मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
आत्मचरित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मचरित्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

४x वा वाढदिवस!



४x वा वाढदिवस आला आणि म्हणता म्हणता सरला देखील ! ४x वर्षे पुर्ण झाली म्हणजे एक प्रकारचा भारदस्तपणा वाटु लागला. तसं म्हणायला आपल्या व्यक्तिमत्वामुळं भारदस्तपणा बऱ्याच आधीपासुन अनायासे प्राप्त झाला असेल तर वयामुळं प्राप्त होणाऱ्या भारदस्तपणाला फारसा वाव नसतो. आता इथला ४x मधला x म्हणजे वय लपविण्याचा प्रयत्न नव्हे तर पूर्ण जन्मतारीख सोशल मीडियावर न टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न ! खट्याळ मित्रांच्या टिपण्णी मात्र आपल्या नियंत्रणात नसतात!

हल्ली सर्वजण फेसबुक आणि व्हाट्सअँपवर मनापासुन शुभेच्छा देतात! सर्व नातेवाईक, लहानपणापासून जोडलेली मित्रमंडळी ते कार्यालयातील मित्रमंडळी सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या की कसं बरं वाटतं! वाढत्या वयाच्या जाणिवेनं आलेली खंत बरीच कमी होते ती दोन गोष्टींनी! एक म्हणजे आपल्याला अजुनही लहान समजणारी आपल्या नातेवाईकांच्या बोलांनी / आशीर्वादांनी आणि दुसरं म्हणजे वय कितीही वाढलं तरी अगदी लहानपणाचा खट्याळपणा कायम ठेवणारी मित्रमंडळी. वय कितीही वाढलं तरी ही लहानपणाची भावना, असला खट्याळपणा जर कायम ठेवता येत असेल तर मग वाढत्या वयाचे दुःख कशाला? 

लहानपणाचा वाढदिवस वेगळा असायचा आणि असतो! कौतुकाचं केंद्रबिंदु स्वतः असायला हवं ही भावना व्यापक असते आणि ती लपवावी असं वाटत सुद्धा नाही. वाढत्या वयानुसार ही भावना कमी होत जाते आणि मग कौतुकाचं केंद्रबिंदू स्वतः असायला हवं ही अपेक्षा आपण ज्यांच्याकडुन ठेवतो त्या लोकांची संख्या कमी होत जाते. आपले आईवडील, काका - काकी, आत्या - आत्याजी, मावशी आणि मोठी भावंडं ही हक्काची मंडळी अशी असतात की त्यांच्याकडं आपण ही भावना कायम ठेवून देतो. वर्षभर आपली साथ देणारी पत्नीसुद्धा आपल्या आवडीचा स्वयंपाक बनविते. मोठी भावंडांनी "आदू" असं संबोधिलं की काळ आपसुक काही वर्षे मागे जातो. 

आता मोर्चा मित्रमंडळींकडे ! इतक्या वर्षानंतर हा मनुष्य वाढदिवसाच्या दिवशी काही पार्टी वगैरे देईल अशी अपेक्षा हे लोक ठेवत नाहीत! त्यामुळे ह्यांची बुद्दी सक्रिय होते आणि विविध माध्यमांतून तिला वाव दिला जातो. ह्यातील काही मित्रमंडळी आपल्यातील असल्यानसल्या (बहुतांशी नसलेल्याच) गुणांची ओळख अशा भारदस्त शब्दांत करुन देतात की त्यांना "अरे हा मनुष्य कोण बरे? त्याची ओळख करुन देशील का? " असे विचारावंस वाटतं ! काही प्रेमळ मित्रमंडळी ५ - १० वर्षापूर्वीचे आपले तरुण लुक्सवाले फोटोज सोशल मीडियावर टाकुन आपल्याला चांगलं वाटायला मदत करतात. 

वर्षे अशीच सरुन जातील. उरतील त्या आठवणी! ५x, ६x, ७x व्या वाढदिवसाला कसं वाटत असेल, मनात काय भावना असतील हे आताच सांगता येणार नाही पण एक मात्र खरं ! प्रत्येक x व्या वाढदिवसाला तोवरच्या आयुष्यभरातील प्रत्येक वाढदिवसाची आठवण ज्यांच्यासोबत काढता येईल असे आप्त, मित्रगण ज्याच्यासोबत आहेत तो खरा भाग्यवान!



आपण माणसांच्या बाबतीत किती सुखी आहोत ह्याची जाणीव करुन देत अजुन एक वाढदिवस सरला ! वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातुन दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनःपुर्वक आभार !

गुरुवार, ९ जून, २०१६

दहावीची शिकवणी !

सोमवार, २३ मे, २०१६

इस्त्री



शाळा आणि महाविद्यालयातील गोष्ट! तो काळ एकतर वेगळा होता किंवा मी वेगळा होतो किंवा दोन्हीही! म्हणजे शाळेच्या वेळी खात्रीपुर्वक मी सांगु शकतो की आम्ही सर्वजण बिना इस्त्रीचे कपडे परिधान करायचो. महाविद्यालयात माझ्या बाबतीत परिस्थिती बदलली नव्हती आणि आजुबाजूच्या मुलांचे निरीक्षण करुन त्यांनी इस्त्री केलेले कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्याइतकी माझी कुतुहूलशक्ती विकसित झाली नव्हती. पण बहुदा रुपारेल आणि SPCE ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे आधिक्य असलेल्या कॉलेजात माझं शिक्षण झाल्याने बहुतांशी हीच परिस्थिती असावी असं मला वाटत! 

नंतर मग नोकरीला लागल्यापासुन मात्र परिस्थिती बदलली. इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घालुन जाणे ही काळाची गरज बनली. विरार लोकलमधुन अंधेरीला उतरेपर्यंत हे कपडे इस्त्री केले आहेत ह्यावर कोणी विश्वास ठेऊ शकत नसे. पण "मी इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घातले!" असं मानसिक समाधान का काय म्हणतात ना ते मात्र मिळायचं!

माझे वडील ऑफिसला जाईतोवर स्वतःचे कपडे स्वतः घरी इस्त्री करत. प्रत्येक कपडा अगदी मन लावुन व्यवस्थित! त्यावर पाण्याचे थेंब शिंपडायचे, प्रत्येक बाहीची घडी अगदी व्यवस्थित पडली आहे ह्याची खातरजमा करुन घेत! माझ्याकडे काही बाबतीत व्यवस्थितपणा आहे असे लोक म्हणतात आणि पत्नी सुद्धा म्हणते! म्हणजे नक्की असावा ! पण इस्त्री करण्याबाबतीत मात्र माझ्याकडे इतका काटेकोरपणा नाही. साधारणतः पाच मीटर अंतरावरुन पाहणाऱ्या माणसाला मी इस्त्री केलेले कपडे घातले आहेत असा भास / विश्वास व्हायला हवा इतक्या काटेकोरपणे इस्त्री करावी हे माझे धोरण! वडील निवृत्त झाले आणि मग आम्ही इस्त्रीवाला पकडला. हे लोक जशी मस्त इस्त्री करतात तशी आपल्याला सुद्धा एकदा का होईना करता यावी ही माझ्या मनात जबरदस्त इच्छा! "त्यांची इस्त्री वेगळी असते !" बायकोने मला समजावल्यावर मी काहीशा अविश्वासाने आणि काहीशा नाराजीने तिच्याकडे पाहिलं. 

पुढे अमेरिका गाठली. तिथं इस्त्रीवाला कुठून मिळणार आणि असला तरी आपल्याला दररोजच्या दररोज कोठे परवडणार? अमेरिकेतील लोकांचे एक वागणं आपल्या सर्वांना लगेच लक्षात येईल. जी काही धमाल करायची ती शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रात्रीपर्यंत! रविवारी का कोणास ठावूक, मंडळी काहीशी दुःखात वाटायची. हाणून सर्वजण घरकामाला लागलेले दिसायचे. आमच्या वसाहतीत कपडे धुवायची यंत्रे सार्वजनिक ठिकाणी असल्याने बरीच पुरुषमंडळी तिथंच भेटायची. पुढे मग रविवारी जास्तच गर्दी व्हायला लागल्यापासुन मग मी माझ्या कपडे धुण्याच्या वेळा बदलल्या ही गोष्ट वेगळी! 

असो तर अमेरिकेत असताना रविवारी रात्रीचे जेवण आटोपलं की मग मी आठवड्याचे सर्व कपडे इस्त्री करायला घ्यायचो! एकदम ब्रह्मानंदी टाळी लागणे वगैरे प्रकार नसला तरी मस्तपैकी मी विचारमग्न व्हायचो. चिंतातुर जंतु असलेल्या माझ्या मनात पुढील आठवड्यात वाढुन ठेवलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणते विचार येणं शक्य नव्हते. परंतु हा वेळ मला आवडायचा! माझ्या मनाला तो येणाऱ्या आठवड्यासाठी तयार करण्यासाठी खूपच मदत करीत असे! प्राजक्ता सुरुवातीला सूचना करी पण नंतर तिने माझा नाद सोडला होता. तुझी इस्त्री आणि तुझे ऑफिस - मला काय त्याचं ! अशा निष्कर्षापर्यंत काही काळाने ती येऊन पोहोचली होती. सोहम एक दोन वर्षाचा असेल. हा काहीतरी भयंकर प्रकार आहे हे इस्त्रीने तापलेल्या कपड्यांना स्पर्श करुन त्याने समजुन घेतलं होतं आणि त्यामुळे तो त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नसे. ह्या कारणांमुळे मी आणि माझी इस्त्री असा हा अर्धा तास अगदी एकांताचा काळ मला मननासाठी मिळे! 

आज अचानक हे सर्व इस्त्रीप्रकरण आठवायचं कारण म्हणजे मे महिना आणि इतर काही कारणांमुळे माझ्यावर इस्त्रीची वेळ आली. पुन्हा एकदा मन विचारात गुंतलं. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करणे हे आपल्याला अगदी वास्तवात ठेवण्यासाठी खूप मदत करतं ह्याची जाणीव मला झाली. पैसा टाकुन सोयी मिळविता येतात ह्यात काही संशय नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण ह्या सोयी मिळाल्याने जो मोकळा वेळ मिळतो त्याचा व्यवस्थित वापर न करता आल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जमिनीवर बसुन इस्त्री करणे हा एक उत्तम व्यायाम आहे असे मी म्हणतो. त्याचप्रमाणे त्या वेळात आपण आपल्या भ्रमणध्वनीपासून दुर राहतो आणि त्यामुळे घरातील लोकांशी संवाद साधण्याची शक्यता वाढीस लागते. आणि तुमच्याकडे कितीही पैसा असो स्वतः बाजारात जाऊन जीवनावश्यक गोष्टी विकत घेता येणं, प्राथमिक पातळीवरील स्वयंपाक करता येणे, इस्त्री करता येणे, घरातील सर्व उपकरणे आई / पत्नीच्या अनुपस्थितीत वापरता येणे हे प्रसंग तुमच्यावर कधी ना कधी तरी ओढवणारच! त्यावेळी तुम्हांला ते निभावता आले पाहिजेत हे नक्की! 

आधुनिक काळ आपल्यापुढे एका आभासी विश्वाचे चित्र रेखाटण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे मुलभूत तत्वांना आपण दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत. पण अगदी निकटच्या भविष्यात ही मुलभूत तत्वे आपल्या खऱ्या महत्त्वासकट आपल्यासमोर उभी ठाकतील ह्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही! 

हे सर्व काही आज सकाळी कराव्या लागलेल्या इस्त्रीच्या दोन कपड्यांपायी !! :)

मंगळवार, १४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ४


 
एकत्र कुटुंब आणि बर्यापैकी मोठी वाडी ह्यामुळे त्यावेळी बऱ्याच कामगार वर्गाचा घरी राबता असे. शेतीत काम करणारी हे सर्व कामगार अगदी घरच्या मंडळीप्रमाणे लहान मुलांची काळजी घेत. ह्यातील प्रत्येकाची खास व्यक्तीवैशिष्टे असत.

मोठी आईचे माहेर मुळगावचे. तिच्या माहेरून आलेला बाबुराव पण घरी काही काळ होता. हा अगदी रंगात आला की "अपलम चपलम" , "तू गंगा की मौज मै यमुना का धारा!!" अशी ठेवणीतील गाणे गाऊ लागे. मग दिदीच्या नेतृत्वाखाली बच्चेमंडळी त्याची फिरकी घ्यायला सज्ज होत. 

रुपजी काका आणि गुलाब काकू हे जोडपे बहुदा ७० च्या दशकापासून घरी राहायला असावे. रुपजी काकाचा उल्लेख बाउल प्रकरणात येउन गेला आहे. त्यांची तीन अपत्ये दीपक, राजू  आणि सुरेखा. दीपकने मला विटी दांडू आणि गोट्या खेळाचे नियम शिकवले. विटी दांडू मध्ये तो मला ९९.९९% हरवायचा. पहिल्या फटक्याने हवेत उडवलेल्या विटीला हवेतच पुन्हा दांडूने मारल्यास दुप्पट गुण मिळत असे मला काहीसं आठवतं. पण मला ह्या दोन्ही खेळात काही विशेष गती प्राप्त न झाल्याने मी ह्या खेळांपासून दुरावला गेलो. दीपक तसा हरहुन्नरी होता. केळीच्या दोन लोदांना (जाड बुध्यांना) मजबूत रस्सीने जोडून त्याने त्याची कामचलावू नौका बनवली होती. गढूळ पाण्याने भरलेल्या बावखलात त्याची ही नौका आणि त्यावर दीपक हे दृश्य मला काहीसं स्मरत. पण पूर्ण खात्री नाही. 

दीपकची मस्ती दिदीला फार खटकायची. एकदा तिचा राग अनावर होऊन तिने त्याला पूर्ण अंगभर बाम चोळला. त्यामुळे कासावीस झालेल्या दीपकला पाहून गुलाबकाकू नाराज झाली होती.

कालांतराने हे जोडपे बेण्यावर स्थलांतरित झाले. रुपजीकाका लवकरच निवर्तले. आणि दीपक, राजू सुद्धा! पण गुलाबकाकू अजूनही काम करते.

अंगमेहनतीची खास कामे करण्यासाठी घाटावरून आलेले तातोबा आणि त्याचे कुटुंब येई. हा तातोबा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार सारखा दिसायचा. त्यालाही तसंच वाटायचं की नाही हे मला ठाऊक नाही. तो एकदा एका प्रकरणात अडकला. त्याने मग वकील वगैरे केले. हे वकील एकदा अण्णांना भेटायला घरीही येऊन गेले. मग काही वर्षाने बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर तातोबा मोठ्या अभिमानाने सांगत आला की "हेच माझे वकील होते!"

मे महिन्यात खूप वेळ असे. त्यावेळी मोठी माणसे सायकलवर फिरत. लहान मुले साधारणतः आठवी नववी पर्यंत ही सायकल चालवू शकत नसत. आणि त्यावेळी लहान मुलांना हजारो रुपयाच्या सायकली विकत घेण्याची पद्धत नव्हती. होळीवर एक दोन दुकाने होती. तिथे भाड्याच्या सायकली मिळत. पन्नास पैसे अर्धा तास आणि एक रुपया एक तास! ज्याला सायकल येते अशा मोठ्या भावंडाची  किंवा मित्राची विनवणी करून त्यांच्याकडून सायकल अंगणापर्यंत आणली जात असे. मग पुढील अर्धा तास मुलं पडत, खरचटवून घेत. पण कधीतरी मग सायकल शिकत! ह्या सायकल शिकण्याच्या कालावधीत मला सायकल चालवता येत आहे ह्याची बऱ्याच वेळा स्वप्ने पडत! दोन्ही हात सोडून काही अंतर सायकल चालवू शकणारा मुलगा प्रसिद्ध असे. 


आईचे माहेर बोर्डीला! तिथे माझी मोठी बहिण सुस्मितताई आणि बंधू बऱ्यापैकी मे महिन्यात राहिले. पण मी मोठा होईस्तोवर आईचे तिथे जाणे हळूहळू कमी होत चालले. तरी देखील बोर्डीचे अण्णा आणि आजीच्या आठवणी मला बर्यापैकी स्मरतात. मे महिन्याची सुट्टी संपून परत यायची वेळ झाली की रमणचा प्रसिद्ध टांगा बोलाविला जाई. आणि मग त्यात भाई, आई, आम्ही तिघे आणि बऱ्याच काही आठवणी घेऊन आम्ही परतत असू ! बोर्डीहून परतणाऱ्या गाड्या अगदी संथ गतीने धावत. तशा अजूनही संथ गतीने धावतात. वाटेत मग डहाणूची डाळ घेतली की आम्ही धन्य होत असू. 
बोर्डीचा समुद्रकिनारा सुंदर आहे. तिथे आम्ही संध्याकाळी फिरायला जात असू. उत्तरेला असेच चालत गेले की झाई गाव लागतं. ते गुजरात राज्यात आहे असे मला सांगण्यात आले होते. एका अशाच संध्याकाळी ओहोटीच्या वेळी आम्ही एक समुद्रातील पाण्याचा प्रवाह (ओढा) ओलांडून पलीकडे गेलो. त्यावेळी बंधू किंवा सुपितताईने मला आपण झाईत म्हणजे गुजरात राज्यात आलो आहोत असे सांगितलं. ती पूर्ण संध्याकाळ मी धन्य होतो. पुढे जून महिन्यात शाळा उघडल्यावर मित्रांना कधी एकदा हे सांगतो असे मला झाले होते. हल्लीच्या मुलांत युरोपला वगैरे गेल्याशिवाय अशी भावना निर्माण होत नाही. 

बोर्डीच्या अण्णांचे कुटुंबीय काही अंतरावर असलेल्या वाडा ह्या ठिकाणी राहत. "अण्णा वाड्यात गेलेत!" हे वाक्य आम्ही बऱ्याचजणांना सांगायचो. अण्णांचे मित्र शांताराम म्हणून होते. ते अण्णांना भेटायला बऱ्याच वेळा यायचे. त्यांची एक खासियत होती. ते अंगणात पडलेल्या सावलीवरून घड्याळाची वेळ अचूक सांगत. ते आले की मी त्यांना वेळ विचारे. मग ते सावलीकडे निरखून पाहत आणि मग मला वेळ सांगत. मग मी धावत जाऊन घरातील घड्याळात वेळ पाहून धन्य होऊन येई. 

बंधू आजूबाजूच्या अण्णांच्या शेजाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असल्याने त्यांच्यात प्रसिद्ध होता. समोरच्या पाटलांकडचेअजित बंधुपेक्षा
वयाने बरेच मोठे असले तरी बंधूला दोस्त म्हणत! एकदा जोशात येउन बंधू त्यांना म्हणाला, "इतके दोस्त वगैरे म्हणता तर आइसक्रीम वगैरे खिलवा की!" अजितभाऊंनी ही गोष्ट फार मनावर घेतली. लगेचच सायंकाळी आम्हां सर्वांना समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलात घेऊन गेले.खिशातील शंभरची नोट बंधूला दाखवत म्हणाले, " तुझा दोस्त म्हणजे काय कमी समजू नकोस!" गोल्ड स्पॉट किंवा थम्सअप वर दहा रुपयाच्या वर खर्च करायची सवय नसलेल्या आम्हां सर्वांना ह्या गोष्टीचे फार मोठे अप्रूप वाटलं होते. सुपितताईची वसईच्या शाळेतील खास मैत्रीण नंदा हिचे सुद्धा बोर्डीला बहुदा आजोळ होते. त्यामुळे ती सुपितताईला तिथे भेटायची. मग सुपितताई खुश व्हायची. त्यावेळच्या पद्धतीनुसार सुपितताईवर घरातील मोठी मुलगी असल्याने कामाचा तसा बोजा पडायचा. 


बोर्डीला बऱ्याच वेळा पॉलीश न केलेला तांदुळ भातासाठी वापरत त्याचीसुद्धा एक वेगळी पण सुरेख चव असे! बोर्डीला आंब्याच्या वेगळ्या जाती असत. ते ही मनसोक्त खायला मिळत! अंगणात सकाळी वासुदेव येई. एका आठवड्यात विष्णू, राम वगैरे रूपे पाहून खुश झालेला मी नंतर अंगणात रावण प्रकटलेला पाहून पूर्णपणे भयभीत झालो होतो. दुपारी कधी मधी फेरीवाले पत्र्याच्या डब्यात नानाविध बिस्किटे , नानकटाई वगैरे घेऊन येत. ही बिस्किटे पाच रुपयाला शंभर असल्या स्वस्त दरात मिळत.

दुपारी जेवणं वगैरे आटोपली की आम्ही मेंढीकोट खेळायला बसू. खाली गोणपाट अंथरलेले असे. अण्णा सुद्धा सामील होत. हुकुम जो लपवित असे तो चतुराईने पायाखाली लपविलेले पान बाकी कोणाचे लक्ष नसताना हळूच वर करून समोरच्याला दाखवे. मग समोरचा कान पकडून, जीभ बाहेर काढून चौकट, बदाम वगैरे हुकुम असल्याचे खुणेनेच सांगे. बऱ्याच वेळा ही मंडळी पकडली जात मग मोठा गदारोळ माजे! गोणपाट अंथरून त्यावर मेंढीकोट खेळायला बसण्यात ह्या चतुराईला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असेच मला अजूनही वाटत आले आहे. पुढे १९८४ साली आजी अचानक स्वर्गवासी झाली आणि मग बोर्डीच्या फेऱ्या खूप कमी झाल्या. 

(क्रमशः)

शनिवार, ४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ३



आधीचे दोन भाग काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध केल्याने संदर्भासाठी त्यांची लिंक इथे देत आहे. 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post.html 

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_206.html 

वसईतील बहुसंख्य लोक पूर्वी स्टेशनवरून गावात परतण्यासाठी एसटी बसचा वापर करीत. पारनाका, होळी, रानगाव, गिरिज, किल्लाबंदर ह्या ठिकाणांसाठी बस सुटत. तशा ह्यातील काही बस अजूनसुद्धा चालू आहेत पण पूर्वीची शान नाही. ह्या बसच्या विशिष्ट वेळा असत आणि डेपोत असलेल्या बसच्या संख्येवरून आपल्याला बस कधी मिळेल ह्याचा अंदाज बांधता येई. बस देताना पारनाक्याला नेहमीच प्राधान्य दिलं जातं अशी होळीवाल्यांची समजूत होती आणि त्यांना त्याचा रागही यायचा. एखाद्या दिवशी बसला खूप उशीर झाला की मग बसच्या रांगेतील सामाजिक जीवनात सक्रिय असणारी मंडळी जाऊन कंट्रोलरला बस देण्यासाठी आपलं म्हणणं पटवून देत. मग थोड्या वेळानं बस येई. म्हटलं तर शाळेत असताना ह्या एसटी बसने प्रवास करायची वेळ क्वचितच येई. पण बाहेरगावी गेल्यावर परतताना नक्कीच एसटीशी गाठ पडे. ह्या एसटीचे ९० सालच्या आसपास स्टेशन ते होळी तिकीट हे ९० पैसे आणि रमेदी पर्यंत तिकीट १ रुपया होते. होळीच्या थांब्याला कंडक्टर बसमधल्या उरलेल्या प्रवाशांकडे नजर टाकून त्यांनी १ रुपयाचे तिकीट काढले असावे की नाही ह्याची खातरजमा करून घेई. अगदीच संशय आल्यास एखाद्याला विचारी सुद्धा! ह्या एसटी बसमध्ये बाकी सर्व दिवे पिवळ्या रंगाचे आणि एखाद दुसरा निळ्या रंगाचा असे. ह्या दिव्याखालची सीट मिळावी म्हणून माझा आटापिटा असे. 

पूर्वी सकाळी ८:४२ वाजता एक बडाफास्ट नावाची लोकल होती. ती बहुदा बोरिवली नंतर थेट बांद्र्याला थांबे. त्या लोकलला आमच्या गल्लीतून जाणारी २-३ मंडळी असत. ती साधारणतः बस पकडण्यासाठी एकत्रच निघत. 

आमच्या गल्लीत जॉनी अंकल राहतात. माझे वडील भाई, काका दाजी आणि जॉनी अंकल बऱ्याच वेळा ऑफिससाठी एकत्र निघत. जॉनी अंकल हे अनेक विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीमध्ये निष्णात आहेत. मी त्यांना ८० सालांपासून आमच्या घरी विविध उपकरणे दुरुस्त करताना पाहतो. ते अजूनही जमेल तसे येतात. दाजींकडे एक शंख असायचा. थोड्या दूर घर असलेल्या जॉनी अंकलना बोलावयाचे झाले की मग दाजी ह्या शंखाचा विशिष्ट नाद करीत. मग जॉनी अंकलना हा संदेश मिळून ते घरी येत. 

वसई स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वालीव ह्या गावी आमची शेती होती. पावसाळा आला की तिथे भाताची लागवड केली जात असे. तिथे एक बेडं होतं. तिथे अण्णा, मोठी आई, बाबा (मधल्या क्रमाकांचे काका) ह्या पावसाळ्याच्या काळात बऱ्याच वेळा जाऊन राहत. तिथे विद्युतपुरवठा वगैरे काहीच नसे. त्या शेताच्या बाजूने एक ओढा वाहत असे. त्या ओढ्याचे पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकाला सुद्धा वापरलं जात असावं अशी माझी आठवण आहे. शुद्धता ती पण किती!! आज घराच्या बाजूला असलेल्या विहिरीतील पाणी थेट पिताना जीव धास्तावतो. भाई मग रविवारी वगैरे ह्या शेतावर जात. माझ्या आठवणीत मी एकदा त्यांच्यासोबत एसटी पकडून गेलो होतो. सर्वत्र पाऊस पडून गढूळ पाणी झालं होतं. शेतात मजूर कामाला होते.  दुपारी गावठी कोंबडीचे जेवण चुलीवर बनवलं होतं. आणि चारच्या आसपास चहा आणि ग्लुकोज बिस्कीट खाऊन आम्ही परतलो होतो. माझे आजोबा भाऊ ह्या वालीवच्या शेतावरून बैलगाडी घेऊन रात्री अपरात्री सुद्धा घरी परतत असत. ती परंपरा बराच काळ बाबांनी चालू ठेवली होती. 
ह्या वालीव शेताच्या बाजूला एक छोटी टेकडी होती. ह्या टेकडीवर आंब्याची अनेक झाडे होती. एका वर्षी ह्या आंब्यांना खूप आंबे आले आणि मग ते पिकण्याच्या सुमारास बैलगाडीत भरून मग घरी आणण्यात आले. ह्यात अनेक प्रकारचे आंबे होते. त्या पिकलेल्या आंब्यांच्या मधुर सुवासाने आजीची खोली भरून गेली. आजी मग आम्हांला प्रत्येक दिवशी ह्या आंब्याचे वाटप करी.

घराच्या मागे असलेल्या बेड्यात दोन कणगे असायचे. त्यात मग ऑक्टोबरच्या आसपास झोडणी करून झालेलं भात आणून भरलं जायचं. आणि बाबा मग लॉरीवाल्यांबरोबर बोलणी करून पेंढा भरून आणत आणि अंगणातील मोकळ्या भागात टाकत. ह्याचं वर्णन मागच्या भागात आलं आहे. हा पेंढा आल्यानंतर काही काळातच मग दिवाळी येई. दिवाळीत आम्ही बाण लावताना ह्या पेंढ्याच्या दिशेने तो लावू नये म्हणून आम्हांला खास सूचना दिल्या जात. 
भाई आणि दाजी ह्यांना एकत्र कुटुंब असेपर्यंत एकच भाजी डब्यात मिळायची. एकदा डांगर वर्गातली एक भाजी कडू निघाली. परंतु ह्या सत्याचा महिलावर्गाला साक्षात्कार होईस्तोवर ह्या दोघातील एक आधीच डबा घेऊन ऑफिसात निघाले होते. त्यामुळे मग दुसऱ्याबरोबर दोघांनी अ-कडू भाजी पाठविण्याचे काम आजीने व्यवस्थित सुनांकडून करून घेतलं. 
आधी एक मजली असणारे घर ८४ च्या आसपास दुमजली करण्यात आले. युसुफभाई कंत्राटदार आणि डिसोजा वास्तुतज्ञ अशी जोडगोळी होती. खालच्या घराची जशी संरचना होती तशीच वरच्या मजल्याची सुद्धा ठेवण्यात आली. ह्या वर्षांतच केव्हातरी घरी पाण्याची मोटार बसविण्यात आली. वरच्या मजल्याचे काम सुरु असताना तिथल्या कच्च्या भितींना दररोज पाण्याने भिजविण्याचे काम मोठी मंडळी उत्साहाने करीत. आपली ह्या कामात मदत होतेय की अडथळा ह्याची चिंता न करता आम्ही सदभावनेने त्यात सहभागी होत असू. ह्या मजल्याचा स्लॅब जेव्हा टाकण्यात आला तेव्हा आम्हां बच्चे मंडळींना मोठे अप्रूप वाटलं. हा स्लॅब कसंही करून एका दिवसात / एका फटक्यात पूर्ण झाला पाहिजे हा महत्वाचा घटक होता. मिक्सरमधून वेगाने निर्माण होणार कॉंक्रीटआणि त्याहून अधिक वेगाने ते वरती चढवायचा प्रयत्न करणारी कामगार मंडळी हे चित्र पाहून मी धन्य झालो होतो. हा स्लॅब यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर सायंकाळी युसुफभाईच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे भाव अजूनही मला आठवतात. 

१९८० साली एक मोठे सूर्यग्रहण झालं होतं. त्यावेळी घरातील सर्व मंडळी सर्व दारं खिडक्या बंद करून घरात बसली होती. पण आमची अनिता दिदी बऱ्यापैकी बंडखोर होती. ती काहीतरी निमित्त काढून घराबाहेर पडली आणि मग घरातील सर्व मोठ्या मंडळींचा संताप झाला होता. 
१९८२ साली एकदा मुंबई पोलिसांनी बंड केले होते आणि त्या संबंधित कारणांमुळे माझ्या वडिलांना रात्रभर ऑफिसात थांबावे लागलं. परंतु त्याकाळी हा संदेश घरी पाठविण्याची सोय नसल्याने घरची मंडळी मात्र रात्रभर चिंतेत राहिली. मी लहान असलो तरी मलाही मोठी चिंता लागून राहिली आणि झोपही आली नाही. सकाळी शाळा होती आणि परीक्षाही होती. शाळेत निघायच्या आधी भाई घरी परतले आणि मग माझा जीव भांड्यात पडला. 
असंच एकदा पावसाळ्यात गल्लीतलं चिंचेचे मोठे झाड विजेच्या तारांवर पडून पूर्ण गल्लीतील विद्युतपुरवठा दोन तीन दिवस खंडित झाला. विहिरीतून पाणी काढून घरात भरणे वगैरे प्रकार करून सर्वांचाच जीव मेटाकुटीला आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांनी शेवटी जेव्हा तीन चार दिवसांनी हा विद्युत पुरवठा पूर्ववत केला तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 
मला लहानपणी पेपर वाचण्याचा मोठा छंद जडला होता. आंघोळ वगैरे करून मी अंगणात पेपरवाल्याची वाट पाहत थांबे. आता नक्की आठवत नाही पण बहुदा त्यावेळी शुजा नावाचे कार्टून रविवारच्या लोकसत्तेत येई. ते मला भारी आवडे. १९८० सालचे ऑलिम्पिक सुद्धा मला काहीसं आठवत. भारताने ह्यात सलामीच्या हॉकीच्या सामन्यात टांझानियाचा १८ -० असा दणदणीत पराभव केला होता. अंतिम सामन्यात भारताने स्पेनचा ४-३ असा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. ह्या सामन्याचे धावतं वर्णन मी घरच्या रेडियोवर ऐकलं होतं. नंतर कधीतरी हे ऑलिम्पिक शीतयुद्धाच्या कालावधीत मॉस्कोत झाल्याने त्यावर अनेक देशांनी बहिष्कार टाकला होता हे मला समजलं तेव्हा मला काहीसं वाईट वाटलं. हा वॉल्वचा रेडियो अधून मधून बिघडे मग जॉनी अंकलना पाचारण केले जाई आणि मग ते आपल्या सवडीने हा दुरुस्त करीत. माझ्या आठवणीत त्यांनी हा रेडियो सात आठ वेळा तरी दुरुस्त केला असावा. हा रेडियो चालू स्थितीत असला की भाई न चुकता सकाळी सहा वाजताची मंगल प्रभात आणि रात्रीचा १० वाजताच छायागीत हे कार्यक्रम लावतं. सहा वाजता अडीच अडीच मिनिटाच्या हिंदी आणि इंग्लिश बातम्या झाल्या की मग सुंदर मराठी गाणी लागत. ह्यात भीमसेन जोशी ह्यांचं "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी" हे खास प्रिय होतं. सहा पस्तीस झाले की मग एक हिंदी गाणं लागून मग ह्या कार्यक्रमाची सांगता होई. ही हिंदी गाणी - "हम होंगे कामयाब" "हर बस्तिका रहनेवाला हमको प्यारा है!" वगैरे असत.
१९८१ च्या साली आमच्या घरी दूरदर्शन संच आला. त्याआधी आम्ही सामने बघायला दामूतात्या यांच्या घरी वगैरे जायचो. नंतर मग जुन्या घरच्याच बंधूनी १९८४ -८५ साली रंगीत दूरदर्शन संच आणला. भारतात रंगीत दूरदर्शन संच इंदिरा गांधी ह्यांनी १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आणला. ह्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी भाई, आई, सुपितताई, बंधू आणि मी महामंडळाच्या सहलीला गेलो. ह्यात कर्नाळा अभयारण्य, महाबळेश्वर, गोवा आणि गणपतीपुळे वगैरे ठिकाणांचा समावेश होता. ही सहल एसटी बसने जायची आणि अजूनही जाते. स्वयंपाकी लोक बस मध्येच असत. ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं की मग ते स्वयंपाकाला लागत. रात्री झोपायला काही ठिकाणी मोठा हॉल असे त्यात सर्व मंडळी झोपत. आमच्याच कुटुंबातील सुभाषबंधू ह्यांच्याकडे आयोजनाची जबाबदारी होती. त्यांनी गणपतीपुळेला हॉटेलमध्ये आम्हांला चांगली रूम दिली. तिथे पौर्णिमेची रात्र होती आणि रात्री वीज गेली होती. त्यामुळे बाहेर समुद्रकिनारी अगदी मनोरम दृश्य होते. मी पेपर वाचत ह्या आशियाई खेळांशी संपर्क ठेवून होतो. सहलीवरून परत आल्यावर मग बाकीचे सर्व सामने पाहिले. गीता झुत्शीला रौप्य पदक मिळाले आणि भारताचा पाकिस्तानने ७-१ पराभव केला ते ही पाहिलं. ते मनाला खूप लागून राहिलं. तरी एकंदरीत १३ सुवर्ण मिळवून भारताने चांगली कामगिरी केली. 
त्याकाळी लग्नाला जायचं म्हणजे बरीच मजा वाटायची. रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास मध्ये सरबत, शेव आणि लाडू असे पदार्थ आदल्या दिवशी खायला मिळत. डॉन चित्रपटातील जिसका मुझे था इंतजार हे गाणं बऱ्याच लग्नाच्या आदल्या दिवशी ऐकल्याचे आठवते. 
(क्रमशः)

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

भेटीगाठी!!


 
गेले काही दिवस वसईत बराच मुक्काम होता. आधी लग्नानिमित्त आणि मग सुट्टी मिळाली म्हणून. ह्या कालावधीत वसईत खूप माणसं भेटतात. अगदी लहाणपणापासून ओळखीतली ते नव्याने ओळख झालेली. थोडी फुरसत असल्याने माणसं मनमोकळेपणाने बोलण्याची शक्यता जास्त असते. 
जुन्या ओळखीतले लोक भेटतात. मन भूतकाळात जातं. गप्पांचा ओघ जुन्या आठवणीकडे जातो. कधी दोघांनाही ह्या आठवणी हव्याहव्याशा वाटतात, तर कधी एकालाच! काही माणसं जगतात वर्तमानकाळात पण मनाने भूतकाळात अडकून बसलेली असतात. काहीजण भूतकाळाला  फक्त फुरसतीच्या क्षणी आठवू शकण्याची क्षमता बाळगून असतात. काहीजणांना भूतकाळातील फक्त चांगले क्षण आठवतात तर काहींना भूतकाळातील कटू स्मृती कायम छळत राहतात. 
चौधरीबाई आणि त्यांच्या यजमानांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जवळच्या नातेवाईकांना आणि आम्हां शेजाऱ्यांना एका सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. हे दोघं अगदी साधेपणाने आयुष्य जगले.   त्यांचा कुटुंबीय असलेल्या रॉबर्ट ह्याने अस्खलित मराठीत सुंदर भाषण केलं. हे जोडपं अगदी साधेपणाने आयुष्य जगलं, त्यांनी मोठा बंगला वगैरे उभारला नसेल, महागड्या गाड्या विकत घेतल्या नसतील पण एक साधं सुधं सार्थक जीवन जगलं. बाई जेव्हा बाजारातून काही भाजी वगैरे घेऊन यायच्या किंबहुना अजूनही येतात तेव्हा त्यांचे यजमान तात्काळ पुढे येतात. पिशवी घेतात; घरकामात त्यांना अजूनही मदत करतात. चौधरीबाई काहीशा भावनाविवश झाल्या होत्या. त्यांचं मन भूतकाळात गेलं. मुलांना सांभाळायचा प्रश्न तेव्हाही यायचा. काही काळ आईकडे तामतलावला शाळेत सोडून यायची वेळ आली. त्याकाळी बस रिक्षा सहजासहजी मिळत नसल्याने संध्याकाळी त्या लहान मुलीला घेऊन सुमारे दीड किलोमीटर अंतर चालत यावे लागत असे. पुढे चुलतदिरांनी सुद्धा लहान मुली सांभाळायला मदत केली. 
ह्याच दिवशी (२७ डिसेंबर १९६४) रोजी चौधरी बाईंच्या यजमानांच्या बहिणीचा सुद्धा विवाह झाला होता. त्या दांपत्याला  सुद्धा व्यासपीठावर बोलावून शुभेच्छा देण्यात आल्या. एकाच दिवशी बहीण भावांची लग्न लावायची जबाबदारी त्यांच्या पालकांनी पेलली. ही पद्धत अजूनही कधी कधी पाहायला मिळते. काही लोक ह्या पद्धतीविषयी साशंक असतात. त्यांनी ह्या दोन दीर्घकाळ विवाहबंधनात बद्ध असलेल्या जोडप्यांकडे पाहून निशंक व्हावे असे एक वक्ता म्हणाला. दोन तीन वक्त्यांनी हल्लीच्या काळात विवाहसंस्था कठीण काळातून जात असताना ह्या जोडप्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे वक्तव्य केले. 
राहून राहून असंच  वाटत गेलं - स्वयंप्रगतीचा ध्यास आणि शांत जीवन ह्या दोन रेषा कधी एकत्र जाऊ शकत नाहीत. कोण्या एकाचा त्याग पती पत्नीतील एकाला किंवा दोघांना करावा लागतोच. ती गोष्ट कोणती आणि त्याग कोणी करायचा ह्याविषयी नवराबायकोचं एकमत व्हावं लागत. पूर्वी हे विचार न करता होत असे कारण पर्याय कमी होते. आता मात्र परिस्थिती कठीण आहे. 
सुट्टीनिम्मित परदेशाहून आलेली मंडळी जसजशी सुट्टी संपू लागली तशी खिन्न होत गेली. आमच्या गल्लीत काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली. आमच्या एक शेजारी, ज्या अगदी चांगल्या हिंडत्या फिरत्या होत्या, त्यांना सुमारे सहा महिन्यापूर्वी एका असाध्य आजाराचे (बहुदा ALS) निदान झाले. दोन्ही मुले, जावई परदेशात! दोन्ही मुले अगदी प्रेमळ! त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केला.शक्य असतील तितके उपचार केले, पैशाकडे पाहिलं नाही. पण ईश्वराच्या मनात मात्र वेगळंच होतं. काही दिवसांपूर्वी ह्या बाई देवाघरी गेल्या. अंकल एकटेच राहिले. त्यांना सोडून परदेशी जाताना मुलांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील ह्याची कल्पनासुद्धा करवत नाही. 
बहिण निऊ तीन वर्षे अमेरिकेत राहून तीन आठवड्याच्या सुट्टीवर आली होती. तिचीही सुट्टी जशी संपायला आली तशी तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसू लागली. ज्या सुट्टीची इतक्या आतुरतेने वाट पाहिली ती इतक्या झटकन संपून जाईल ह्याची कल्पना केली नव्हती. शर्व आणि निरंजना सुद्धा मजेत होते. तीन वर्षांच्या मधल्या कालावधीत त्यांच्यात फारसा काही फरक पडलेला वाटला नाही. म्हणजे त्यांचा भारतीयपणा बऱ्यापैकी शाबूत आहे. निऊ आणि निशांकला ह्याचे श्रेय द्यायला हवं. शर्वला तर अमेरिकन असेंटमध्ये त्याच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न फारसा भावला नाही. मी अमेरिकेत राहिलो तरी मला मराठी समजतं असं सांगून त्याने माझी आणि स्वतःची सुद्धा सुटका केली. 
सुश्रुत दोन वर्षांनी न्यूझीलंड वरून आला. त्याने स्वरूपदादाच्या लग्नात खूप काम केलं. त्याची सुट्टी सुद्धा संपत आली. काहीसा हिरमुसला झाला तो! भारतात मनासारखी नोकरी मिळाली तर पुढे कधीतरी परत येईन असे म्हणाला. जबाबदारी त्याच्या चेहऱ्यावर, बोलण्यात जाणवत राहिली.

अजून काही लोक भेटत राहिले. काहींना आयुष्याने समृद्धी दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समृद्धी उठून दिसत होती. काहींना आयुष्याने कष्ट दिले होते. तरीही हे लोक आयुष्यात जमेल तसा आनंद शोधत होते. पैसा आणि आनंद एकत्र नांदायला हवेत असं नाहीच. 


काही दिवस देवपूजेची जबाबदारी माझ्यावर पडली. पडली म्हणण्यापेक्षा मी आनंदाने घेतली. आजीने कधी लहान असताना पूजा कशी करायची हे दाखवलं होतं. त्यातलं किती लक्षात आहे हे माहित नाही. आता स्वतःच्या समजुतीनुसार पूजा करतो. 
बंबाच्या गरमागरम पाण्याने आंघोळीस मजा आली. आंघोळ संपवू नये असेच वाटायचे. सकाळी लवकर आंघोळ आटोपल्यावर दिवस कसा मोठा वाटतो. उत्साहाने भारून गेल्यावर क्षणनक्षण पुरेपूर चांगल्या कार्यात घालवावासा वाटतो. 

ताम्हाणात दुधसाखरेच्या नैवेद्याची वाटी, सोबत अभिषेक केलेल्या देवांना कोरडे करण्यासाठी घेतलेल कापड आणि अंगणातल्या फुलांची परडी. अंगणात जास्वंदाची तीन चार रंगांची झाड आहेत. पावसाळ्यात ती अगदी फुलांनी बहरून जातात. पावसाळ्यातील जमिनीचा ओलावा आता संपत आला आहे. त्यामुळे ह्या झाडांची फुले ओसरू लागली आहेत. आता वडील ह्या झाडांना पाणी द्यायला सुरु करतील. तर ह्या जास्वंदाची लाल, भगवी, पिवळसर फुले आणि टगर आणि अजून एक दोन झाडांची पांढरी फुले अंगणात सकाळी फुलतात. त्यांनी परडी तशी भरते. मग ताम्हाण, फुलांनी भरलेली परडी घेऊन पूजेला लागायचं. वर म्हटल्याप्रमाणे मी केलेली पूजा शास्त्रोक्त नसते. पण भावना महत्वाची! आजीने बऱ्याच देवांच्या मूर्ती देव्हाऱ्यात मांडल्या होत्या. काळानुसार थोडा त्यात बदल झाला पण बहुतांशी ठेवण तशीच आहे. ह्या सर्व देवांना क्रमाक्रमाने ताम्हाणात घ्यायचं, त्यांना अभिषेक घालायचा, कपड्याने (ह्याला एक चांगला शब्द आहे जो आता आठवत नाही) त्यांना कोरडं करायचं आणि मग त्यांच्या जागी पुन्हा त्यांची मांडणी करायची. मग सहाणेवर चंदन घासून त्यांना गंध लावायचा, कुंकू लावायचं. दुध साखरेचा नेवैद्य दाखवायचा. देवाला दिवा, अगरबत्ती लावायचं. मग तांब्यातल उरलेलं पाणी मागच्या दारी असलेल्या तुळशीला घालायचं. ते जास्तच उरलं असेल तर मग विहिरीत सोडून द्यायचं.  पूजा करत असताना खरं तर विशिष्ट स्तोत्र वगैरे म्हणायला हवं. माझी मर्यादा मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्रच्या पलीकडे जात नसल्याने आलटून पालटून त्यांच्या सहाय्याने पूजा आटोपायची. शाळेत असताना पारनाक्यावरील कॉंग्रेस भवनात किंवा अजून एका हॉलवर सार्वजनिक गणपतीच्या वेळी पठण स्पर्धा होत. त्यावेळी मारुतीस्तोत्र पठनाची स्पर्धा असे. त्यात मला बहुदा उतेजनार्थ बक्षीस मिळे आणि दोन रुपये मिळत. त्या निमित्ताने मारुतीस्तोत्र पाठ झालं ते झालं! 

पावसाळ्यात अंगणाच्या एका कोपऱ्यात दुर्वानी बराच प्रसार केला होता. पावसाच्या पाण्यावर त्या मस्त भरारून आल्या होत्या. मोठीआई सकाळी उठून त्यातील मोजक्या देवपूजेला घेऊन जायची. जमिनीतला ओलावा संपला आणि दुर्वांची सुकलेली पानं दिसू लागली. त्या भागातली दुर्वांची मुळं मरू लागली. दोन दिवस त्यांना पाणी देऊन जगवायचा मी प्रयत्न केला. पुढे पण टिकली तर किती बरं होईल! अंगणातलं प्राजक्ताचं झाड अजून हिरवंच आहे पण बहर मात्र थोडा कमी झाला आहे.

होळीवर भाजीसाठी अनेक फेऱ्या झाल्या. बहुतेक सर्व भाजीवाल्या भाजीच्या दर्जाविषयी अगदी स्पष्ट सांगतात. ह्या मोसमातील होळीवरची भाजी अगदी मन प्रसन्न करून टाकते. मुळा, माठ, तांदूळका, लाल माठ, पालक, खापरा, लहान मेथी, मोठी मेथी - पालेभाजीचेच अनेक प्रकार! ह्या काळात अल्कोल आणि नवलकोल अशा दोन प्रकारची सुद्धा भाजी येते. थोडंस कळायला लागल्यापासून अल्कोल आणि अल्कोहोलचा काहीतरी संबंध असावा असा मला दाट संशय होता. कोथिंबीरसुद्धा मस्त दिसत होती. तिच्या हिरव्यागार रंगावर खुश होत चांगल्या दोन जुड्या घेतल्या. घरी काय होईल ह्याची पर्वा न करता! दुधी तर अगदी कोवळा मिळाला. पडवळ, वाल वांगी, फरसबी, भेंडी, पापडी, सिमला मिरची, पातीचा कांदा ह्यांनी समग्र पिशव्या काठोकाठ भरल्या. पण सफेद वेलचीची केळी, संत्र, डाळिंब, सफरचंद ह्यांना जागा तर करावीच लागली. कांदे बटाटे सुद्धा अगदी मस्त होते. ओला कांदा मस्त लाल दिसत होता. हा चांगला दिसतोय, तो पण चांगला दिसतोय असं करता करता चांगले दोन किलो झाले. पस्तीस रुपये किलोचा भाव देताना शरद पवार आठवले! कांदे बटाट्यांना स्कूटरच्या पोटात बसवले. त्या नाजूक स्कूटरवर मी आणि समग्र भाजीचे प्रतिनिधित्व घेऊन कसाबसा घरी आलो. 
दुसऱ्या एका दिवशी मासळीमार्केटला गेलो. पापलेटचे भाव अगदी आकाशाला भिडलेले होते. ३ पापलेट म्हणे २००० रुपये. त्यांनी सांगितलेल्या भावाचा थेट अर्धा भाव सांगायचा हा प्राजक्ताने सांगितलेला नियम आचरणात आणण्याचे धारिष्ट झाले नाही. पैसा उगाच खर्च नाही करायचा. मग मोर्चा कोलंबी, बोंबील आणि गोळीचं खारं ह्याच्याकडे वळवलं. गोळीचं खारं अगदी मस्त मिळालं. तिने थोडं महागच दिलं पण ताजेपणा अगदी भरभरून दिसत होता. तिला जरा चिडवायला "पण नक्की ताजं आहे ना?" असे मी पैसे देता देता शुद्ध मराठीत विचारलं. "आ, मी दररोज इथे बसे नयं? असे तिने गुश्श्यातच प्रत्त्युत्तर दिलं. मोठ्या कोलंबीचा सहाशेचा वाटा असा भाव सांगितल्यावर मी छोट्या कोलंबीकडे मोर्चा वळवला. ती कोळीण बिचारी चाळीस चाळीस असे दोन वाटे द्यायला तयार झाली. सोलून देशील का? असे मी फारशी अपेक्षा न ठेवता विचारलं. आणि ती तयार सुद्धा झाली. दहा मिनिटात तिने कोलंबी सोलून दिल्यावर मी शंभरची नोट तिच्या हाती सोपवल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
वसईच्या कला क्रीडा महोत्सवाचे पंचविसावे वर्ष! तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर नक्की ह्या प्रदर्शनाला भेट द्या! दरवर्षी २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ह्या कालावधीत हे प्रदर्शन भरतं. वसई विरार परिसरातील विविध शाळा नृत्य, गायन, सुगम संगीत, छायाचित्रण, क्रीडास्पर्धांत भाग घेतात. धावण्याच्या, कबड्डी, खोखोच्या, बॉक्सिंगच्या स्पर्धा होतात. रांगोळी विभाग तर अप्रतिमच! बाकी मग शरीरसौष्ठव, मिस वसई,  पर्सनॅलिटी स्पर्धा सुद्धा होतात. ह्या स्पर्धेच्या आयोजनात काम करणाऱ्या आणि कधीही व्यासपीठावर येऊ न शकलेल्या कार्यकर्त्यांना मनापासून सलाम! ह्या महोत्सवात उतेकर फिशरी ह्यांनी मस्त्य आणि पक्षीप्रदर्शनाचा जो विभाग मांडला आहे तो केवळ अप्रतिम! डोळ्याचे पारणे फेडून टाकणारा! असंच एक साधं घर असावं आणि त्यात असा एक फिश टैंक असावा. त्यातल्या त्या माशांच्या हालचालीकडे आणि त्या दगडांवरील धावणाऱ्या सूक्ष्म रेषांकडे तासंतास पाहत राहावं. मन भरून जायला इतकंस पुरेसं आहे ना! पक्षीप्रदर्शनात अगदी इवलेसे पक्षी होते. हे हिमालयातील दुर्मिळ पक्षी असावेत अशी माहिती तज्ञ प्राजक्ता ह्यांनी पुरवली. दुसऱ्या क्षणाला मी हिमालयातील ऋषी बनून गुहेत बसलो होतो आणि हे पक्षी माझ्या गुहेसमोरील आकाशाला भिडणाऱ्या सूचीपर्णी वृक्षावर विहार करीत होते. 
वसईच्या थंडीत अशा मस्त संध्याकाळी वडा पाव वगैरे खाण्याच्या आमच्या इच्छेवर आम्ही आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला. मैदानाच्या एका कोपऱ्यात मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लागले होते. त्यातील वाडवळ स्टॉवर जाऊन वधडी ह्या खास वसई पदार्थाची एक डिश घेतली. 
सुट्टी संपत आली होती. अगदी लहानपणापासून ज्या वातावरणात दिवस घालवले तिथेच पुन्हा जवळजवळ दोन आठवडे होतो. ऑफिससुद्धा नशिबाने शांत होते. अशाच वातावरणात कायम राहावं असा विचार अनेकदा मनात येऊनसुद्धा गेला. पण कर्तव्य बोलावत होतं. अमेरिकेतील माझ्या कंपनीच्या कार्डची जबाबदारी जणू काही मीच माझ्या खांद्यावर घेतली होती. सोमवार सकाळी कार काढली आणि बोरीवलीला परतलो. 
२०१४ खरंतर येत्या दोन तासात संपेल पण माझ्यासाठी ते रविवारी रात्रीच वसई मैदानावरून परतताना संपलं होतं. 
आपणा सर्वांना २०१५ आरोग्यपूर्ण आणि सुखासमृद्धीच जावो ही शुभेच्छा!

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

रम्य ते बालपण - २


 
 अण्णांना कुत्रे बाळगायचा म्हटला तर तसा शौक होता आणि म्हटली तर ती गरजसुद्धा होती. चार्ली - ब्राऊनी ही जोडी, मोती हा कुत्रा आणि राणी ही भयंकर आक्रमक कुत्री ही अण्णांनी बाळगलेल्या श्वान मंडळीतील काही उल्लेखनीय नावे! गल्लीत चार्ली - ब्राऊनीचा दरारा होता. अंगणातून मंडळी विचारत, "अहो, कुत्र्यांना बांधलं आहे का?" आणि मगच अंगणात शिरायची हिंमत दाखवीत. अण्णा बऱ्याच वेळा मसूरवाडीत शिपायला जात. मागच्या पोस्टमध्ये दाखविलेल्या विहिरीवर पाण्याची मोटार होती. उन्हाळ्यात ह्या विहिरीचे पाणी खूप खाली जाई. ह्या विहिरीच्या पाण्यावर पाटील कुटुंबाच्या अनेक वाड्यांचे सिंचन अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाचा नंबर लावला जाई. सायंकाळी अगदी काठाला गेलेली विहीरीतील पाण्याची पातळी सकाळपर्यंत तिच्यातील झऱ्यांनी बऱ्यापैकी 
वर आणून ठेवलेली असे. आणि त्यात अजून विद्युतपुरवठ्याची अनिश्चितता भर घालत असे. त्यामुळे अण्णा भल्या पहाटे उठून वाडीत शिपायला जात. अशा अगदी सकाळच्या वेळी अंधारात चार्ली - ब्राऊनीची जोडगोळी अण्णांना साथ देई. वाडीत सापांचे स्थानिक प्रकार जसे की अदिलवट, दिवड वगैरे निघत. ह्या दोघांना अशा जनावरांचा लगेचच सुगावा लागे आणि मग भुंकून - भुंकून ते अशा उपद्रवी प्राण्यांना बेजार करीत आणि निघून जायला परावृत्त करीत. एकदा का वाडीत पोहोचले की ही जोडगोळी मोक्याची जागा पकडून बसून राहत. आणि अण्णांची चाहूल घेत राहत. अण्णांचे काम आटपल की "चला रे!" अशी साद घातली की ही मंडळी तडक उठून घरचा रस्ता पकडीत. ते पुढे आणि अण्णा मागे असा प्रवास चालू राही. मी लहान असताना मी सुद्धा अण्णांबरोबर वाडीत जाई. हा वाडीचा रस्ता अगदी घनदाट झाडीने व्यापलेला असे. त्यात पिवळे वेल झाडांवरून लटकत असत. ह्या वेलांमध्ये पाचपावली नावाचं खतरनाक जनावर वास्तव्य करून असतं असे भय आम्हांला दाखविण्यात येत असे. हे जनावर थेट मेंदूचा वेध घेते आणि त्यानंतर माणूस पाच पावलं टाकताच मरून जातो असे आमचे खट्याळ मोठे मित्र आम्हांला सांगत असत.आमच्या शाळेतून परत यायच्या दोन तीन रस्त्यांपैकी एक हा मसूरवाडीतून असायचा. त्यामुळे कधीकाळी ह्या रस्त्याने एकटं यायची वेळ आली की मग ह्या पाचपावलीच्या भयाने थरकाप उडे. 

पहिलीची शाळा व्यवस्थित चालू होती. रोहिणी चौधरी बाई ह्या आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका होत्या. शालेय जीवनातील आमच्या त्या आवडत्या बाई होत. बालवाडीत एकत्र असलेले राकेश आणि निलेश राऊत ह्या राऊतबंधूंना पहिल्या इयत्तेत वेगळ्या तुकडीत जावे लागल्यामुळे त्यांच्या निरागस मनांवर फार मोठा आघात झाला. पहिलीत जमिनीवरील बैठी बाके आणि सतरंजी अशी आमची बैठक व्यवस्था असे. वर्षात एकंदरीत चार परीक्षा असत, दोन घटक चाचण्या, सहामाही आणि वार्षिक परीक्षा. बाकी पहिलीचा अभ्यासक्रम वगैरे काही लक्षात नाही. पहिलीत असलेली स्मरणशक्ती स्पर्धा मात्र आठवते. एका खोलीत १० वस्तू ठेवल्या होत्या. आम्हा सर्व मुलांना तिथे नेवून  २ मिनटे त्या वस्तू दाखवण्यात आल्या आणि मग परत येवून त्या वस्तूंची नावे लिहिण्यास सांगण्यात आली.

आमचे क्रिकेट वेड पहिलीपासून होते. शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शिक्षक वसाहतीतील पिंगळे सरांच्या दिवाणखान्यातील दूरदर्शन संच आम्ही बाहेरून पाहत असू. त्यावेळी आलेला इंग्लंडचा संघ अजून लक्षात आहे. त्यावेळी थम्स अपच्या बाटल्यांच्या झाकणात चित्र मिळत आणि ह्या चित्रांचा एक समूह गोळा केल्यास एक छोटी पुस्तिका मिळे. अशा एका पुस्तिकेत असणारी कपिल देवची असंख्य चित्रे भराभर चाळल्यास तयार होणारी गोलंदाजीची लयबद्ध धाव अजून लक्षात आहे. वर्गातील बहुसंख्य मुले वसई गावातीलच असल्यामुळे त्या सर्वांचे पालकही एकमेकांचे ओळखीचे असत. बालवाडीतील एक दुःखद प्रसंग म्हणजे वर्गशिक्षिका न येण्याचा दिवस. त्या दिवशी पूर्ण वर्ग फोडला जावून बाकीच्या तुकड्यांमध्ये तो विभागला जाई. मधल्या सुट्टीत हे सर्व बिछाडलेले जीव एकत्र येण्याचा क्षण फारच हृदयस्पर्शी असे!

दुसऱ्या इयत्तेत बऱ्याच काळापर्यंत आम्हाला वर्गशिक्षिका नसल्याने आम्ही वर्ग फोडण्याच्या दुर्धर प्रसंगास बराच काळ सामोरे गेलो. काही काळानंतर कुंदा बाई ह्या वर्गशिक्षिका म्हणून आल्या. उंच वैद्य बाई आम्हाला विज्ञान शिकवीत. त्यांनी शिकवलेली वाऱ्याची 'हलत्या हवेला वारा म्हणतात' ही व्याख्या अजूनही माझ्या ध्यानी राहिली आहे. त्याच प्रमाणे विरारच्या चोरघे बाई आणि छबीला बाई ह्या आम्हास शिकविण्यास होत्या. त्यावेळची मुले चळवळी असत, वर्गात, पटांगणात, मैदानात नियमितपणे पडत. पडल्यावर त्यांना जखमा होत आणि अशा वेळी बेबीताई धावून येई आणि मग ते प्रसिद्ध लाल औषध जखमेवर लावले जाई. बहुतांशी जखमा ह्या औषधापुढे माघार घेत. शाळेच्या शिक्षकांसाठी एक कठीण प्रसंग म्हणजे शाळा तपासणी अर्थात इन्स्पेक्शन! मुलांच्या कामगिरीवर शिक्षकांचे भवितव्य ठरत असे. अशाच एका शाळा तपासणीच्या प्रसंगी आमच्या वर्गातील एका मुलास केवळ प्रसंगाच्या दडपणामुळे सीता कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

गल्लीत आमचे क्रिकेट अगदी जोरात चालू होते. आमचा एक पूर्ण संघच होता. मी, बंधू, स्टीफन, विजय ही लेमॉस बंधुची जोडी, वेंझील, ह्युबर्ट, लॉइड, रॉलस्टन हे लोपीस बंधू, नितीन (बाळ्या), बिट्ट्या हे देखमुख बंधू, नेपोलियन आणि एस्टानि ही अजुन एक बंधुची जोड़ी, दर्शन हटकर, नेल्सन, डेनिस घोन्सालवीस, अमोल, रोबर्ट, झेवियर (जेवी), ख्रिस्तोफर (किरी) हे चौधरी कुटुंबीय असा मोठा समूह होता. मे महिन्यात सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी चार ते सहा अशी खेळाची दोन सत्रे होत.

हे सर्वजण विविध वयोगटातील होते. किरी हा वसईत ठिकठिकाणी टेनिस सामन्यात कप्तान असे. त्यामुळे गल्लीत खेळताना तो बऱ्याच अधिकारवाणीने सर्वांना ओरडे. विजय, जेवी आणि बंधू हे आमचे वेगवान गोलंदाज. त्यातील पहिल्या दोघांना किरी त्यांच्या गोलंदाजीच्या टप्प्याविषयी आणि दिशेविषयी सतत ओरडत असे.

सायंकाळी शाळेतून येतानाचा रस्ता प्रामुख्याने ख्रिश्चन वस्तीतून येत असे. पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता बऱ्याच वेळा पाण्याने भरलेला असे. ख्रिश्चन लोक त्यावेळी सायंकाळी आंघोळ करत. त्यामुळे त्यांच्या पाण्याच्या चुली पेटलेल्या असत. त्यांच्या अंगणात धूर पसरलेला असे. अशा वातावरणात घरी परतायला मजा येई. 



ह्या मागच्या रस्त्याला बिदीचा रस्ता असेही संबोधिल जाई. ह्या रस्त्याच्या कडेला गावातील विविध बावखल वसई खाडीला जोडणारे ओहोळ वाहतात. शाळेतील मुले शाळा सुटल्यावर किंवा बऱ्याच वेळा शाळेतील तासांना दांडी मारून ह्या ओहोळातील मासे पकडण्याचा उद्योग करीत.

क्रिकेट खेळताना गल्लीतील आमच्या गटात एकमेकांना प्रेमाने संबोधिले जाई. एखादा खेळाडू वेडावाकडा फटका मारून बाद झाला कि त्याचा कप्तान त्याची बरीच निंदानालस्ती करे. "ह्यो खकाटलाय" किंवा "ह्यो इस्टावलाय" असे ठेवणीतले शब्द काढले जात. ह्या शब्दप्रयोगात संबोधल जाणारं मुख्य पात्र हे "नाळ" (नारळ ह्या शब्दाचा अपभ्रंश) आहे हे ह्यातील मुख्य गृहीतक असे.

पूर्वी आमच्याकडे खेळायचे चेंडू फार नसायचे. त्यामुळे झाडात वगैरे चेंडू हरवला की सर्व मंडळी जीवाचा आटापिटा करून हा चेंडू शोधायला जात. ह्यात अमोल उगाचच "मी आला!" असं "मिळाला" ह्या शब्दाशी नाद साधर्म्य असणारं वाक्य बोलून सर्वांचा रोष ओढवून घेई.



ख्रिश्चन लोक पूर्वी घराच्या भोवती डुक्कर पाळीत. एखादा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला की मग तीन चार वर्षाआधीच असा डुक्कर पाळायला आणून ठेवला जाई. आणि मग त्याला चांगला आहार देऊन धष्टपुष्ट केला जाई. ही डुक्कर लग्नाच्या आदल्या दिवशी शहीद होत असत. त्यांच्या तेलात वडे तळले जात. आदल्या दिवशीचा हा कार्यक्रम बराच रंगे. जवळच्या नातेवाईक स्त्रिया येउन ह्या वडे तळण्याच्या कार्यक्रमात भाग घेत. आणि पारंपारिक गाणी गात. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चाले.
परंतु डुकराचे मांस तब्येतीला चांगले नाही असे डॉक्टर लोकांनी सांगितल्याने ह्या प्रथेचे हल्ली  प्रमाण कमी झाले आहे. तरीही रात्रीची गाणी आणि नाच अजून चालू आहेत. ह्या गाण्यांना असलेली सुरेख लय आणि पारंपारिक जोड वातावरणात अगदी उत्साह निर्माण करतात. 
पूर्वीच्या काळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे माणसाचं वृक्षांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं! अंगणात आणि वाडीत माझेही असे अनेक सुहृद होते. 
पांगारा 
आमच्या अंगणात असलेल्या पांगाऱ्याच्या झाडावरची आधीची पोस्ट पुन्हा एकदा इथे!
वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!

पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे?


सुबाभुळ 
अण्णांची धाकटी मुलगी सुनितामाई. तिचा ८४ साली सुप्रसिद्ध कृषीतज्ञ जयंतराव पाटील ह्यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रदीप पाटील ह्यांच्याशी विवाह झाला. जयंतराव पाटील हे कृषी विषयावर बरंच लिखाण करीत. त्यांच्या अशाच एका लेखात सुबाभूळ ह्या वृक्षाविषयी मी वाचलं. त्याचा पाला कसा सकस असतो आणि गुरांसाठी कसा उपयुक्त असतो त्याची वाढ कशी झपाट्याने होते हे सर्व मुद्दे त्यांनी अगदी सुरेखपणे मांडले होते. माझ्या मोठ्या आत्याचा मुलगा शशीभाई ह्याच्याकडे ह्या सुबाभुळाची काही झाडे आहेत असे मला कळलं. मग मी त्याच्याकडे जाऊन त्याच्या काही सुकलेल्या शेंगा आणल्या आणि त्यातील बिया एकत्र लावल्या. काही दिवसांनी त्यातून छोटे रोपे एकदम सर्व अचानक वर आली. मग वाडीच्या एका कोपऱ्यात नेउन मी ते लावले. पाचवी ते सातवी माझी शाळा सकाळची असे. शाळेतून बाराच्या सुमारास परत आल्यावर मी जेवणाआधी मोठ्या श्रद्धेने बादलीतून ह्या झाडांना पाणी देत असे. जयंतरावांनी (दादा) सांगितल्याप्रमाणे ही झाडे अगदी झपाट्याने वाढत होती. दोन महिन्यांनी ह्यातील चार झाडे अगदी फोफावली. एका वर्षानंतर त्यांची उंची चांगली दोन तीन मीटरच्या आसपास झाली. त्यांचा पाला सुद्धा हळूहळू गायींना मिळू लागला होता. पण मग नंतर त्यांना बिया आल्या. एका पावसाळ्यात ह्या सर्व बिया वाडीच्या भागात पडल्या. आणि मग नंतरच्या पावसाळ्यात वाडीच्या त्या भागात सुबाभुळाची असंख्य रोपे फैलावली. ती काढून टाकण्यासाठी खास कामगार लावावे लागले. पुढे ह्या झाडांच्या ह्या बालरोपांचा उपद्रव इतका वाढला की ही चारही झाडे तोडण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हळव्या मनाचा असलेल्या मला ह्याचे खूप दुःख झाले होते. नंतर काही दिवसांनी मी एक झाड अंगणात लावलं. परंतु हे ही झाड झपाट्याने वाढलं आणि एके दिवशी तुलनेने कमकुवत बुंध्याच असलेले हे झाड पावसामुळे गॅलरित कोसळलं, नंतर एकदा विजेच्या तारांवर त्याची फांदी पडली. मग हे ही झाड तोडण्यात आलं. माझ्या मनावर ह्याचे आघात झाल्याने ह्या पुढे आपण ज्यांना वाचवू शकत नाही, त्या सुबाभुळ वृक्षांची लागवड न करण्याचा मी निर्णय घेतला. 
चिंच 
घराच्या दक्षिण सीमेवर चिंचेचे दोन मोठे वृक्ष होते. लहानपणी आमच्या समाजाचे महामंडळ २६ जानेवारीला जानकी चित्रपटगृहात चित्रपट दाखवत असे. मामासाहेब मोहोळ महामंडळाला बहुदा हे चित्रपटगृह विनाशुल्क उपलब्ध करून देत असत. अशाच एका मराठी चित्रपटात "हे चिंचेचे झाड दिसत असे चिनार वृक्षापरी!" हे बहुदा काशिनाथ घाणेकरांवर चित्रित केलेलं गाणं मी पाहिलं होतं. माझ्या माहितीत मराठी चित्रपट संगीतात श्रुंगाररसात वापरलं गेलेलं हे एकमेव झाड असल्याने एकंदरीत चिंचेच्या झाडांविषयी आणि आमच्या दोन झाडांविषयीचा माझा आदर अगदी दुणावला होता. ह्या चिंचेवर आमचे आणि आजीचे बारीक लक्ष असे. कच्च्या चिंचा लागल्या की त्या सगळ्याची नजर चुकवून कधी पाडून
खाता येतील ह्याकडे आम्ही लक्ष ठेवून असायचो तर झाडाला लागलेल्या चिंचेच्या संख्येवरून कंत्राटदाराला हे झाड कितीला देता येईल ह्याचा आजी अंदाज बांधत असायची. सिमेपलीकडे चौधरी कुटुंबाची वाडी होती. ह्या चिंचेच्या झाडांमुळे त्यावर   बरीच सावली पडून त्यात चांगलं उत्पन्न मिळत नसे त्यामुळे त्यांचा थोडा रोष असे.  चिंचा पाडणारा कंत्राटदार आला कि मग थोडीफार भांडणं होत. शेवटी मग एकदा कधीतरी ही डेरेदार चिंचेची झाडेसुद्धा कापून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्यावेळी सर्व कुटुंबियांना खूप दुःख झालं. 

अजून काही झाडांच्या आठवणी पुढच्या भागात! 
ही श्रुंखला आवडली असल्यास नक्की कळवा! जमल्यास ब्लॉगला फॉलो करा :)
(क्रमशः)

रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

रम्य ते बालपण - १



 
बालपण बहुतेक सर्वांना आवडतं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बहुतेकांना हे भावतं. पूर्वी तर हे खूपच सुंदर असायचं. वसईसारख्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि एकत्र कुटुंबात वाढलेल्या माझ्यासारख्याला तर हे खूपच सुंदर वाटायचं. जबाबदाऱ्या बहुदा नसायच्याच आणि असल्या तरी जीवनातल्या जबाबदाऱ्या काय असतात ह्याची जाणीव नसायची. त्यामुळे आयुष्य अगदी सुखाने भरलेलं वाटायचं.
प्रत्येकाला किती वर्षापासूनच्या आठवणी लक्षात राहतात हे नक्की माहित नाही. मलाही चार ते पाच वर्षापासूनच्या काही आठवणी अंधुकशा आठवतात. माझा जन्म १९७२ सालचा, मी जन्मलो त्या वर्षीच फेब्रुवारीत माझे आजोबा श्री. पांडुरंग पाटील निवर्तले. त्यामुळे त्यांच्या सहवासाचं भाग्य काही मला लाभलं नाही. त्यांना चार पुत्र आणि तीन कन्या. माझी आजी ही वसईच्याच घरत कुटुंबातली. तिचं माहेर होळीवर.
माझी धाकटी आत्या वत्सला (हे तिचं माहेरचं नाव!) लग्न वसईच्या घरीच झालं. हे घराच्या हॉलमध्ये लागलं. हे लग्न १९७५ साली झालं. हे लग्न हॉलमध्ये लागताना पाहिल्याचा मला भास होतोय. भास अशासाठी की तीन वर्षाचा असतानाची आठवण लक्षात राहण्याची शक्यता कमीच! बहुदा ह्या लग्नाचे जुने फोटो एकदा पाहून त्यानंतर मला स्वप्न वगैरे पडलं असेल आणि त्यामुळे ही आठवण माझीच असावी असा मला भास होत असावा.

हे घर बांधलं आजोबांनी १९५२ साली! त्यावेळी ते एक मजली होतं. घरात एक मोठा हॉल, चार खोल्या, एक पंगतीची खोली आणि एक स्वयंपाकघर होतं.  मला कळायला लागलं तेव्हा चौघाही भावांची लग्न झाली होती. आणि धाकट्या काकांनी म्हणजे दाजींनी वरती गच्चीवर त्यांच्यासाठी खोली बनवली होती. चार खोल्यातली एक खोली म्हणजे देवाची खोली त्यात देवघर आणि आजीचं वास्तव्य असे. ह्या खोलीत आजीची खाट असे. आजीच्या खाटेखाली काही महत्वाच्या गोष्टींचा साठा असे. 

माझी चुलतबहिण योगिता ही माझ्यापेक्षा आठ महिन्यांनी मोठी, पण शाळेत ती माझ्यापेक्षा एक वर्षे पुढे होती. तिची पहिली चालू असताना मला बालवाडीत टाकण्यात आलं.  बालवाडीचा वर्ग आमच्या शाळेच्या वाचनालयात त्या काळी भरत असे. सुरुवातीला शाळा हा प्रकार मला फारसा आवडत नसे. मी बराच वेळ शाळा सुटायची वाट पाहत असे. अशा वेळी मध्येच माझ्या धाकट्या काकू नंदिनी (दादी) आपल्या सहशिक्षिका मांजरेकर मॅडम बरोबर मला भेट देऊन जात. आणि त्यामुळे माझा मूड चांगला व्हायला मदत होत असे. भेंड्याची भाजी त्याकाळी मला आवडत नसे आणि त्यामुळे ती डब्यात असली की मला खूप कंटाळा येई.
घरी एकत्र कुटुंबात खूप धमाल असे. आजी आपल्या चारही सुनांवर बारीक लक्ष ठेऊन असे. ह्यातील दोन सुना म्हणजे माझी आई आणि दादी ह्या शिक्षिका होत्या, तर मोठी आई आणि प्रतिभाकाकी ह्या पूर्ण वेळ गृहिणींचे काम करीत. एकत्र स्वयंपाक करायचा म्हणजे कसरतीचे काम असे. सकाळी वाडीतला बाजार काढला जाई आणि मोठीआई, काकी बाजार विकायला जात असत. त्यावेळी पानवेलीचा बाजार मोठ्या प्रमाणात काढला जाई. मोठे काका अण्णा (मधुकर पाटील) ह्या पानवेलीचा व्यापार करणाऱ्या सोसायटीचे सभासद होते. ही पान उत्तर भारतात, गुजरातेत विक्रीसाठी जात आणि मग वर्षातून एक दोन वेळा अण्णा ह्या पानाच्या वसुलीसाठी गुजराथेत, उत्तर भारतात ट्रेनने जात. हा त्यांचा दौरा आठ आठ किंवा कधी कधी पंधरा दिवसापर्यंत चाले. त्याकाळात फोनचा वापर फार कमी असल्याने आणि अण्णांकडून पत्र वगैरे लिहिण्याची अपेक्षा बाळगता येत नसल्याने इतके दिवस केवळ फक्त त्यांची वाट बघण्याशिवाय मोठीआईकडे आणि आम्हा सर्वांकडे पर्याय नसे. मग अचानक अण्णा एखाद्या सकाळी परतत. येताना ते बरीच मिठाई वगैरे घेऊन येत असल्याने आम्हां मुलांची खूप मजा होई. पानवेलीची वाडी करणे हा फार कौशल्याचा प्रकार असे. असे म्हणण्याचं कारण की आता आमच्या वाडीतील पानवेली गायब झाल्या आहेत. पानवेलीची वेल बारीक कारवीच्या सहाय्याने उभी केली जात असे. दोन पानवेलीला आधार देणाऱ्या कारवीमध्ये विशिष्ट अंतर ठेवले जाई. ह्या वेलींना थेट सूर्यप्रकाशाचा मारा सहन न होत असल्याने त्या वेलींमध्ये केळी वगैरे लावण्याची प्रथा असे. 
हल्ली एकंदरीत वसईत पानवेली फार दुर्मिळ होत चालल्या आहेत. वसईतील माझे मित्र श्री. संदेश वर्तक ह्यांच्या सौजन्याने मिळालेली पानवेलीची काही छायाचित्रे!





ह्या वेलींची वारंवार खूप काळजी घ्यावी लागते. उंच झालेल्या आणि कारवीपलीकडे पोहोचलेल्या वेलींना खाली आणणे, त्यांच्या नाजूक खोडाला घट्ट कारवीला बांधून ठेवणे, काही काळाने नवीन वेली आणून लावणे असले कौशल्याचे प्रकार करावे लागत. ही कामे कोणी ऐरा गैरा माणूस करू शकत नसे. त्यासाठी कुशल कामगारांचा संघ लागे. ह्या कुशल कामगारांना वसईच्या भाषेत गो असे म्हणत. ह्या गो मंडळींचा खूप मान ठेवावा लागे. त्यांना सकाळी न्याहारीला होळीवरून जिलेबी, बटाटवडे आणि घरचा चहा द्यावा लागे. हा चहा एका मोठ्या तांब्यातून वाडीत पाठवला जाई आणि मग हे गो लोक केळीच्या पानातून (खोल्यातून) हा चहा पीत. ह्या गो लोकांची न्याहारी वाडीत पोहोचविण्यासाठी बहुदा आमची नेमणूक केली जात असे. ह्या वेलीमध्ये अळू, पालेभाज्या ह्यांची लागवड केली जाई. ह्या वेलीत लावलेली माठ भाजी अगदी ताजी आणि मस्त लागे. का कोणास ठाऊक पण ह्या भाजीस सिनेमातील भाजी असे माझे वडील म्हणत. बहुदा अरुण सरनाईक आणि जयश्री गडकरच्या काळातील मराठी चित्रपटात बायको नवऱ्याला भाजी वाढतानाचे जे दृश्य असे त्या भाजीशी त्यांना माठ भाजीचे साधर्म्य वाटत असावे.
ही पाने वाडीत काम करणाऱ्या कामगार स्त्रिया खुडून घरी आणत. मग रात्री जेवण आटपली की महिला वर्ग ती व्यवस्थित जोडून त्याची कातळ करून ठेवायला बसे. पानाचे दोन प्रकार असत, मोडवण आणि बिबला. छोट्या पानांना मोडवण आणि मोठ्या आकाराच्या पानांना बिबला म्हणत! दुसऱ्या दिवसाला ह्या पानाच्या पाटीला काय भाव मिळणार ह्याची उत्सुकता ह्या पाने करणाऱ्या बायांना असे.

आमच्या घराजवळ एक वाडी आहे आणि दुसरी वाडी थोडी दूर आहे. ह्या दूरच्या वाडीला मसूरवाडी असे म्हटलं जातं. ह्या मसूरवाडीतील सिंचनासाठी वापरली जाणारी विहीर गावातील मुलांमध्ये खूप प्रसिद्ध होती. ह्या विहिरीचे हे चित्र!

मे महिन्यात मुले ह्या विहिरीत पोहायला येत. पहिल्या एक दोन दिवशी त्यांच्या पाठीला डबा बांधून त्यांना विहिरीत सोडलं जाई. नंतर मात्र थेट विहिरीच्या वरच्या पायरीवरून त्यांना पाण्यात ढकललं जाई. एकदा का नाका तोंडात पाणी गेलं की पोरगं आपसूकच पोहायला शिके आणि मग नव्या येणाऱ्या मुलांना विहिरीत ढकलायला तयार होई.

आमच्या पाटील कुटुंबाच्या मूळ घराच्या बाजूला मसूरवाडी आहे. ह्या मूळ घराला आम्ही जुनं घर असेही म्हणतो. ह्या जुन्या घरी कुटुंबाचे गणपती बसतात. इथे जाताना एक पाण्याचा ओहोळ लागतो. त्याला बोली भाषेत वळ असे म्हणतात. हा वळ आमच्या घराशेजारील तळ्याला (बावखल) वसईच्या खाडीला जोडतो. ह्या वळात साधारणतः डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी असते. पूर्वी ह्या वळातील पाणी एकदम शुद्ध असे. आणि आम्ही गणपतीला जाण्यासाठी ह्या पाण्यातून बिनधास्त जात असू. लहानपणी गणपतीची आठवडाभर सुट्टी असल्याने आम्ही बऱ्याच वेळ जुन्याघरी गणपतीत जात असू. अगदी रात्रीच्या आरतीला सुद्धा! मग रात्री अंधारातून'ह्या वळातून येताना बऱ्यापैकी भिती वाटे. ह्या रस्त्याच्या बाजूच्या झाडीचे दिवसाचे चित्र!



पहिली दुसरीपर्यंत आमच्या घरात सर्वजण एकत्र जेवण करीत. मग एकदा कधीतरी चार भावांनी वेगळा स्वयंपाक करण्याचे ठरविलं. त्यावेळी आम्हा सर्व लहान मुलांना खूप दुःख झालं होतं.

त्याकाळी मे महिन्यात आम्ही मुले वाडीत खूप खेळत असू. दगड का माती, लपालपी, विटी दांडू आणि गोट्या, क्रिकेट असले खेळ चालू असत. पकडापकडी खेळताना वाडीत लपायला बरे जाई. आमच्या घराच्या बाजूलाच बेडे होते. ह्या बेड्यातील चुलीवर पूर्वी स्वयंपाक केला जाई. पूर्वी आमच्या कुटुंबाची भाताची शेती वालीव ह्या ठिकाणी होती. सुगीच्या दिवसानंतर आलेला तांदूळ साठविण्यासाठी ह्या बेड्यात कणगे होते.



ह्या बेड्याच्या माळ्यावर लाकडे वगैरे साठवलेली असत. लपालपी खेळताना ह्या माळ्यावर आणि पानवेलीत लपायला चांगली जागा मिळे. बेड्याच्या माळ्यावर जायला शिडीवरून चढून जायला लागे. बऱ्याच वेळा ह्या शिडीच्या मधल्या पायऱ्या तुटलेल्या असत त्यामुळे बरीच कसरत करावी लागे.

दोन नंबरची आत्या इंदिरा (जिजी) मालाडला राहते. अनाघाअक्का आणि अभिजीत ही तिची मुले. अभिजीतला लहानपणी वसई खूप आवडायचे. वसई ढकलत मालाडला नेली पाहिजे असे तो म्हणायचा. त्याला भिती हा प्रकार माहीत नव्हता. कोंबड्यांची खुराडी त्यावेळी मोठी असत. त्यात शिरून आतून दरवाजा बंद करून तो कोंबड्यांना घाबरवायचा. बिचाऱ्या कोंबड्या भितीने कलकलाट करायच्या. मग आजी घरातून ओरडायची. मग नाईलाजाने अभिजीतला बाहेर यावं लागे. मे महिन्यात उद्योग कमी असल्याने आम्ही मग बरेच खटाटोप करत असू. करवंटीत पाणी घेऊन त्यात जास्वंदीची फुले पिळून काढून त्यापासून तेलसदृश्य द्रवाची निर्मिती करणे, कैऱ्या पाडून त्याचे पन्हे करणे अशा प्रकारांचा समावेश होई. पन्हे करण्याच्या उद्योगात साखर आवश्यक असल्याने आम्ही काहीसे पेचात पडू. मग मोठीआई आजीची करडी नजर चुकवून एकतर घरातील साखर काढून देई किंवा दोन तीन रुपये देऊन सोसायटीमध्ये साखर आणायला पाठवे.

संध्याकाळी कोंबड्या खुराड्यात झाकणे हा एक मोठा उद्योग असे. खट्याळ कोंबड्या जांभळाच्या आणि आंब्याच्या झाडावर चढून बसत. मग दगडे मारून, काठी फेकून वगैरे त्यांना खाली आणावे लागे. एकाच खुराड्यात अनेक कोंबड्या असत, त्यातील काही कोंबडे / कोंबड्या दादागिरी करून बाकीच्या कोंबड्यांचे हाल करीत. अशा दादागिरी करणाऱ्या कोंबड्यांना काठीने मारून आम्ही वठणीवर आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असू. कोंबड्या अंडी घालत. शिस्तीतल्या कोंबड्या खुराड्यात वेळच्या वेळी अंडी घालत आणि कलकलाट करीत. मग त्यांना सोडण्यात येई. काही कोंबड्या अगदी मुक्त संस्कृतीतील असत. त्या खुराड्यात अजिबात अंडी घालत नसत. मग मोकळ्या सुटल्यावर गोठ्याच्या वरच्या भागात पेंढा वगैरे ठेवला असे तिथे अंडी घालत. बहुदा ही वेळ दुपारची असे. मग त्यांच्या कलकलाटाने झोपलेली आजी उठे. चार सुनांपैकी जी कोणी पहिली नजरेस पडेल तिला अंडे आणण्यासाठी पाठवे. ती सून मनातल्या मनात नाखूष होत नाईलाजाने अंडे आणायला जाई.

वर्षातील काही काळात मोठीआई एखाद्या कोंबडीला अंड्यावर बसवे. बेड्यात एका टोपल्यात पेंढा वगैरे ठेवून त्यात ही गावठी अंडी त्या कोंबडीला दिली जात. साधारणतः एकवीस दिवसांनी पिल्ले बाहेर येत. सुरुवातीला कोंबडीला ह्या अंड्याविषयी इतकीच आत्मीयता नसे पण कालांतराने त्या फक्त पाणी पिण्यासाठी आणि दाणे खाण्यासाठी अगदी थोडा वेळ बाहेर पडत. पिल्ले बाहेर आली की मग अजून कसरतीचा काळ सुरु होई. त्यांना नेहमीच्या खुराड्यात ठेऊन फायदा नसे कारण तिथल्या भोकातून ही खट्याळ पिल्ले बाहेर येऊ शकत असत. त्यांना बहुदा सुरुवातीला टोपल्यातच ठेवलं जाई. मग चार पाच दिवसांनी कोंबडीचा एक पाय दोरीने बांधून तिच्यासोबत ह्या सर्वांना बाहेर सोडलं जाई. कोंबडी मग ह्या सर्वांना दाणे शोधण्याचं आणि खाण्याचं प्रशिक्षण देई. तिला गांडूळ वगैरे मिळाले की घशातून एक वेगळाच आवाज काढून ती ह्या सर्व पिल्लांना बोलवे. असा आवाज आला की सर्व पिल्लं मग आपले उद्योग सोडून तिच्याकडे पळत येत. मग त्यांची ह्या खाद्यासाठी खूप मारामारी होई. आकाशात कावळे मंडळी ह्या पिल्लांवर लक्ष ठेऊन असत.एखादं खट्याळ पिल्लू कोंबडीपासून बरंच लांब गेलं आणि आम्ही पहारेकरी बच्चेमंडळी समजा तिथे नसू तर एकदम झेप घेऊन मग तो कावळा पिल्लाला उचलून नेई. पुन्हा मग एकदा कोंबडीचा कलकलाट होई. समजा कोंबडीला वीस अंडी देऊन बसविली असेल तर त्यातून १२ - १४ पिल्लं बाहेर येत. ह्या एकवीस दिवसांच्या कालावधीत ढगांचा गडगडाट झाल्यास ती गोष्ट अंड्यातील जीवाच्या दृष्टीने चांगली नसे. माझ्या लहानपणी (पहिलीत असताना!) मला एक राखाडी कोंबडी आवडायची. पण ती अचानक गायब झाली. ती बावलाने वगैरे पळविली असा समज करून मी आणि आम्ही सर्व खूप दुःखी झालो. पण अचानक एके दिवशी यशवंतकाका (आमच्या वाडीत काम करणारे) ह्यांना गोठ्याच्या वरती रचलेल्या पेंढ्याच्या राशीतून पिल्लांचा आवाज आला. मग अधिक शोध घेता पेंढ्यात माझी आवडती कोंबडी आपल्या दोन पिल्लांसहित सापडली. त्यावेळी मला कोण आनंद होऊन माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं.

ह्या कोंबड्यांच्या शत्रुमध्ये बाउल हा प्राणी वरच्या स्थानावर गणला जाई. हा मांजर वर्गातील प्राणी. काही आक्रमक मांजरांचे बाऊल मध्ये रुपांतर होते अशी माझी लहानपणी समजूत होती आणि अजून तशीच आहे. तर हे बाऊल कोंबडी आणि त्यांच्या पिल्लांना पळवून नेत. एकदा अशाच एका बावलाने खूप कहर केला होता. त्याने पाच सहा कोंबड्यांचा फडशा पाडल्यावर आजीने बैठक बोलावली. आणि मग वाडीत काम करणारी गडी मंडळी आणि अजून काहीजण असे मिळून ह्या बावलाचा नायनाट करण्याचे ठरविण्यात आले. एके दिवशी यशवंतकाकाने हा बाऊल गोठ्याच्या वरच्या भागातील पेंढ्यात लपल्याची खात्रीची खबर आणताच ह्या सर्व मंडळींना बोलावण्यात आले. सर्व मंडळीनी मिळून गोठ्याला वेढा घातला. प्रत्येकाच्या हातात काठी किंवा वाडीत काम करण्यासाठी हत्यार वगैरे होते. या मोहिमेत भाग घेण्याची आमची तीव्र इच्छा असून देखील आम्हांला त्यासाठी योग्य नसल्याचे समजण्यात आले होते. पण खिडकीतून हे सारे पाहण्यात सुद्धा केवढा आनंद आहे हे आम्हांला समजून चुकलं होतं. मंडळींनी चोहो बाजूंनी आवाज करण्यात सुरुवात केली. बहुदा बाऊल भेदरला असावा. काही कोंबड्या खाल्ल्या तर त्याचा ह्या मंडळींनी इतका बाऊ का करावा हे त्याला बहुदा समजले नसावे. 
हा तज्ञ मंडळीनी त्या बावलाला एका कोपऱ्यात घेरले. आम्ही अगदी डोळे मोठे करून हे सारे पाहत होतो. आणि अचानक तो बाऊल रुपजी काकासमोर आला. अचानक आलेल्या बावलाच्या दर्शनाने चकित झालेल्या रुपजीकाकाने आपल्या हातातील हत्यार त्याच्या अंगावर मारण्याआधीच उडी मारून तो बाऊल गायब झाला. खिडकीतून हे सारे पाहत असलेल्या आजीने रुपजीकाकाचा उद्धार केला. हे प्रकरण जीवावर बेतलले पाहून मग बिचाऱ्या बावलाने आमच्या कोंबड्याकडे नंतर आपली वक्रदृष्टी फिरवली नाही.

गोठयामध्ये बऱ्याच गाई आणि बैलही असत. त्यांच्यासाठी वर्षभराचा पेंढा आणून ठेवावा लागे. ह्यात आमचे काका जगदीश (ज्यांना आम्ही बाबा असे संबोधित असू) हे पुढाकार घेत असत. वालीवच्या शेतावरून किंवा मग विकत घेऊन ते लॉरीत टाकून घरी आणत असत. ही लॉरी गल्लीच्या निमुळत्या रस्त्यातून कशीबशी अंगणात पोहोचे. ह्या लॉरीत पेंढा अगदी तिच्या उंचीच्या दीडपट प्रमाणात भरलेला असे. त्यामुळे क्वचितच वरच्या विजांच्या तारांना चुकवून आणण्याची सुद्धा कसरत लॉरीवाल्याला करावी लागे. अशा प्रकारे आडव्या आणि उभ्या अशा दोन्ही पातळीवरून कसरत करून मग पेंढा अंगणात पोहोचे. मग त्यातील कामगार हा पेंढा पटापट अंगणात फेकून टाकत. त्यावेळी पेंढ्यातून त्याचा बराच हलका भाग (नक्की शब्द आता आठवत नाही) घरात शिरण्याची शक्यता निर्माण होई. अशा वेळी घराच्या सर्व खिडक्या झटापट बंद कराव्या लागत.

मग पुढे दोन तीन दिवस हा पेंढा व्यवस्थित एकावर एक लावून ठेवण्यासाठी कामगार मंडळी येत. हा पेंढा व्यवस्थित लावून ठेवला की त्याच्यावर उडी मारण्यासाठी तो लहान मुलांना अगदी आकर्षित करे. कधी एकदम खूप पेंढा आणला की मग त्याचे दोन तीन थर बनत. मग  अंगणात क्रिकेट खेळताना मुद्दाम चेंडू ह्या पेंढ्याच्या राशीवर मारला जाई. त्यावर आम्ही चढलो असता आजी किंवा मोठ्या लोकांनी पकडल्यावर मग आमची काशी होत असे.

माझे वडील कुलाब्याला भाभा अणुशक्ती केंद्रात कामाला होते. समजा गडी आला नाही तर ते ऑफिसला साडेसातला निघण्याआधी गाईचे दुध काढून जात. आणि संध्याकाळी परतल्यावर गाईला बादलीत पाणी देत आणि पेंढ्याची किंवा सुक्या गवताची एक गुंडी देत असत. समजा त्यांना उशीर झाला किंवा ते बाहेरगावी गेले की मग ही जबाबदारी आमच्यावर येई. रात्रीच्या वेळी गोठ्यात जाणे हा अगदी उत्कंठावर्धक अनुभव असे. विहिरीचे पाणी हाताने काढून बादलीत भरायच आणि मग ती बादली घेऊन गोठ्यात जायचं. खाली बसलेली गाय मग शांतपणे उठे आणि हळूहळू पाणी पीत असे. तितक्या वेळ त्या अंधारात थांबावे लागे. लहान असल्याने त्यावेळी उगाच कोठून छोटं जनावर वगैरे निघेल कि काय अशी भीती वाटे.  शुद्ध पक्ष चालू असल्यास आकाशातील चंद्र दर्शन देई. मग केव्हातरी तयार खाण्याचा प्रकार निघाला. सुग्रास, चुनी, भरडा असे प्रकार आले. गाईचे दुध काढण्याआधी त्यांना एका घमेल्यात ह्या सर्वांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून खायला दिले जाई.

गाई व्याल्या की सुरुवातीच्या दिवसातल्या चिकट दुधाचा खरवस बनवला जाई

माझी आई बोर्डीची. तिच्या वडिलांनी म्हणजे बोर्डीच्या अण्णांनी तिला एकदा म्हैस पाठवली होती. ही म्हैस अगदी धष्टपुष्ट होती.एकदा ही म्हैस तिच्या गळ्याला बांधलेली वेसण तोडून पळाली. पळाली ती पळाली आणि वर मग वाडीत दुध्याचा मांडव होता तिथे जाऊन पोहोचली. तिच्या अंगातील शक्तीला बाहेर पडण्यासाठी तिच्याकडे दुसरे काही साधन नव्हते. म्हणून तिने थेट  संपूर्ण मांडव आपल्या डोक्याने आणि शिंगाने जोरात हलवायला सुरुवात केली. संपूर्ण पाटील कुटुंब हा बाका प्रसंग अगदी प्रचंड तणावाखाली येउन पाहू लागले. तिच्या माहेरची म्हैस असल्याने माझ्या आईला अधिकच तणाव आला.  सर्व पाहणाऱ्या माझ्या मोठ्या भावाने मग प्रसंगाला आवश्यक असणारे धैर्य दाखवलं. सरळ चालत जाऊन त्याने हातात घेतलेली वेसण थेट त्या म्हशीच्या डोक्यात घुसविली आणि एका मोठ्या शूर वीराच्या थाटात गोठ्यात नेऊन बांधली. त्याच्या ह्या थोर पराक्रमावर सर्व पाटील कुटुंबीय (दुधीचा मांडव वाचल्याने) आणि खास करून आई खूप खूष झाली.



(क्रमशः)
Me Marathi!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...