मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ९ Swarovski, Vaduz, Innsbruck



२० जून २०२४ 

माउंट टिटलीस,  लुसर्न तलाव यासारख्या अतिसुंदर निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्यानंतर त्यानंतर पाहिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांवर काही प्रमाणात अन्याय होतो.  या निसर्गरम्य ठिकाणांच्या स्मृती मनामध्ये रेंगाळत असतांना दुसऱ्या दिवशी पाहिल्या जाणाऱ्या ठिकाणांमध्ये आपण पूर्णपणे गुंतून जात नाही.  बघूया आज काय होतंय ते! आधी सांगितल्याप्रमाणे झुरिच येथील हॉटेल सोडण्याआधी तिथल्या मॅनेजरने अतुलसोबत जाऊन प्रत्येक खोलीची तपासणी केली. आम्ही सर्वांनी खोल्या टापटीप ठेवल्या असल्यामुळं कोणालाही दंड करण्यात आला नाही. काहीसा खटकण्याजोगा प्रकार परंतु आपल्याच लोकांच्या आधीच्या चुकीच्या वागणुकीमुळं अस्तित्वात आलेला. आपलं बाहेरील देशातील वागणं आपल्या देशाच्या प्रतिमेला कसं बाधा आणू शकतं ह्याची जाणीव करून देणारा!

आमचा प्रवास लिचटेंस्टीन (Liechtenstein) ची राजधानी वडूजच्या दिशेने सुरू झाला.  स्वित्झर्लंड म्हणा की ऑस्ट्रिया, निसर्गांनं या दोन्ही देशांवर सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.  युरोपच्या प्रवासात पवनचक्क्यांसोबत सतत आढळणारी एक गोष्ट म्हणजे शेतात गुंडाळून ठेवलेले गवताचे भारे.  बहुतांशी युरोपीय देश हे दुग्धजन्य पदार्थांचे निर्माते असल्यामुळे तिथं गाई मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्यामध्ये येथील गवताळ प्रदेश शुष्क बनतो.  या कालावधीत नैसर्गिकरित्या गवताचे उत्पादन घेणे शक्य नसल्यामुळं उन्हाळ्यातील गवत व्यवस्थितरित्या गोलाकार आकारातील भाऱ्यांमध्ये बांधून ठेवून हिवाळ्यासाठी त्याची साठवणूक करणे अत्यावश्यक असते.  असे बरेच गोलाकार गवतांचे गठ्ठे / भारे आम्हांला आतापर्यंत दिसत आले होते.  परंतु प्रथमच हा गवताचा भारा पावसाच्या पाण्याने ओला होऊन खराब होऊ नये म्हणून त्याला बहुधा प्लॅस्टिकच्या आवरणात झाकण्यात आले होते.  क्रिकेटवेड्या माणसाला क्रिकेट पिचवर दोन डावांमध्ये किंवा दिवसाच्या प्रारंभीस खेळपट्टीवर फिरवण्यात येणाऱ्या रोलरची आठवण या छायाचित्रानिमित्त झाली. 





प्रवास सुरू असताना झुरीच तलाव आमच्या डाव्या बाजूला आमची साथ देत होता.  'गोड्या पाण्याच्या साठ्याला तलाव म्हणतात' ही शाळेत कधीतरी ऐकलेली व्याख्या ! लहानपणापासून आतापर्यंत पाहण्यात आलेले सर्व तलाव नजरेच्या एका आवाक्यात बसणारे. त्यामुळे बराच काळ बसमधून दिसणाऱ्या गोड्या पाण्याच्या महाकाय साठ्याला काय म्हणावं हा प्रश्न मनात उद्धवला. 




शेतात काम करणारे शेतकरी क्वचितच आतापर्यंत दिसले होते. अचानक शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरलेले दिसले. बहुदा भाकरी झुणका घेऊन एखादा स्विस शेतकरी नांगरणीसाठी शेतात आला असावा अशी मी माझी समजून करून घेतली.  




शेतांमध्ये काही लक्षवेधक अशी दृश्यं दिसत होती ओळीने लागवड केलेली छोटी झाडे हे अशाच दृश्यांपैकी एक.  बहुदा त्यांनी मोठ्या वृक्षलागवडीची सुरुवात केली असावी.  भविष्यातील युरोप सहलींमध्ये स्विस, ऑस्ट्रियन शेतकऱ्यांसोबत 'आमची माती आमची माणसं' ही मालिका निर्माण करण्याचा मानस आहे. 






काही वेळानं डोंगरातून आपल्या आई-वडिलांचा कडक पहारा सोडवून चुकवून जमिनीच्या दिशेने कूच केलेले बालनभ शेताभोवती खेळताना दिसले.  हे दृश्य पाहून 'नभ उतरू आलं' हे गाणं आठवणार नाही असा मराठी माणूस विरळा!



भोवतालच्या पर्वतरांगातील काही पर्वत वेगवेगळ्या पोज देऊन छायाचित्र काढण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करत होते.  आम्हीही खुशीनं  त्यांची इच्छा पूर्ण करीत होतो.  







शेतांनी अधुनमधून  विसावा घेतल्यानंतर दिसणारी टुमदार गावं  आपल्या मनोहर रूपानं आम्हांला भाळून टाकत होती.  या गावातील लोकांचं आयुष्य कसं असावं याविषयी नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.  संध्याकाळी गावातल्या पारावर ही मंडळी गप्पा मारत बसत असावी ही माझी सुप्त इच्छा!  

काही वेळानं आम्ही वडूस (vaduz) इथं पोहोचलो. वडूस हे शहर लिचटेंस्टीन  (Liechtenstein) या युरोपातील एका छोटुल्या देशाची राजधानी आहे. इथं या देशाच्या संसदेची वास्तू आहे. र्हाईन नदीच्या काठावर वसलेल्या वडूज शहराची लोकसंख्या सहा हजाराच्या आत आहे असं माहितीमायाजाल सांगतं. हे वाचून मला उगाचच पाच हजार फेसबुक मित्र असलेल्या काही लोकांची आठवण झाली. वडूस किल्ला हा या शहरातील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे. या छोटेखानी शहरातून हा प्रासाद सदृश्य किल्ला आपल्याला विविध रूपांतून सामोरा येत असतो, जसा की आयफेल टॉवर पॅरिस मधून!  वडूस मध्ये देशाचा राजपुत्र, राजघराणे वास्तव्य करून आहे.  

वडूस शहराची ट्राममधून केलेली सफर हा एक अत्यंत आनंददायी अनुभव होता.  हे एक जुन्या काळाशी नातं जपून ठेवलेलं युरोपातील छोटं गाव.  काळानुसार बदलण्याची फारशी घाई  ना इथल्या रहिवाशांना ना इथल्या लोकप्रतिनिधींना.  अशा शहरातून शांतपणे जाणारी ट्राम या शहराच्या दैनंदिन दिवसात डोकावून पाहण्याची आम्हांला संधी देत होतं.  लोक आपल्या मर्जीनुसार शांतपणे  रस्त्यावरून मार्गक्रमण करत होते.  ज्या भागात कडाक्याचा हिवाळा असतो त्या भागातील लोकांची उन्हाळ्यातील मनोवृत्ती जाणून घेणं आपल्यासारख्या उष्णकटिबंधात राहणाऱ्या लोकांसाठी आवश्यक आहे. जी माणसं वर्षातील चार-पाच महिने घरात थंड वातावरणाचा मुकाबला करत बसून राहिलेली असतात,  अशा माणसांना उन्हाळा म्हणजे हिवाळ्यातील निष्क्रियतेच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी आणि चैतन्यदायी सूर्यकिरणांमध्ये स्वतःला न्हाऊन घेण्यासाठी  निसर्गाने दिलेली एक मोठी संधी असते.  त्या संधीचा ही लोकं पुरेपूर वापर करून घेत असतात.  

वडूज ट्रामचा फोटो !





ट्राम मध्ये ऐकण्यासाठी श्रवणयंत्र देण्यात आली होती. उपलब्ध भाषांमध्ये हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध होता हे पाहून अभिमान वाटला. 



गावातील घरं अर्थातच जुन्या धाटणीची होती.  बहुतांशी सर्व वाईन यार्ड  या राजघराण्याच्या मालकीच्या आहेत असं आम्हांला सांगण्यात आलं. या वाईन यार्डमधून निर्माण होणारी बहुतांश वाईन या राजघराण्यांतील खाश्या  मंडळींच्या पोटात जात असते असे आम्हाला सांगण्यात आले. खरं खोटं देव आणि अतुल जाणे!






वडूज प्रासादसदृश्य किल्ला !


निवांत शेत !


वडूस शहरातील फेरफटक्यात काढलेले व्हिडीओ !




वडूज गावात अनेक ठिकाणी सुंदर फुलांनी दर्शन दिलं !






गूढ आकृती !



ट्रामचा प्रवास आटोपल्यानंतर आम्ही खरेदीसाठी तेथील एका दुकानात गेलो.  इथं पोस्टाची तिकिटं, स्मृती चिन्हं,  किल्ल्या, सूरी, काचेचे ग्लास, टी-शर्ट, स्वेटर्स अशी विविध वस्तू विक्रीसाठी महाग पण आकाशाला न भिडलेल्या दरात  उपलब्ध होत्या.  या दुकानात आमचा प्रवेश झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांतच एक नाट्यमय अशी घटना घडली.  एक भारतीय महिला काउंटरवर विकत घेतलेल्या वस्तूंचे पैसे देत असताना ती आणि काउंटरवरील माणसामध्ये  झालेल्या गैरसमजूतीमुळं तिच्यावर शॉपलिफ्टिंगचा आरोप करण्यात आला.  दोन मिनिटं प्रकरण हाताबाहेर जातं  की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  त्या काउंटरवरील माणसाने काहीशी आक्षेपार्ह अशी भाषा वापरली होती. सुदैवानं तो थोड्या वेळात काहीसा नरमला, प्रकरण मिटवण्यात आलं.  परंतु या घटनेमुळे खरंतर त्या दुकानातून फारसं काही घेण्याची इच्छा राहिली नाही. इथली खरेदी आटपून धावतं छायाचित्रण सत्र आटपण्यात आलं. 


ते झाल्यानंतर आमची बस दुपारच्या भोजनासाठी Restaurant Schlossle Mahal Vaduz या उपहारगृहाच्या दिशेने निघाली.  लोकवस्तीमध्ये असलेलं हे उपहारगृह महंता नामक असामी सदगृहस्थाने चालवलेलं आहे. गेले ३७ वर्ष तो या व्यवसायामध्ये स्थिरावला आहे.  येथील थंड हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी होतं. त्यामुळं बराचसा भाजीपाला हा उष्ण हवामान असलेल्या इटलीमधून  मागवला जातो असं त्यांनी सांगितलं.  काही उपहारगृहांमध्ये जागेची टंचाई असल्यामुळे जरी बुफे प्रकारातील जेवण असलं तरी आपण जागेवरच बसून राहणं अपेक्षित असते.  उपहारगृहाचा कर्मचारीवर्ग आपल्याला हवं नको ते टेबलावर आणून देत असतो.  या उपहारगृहात महंताने देवघराची स्थापना सुद्धा केली आहे.  जेवणानंतर आईस्क्रीमचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतला.  मुंबईत एक आईस्क्रीम घेताक्षणी सर्दी होणारा आदित्य दररोज आईस्क्रीम खातो हे दृश्य घरच्यांसाठी आणि आदित्यासाठी सुद्धा काहीसं आश्चर्यजनक होतं.  

हे उपहारगृह अगदी भरवस्तीत असल्यामुळे इथे रस्ता ओलांडून जाऊ नये, उगाचच लोकांच्या घरांचे फोटो काढू नये अशा सूचना आम्हांला देण्यात आल्या होत्या.  स्थानिक लोकांच्या शांत जीवनपद्धतीचा आदर करावा हे सूचित करणाऱ्या या सूचनांचे आम्ही मनापासून पालन केले.  भरपेट जेवण करून सुस्तावलेले असे आम्ही आता स्वरोवस्कीच्या दिशेने निघालो. खरंतर स्वरोवस्की हा जगप्रसिद्ध ब्रँड, पण शिंपोलीच्या पीटर इंग्लंड, वॅन हुसेनमधून अर्ध्या तासात वर्षभरात लागणाऱ्या शर्टाची खरेदी करणारा मी ह्याविषयी अनभिज्ञ होतो.  अतुलच्या तोंडून स्वरोवस्की हे खरेदीसाठी उच्चभ्रू लोकांच्या खरेदीसाठी सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे हे ऐकून काहीसे दडपण आले.  परंतु एक बरं असतं अशा ठिकाणच्या किंमती गगनाला इतक्या भिडलेल्या असतात की बहुतांश लोक अशा ठिकाणच्या खरेदीपासून दूरच राहतात.  

स्वरोवस्कीकडे जाणारा रस्ता वळणावळणाच्या घाटातून जाणारा, अतिसुंदर निसर्गदृश्यांची उधळण करणारा असा रस्ता आहे.  नक्की उजव्या दिशेने पाहावं  की डाव्या दिशेने हा निर्णय करणं कठीण होत राहतं.  ह्या छायाचित्रातील वाट पाहून 'ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा'  गाण्याची आठवण झाली. 



अशा लांबवरच्या प्रवासात क्वचितच हार्ली डेविडसन या जगप्रसिद्ध कंपनीच्या  बाईकवरून देशभर, खंडभर प्रवास करणाऱ्या हौशी बायकर्सचे ग्रुप भेटतात.  हे समूहानं प्रवास करीत असतात. महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या बसच्या अवतीभवती हा गट आला की बसचे ड्रायव्हर थोडी काळजी घेतात. आमच्या जवळून असाच एक गट गेला. जॅकने बसचा वेग थोडा कमी केला. एकत्र राहण्याचा या बायकर्सचा प्रयत्न असल्यामुळे कधी कधी महामार्गावरील त्यांचं ड्रायव्हिंग धोकादायक व्याख्येकडं झुकणारं असतं असं आपण म्हणू शकतो. जॅकनं पाश्चिमात्य गाणी बसमध्ये सुरु केली होती. मलाही उगाचच युरोपिअन वाटू लागलं होतं. बसमधील प्रवाशांनी नेमकं त्याचवेळी खाकरा, चकल्या अशा अस्सल भारतीय पदार्थांचं वाटप सुरु केल्यानं माझं हे युरोपिअन वाटणं अकाली आवरलं गेलं.  

एकदाचे आम्ही स्वरोवस्कीला पोहोचलो. 


ह्या माणसाच्या तोंडातून सतत पाण्याचे कारंजे का येत राहतात हा अभ्यासू वाचकांसाठी आजच्या पोस्टमधील पहिला प्रश्न! उत्तर शोधून टिपणीमध्ये समाविष्ट करावं ! स्वरोवस्की क्रिस्टल वर्ल्ड (Swarovski Kristallwelten (Crystal Worlds)) हे काचेच्या चमकदार वस्तू बनविणाऱ्या स्वरोवस्की ह्या प्रसिद्ध उत्पादकासाठी बनविण्यात आलेले एक आकर्षक असं पर्यटन स्थळ आहे. हे १९९५ ह्या वर्षी वॅटेन्स ह्या शहरात बनविण्यात आले. ह्या शहरातच स्वरोवस्कीचे मुख्य कार्यालय आहे. 

इथं नेहमीप्रमाणं आम्हांला प्रवेश तिकिटं देण्यात आली. सर्वप्रथम आम्ही 'चेम्बर्स ऑफ वंडर्स' (अद्भुत विश्वातील दालनं) मध्ये प्रवेश केला. एकंदरीत इथं अठरा आश्चर्य आहेत. त्यांची नावं खालीलप्रमाणे 

Blue Hall
Silent Light
Crystal Dome
The Art of Performance
Into Lattice Sun
Ready to Love
Ice Passage
Umbra
Transparent Opacity
Chandelier of Grief
Studio Job Wunderkammer
La Primadonna Assoluta
Eden
FAMOS
55 Million Crystals
Heroes of Peace
El Sol
Timeless

जगप्रसिद्ध कलाकारांनी प्रचंड विचार करून ही आपल्याला तथाकथित अद्भुत विश्वात नेऊन आणणारी दालनं बनविली आहेत.  अशा ठिकाणी जाताना थोडा अभ्यास करून जाणं खरोखर आवश्यक आहे. ही दालनं कोणी बनविली, त्यामागं नक्की कोणती संकल्पना आहे हे जर माहिती नसेल तर केवळ एक वेगळा दृक श्राव्य अनुभव घेऊन आपण ह्या दालनातून बाहेर पडतो.  का कोणास ठाऊक ह्या संकल्पना वगैरे जाणून घेण्यात मला कधीच रस नसतो. अभ्यासू वाचकांसाठी आजचा दुसरा गृहपाठ. वर दिलेल्या अठरा दालनांच्या आणि खाली दिलेल्या त्यातील काही दालनांच्या छायाचित्रांच्या जोड्या लावा! आपण खरोखरच अभ्यासू किंवा जाणकार असाल तर प्रत्येक दालनाच्या संकल्पनेविषयी मला समजावून सांगा !


























त्यानंतर आम्ही खरेदी विभागात प्रवेश केला. तिथं काही वेळ व्यतित करून आम्ही बाहेर पडलो. बाहेरील एका कॅफेमध्ये चहा / कॉफी प्राशन केलं. तिथं असलेल्या कारंज्याचं एक अप्रतिम छायाचित्र ! निळा रंग आपल्या सर्वोत्तम रूपात ! 


ह्या पोस्टमध्ये चेंबर ऑफ वंडर्स, जगप्रसिद्ध स्वरोवस्की खरेदी केंद्र ह्याला योग्य न्याय मिळाला नाही. ह्यामागं माझी शॉपिंगमधील अनुत्सुकता, अद्भुत विश्वाविषयीची अरसिकता ह्या गुणधर्माचा समावेश होतो. आपल्या मूळ स्वभावाला बदलण्यासाठी आवश्यक असणारी लवचिकता दाखवणारच नाही ह्या धोरणाला टिकून राहायचं की न आवडणाऱ्या गोष्टीत रस घेतोय हे दाखविण्याचं नाटक करायचं ह्यातील एका पर्यायाची निवड प्रत्येक प्रौढ व्यक्तीस करावी लागते. हे विधान चेंबर ऑफ वंडर्स च्या बाबतीतच नाही तर जीवनाला सुद्धा लागू होतं. आयुष्यात तुम्ही किती सुदैवी ठरला आहात हा घटक ह्यातील एका पर्यायाची निवड करण्यात महत्वाचा ठरतो. 

आता आमची वाटचाल इन्सब्रुक शहराच्या दिशेनं सुरु झाली होती. हे ऑस्ट्रियातील पाचव्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. 




उंच पर्वतातील सपाट भूभागात वसलेलं इन्सब्रुक हे हिवाळी खेळांसाठी जगातील सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे. इथं १९६४, १९७६ सालच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा तसेच १९८४, १९८८ सालच्या पॅरालिम्पिक स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रियाला पहिल्या महायुद्धाची मोठी झळ बसली असली तरी तुलनेनं इन्सब्रुक ह्या महायुद्धात सुरक्षित राहिलं. दोस्त राष्ट्रांनी १९१८ साली एकदाच ह्या शहरात आसरा घेतलेल्या ऑस्ट्रियन सैन्यावर हवाई हल्ला केला होता. ह्यात शहराचं फारसं नुकसान झालं नाही. 




शहरात आम्ही एक उत्साहवर्धक असा फेरफटका मारला. सायंकाळच्या सुर्याच्या पिवळ्याजर्द उन्हात जुन्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर सायकलवरून फिरणारी, रस्त्यावरून चालणारी माणसं पाहणं हा एक चांगला अनुभव होता. इथं अनुभव ह्या शब्दाआधी चांगलं पेक्षा अधिक चपखल  असं कोणतं विशेषण वापरायचं ह्यासाठी मराठी भाषेवर प्रभुत्व असायला हवं !  

सूर्यकिरणांत न्हाऊन निघालेली शुभ्र वास्तू !


आम्ही आता इन्सब्रुकचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सुवर्णछत (
Goldenes Dachl ((Golden Roof )) ह्या पर्यटनस्थळाकडे निघालो होतो. १५०० साली बांधून झालेल्या ह्या वास्तूचे छत २६५७ सोन्याचा गिलावा दिलेल्या ताम्र फरशांनी सुशोभित करण्यात आलं आहे.  सम्राट मॅक्सिमिलन आणि बियांका मारिया स्फोर्झा ह्यांच्या विवाहानिमित्त हे सुशोभीकरण करण्यात आलं होतं. ह्या वास्तूसमोरील चौकात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांच्या, स्पर्धांच्या वेळी ह्या बाल्कनीत येऊन मॅक्सिमिलन आणि बियांका जनतेस दर्शन देत असत. 





ह्या परिसरात कॅफे आणि अनेक वस्तूंची दुकाने आहेत. ह्यावेळी युरो सामना सुरु असल्यानं आऊटडोर कॅफेमध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर बरेचजण त्या सामन्याचा आनंद घेत होते. माझं लक्ष वेधून घेणारं टोप्यांचं इथलं एक दुकान !


आता वाटचाल सुरु झाली होती ती ऑलीम्पिया ह्या डोंगरकुशीत वसलेल्या आमच्या हॉटेलच्या दिशेनं ! रस्त्यातील काही नयनरम्य दृश्यं !




डोंगरातील दुर्गम भागात राहणाऱ्या रहिवाशांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी खासगी केबलकार !




हॉटेल ऑलीम्पियाच्या भोवतालच्या परिसराचं वर्णन करायचं तर शब्द अपुरे पडतात. तीन हिरव्यागार डोंगरांच्या मध्यात वसलेलं हे परिसरातील एकुलतं एक हॉटेल. 




ह्या परिसराचं खरं सौंदर्य वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून तत्त्वाला मुरड घालून जॅकच्या ड्रोन कॅमेराने टिपलेला हा व्हिडिओ.  


डोंगरांवर रात्रीचे नऊ वाजले तरी चरणाऱ्या गाईंच्या गळ्यातील घंटानाद त्या तिन्ही डोंगरात सामावलेल्या परिसराला व्यापून टाकत होता. एक अद्भुत अनुभव होता हा ! 


सोयी अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या असल्या तरी खोल्या प्रचंड मोठ्या होत्या. सहा पलंग होते. इथं बहुसंख्येनं स्कीईंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक स्वरूपाच्या सोयी असल्या तरी चालून जातं असं अतुल म्हणाला. 


हे ठिकाण हिवाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. भोवतालचा सर्व परिसर केवळ बर्फानं व्यापलेला असतो. माहिती मायाजालावरून घेतलेलं हे हॉटेलचं हिवाळ्यातील छायाचित्र!  



रात्रीच्या भोजनासाठी विस्तृत भोजनकक्ष होता. जेवणासाठी युरोपिअन पद्धतीचे भरपूर पर्याय उपलब्ध होते. इथं मी भरपेट जेवलो. एका क्षणी ह्या पुढील दिवसात जेवणावर नियंत्रण आणलं पाहिजे ह्याची मला जाणीव झाली. त्या दृष्टीनं केलेला निर्धार मी सहलीच्या शेवटापर्यंत पाळला. 

आजच्या दिवसाचा सारांश घ्यायचा झाला तर वडूस शहरातील फेरफटका ही नक्कीच संस्मरणीय भेट होती. आपलं जुनंपण जपून ठेवणाऱ्या पण तरीही पर्यटकांना त्यात डोकावून पाहण्याची संधी देणारं हे शहर. अद्भुत कक्ष, महागड्या वस्तूंचं दर्शन घडवणारं सरोवस्की आणि डोंगराच्या कुशीत लपलेलं हॉटेल ऑलीम्पिया. ही युरोप सहल दररोज युरोपचे नवनवीन पैलू आमच्यासमोर उलगडत होती. मनःपटलावर खूप काही नोंदलं जात होतं. निसर्गाची बहुविध थक्क करणारी रूपं, युरोपचा अत्यंत मनोवेधक पण काहीसा रक्तरंजित इतिहास, युरोपातील लोकांचं कलाप्रेम सारं काही आम्हांला अनुभव संपन्न करत होतं. 

मागील भागात लुसर्न नदीतील फेरीतील शेयर करायचा राहून गेलेला एक व्हिडिओ !



ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया / माहितीमायाजाल 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 
(क्रमशः )
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रस्त्यावरील पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट - वसईतील आठवणी

काल आमच्या शाळेच्या व्हाट्सअँप ग्रुपवर गावात मैदानावर तात्पुरता पडदा उभारून त्यावर दाखविल्या जाणाऱ्या शिणुमाविषयीची एक पोस्ट आली. आमचे शालेय...