मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ६

 
RBS च्या बंगलोर शाखेतील निवडीने नीलाच्या अंगात नवीन जोम शिरला होता. मनावर घेतलं तर आपणसुद्धा अगदी स्कॉलर जनतेच्या बरोबरीने अभ्यास करू शकतो हे तिला नव्यानेच जाणवलं होतं. केवळ हेच सिद्ध करायचं होतं की आणखी काही हे मात्र तिला उमगत नव्हतं. सुशांतची सुद्धा तिथंच निवड झाली हे तिला कळलं होतं. अजून काही महिने बाकी असल्याने तिने फारसं दडपण घेतलं नव्हतं. 

वरवर पाहिलं तर सुशांतचे आयुष्य अगदी दृष्ट लागण्याइतपत परिपूर्ण होतं. तो महाविद्यालयातील एक टॉपर होता, एक लठ्ठ पगाराची नोकरी त्याने मिळवली होती. बाबा नवनिर्वाचित आमदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत असं म्हणतात खरं; पण सुशांत आणि रावांच्या घरी मात्र ह्या दोघीही सुखाने नांदताना वर वर का होईना पण दिसत होत्या. 

हे झालं वरवरचं चित्र! पण मनातून मात्र सुशांत विचलित होता. आमदारकी मिळाल्यावर घरी आता वेगळ्या प्रकारची लोक भेटायला यायला लागली होती. पूर्वी नियमितपणे घरी येणारे साधे सुधे कार्यकर्ते बाबांना भेटायला उत्सुक असायचे पण बहुदा त्यांना भेटण्यासाठी बाबांकडेच वेळ नसायचा. त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही अशी सबब पुढे करणाऱ्या बाबांकडे मात्र मोठ्या उद्योगपतींना भेटण्यासाठी वेळ असायचा. त्यांच्या ह्या बैठकी मात्र बराच वेळ चालायच्या. पूर्वी वर्षातून क्वचितच एखाद दुसऱ्यांदा मदिरासेवन करणारे बाबा आता ह्या श्रीमंती लोकांच्या सहवासात नियमितपणे उंची मद्य प्राशन करू लागले होते. एकदा आईने ह्याबाबतीत त्यांना विचारलं सुद्धा! "हल्ली इतकं टेन्शन येतं कि अधून मधून घ्यावीच लागते!" त्यांचं हे उत्तर त्यांना स्वतःलासुद्धा पटत नसल्याने आईला पटण्याची तर त्यांनी अपेक्षासुद्धा केली नव्हती. 

सुशांतला नीला कॉलेजात दिसायची पण भेटायची नाही. दोघांच्याही शाखा वेगवेगळ्या होत्या आणि नेमके वर्ग दोन वेगवेगळ्या मजल्यावर होते. नीलाविषयी सुशांत मनात अगदी गंभीरपणे विचार करीत होता. आपलं  तिच्यावर प्रेम वगैरे आहे की नाही हे समजून घेण्याचा त्याचा अट्टाहास नव्हता. त्याला नीला हवी होती पत्नी म्हणून आणि तिथंच त्याचा मोठा संभ्रम होता. ज्या प्रकारे आपल्या घरातील वातावरण बदलत चाललं होतं ते त्याला अजिबात पटत नव्हतं. एक सुसंस्कृत मध्यमवर्गीय घर पूर्णपणे पैशाच्या मागे धावताना दिसत होतं. पैसा कमावणे चुकीचं असं त्याचं केव्हाही म्हणणं नव्हतं पण बाबा ज्या लोकांच्या संगतीत अधिकाधिक वेळ घालवत आहेत ती लोक सरळ मार्गांनी जाणारी नाहीत हे न समजण्याइतका तो आता लहान राहिला नव्हता. एकदा आईकडे त्याने विषय सुद्धा काढला होता. तिलाही हे सारं पटत नव्हतं पण बहुदा बाबांवर श्रेष्ठींकडून निधी गोळा करण्याची जबाबदारी टाकली गेली होती ह्याची कुणकुण तिला लागली होती. बाबांचा बहुदा नाईलाज झाला असावा असं तिचं म्हणणं होतं. सुशांतला तिचं हे म्हणणं काही पटलं नव्हतं. 

अशा ह्या बदलत्या घरात नीलाला सून म्हणून आणण्याची त्याची मानसिक तयारी झाली नव्हती. आपण चांगलीशी नोकरी मिळवावी आणि जमलं तर स्वतंत्र घरट उभारायचं इतक्या थराला तो गेला होता. पण नीलाचं वागणं मात्र त्याला गोंधळात टाकायचं. आधी तिने बाबांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता त्यावेळी एका शब्दानेसुद्धा मी ही जबाबदारी घेऊ का असं तिने त्याला विचारलं नव्हतं आणि त्यामुळे तो काहीसा दुखावला गेला होता. तरी पण नंतर अधून मधून जेव्हा नीला त्याला शंका विचारायची तेव्हा तो सुखावला जायचा. प्रत्यक्ष व्यक्त केल्या गेल्या नसल्या तरी एकमेकांविषयीच्या भावनांची त्यांना जाणीव होती. म्हणजे सुशांतला तर नक्कीच होती. पण बहुदा नीलाला त्याने त्या भावनांचं उघडपणे प्रकटीकरण केलेलं आवडलं असतं. आणि तिथंच गाडं अडलं होतं. आणि मग हे RBS प्रकरण उद्भवलं होतं. नीला आणि सुशांत ह्यांची एकत्रपणे निवड झाल्यावर कॉलेजातील टवाळ कंपूला आयताच विषय मिळाला होता. तसं म्हटलं तर सुशांतने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं असतं पण एके दिवशी नीलाची सुद्धा RBS मध्ये निवड होण्यात रावांचा हात आहे अशी  अगदी धादांत अफवा कॉलेजात पसरविण्यात दृष्ट प्रवृत्तींना यश मिळालं होतं. आणि तेव्हापासून तर क्वचितच होणारी नजरभेट आणि लपून दिलेलं हसू सारं काही संपल होतं. आता तर नीला पूर्णपणे अभ्यासात गुंतून गेली होती. अशा वेळी आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचविल्या तर उगाचच ती डिस्टर्ब व्हायला नको म्हणून सुशांत सुद्धा गप्प राहिला होता. हे वर्ष काय बघता बघता निघून जाईल आणि मग त्यानंतर आपण विचारपूर्वक कृती करूयात असंच त्याने ठरवलं होतं. 

दारची बेल वाजली तेव्हा नीलाची आई काहीशी आश्चर्यचकित झाली. नीला कॉलेजात गेली होती आणि बाबा ऑफिसात! अशा वेळी घरी कोण येणार अशा विचारातच तिनं दरवाजा उघडला. समोर शलाकाला पाहून तिला आश्चर्यच वाटलं. "हिला आज कॉलेज वगैरे कसं नाही!" अशा विचारातच त्यांनी तिचं स्वागत केलं. "ये ना शलाका! आज किती दिवसांनी येतेस तू!" त्यांनी शलाकाला म्हटलं. शलाका हॉलमध्ये खुर्चीवर बसली. "आज माझं किनई माझ्या चुलत मावशीकडे काम होतं म्हणून मी आज दांडी मारली कॉलेजला!" नीलाच्या आईची साशंक नजर चुकवायचा प्रयत्न करीत शलाका बोलत होती. "हो का! सहजच  काम निघालं वाटतं मावशीकडे !" आई म्हणाली. शलाकाने एक दीर्घ श्वास घेतला. "मावशी, मला खास तुमच्याशीच बोलायचं होतं! म्हणून कॉलेजात न जाता मी थेट आज इथे आले!" शलाकाने थेट मुद्द्यालाच हात घातला. 

पुढील जवळजवळ दीड तासभर दोघी बोलत होत्या, नीला आणि सुशांतबद्दल! नीलाला सुशांत मनापासून आवडला आहे हे तिच्या प्रत्येक कृतीतून शलाकाने गेलं वर्षभर पाहिलं होतं. पण आता ज्या प्रकारे रावांचे शत्रू जिथे संधी मिळेल तिथे ह्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे नीलाला खूपच मानसिक त्रास होत होता. आणि त्यामुळेच तिनं स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. "मावशी, तिला बंगलोरला कोणत्याही परिस्थितीत जाऊन देऊ नका! म्हणजे जिथं सुशांत जाईल तिथं नको! त्या दोघांचं भलं होईल अशीच माझी मनापासून इच्छा आहे पण हे राजकारणी लोक आपापसातल्या वैरापायी उगाच ह्या दोघांचा बळी घायला नकोत!" शलाका अगदी कळकळीने सांगत होती. आईला तिचं म्हणणं बऱ्यापैकी पटत होतं पण नीलाला समजवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. शेवटी मग मी बाबांशी बोलून बघते असं म्हणत आईने शलाकाचा निरोप घेतला. रात्री मग बाबांशी आईने हा विषय काढल्यावर ते ही चिंतेत पडले. 

दिवस भरभर निघून जात होते. सातव्या सेमिस्टरची परीक्षा हा हा म्हणता आली आणि संपून सुद्धा गेली. नीलाने पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं होतं परिणामी पेपर अगदी झकास गेले आणि निकाल लागला तेव्हा त्याची प्रचिती आली सुद्धा! तिच्या शाखेत नीला दुसऱ्या क्रमांकावर आली होती. सुशांत आपला पहिला क्रमांक राखून होता. दिवसागणिक नीलाच्या आईवडिलांची चिंता वाढत चालली होती. बंगलोरला जाऊ नकोस हे नीलाला कसं सांगायचं हे त्यांना समजत नव्हतं. "आपण सुधीररावांशी थेट बोलूयात का? " आईच्या ह्या प्रश्नाकडे बाबांनी साशंक नजरेने पाहिलं. तिला नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांना समजल नव्हतं. "म्हणजे थेट लग्नाविषयी विचारून पाहिलं तर!" काहीही म्हणतेस तू असं बाबांनी नजरेनेच तिला ताबडतोब उत्तर दिलं खरं पण मग ते सुद्धा त्या पर्यायावर थोडा गंभीरपणे विचार करू लागले. जर रावांनी हो म्हटलं असत तर सर्वच प्रश्न सुटणार होते. पण जर नाही म्हटलं तर! त्यांचं डोकं सुद्धा चालेनासं झालं होतं. 

गेले काही दिवस सुधीररावांची वाढती बेचैनी गीताताईंच्या लक्षात येत होती. शेवटी न राहवून त्यांनी रावांना विचारलं. "सर्व काही ठीक चाललंय ना! कामाचा खूप ताण होतोय का! नाहीतर तुम्ही कशी आठवडाभराची सुट्टी काढा बरं! आपण मस्तपैकी कोकणात जाऊन येऊयात! मस्त थंडी पडली असेल तिथं!" आपल्या अनुपस्थितीत सुशांतचे हाल होतील हे माहित असूनसुद्धा गीताताई म्हणाल्या. रावांची बेचैनी त्यांना पाहवत नव्हती. "गीता मी पूर्ण फसवला गेलो गं! एक मोठे आर्थिक प्रकरणात मोठा उद्योगपती आणि पक्षश्रेष्ठी ह्यांच्यात मी मध्यस्थी करत होतो. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण अगदी शेवटच्या क्षणी त्या उद्योगपतीला ते कॉन्ट्रैक्ट न देता दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आलं! आता तो उद्योगपती पूर्ण बिथरला आहे. त्याचे भली मोठी रक्कम ह्या व्यवहारात अडकली आहे. तो श्रेष्ठींचा तर बदला घेऊ शकत नाही पण तुम्हांला पूर्णपणे आयुष्यातून उठवून टाकीन अशी धमकी त्याने मला दिली आहे!" डोळ्यातील अश्रुंवर ताबा न ठेवता आल्याने त्यांना मोकळेपणाने वाहून देत राव म्हणाले. गीताताईना हा मोठा धक्काच होता. आतापर्यंत अगदी सचोटीने व्यवहार करणारे राव ह्या प्रकरणात असे कसे अडकू शकतात ह्याचाच त्यांना उलगडा होत नव्हता. पुढील काही दिवस त्या रावांना धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. पण परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता. 

निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना RBS ने संपर्क केला होता. आणि बरीच कागदपत्रे भरून मागितली होती. काल रात्रीच नीलाने हा विषय आईवडिलांकडे काढला तेव्हा ते दोघे अगदी गप्पच राहिले होते. ही गोष्ट अगदी उत्साहात असलेल्या नीलाच्या कशी कोणास ठाऊक पण लक्षात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून नीला चहाचा कप घेत खुर्चीवर विसावली. सवयीप्रमाणे तिनं वर्तमानपत्राचे मुख्य पान उघडलं आणि तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना! "आमदार सुधीरराव ह्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काल रात्री अटक!" अगदी मोठ्या अक्षरातील ही बातमी वाचून क्षणभर तिच्या डोळ्यासमोर काळोखी आली!

(क्रमशः )

रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ५


 

पुढील तास दोन तासभर नीलाची समजूत घालण्यात गेले. "राजकारणी लोकांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही असं म्हणतात ते काही उगीच नाही!" बाबा म्हणत होते. "तसं म्हटलं तर फार काय मोठं घडलं नाही आणि जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाही!" नीलाची समजूत घालण्यात आईने सुद्धा पुढाकार घेतला होता. दोघांच्या वास्तववादी बोलण्यानं नीला मात्र बरीच सावरली होती. अभ्यासाची बरीच मजल मारायची होती. ह्या घटनेने निराश होऊन बसण्यात काही अर्थ नव्हता. तिने आपल्या अभ्यासिकेत स्वतःला दोन तासभर कोंडून घेतलं. सुरुवातीच्या काही वेळानंतर अभ्यासात तिची चांगलीच लिंक लागली. दोन तासाभराचा अभ्यास झाल्यावर काहीशा प्रसन्न मनाने ती बाहेर हॉलमध्ये येण्यासाठी दार उघडायला गेली तर बाबा हळू आवाजात कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. खरंतर असं लपून ऐकायची तिला सवय नव्हती पण नक्कीच ज्या अर्थी बाबा हळू आवाजात बोलत आहेत म्हणजे हा फोन सकाळच्या घटनेशी संबंधित असणार अशी अटकळ तिने बांधली. 
"हो हो ठीक आहे सुधीरराव!! हे कोण्या दुष्ट बुद्धीच्या लोकांचे कारस्थान आहे हे मी समजू शकतो! तुम्ही फोन केलात त्याबद्दल धन्यवाद!" असे म्हणत बाबांनी फोन ठेवला. 
काही क्षण दरवाजाशीच थबकलेली नीला काहीसा विचार करतच मग बाहेर पडली. बाबांनी तिला सोफ्यावर विसावू दिलं. "रावांचा फोन आला होता! " नीलाकडे पाहत बाबा म्हणाले. "ओ. के." मनातील भावनांचा अजिबात चेहऱ्यावर मागमूस लागणार नाही अशी काहीशी प्रतिक्रिया नीलाने दिली. "सर्वप्रथम आपल्या सर्वांची आणि खास करून तुझी त्यांनी क्षमा मागितली आहे! ह्या प्रकरणात आपल्या सर्वांना जो मनःस्ताप होतोय त्याबद्दल त्यांना खरोखर वाईट वाटल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं!" बाबांनी आपलं बोलणं पुढे चालू ठेवण्यास योग्य वातावरण आहे ह्याची खातरजमा करीत पुढील माहिती दिली. "हा मेसेज पाठविण्यास ज्यांनी सुरुवात केली त्यांच्यापर्यंत पोलिस आजच्या दिवसात नक्कीच पोहोचतील आणि आपला इंगा दाखवतील!" 
बाबांचे बोलणे थांबले तसा नीलाने एक हलकसा उसासा टाकला. "आई जेवण झालं असेल तर वाढ पाहू!" नको असलेल्या विषयावरील चर्चा थांबविण्याची ही नवीन पिढीची ही पद्धत आईला चांगलीच माहित होती. 

केवळ "सॉरी! जे काही घडलं त्याबद्दल आम्ही सर्व क्षमस्व आहोत!" whatsapp वरील ह्या एका संदेशाव्यतिरिक्त सुशांत अजून बरेच काही करू शकला असता असे नीलाला राहून राहून वाटत होते. "पण आपण उगाचच ह्या सर्व प्रकारात प्रमाणाबाहेर जास्त गुंतत चाललो नाही ना!" हा प्रश्न तिने स्वतःला विचारून पाहिला. मग मात्र तिचा प्रचंड गोंधळ उडाला. राव पडले पक्के राजकारणी; माणूस म्हणून कितीही चांगले असले तरी हल्लीच्या राजकारणात सतत राहून त्यांची माणुसकी कितपत शाबूत असणार ह्याबाबत नीलाला खात्री वाटत नव्हती. आणि राहता राहिला तो सुशांत! त्याच्या करियरपुढे आपण किती महत्वाचे आहोत ह्याचा थांगपत्ता नीलाला अजूनही लागला नव्हता. आणि जरी समजा त्याने आपल्याशी लग्न केलं आणि जर तो असाच स्वतःच्या करीयर मध्ये गुंतून बसला तर मग ते आपल्याला आवडेल का? ह्या प्रश्नाचे उत्तर नीलाचे मन नकारार्थीच देत होते. ह्या सर्व गुंत्यातून बाहेर पडण्याचा तात्पुरता मार्ग म्हणजे अभ्यासात स्वतःला झोकून देण्याचा होता. आणि नीलाने तोच पत्करला. अभ्यास सुट्टीच्या शेवटच्या दहा दिवसात तिने अभ्यासात स्वतःला अगदी झोकून दिलं.

मधल्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. अभ्यासाच्या इतक्या तणावातसुद्धा मतदान करण्याची प्रथम संधी युवा वर्गाने न गमाविण्याचा चंग बांधला होता. मतदानकक्षात एक क्षणभर थांबलेली नीला शेवटी रावांनाच मत देऊन बाहेर पडली होती. 

परीक्षेत नीलाच्या परिश्रमाला चांगलेच यश मिळालं होतं. सर्व पेपर अगदी मस्त गेले होते. नेहमी भय देणारा A.T.K.T. नावाचा बागुलबुवा यंदा कोठेतरी दूरवर पळून गेला होता. शेवटचा पेपर संपला तसं ती आणि शलाका काही वेळ कॉलेजातच रेंगाळत राहिल्या होत्या. "सुशांत काय म्हणतो गं!" शलाकाच्या ह्या थेट प्रश्नाने नीला अगदी दचकुन गेली. ह्या प्रकरणाची कॉलेजात थोडीफार चाहूल लागली असली तरी परीक्षेच्या दडपणात कोणी काही बोललं नव्हतं आणि अगदी खास असली तरी हिच्याशी बोलण्याइतपत मामला पुढे गेला आहे असे नीलाला वाटत नसल्याने तिने अजून तिच्यापाशी ह्याचा उल्लेख केला नव्हता. उत्तर देण्यासाठी चाललेला नीलाच्या ओठांचा संघर्ष तिच्या डोळ्यातील तिच्या नकळत थबकलेल्या अश्रूंनी सोडवला. "अग वेडूबाई! चल आपण कोठेतरी बाहेर जाऊन बसू!" शलाकाने जवळजवळ तिला ओढतच बाहेर नेले. 
नीलाने आपल्या मनीच्या भावना शलाकाजवळ मोकळ्या केल्या. खरं म्हटलं तर कॉलेजात ह्या विषयी कुजबुज चालूच होती जी शलाकाच्या कानी पडली होती. पण ती मात्र तिने नीलाला सांगणं ह्या क्षणी टाळलं. आता चांगली तीन आठवड्यांची सुट्टी असणार होती. सुट्टीत एकमेकांच्या घरी किमान एकदा तरी भेट देण्याचे वचन देऊन दोघींनी एकमेकांचा निरोप घेतला. 

सुट्टीचे पहिले दोन दिवस नीलाने चांगली ताणून दिली होती. परीक्षेनंतर खरंतर अजून झोपा काढायचा तिचा मनसुबा आईच्या अचानकच्या पुणे वारीच्या बेताने बाजूला सरला गेला. रात्री आई आणि ती बॅगा भरत असताना "अगदी मतमोजणीच्या दिवशीच पुण्याला जायचं तुम्हांला कसं सुचलं ?" बाबांच्या ह्या प्रश्नाने नीलाला भानावर आणलं. आईसुद्धा विचारात पडल्यासारखी तिला वाटली. मतमोजणीच्या दिवशी प्रवास टाळावा हे बाबांचं म्हणणं तसं बरोबरच होतं. "आता करायचं तरी काय" अशा विचारात ती आणि आई सोफ्यावर बसल्या. "मुळचा बेत आईचा, घेऊ दिला काय तो निर्णय!" असा विचार करीत नीला उठून खोलीकडे निघाली. दोन पावलं पुढे जाते तितक्यात आपला मोबाईल विसरली म्हणून ती मागे वळली तर "तुम्ही इतके बावळट कसे!" अशी बाबांकडे पाहत असलेल्या आईची मुद्रा तिच्या नजरेस पडली. तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मागचा प्रकार पाहता मतमोजणीच्या दिवशी आपण इथे असायलाच नको अशी आईची इच्छा असणार हे तिला उमगलं. नीला अशी अचानक मागे वळल्यावर आई मात्र अगदी गांगरून गेली. मग कोणी काहीच बोललं नाही. नीला मात्र काही वेळाने खोलीतून बाहेर आली, "आई तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण उद्या जाऊयात पुण्याला सकाळी!" दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या दोघी एशियाडने पुण्याला पोहोचेस्तोवर मतदानाचे कौल बऱ्यापैकी स्पष्ट होत चालले होते. रावांनी आपल्या मतदारसंघात विक्रमी आघाडी घेतली होती. आणि त्यांचा पक्षसुद्धा सत्तेवर येईल अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. नीला आणि आई ह्या दोघींनी ह्या  सर्व प्रकारापासून दूरच राहणे पसंत केलं.

बाबा आज रात्री घरी एकटेच होते. दाराची बेल वाजली तर आपण ऑर्डर केलेली पावभाजी घेऊन हॉटेलातून कोणी आलं असावं असं त्यांना वाटलं. पण दार उघडताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रावांचा एक खास माणूस मिठाईचे बॉक्स घेऊन दाराशी उभा होता. दारातूनच त्यांनी रावांना फोन लावला. नीला घरी नाहीय हे कळताच रावांची काहीशी निराशा झाली. "आमच्या यशाला नीलाच्या प्रचाराचा खूपच हातभार लागला! तरुण मतदारांची जवळजवळ ७५% टक्के मते मलाच मिळाली आणि ती फार निर्णायक ठरली!" रावांचा उत्साह फोनवरून सुद्धा उतू जात होता. "नीला परत आली की तुम्ही सर्व घरी जेवायलाच या!" असे सांगून त्यांनी फोन ठेवला. स्त्रिया किती दूरदृष्टीच्या असतात ह्याची खात्री बाबांना आता येत होती. आज नीला इथं असती तर पुन्हा त्या आठवणी बाहेर निघाल्या असत्या. 

दोन दिवसासाठी म्हणून ठरलेलं आईचं माहेरचं वास्तव्य मग आठवडाभर वाढत गेलं. नीलाने सुद्धा त्याला फारसा आक्षेप घेतला नाही. सुट्टीवर परत आल्यावर मग शलाकाशी एकदा भेट झाली. बघता बघता सुट्टी संपून गेली आणि सातवं सेमिस्टर सुरु झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉलेज सुरु होऊन दोन आठवडे होत नाही तोवर मुंबई विद्यापीठाने सहाव्याचा निकाल घोषित केला. आमदारपुत्र सुशांत त्याच्या शाखेत विद्यालयातून प्रथम आले होते!! आणि नीलाच्या परिश्रमाला यश मिळून तिने तिच्या शाखेत पहिल्या पाचांत स्थान मिळविले होते. सर्वांचे लक्ष आता महाविद्यालयात मुलाखतीसाठी येणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे लागून राहिलं होतं. 

ह्या मुलाखतींसाठी काही खास तयारी करण्याच्या मनःस्थितीत नीला नव्हती. मिळाली नोकरी तर हो अशीच काहीशी बिनधास्त वृत्ती ठेवून ती पहिल्या मुलाखतीला गेली. पहिली फेरी संपली आणि त्यात ती निवडली गेली. दुसऱ्या फेरीत ग्रुप डिस्कशन होते. ह्यात तर तिने अगदी बाजीच मारली. ह्या फेरीच्या वेळी बहुदा त्या कंपनीच्या आलेल्या पथकातील सर्वात जेष्ठ सदस्य तिथे उपस्थित होता. तो नीलाच्या संभाषणचातुर्यावर जबरदस्त खुश होता. पुढे मग नीलाची निवड होणे ह्यात केवळ औपचारिकताच बाकी राहिली होती. संध्याकाळी अगदी उशिरा ह्या मोठ्या कंपनीने आपल्या निवडलेल्या मुलांची यादी जाहीर केली. यादीत अपेक्षेप्रमाणे सुशांतचे नाव अगदी वरच्या स्थानावर दिमाखात झळकत होते. यादीच्या शेवटून दुसऱ्या क्रमाकांवर होती नीला!! "आई, माझी  किन्नई RBS च्या बंगलोर शाखेत निवड झाली!! भलं मोठं पॅकेज देऊ केलंय त्यांनी मला!!" नीलाचा उत्साह ऊतू जात होता. सुशांतचे यादीच्या अग्रस्थानी असलेलं नाव कसं कोणास ठाऊक पण तिच्या नजरेतून सुटलं होतं. 

(क्रमशः)

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ४


 
नीलाने सुधीररावांच्या फोनची बातमी आपल्या आईवडिलांच्या कानावर घातली तेव्हा त्यांचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. राजकारणापासून आणि विशेष करून राजकारणी लोकांपासून आपल्या लेकीने दूरच राहावं अशी सर्वसामान्य माणसांसारखी त्यांचीही अपेक्षा होती. त्यात नीला ही अभियांत्रिकी शिक्षण घेत होती. पुढील वर्ष महत्वाचं होतं. त्यामुळे हे नसतं शुक्लकाष्ठ आपल्या मागे नीलाने मागे लावून घेऊ नये अशीच तिच्या आईवडिलांची इच्छा होती. पण सुधीरराव हे सुशांतचे वडील ही गोष्ट त्या दोघांच्याही लक्षात होती. आपल्या मुलीच्या मनात ह्या मुलाविषयी नक्की काय भावना आहेत ह्याचा त्यांना पूर्ण ठावठिकाणा नव्हता आणि त्यामुळे पूर्णपणे नकार देण्याऐवजी सुधीररावांच्या सोशल मीडियावरील प्रचाराची जबाबदारी घ्यायची सूचना त्यांनी नीलाला केली. 

नीलाला सुद्धा त्यांचं म्हणणं पटलं. सुधीररावांनी एकदा ह्या प्रस्तावाला होकार दिल्यावर मात्र नीलाने मागं वळून पाहिलं नाही. सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर रावांच्या प्रचाराचा जोरदार धुरळा तिने उडवून दिला. आपल्या कल्पनाशक्तीला पूर्णपणे मोकळं सोडत तिने रावांच्या आजवरच्या कामगिरीची योग्य माहिती ह्या माध्यमांतर्फे युवा मतदारांसमोर येईल ह्याची खात्री केली. सत्ताधारी पक्षात आता खळबळ माजली होती. रावांसमोर उभा केलेला तरुण डॉक्टरचा डाव फारसा यशस्वी न ठरण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. विविध बातमी वाहिन्यांनी घेतलेल्या प्राथमिक अहवालानुसार रावांची घोडदौड जोमात चालू होती. 

निवडणुकीचे वातावरण तापत चाललं होतं. सहाव्या सत्राचे सबमिशन आटपून कॉलेजात आता अभ्यासाची सुट्टी चालू झाली होती. नीलाने सुद्धा ह्या जोमदार तयारीनंतर अभ्यासाकडे लक्ष वळविले होते. पण काही विषयात मात्र तिचं घोडं अडून पडलं होतं. काही लेक्चर्स बंग झाली होती आणि त्यातच तो महत्वाचा भाग शिकविला गेला होता. आता कोणाकडून हा भाग समजवून घ्यायचा असा प्रश्न तिला पडला होता. म्हटलं तर तिच्या बैचैनीला अजून एक कारण होतं. सुशांत अगदी सहजरित्या पूर्णपणे अभ्यासात रंगून गेला होता. एक साधा फोन करण्याचे सौजन्य सुद्धा त्याने दाखवलं नव्हतं. उगाचच आपण मनोरे रचत होतो असे तिला राहून राहून वाटत होते. पण सध्या आपल्या अडलेल्या शंका निस्तरणे भाग होते. अशा विचारचक्रात असतानाच तिने कॉलेजात जायचं ठरवलं. वर्गातलं कोणी भेटलं तर बऱ्याच शंका सहज दूर होतील असा तिचा अंदाज होता. नेमकं तिचं मोबाईलचा इंटरनेट पॅक आज सकाळी संपला होता नाहीतर whatsapp तिला कॉलेजात कोण येणार का असा प्रश्न ग्रुपवर टाकता आला असता. 
कॉलेजात गेल्यावर मात्र तिची निराशाच झाली. सगळीकडे अगदी सामसूम होती. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील काही मुलं लायब्ररीमध्ये चर्चेला बसली होती तितकंच! पण तिच्या वर्गातील कोणी दृष्टीला पडलं नव्हतं. आणि अचानक तिची नजर विकीवर पडली. विकी तोच तो ज्याने रावांच्या भाषणात भ्रष्टाचाराचा प्रश्न उगाचच विचारून खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. विकी एकटा नव्हता तर त्याच्या सोबत त्याचा टवाळ कंपू सुद्धा होता. "A.T.K.T. कमी करायचा जोरदार प्रयत्न चालू आहे वाटतं!" नीला मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. तिला पाहताच विकीच्या नजरेत मात्र अगदी चमक भरली. नीलाच्या तडफदार उत्तराने त्याचा भर सभागृहात पाणउतारा झाला होता. खरतर असा प्रश्न विचारून गडबड करण्याचा त्याचा पिंड नव्हता. म्हणजे त्याचा पिंड मुळचा बदमाशगिरीचाच पण व्याख्यानात प्रश्न विचारणे वगैरे प्रकार त्याला झेपण्यासारखे नव्हते. पण त्याने हा प्रश्न विचारला तो त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून! हा कोणीतरी होता सत्ताधारी पक्षाचा ओमकार शर्मा ! रावांना उगाचच कॉलेजात भाव मिळतोय हे शर्माला रुचलं नव्हतं आणि म्हणून त्याने विकीला हाताशी धरलं होतं. पण नीलाने हा डाव हाणून पाडला होता आणि उलट त्यामुळे रावांना अधिकच प्रसिद्धी मिळाली होती. 
विकीचा उपयोग करून झाल्यावर आता शर्मा त्याला फारसा भाव देतही नव्हता. पण विकीच्या मनात मात्र खुन्नस भरून आली होती. सर्वांसमोर आपला असा अपमान करणाऱ्या नीलाविषयी त्याच्या मनात सूडभावना निर्माण झाली होती. तिचा बदला घेण्याच्या योग्य संधीची तो वाट पाहत होता. परीक्षेनंतर ही संधी चालून येईल ह्याची त्याला खात्री होतीच पण आज नीलाला एकटीच पाहताच त्याची द्रुष्ट मती अतिवेगाने काम करू लागली. "आज पाखरू कसं एकटं फिरकलं बरं!" नीलाला ऐकू जाईल इतक्या जोरात तो म्हणाला. त्याचे हे उदगार ऐकून नीला दचकलीच. आपल्या कॉलेजात अशी कोणाची हिंमत होईल अशी तिची अपेक्षा नव्हती. आता लवकर इथून काढता पाय घेतलेला बरा असा विचार करून तिने पुस्तके आवरली. ती उठून बाहेर पडायला निघणार तितक्यात विकी आणि कंपू तिच्या बाहेर जाण्याची वाट अडवून उभा होता. नीलाने लायब्रेरियनच्या सीटकडे नजर टाकली. ते ही बहुदा आपली सीट सोडून आतल्या कक्षात पुस्तके शोधण्यासाठी वगैरे गेले असावेत. नीलाच्या हृदयाचा ठोका चुकला. लायब्ररीला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. "आज कशी बरी सापडली!" विकी म्हणाला. "हॅलो !" अचानक नीलाने त्यांच्या दिशेने पाहून हात उंचावला. सगळेजण एकदम चाट पडले. पोरगी वाघीण आहे हे ते जाणून होते पण इतक्या हिंमतीची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. क्षणभर ते शांत होते इतक्यात त्यांना धक्का देत सुशांत लायब्ररीत शिरता झाला. सर्व टवाळ कंपूत निराशेची लहर पसरून गेली. 
पुढील तासभर सुशांतने नीलाच्या बऱ्याचशा शंका सोडवून दिल्या. विकी आणि कंपू कंटाळून निघून गेला. नीलाने काय झालं ते सुशांतला सांगण्याचं टाळलं. 
विकी आपल्या बाईकवरून घरी परतताना आपल्या नेहमीच्या बारवर नेहमीप्रमाणे काही वेळासाठी थांबला. हल्ली पेग घ्यायला वेळ नसला तरी मालकाशी गप्पा मारणे हा त्याचा आवडता छंद होता. काऊटर वर गप्पा मारता मारता अचानक त्याच्या पाठीवर जोरदार थाप पडली. काहीसं वैतागून त्याने मागे वळून पाहिलं तर ओमकार होता. 
ओमकारच्या जबरदस्तीपुढे विकीचे काही चाललं नाही आणि त्याला आतमध्ये जावंच लागलं. 
"पोरीने जीव कंठाशी आणलाय!" पहिल्या पेगचा अंमल ओमकारवर चढू लागला होता.
विकिची ट्यूब काही लगेच पेटली नाही. पण पुढील काही मिनिटातच त्याला ओमकार नीलाच्या सोशल मीडियावरील प्रचाराविषयी बोलतोय हे कळून चुकलं. 
"हं!! आज कॉलेजात तिला ऐकवायची आयती संधी मिळाली होती! पण नेमका एक पोरगा मध्ये कलमडला!" विकीने आपली कहाणी सुनावली. 

"कोण होतं रे कार्ट!" ओमकार रागाने म्हणाला. "सुशांत ! कॉलेजातला स्कॉलर आहे तो!" 

"त्याची आणि नीलाची खास मैत्री आहे का!" ओमकारचं विचारचक्र काहीसं सुरु व्हायच्या मार्गावर होतं. 

"तसं अजून काही खास दिसत नाही! एक दोनदा एकत्र फिरताना दिसले इतकंच!" विकी म्हणाला. 

"राजकारण्याच पोरगं असून इतका अभ्यास करतं!" विकीसोबत आलेला डिसोजा काहीशा रागानेच म्हणाला. 

ओमकारचे डोळे चकाकले "राजकारण्याचं म्हणजे?" 
"म्हणजे रावांचा!" फुकटची दारू चढायला डिसोजाला तसा वेळच लागायचा. 

इतके दिवस विकीने आपल्याला ही गोष्ट सांगितली नाही ह्याचा ओमकारला आलेला भयंकर संताप त्याने दाबून धरला. 

बऱ्याच दिवसांनी नीलाला चांगली झोप लागली होती. सुशांतने बऱ्याच शंकाचे निरसन केल्यानं काल तिचा बराच अभ्यास झाला होता आणि त्यामुळे झोपही चांगली लागली होती. त्या खुशीतच सकाळी उठून ती डायनिंग रूम मध्ये आईच्या हातचा सकाळचा चहा घ्यायला आली. आई बाबा दोघे अगदी गंभीर होऊन बसले होते. 
"काय झालं बाबा? " आपला मोबाईलकडे गंभीरपणे पाहत बसलेल्या बाबांना तिने विचारलं. 

बाबांनी आपला मोबाईल तिच्या हाती दिला. बाबांच्या एका जिवलग मित्राने त्यांना whatsapp वरचा मेसेज फोरवर्ड केला होता. 

"रावांच्या प्रचारात भावी सुनेचा मोठा हातभार!" अशा शीर्षकाखाली आलेला तो मेसेज होता. नीलाला क्षणभर आपल्या पायाखालील जमीन दुभंगत असल्याचा भास झाला !!

(क्रमशः)

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ३


 

सुशांतसोबत चहा पिऊन कॅंटीनमधून बाहेर पडल्यावर नीलाचे विचारचक्र अगदी जोरात चालू झालं होतं. आर्थिक धोरणावरील चर्चेचा कार्यक्रम तर आता नक्की झाला होता आणि प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता सुद्धा निवडला होता,अगदी सुधीररावांच्या पार्टीचा सुद्धा! आता अशा परिस्थितीत सुधीररावांची मनधरणी कशी करायची हेच तिला कळेना! त्याच विचारात ती आयोजन समितीच्या मुख्य कार्यालय असलेल्या एका वर्गात शिरली. 

वार्षिक कार्यक्रमांचे अंतिम स्वरूप आता मूर्त स्वरूप घेत होते. प्रोफेसर पंडित एकेक कार्यक्रमातील निमंत्रितांची यादी आपल्या नजरेखालून घालत होते आणि आपल्या सूचना देत होते. नीला मुख्य कार्यालयात प्रवेश करायला आणि आर्थिक धोरणाचा कार्यक्रम चर्चेस यायला गाठ पडली. "सर्वच पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून तुम्ही फारच मोठे धाडस करीत आहात! समजा त्यांची चर्चा अगदी तापली आणि हाताबाहेर गेली तर तुम्ही करणार काय? " पंडितांच्या ह्या प्रश्नाला आयोजन समितीकडे उत्तर नव्हते. काही क्षण ते सर्व एकमेकांकडे पाहताच राहिले. "सर आपण एखाद्या जेष्ठ नेत्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली तर!" नीलाच्या तोंडून अचानक वाक्य निघून गेलं. पंडितांना ही सूचना खुपच आवडली. "पण असा कोण नेता आहे का आपल्या नजरेसमोर जो इतक्या कमी कालावधीत तयार होईल? आणि हो त्याने आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याची बाजू न घेता निःपक्षपाती भुमिका घ्यायला हवी!" पंडित सर म्हणाले. ताबडतोब सुधीररावांचे नाव घेण्याची नीलाची इच्छा तिने दाबून धरली. सुशांतचे बाबा राजकारणात आहेत हे इथल्या इतक्या मुलांपैकी कोणाला तरी माहित असणारच आणि त्यापैकी कोणीतरी एखादा बोलेलच असा तिचा कयास मंदारने बरोबर ठरवला. "सर आपल्या सुशांत सरपोतदारचे वडील सुधीरराव आहेत ना! त्यांना बोलवायचं का?" त्याच्या ह्या प्रश्नावर पंडित सर सुरुवातीला फारसे अनुकूल नव्हते. पण काही क्षण विचार केल्यावर दुसऱ्या कोणत्या पर्यायाअभावी त्यांनी ह्या प्रस्तावाला मान्यता दिली. "मग आता सुधीररावांना भेटायला जाणार कोण?" पंडित सरांनी रास्त प्रश्न विचारला."सर मी उद्या सकाळी जाऊ शकते!" ह्या कार्यक्रमात पुढाकार घेतलेल्या नीलाने तात्काळ संधी साधली. तसं म्हटलं तर आर्थिक चर्चेच्या कार्यक्रमात सुरुवातीपासून नीलाचा पुढाकार असल्याने तिच्यावर कोणी जास्त संशय घेतला नाही. 

नीलाच्या एकंदरीत प्रस्तावावर सुधीरराव खूपच खुश झाले. आपल्या पक्षात आपलं जेष्ठत्व दाखवून देण्याची संधी आपसूकपणे त्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार होती. त्यांनी फारशी चौकशी न करता नीलाला होकार देऊन टाकला. गीताताईंनी आणलेला चहा नीला संपवत नाही तोवर कॉलेजात जायला तयार होऊन आलेला सुशांत तिला पाहून अगदी दचकला. पण नीलाने त्याला नजरेनेच आश्वस्त केलं. "येते हं मी!" स्वयंपाकघरात कपबशी विसळून ठेवत नीलाने गीताताईंचा निरोप घेतला. क्षणभर सारं काही विसरून गीताताई तिच्याकडे पाहतच राहिल्या.

सुशांतला नीलाचं हे धाडस फारसं पसंत पडलं नव्हतं. आपल्या मनात नीलाविषयी नक्की भावना काय आहेत हे त्याला एकतर समजत नव्हतं आणि ते समजून घेणं हे सध्या त्याच्या प्राधान्यक्रमात बसत सुध्दा नव्हतं. नीला आपल्याला आवडते हे तो मनोमन समजून चुकला होता. आणि तिने आपल्या वडिलांना आर्थिक चर्चेविषयीच्या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली हे ज्या क्षणी त्याला कळलं त्यावेळी तिचा आपल्या कुटुंबांशी जवळीक साधण्याचा तर प्रयत्न तर नाही ना अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती. पण नीलाची गेल्या तीन वर्षातील प्रतिमा, तिचा स्पष्टवक्तेपणा पाहता तिला असं काही करायची गरज भासणार नाही हे तो पक्कं जाणून होता.

महाविद्यालयाचा वार्षिक कार्यक्रम चांगलाच रंगत चालला होता. सर्वच  सांस्कृतिक कार्यक्रम एकापेक्षा एक रंगत होते. बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आता प्रवेशासाठी खूपच मोठी रांग लागायला सुरुवात होऊ लागली होती. आर्थिक धोरणावरील कार्यक्रमाची हवा आता जोरात निर्माण करण्यात आयोजकांना बरंच यश मिळालं होतं. नीलाने गेल्या कित्येक रात्री केवळ दोन तीन तासांच्या झोपेवर काढल्या होत्या. सुधीररावांनी सुद्धा बरीच तयारी केली होती. ह्या कार्यक्रमाचं मीडियामध्ये व्यवस्थित कवरेज मिळवून देण्याची काळजी सुद्धा त्यांनी आधीच घेऊन ठेवली होती. 

गेले कित्येक दिवस सुशांत आणि सुधीरराव कधी एकत्र जेवलेच नव्हते. पण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुशांतला एकटा जेवताना पाहून सुधीररावांनी गीताताईंना त्यांचसुद्धा ताट घेण्याचा आग्रह केला. "कसं चाललंय तुझं कॉलेज?" खुर्चीवर बसता बसता त्यांनी सुशांतला प्रश्न केला. "चाललंय तसं ठीक! सहाव्याचा अभ्यास जोरदार आहे आणि सातव्याला चांगल्या चांगल्या कंपन्या कॅम्पसला येणार तेव्हा आता चांगले मार्क तर मिळवायलाच हवेत!" सुशांत म्हणाला. बाबांचा मूड ठीक असला तर तो ही ठीकच असायचा. स्वतःहून त्याने कधी बाबांशी मतभेद उकरून काढले नव्हते. "तब्येतीची काळजी घे हो, इतका सर्व अभ्यास करताना! शेवटी काय तर हेल्थ इज वेल्थ!" सुधीरराव त्याला म्हणाले. बऱ्याच महिन्यानंतरचा त्या दोघांचा असा सुखसंवाद पाहून गीताताईंच्या डोळ्यात आपसूकच अश्रू आले. पदरानेच त्यांनी ते पुसून टाकले. सुशांतचे जेवण पहिलं आटोपलं. उठता उठता "बाबा उद्याच्या कार्यक्रमासाठी बेस्ट लक!" असं म्हणून आपल्या चेहऱ्यावरील भावुकता बाबांच्या नजरेस पडू नये म्हणून तो तात्काळ किचनच्या दिशेने निघाला. 

आर्थिक धोरणाचा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून चांगलाच रंगला. नीलाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची ओळख करून दिली. आणि मग कार्यक्रमाची सूत्रे सुधीररावांकडे सोपवली. जर ही प्रचारसभा असती तर रावांनी हाती आलेला माईक पुढील तासभर हातचा सोडला नसता पण ते कोणत्या ठिकाणी कसे नियोजन करायचं ह्याची मेख चांगलीच जाणून होते. जरी ह्या कार्यक्रमाचा विषय भारताच्या आर्थिक धोरणाशी मर्यादित असला तरी सद्यकाळात जागतिक अर्थव्यवस्थेतील थोडीदेखील चढउतार कशी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकत असल्याने त्याचे भान राखणं सुद्धा कसं महत्वाचं आहे ह्याचं सुरेख विवेचन त्यांनी केलं. मग प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता येऊन आपली बाजू मांडू लागला. त्यात रावांच्या पक्षाचा प्रवक्ता सुद्धा होता. सर्वच पक्षांच्या प्रवक्त्यांनी बाजू मांडून झाल्यावर सुधीरराव एकूण चर्चेचा आढावा घेण्यासाठी म्हणून पुन्हा व्यासपीठावर आले. त्यांचे आढावा घेण्याचे काम सुरु असतानाच कॉलेजातील विघ्नसंतोषी मुलांपैकी एक अचानक उठला आणि "इथे सर्व पक्ष जरी सुधारकांचा आव आणत असले तरी जोवर भ्रष्टाचारी लोक सर्व पक्षांत ठासून भरले आहेत तोवर ह्या देशाचे काही भले होणार नाही !" असे अगदी जोरात ओरडला. अगदी दृष्ट लागण्यासारख्या झालेल्या कार्यक्रमाला हे असं गालबोट लागणं म्हणजे अगदी दुर्देवी घटना होती. सुधीररावांचा चेहरा रागाने अगदी लालेलाल झाला होता. नीलाच्या ध्यानात हे सारं काही आलं. तात्काळ धावत जाऊन ती सुधीररावांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " आपल्या कॉलेजात आलेल्या माननीय पाहुण्यांसोबत असा अनादर व्यक्त करणारी मुलं आपल्या कॉलेजात आहेत ही दुर्दैवाची गोष्ट! पण ज्याप्रमाणे अशा मुलांच्या उपस्थितीमुळे आपल्या कॉलेजच्या प्रगतीत जशी बाधा न येता आपलं कॉलेज प्रगतीची शिखरं गाठत आहे त्याचप्रमाणे देशातील मोजक्या भ्रष्टाचारी लोकांच्या अस्तित्वाने आपल्या देशाच्या प्रगतीत बाधा येणार नाही!" नीलाच्या ह्या करारी बोलण्याने वातावरण अगदी पालटून गेलं. सभागृहातील मुलांनी एव्हाना त्या खट्याळ कार्ट्याला आणि त्याच्या साथीदारांना सभागृहाबाहेर पिटाळून लावलं होतं. सुधीरराव मोठ्या कौतुकाने नीलाकडे पाहत होते. इतक्यात मग एका अभ्यासू मुलाने FDI वर  प्रश्न विचारायला सुरुवात केली. ह्या विषयात तर सुधीररावांचा हातखंडा! मग त्यांनी पुढील अर्धा तासभर आपल्या ज्ञानाची पखरण सभागृहात केली. वेळ उलटून गेला तरी कोणालाच त्याचं भान राहिलं नाही. शेवटी मग नाईलाज म्हणून नीलानेच सुधीररावांना आवरतं घेण्याची नजरेने विनंती केली. कार्यक्रम संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट पुढील दोन तीन मिनिटे चालूच राहिला. 

बऱ्याच दिवसांनी सुधीररावांना खूप खूप समाधान वाटत होते. बाहेर निघताना नीलाचे आभार मानण्याची संधी राहून गेली ह्याची बरीच चुटपूट त्यांना लागून राहिली. सुशांतने घरी परतताच त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. "अरे त्या नीलाचा नंबर आहे का तुझ्याकडे? त्या पोरीचं आभार मानायचंच राहून गेलं! तिने प्रसंगावधान दाखवलं म्हणून सारा कार्यक्रम यथासांग पार पडला!" आपल्याकडे नीलाचा मोबाईल क्रमांक नाही ह्याची पहिल्यांदाच सुशांतला जाणीव झाली. "बाबा मी तुम्हांला उद्या आणून देतो तिचा क्रमांक!" सुशांत काहीशा अपराधीपणाने म्हणाला. 

दुसरा दिवस उजाडला तोच एका मोठ्या बातमीने! महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची अचानक घोषणा झाली होती. सत्ताधारी पक्षाचे बहुमत धोक्यात आल्याची वदंता गेले कित्येक दिवस होतीच. नाहीतरी पुढील सहा महिन्यात विधानसभेचा कालावधी संपणार होताच तर मग आताच निवडणुका घेऊन टाकाव्यात असा रास्त विचार केंद्र सरकारने केला होता. 

पुढील दोन आठवड्याचा काळ राव दक्षिण मुंबईत हॉटेलात तळ ठोकून होते. नीलाचा नंबर त्यांना सुशांतने दिला खरा पण तिला फोन करण्याची त्यांना संधी सुद्धा मिळाली नाही. त्यांच्या मोर्चेबांधणीचे यश त्यांना एकदाचे मिळालं आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याचं जाहीर झालं. रावांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोन आठवड्यांनी त्यांनी घरी प्रवेश केला. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी उत्साह पसरला होता. 

दुसऱ्या दिवशी राव विभागवार कार्यकर्त्यांच्या नेमणुकीत गुंतले होते. अचानक सत्ताधारी पक्षाने रावांच्या विरोधात एका तरुण डॉक्टरची उमेदवारी जाहीर केली. आणि रावांच्या पक्षात खळबळ माजली. 

वार्षिक कार्यक्रमामुळे अस्ताव्यस्त झालेल्या सबमिशनच्या व्यापात नीला अगदी गढून गेली होती. सर्व कार्यक्रमाचे अगदी खूप कौतुक झाले होते. पण नीलाला मात्र एक शल्य खुपत होतं. "कार्यक्रम चांगला झाला " असं एका वाक्याने कौतुक करून सुशांत Industrial Visit साठी बंगलोरला रवाना झाला होता. आणि रावांनी तर जाताना सुद्धा आभार मानले नव्हते. "होतं असं कधी कधी आयुष्यात!" असं म्हणत तिने स्वतःचीच समजूत काढली होती. आणि कालच त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याची बातमी आली होती. 

अचानक तिच्या मोबाईलची रिंग वाजली. समोर राव होते. आपल्याकडून तिचे आभार मानायचे राहून गेले ह्याची खरोखरीची खंत त्यांच्या आवाजात जाणवत होती. त्यांच्या सारख्या इतक्या जेष्ठ नेत्याकडून फोन आल्यावर नीला झालं गेलं विसरून गेली होती. त्यांचे अभिनंदन करून फोन ठेवणार इतक्यात राव म्हणाले, "एक मिनिट थांब! माझ्या प्रचारासाठी एक युवा चेहरा मी शोधतोय! तू ही जबाबदारी घ्यायला तयार आहेस?"

 (क्रमशः)

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग २


 

"आई, हा आमच्या कॉलेजातील सुशांत बरं का! अगदी स्कॉलर मुलगा आहे!" नीला मोठ्या कौतुकाने आईशी सुशांतची ओळख करून देत होती. तिचे बाबा मात्र शांतपणे आपल्या डिशचा आस्वाद घेण्यात दंग होते. "नमस्कार!" सुशांतने हात जोडून नीलाच्या आईला प्रणाम केला. "हिचे वडील थोडे खाष्टच दिसतात!" चिकन लेगचा आस्वाद घेण्यात मग्न असलेल्या तिच्या बाबांकडे नजरेचा कटाक्ष टाकत सुशांत मनातल्या मनात पुटपुटतो इतक्यात "हाऊ आर यु यंग मॅन !" म्हणत त्यांनी त्याला त्यांच्यात सामील होण्याची विनंती केली. "आणि हो त्या दिवशी नीलाला कॉलेजात लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद!" बाबांच्या ह्या मनमोकळ्या बोलण्याने आपण उगाचच ह्यांच्याविषयी मत बनविण्याची घाई करत होतो ह्याचा सुशांतला मनातल्या मनात पश्चात्ताप झाला. 
आपण एकटेच इथे हॉटेलात का आलो होतो ह्याचे स्पष्टीकरण देणे सुशांतला काहीसं जड गेलं. पण मग नीलाने लगेचच त्याची परिस्थिती ओळखून विषय बदलण्यात त्याची मदत केली. मग निरोप द्यायची वेळ आली तेव्हा सुशांतचा मूड बराच सुधारला होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला नीलाला तसा उशीरच झाला. आज आपल्याला असं अगदी छान का वाटतंय ह्याचा तिला उलगडा होत नव्हता. चांगलासा ड्रेस घालून ती आरशासमोर केस विंचरत उभी होती. आणि अचानक तिला मागे सुशांत उभा आहे असा भास झाला. अगदी दचकून तिनं मागे वळून पाहिलं पण तिला झालेला हा भास होता. 
रिक्षाने कॉलेजात जाताना भिरभिरणारी तिची नजर प्रत्येक बाईकवाल्यावर पडत होती. हे आपल्याबाबतीत असं होऊ शकत ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. 
त्या दिवशी सुशांतची एका पाठोपाठ एक लेक्चर्स होती. मध्ये नीलाला एक फ्री लेक्चर मिळताच आपल्या मैत्रिणीला घेऊन उगाच तिने सुशांतच्या वर्गावरून चक्कर मारली. पाठमोरा सुशांत अगदी एकाग्रतेने प्रोफेसरकडे लक्ष देऊन ऐकत होता. "बाय द वे आपण ह्या वर्गापाशी का थबकलो आहोत?" चाणाक्ष शलाकाच्या ह्या प्रश्नाने भानावर आलेल्या नीलाने तातडीने आपल्या पावलांचा वेग वाढवला. तिच्या सुदैवाने शलाकाचे लक्ष कोठे दुसरीकडे वेधले गेले म्हणून ठीक नाहीतर तिची आज काही खैर नव्हती. 
दोन दिवसानंतर मात्र नीलाच्या प्रयत्नांना यश लाभलं. पुस्तक परत करायला लायब्ररीमध्ये ती प्रवेश करणार आणि सुशांत तिथून बाहेर पडायला एकच गाठ पडली. "हॅलो!" सुशांतने आपल्या मित्रांच्या अस्तित्वाचे भान ठेवत हळूच तिला अभिवादन केलं. त्याच्यासोबत ह्या वेळी त्याचा जीवलग मित्र निखिल होता. एकंदरीत परिस्थितीचा त्याला साधारणतः अंदाज आलाच होता. सुशांतला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात अचानक उबाळून आली. "ओह नो! माझे अजुन एक पुस्तक परत करायचं राहून गेलं! सुशांत माझं एक काम करशील? ही रांग भलीमोठी वाढतच चालली आहे. तू इथंच उभा राहा मी हा असा गेलो आणि पुस्तक घेऊन परत आलो!" निखिलचे हे उदगार सुशांतला कितीसे पसंत पडले हे जरी त्याला समजलं नसलं तरी नीलाच्या चेहऱ्यावर उमटलेलं छुपं हासू त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलं नाही. 

"त्या दिवशी रात्री हॉटेलात तू असा अगदी टेन्स का दिसत होतास?" रांगेत सुशांतच्या पुढे उभ्या असलेल्या नीलाने त्याला विचारलं. "आणि हो असा एकटाच कसा काय आलास हॉटेलात?" तिच्यासोबत रांगेत एकत्र उभी रहायची पाळी आली तेव्हा सुशांतने अशा प्रश्नांना सामोरं जाण्याची तशी तयारी केलीच होती. गेले दोन दिवस घरी वातावरण तंगच होतं. अंगात ताप असल्याने बाबा घरीच होते आणि त्यामुळे आईशी ह्या परिस्थितीवर चर्चा करायची सुद्धा संधी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे आता हिच्याशी ह्या विषयावर बोलण्याशिवाय पर्याय नाही असा निर्णय सुशांतने घेतला. 

"तुला थोडा वेळ असेल तर आपण कॅंटीन मध्ये चहा घेऊयात का?" सुशांतने तिला विचारलं तेव्हा नीला अगदी खुष होऊन गेली. त्या दोघांची एकत्र एंट्री कॅंटीन मध्ये झाली तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या सुशांतच्या मित्रांच्या तोंडाचा उघडलेला आ तसाच काही वेळ कायम राहिला. नीलाने एका कोपऱ्यातील टेबल पकडलं आणि तोवर सुशांत दोन कप चहा हातात घेऊन तिथवर आला. "अबे क्या तू भी वही देख रहा हैं जो मैं देख रहा हूँ?" अशा ऐतिहासिक प्रसंगी हिंदी चित्रपटातील संवाद बोलण्याची सवय तशी सुशांतच्या मित्रांना होतीच. आतापर्यंत सुशांतने अनाथ सोडलेला निखिल सुद्धा त्यांच्यात सामील झाला होता. आपण सुरु केलेलं अभियान सुशांत इतक्या लगेच इतकं पुढे नेईल ह्याची कल्पना नसलेला निखिल मनातून खुश झाला. 

"हं तर अशी परिस्थिती आहे तर!" सुशांतच्या घरी हे वादळ घडवायला अप्रत्यक्षरित्या आपण कारणीभूत झालो ह्याचे नीलाला खूप वाईट वाटत होते. चहाचे घुटके घेत असताना ह्या परिस्थितीत कशी सुधारणा घडवता येईल ह्याची चक्रे तिच्या डोक्यात फिरू लागली. चहा आटपून मग काही वेळाने दोघंजण एकत्रच बाहेर पडली. सुशांतने कंपूला आपल्या नजरेतून कॅंटीनमध्ये प्रवेश करता करताच पाहिलं होतं. नीलाशी बोलल्यावर सुशांतला काहीसं हलकं वाटू लागलं होतं. त्या मूडमध्ये त्याने बाहेर पडताना कंपूला लांबूनच आत्मविश्वासपूर्ण हात केला. एव्हाना कंपू पूर्णपणे थंडगार झाला होता. 

आज सुधीररावांना तसं बरं वाटू लागलं होतं. सकाळीच उठून अंगणात एक फेरफटका मारून ते हॉलमध्ये बसले होते. त्यांना चहा घेऊन गीताताई आल्या. कप टीपॉय ठेवून स्वयंपाक घरात जायला निघतात तितक्यात दारची बेल वाजली. इतक्या सकाळसकाळी कोण आलं असेल असा विचार करतच त्यांनी दार उघडलं तर समोर एक सुंदर आकर्षक महाविद्यालयीन युवती उभी होती. "माझं नाव नीला! मला सुधीररावांना भेटायचं होतं. फोन न करता अचानक आल्याबद्दल क्षमस्व!" गीताताई अगदी आश्चर्यचकित झाल्या होत्या. "अहो ऐकलं का!" आपली ठेवणीतील हाक मारता मारता ही मुलगी कशी सोज्ज्वळ दिसते हा विचार त्यांच्या मनात डोकावलाच!!

(क्रमशः)

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग १


 
 सुधीररावांच्या आक्रस्ताळपणाकडे दुर्लक्ष करून सुशांतने आपला अभ्यास सुरूच ठेवला. "असली पुस्तकं वाचत बसलो असतो तर हा बंगला, ही जमीन कधीच मिळवता आली नसती!" सुधीररावांनी आपला संताप सुरूच ठेवला तसा न राहवून सुशांत म्हणाला, "हवीय कोणाला तुम्हांला तुमची संपत्ती!" त्यांच्या वाक्याने होऊ घातलेला सुधीररावांच्या संतापाचा स्फोट बाहेरून येणाऱ्या SUV च्या दर्शनाने त्यांना आवरता घ्यावा लागला. 
"तू आपलं शांतपणे जेवून घे पाहू!"  रावांची कार्यकर्त्यांबरोबर बैठक सुरु झाली तसं गीताताई सुशांतला म्हणाल्या. बापलेकांचे खटके तसे हल्ली वारंवार होऊ लागले होते. गेले नऊ वर्षे आमदारकीपासून वंचित राहिलेल्या रावांचा संयम हल्ली काहीसा सुटत चालला आहे असंच ताईंना वाटू लागलं होतं. नाहीतर अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या सुशांतच्या मागे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता बनण्याचा घोषा त्यांनी उगाच का लावला असता! 
सुशांतने थोडक्यातच आपलं जेवण आटपून घेतलं आणि तसाच तडक तो आपली बाईक काढून महाविद्यालयाच्या दिशेने सुसाट निघाला. नुकताच पाचव्या सेमिस्टरला महाविद्यालयात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तसा त्याचा जीव महाविद्यालयात चांगलाच रमला होता. आता सहाव्याला पहिलाच क्रमांक काढायचा असा त्याच्या मनाने ठाव घेतला होता. त्यामुळे एव्हाना महाविद्यालयाच्या वाचनालयातच त्याचा अधिकाधिक वेळ जायचा. 
सिग्नलला बाईक थांबवून त्याने क्षणभरासाठी हेल्मेट बाजूला केलं तशी बाजूच्या कारची काच वर झाली. "हॅलो सुशांत!" कारमधून एक मंजुळ आवाज आला. अचानक आलेल्या ह्या आवाजाने सुशांत दचकला. मेंदूला थोडा ताण दिल्यावर ही तर आपल्या कॉलेजातील मुलगी हे त्याने ओळखलं. "हाय !" त्याने काहीसा थंड प्रतिसाद दिला. हिचं नाव काय बर असा मनात येणारा विचार त्याने त्यात यश न मिळण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन सोडून दिला. सिग्नल कधी हिरवा होतोय ह्याची वाट पाहत असताना पुन्हा तिचा आवाज आला, "माझ्या वडिलांना किन्नई मीटिंगला जायला थोडा उशीरच होतोय, मी तुझ्यासोबत बाईकवर आले तर चालेल का?" वडिलांशी थोडा वेळ जास्त भांडलो असतो तर हा अनावस्था प्रसंग ओढवलाच नसता असा त्याच्या मनात विचार आला. पण स्त्रीदाक्षिण्याच्या विचाराने त्याने शेवटी तिला मानेनेच होकार दिला. 
महाविद्यालयाच्या बाहेर टपरीवर कटिंगचा आस्वाद घेत असलेल्या सुशांतच्या मित्रमंडळीच्या ग्लासातील चहा आपल्या नव्याकोऱ्या बाईकवरून येणाऱ्या सुशांतला पाहून हिंदकळला. सुशांत बाईकवरून येणे ह्यात काही नाविन्य नव्हतं पण त्याच्या मागे बसलेल्या नीलाचे दर्शन त्यांना अनपेक्षित होते. नीला ही कॉलेजातील बऱ्यापैकी फ़ेमस होती आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे कॉलेजातील जवळजवळ प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमातील तिचा सहभाग! वक्तृत्वस्पर्धा असो की गायनस्पर्धा वा नृत्यस्पर्धा, एकतर स्पर्धक किंवा सूत्रधार म्हणून तिचा सहभाग ठरलेलाच असायचा! हिची आणि सुशांतची ओळख कधी झाली हाच गहन प्रश्न सर्व मित्रमंडळीना पडला; आणि त्याहूनही आपल्या गुप्तहेर खात्याचं इतके मोठे अपयश त्यांना पचवणं जरा कठीणच गेलं. त्यातील काहींच्या असूयेची भावना निर्माण झाली हा अजून एक भाग!! ह्या मित्रांच्या घोळक्यासमोरून जाताना सुशांतने बाईक जरा अजून जास्तच झुपकन जोरात नेली. त्यातील काहींनी त्याला नजरेनेच "तू ये तर खरा इथे घोळक्यात, मग पाहून घेतो तुला!!" असे धमकावलं. 
"भेटली वाटेत आणि दिली तिला लिफ्ट! त्यात काय मोठं आभाळ कोसळून पडलं काय!" मित्रांच्या चेष्टामस्करीने मनातून सुखावलेला सुशांत उसने अवसान आणून त्यांच्याशी फुल फाईट देत होता. शेवटी सुशांतकडून कॅंटीनमधल्या प्रसिद्ध पावभाजीची पार्टी घेइस्तोवर मित्रांनी त्याचा पिच्छा सोडवला नाही. 
दिवस शांतपणे चालले होते. पितापुत्रांचा अबोला काहीसा कायमच होता. नीला आणि सुशांत पातळीवर सुद्धा काही विशेष घडामोड नव्हती. चुकून समोरासमोर आले तर "हाय, हॅलो"  व्हायचं इतकंच!! सुशांतचे लक्ष महाविद्यालयात सातव्या सत्रात येणाऱ्या कंपन्याद्वारे नोकरी मिळवण्याकडे लागून राहिलं होतं. कोठे बाहेरगावी नोकरी मिळवली तर बाबांच्या कटकटीपासून काही दिवस का होईना मुक्तता मिळेल असाही त्यामागचा हेतू होता. 
कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमाचे वारे एव्हाना जोरात वाहू लागले होते. आयोजनात अर्थातच नीलाचा पुढाकार होता. खरेतर राजकीय पक्षांपासून हा कार्यक्रम दूर ठेवण्याचा व्यवस्थापनाचा कटाक्ष होता, पण पुढील वर्षाच्या निवडणुका लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थांच्या मनात एकंदरीत विविध पक्षांच्या आर्थिक धोरणांबाबत जागृती निर्माण व्हावी असा प्रस्ताव नीलाने मांडला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राचार्य आणि व्यवस्थापनाने हा प्रस्ताव फारसे आढेवेढे न घेता उचलून धरला. 
नीलाने स्थानिक पातळीवरील विविध पक्षांशी संपर्क साधला आणि आपला प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली. बदलत्या वातावरणाचे भान असलेल्या सर्व पक्षांनी तत्परतेने आपल्यातील तरुण जाणकार नेत्यांची ह्या कार्यक्रमासाठी निवड केली. महाविद्यालयीन तरुणांसमोर आपल्या पक्षाची तरुण प्रतिमा निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू होता. 
सुधीररावांपर्यंत ही बातमी इथून तिथून का होईना पण पोहोचली. आपल्या मुलाच्याच कॉलेजातील कार्यक्रमात आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला बोलावलं जात नाही हे त्यांच्या मनाला अगदी लागलं. अगदी खवळूनच ते रात्री घरी पोहोचले. सुशांत शांतपणे आपल्या खोलीत अभ्यासाला बसला होता. "बस झाली ही नाटकं!" त्याच्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडत सुधीररावांनी त्याच्यावर आग ओकली. "बापाच्या पैशाने फी भरतो आणि बापाला कॉलेजात बोलवायला तुला लाज वाटते की काय!" त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. क्षणभर काय झालं ते सुधीरला कळलंच नाही. पण क्षणभर विचार करता त्याची ट्यूब पेटली. "अहो बाबा, तसं काही नाहीय! ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात माझा अजिबात सहभाग नाही! आणि आयोजकांनी असा कार्यक्रम आयोजित केला इतकंच मला माहितेय, पण त्यांनी प्रवक्त्यांना निमंत्रण पाठवली हे मला बिलकुल माहित नाही!" त्याच्या ह्या बोलण्याचा काही प्रभाव न पडल्याने रावांनी आपला पट्टा चालूच ठेवला. 
सुशांतने आपला शांतपणा कायम ठेवला. "आई मी बाहेर एक चक्कर मारून येतो!" आपल्या बाईकची चावी उचलत तो म्हणाला. आईनेही त्याला अडविले नाही. "तू ह्याला पूर्ण बिघडून ठेवला आहे! माझी ह्या घरात काहीच किंमत राहिली नाही !" सुधीररावांची धुसफूस सुरूच राहिली. 
ह्या वेळी कोठे जायचे हे सुशांतला समजत नव्हते. समोर एक हॉटेल दिसलं त्यात एक कॉफी पिऊन मग घरी जावं असा त्याने विचार केला. 
हॉटेलाच्या वातानुकुलीत कक्षाचा दरवाजा उघडून कोठे मोकळी जागा मिळते का ह्याचा शोध त्याची नजर घेत असतानाचा अचानक त्याला "हाय सुशांत !" अशी हाक ऐकू आली. हाकेच्या दिशेने नजर वळवून पाहतो तो आपल्या आईवडिलांसोबत जेवण घेत असलेली नीला त्याच्या नजरेस पडली!

(क्रमशः)

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...