युरोप सहलीचा बेत खरं तर २०२० मध्ये आखला होता. त्यावेळी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा व्हिसा मिळाला सुद्धा होता. शेंघेन व्हिसासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू असतानाच कोविड सुरू झाला. अर्थातच सर्व सहली पुढे ढकलल्या गेल्या. २०२२ पर्यंत सहली सुरू झाल्या नव्हत्या किंवा मर्यादित प्रमाणात सुरु होत्या. त्यानंतर वीणा वर्ल्डने आमच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. आमच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला म्हणजे बुकिंगसाठी दिलेल्या काही रकमेवर पाणी सोडून बाकी रक्कम परत घेणे. दुसरा पर्याय म्हणजे आता वाढलेल्या किंमतीनुसार फरक भरून काढून उपलब्ध असलेल्या सहलीमध्ये सहभागी होणे. २०२३ साली आम्हां सर्वांचे वेळापत्रक वीणा वर्ल्डच्या उपलब्ध असलेल्या सहलींच्या वेळापत्रकासोबत न जमल्यामुळे तेव्हा आम्ही युरोप सहलीला जाऊ शकलो नाही.
साधारणतः २०२३ च्या उत्तरार्धात वीणा वर्ल्डने आता ही रक्कम अशीच राखून ठेवणे शक्य होणार नाही असा निर्वाणीचा खलिता पाठविला. त्यामुळे एकतर भारतातील सहलींसाठी ही रक्कम वापरणे किंवा तात्काळ युरोप सहलींचे नियोजन करणे हेच पर्याय आमच्यापुढे शिल्लक राहिले. आम्ही दुसऱ्या पर्यायाची निवड करत "युरोपियन हायलाईट" ही १३ जूनपासून सुरू होणारी बारा दिवसांची सहल निवडली.
साधारणतः फेब्रुवारीमध्ये सहलीची निवड केल्यानंतर इंग्लंडचा व्हिसा आणि शेंघेन व्हिसा यासाठी तयारी सुरू झाली. दोन्ही व्हिसासाठी बऱ्यापैकी सारख्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने तुमच्या बँक अकाउंटमध्ये गेल्या सहा महिन्यात बचत खात्यामध्ये उपलब्ध असलेली सरासरी रक्कम, तुमच्या मुदत ठेवींची माहिती, तुमच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती, तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तुमच्या कंपनीकडून सहलीच्या कालावधीसाठी तुमची सुट्टी मंजूर झाल्याचे पत्र इत्यादी माहितीचा समावेश होतो. यातील बरीचशी माहिती आपल्या खाजगी माहितीत समावेश होते अशी भावना निर्माण होते. मुख्य म्हणजे ही माहिती त्या देशांच्या वकिलातीपर्यंत पोहोचेपर्यंत मध्यस्थ कर्मचाऱ्यांना देखील ही माहिती उपलब्ध होते. हे खरोखरच आवश्यक आहे काय हा प्रश्न निर्माण होतो.
ही बाब वगळता वीणा वर्ल्डतर्फे व्हिसाचे नियोजन करणे हा एक चांगला अनुभव असतो. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीणा वर्ल्ड तुम्हाला खूप सहकार्य करते. तुम्ही भरलेल्या अर्जाची सखोल छाननी करून त्यात काही चुका असल्यास त्या तुम्हांला दुरुस्तीसाठी पाठवून देण्यात येतात. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि शेंघेन देशांपैकी ज्या देशाच्या व्हिसा मुलाखतीसाठी सर्वात पहिली तारीख मिळू शकते त्या देशाच्या वकिलातीमध्ये व्हिसासाठी तुम्हाला तारीख मिळवून देण्यात वीणा वर्ल्ड अत्यंत मोलाचे सहकार्य करते. प्रत्येक माणसाच्या दृष्टीने वेळ आणि पैसा या दोन महत्त्वाच्या घटकांपैकी प्राधान्यक्रम ठरलेला असतो. काहींसाठी वेळ महत्त्वाचा तर काहींसाठी पैसा! तुम्ही स्वतः ही संपुर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुमचा पैसा वाचेल पण तुम्हांला त्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल, हजारो लोकांचे व्हिसा करून दिलेल्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाला तुम्ही मुकाल. हे काही मोठे क्लिष्ट काम आहे असे मला म्हणायचे नाही. परंतु ते मोठे डोकेदुखीचे काम आहे हे मात्र नक्की! यामुळे वीणा वर्ल्डचा या प्रक्रियेतील सहभाग आमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरला असे मी म्हणेन.
आम्हांला इंग्लंड व्हिसासाठी वांद्रा, कुर्ला संकुलात बोलवण्यात आले. शेंघेन व्हिसासाठी आम्ही महालक्ष्मी येथील ऑफिसमध्ये गेलो. दोन्ही ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजित केलेली प्रक्रिया आहे. सर्वप्रथम तुम्ही आणलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. या कार्यालयात ज्या क्रमानं कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्याच क्रमवारीने वीणा वर्ल्डने आम्हांला कागदपत्रांची आखणी करून दिली होती. त्यामुळे तेथील कर्मचारी वर्गांची बरीच मेहनत वाचली. ही कागदपत्रांची छाननी करून झाली की मग पुढे तुमचे बायोमेट्रिक, व्हिसाची फी भरणे इत्यादी सोपस्कार पार पाडले जातात. या सर्व प्रकारास दीड तास लागतो. त्यानंतर एका वकिलातींद्वारे सर्व तपासणी होऊन एका आठवड्यात तुमची पारपत्र तुमच्या घरी कुरियरने पोहोचवली जातात. ह्या कार्यालयात जाऊन पारपत्र स्वीकारण्याचा पर्याय सुद्धा तुमच्यासमोर उपलब्ध असतो. परंतु इतक्या उन्हात या दोन लांबच्या ठिकाणी पुन्हा जाण्यापेक्षा थोडे अधिक पैसे देऊन पारपत्रे घरी स्वीकारण्याचा पर्याय आम्ही निवडला.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्हिसासकट पारपत्रे आमच्या हाती आली होती. त्यामुळे एक प्रकारची काहीशी आश्वासकता निर्माण झाली होती. आता सहलीची तयारी करण्यास आम्ही मोकळे होतो. वीणा वर्ल्ड युरोपच्या सहलीसाठी जाणाऱ्या भावी प्रवाशांना माहिती देण्यासाठी अनेक झूम बैठकींचे आयोजन केले जाते करते. त्यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होतो.
- सहलीमध्ये घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारी पौंड, युरो रक्कम
- सहलीत किती बॅगा घेऊन जाव्यात. चेक इन, केबिन बॅगांची संख्या किती असावी? त्यात नेऊ शकू अशी शिफारस करण्यात आलेल्या गोष्टी.
- युरोपमध्ये आपल्या मौल्यवान गोष्टींची कशी काळजी घ्यावी. पारपत्र हरवल्यास किती गंभीर प्रसंगास तोंड द्यावे लागू शकते ह्याची आपणास वारंवार जाणीव करून दिली जाते.
- युरोपात हॉटेलमधील खोल्या आकाराने अगदी छोट्या असतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सुद्धा घेतला. एका हॉटेलात आमच्या तिन्ही बॅग्स उघडल्यानंतर संपूर्ण खोली व्यापून गेली होती.
- इथे सार्वजनिक नळातील पाणी थेट तुम्ही घेऊन गेलेल्या बाटलीमध्ये भरून पिऊ शकता. त्यामुळं रिकामी बाटली नेणं आवश्यक आहे. ह्या विधानावर उगाचच भुवया उंचावू नये.
- सुके खाद्यपदार्थ नेणे आवश्यक आहे की नाही ह्यावर मार्गदर्शन करण्यात येतं. माझ्या अनुभवानुसार तुम्ही वीणा, केसरीसारख्या कंपन्यांद्वारे प्रवास करत असाल तर सुक्या खाद्यपदार्थांची अजिबात आवशक्यता नाही.
- लोकरी कपडे किती न्यावेत.
- युरोपातील कित्येक ठिकाणी आढळणाऱ्या चोरट्यांपासून आपल्या मौल्यवान वस्तूंचे कसे संरक्षण करावे.
सतत बारा दिवस प्रवास करत असल्यामुळे कपड्यांचे नियोजन हे प्रत्येकाने आपापल्या सवयीनुसार, आवडीनुसार करणे आवश्यक आहे. बहुतेक विमानकंपन्या तुम्हाला दोन चेक इन बॅग्स नेण्यास परवानगी देतात. वीणा किंवा तत्सम प्रवास कंपन्यांबरोबर आपण स्वदेशामध्ये प्रवास केला असल्यास आपण अत्यंत खुशीत असतो. हॉटेलमधील खोली ते प्रवासाची बस यामध्ये बॅग्सची ने आण करण्यासाठी हॉटेलमधील कर्मचारी आपल्याला मदत करतील अशी नियोजन ह्या प्रवासकंपन्यांनी केलेले असते. परंतु परदेशामध्ये मात्र मनुष्यबळ इतक्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने किंवा असे मनुष्यबळ उपलब्ध करणे ही खर्चिक बाब असल्यानं आपल्या बॅग्सची बस ते हॉटेलची खोली यामधील ने आण आपल्यालाच करावी लागते. त्यामुळे माणशी दोन चेकिंग बॅगा हा योग्य पर्याय असू शकत नाही. बऱ्याच वेळा या बस हॉटेलपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर थांबतात. अशावेळी दोन चेकिंग बॅगा, एक केबिन बॅग स्वतः वाहून नेणे हे बहुतांशी प्रवाशांना सहजसाध्य होत नाही. त्यामुळे "Travel Light Travel Smart" या तत्त्वाचे अंगीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
सतत बारा दिवस तुम्ही घराबाहेर राहता. युरोपातील ज्या हॉटेलमध्ये आपण वास्तव्य करतो तिथं वॉशिंग मशीन सहजासहजी उपलब्ध असल्याचे मी तरी पाहिले नाही. जरी ती उपलब्ध असली तरी कपडे धुण्याचे आणि वाळवण्याचे वेगळे मशीन अशा एकंदरीत प्रकारात तुमचा सहजासहजी दीड दोन तास वाया जाण्याची शक्यता असते. बहुतांशी वेळा रात्रीचे जेवण आटपून आम्ही खोलीत प्रवेश करेस्तोवर दहा वाजले होते. सकाळचा गजर सर्वात लवकर तीन वाजता आणि सरासरी सहा वाजता होत असे. या सर्व प्रकारात हॉटेलमधल्या लॉन्ड्रीचा वापर करत कपडे धुणे हे बऱ्यापैकी कठीण आहे. त्यामुळे तुम्ही बारा दिवसांचे कपडे आपापल्या सवयीनुसार घेऊन जाणे आवश्यक आहे. आता यामध्ये अधिक खोलात शिरणे मी प्रशस्त समजत नाही. केवळ दोन जीन्सवर बारा दिवस काढणारी मंडळी सुद्धा असू शकतात असे विधान करून मी या विषयावर पडदा पडत आहे. सोशल मीडियावरील सर्व फोटोत दोनच रंगांच्या जीन्स दिसतील हे योग्य आहे का अशा शंका असतील तर त्यावर विविध उपाय आहेत.
भले तुम्ही दोन आठवडाभर आधी पॅकिंगला सुरुवात करा. खरं पॅकिंग हे प्रवासाच्या आदल्या दिवशी होते. त्यावेळी रात्री झोपताना सर्व चेक-इन बॅगा कुलूपबंद करून दिवाणखान्यात आणल्या गेलेल्या असाव्यात. लॉकसाठी टीएसए कुलुपं नावाचा प्रकार असतो. माझ्या समजूतीनुसार सुरक्षा यंत्रणेकडे टीएसए कुलुपं उघडू शकतील अशा किल्ल्या असतात. त्यामुळे जर त्यांना संशय आला तर ते त्या किल्ल्यांद्वारे टीएसए कुलुपं लावलेल्या बॅग्स उघडून तपासणी करून पुन्हा त्या बंद करून ठेवतात. जर तुम्ही या कुलुपांव्यतिरिक्त दुसरी कुलुपं वापरलीत तर त्यांना ती कुलुपं तोडण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नसतो. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात अशी कुलुपं फोडली गेली होती. परंतु तो अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रवास असल्याने त्यांनी आमच्यासाठी दुसरी कुलुपं बॅगेमध्ये ठेवली होती. असो!
ज्याक्षणी तुम्ही विमानतळासाठी बोलावलेल्या टॅक्सीचे इमारतीखाली आगमन झालं आहे असा टॅक्सी चालकाचा मेसेज किंवा फोन येतो त्यावेळी दोन मिनिटं थांबून आपल्या सर्वांची पारपत्रे आणि आपण घेतलेले परकीय चलन हे नक्की कोणत्या बॅग्समध्ये आहे याची खातरजमा करून घ्यावी. संपूर्ण प्रवासामध्ये या दोन गोष्टी शक्यतोवर एकाच ठिकाणी ठेवाव्यात आणि ह्या बॅग / पाकिटाकडं दुर्लक्ष करण्याचा वेंधळेपणा करू नये. प्रत्येक ठिकाणी बसमधून उतरताना पारपत्र आपल्यासोबत घेऊन जाण्याची दक्षता घ्यायला हवी. आता चलनाच्या बाबतीत! हल्ली चलन तुम्ही रोख रकमेच्या स्वरूपात घेऊ शकता किंवा तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी सक्षम करू शकता किंवा फॉरेक्स कार्ड घेऊ शकता. तुम्ही जरी कार्डद्वारे परदेशात खरेदी करणे हा योग्य पर्याय समजत असाल तरी काही दुकानांमध्ये ही स्वीकारली न जाण्याची शक्यता असल्यानं तुमच्यासोबत किमान रोख रक्कम असणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये केवळ पौंड स्वीकारले जातात. बाकी सर्व युरोपियन देशांमध्ये युरो स्वीकारले जातात. आम्ही भेट दिलेल्या देशांमध्ये याला अपवाद स्वित्झर्लंडचा होता. तिथलं स्थानिक चलन स्विस फ्रॅंक आहे. त्यामुळे ते तुम्हाला शिलकीची रक्कम फ्रॅंक नाण्यांमध्ये देतात. आता फ्रॅंकमधील नोटा व नाणी हे दोन वेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर भारतात परकीय चलन परत आणून ते स्वीकारणाऱ्या आस्थापनांमध्ये गेलात तर तिथे नोटा स्वीकारल्या जातील परंतु नाणी नाहीत. त्यामुळे स्वित्झर्लंडमधून बाहेर पडताना सर्व फ्रॅंकची नाणी खरेदीसाठी वापरून टाकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर युरोप प्रवास समाप्तीआधी युरोपमधील सर्व नाणी खरेदीसाठी वापरावीत. मी या गोष्टींकडे पैसे वेगळ्या प्रकारे बघतो. माझ्याकडे अशी सुट्टी नाणी बरीच आहेत. अशीच ही नाणी पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करून दीडशे दोनशे वर्षानंतर त्यांना दुर्मिळ वस्तूंचा खजिना उपलब्ध असेल अशी माझी विचारसरणी आहे.
आमचं लंडनला जाणार विमान खरं तर दुपारी पावणेदोन वाजता मुंबई विमानतळावरून निघणार होते. परंतु एक दिवस आधी या विमानाची वेळ पुढे आणण्यात आली असून आता हे विमान एक वाजून दहा मिनिटांनी विमानतळावरून निघेल असा संदेश आम्हांला एअर इंडिया आणि वीणा वर्ल्ड या दोघांकडून आला. आतापर्यंतच्या इतिहासात विमान आधी सुटण्याचा ( ते ही केवळ पत्तीस मिनिटं) संदेश येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी स्वतःला चिमटा काढून हे खरोखरच होत आहे ना याची खात्री करून घेतली. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी चार तास आधी विमानतळावर हजर व्हायला हवं असा नियम मी स्वतःसाठी घालून घेतला आहे. बरेचजण यावर माझी फिरकी घेतात. परंतु मी याबाबतीत ठाम आहे. मर्फी नामक सद्गृहस्थाचा नियम आहे - एखादी गोष्ट चुकीची घडण्याची जर शक्यता असेल तर ती केव्हातरी नक्कीच चुकीची घडणार. विमानतळावर प्रवेश करण्याआधी सुरक्षाकर्मचाऱ्याने केलेली तपासणी, चेकइन बॅग्स एअरलाईनला हस्तांतरित करून बोर्डिंग पास घेणं, सुरक्षातपासणी, इमिग्रेशन आणि इच्छित गेटसमोर उड्डाणाआधी एक तास पोहोचणं ह्या सर्व सोपस्कारांचा विचार करता हे चार तास आवश्यक आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे.
कंपनीद्वारे होणारा विमानप्रवास बिझनेस क्लासने होत असल्यामुळे तिथं ही सर्व प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडते. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी इकॉनॉमी क्लासने करत असलेल्या या प्रवासाविषयी माझ्या मनात काहीशी साशंकता निर्माण झाली होती. त्यामुळे घरच्या सर्वांना लवकरात लवकर निघण्याची मी विनंतीवजा धमकी देत होतो. एक वाजून दहा मिनिटाचे विमान लक्षात घेता त्यातून चार तास वजा केले तर नऊ वाजून दहा मिनिटांनी विमानतळावर पोहोचायला हवे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग हा आठ वाजल्यानंतर कांदिवलीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपासून अत्यंत गजबजलेला असतो. आठ वाजल्यानंतर त्या बिंदूपासून विमानतळावर पोहोचण्यासाठी नक्की किती वेळ लागू शकतो याविषयी छातीठोकपणे कोणताही तज्ञ सांगू शकत नाही. त्यामुळे असे सर्व अशाश्वततेला आमंत्रण देणारे घटक लक्षात घेता घरातून साडेसात वाजता सर्वांनी निघावे असे फर्मान मी काढले. सर्व आटपून आम्ही पावणेआठ वाजता विमानतळाकडं प्रस्थान केलं. सुदैवाने पश्चिम द्रुतगती मार्ग हा बऱ्यापैकी मोकळा होता. आम्ही त्यामुळे साडेआठ वाजता विमानतळावर पोहोचलो. आमच्या सोबत माझी मोठी बहीण सुस्मितताई आणि तिचे यजमान संदीपभाई सुद्धा होते. ते अंधेरीहुन निघाले होते. आमची लगबग ध्यानात घेता ते सुद्धा लवकरच निघाले होते. योगायोगाने ते आणि आम्ही एकाच वेळी विमानतळावर पोहोचलो. तेथील सुरक्षा रक्षकाने आमच्या तिकिटांकडे पाहत तुम्ही इतक्या लवकर का आलात अशी प्रश्नार्थक मुद्रा केली. ती मुद्रा प्राजक्ताने माझ्याकडे हस्तांतरित केली. कोणत्या क्षणी आकाशाकडे पाहावे हे इतक्या वर्षानंतर मला नक्की ठाऊक असल्यामुळे मी आकाशातील ढगांकडे पाहत असल्याचे ढोंग केले. थोड्याच वेळात आम्ही एअर इंडियाच्या चेक इन रांगेत होतो. माझ्या दुर्दैवाने म्हणा पण इथं सुद्धा कोणीच नव्हते. त्यामुळे लगेचच आम्ही तेथील स्त्री कर्मचाऱ्याच्या समोर आमच्या पाच चेक इन बॅग्स घेऊन हजर होतो. तिथेच आमची वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर अतुल भोबे यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी माणशी एक अशी ठेपल्याची पाच पाकिटे आमच्या स्वाधीन केली. थोड्याच वेळात आमच्या पाचही बॅगा एअर इंडियाच्या पट्ट्यांवर होत्या. त्यांनी योग्य पट्ट्यांवर योग्य दिशेने प्रवास करून आमच्याच विमानाच्या पोटात जावे अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना केली.
इतक्यात आम्हांला एक अत्यंत धक्कादायक बातमी कळाली. अर्धा तास लवकर उड्डाण करणे अपेक्षित असलेलं आमचे विमान बऱ्याच उशिराने प्रस्थान करणार होते. आमची बोर्डिंग वेळ ही आता सव्वा दोन वाजताची करण्यात आली होती. या क्षणी नऊसुद्धा वाजले नव्हते. आम्हांला आता जवळपास पाच तास वेळ घालवायचा होता. सुरक्षातपासणी सुद्धा अत्यंत वेगाने झाली. तेथील अधिकाऱ्यांनी युरोपातील हवामान कसे असेल याविषयी प्राजक्ताशी बातचीत केली. सुरक्षातपासणी झाल्यानंतर आम्ही फूडकोर्ट मधील एक मोक्याची जागा पकडली. आमच्या विमानाचा गेट क्रमांक ७६ होता. ते गेट आम्हांला आम्ही बसलेल्या जागेवरून दिसत होते. एव्हांना आम्हांला बऱ्यापैकी भूक लागली होती. मसाला डोसा फक्त ३८० रुपये, चहा १८० ते २१० रुपये असे माफक दर पाहून आमच्या डोळ्यांत आलेल्या आनंदाश्रूंना न जुमानत आम्ही हे पदार्थ ग्रहण केले. वीणा वर्ल्डने दिलेले ठेपलेच्या पाकीट उघडले, ते जास्तच तेलकट आहेत असा निष्कर्ष काढण्यात आणला.
बराच वेळ काहीच घडत नव्हते. मग थोड्या वेळाने त्या गेटवर एअर इंडियाचे एक विमान आले. त्या विमानाभोवती कर्मचारी येऊन थोडावेळ काही घडामोडी झाल्या. त्या बघण्यात आमचा वेळ गेला. त्यानंतर जवळच्या गेटवर दुसरे एक एअर इंडियाचे विमान आले. तिथे सुद्धा कर्मचारी येऊन बऱ्याच काही घडामोडी होऊ लागल्या. तेव्हा बारा वाजत आले होते. वैतागून मी सोहमला एअर इंडियाला ट्विटरवर मेसेज कर असा सल्ला दिला. कधी नव्हे त्यांनं तो मानला. अहो आश्चर्यम! पुढील पाच मिनिटांत एअर इंडियाचा प्रतिसाद आला. या उशिराबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून आम्ही त्याची नोंद घेतली आहे; यावर आम्ही नक्कीच कृती करू असा संदेश पाठवला. योगायोगाची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळात आम्हांला वीणा वर्ल्डच्या अतुल यांनी पाठवलेला एअर इंडियातर्फे त्या विमानातील सर्वांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे असा संदेश मिळाला. त्यात वरण-भात आणि भाजी असा मेनू होता. जेवण जरी अत्यंत साधे असले तरी अगदी योग्य वेळ मिळाल्याने ते अमूल्य वाटले.
अशा प्रकारात सर्व वेळ गेल्यामुळे आता दोन वाजू लागले होते. जवळच्या गेटमधील विमानामध्ये वेगाने घडामोडी होत असल्याचे दिसू लागले होते. थोड्याच वेळात विमानाचे गेट बदलून या नवीन विमानाच्या गेटची घोषणा करण्यात आली. आम्ही तीन वाजताच्या सुमारास तिथे गेलो. विमानाचे बोर्डिंग काही वेळात सुरू झाले. अचानक मला तिथं चेतेश्वर पुजारा दिसला. तो बिझनेस क्लासने जरी प्रवास करत असला तरी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्यांने त्याला काहीतरी सांगितले. तो बिचारा शांतपणे बाजूला कोपऱ्यात जाऊन वाट बघत राहिला. थोड्याच वेळात त्याला बोलावण्यात आले. इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसोबतच त्याने प्रवेश केला. ही संधी साधून मी सोहमला त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला सांगितले. सोहमची विनंती त्याने तात्काळ मान्य केली.
विमान अत्यंत टुकार होते. बहुदा खूप जुने होते. आतल्या स्वच्छतेच्या नावाने अत्यंत बोंब होती. स्वच्छतागृहे सुद्धा नीट स्वच्छ केली गेली नव्हती. शेवटी एकदाचे पावणेचार ते चार मध्ये कधीतरी विमानाने लंडनच्या दिशेने उड्डाण केले. वादळी हवामानामुळे विमान हेलकावे खात होते. विमान ज्या ज्या वेळी हेलकावे खात होते त्या त्या वेळी जलपान खानपान सेवा स्थगित केली जाण्याची उद्घोषणा अत्यंत तत्परतेने विमानात केली जात होती. बऱ्याच रांगांतील प्रवाशांना केवळ एकच हवाई सुंदरी सर्व काही आणून देत होती. त्या बिचारीची दया यावी अशी परिस्थिती होती. ती आपल्या परीने खूप प्रयत्न करत असली तरी इतक्या सर्व प्रवाशांना वेळेवर जलपान खानपान सेवा देणे तिच्या दृष्टीने शक्य नव्हते. त्यातच भरीला वादळी हवामानामुळे तिला सतत आपल्या जागी जाऊन बसावे लागत होते. विमानात थंड हवा झाली तर आवश्यक असणारी ब्लॅंकेट सुद्धा प्रत्येक सीट्सवर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्राजक्ताने विनंती केलेले ब्लॅंकेट येण्यासाठी अर्धा पाऊण तास लागला. प्रवासी अचानक उठून डोक्यावरील केबिनमधील बॅग्समधील जिन्नस काढून घेत होते. ती हवाईसुंदरी ही सर्व केबिन्स पुन्हा बंद करत होती. सीटसमोरील स्क्रीन कशीबशी चालू होती. परंतु त्यातही सर्व काही पर्याय उपलब्ध नव्हते. टॉयलेटच्या स्वच्छतेविषयी न बोललेलेच बरे! जेवण ठीकठाक होते. त्यात नाव ठेवण्यासारखं काही नसलं तरी आठवणीत राहील असंही काही नव्हतं. अशा प्रकारे एका अत्यंत निरस आणि वैतागवाणा साडेनऊ तासाचा प्रवास करून आम्ही एकदाचे हीथ्रो विमानतळावर स्थानिक वेळेनुसार साडेनऊच्या आसपास उतरलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा