मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

चकाकते ते सर्व काही ....



काही काळापुर्वी समाजानं संभाषणकलेचे महत्व जाणून घेतलं. त्यामुळे संभाषणकला सुधारणेला अनन्यसाधारण महत्व मध्यमवर्गीयांच्या कुटुंबात प्रस्थापित झालं.  व्यावसायिक क्षेत्रात उत्तम संभाषण कला असणे ह्याला निर्विवाद महत्त्व आहे. तुमच्याकडं कोणत्याही क्षेत्रातील उत्तम ज्ञान असेल पण ह्या ज्ञानाला तुम्ही उत्तम संभाषण कलेची जोड देऊ शकत नसाल तर तुमच्या यशाला काहीशा मर्यादा येतात.  व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केलेल्या मध्यमवर्गीयांनी ही बाब जाणून घेतली. त्याचे महत्व, आपला अनुभव त्यांनी आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत पोहोचविला. 

मौखिक आणि लिखित स्वरूपातील उत्तम संभाषण कला झपाट्याने मध्यमवर्गीयांमध्ये पसरली.  इथं एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तुमच्याकडं एखाद्या विषयातील मुळ ज्ञान असणं आवश्यक आहे. या ज्ञानाला संभाषणकलेची जोड देऊन तुम्हाला यशाची शिखरे गाठता येतील.  परंतु जर तुमच्याकडे मूळ ज्ञानाचा अभाव असेल तर तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत नाही. 

सध्या युगामध्ये हल्ली एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. जुजबी ज्ञानाला उत्तम संभाषणकलेची जोड देऊन जनमानसात भ्रम निर्माण करणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. जे काही चकाकतं ते सर्व सोनं नसतं या उक्तीचं  सतत आपणास स्मरण करावं लागतं.  आपण जे काही वाचतो, ऐकतो त्यामध्ये हे जे काही उत्तम संभाषणकलेने चकचकीतपणाचे एक आवरण निर्माण केलेले असतं ते भेदून आत मुळ गाभा किती अर्थपूर्ण आहे याचा शोध घेणारी नजर आणि कुवत तुमच्याकडे असायला हवी. काही दिवसांनी ह्या मुळ गाभ्याचा शोध घेणाऱ्या माणसांची गरज मानव जातीला प्रचंड प्रमाणात लागणार आहे. 

एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. बऱ्याच यशस्वी वित्तीय संस्थांमध्ये अशी चकचकीतपणाचे आवरण भेटणारी माणसे सर्वत्र आढळतात. त्यामुळे अशा ठिकाणी मूळ मुद्द्याला अजूनही महत्व असल्याचे आढळून येते.  जागतिक पातळीवर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाची उपासना करण्याशिवाय दुसरा कोणता शॉर्टकट नसतो हे अशा वेळी जाणवतं आणि एक जुन्या पद्धतीने विचार करणार मन सुखावतं!

उत्तम संभाषणकलेचा, व्यक्तिमत्त्वाचा ध्यास नवीन पिढीने धरणं आवश्यकच आहे.  परंतु या ध्यासाच्या मागे लागताना ज्ञानउपासनेच्या मूळ लक्ष्याकडं दुर्लक्ष होऊ देता कामा नये! हाच मुद्दा लक्षात घेतल्यास केवळ आपल्या स्वार्थासाठी लहान मुलांना ज्ञानउपासनेच्या मार्गातुन विचलित करुन रिऍलिटी शो मध्ये आणणाऱ्या वाहिन्यांना माझा तात्विक विरोध आहे !

जाता जाता व्यावसायिक क्षेत्रात यशाची शिखरं खालील आलेखाद्वारे दर्शविता येतात. जसजसं वर जावं तसतसं व्यक्तींची संख्या कमी होत जाते असं ढोबळमानाने हा आलेख दर्शवितो. 

प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञान आणि संभाषणकला / व्यक्तिमत्व ह्यांचं एक unique combination असतं. समजा ह्या combination च्या खालील शक्यता ध्यानात घेता ती व्यक्ती ह्या pyramid मध्ये कुठं बसेल ह्याचा अंदाज तुम्ही बांधुन पहा. आजच्या पोस्टचा हा गृहपाठ समजा !

                    ज्ञान              संभाषणकला 
१)                सामान्य            सामान्य 
२)                सामान्य            उत्तम 
३)                सामान्य            अतिउत्तम 
४)                उत्तम               सामान्य 
५)                उत्तम               उत्तम  
६)                उत्तम               अतिउत्तम 
७)                अतिउत्तम        सामान्य 
८)                अतिउत्तम        उत्तम  
९)                अतिउत्तम        अतिउत्तम 

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

कोषावस्था!



सध्या मी सोनी टीव्हीची मराठी वाहिनीचा चाहता बनलो आहे.  या वाहिनीवरील रविवारी दुपारी दाखवल्या जाणाऱ्या नवीन मराठी चित्रपटांव्यतिरिक्त "ती फुलराणी" या मराठी मालिकेने माझे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्याच्या एका बंगल्यामध्ये चित्रीकरण केल्या जाणाऱ्या या मराठी मालिकेतील काही कलाकारांची पात्रे चांगल्या प्रकारे खुलवली केली आहेत.  

या पोस्टचा विषय आहे या मालिकेतील देवयानी या पात्राने वठवलेली भूमिका आणि तिची Denial अवस्थेत मध्ये जाणं! देवयानी ही एका श्रीमंत घराण्यातील सुंदर मुलगी! तिची शौनक या एका देखण्या आणि देशमुखांसारख्या खानदानी कुटुंबातील तरुणाबरोबर असणारी मैत्री लग्नामध्ये परिवर्तन होण्याच्या मार्गावर असताना एक फुलराणी येऊन या देवयानीच्या राजकुमाराला म्हणजेच शौनकला घेऊन जाते, त्याच्याशी विवाहसुद्धा करते. एक होऊ घातलेलं परिपूर्ण चित्र पुर्णपणे विस्कटून जातं.  परंतु या सत्याचा स्वीकार करण्यास देवयानी नकार देते, माझंच लग्न शौनकशी झालं आहे अशा समजुतीत त्याच्या घरी राहू लागते. या मालिकेत केव्हातरी देवयानी denial मध्ये राहत आहे अशा शब्दप्रयोगाचा वापर केला  गेला आणि माझं लक्ष या संज्ञेकडे वेधलं गेलं!

म्हणायला गेलं तर ही Denial म्हणजे नकाराची भावना नकारात्मकच असायला हवी! व्यावहारिक जगाच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी वास्तव स्वीकारायला हव्यात त्या गोष्टीला न स्वीकारता आपल्याला हवं असलेल्या स्थितीचं एक काल्पनिक चित्र बनवुन त्या भ्रमाने बनवलेल्या काल्पनिक विश्वात वावरणं याला आपण State of Denial असे म्हणू शकतो.  परंतु Denial हे प्रत्येक वेळी घातक किंवा चुकीचं असतं असं नाही. काही वेळा Denial मध्ये राहणे हे तुमच्यातील जिद्द जागृत करु शकतं,  व्यावहारिक जगाच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही साध्य करू शकता.  उदाहरणार्थ एखाद्या परीक्षेत दोन-तीन वेळा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला जग उपदेश देईल की ही परीक्षा पास होणे उत्तीर्ण होणे तुझ्या आवाक्यातील गोष्ट नाही, तु या परीक्षेचा नाद सोडून द्यावा यातच तुझं हित आहे. जर त्या विद्यार्थ्याने जगाचा हा सल्ला मानला तर तो आपलं ध्येय गाठू शकणार नाही. परंतु त्यानं जगाच्या सल्ल्याला धुडकावून लावून आपल्याच मनाला जे योग्य वाटतं त्यानुसार जिद्दीने प्रयत्न केले तर तो कदाचित यशस्वी होऊ शकतो! 

या उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात येते की काही प्रसंगी जगाच्या उपदेशाला विसरून जाऊन म्हणजे कोषावस्थेत राहून आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करणे योग्य ठरतं. परंतु या डिनायल स्टेट मध्ये दीर्घकाळ राहणे हे मात्र धोक्याचे असू शकते.  हा धोका टाळण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण डिनायल स्टेटमध्ये आहोत हे ओळखता यायला हवं.  दुसरी गोष्ट म्हणजे आपण एका विशिष्ट कारणासाठी या डिनायल स्टेटमध्ये जात आहोत हे आपल्या निकटच्या किमान एका व्यक्तीला तरी सांगून त्या व्यक्तीला आपल्यावर लक्ष ठेवण्यास व आपणास एखाद्या टोकाच्या भूमिकेपासून दूर ठेवण्यास त्या व्यक्तीची मदत घ्यावी.

व्यक्तीनं State of Denial मध्ये जाणं ह्यापुढील पातळी म्हणजे एखादं कुटुंब, एखादा समाज अथवा एखादा संपुर्ण देश सुद्धा ह्या अवस्थेत जाऊ शकतो.  व्यक्तीनं State of Denial मध्ये जाणं ह्याबाबतीत बहुतांशी वेळा केवळ त्या व्यक्तीचीच हानी होते परंतु सामाजिक पातळीवरील State of Denial मध्ये जाणं हे समाजस्वाथ्याच्या दृष्टीतुन धोकादायक ठरु शकतं. 

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

एक संध्याकाळ !



आश्लेषा - "आपलं दोघांचं एकत्र बसून असं बोलणं कधीच होत नाही?"

ऋषिकेश - "आपलं बोलणं होतच नाही असं कसं म्हणतेस तू? आपण नाही का एकत्र बसून संध्याकाळी चर्चा करतो?

आश्लेषा - "त्याला काही एकत्र बोलणे असे म्हणतात येणार नाही.  त्यावेळी आपल्या दोघांच्या हाती मोबाईल असतात!  टीव्ही चालू असतो, आपली सायली मध्ये मध्ये येऊन तिच्या विश्वातील काही घटना आपल्याला सांगत असते !

ऋषिकेश - "या पलीकडे तुला कोणत्या प्रकारचा संवाद अपेक्षित आहे?"

या प्रश्नावर आश्लेषा अत्यंत हैराण!! काही मिनिटांच्या मौनानंतर 

आश्लेषा - " मला नक्की काय म्हणायचं आहे ना ते तुला इतक्या वर्षांच्या संसारानंतर सुद्धा कधी कळणारच नाही!! कधी कधी तर मला असा संशय येतो की तु न समजल्याचे नाटक करत असावा!! 

ऋषिकेश काहीसा नाराज होतो.  थोडा वेळ दोघंही गप्प बसतात त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर ऋषिकेश आपले विचार सावरून घेतो आणि पुन्हा संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करतो.  

ऋषिकेश - " म्हणजे आपल्या आयुष्यातील आतापर्यंतच्या प्रवासाविषयी आणि त्यानंतरच्या संभाव्य वाटचालीविषयी आपण बोलावं असं म्हणायचं आहे का तुला? "

आश्लेषाची नाराजी पूर्ण दूर झालेली नाही. तरीसुद्धा ऋषिकेशने हा संवाद पुढे सूरू करण्याचा प्रयत्न केला याचं तिला मनातून कुठेतरी बरं वाटतं.  या बरं वाटलं म्हणून ऋषिकेशला शाबासकी द्यावी हा विचार कुठेसा अस्पष्टपणे तिच्या मनात डोकावतो.  त्या विचारानं गंभीर रुप धारण करुन  तो आपल्या तोंडुन बाहेर निघण्याआधीच त्या विचाराला धुडकावून लावण्याची काळजी ती घेते !!

आश्लेषा - "हो,  हो!! काहीसं असंच म्हणायचं आहे मला !!"

ऋषिकेश - " असे संवाद आपण गंभीरपणे जरी चर्चिले नसले तरी ढोबळमानाने पुढील आयुष्यात काय करायचं आहे याविषयी आपलं एकमत आहे असं मला वाटतं!  म्हणजे अगदी मुद्देसुद आराखडा बारीकसारीक तपशीलांसहित जरी आपण बनवला नसला तरी योग्य वेळ येताच आपण तो नक्कीच बनवु ह्याची खात्री आहे मला !!

आश्लेषा - "ओके !! आपण एकमेकांना पुरेसा वेळ देतोय का? भावनिकदृष्ट्या एकमेकांना आपण जाणुन घेतोय का?"

ऋषिकेश बहुदा चर्चेनं घेतलेल्या ह्या वळणाला तयार नसावा. त्यामुळं तो काहीसा हबकुन जातो. ही आतापर्यंत ठीक होती, अचानक तिला काय झालं असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसुन येतात !

ऋषिकेश - "तुला नक्की काय म्हणायचं आहे समजावुन सांगशील का?"

आश्लेषा - "मी शुद्ध मराठीत सांगितलं आहे. तु मला भावनिकदृष्ट्या समजुन घेतोस का किंबहुना तसा किमान प्रयत्न तरी करतोस का?"

आश्लेषानं उत्तर देईस्तोवर मिळालेल्या वेळात ऋषिकेशचा मेंदु परिस्थितीचं गांभीर्य ओळखतो. मेंदुचा सर्व विचारशक्ती ह्या चर्चेकडं आणणं ही ह्यावेळची गरज आहे हे त्याच्या मेंदुला समजलेलं असतं ! 


ऋषिकेश - "तु मला भावनिकदृष्ट्या समजावुन घेतेस का? किंबहुना मलासुद्धा भावनिकदृष्ट्या समजावुन घेणं ही तुझ्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी ह्याचा तु कधी विचार केला आहेस का ?

भयंकर आश्चर्यचकित झालेली आश्लेषा मध्ये  काही  बोलु  इच्छिते ! तिला थांबवुन 

ऋषिकेश - " लेट मी फिनिश ! मला माझं बोलणं पुर्ण करु देतं ! तु लौकीकार्थानं माझी सगळी काळजी घेतेस. वेळच्यावेळी डबा, जेवण देतेस. घरात मला काही एक म्हणुन पाहावं लागत नाही. तु ही माझ्याप्रमाणं नोकरी करत असलीस तरी सुद्धा घरकामात मला अजिबात लक्ष घालावं लागत नाही. पण .... पण मलासुद्धा काही भावनिक गरजा असु शकतात ह्याचा तु कधी विचार केला आहेस का? 

आश्लेषा - (डोळे मोठे करुन!) " तुझ्या भावनिक गरजा!! व्हॉट डु यु मीन ऋषिकेश?

ऋषिकेश - " मी सुद्धा कधी उदास असु शकतो, मलाही क्वचित सगळ्याचा कंटाळा येऊ शकतो !!"

आश्लेषा - "हं ... May be I should keep this thing in mind!!"

ऋषिकेश -" Thank You!"

ह्या  चर्चेत आपण अचानक बॅकफूट वर गेलो आहोत ह्याची  आश्लेषाला जाणीव  होते . 

आश्लेषा - " पण तु हा मुद्दा अचानक कसा आज काढलास? इतकी वर्षं तु मला त्याची जाणीव सुद्धा का करुन दिली नाहीस?


ऋषिकेश (खट्याळपणे )- " ते ही खरंच !! पण जर गंभीरपणे बोलायचं झालं तर तुम्ही हल्लीच्या स्त्रिया बहुदा आम्हां पुरुषांना गोंधळवुन टाकत असाव्यात !! बाकीच्या सर्व वेळी आमच्या खांद्याला खांदे लावुन कार्यरत असता आणि मग कधीतरी अचानक आम्ही तुम्हांला भावनिकदृष्ट्या संभाळून घ्यावं आणि ते सुद्धा तुम्ही शब्दरुपात स्पष्टपणे न सांगता ही तुमची अपेक्षा असते ! पण खरं सांगायचं झालं तर ह्या बाबतीत बहुतांशी पुरुषांची बुद्धी जास्त चालत नाही ! "

आश्लेषा - " हे असं बोललं की झालं ! आमची बुद्धी चालत नाही  वगैरे सांगितलं की तुम्ही हात झटकायला मोकळे !!

ऋषिकेश - "आता आपलं बोलणं होतंच नाही इथुन सुरु झालेली चर्चा आपण गेली पंधरा मिनिटं करत आहोत हे तरी तु मान्य करशीलच ना?"

आश्लेषा - " नाही नाही ! ही कसली चर्चा ! हे तर एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करुन एकमेकांवर टीका करणं चालु आहे आपलं ! मुख्य चर्चा तर बाकी आहे मेरे दोस्त !!"

ऋषिकेश - " ओहो तु  मला दोस्त म्हणालीस ! क्या बात आहे !!"

आश्लेषा - (काहीशी लाजुन) " पण ऋषी मला एक गोष्ट जाणवली ! ही जी काही शांत बसुन चर्चा वगैरे आहे ना , त्यात पहिली काही मिनिटं दोघांना मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आणण्यातच जातात !"

ऋषिकेश - "मगाशी भावनिकदृष्ट्या झालं आता मानसिकदृष्ट्या ! अजुन कोणी दृष्ट्या बाकी आहे काय?"

आश्लेषा - "तु आहेस ना मुख्य दृष्ट्या !!"

ऋषिकेशला हसु आवरत नाही !

आश्लेषा - " महत्वाचा मुद्दा असा की बरीचशी जोडपी अशी शांतपणे चर्चा करायला बसली की सुरुवातीचा हा जो मानसिकदृष्ट्या एका पातळीवर येण्याचा प्रकार असतो ना त्यातच आरोपाच्या फैरी झडत असाव्यात ! त्यामुळं मुख्य चर्चेपर्यंत मंडळी पोहोचतच नसावीत !"

ऋषिकेश - " हे मात्र खरं !"

आश्लेषा - "तर आपण आता मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आलो आहोत ! आता खऱ्या चर्चेला सुरुवात करूयात का?

ऋषिकेश - "अरे यार ! माझा मेंदु पार थकुन गेलाय !! पुन्हा कधीतरी नक्की !

आश्लेषा - " ठीक आहे ! तुझ्या चेहऱ्यावरील भाव पाहुन मी तुला माफ करतेय ! पण दोन अटींवर !

ऋषिकेश - "आता कोणत्या दोन अटी ? "

आश्लेषा - " आज झालेली ही मानसिकदृष्ट्या एका पातळीवर येण्याची चर्चा पुढील एका वर्षासाठी ग्राह्य राहील !! "

ऋषिकेश (डोळे मोठे करीत ) - "आणि दुसरी ?"

आश्लेषा - "आता आपण दोघेजण मॉलमध्ये जायचं !!"

ऋषिकेश - "........ "

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

2019 World Cup, IPL



यंदाच्या वर्षी IPL काही महत्त्वाच्या गोष्टींचा सामना करणार आहे. भारतभर पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मैदानी हिरवीगार ठेवण्यासाठी हजारो लिटर पाणी खर्च करणे कितपत योग्य आहे, त्याच सोबत रात्रीच्या वेळी विद्युतझोतात सामने खेळवून दुर्मिळ विजेचा या कारणासाठी उपयोग करणे नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे या दोन मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता आहे.  

वरील मुद्द्यांवर मी नंतर केव्हातरी लिहीन; परंतु आजचा मुद्दा आहे २०१९ सालची विश्वचषक स्पर्धा अगदी तोंडावर आली असता भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये गुंग होऊन जाणे कितपत योग्य आहे? यामध्ये आक्षेप घेण्यासारख्या काही गोष्टी खालीप्रमाणे!

१) IPL मध्ये खेळाडूंना दुखापत होण्याची, त्यांची दमछाक होण्याची  शक्यता नेहमीच अधिक प्रमाणात असते! तुम्हांला मिळालेल्या कोट्यावधी रुपयांचे मोल चुकवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी करत असता, एक दिवसाआड भारतासारख्या खंडप्राय देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात विमानाने जाताना झोपेचे खोबरे करुन तुम्ही खेळत असता.  

२) IPL मध्ये रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्ट्यांचे सध्या स्टेटस काय आहे मला माहित नाही. परंतु त्यात तुम्ही सहभागी होत असाल तर तुमच्या शिस्तबद्ध दिनचर्येची हालत खराब होऊ शकते.  

३) IPL स्पर्धा मे महिन्यामध्ये बराच काळ चालेल. विश्वचषकाचे सराव सामने मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहेत.  भारतातील उन्हाळ्यातील सामने खेळुन जेव्हा खेळाडू इंग्लंडच्या थंड हवामानातील तेव्हा त्यांना तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. 

४) अजून एक मुद्दा IPL मध्ये तुम्ही परकीय खेळाडूंच्यासोबत एका संघातून आपल्या संघातील खेळाडूविरुद्ध खेळणार. अशावेळी सामन्याच्या ओघात तुम्ही तुमची काही संघातील गुपिते परकीय खेळाडूंना सांगणार नाहीत याची हमी कोण देणार? 

आता म्हणायला गेलं तर जसे हे मुद्दे भारतीय खेळाडूंना लागू होतात तसेच हे मुद्दे परदेशी खेळाडूंना सुद्धा लागू होतील. परंतु येथील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही देश येणारी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता आपल्या खेळाडूंना आयपीएलच्या उत्तरार्धामध्ये स्पर्धेतून बाहेर काढून घेतील.  परंतु आयपीएलची मार्केट व्हॅल्यू कायम ठेवण्यासाठी भारतीय खेळाडूंना मात्र या स्पर्धेच्या शेवटापर्यंत खेळावे लागण्याची शक्यता जास्त!! IPL मध्ये खेळण्याची संधी मिळत नसलेल्या पाकिस्तानला तर अजुनच जास्त बरं !!


आता ह्या पोस्टचा उत्तरार्ध. विश्वचषक सामन्यांमध्ये विविध संघाच्या संभाव्य कामगिरीविषयी माझं हे परीक्षण !! 
विश्वचषकासाठी फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवल्या जात असल्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट हंगामातील पूर्वाधात जरी ही स्पर्धा खेळली जाणार असली तरी गोलंदाजांना अति अनुकूल परिस्थिती मिळेल असे आपणास म्हणता येणार नाही. जर गोलंदाजीला अनुकूल मैदान बनवलं आणि सामना ३० - ४० षटकांमध्ये आटोपला तर जाहिरातदारांचं किती नुकसान होणार ह्याचा विचार करावाच लागतो ! त्याचप्रमाणे २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या अनुभवानंतर भारतीय संघाचे आव्हान स्पर्धेच्या अधिकाधिक कालावधीपर्यंत टिकुन रहायला हवं ! म्हणुन तर यंदा प्राथमिक फेरीत सर्व संघ एकमेकांशी खेळणार आहेत !! 

स्पर्धेत भाग घेणारे संघ पुढीलप्रमाणे 

इंग्लंड 
भारत 
न्युझीलंड 
ऑस्ट्रेलिया 
दक्षिण आफ्रिका 
पाकिस्तान 
वेस्ट इंडीज 
श्रीलंका  
अफगाणिस्तान 
बांगलादेश 

इंग्लंड 
इंग्लंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सध्या एक क्रमांकाचा मानला जातो.  स्वदेशी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये इंग्लंड संघाचे पारडे नक्कीच जड राहील. सध्या वेस्ट इंडीजमध्ये या संघाला नक्की काय झालं आहे याचा उलगडा मला होत नाही. ही केवळ एक तात्पुरती घटना आहे की शिखर स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या उतरणीला सुरुवात झाली आहे या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल!  ह्या संघाचा विश्वचषक स्पर्धेतील इतिहास पाहता हा संघ मोक्याच्या वेळी ढेपाळतो हा अनुभव आहे. असे असले तरी मॉर्गन, बटलर, बेयरस्टो, रूट, रॉय, स्ट्रोक, ब्रॉड, अँडरसन ही मंडळी ह्या संघाला नक्कीच बाद फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. 

भारत 

भारतीय संघ फलंदाजीच्या बाबतीत दोन-तीन शक्यतांमध्ये आपली कामगिरी बजावतो. 

पहिली शक्यता म्हणजे आघाडीचे तीन फलंदाज यशस्वी होणे. ह्या शक्यतेमध्ये सध्या तरी जगातील प्रत्येक संघाच्या गोलंदाजीला खरपूस समाचार घेण्याची क्षमता या तिघांमध्ये आहे. त्यामुळं भारतीय संघ बहुतांशी वेळा दणदणीत विजय मिळवतो. 

दुसरी शक्यता म्हणजे हे तिघे अयशस्वी होणे. बऱ्याच वेळा हे तिघेही एकत्र  अयशस्वी होतात. अशावेळी मधल्याफळीतील फलंदाज कशा प्रकारे ह्या बिकट परिस्थितीचा सामना करतात, चिकाटीने खेळुन  काहीशी आव्हानात्मक संख्या उभारतात ह्यावर सामन्याचे भवितव्य अवलंबुन राहते. 

२ अ ) मधल्या फळीने झुंज देत आव्हानात्मक धावसंख्या उभारली तर सामने बऱ्यापैकी चुरशीचे होतात. 

२ ब ) ही शक्यता शक्यता म्हणजे आघाडीच्या फलंदाजीसोबत मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा हाराकिरी पत्करतात; भारतीय संघाचा दारुण पराभव होतो. 

विश्वचषक स्पर्धेचे यंदाचे स्वरूप लक्षात घेता सर्व सहभागी संघ एकमेकांशी साखळी स्पर्धेत खेळणार आहेत, त्यानंतर त्यातील आघाडीचे संघ उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.  कोणताही संघ विश्वचषक स्पर्धेच्या आधी फॉर्ममध्ये असेल तर त्याचा अर्थ तो संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल असा होत नाही.  पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये असलेला विंडीजचा संघ आणि १९९९ ते २००७ सालापर्यंतचा ऑस्ट्रेलियाचा संघ या दोन संघानी तत्कालीन इतर संघांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 

परंतु सध्या मात्र तशी स्थिती दिसत नाही. भारतीय संघ जरी आघाडीचा संघ मानला जात असला तरी चार-पाच सामन्यानंतर अचानक त्यांना Bad Day in Office मुकाबला करावा लागतो.  अशावेळी मागच्या सामन्यात सहज जिंकलेला हाच तो संघ का असा प्रश्न सर्वांना पडतो! जर भारतीय संघाला विश्वचषक जिंकायचा असेल तर असे Bad Day in Office साखळी स्पर्धेत आलेले आपल्याला परवडतील!  

सध्या या संघाला प्रॉब्लेम ऑफ प्लेण्टी ही समस्या सुद्धा भेडसावत आहे.  म्हणजेच एका स्थानासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समजा मी क्रिकेट हे क्षेत्र निवडलं असतं तर १९९० च्या दशकात माझ्यात, द्रविड, सौरभ, लक्ष्मण आणि सचिनमध्ये कशी मधल्या फळीतील स्थानांसाठी चुरस झाली असती त्यालाच Problem of Plenty असं म्हणतात. फक्त ही संज्ञा समजाविण्यासाठी हे उदाहरण दिलं !! बाकी कोणताही हेतु नाही !!

उपांत्य फेरीपासून आपल्याला आघाडीच्या तीन फलंदाजांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागेल.  बुमराह, शमी, भुवनेश कुमार, चाहल आणि  कुलदीप यांची गोलंदाजी कितीही भरभक्कम वाटत असली तरी फलंदाजांनी किमान धावसंख्या उभारणे आवश्यक आहे.  IPL नंतर आपली मंडळी कोणत्या मनःस्थितीत विश्वचषक खेळण्यास उतरतात हा एक महत्त्वाचा घटक आहे! तरी सुद्धा सध्याच्या फॉर्मनुसार आपण उपांत्य फेरीपर्यंत पोहचु शकतो असं मला वाटतं. 

न्युझीलंड 
न्युझीलंड हा संघ जरी भारताकडून आता घरच्या मैदानावर ४-१ असा पराभूत झाला असला तरी विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांना कमी लेखण्याची चूक कोणी करु नये. या संघाकडे खोलवर फलंदाजी करणारे खेळाडू आहेत.   त्याचप्रमाणे बोल्ट, साऊथीसारखे अत्यंत घातक  वेगवान गोलंदाजसुद्धा आहेत. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे क्रिकेट सेन्स ज्याला उत्तम लाभला आहे असा त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन हा त्यांच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत सहज घेऊन जाऊ शकतो!!


ऑस्ट्रेलिया 
ऑस्ट्रेलिया या संघाचे विश्वचषकातील भवितव्य बऱ्याच प्रमाणावर स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवर अवलंबून आहे. या दोघांवरील बंदी मार्च महिन्यात उठल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी प्राप्त होईल.  एक वर्षाच्या बंदीमुळे त्यांच्या खेळावर किती विपरीत परिणाम झाला आहे आणि या बंदीमधुन मानसिकदृष्ट्या ते किती झटपट बाहेर निघू शकतात हा ऑस्ट्रेलियन संघासाठी कळीचा मुद्दा बनू शकतो! हॅझलवूड आणि स्टार्क या दोघांवर ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजीचे भवितव्य अवलंबून राहील. स्मिथ आणि  हॅझलवूड दुखापतीतून कसे लवकर बाहेर पडतात हा महत्त्वाचा मुद्दा राहील. परंतु एकंदरीत सद्यस्थिती पाहता विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचणे सर्वात आशादायक कामगिरी असू शकते.  

दक्षिण आफ्रिका 
गेल्या काही विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका नेहमीच एक आघाडीचा संघ म्हणून उतरला होता. परंतु प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत त्यांनी मोक्याच्या वेळी हाय खाल्ल्यामुळे त्यांना विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयश आले होते. यंदाच्या वेळी त्यांच्याकडे रबडा, निगडी, स्टेन असे चांगले गोलंदाज जरी असले तरी त्यांची फलंदाजी आतापर्यंतच्या विश्‍वचषक स्पर्धेत भाग घेतलेल्या बाकीच्या दक्षिण आफ्रिका संघांपेक्षा बरीच कमकुवत वाटते. डुप्लेसीवर बरंच काही अवलंबुन असेल. मानसिक कणखरता हे दक्षिण आफ्रिकेचे बलस्थान केव्हाच नव्हते.  यावेळी तर त्यांना ह्यावर खुप मेहनत घ्यावी लागणार आहे. डेव्हिलर्सची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाप्रमाणेच हा संघ सुद्धा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणं ही सर्वोत्तम आशा धरू शकतो. परंतु उपांत्य फेरीमध्ये त्यांच्या मानसिक कणखरतेची सर्वात कठीण परीक्षा घेतली जाईल.   

पाकिस्तान 
पाकिस्तान हा संघ दक्षिण आफ्रिकेत सध्या पराभूत होत असला तरी त्या संघाने आपल्या कामगिरीमध्ये खूपच सुधारणा केल्याची जाणवून येते. या संघाकडे वलयांकित नसलेले असे बरेच गुणवान खेळाडू आहेत. समजा इंग्लंडच्या पूर्वार्धातील हवामानाने त्यांच्या गोलंदाजांना साथ दिली तर हा संघ त्यांच्या दिवशी भल्या भल्या संघांच्या तोंडचे पाणी पळवु शकतो. फक्त या संघाची केव्हाही कोसळू शकणारी फलंदाजी या संघाचा घात करू शकते. आणि ह्याच कारणास्तव ह्या संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांना सुरुंग लागु शकतो. 

वेस्ट इंडीज 
जे कोणी क्रिकेटरसिक सध्या वेस्ट इंडिज संघाची इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील कामगिरी पाहत आहेत, त्यांना आश्चर्याचा खूपच सुखद धक्का बसला असेल. ज्याप्रकारे वेस्ट इंडिजच्या संघाने जेसन होल्डर च्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला दोन्ही कसोटी सामन्यात नमवले आहे ते पाहून दर्दी क्रिकेट रसिकांना खूपच बरे वाटले असेल. Shimron Hetmyer  आणि शाई होप हे भविष्यातील महान खेळाडु या संघाकडे मधल्या फळीत आहेत. या संघाची भारतीय दौऱ्यावरील गेल्या वर्षातील एकदिवसीय मालिकेतील कामगिरी आठवून पहा! हा संघ जुनमध्ये भरात आला तर होल्डर याच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीपर्यंत धडक देऊ शकतो असे मला वाटते. 

श्रीलंका  
श्रीलंका हा संघ संगकारा, महेला जयवर्धने या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीनंतर अजूनही पूर्णपणे सावरला नाही.  या संघाची सध्याची कामगिरी पाहता या संघाकडून विश्वचषक स्पर्धेमध्ये फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. ह्या संघाचे बांगलादेश, अफगाणिस्तान सोबतचे सामने चुरशीचे होऊ शकतात. 

अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ दोन तीन आघाडीच्या संघांना धक्के देऊ शकतात. परंतु उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणे त्यांना कठीण आहे ! 



शेवटी सारांश असा की सध्याची कामगिरी लक्षात घेता भारत, इंग्लंड, आणि न्युझीलंड या संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सर्वाधिक संधी आहे.  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चौथ्या स्थानासाठी चुरशीची स्पर्धा होऊ शकते. विंडीज आणि पाकिस्तान हे दोन संघ बेभरवशाचे आहेत.  त्यांच्याकडे उपांत्यफेरीत प्रवेश करण्याची क्षमता असली तरी ते आपल्या सातत्याच्या अभावामुळं बहुदा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत!!  

हा ब्लॉग आता वाचून विसरून जा!! विश्वचषक स्पर्धेत वेगळेच निकाल लागल्यानंतर या ब्लॉगची लिंक मला पाठवून खजील करु नकात !!

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...