मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
पुस्तक परीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक परीक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ मे, २०२५

आठवणीतील कविता - मुलांस बोध

 


 

आठवणीतील कविता ह्या शृंखलेतील भाग एक आणि दोन ह्या पुस्तकांचं वाचन करत असताना मुलांना बोधपर अशा तीन कविता वाचनात आल्या. ह्या भागात आणि उर्वरित दोन भागात अजूनही ह्याच आशयावरील काही कविता असू शकतात. 

तत्कालीन समाजात लिखित वाङमयानं समाजाला बोध देण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावली असणार. त्यावेळची बुद्धिमान माणसं चांगलं काही वाचण्यासाठी भुकेली असावीत. अशा ज्ञानी माणसांना लिखित स्वरूपात मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजातील इतर घटकांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहचविण्याचा प्रयत्न केला. कविता ह्या माध्यमातून ज्ञान, संदेश प्रसार सहजरित्या होत असणार कारण एकदा का कवितेला चाल देऊन तिचा सर्व घरात प्रसार झाला की घरातील जुनीजाणती मंडळी, आजी पुढील पिढीपर्यंत ह्या अमूल्य ठेव्याचं हस्तांतरण अगदी अलगदपणे करण्याचं काम नीटनेटकेपणानं बजावत असत. 

ही पोस्ट लिहितांना मनात आलेले काही विचार 

१. व्हॉइस टायपिंग 
प्रारंभीस मी पुस्तकातील कविता व्हॉइस टायपिंगचा वापर करून लिखित स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जुनी मराठी भाषा आणि माझ्या उच्चारातील त्रुटी ह्यामुळं व्हॉइस टायपिंगनं दिलेलं मूळ रूप दुरुस्त करता करता इतका वेळ लागला की स्वतःच लिहिलं असतं तर नक्कीच लवकर तडीस नेता आलं असतं. तंत्रज्ञान उपलब्ध असलं तरी नक्की कुठं वापरावं ह्याचं भान असणं आवश्यक ! नाहीतर 'माकडाच्या हाती कोलीत' असला प्रकार व्हायचा. 

तरी देखील व्हाट्सअँपला पुढील सूचना करण्याचा माझा मानस आहे. ज्यावेळी एखादा इसम तुमची मराठी व्हॉइस टायपिंग सुविधा वापरू इच्छितो त्यावेळी त्याला / तिला कोणत्या कालावधीतील मराठी लिखित स्वरूपात आणायची आहे असा प्रश्न विचारून त्या कालावधीतील मराठी उपलब्ध करून द्यावी.  

२. अनुस्वार 
त्या काळातील बहुतेक शब्दांतील अंतिम अक्षरावर अनुस्वार आढळून येतात. त्याकाळातील बोलण्यात देखील ह्या अनुनासिक स्वरांचा वापर आपल्याला जुन्या मराठी चित्रपटात / नाटकात आढळून येतो. परंतु आता बहुदा जुन्या पिढीसोबत हीं अनुनासिकें काळाच्या पडद्याआड गेलीं असावीत असें मानण्यास वाव आहे. 

३. र्हस्व दीर्घ संकल्पना 
दहावीत सुद्धा माझा र्हस्व दीर्घ संकल्पनेबाबत गोंधळ उडायचा. आता तर प्रचंड गोंधळाची परिस्थती आहे. मराठी र्हस्व दीर्घ लिखाणाबाबतीचे सर्व नियम संकलित करून एका जागी प्रसिद्ध करावेत अशी मागणी ह्या पोस्टद्वारे मी करत आहे. 

४. भुजंगप्रयात / आर्या 
ह्या कवितेत काही ठिकाणी भुजंगप्रयात / आर्या वगैरे उल्लेख करण्यात आला आहे. भुजंगप्रयास हा छंद असे ऐकून माहिती आहे. ह्याविषयी तज्ञ मंडळींनी खुलासा करावा अशी मागणी मी करत आहेत. 

५. जामीन
ह्या पुस्तकात दोन तीन वेळा जामीन राहू नये असा सल्ला देण्यात आला आहे. जामीन राहून जबरदस्त फटका खाल्ल्याची उदाहरणे त्याकाळी प्रचलित असावीत. 
 
६. रामदास 
रामदासांच्या कवितेतील एक एक ओळी सुवचन म्हणून प्रसिद्ध आहेत. जसे की

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
मरावें परी कीर्तिरूपे उरावे 

ह्या सुवचनांचं स्रोत असलेल्या मूळ कविता वाचनात आल्या ह्याचा मला आनंद झाला. 

७. उपदेश 
ह्या कवितेतील उपदेश मोठ्या माणसांना देखील लागू होतो, अगदी हल्लीच्या काळात सुद्धा ! पुढील काही दिवसात चॅट जीपीटीला ह्या कविता वाचायला देऊन त्यांजकडून ह्या कवितांची सद्यकालीन आवृत्ती लिहून घेण्याचा मानस आहे. 

उदाहरणार्थ 
मूळ पंक्ती  

कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


आधुनिक काळातील उपदेश 

कसा तुला छंदच भ्रमणध्वनीचा 
तासंतास व्हाट्सअँपवर रेंगाळण्याचा 

कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।



आता तीन कविता ह्या दोन पुस्तकांतून घेतलेल्या मूळ रूपात! शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही चुका राहिल्या असल्यास क्षमस्व! 


मुलांस बोध - रामदास 

भुजंगप्रयात

बरे सत्य बोला यथातथ्य चाला,
बहु मानिती लोक येणें तुम्हांला, 
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो,
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ।।१।।

सदा दांत घांसोनि तोंडा धुवावें, 
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें, 
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे, 
बहू काळ हा खेळ कामा नये रे.  ।।२ ।।

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करा
वें, 
बरें बोलणें नित्य जीवीं धरा
वें.  ।। ३ ।।

बहु खेळ खोटाची आलस्य खोटा,
समस्तांशि भांडेल तोची करंटा. 
बहुतां जनांलागिं जीवें भजावे,
भल्या संगतीं न्याय तेथे वसावें. ।। ४ ।।

विवेकेंविणें सर्वही दंभ झाला, 
बहु नेटका सज्जला साज केला. 
प्रतीतीवि
णें बोलणें व्यर्थ होतें 
विचारेवि
णें सर्वही व्यर्थ हो तें . ।। ५ ।।

'भला रे भला!' बोलती 
तें करावें, 
बहुता जनांचे मुखें येश घ्यावें. 
परी शेवटी सर्व सोडून द्यावें, 
मरावें परी कीर्तिरूपे उरावे. ।। ६ ।।


 मुलांस उपदेश 

शिवी कोणा देऊं नये ।।
कोणासंगे भांडूं नये ।।१।।

अनवाणी चालूं नये ।।
चालताना धांवूं नये ।।२।।

खोटी साक्ष देऊं नये ।।
जामिन कोणा होऊं नये ।।३।।

दुसऱ्याचें चोरुं नये ।।
खोटें कधीं बोलूं नये ।।४।।

गोड फार खाऊं नये ।।
पाहिलें तें मागूं नये ।। ५ ।।

चित्तीं धरी जो हे बोल ।।
त्याचें कल्याण होईल ।। ६ ।।

अभंग 
सकाळी उठोनी, देवासी भजावें ।।
गुरुसी वंदावे, जीवें भावें ।। १ ।।

वडिलांची आज्ञा, घेतल्यावांचून  ।।
कोठें घरांतून, जाऊं नये ।। २ ।।

शाळेसी जातांना, मुलांनीं वाटेंत ।।
तमाशा पाहात, राहूं नये ।। ३ ।।


नेमियल्या वेळीं, शाळेमध्यें जावें ।।
चित्त तें ठेवावें, विद्येवरी ।। ४ ।।

बालपणीं विद्या, वृक्षासी लावावें ।।
तरुणपणी घ्यावें, फळ त्याचें  ।। ५ ।।

अभंग तुकाराम 

आता तरी पुढें, हाची उपदेश ।।
नका करूं  नाश, आयुष्याचा ।। १ ।।

सकळांच्या पायां, माझे दंडवत ।।
आपुलालें चित्त, शुद्ध करा ।। २ ।।

हित तें करावें, देवाचें चिंतन ।।
करूनियां मन, शुद्ध भावे ।। ३ ।।

तुका म्हणे हित, होय तो व्यापार ।।
करा, काय फार शिकवा
वें ।। ४ ।।


मुलांस उपदेश

श्लोक - उपेंद्रवज्रा  


कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


भुजंगप्रयात 

मुलांनों तुम्हीं सर्व हा खेळ सोडा
मनीं काळजी बाळगा ज्ञान जोडा
असा काळ कैसा तुम्हांला मिळेल
पुढे दुःख होतां तुम्हांला कळेल ।। २ ।।

आर्या 

तुमचें वय हें आहे, केवळ विद्या शिकून असण्याचें 
चित्तीं धरूनि ऐसें, टाकुनि द्यावें उगीच फिरण्याचें ।। ३।।

श्लोक - कामदा 

चांगल्यासवें  संगती घरी
त्यामुळे जगीं मान्यता खरी
अन्यथा तुम्हां कोण मानिल
योग्यता जगीं कैशि होईल ।। ४ ।।

शुद्धकामदा


धरुं नका तुम्ही दुष्ट वाट ती
जरी तुम्हांस ती गोड वाटती
करिल नाश ती हे धरा मनीं 
करूं नका हसूं आपलें जनीं ।। ५ ।।

भुजंगप्रयात 

स्मरा नित्य देवा करा मातृसेवा
धरा सुस्वभावा त्यजा वैरभावा
असे केलिया सौख्य तुम्हांस आहे
म्हणूनीच मी नित्य बोधीत आहें ।। ६ ।।

आर्या 
उपदेश हा ठसूं द्या, तुमच्या चित्तावरीच बळकटसा
नाहींपक्षीं तुमचा, होय श्रम आमचाहि फुकट तसा ।। ७।।



रविवार, २३ मार्च, २०२५

आठवणीतल्या कविता - आजीचे घड्याळ


काल सायंकाळी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातून नाटक पाहून बाहेर पडताना मॅजेस्टिकचे पुस्तक प्रदर्शन दिसलं.  'दोन वाजून बावीस मिनिटं' ह्या नाटकानं खूप आनंद दिला. बऱ्याच काळानं खुर्चीला खिळवून ठेवणारं, कलाकारांचा वास्तववादी अभिनय  आणि प्रत्येक प्रसंग अगदी अलगदपणे खुलवत अनपेक्षित शेवटाकडं प्रवास करणारं  असं हे नाटक ! पुस्तक प्रदर्शन पाहून नकळत पावलं तिथं वळली. अर्ध्या तासानं मीना प्रभूंची वाचायची राहून गेलेली काही प्रवासवर्णनाची पुस्तकं, 'आठवणीतील कविता' ह्या  जुन्या काळात शाळेत शिकलेल्या आठवणीतील कवितांच्या संग्रहाचे दोन भाग आणि इतर काही पुस्तकं घेऊन आम्ही बाहेर पडलो.  प्राजक्ताला मराठी कवितांची खास आवड असल्यानं ही कवितासंग्रहांची खरेदी झाली. 

ह्या कविता संग्रहाचे एकूण चार भाग आहेत. जुन्या काळातील मराठी जीवनाचं प्रतिबिंब घडविणारे असे हे चार भाग. ह्या पुस्तकाच्या संकल्पनेचे बीज कसं रुजलं आणि त्यातून ही एक सुंदर कलाकृती कशी निर्माण झाली हे आपल्याला ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत अगदी सविस्तर वाचायला मिळतं.  पुढील काळात जमेल तसं ह्यातील एकेक कवितेचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करीन.  एक सुवर्णयुग म्हणता येईल असा कालावधी आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी अनुभवला. त्यातील प्रतिभावान कवी, लेखकांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यानं ह्या कालावधीतील काही सुवर्णक्षणांना कागदावर नोंदवलं. प्रत्येक मराठी माणसानं अशा कलाकृती नक्कीच वाचाव्यात. असा सुवर्णकाळ परत येईल अशी भाबडी आशा मनात बाळगावी !

आजची कविता 

कवी - केशवकुमार 
 

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

रसग्रहण 

सर्वप्रथम ह्या कवितेसोबत असलेलं चित्र आपल्याला जुन्या काळात ओढून नेतं. अनेक नातवंडांना आपल्या मायेनं न्हाऊ घालणारी ह्या चित्रातील आजी आपल्याला आपल्या आजीची नक्कीच आठवण करून देते. सर्वात धाकट्या नातवाच्या चेहऱ्यावरील अचंबा चित्रकारानं हुबेहूब टिपला आहे. वयानं थोड्या मोठ्या अशा नाती मात्र आजीच्या सहवासात अगदी निश्चिन्तपणे तिच्या समोर बसल्या आहेत किंवा लाडीकपणे तिला मिठी मारून तिची माया अनुभवत आहेत. आजीच्या कथेत कितीही भय निर्माण झालं तरी शेवट मात्र सुखद असणार ह्याची अनुभवानं त्यांच्याकडे आलेली आश्वासकता बहुदा त्या छोट्या नातवाकडं नाही! 

आजीकडं घड्याळ नाहीच किंबहुना आजी हेच घड्याळ हे सर्व वाचकांना ठाऊक आहे. पण थेट त्याचा उल्लेख न करता आजीचं नातवांप्रती असणारं प्रेम, धाक, त्यांनी शिस्तबद्ध राहावं ही कळकळ कवितेतील विविध उदाहरणांतून आपल्यासमोर येते.  सकाळी पहाटे अभ्यासासाठी मला उठव हे एकदा का आजीला सांगितलं की अगदी बिनधास्त गाढ झोपून जावं हे नातवंडांना ठाऊक आहे. आजी आपल्या नातवंडांवर कसे संस्कार करत असे हे ही ह्या कवितेतून अलगदपणे आपल्यासमोर उलगडत जातं. नातवंडांनी वक्तशीरपणा न दाखवल्यास चिडणाऱ्या आजीचा लटका राग आपल्यासमोर 'घणघणा घंटाध्वनी', 'लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा' ह्या शब्दप्रयोगातून येतो. रूपकातून सारं काही कसं अलगदपणे व्यक्त करावं हे मागच्या पिढीकडून शिकावं. मला तर असं वाटत राहतं की खरी प्रगत तर ती पिढी होती. शेवटच्या कडव्यात आजीचं घड्याळ दैनंदिन नव्हे तर आठवडाभरातील वार, वर्षभरातील सणांचा सुद्धा कसा हिशेब ठेवत असे हे सांगायला कवी विसरत नाही. मग हळूच आठवत येते ती रविवारी संकष्टी आहे हे सांगणाऱ्या आई / ताई / सासूबाईंच्या फोनची ! अशी आजी असेल तर नातवंडाचं भावविश्व समृद्ध होणारच, आयुष्यभरात निराशेला कसं बाजूला सारून आयुष्य जगावं ह्याची शिकवण त्यांना आपसूकच मिळणार !
 
येईल का कधी परत असा काळ आणि ते आजीचं घड्याळ ?

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

The Sun Does Shine


 

ऍंथोनी रे हिंटन ह्या गृहस्थाचं हे आत्मचरित्र. आपण न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली आयुष्यातील तीस वर्षे तुरुंगात व्यतित करताना आयुष्यातील अनमोल असं सारं काही गमावल्याची खंत जरी ह्या पुस्तकातुन सतत जाणवत असली तरी आपण निर्दोष असल्याची जाणीव लेखकाला सतत लढा देण्याची जिद्द देते. १९८५ साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी तुरुंगात गेलेला रे २०१५ साली एकोणसाठाव्या वर्षी मुक्त होतो ! 

रे चे बालपण अमेरिकेतील अलाबामा राज्यातील ग्रामीण भागात गेलं. श्वेतवर्णीयांचे बाहुल्य असलेल्या ह्या भागात एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. द्रारिद्र्य पाचवीला पुजलं म्हणावं अशी परिस्थिती ! खाणीत काम करणाऱ्या वडिलांचा तिथल्याच  एका अपघातात मृत्यू झाल्यावर साऱ्या भावंडाना वाढविण्याची जबाबदारी आई घेते. आईनं दिलेल्या संस्कारांची वर्णनं आणि त्यांनी रे ला इतक्या काठिण्यपुर्ण काळात दिलेल्या मानसिक बलाचे संदर्भ पुस्तकात येत राहतात. 

श्वेतवर्णीयांचं बाहुल्य असलेल्या अमेरिकेच्या ग्रामीण भागात कृष्णवर्णीयांना कसं संघर्षपुर्ण जीवन जगावं लागत असायचं किंबहुना अजुनही जगावं लागतं असेल ह्याची कल्पना सुरुवातीच्या प्रकरणांतून येते. अमेरिका हा भौगोलिकदृष्टया प्रचंड मोठा देश ! कार नसल्यावर इथलं जीवन प्रचंड कठीण! अशा वेळी दूरवर असलेल्या शाळेमध्ये रे आणि त्याचा धाकटा भाऊ चालत जात असत. चालत जाताना - येताना निर्मनुष्य भाग आला आणि एखादी कार रस्त्यानं येताना दिसली की त्या चालकाच्या नजरेस आपण पडु नये ह्याची त्यांना जी धडपड करावी लागायची ते वाचुन अंगावर काटा येतो ! कारण काय तर चालक जर डोकेफिरु निघाला तर जीवावर बेतण्याची पाळी यायची ! रे हा बेसबॉलचा तरबेज खेळाडु, परंतु एका सामन्यात होम रन करताना त्याच्या आईसमोर संपुर्ण स्टेडियमनं निगर म्हणुन त्याला संबोधिल्याचं आणि सामना जिंकुनसुद्धा मनातुन पराभव बाळगावं लागण्याचं शल्य रेच्या पदरी येतं. त्याची आई त्याला सदैव श्वेत लोकांशी कसं काळजीपुर्वक वागावं, त्यांच्या अपमानास्पद बोलण्यानं संतापुन न जाता मनावर कसा संयम ठेवायचा ह्याचं शिक्षण देत राहते ! 

शाळेनंतर खाणीतील नोकरी स्वीकारण्याची पाळी रे वर येते. खाणीत ज्यांनी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत त्या कामगारांच्या ढासळलेल्या तब्येती तो आपल्या डोळ्यांनी पाहत असतो! अंधाऱ्या खाणीत असुरक्षित वातावरणात काम करताना ज्या भयावह स्थितीचा सामना करावा लागतो त्याचं वर्णन लेखकानं अत्यंत तंतोतंत केलं आहे. ह्या अंधारातील श्रीमंतीपेक्षा उजेडातील गरिबी मी स्वीकारीन असं म्हणत रे ही नोकरी सोडुन देतो ! 

तारुण्याच्या भरात रे कडुन काही चुका होतात. भावंडं उज्ज्वल भवितव्याच्या शोधात रे आणि आईला सोडुन वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्याआधी बऱ्याच तरुणींच्या सोबत त्याची मैत्रीही होते. त्यात एकाच वेळी त्यानं  मैत्री जोडलेल्या बहिणी आणि त्यापायी त्यातील छोट्या बहिणीशी मैत्री जोडण्यास इच्छुक असलेल्या तरुणाशी त्यानं पत्करलेल्या वैमनस्याचा उल्लेख येतो. कारशिवाय आईचं काठिण्यपुर्ण जीवन पाहता न आल्यानं रे कारची चोरी करतो आणि काही काळानं पकडला जातो.  रे ला आपली चुक उमजते. आईला आणि आपल्या जवळच्या मित्राला पुन्हा अशी चुक न करण्याचं आश्वासनसुद्धा तो देतो!

ह्या काळात सिल्विया नावाच्या तरुणीशी त्याची मैत्री जुळते. आणि तिच्यासोबत आयुष्य व्यतित करण्याची स्वप्नं तो पाहु लागतो. एका गॅरेजमध्ये त्याच्या रात्रपाळीची नोकरी सुरु होते. त्या कालावधीत त्या शहरात दोन खुन होतात आणि तिसऱ्या खुनाचा अयशस्वी प्रयत्न होतो. पोलीस आपल्या चौकशीचे सत्र सुरु ठेवतात. वाचलेला व्यवस्थापक आपल्यावर हल्ला करणाऱ्या युवकाचे वर्णन करतो. छोट्या बहिणीच्या प्रेमात रे ने ज्याच्याशी वैमनस्य पत्करलेलं असतं तो सूडानं पेटलेला युवक ह्या वर्णनाशी मिळताजुळता असा युवक मला माहिती आहे हे पोलिसांना सांगतो. त्यानंतर सुरु होते ती रे ची तीस वर्षांची स्वतःला निर्दोष शाबित करण्याची धडपड ! 

ज्या दिवशी तिसऱ्या खुनाचा प्रयत्न झाला त्यावेळी खरंतर रे आपल्या रात्रपाळीच्या कामावर असतो. ज्या गोळ्यांनी आधीचे खुन झालेले असतात त्या गोळ्या आणि रे च्या आईचे पंचवीस वर्षांपूर्वीचे पिस्तुल ह्याची खरंतर संगती लागत नसते. परंतु केवळ पोलिसांकडे उपलब्ध कारचोरीचं रेकॉर्ड आणि खऱ्याखुऱ्या गुन्हेगाराच्या वर्णनाशी असलेलं रे चे काहीसं साधर्म्य हे घटक त्याच्या विरुद्ध जातात. त्यानंतर पुस्तकात सामोरा येत राहतो तो अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अस्तित्वात असलेला एक अदृश्य भेसुर चेहरा ! रे ने पॉलीग्राफ परिक्षेतुन सिद्ध केलेलं स्वतःचं निर्दोषित्व यंत्रणा पुर्णपणे झाकुन टाकते. रे ला देण्यात आलेला सरकारी वकील आपण १५०० डॉलर्स न्याहारीवर खर्च करतो असं उघडपणे सांगतो. तू निर्दोषी असशीलसुद्धा, पण तू नाही तर दुसरा कोणी कृष्णवर्णीय युवक आम्ही शोधला असता असं त्याला उघडपणे सांगण्यात येतं !

रे ची रवानगी ज्यांना देहांताची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांच्या सोबत दुसऱ्या तुरुंगात होते ! इथं आपल्या कैदेचा बराचसा कालावधी रे घालवतो! सकाळी ३ वाजता नाश्ता, दहा वाजता दुपारचं जेवण आणि दुपारी २ वाजता रात्रीचं जेवण असा दिनक्रम असतो. त्याच्या खोलीपासुन काही मीटर अंतरावर विद्युतखुर्चीत देहांत देण्याची व्यवस्था असणारा कक्ष असतो. ज्यांची देहांताची तारीख पक्की झाली आहे अशा कैद्यांना १ महिना आधी पुर्वसुचना देण्यात येते. त्यानंतर त्या कैद्यांच्या होणाऱ्या मनःस्थितीचं वर्णन वाचुन मन उद्विग्न होते. प्रत्येक शिक्षेनंतर वातावरणात जो एक दर्प भरुन राहतो तो सहन करणं सर्वांना फार कठीण जातं ! ज्यावेळी कैद्याला प्रत्यक्ष देहांतशिक्षेसाठी घेऊन जातात त्यावेळी बाकीच्या कैद्यांना त्याचा सुगावा लागतो. मग संपुर्ण तुरुंग बाकी कैद्यांनी भिंतीवर, गजांवर हात, ताटल्या वाजवुन केलेल्या उच्चरवाने भरुन जातो! तु एकटा नाहीयेस आम्ही तुझ्या सोबत आहोत हाच ह्या कैद्यांनी आपल्या सोबत्याला दिलेला शेवटचा संदेश असतो ! कसा क्षण असेल हा ! 

बराच काळ रे ह्या देहांताच्या शिक्षेच्या सीमारेषेवर  हिंदकोळे घेत असतो. केवळ काही मीटर अंतरावर अनुभवलेल्या आपल्या अशा अनेक सहकाऱ्यांच्या मृत्युच्या वेळी पुढचा नंबर आपला असु शकतो हे कायमचं भय जाणवत राहतं. अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या मनाचे स्थैर्य शाबुत ठेवण्यात  तो यशस्वी होतो. 

एका काळानंतर सरकारी वकील रे ची बाजु मांडायची असेल तर १५००० डॉलर्सची मागणी करतो. रे च्या आईनं आपलं घर गहाण टाकुन ही रक्कम उभी करावी असं सुचवतो. रे त्यास स्पष्ट नकार देतो ! अशा वेळी मग ब्रायन स्टीवन्सन नावाचा ऍटर्नी आणि त्याची संस्था त्याच्या पाठीशी उभी राहते ! रे च्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण येतो ! योग्य पुरावे गोळा करुन रे चे निर्दोषित्व सिद्ध केलं जाते ! तरीही मग बराच काळ सर्व सोपस्कार पार करत तीस वर्षांनी रे एकदाचा मुक्त होतो! 

खरंतर सुरुवातीच्या काही प्रकरणानंतर मी हे पुस्तक पुर्ण वाचलं नाही. हळुहळू वाचीन ! मी हे पुस्तक वाचायला का घेतलं? आयुष्याकडं बघण्याचा एक पुर्ण नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देतं. संपुर्ण यंत्रणा एकत्र येऊन आपल्याविरुद्ध कसं धडधडीत षडयंत्र रचु शकते आणि एका उभारु लागलेल्या जीवनाला कसं नष्ट करु शकते ह्याचा अनुभव आपल्याला ह्या पुस्तकातुन येतो !  आपण किती साध्या गोष्टींनी निराश होतो, आपल्याजवळ असलेलं स्वातंत्र्य, असलेल्या किती छोट्यामोठ्या गोष्टी ह्याचं आपल्याला कधीच महत्व कळत नाही ! पुस्तकात एक वाक्य आहे - स्वातंत्र्याचं  खरं महत्व आपल्याला ते गमावल्यानंतर कळतं!

२०१५ साली सुटलेला रे आता आपलं आयुष्य पुन्हा उभारु पाहतोय ! एक यशस्वी वक्ता म्हणुन गणला जाऊ लागला आहे ! Hats off to you Anthony Ray Hinton! 

सोमवार, १८ मे, २०२०

सांजशकुन - पाणमाय!



कथा फ्लॅशबॅक स्वरूपातील,  एका मातेने सांगितलेली !आयुष्याच्या सायंकाळी  आपल्या संसाराच्या  बहरलेल्या वेलीकडे अत्यंत समाधानाने पहात असता तिला आपल्या वडिलांनी सांगितलेलं वाक्य आठवतं, "अति सुखाच्या क्षणीच माणसाने सावध राहावे,  कारण माणसाचं पूर्ण सुख दैवाला पहावत नाही!"

मग तिला धाकटा मुलगा आपल्याला अचानक लाभलेल्या श्रीमंतीचे रहस्य विचारतो.  तिनं  या प्रश्नाचे उत्तर देणे आयुष्यभर टाळलेलं असतं. परंतु आज छोटा अगदी हट्टालाच पेटलेला असतो. "मी कोणताही अधर्म ना करता हे सर्वकाही मिळवलं आहे!" हे उत्तर तुला पुरेसं नाही का?  ती छोट्याला अजिजीनं विनविते. परंतु आज छोटा तिचं काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत  नसतो! जर  हे रहस्य तुम्हांला  सांगितले तर कदाचित मला मृत्यूला सामोरं जावं लागेल या सत्याची जाणीव त्या सर्वांना करून देते.  ते ही आम्हांला चालेल ह्या सर्वांच्या एकमुखी उत्तरानं  तिला प्रचंड धक्का बसतो. ज्याच्याबरोबर आयुष्यभर संसार केला त्या नवऱ्याकडूनसुद्धा तिला अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. अचानक तिच्या मनामध्ये या सर्वांविषयी अलिप्ततेतची भावना दाटून येते! मग एका निर्विकार मनाने ती आपलीआणि पाणमायेची कहाणी सर्वांना ऐकवते. 

पुर्वायुष्यातील अत्यंत गरिबीच्या एका पराकोटीच्या क्षणी तिचा निर्धार ढासळतो. ती विहिरीमध्ये आपला जीव देण्यासाठी पायऱ्या उतरु लागते. अशावेळी तिला भेटते ती पाण्यातील तिची पाणमाय! ही पाणमाय तिची सोन्यांच्या चकत्यांनी तिची ओटी भरते.  मग तिला सापडतो तो समृद्धीचा एक अक्षय ठेवा! त्यानंतर तिच्या कुटुंबाला दिवसेंदिवस  समृद्धीची साथ लाभत जाते. आपलं हे मोठं रहस्य ती सर्वांना सांगते!

पाणमायेने घातलेल्या अटीनुसार ज्या क्षणी तिनं हे रहस्य इतरांना सांगितलं तो तिचा भुतलावरील अंतिम दिवस ठरणार असतो. तिला आपल्या पाणमायेकडे परतणं क्रमप्राप्त असतं. आयुष्यभराचे पाश असे एका क्षणात सोडुन निर्मोही मनानं पाणमायेकडे परतणे तिला अवघड जातं. मग पाणमाय तिची समजुत काढते. ही तुझी एकटीची कहाणी नाही! ही आपल्या संपुर्ण स्त्रीजातीची कहाणी आहे ! कथेचा शेवट होतो तो पुढील वाक्यानं !
मग पाण्याने तिला सर्व बाजुंनी आपुलकीनं स्पर्श केला आणि आपल्यात माहेरी आणलं !

जी. ए. च्या बाकी कथांशी तुलना केली तर ह्या कथेची काठिण्यपातळी थोडी कमीच ! नेहमीप्रमाणं कथेतील पात्र नक्की कशाचं प्रतिक ह्याचा अर्थ लावता येणं सहज नाही!  तरीही  स्त्रीनं कुटुंबाप्रती केलेल्या असीम त्यागाची आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्यांनी तिच्याप्रती दर्शवलेल्या कृतघ्न मानसिकतेची ही कहाणी आहे ! आता मी हे आत्मविश्वासानं बोलतोय खरं पण जी. ए. ना अभिप्रेत असलेला अर्थ बराचसा वेगळाही असु शकतो !

ही पाणमाय म्हणजे नक्की कोण ? प्रत्येक स्त्रीची पाणमाय वेगवेगळी असु शकते !  मातेच्या, बहिणीच्या, आत्याच्या, मावशीच्या, मामीच्या, मैत्रिणीच्या, शेजारणीच्या कोणत्याही रुपात प्रत्येक स्त्रीला ही पाणमाय भेटु शकते! एक संसार उभा करणं, कोणतीही अपेक्षा न बाळगता आयुष्याच्या सायंकाळपर्यंत तो चालवणं हे एकटीचं काम नव्हे हे साऱ्या पाणमाया जाणुन असतात. एकटीनं हा भर उचलताना कोणत्याही कमकुवत क्षणी स्त्रीने हार मानु नये म्हणुन ह्या पाणमाया तिची साथ निभावतात. प्रत्यक्ष घरात तिच्या भोवताली नसल्या तरी तिच्या एका प्रतिसादात तिच्या वेदनेची आर्तता ह्या पाणमाया शेकडो मैलांवरुनसुद्धा ओळखु शकतात! 

आता ह्या कथेतील भावलेली काही वाक्यं !

ज्या क्षणी छोटा तिला रहस्य सांगण्याचा आग्रह धरतो आणि त्यापायी तिचा जीव गेला तरीही कोणालाही त्याची पर्वा नसणार ह्याची तिला जाणीव होते त्यावेळी - पाहतापाहता प्रत्येकाशी असलेला एकेक अदृश्य धागा तुटून गेला! 

पाणमायेकडे दुसऱ्यांदा परत आल्यावर पाणमाय तिला आपल्या जागेवर बसवुन पुन्हा एकदा कुणाचीतरी बहीण, मुलगी, बायको, आई असा खेळ मांडायला निघुन जाते! हे चक्र असेच चालु राहणार असतं! - हा तुझा काय, माझा काय , सगळ्यांचाच शाप आहे . आमच्याखेरीज त्यांचे क्षणभरही चालत नाही . आम्ही नसलो तर ती माणसे निखाऱ्यावरच्या फटिकाच्या लहरींप्रमाणं फुटतील . पण नंतर मात्र सुख अंगावर येतं आणि  त्या क्षणी मात्र आपण कुणाकुणाला नको होतो ! 

जी. ए. च्या इतर बहुतांश कथांप्रमाणे ही कथा सुद्धा कथेच्या शेवटाला आवर्तनात गुंतून जाते! ही माता आता पाणमायेच्या भुमिकेत शिरते तर पाणमाय ह्या मातेच्या ! जीवनातील विविध भुमिकांच्या आवर्तनांचा खेळ सदैव सुरुच राहणार आहे आणि आपण दैवानं आपल्याला सोपवुन दिलेल्या भूमिकेचं ओझं कदाचित बाळगत असु ! 

शनिवार, २ मे, २०२०

सांजशकुन - भाग १ !


सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते. 

अस्तिस्तोत्र

कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात.  प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात. 

समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....  

कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं. 

त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं ! 

संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !

एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!    


पत्रिका

एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका  ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !  

 मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार ! 

ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे ! 

आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण! 

पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !

प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !

शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही ! 

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

ययाति - वि. स. खांडेकर



 गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट कादंबऱ्यांद्वारे ह्या सुवर्णकाळाचा अनुभव आजही आपण काही प्रमाणात घेऊ शकतो. वि. स. खांडेकर ह्यांच्या अश्रू ह्या कादंबरीचे मला झालेलं आकलन ह्या आधी एका पोस्टद्वारे केलं होतं. ह्या सिद्धहस्त लेखकाच्या ययाती ह्या अविस्मरणीय कादंबरीविषयीच माझं मनोगत मी इथं मांडत आहे. ह्या कादंबरीस १९७६ सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. 

वि. स. खांडेकर हे अत्यंत बुद्धिमान, प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेतुन आणि पार्श्वभुमी ह्या विभागातुन कादंबरीतील विविध व्यक्तिरेखांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि ह्या कादंबरीतुन सद्य समाजानं शिकण्यासारख्या असलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. 

ययाती 

स्त्रीसुखासाठी आंधळा होऊन स्वतःच्या पुत्राकडं तारुण्याची मागणी करणारा एक निर्दयी पिता अशी ययातीची ओझरती ओळख घेऊन ह्या कादंबरी वाचनास मी आरंभ केला होता. कादंबरीच्या पुर्वार्धात ययातीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु खांडेकरांनी उलगडुन दाखविले आहेत. प्रत्यक्ष इंद्राला पराभुत करणाऱ्या पराक्रमी नहुष  राजाचा हा पुत्र. परंतु आपल्या पित्याकडुन विजयाच्या एक उन्मत्त क्षणी घडलेल्या चुकीमुळं मिळालेल्या शापाचे ओझे सदैव घेऊन वावरणारा! "नहुष राजाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" हा तो शाप ! स्वतः खुप पराक्रमी. अश्वमेधाच्या घोड्यासोबत स्वतः स्वारी करत मोठमोठ्या राजे - महाराजांना स्वतःसमोर लोटांगणे घालावयास भाग पाडणारा ! आपल्या जन्माआधी राजमहालातील वैभवाचा त्याग करुन गेलेल्या आपल्या थोरल्या भावाशी म्हणजेच यतीशी त्याची ह्या प्रवासात अचानक भेट होते. यतीचं आपलं आयुष्य पुर्णपणे तपश्चर्येला वाहुन देणं ययातीला विचारात पाडतं. हे वादळ संपतं तितक्यात अंगिरस ऋषींच्या शांतीयज्ञात  राक्षसांकडुन होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासुन संरक्षणासाठी ययाती काही काळ त्या ऋषींच्या आश्रमात घालवितो. तिथं त्याची भेट कचाशी होते! ययातीच्या पत्नीचं म्हणजेच देवयानीचे पहिलं प्रेम हा कच ! परंतु एकंदरीत देवयानी प्रेमापेक्षा सामर्थ्याला महत्व देणारी ! त्यामुळं योगायोगानं भेटलेल्या ययातीला तो केवळ एका बलवान साम्राज्याचा चक्रवर्ती आहे म्हणुन पती म्हणुन स्वीकारण्यात तिला कोणताही संदेह नव्हता. परंतु ह्याच कारणामुळं ती ययातीची प्रेयसी केव्हाच बनु शकली नाही! म्हणुनच की काय ययाती मग शर्मिष्ठेकडं आकर्षिला गेला! ययातीचे शर्मिष्ठेकडे आकर्षित होणं प्रेमाच्या भुकेखातर असं जरी क्षणभर मानलं तरी त्याआधी आणि त्यानंतर त्यानं केलेल्या अनेक स्त्रियांच्या सहवासाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही! 

इथं खांडेकर ययातीची तुलना आधुनिक काळातील मानवाशी करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर "शास्त्राने, यंत्राने आणि संस्कृतीनं निर्माण केलेलं आधुनिक सुंदर व संपन्न जगआजच्या ययातीपुढं पसरलं आहे. सुखोपभोगांची विविध साधने घेऊन ते त्याला पळापळाला आणि पावलोपावली मोह घालीत आहे!" १८५७ ते १९४७ च्या काळात पेटलेल्या पवित्र यज्ञकुंडांच्या ज्वाला विझुन गेल्या आहेत आणि मोठमोठे ऋत्विज यज्ञभूमी सोडुन गेले आहेत! - 

पहा किती सौंदर्यपुर्ण अशी ही उपमा! 

देवयानी 

देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या ! पित्याचा महत्वाकांक्षी स्वभाव तिच्यात उतरलेला! आपल्या बालपणात शर्मिष्ठेचं वैभव तिनं अगदी जवळुन पाहिलेलं. आपल्या पित्याला, त्याच्या विद्वतेला कितीही मान असला तरी प्रत्यक्ष राजाकडे असणाऱ्या सत्तेविषयी तिच्या मनात सुप्त आकर्षण कायम वसलेलं असतं. त्यामुळं कचाविषयी तिच्या मनात आकर्षण असलं तरी त्याच्याशी विवाह करण्याचा विचार ती कधीच करत नसते. ययातीसोबत योगायोगानं झालेल्या एका भेटीमुळं तिला आपल्या महत्वाकांक्षांना मुर्त रुप देण्याची संधी आपसुक गवसते. जिच्या वैभवाच्या सावलीत आपलं बालपण घालवलं त्या शर्मिष्ठेविषयी असणाऱ्या असुयेमुळं ती तिला आपली दासी बनवुन आपल्यासोबत हस्तिनापुरात घेऊन येते. इथं तिला हवं असलेलं सत्तासामर्थ्य लाभतं. एक सम्राज्ञी म्हणुन देवयानी यशोगाथा बनली असली तरी एक पत्नी म्हणुन एक जिवंत शोकांतिका बनुन वावरत राहते! खांडेकरांनी ही कादंबरी लिहिताना ज्या स्रोतांचा संदर्भ घेतला आहे तिथं एका ठिकाणी ती ययातीने शर्मिष्ठेला तीन पुत्र दिले आणि आपल्याला दोनच पुत्र दिले अशी तक्रार करत असल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तिला ययातीने आपल्याशी केलेल्या प्रतारणेविषयी खंत नाही. पण तत्कालीन संदर्भानुसार स्त्रीला समाजात ज्या बाबींमुळं मान मिळायचा त्या पुत्रांच्या बाबतीत ययातीने दुजाभाव केल्याची खंत ती बाळगुन आहे.  

सद्यकालीन समाजाशी तुलना करता येनकेनप्रकारे प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या समाजातील मनोवृत्तींसोबत देवयानीची तुलना होऊ शकते. इथं ह्या प्रतिष्ठेच्या मागं धावताना जीवनातल्या गमावलेल्या अनेक अमुल्य गोष्टींचं भान अशा मनोवृत्तींना राहत नाही !

शर्मिष्ठा 

केवळ एका दुर्दैवी घटनेमुळं आपलं राजकन्यापद सोडुन देऊन शर्मिष्ठेला देवयानीचं दासीत्व पत्करावं लागतं. शुक्राचार्यांच्या रागीट स्वभावाची पुर्ण कल्पना असल्यानं त्यांच्या मुलीचा हा दुराग्रह पुर्ण न करण्यामुळं होऊ शकणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांचा तिला पुर्ण अंदाज आहे. आपल्या ज्ञातीसाठी स्वतःच्या जीवनातील सर्व सुखांचा ती त्याग करण्यास तयार होते. तिनं केलेल्या ह्या त्यागासाठी सद्यकालीन समाजात समांतर उदाहरण मिळणं तसं कठीणच! परंतु शर्मिष्ठा हस्तिनापुरात आल्यावर पुर्णपणे आपल्या नशिबाला दोष देत बसलेली दिसत नाही! ययातीने शर्मिष्ठेला वश केलं की त्यासाठी शर्मिष्ठेनं स्वतःहुन काही पावलं उचलली असावीत ह्याची खोलवर मीमांसा करण्याइतका  माझा अभ्यास नाही ! परंतु शेवटी ययातीच्या हृदयातील स्थानाच्या बाबतीत देवयानीवर कुरघोडी करण्यात ती यशस्वी होते! इतकंच नव्हे तर तिचा पुत्र पुरु अत्यंत सुस्वभावी आणि कर्तृत्ववान निघतो. पित्यासाठी आपलं तारुण्याच नव्हे तर देवयानीच्या मुलासाठी राज्यावरील आपला अधिकार सोडुन देण्यास तो तयार होतो. त्याच्या ह्या वागण्यानं देवयानीसारख्या स्त्रीचं हृदयपरिवर्तन करण्यात त्याला यशही मिळतं ! 

सद्यकालीन समाजातील आपल्या मेहनतीनं अधिकारपदाकडं वाटचाल करणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व शर्मिष्ठा करते असं ढोबळमानाने विधान आपण करु शकतो ! कठोर तपस्या करणारा कच बहुदा समाजातील ज्ञानपूजक वर्गाचं प्रतिनिधित्व करतो.

मुकुलिका, अलका या दासींची वर्णनं ह्या कादंबरीत विस्तारानं येतात. ह्या दासी कुशाग्र बुद्धीच्या असाव्यात. स्वपराक्रमावर मोठाली युद्धं जिंकुन आणणाऱ्या ययातीसारख्या यशस्वी सम्राटाला सर्वपरीनं त्या समाधानी ठेवतात! इथं एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. देवयानी असो की ययातीची आई असो; सम्राज्ञीपणाच्या भूमिकेच्या ओझ्याखाली कुठंतरी ह्या स्त्रिया एक पत्नी म्हणुन कमी पडत असाव्यात !  आणि म्हणुनच ह्या बुद्धिमान दासींची ह्या कथांमध्ये आणि सम्राटांच्या आयुष्यात महत्वाची भुमिका ठरते !

खांडेकरांच्या प्रतिभेचा  मेरु ह्या कादंबरीत चौखेर उधळला आहे! आपल्या ह्या काळातील जीवनाचं हुबेहूब वर्णन ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. मी पुर्णपणे ह्या कादंबरीशी आणि तात्कालीन व्यक्तिरेखांसोबत समरस होऊन गेलो ! एक अजरामर पौराणिक कथा आणि त्या कथेला यथायोग्य न्याय देणारा तितक्याच ताकदीचा प्रतिभाशाली साहित्यिक असा दुग्धशर्करायोग ह्या कादंबरीच्या निमित्तानं जुळून आला आहे. ह्या कादंबरीतील प्रत्येक वाक्य साहित्यिक श्रीमतीनं ओथंबुन भरलं आहे! ह्या रसाचा अत्यंत शांत मनःस्थितीत आस्वाद घेण्यासाठी ह्या कादंबरीचं पुन्हा सखोल वाचन करणं अनिवार्य आहे असा माझा समज आहे ! खांडेकरांना आणि त्यांच्या अफाट प्रतिभेला माझा सादर प्रणाम! सद्यकाल AI, ML, Cloud ह्या दिशेनं कितीही वेगानं जात असला तरी साहित्यातील अशा अमुल्य ठेव्यांचा आपण स्वतः आनंद घ्यावा आणि जमल्यास पुढील पिढीपर्यंत सुद्धा ह्या ठेव्यांचं हस्तांतरण करावं ही माझी कळकळीची विनंती!

शनिवार, ४ मे, २०१९

मुक्त निर्मितीचा महोत्सव




गंगाधर गाडगीळ ह्यांचं एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र वाचणं हे गेले दोन वर्षे माझ्या To Do List मध्ये आहे. आज काही वेळ मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या पुस्तकाने आणि खास करुन मुक्त निर्मितीचा महोत्सव  या प्रकरणाने माझे लक्ष वेधून घेतले.  या प्रकरणामध्ये गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या या साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी एक विस्तृत असे विश्लेषण केलं आहे.  हा अत्यंत एक वाचनीय असा अनुभव आहे. मराठी भाषेतील एका नावाजलेल्या लेखकानं केलेलं साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचे हे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण आहे. ह्या पोस्टमध्ये गाडगीळांची काही वाक्ये जशीच्या तशी नमुद करण्यात आली आहेत. ह्यात वाडःमयचौर्य हा हेतु नसुन गाडगीळांच्या प्रतिभाशाली भाषाशैलीचा वाचकांना आनंद मिळावा हा हेतु आहे. 

१) या प्रकरणाच्या सुरुवातीला ते समीक्षालेखन आणि ललित साहित्य निर्मिती या दोन प्रकारांविषयी लिहतात. आपल्या समीक्षालेखनामागे नवनिर्मितीच्या मार्गातील अडचणी दूर करणे आणि तिच्यासाठी विशाल रिंगण निर्माण करणे हे मुख्य हेतू असावेत असे त्यांना वाटतं. 

२) ज्या लेखकाकडे स्वतंत्रनिर्मितीची क्षमता आहे त्यानं समीक्षेच्या क्षेत्रात अधिक काळ गुंतून राहून वाद निर्माण करत बसणे हे काहीसे अपकारक ठरण्याची शक्यता आहे. यामागं मर्यादित वेळेचा वापर हा एक घटक तर आहेच परंतु त्यासोबत समीक्षा आणि लेखन निर्मिती या दोन भिन्न प्रकारांत लेखक वेगवेगळ्या पातळ्यांवर सक्रिय असतो हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. 

समीक्षा ही बऱ्याचदा बौद्धिक पातळीवर असते तर साहित्यनिर्मितीमध्ये लेखकाला अकरणात्मक भूमिका घ्यायची असते असे ते म्हणतात. आता अकरणात्मक या शब्दाचा अर्थ शोधून काढणे हे ही पोस्ट लिहुन झाल्यानंतर माझ्यापुढील कार्य आहे.  आपण केलेल्या त्या काळातील साहित्यनिर्मितीचा वेध घेणाऱ्या समिक्षेमुळे आपल्या साहित्यनिर्मितीवर विपरीत परिणाम झाला नाही असे त्यांना वाटते. आपण कविता सोडून बाकी सर्व वाडःमय प्रकार हाताळले असे ते म्हणतात. 

३) त्याकाळी गाडगीळांनी बहुदा प्रस्थापित साहित्याला मोठ्या प्रमाणात आव्हान दिले असावे. या प्रकरणांमध्ये ते याविषयी विस्तृतपणे विवेचन करतात.  प्रस्थापित साहित्यातील सुबोधता,  सामाजिक परिणाम आणि सौंदर्य याविषयी एकंदरीत जे काही मापदंड निर्माण केले असावेत त्यामुळं मराठी साहित्याला कदाचित एक संकुचित रिंगण घातलं गेलं असावं असं त्यांना वाटलं. हे रिंगण विस्तारित करण्यासाठीच आपण प्रस्थापित साहित्याला आणि त्यातील वरील घटकांना आव्हान दिलं असे ते म्हणतात. 

४) समीक्षालेखन हे बौद्धिक पातळीवर असल्यानं सातत्याने केलेल्या समीक्षालेखनामुळे आपल्या भूमिकेत किंवा लिखाणात सुसंगती यावी असा प्रयत्न अजाणतेपणी होऊ लागतो. त्यामुळे कदाचित आपल्या साहित्यनिर्मितीतील अबोधता आणि अस्पष्टता ह्या घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला असावा असं त्यांना वाटलं.  "जाणवणाऱ्या आशयाच्या पलीकडे जे अस्पष्ट मोठे हुंकार असतात त्यांच्याकडे मी दुर्लक्ष तर नाही केलं " असंही त्यांना वाटुन गेलं. 

५) या अशा सखोल विश्लेषणानंतर गाडगीळ हे त्यांनी मोठ्या प्रमाणात हाताळलेल्या लघुकथा या प्रकाराकडे वळतात.  इथं एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी विशद केला आहे, "मला काय सांगायचं आहे ते मी थोडक्यात सांगतो ! एखादं काम पार पडण्यासाठी आवश्यक काय आहे ते मला पटकन कळतं आणि मी आवश्यक तितकी मोजकी पावले टाकून ते काम पार पाडतो. इतर माणसं काम करू लागली की मला वाटतं इतका ही माणसं घोळ का घालत आहेत? कदाचित गाडगीळांची अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी ह्या मुद्देसुदपणाला कारणीभुत असावी. 

आपल्यामधील या संक्षिप्तपणा साध्य करण्याच्या क्षमतेमुळं बऱ्याच खरंतर कादंबरीच्या स्वरुपात लिहिल्या जाऊ शकणाऱ्या कल्पनांना आपण लघुकथा म्हणून जन्म दिला असे ते म्हणतात. दुसऱ्या बाजूने विचार करता कदाचित माझ्यामध्ये दीर्घकाळ मन एकाग्र ठेवण्याची क्षमता अंगी नव्हती, मोठ्या रचना करण्याची आणि हाताळण्याची कुवत नव्हती म्हणून मी कादंबऱ्या कदाचित लिहिल्या नसाव्यात असं तर नाही ना हा विचार त्यांच्या मनात येतो!!  

६) कथा सुचण्यासाठी व्यावहारिक व्यवधानातून मुक्त होणे माझ्याबाबतीत तरी अत्यावश्यक असतं हे सांगताना आपला चिंतातुर जंतुचा स्वभावदेखील ते थोडक्यात नमूद करतात. या स्वभावामुळे निवांतपणा मिळण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते असं त्यांना वाटतं. यामुळे आपल्या बर्‍याचशा कथा या एखादं मोठं काम संपवून मोकळे झाल्यावर अथवा कॉलेजला सुट्टी पडल्यावर लिहिल्या गेल्या आहेत असे ते म्हणतात.  

ह्यासोबत चांगलं चालणं सुद्धा साहित्यनिर्मितीला  पूरक आहे हा मुद्दा ते अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतात.  चालताना भोवताली असणाऱ्या वातावरणातील प्रसन्नता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे असे त्यांना वाटतं.  पावसानं, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या धारांनी, वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळांनी आपल्या निर्मिती प्रक्रियेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे असे ते म्हणतात. 

७) आपल्या निर्मितीप्रक्रियेच्या वेळी आपल्याला निवांतपणा आणि त्याच्यासोबत एकटेपणा ही लागतो. आसपास काही अंतरावर माणसे असली तर चालतात पण ती आपापल्या उद्योगात व्यग्र असावीत. 

८)  ते आपल्या कथानिर्मितीच्या प्रक्रियेविषयी आणि त्यातील व्यक्तिरेखा आपल्याला कशा सुचल्या याविषयी विस्ताराने लिहितात. लहानपणापासून आपल्या जीवनात आलेली विविध माणसे ही थेट जरी जशीच्या तशी आपल्या कथेत येत नसली तरी त्या व्यक्तिरेखांचा मूळ गाभा घेऊन आपल्या कथेतील अनेक पात्रे आपण अजाणतेपणे रेखाटली आहेत हे त्यांना विश्लेषणानंतर समजलं. आपल्या मर्यादित स्मरणशक्तीचा देखील ते इथं उल्लेख करतात. त्यामुळे आपण प्रवासवर्णन या प्रकारात जास्त गुंतलो नाहीत असं त्यांना वाटतं. 

९) एखादी कथा लिहिताना एकदा मन त्या निर्मितीच्या अवस्थेत गुंतलं की निरनिराळ्या आणि कधीकधी अगदी वेगळ्या प्रकृतीच्या कथाकल्पना मनात उमटत राहतात.  आपलं मन हे या विविध प्रकृतीच्या कथांमध्ये स्वच्छंदपणे वावरत असतं. ह्यातील नक्की एखादा कोणता प्रकार, कोणती कल्पना आपण शेवटी उचलतो हा मात्र अगदी जाणतेपणे घेतलेला निर्णय असू शकत नाही ते म्हणतात. ज्यावेळी कथा सुचते तेव्हा ती एखाद्या ढगासारखी असते. ह्या ढगाचा पाठलाग करताना त्याच्या अनेक कथा देखील बनू शकतात.  आपल्या काही कथा या कशा जुळ्या बहिणी आहेत हा प्रकार देखील ते या ढगाच्या रूपकातून स्पष्ट करून सांगतात.  

बऱ्याच वेळा कथा लिहिताना आपली कथा बिनसले आहे हे मध्यावर आपल्याला जाणवलं आहे मग त्यावेळी आपला हातच पुढे चालत नाही मग ती पुढची पाने अथवा सगळी कथाच मी फाडुन टाकतो असे ते म्हणतात. 

१०) एखादी कथा लिहायला सुरुवात केली की आपल्याला नक्की काही म्हणायचं आहे हे आपल्या मनात नक्की ठरलेलं नसतं. त्यामुळे सुरुवातीचा बराचसा काळ हा अनिश्चिततेचा असतो. पण एक क्षण मात्र असा येतो की कथा आपल्याला जमली असं वाटू लागतं. त्यानंतर सुरळीतपणे लिहिली जाते कोणत्याही कथेमध्ये वेगवेगळी वर्तुळे असतात,  कथेतील व्यक्तिरेखा या वर्तुळांमध्ये फिरत असतात. 

१०) लेखकाची एक विशिष्ट प्रकारची लिखाणशैली काही कालावधीनंतर तयार होते,   त्यामुळे कथानकरचना, पात्र यामध्ये काहीसा तोचतोचपणा येऊ लागतो.  हा घटक लेखकांनी टाळावा असे ते म्हणतात. 

११) चांगलं साहित्य म्हणजे काय नक्की काय हे लेखकाला जरी माहीत असलं तरीदेखील प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी त्या जाणिवेचा प्रत्यक्षात अंमल करणे हे इतकं सोपं नाही.  पुन्हा एकदा ढगाच्या उदाहरणाकडे वळुन ते म्हणतात की कथा ज्यावेळी सुचते त्यामध्ये त्या ढगामध्ये एकच नव्हे तर अनेक कथारुपी ढग असतात. त्यातील एका ढगांवर मन केंद्रित होण्याची क्रिया सावकाश आणि रेंगाळत होते. आपण एका विशिष्ट ढगावर लक्ष केंद्रित करावं असं ठरवावं आणि मनानं तसं करायला नकार द्यावा असेही अनेकदा घडतं आणि मग शेवटी जो ढग निवडला गेला त्यावर कथा लिहिली जाते.  

१२) विनोदी साहित्य या प्रकाराकडे आपण केंद्रित केले नाही असे ते  म्हणतात. मराठी भाषेत झालेल्या विनोदी लिखाणाविषयी आपण फारशे समाधानी नाही आहोत असे विधान ते करतात. त्या मानाने  इंग्लिश भाषेत अधिक चांगल्या दर्जाच्या विनोदनिर्मिती झाल्या आहेत ह्याचं सोदाहरण विवेचन त्यांनी केलं आहे.  

१३) विनोद कथांची निर्मिती प्रक्रिया काहीशी वेगळी आहे. गंभीर कथा जशा मनाच्या खोल अज्ञात व्यापारापासून जन्माला येतात त्याप्रमाणे विनोदी कथा जन्माला येत नाही. मनाच्या वरच्या थरांतून विनोदी कथा जन्म घेतात. काल परवा घडलेल्या कुठल्यातरी घटनांशी त्यांचा संबंध असतो. 

१४) विनोदी लेखकांकडुन त्यांनी समाजावर ताशेरे झाडले पाहिजेत, समाजातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली पाहिजे अशी अपेक्षा साधारणतः केली जाते. 

१५) विनोद हा सहजपणे आपल्या गतीने आणि आपल्या पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विनोद करताना कुठे थांबायचं आणि अतिशयोक्ती कशी किती ताणायची, संभाषणातील घोटाळा कुठपर्यंत वाढत जाऊ द्यायचा हे कळावं लागतं. 

१६) मराठी भाषेची माझी नीट उमज आणि समज होती का?  मी मराठी जुनं साहित्य वाचलं नव्हतं,  संस्कृतचाही माझा व्यासंग नव्हता. संगीताचा मला कान नव्हता यामुळे माझी भाषिक क्षमता फार मर्यादित झाली होती का?  भाषिक क्षमतेवर अनुभव ओळखायची,  त्याचा वेगळेपणा,  खास त्याची चव टिपण्याची शक्ती काही प्रमाणात तरी अवलंबून असते.  त्याच बरोबर भाषिक क्षमता हा एक अडथळा देखील होऊ शकतो असं जरी वाटत असलं तरी  एकंदरीत आपल्या मर्यादित भाषिक क्षमतेबद्दल मला खंत वाटायची असे ते म्हणतात. ती खंत दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी तुकारामाचे अभंग बखरी वगैरे जुनं  साहित्य मी थोडंफार वाचलं पण त्यात माझे मन रमेना!

१७) ते आपल्या स्वभावाविषयी सुद्धा म्हणतात. मी आयुष्यात अनेक धोके पत्करले. अनेक संघर्ष अंगावर ओढून घेतले तरी पण मला वाटायचं की मी भित्रा आहे. मला वाटायचं की मी साहित्यातही  तसंच करतो का? तीव्र आणि उत्कट अनुभवांपासून मी दूर पळतो का? ज्या अलिप्तपणे मी साहित्य लिहितो ते या पळपुटेपणाचेच वाङमयीन रुप आहे का?

गाडगीळांनी ह्या आणि बऱ्याच अनेक मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या साहित्याचे विस्तृत वर्णन केलं आहे. हे करताना ते  स्वतःच्या  व्यक्तिमत्वाचं देखील सखोल  विश्लेषण करतात. मराठी साहित्यिकांपैकी किती जणांनी असा प्रयत्न करुन पाहिला आहे हे मला ठाऊक नाही , पण  गाडगीळांचा हा प्रयत्न एक प्रामाणिक आणि मराठी भाषासौंदर्यानं  नटलेला  समृद्ध  अनुभव म्हणुन माझ्या ध्यानात राहील !

रविवार, १ जुलै, २०१८

साथ सोबत!



न्यु इंग्लिश स्कूल ही वसईतील एक नामवंत शाळा!! या शाळेची स्थापना साधारणतः ७५ वर्षांपुर्वी झाली. या शाळेनं वसईतील अनेक पिढ्या घडवण्याचे कार्य केलं आहे. या शाळेत अनेक गुरुतुल्य व्यक्तिमत्वांनी वास्तव्य केले आणि आपल्या ज्ञानदानाने असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य अलंकारित केले. ह्या सुवर्णयुगातील आठवणी केवळ मनात ठेवुन गेल्या कित्येक पिढ्या राहिल्या. आणि त्यातील काही काळाच्या पडद्याआड गेल्या सुद्धा! वसईच्या सुवर्णकाळातील या अतिरम्य आठवणींना लिखित स्वरुपात नोंदवण्याचा प्रयत्न झाला नसेलच असं मी म्हणत नाही! परंतु या सर्व आठवणींची एकत्रित स्वरुपात लिखित नोंद नाही ही खंत मात्र तो सुवर्णकाळ अनुभवलेल्या बऱ्याच जणांच्या मनात आहे. 

जणु काही ही खंत ओळखुनच या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या वसईतील दोन नामवंत शिक्षिका नंदिनी पाटील मॅडम आणि सापळे मॅडम या दोघींनी गेले काही महिने या आठवणींना उजाळा दिला आणि नुकतंच ह्या  आठवणी पुस्तकरुपानं प्रसिद्ध केल्या. या पुस्तकाचं नाव आहे साथ सोबत!  या दोघीजणींनी जवळपास चाळीस वर्ष या पवित्र वास्तूमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले.
अजुनही मोजक्या विद्यार्थ्यांना ह्या दोघी मार्गदर्शन करीत असतात.  या शालेय नोकरीच्या कालावधीत विविध गुणी शिक्षिकांशी त्यांचा संबंध आला. हा संबंध केवळ शैक्षणिक क्षेत्रापर्यंत मर्यादित न राहता हे ऋणानुबंध वैयक्तिक आयुष्यात सुद्धा विस्तारित झाले. आणि मग विणले गेले ते मैत्रीचे घट्ट बंध! या मैत्रीच्या अतुट नात्यांना पुस्तक स्वरुपात या दोघींनी अत्यंत सुरेख मुर्तरुप दिलं आहे. 

है दोघींच्या जवळपास २१ मैत्रिणींची व्यक्तिचित्रे या पुस्तकात आपल्याला वाचायवास मिळतात. 


यातील बहुतेक सर्वजणींनी वसईतील न्यु इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना शिकविले आहे. परंतु या शिक्षकांची तेव्हा केवळ शिक्षिका म्हणूनचआम्हांला ओळख होती. एक व्यक्ती म्हणून ह्या साऱ्याजणी कशा होत्या, त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या अडचणींचा मुकाबला केला,  प्रत्येकीच्या अंगी कसे वेगवेगळे कलागुण आहेत आणि वयाचे बंधन पाळता अजूनही या सर्वजणी कशा एकत्र येऊन ह्या मैत्रीला उजाळा देतात या सर्वांचं एक उत्कट वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचावयास मिळतं.  

पाटील मॅडम आणि सापळे मॅडम यांनी या पुस्तकांमध्ये छोट्या छोट्या काव्यरूपी रचनांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. नारकर मॅडमचा उल्लेख करताना खालील ओळी मॅडमचे चित्र खरोखर डोळ्यासमोर उभं करतात.  

हात जोडीते स्मरण तुझे। 
डोळे बंद करता मूर्ती दिसे। 
मनाच्या कोपऱ्यात ध्यास वसे। 

या रचना इतक्या बेमालुमपणे या पुस्तकातील त्या व्यक्तिमत्वाच्या छटेत अशा मिसळून जातात की आपण अगदी खुश होऊन जातो. खरंतर पाटील मॅडम प्रामुख्यानं इंग्लिश शिकवायच्या आणि सापळे मॅडम गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका!! परंतु आपल्या अंगी असलेले मराठीचे यांनी प्रभुत्व या दोघींनी या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत दिलदारपणे वाचकांसमोर ठेवलं आहे. 

प्रत्येक मैत्रिणीला या दोघींनी एक विशेषण दिलं आहे आणि ते विशेषण त्या मैत्रिणीच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसं आहे! पुस्तकाची मांडणी दोन मैत्रिणींनी केलेले आपल्या बाकीच्या जिवलग मैत्रिणींचे वर्णन अशी असली तरी हे वर्णन करताना न्यु इंग्लिश स्कुल आणि वसईचा मागील काही दशकातील  सुवर्णकाळ डोळ्यासमोर अलगदपणे उलगडत जातो.  त्यातील प्रत्येक मैत्रीण ही शाळेतील एक मान्यवर शिक्षिका आणि त्यातील काही जणींचे यजमान हे मान्यवर शिक्षक! या पुस्तकाच्या माध्यमातून या ऋषितुल्य शिक्षकांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी आपल्याला मिळते.  या शिक्षिकांच्या अंगी असलेले पाककलेचे, संगीताचे अज्ञात असे पैलूसुद्धा आपल्याला समजतात. 

या पुस्तकातून शाळेच्या आवारात असलेल्या शिक्षकांच्या कॉलनीचे वर्णन अधूनमधून डोकावत राहते आणि मग वाचकाच्या मनात असणाऱ्या या कॉलनीच्या आणि त्यात वास्तव्य करुन राहिलेल्या शिक्षकांच्या आठवणी  पुन्हा जागृत होतात. हे सर्व शिक्षक मूळचे वसईचे होते असं नाही.  महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली आणि आपल्या पेशाच्या निमित्ताने वसईत विसावलेली ही मंडळी! वसईच्या मातीत असा कोणता घटक आहे देव जाणे पण वसईत जो कोणी एकदा आला तो वसईत मनानं अगदी रमून गेला. ह्या सर्वांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं झालं आहे. वसईत कायमस्वरुपी वास्तव्य करणं सर्वांनाच शक्य झाला असे नाही परंतु जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ही सर्व मंडळी वसईला नक्कीच येतात. ह्या मैत्रिणींच्या स्नेहसंमेलनाच्या आठवणी पुस्तकातुन डोकावत राहतात. 
वसईच्या आठवणी त्या तर मात्र मनात सदैव घेऊन वावरत असतील ह्या विषयी शंका नाही! 

मांजरेकर आणि दांडेकर ही जोडी वसईकरांना कित्येक दशके पाहिली आहे  पुस्तकातील हे वाक्य तंतोतंत परिस्थितीशी जुळणारं आहे. मांजरेकर मॅडमचं वर्णन करताना ह्या दोघी म्हणतात की १९७०-७१ साली भेटलेल्या मांजरेकर मॅडम आणि आजच्या मॅडम यांत आम्हांला कुठे बदल दिसत नाही हे वाक्य तर मनाला अगदी शंभर टक्के पटून जाते.  २००२ च्या सुमारास मांजरेकर मॅडम सत्यनारायणाच्या पुजेच्या निमित्तानं घरी आल्या होत्या. मी कोणा लहान मुलासोबत तरी सहज बॅडमिंटन खेळायला होतो आम्हाला खेळताना बघुन स्वस्थ बसल्या त्या मॅडम कसल्या! त्या देखील लगेच खेळावयास उतरल्या आणि आपल्या जीवनातील बॅडमिंटन आठवणी सांगू लागल्या.  न्यु इंग्लिश स्कूलच्या काही शिक्षकांना त्यांच्या आद्याक्षरांवरून जात असे. मीना म्हात्रे मॅडम मुळगावच्या! त्यांचं वर्णन करताना सुद्धा MH असे करण्यात आले आहे. 

 या पुस्तकाविषयी अधिक काही लिहून मी तुमची उत्सुकता ताणणार नाही. पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन आदरणीय श्रीमती इंदुमती बर्वे मॅडम ह्यांच्या शुभहस्ते त्यांच्या वाढदिवशी करण्यात आले. त्या प्रसंगी दोन्ही लेखिकेचे मॅडम सोबतचे हे छायाचित्र ! 



पहिल्या आवृत्तीच्या मोजक्या प्रति छापताना केवळ आपल्या मैत्रिणींसोबत हे पुस्तक शेयर करावं असा त्यांचा विचार होता. परंतु ही बातमी जसजशी पसरली तसं ह्या दोघीजणींना दुसऱ्या आवृत्तीचा जोरदार आग्रह करण्यात येऊ लागला आहे. न्यु इंग्लिश स्कूलशी  आपला जर संपर्क आला असेल तर  This is a Must Read Book! दुसऱ्या आवृत्तीची आपली प्रत आधीच राखुन ठेवा !!

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

The Remains of the Day - भाग १


नेहमीच्या धोपटमार्गातील वाचनापासुन फारकत घ्यावी ह्या हेतूनं प्राचीकडून भाऊबीज भेट म्हणुन The Remains of the Day ह्या नोबल पारितोषिक विजेत्या पुस्तकाची मागणी केली. त्या पुस्तकाचं परीक्षण येत्या काही भागात! नक्की भाग किती असं विचाराल तर सध्या ठाऊक नाही. पुस्तक परीक्षण कसं करावं ह्याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का हे मला ठाऊक नाही. माझा हा प्रयत्न मात्र कथेचा आढावा, काही मुख्य व्यक्तिमत्वांचं चित्रण, १९३० च्या सुमारातील बटलर ह्या पेशाचे इंग्लंडमधील जीवनाचं ह्या पुस्तकातुन घडणारं दर्शन, आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर उलगडत जाणारी आणि कधी वास्तवात न उतरलेली प्रेमकथा ह्या बाबींशी संबंधित राहील. 

कथा ही फ्लॅशबॅक स्वरूपातील! १९५० च्या सुमारास डार्लिंग्टन हॉलचे नवीन अमेरिकन मालक फॅरॅडे आणि त्यांचा सेवक मिस्टर स्टीवन्स ह्यांच्याभोवती ही कथा सुरु होते. आपण अमेरिकेला सुट्टीवर जात असल्यानं स्टीवन्स ह्यानं आपली फोर्ड गाडी घेऊन इंग्लंडच्या ग्रामीण भागाचा फेरफटका मारुन यावा असं फॅरॅडे सुचवितात. त्याच सुमारास डार्लिंग्टन हॉलमध्ये १९३० च्या कालावधीत  स्टीवन्स ह्यांच्या सोबत इथं कर्मचारी म्हणुन काम केलेल्या मिसेस बेन (पूर्वाश्रमीच्या मिस केंटन ) ह्यांचं पत्र स्टिव्हन्स ह्यांना आलं असतं. एकंदरीत पत्राचा सूर पाहता मिसेस बेन ह्यांच्या जीवनात काहीशी अस्थिरता आली असुन त्या डार्लिंग्टन हॉलमध्ये पुन्हा कामासाठी येण्यास तयार असतील असा समज स्टिव्हन्स करुन घेतात. 

फोर्ड गाडी घेऊन एकट्यानं प्रवास करत इंग्लंडच्या नयनरम्य ग्रामीण भागाचं दर्शन घेत असताना स्टिव्हन्स ह्यांचं मन  भुतकाळाच्या आठवणीत ओढलं जातं. लॉर्ड डार्लिंग्टन आणि त्यांच्या कुटुंबियांकडे ह्या भव्य वास्तुची मालकी जवळपास दोन शतकं असते. अशा गौरवास्पद इतिहासाचं भुषण अभिमानानं मिरवणाऱ्या वास्तुची देखभाल ठेवायची असेल तर तिथला कर्मचारीवर्ग सुद्धा कसा अगदी तत्पर आणि कुशल असायला हवा. आदर्श बटलर कसा असायला हवा ह्याविषयावर बरीच पानं काझुओ ह्यांनी खर्च केली आहेत. आदर्श बटलरचे गुण कुठं लिखित स्वरुपात तुम्हांला आढळणार नाहीत पण स्टीवन्सला मात्र हेज सोसायटीने (Hayes Society) आचरणात आणलेले बटलर निवडीचे मापदंड काहीसे मदत करु शकतात असे वाटत असते. इंग्लंडच्या परंपरावादी संस्कृतीच्या विचारसरणीचं प्रतीक इथं आपणास दिसतं. नवश्रीमंत उद्योगपती लोकांच्या आधुनिक घरात काम करणाऱ्या बटलरला आदर्श बटलरच्या संभाव्य यादीत समाविष्ट करण्यास सुद्धा हेज सोसायटी तयार नसते. आणि हो असा कुणी खरोखर चांगला बटलर समजा चुकुन अशा उद्योगपतीच्या घरात कामास गेला तर परंपरावादी घराणी त्याला खेचुन आपल्या जुन्या प्रशस्त वास्तुत आणतील असा विश्वासही हेज सोसायटीला वाटत असावा असं स्टीवन्स म्हणतात. 

ह्या विषयावर स्टीवन्स आणि त्यांचे मित्र ग्रॅहम ह्यांच्या वारंवार चर्चा झडत असाव्यात. अत्यंत कार्यक्षम बटलर आणि महान बटलर ह्यांच्यात फरक कोणता असेल तर 'Dignity' (आब ) ह्या गुणाचा ह्यावर ह्या दोघांचं एकमत होत असलं तरी Dignity ची व्याख्या कशी करायची ह्यावर मात्र ह्या दोघांचं एकमत होणं कठीण होतं. ह्या दोघांच्या चर्चेतील Dignity च्या उद्धृत केलेल्या काही व्याख्या इथं मुळ इंग्लिशमध्ये!

Dignity is something like a woman's beauty and it was pointless to attempt to analyze it. 

Dignity was something one possessed or did not by a fluke of nature; and if one did not self-evidently have it, to strive after it would be futile.

Dignity has to do crucially with a butler's ability not to abandon the professional being he inhabits. 

असो मग स्टीवन्स ह्यांच्या आठवणींचा ओघ मग त्यांच्या वडिलांच्या जीवनाकडे वळतो. त्यांच्या मालकांच्या मद्यपान करुन आपले होशहवाल गमावुन बसलेल्या मान्यवर पाहुण्यांना त्यांनी एकही शब्द न बोलता केवळ आपल्या वागणुकीने वठणीवर आणलं ह्याची कहाणी स्टीवन्स सांगतात. इंग्लंडचा प्रमाणाबाहेरचा अभिमान अधुनमधून डोकावतो. जातिवंत बटलर केवळ इंग्लंडमध्येच अस्तित्वात आहेत इतरत्र आहेत ते केवळ पुरुषसेवक! 

वडिलांच्या आठवणीनंतर मग ओघ वळतो तो मिसेस बेन ह्यांच्याकडे. स्टीवन्स मात्र त्यांना मिस केंटन म्हणुन संबोधणेच पसंत करतात. मिस केंटन आणि स्टीवन्स ह्यांचे वडील जवळपास एकाच वेळी लॉर्ड डार्लिंग्टन ह्यांच्याकडे कामास रुजु होतात. स्टीवन्स ह्यांच्या वडिलांचं त्यावेळी वय झालेलं असते परंतु परिस्थितीमुळे त्यांना हे काम करणं भाग पडलेलं असतं. सुरुवातीला काही कारणास्तव मिस केंटन स्टीवन्स ह्यांच्या वडिलांच्या विरोधात असतात आणि त्यांच्या कामात खोट काढण्याचा प्रयत्न करत असतात. 

स्टीवन्स हे मुख्य बटलर असल्यानं एकंदरीत कर्मचारीवर्गाची संख्या ठरविणे, कामाच्या दर्जावर बारीक लक्ष ठेवणं अशा सर्व जबाबदाऱ्या पार पडत असतात. पाहुणे भोजनासाठी बसले असताना त्यांच्या बोलण्यातील प्रायव्हसीचा भंग न होऊ देता त्यांना वेळोवेळी सर्व्ह करत राहणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे असं स्टीवन्स म्हणतात. 

पुढं आठवणींचा ओघ डार्लिंग्टन हॉलमध्ये येणाऱ्या जर्मनीच्या पाहुण्यांच्या भेटींकडे वळतो. पहिल्या महायुद्धात पराभुत झालेल्या जर्मनीतले  पाहुणे लॉर्ड डार्लिंग्टनकडे सतत येत राहतात. आणि मग राजकीय चर्चा अगदी गरमागरम स्वरुप धारण करतात. एक बटलर म्हणून ह्या सर्व घटनांचे साक्षीदार होण्याची संधी स्टीवन्स ह्यांना मिळते. 

(क्रमशः )

(तळटीप  : नोबेल  पारितोषिक  मिळविणारे  पुस्तक  असतं  तरी कसं ह्या कुतुहलापायी  हे  पुस्तक वाचन सुरु  केलं. पुस्तकातील  वाक्यांची धाटणी, जुन्या इंग्लंडचे  वातावरण  शब्दमाध्यमातुन  अगदी हुबेहूब  वाचकांसमोर ठेवणं  ह्या काही बाबी आतापर्यंतच्या  वाचनातुन  जाणवल्या. आणि हो  बटलर ह्या  पेशाविषयी  आणि त्यांच्या १९३० - ५० च्या कालावधीतील  आयुष्याविषयी  अगदी विस्तृत माहिती  हे पुस्तक  देते.  ब्लॉगचा पुढील  भाग लगेचच येईल ह्याविषयी खात्री नाही )

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

अश्रू - वि. स. खांडेकर

Netbhet.com
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि. स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक. कथा म्हणून बघितली तर साधीसुधी. एका आदर्शवादी शिक्षकाचा १९५० च्या आसपास तुटपुंज्या पगारात संसार चालविण्यासाठी, आपल्या मुलाचा एक साधा ३० रुपयाची सायकल आणून देण्याचा हट्ट पुरविण्यासाठी आणि आपल्या बहिणीच्या लग्नासाठी २००० रुपये हुंडा जमा करण्यासाठी चाललेला संघर्ष हे वरवर पाहता दिसणारे कथेचे सार! खांडेकर आपल्या मराठी भाषेच्या वैभवाची खैर करताना आढळतात
वानगीदाखल 'रात्र तलम चंदेरी  वस्त्र नेसून विश्वाच्या वीणेवर विश्रांतीची शांत रागिणी आळवू लागली होती . तिच्या एकेक मध्यम  स्वराची एकेक सुंदर तारका होत होती'.काळानुसार मराठी भाषेत कसकसे बदल होत गेले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि १९५० च्या दशकातील भाषेचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून ह्या पुस्तकाची निवड होऊ  शकते

कथेतील  महत्वाचे पात्र नायकाच्या पत्नीचे. ती जरी नायकाची पत्नी असली तरी नायिका नाही. ह्या एकत्र कुटुंबात सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आयुष्य व्यतित करणे हीच तिची कहाणी आहे, हेच तिचे विश्व आहे. 
कहाणीत खांडेकरांनी उमेच्या मनात शंकरविषयी असलेल्या प्रितीभावनेचे सुरेख वर्णन केलं आहे. कथेतील उमेची प्रिती जशी मूक आहे तशीच खांडेकर ह्या भावनेसाठी वापरलेली भाषा सुद्धा सूचक आहे. 
बाह्य जगाच्या दृष्टीने अगदी सामान्य असलेल्या आपल्या पतीला उमा मात्र अगदी मनापासून पूजत असते. आपल्याच वाट्याला आर्थिक तंगी का यावी असला प्रश्न तिला पडत नाही. समजा हीच परिस्थिती आजच्या युगातील एखाद्या जोडप्याच्या वाट्याला आली असती तर त्या पत्नीला आपल्या पतीविषयी असे निरामय प्रेम जपणे शक्य झाले असते का?
ह्याचं उत्तर नाही असण्याचीच शक्यता जास्त आहे. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे हल्लीच्या युगात स्त्रीचे विश्व उमाइतके मर्यादित राहिलं नाही. ते खूप व्यापक बनलं आहे. ह्या स्त्रीच्या मनात सुरु असणाऱ्या विचारचक्राची वैविधता बरीच व्यापक बनली आहे. जीवनात येणाऱ्या विविधांगी अनुभवामुळे व्यापक बनणारे हे विचारचक्र ह्या आधुनिक स्त्रीला मानसिक समाधानाच्या उंच पातळ्यांवर नेऊन ठेवते आणि अशा प्रकारे मानसिक समाधान अनुभवणारी स्त्री ज्यावेळी आपल्या पतीशी संवाद साधते त्यावेळी जर तिचा वारंवार अपेक्षाभंग होत असेल तर ती हळूहळू स्वतःभोवती एक कोश विणू लागते आणि मग तारा कधी जुळल्याच जात नाहीत. हल्लीच्या युगातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या पुरुषास ही विवंचना बाजूला ठेवून आयुष्यातील बाकीच्या बाबींच्या जोरावर आपल्या पत्नीशी चांगल्या प्रकारे सुसंवाद साधणे कितपत शक्य आहे?

ह्या पुस्तकाच्या आरंभी खांडेकरांनी प्रस्तावनासदृश्य 'दोन शब्द' लिहिले आहेत आणि शेवटी ह्या पुस्तकाची 'पार्श्वभूमी' लिहिली आहेत
'दोन शब्द' मधून खांडेकरांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. १९३० साली लिहिलेल्या "हृदयाची हाक" ह्या कादंबरीला त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांच्या लेखन कर्तृत्वाचा आलेख उंचावतच राहिला होता. पण काही कालावधीनंतर ते काहीसे सुप्तावस्थेत गेले. अश्रू ह्या कादंबरीआधीची दहा वर्षे त्यांची कोणतीही कादंबरी प्रकाशित झाली नाही. ह्या सर्वांची मीमांसा त्यांनी ह्या "दोन शब्द" ह्या प्रस्तावनेत केली आहे

"पार्श्वभूमी" मध्ये ते १९०० सालच्या आसपास हरिभाऊ आपटे ह्यांनी वर्णिलेल्या मध्यमवर्गाचा संदर्भ देतात. आणि ती परिस्थिती १९५० सालापेक्षा कशी वेगळी होती ह्याचे पृथ्थकरण करतात. गेल्या शंभर वर्षात मागे वळून पाहिले असता जीवनात खूपच स्थित्यंतरे झाली आहेत असं त्यांना जाणवलं. मला ही एक महत्वाची बाब वाटली. हल्लीची म्हणजे २०१५ सालची मंडळी सुद्धा आमच्या लहानपणी असं होतं तसं होतं असे म्हणत असतात. अगदी नेमकी तीच भावना १९५० च्या सुमारास खांडेकरांच्या मनात सुद्धा होती. म्हणजे फारसे काही चिंतेचे कारण नाही हो मंडळी

खांडेकरांच्या नजरेतून गेल्या काही वर्षात यंत्रयुगाने सामाजिक जीवन व्यापून टाकलं. ह्या यंत्रयुगाने सामान्य माणसांच्या जीवनात ज्याप्रमाणे सुखसोयींच्या संधी उपलब्ध केल्या त्याचप्रमाणे अनेक पटींनी क्लिष्टताही निर्माण केली. खांडेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर "सुंदर फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखावरून भयंकर साथीचे जंतू जिकडे तिकडे पसरावेत, तसे ह्या युगाचे कर्तुत्व विचारवंतांना वाटू लागलं आहेहे युग ज्याप्रमाणे कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवर उपाय आणते त्याचप्रमाणे अणुबॉम्बची विध्वंसकतासुद्धा हे युग निर्माण करते. पुन्हा एकदा यंत्रयुगाविषयी खांडेकरांनी जी भावना व्यक्त केली आहे नेमकी तीच आज संगणकयुगाविषयी बाळगून आहोत. यंत्रयुग झालं , आज संगणकयुग बहुदा आणखी काही वर्षांनी यंत्रमानव आणि संगणक ह्यांचं एक संयुक्त युग असेल आणि त्यात माणसे कुठेतरी जीव मुठीत धरून हीच भीती व्यक्त करतील. कालाय तस्मे नमः!! 

गेल्या पन्नास वर्षात दिसलेला अजून एक फरक खांडेकर मांडतात. टिळक आगरकरांनी जो स्वार्थत्यागाचा आणि ध्येयवादाचा कित्ता घालून दिला तो महाराष्ट्रातील पुढल्या दोन पिढ्यांना पुरला. नव्या इंग्रजी शिक्षणाचे फायदे जुन्या विद्येकडून तिकडे वळलेल्या मध्यमवर्गीयांच्या पदरात पडले. त्यामुळे बराच काळ आदर्शवाद बाळगताना सुद्धा आर्थिक विवंचनेचे सावट मध्यमवर्गीयांवर कधी आलेच नाही. पण पहिल्या महायुद्धानंतर मात्र परिस्थिती पालटली. आणि मग त्यानंतर गांधींजीचा उदय झाला. मध्यमवर्गीयांचा ध्येयवाद अजूनही काही प्रमाणात शाबूत राहिला होता. पण इंग्रजी अंमल जसजसा सुस्थिर होऊ लागला तसतसा मध्यमवर्गीयांचा एकजिनसीपणा मोडला. त्यांच्या परंपरागत निष्ठा द्विधा झाल्या. समाजातील एक थर आर्थिक ध्येयांच्यामागे धावताना दिसला

खांडेकरांची विश्लेषणशक्ती अत्यंत खोलवर आहे ह्याची प्रचीती ह्या पार्श्वभूमी लेखनातून वारंवार येत राहते. पैशाची ऊब नसली की माणसाच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.खालच्या वर्गातील लोकांची पैशाच्या अभावी जी कुतरओढ होते ती शारीरिक गरजांची असते; ह्या उलट पैशाअभावी मध्यमवर्गीयाला मात्र भावनिक आणि वैचारिक कुतरओढीला सामोरे जावे लागते. अगदी खालच्या वर्गाने परंपरेने आणि परिस्थितीने त्याच्या इच्छा, वासना आणि अपेक्षा मर्यादित केलेल्या असतात. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख मध्यमवर्गाइतके ह्या वर्गाच्या वाट्याला येत नाही
जवळजवळ वीस पाने खांडेकर आपल्याला ह्या अगदी खोलवर विश्लेषणाने खिळवून ठेवतात. अखेरीस ते एक महत्वाचा मुद्दा मांडतात
जगाच्या दृष्टीने अतिशय सामान्य व्यक्तीचे चित्र रंगवणे कितपत महत्वपूर्ण आहे? त्याच वेळी त्यांचे दुसरे मन त्यांना उत्तर देई, "विसाव्या शतकानं दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सर्वसामान्य माणसाला दिलेलं महत्त्व!" असामान्यत्वाचे आकर्षण जगाला वाटावे हे स्वाभाविक आहे. पण जीवनातील अधिक भाग कुणाचा असतो? मुठभर असामान्यांचा की शेकडा नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजवर राजांनी, वीरांनी,संतांनी, तत्वज्ञानी लोकांनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी ह्या सामान्य माणसाला बोलू दिले नव्हते पण आज ह्या सामान्य माणसाची वेळ आली आहे. सामान्य माणूस भलेही काही असामान्य करत नसेल पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चुकीचे पाऊल न उचलण्याचा पराकोटीचा संयम हा मध्यमवर्गीय दाखवतो आणि तेच ह्याचे असामान्यत्व!!

खरंतर केवळ कथा वाचून मी ज्यावेळी पुस्तक बाजूला ठेवलं तेव्हा केवळ भाषा वैभवाच्या शाही प्रदर्शनाने मी सुखावून गेलो होतो. कथेचा अचानक झालेला शेवट मला काहीसा रुचला नव्हता. पण दुसऱ्यांदा पुस्तक जेव्हा हाती घेतलं तेव्हा "दोन शब्द" आणि "पार्श्वभूमी" नजरेस पडलं आणि मग ह्या पुस्तकाकडे पाहण्याचा एक दुसरा दृष्टीकोन मिळाला. कथेतील नायकाचं जे व्यक्तिमत्व आहे , त्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची उलगड खांडेकरांच्या ह्या मनोगतातून मिळाली. पुस्तकं कसं वाचावं हे ह्या खांडेकरांनी समजावून दिलं. घाईघाईने  पाने नजरेआड करणे म्हणजे पुस्तक वाचणे नव्हे हे मला जाणवलं. खांडेकरांसारखा व्यासंगी लेखक असेल तर पुस्तक कसं अगदी मन लावून वाचावं हे मी शिकलो! मराठी भाषेतील ह्या श्रेष्ठ साहित्यिकाचे धन्यवाद! नाताळच्या सुट्टीत ह्या पुस्तकाचे अजून एक वाचन करावे असं म्हणतोय, अजून बरेच पैलू उलगडतील हे नक्की!! 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...