मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
व्यक्ती आणि वल्ली ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्ती आणि वल्ली ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २२ जुलै, २०१८

शिक्षणमहर्षी डोंगरेसर!!



सद्ययुगात परिचित व्यक्तीला तुझे कोणते छंद आहेत अशी विचारण्याची पद्धत रुढ झाली आहे. बरेचजण आपल्या उमेदवारी अर्जातसुद्धा ह्याचा उल्लेख करतात. ह्या प्रश्नाचे उत्तर एका ठराविक धाटणीचे असतं. भारतातील ८० ते ८५ टक्के लोक वाचन, गायन ( यात बहुतांशी प्रतिकिशोरकुमार), क्रिकेट पाहणं आणि खेळणे  हे छंद बाळगून असतात. आता २०१८ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर यात फुटबॉल हा सुद्धा एक छंद म्हणून समाविष्ट होत जाईल यात तिळमात्र शंका नाही. 

आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन घेणार आहोत ज्या व्यक्तिमत्त्वाला छंदाचे काही बंधनच नाही. जणु काही मुक्तछंदच! या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलु पाहिले असता प्रत्येक ऋतुमानानुसार ती व्यक्ती वेगवेगळ्या उपक्रमात गढुन गेलेली आपल्याला आढळून येते. Ladies and Gentleman! Let me take the privilege of introducing Professor Hemant Dongre!!

माझी आणि सरांची ओळख तशी आधीपासुन होतीच. परंतु ही ओळख दृढ होण्यास कारण म्हणजे १९८५ बॅचने त्यांचं जे पहिलं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं त्यात त्यांनी मलासुद्धा बोलावलं. त्यांनी मला नक्की का बोलावलं हे मला अजून समजलेलं नाही. प्रस्तावनेच्या भाषणात सरांनी त्यांच्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितल्या. त्यात अनघाला शाळेच्या प्रत्येक वर्षी पहिल्या बाकावर का बसवलं गेलं याविषयी त्यांच्या मनात असलेल्या खंत /असुया वगैरे भावनांचं मिश्रण त्यांनी प्रत्यक्ष बोलून दाखवलं. त्यानंतर मीसुद्धा स्टेजवर जाऊन काहीतरी बोललो. काय बोललो ते नक्की आठवत नाही. परंतु त्यानंतर मात्र मला 1985 बॅचच्या एकाही कार्यक्रमास पुन्हा कधी बोलवण्यात आले नाही!असो !!

माझ्या नात्यामध्ये सरांचे काही विद्यार्थी पसरलेले आहेत. सर भौतिकशास्त्र चांगलं शिकवितात  हे मत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सातत्यानं दिसुन येतं. बाकी काही विद्यार्थी त्यांना अनिल कुंबळे या नावाने सुद्धा ओळखत असत हे ऐकिवात आहे. 

हेमंतच्या चिरतरुण प्रतिमेमागे त्याच्या धर्मपत्नीचा खूप मोठा वाटा आहे. ते जेव्हा वसईत असतात त्यावेळी त्यांना दोन्ही वेळी घरगुती जेवण ते  जिथे असतात तिथं पोचवण्यात येतं. ते घर सोडून कितीही वेळ बाहेर भटकत असले तरी त्यांना घरी फारसा ओरडा मिळत नसावा असे मानण्यास एकंदरीत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाव आहे. त्याच्या ८५ बॅचमधील सहाध्यायी मुलींचे (???) सौ.डोंगरे अत्यंत आपुलकीने आदरातिथ्य करत असल्याचं ऐकिवात आहे. 




आता वळूयात ते ह्या बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या एकेक पैलुकडे !!

पट्टीचे पोहणारे  !!

पावसाळ्याच्या मोसमात वसईतील काही मंडळी पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये आपल्या पोहण्याच्या कलेचे प्रदर्शन विनाशुल्क करत असतात. ह्यात केवळ पोहणे समाविष्ट नसुन विहिरीच्या काठावरुन मारलेल्या विविध डायविंग प्रकारांचा समावेश होतो. हेमंत ह्यांनी मारलेली ही "निरागस सूर". हे बहुदा २०१६ सालातील चित्र आहे. त्यावेळी हा सर्व ग्रुप २०२० ऑलिम्पिकमध्ये synchronized swimming ह्या क्रीडाप्रकारात भाग घेण्याचा विचार करत होता.  ह्या प्रतिमेतील डाव्या बाजुचे सुरमारे डोंगरे सर आहेत.

त्यांच्या ह्या प्रसिद्धीमुळे वसईतील काही वजनदार व्यक्ती त्याच्याकडे पोहण्याची शिकवणी लावण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु वजनदार व्यक्ती आणि भौतिकशास्त्राचे नियम ह्यांची पाण्यात कशी सांगड बसेल ह्याविषयी खात्री नसल्यानं हेमंत ह्या बाबतीत चालढकल करताना आपल्याला आढळुन येतोय !





पंडितांच्या शब्दात सांगायचं झालं तर ... 
"सूर निरागस हो" हे गाणे तर गळ्यातील सूर नाही तर सरांची विहिरीतील सूर पाहूनच लिहिले असणार अशी मला नक्की खात्री आहे. पट्टीचे पोहणारे सर अवघ्या महाराष्ट्राचे ते सुर सम्राट आहेत. इतकेच काय वसईच्या थोर समाजसेविका भगिनी सुगंधा मौशी जोशी सुतारआळीकर यांना विहिरीत पोहायला शिकवण्याची भीष्म प्रतिज्ञा सरांनी केली आहे. 

आपलं पोहण्यातील कौशल्य विविध खंडात सिद्ध व्हावं ह्यासाठी अमेझॉन जंगलासारख्या दुर्गम ठिकाणी पोहण्यास जाण्यास सर अजिबात कचरत नाहीत. 



"सुरमई" सम्राट


पुन्हा एकदा पंडितांच्या शब्दात 
वसई नायगांव कोळीवाड्यातील मासळी बाजार करोडोंची उलाढाल करतो.  त्यातही सरांचा मोठ्ठा वाटा आहे. अनेक मित्रमंडळींना एकत्र करून ते मासळी विकत घ्यायला जातात. त्यांना आठवड्याला (हो आठवड्याला) पुरेल इतकी तब्बल २० ते २४ हजारांची मच्छि ते स्वतःसाठी घरी घेऊन येतात. त्यामुळेच मच्छिमार समाजाने राज्य सरकारकडे अखिल भारतीय मच्छि विक्रेता संघाने  सरांना ब्रँड अँबेसिटर करण्याची मागणी करत त्यांना राज्य मंत्र्यांचा दर्जा देण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांचे पोहतानाचे सूर पाहून आणि सर्वात आवडती मच्छिवरून त्यांना  "सुरमई" सम्राट अशी उपाधी देखील दिली आहे. 

फोटोत  जरी पापलेट दिसत असले तरी पंडितांच्या  शब्दावर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या ह्या मासे खाण्याच्या अफाट क्षमतेमुळं काहीसा असुयाभाव निर्माण झालेला त्यांचा मित्रवर्ग "आठवड्याला एवढे मासे खाणारा  'असूर' वर्गात येऊ शकतो" अशा शब्दांत त्यांची संभावना करतो.  

जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू 



एकदा मी प्रोफेसरांना प्रश्न विचारला होता. वसईतील तुमचं नामांकन कितवे असावं ? सरांच्या बॅडमिंटन वर्तुळात त्यांना हरवणारे एक - दोघंजण असावेत. त्यामुळं त्यांनी आत्मविश्वासानं उत्तर दिलं - तिसरं ! माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहुन त्यांनी मनोमनी एक चंग बांधला असावा. यंदाच्या मे महिन्यात त्यांनी वसईत एका बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करुन त्यातील तीन-चार स्पर्धा प्रकारातील विजेतेपदं पटकावली. त्यामुळं आता त्यांना वसईतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटु असं कायम संबोधण्यात येईल.  

हौशी सायकलस्वार

आपल्या बॅडमिंटन कौशल्याला पुरक म्हणुन त्यांनी गेल्या काही वर्षात सायकलस्वार होण्याचं मनावर घेतलं आहे. आपल्या जिवलग मित्रांसोबत नोव्हेंबर - मे महिन्यात ते बरेच वेळा वसईच्या निसर्गरम्य भागात सायकलस्वार बनुन हिंडताना दिसतात. 



हौशी क्रिकेटपटु 



सरांच्या अंगी विनम्रपणा ओतपोत भरला आहे. आपण काही उत्तम क्रिकेटपटु नाहीत हे ते सांगत असले तरी ८५ बॅचच्या अतिउत्साही मित्रांमुळं त्यांना दरवर्षी NPL मध्ये सहभागी व्हावं लागतं. ८५ बॅचचा क्रिकेट संघ म्हणजे सचिन पाटणकर ह्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटुवर आधारित एकखांबी तंबु ! सर सचिनला सदैव साथ देताना दिसुन येतात! वरील फोटोत  खरंतर ते non-striker end ला उभे आहेत पण कॅप्टनला साथ द्यायला हवी ही भावना मनात इतकी दाटुन आली की त्यांनी तिथंच फलंदाजीचा पवित्रा घेतला !

धाडशी स्वभावाच्या छटा ! 


सरांचा स्वभाव तसा मुळचा धाडशी नसला तरी त्यांनी मध्यंतरी प्रचंड धाडस केलं होतं. आपल्या मित्रांसोबत ते एकटे बँकॉकला जाऊन आले. तिथल्या जीवनाचा अनुभव घेतला आणि नंतर तिथल्या रोचक अनुभवांवर त्यांनी चक्क ब्लॉग लिहिला ! ह्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच !



सर्पमित्र 


आपल्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं सर महाराष्ट्रभर फिरत असतात. अशा दौऱ्यांमध्ये ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा विविध सर्पवर्गातील प्राण्यांशी भय न बाळगता संपर्क साधताना दिसतात. 







प्रकाश आमटेंसोबत!! 
सरांनी धरलाय तो प्रसिद्ध बँडेड क्रेट, नागाच्या अनेक पट विषारी




सामाजिक कार्य  

सरांचा  सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. ८५ बॅच आणि वसईतील सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन ते विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. काही वर्षांपुर्वी त्यांनी "स्वरानंदवन" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आनंदवन उपक्रमासाठी निधी उभारुन देण्यास मदत केली होती.  

परंपरेला झुगारुन देणारा   

सर भौतिकशास्त्र आणि गणित ह्या विषयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. ह्या क्षेत्रात राहुन म्हणुन की काय त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना आव्हान देण्याची वृत्ती दिसुन येते. आणि केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असं न होऊ देता त्यांनी आपल्या स्वतःच्या वर्तवणुकीद्वारे ह्याचा आदर्श घालुन दिला आहे. 

लोकल प्रवासाचा धसका 

लोकल ट्रेनच्या प्रवासाविषयी मात्र सरांनी काहीसा धसका घेतला असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून आढळून येते. बराच वेळा वसई स्टेशनवर स्टेशनच्या पुलावर ते विरारच्या दिशेने टक लावून पाहत असल्याचे आढळुन आले आहे. शेवटी बऱ्याच गाड्या सोडून दिल्यावर ते परत आले आहेत. या सर्व बातम्यांची अफवा म्हणून ते बोळवण करतात. आणि त्यावर पुरावा म्हणून क्वचितच केलेल्या हेसुद्धा दुपारच्या कमी गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवासाची चित्रे हे विविध व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित करतात. 


उत्तम बल्लवाचार्य 


सर पेशानं आचार्य असले तरी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मात्र ते बऱ्याच वेळा आपल्या पाककलाकौशल्याचे घरी प्रदर्शन करतात. आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्रांना त्याचा आनंद लुटण्याची संधी देतात.  त्यांनी स्वहस्ते बनविलेल्या (त्यांच्या म्हणण्यानुसार) मसालेदार चिकनचे हे छायाचित्र!

उत्तम गायक 

सर उत्तम गायक आहेत. आपल्या ८५ बॅचच्या सहकाऱ्यांच्या सानिध्यात असले की उत्तमोत्तम गाण्यांचा नजराणा ते पेश करतात. त्यांच्या बॅचमधील मुकेश ह्यांच्या साथीनं त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या आहेत. काही तांत्रिक कारणांमुळं ह्याचा पुरावा सादर करु शकत नाही.  


व्याख्याता - प्रमुख पाहुणे 



सरांची वाटचाल  वसईतील एका प्रसिद्ध वैचारिक व्यक्तिमत्वाच्या दिशेनं चालु असुन बऱ्याच वेळा त्यांना वसईतील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणुन अगत्याचं आमंत्रण असतं !









त्यांच्या एका हितचिंतकाच्या  शब्दांत   सांगायचं झालं  तर !  

उदयनराजे आणि आइन्स्टाइनसारखे दिसणारे तसेच त्या दोन्ही व्यक्तींसारखेच अनुक्रमे भारदस्त आणि हुशार असणारे शिक्षण महर्षी, संतशिरोमणी हेमंत डोंगरे सर माझे चांगले मित्र असणे हे खरं तर माझ्यासाठी अहोभाग्य 


हे सर्व झाले सरांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचे काही पैलु !! आता वळुयात त्यांच्या सर्वात महत्वाच्या पैलूंकडे ! हा असा पैलु ज्यामुळं एक खराखुरा मित्र, सल्लागार म्हणुन त्यांच्याकडं अनेकजण पाहत असतात. 


उत्तम मित्र /सल्लागार / स्थितप्रज्ञ 

सरांचा स्वभाव खुप स्थितप्रज्ञ आहे. ते भडकलेले आहेत असं माझ्यातरी पाहण्यात आलं नाही. एखाद्या कठीण प्रसंगी सल्ला मागायला जावं असं हे एक व्यक्तिमत्व! आपलं बोलणं ते शांतपणे ऐकुन घेतात. आणि आपल्या एका खास शैलीत ते आपलं मत नोंदवितात. कोणी एखादा सल्ला मागायला आला म्हणजे त्याला सल्ला द्यायलाच हवा असं त्यांचं म्हणणं नसतं. जर आपल्याकडं समोरच्याला हवी असणारी माहिती नसेल तर ते तसं मोकळेपणानं त्या व्यक्तीला सांगतात. आणि त्यांच्या माहितीत कोणी योग्य व्यक्ती असेल तर तिचा संदर्भसुद्धा देतात.   

त्यांच्या जवळच्या सुहृदांनी व्यक्त केलेल्या त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया ... 

१००%  विश्वास वाटावा असा मित्र

बोलतो खूप, चिडवतो खूप... पण करतो खूप ... गरज असेल ते तो करतो

मला त्याचा रोखठोकपणे बोलण्याचा प्रकार आवडतो . आणि तो जे बोलतो ते करतो हे नक्की आहे

वेळ , पैसा, मेहेनत सर्व बाबतीत तयारी असते. Only thing we all fear
तो कधी काय बोलेल नेम नाही बरं बोलतो ते एकदम correct असतं  
Open minded Outspoken



धन्य भाग हमारे जो आप ने हमें गुरुदेव की शान मे कुछ कहने का मौका दिया!!!


पुन्हा एकदा पंडित उवाच !!

सरांचा स्वभाव. ते हुशार, बुद्धिमान, नेहमी शांत स्वभावी तसेच ते नेहमी हसतखेळत आणि आनंदी असतात आणि महत्वाचं म्हणजे ते विनोदी देखील आहेत. चर्चेत, गप्पात नर्मविनोद जोक, मजा मस्करी यामुळे आमचे स्वभाव जास्त जुळले. एक राजकारण सोडले तर आमच्यात मतभेद अगदी नाहीच. शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळण्यामागे सरांचे मोलाचे परिश्रम आहेत. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असूनही मराठी भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे. लिखाण, भाषाशैली प्रभावी आहे. विनोदी स्वभाव ही तर त्यांची खासियत. ते शिक्षणासोबतच अनेक क्रीडा प्रकारात ते रुची ठेवून आहेत. बॅडमिंटन मध्ये तर वसईचे प्रकाश पडुकोणच. बुद्धिबळ, कॅरम, रायफल शूटिंग ह्यात ही वाकबगार. 
अफाट बौद्धिक खजिना असलेले, प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेले सर तितकेच सेवाभावी. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी हातभार असतो. 
अशा या आमच्या सदाबहार सरांनी यशाचे उत्तमोत्तम डोंगर पार करोत ही ईश्वरचरणी प्रार्थना..

वरील प्रतिक्रिया सरांचा जनमानसावर असलेला पगडा अधोरेखित करतात. सर दोस्तों के दोस्त आहेत. सर आणि PM ह्यांची मैत्री अखिल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सरांच्या मैत्रीला PM सुद्धा दिलदारपणे दाद देतात. PM ह्यांच्या वाडीतील हिरव्यागार भाज्यांपैकी काही भाज्या  होळी बाजारात पोहोचण्याआधी सरांच्या किचनमध्ये स्वखुशीने विसावतात! सरांसोबत PM च्या विहिरीत पोहण्यास गेलेले त्यांचे विविध वयोगटातील मित्रसुद्धा प्रसंगी PM ह्यांच्या दानशुरतेचे लाभार्थी होताना दिसतात. अशाच एक बालवर्गातील लाभार्थीच्या घरी बनलेली केळफुलाची भाजी !




साहजिकच आहे की ही पोस्ट खुपच लांबली तरी बरंच काही बाकी असल्यासारखं वाटतंय ! सरांचे व्यक्तिमत्व आहेच तसं व्यापक ! ह्या पोस्टने प्रेरणा घेऊन ८५ बॅच आता सरांवर पुस्तकच लिहेल असं मला वाटतंय! पंडितांच्या म्हणण्यानुसार ब्लॉगमध्ये व्यक्तिमत्व मावणे शक्य नसल्याने NES ८५ बॅच  सरांचा बायोपिक सिनेमासुद्धा बनवु शकते. आणि ही बातमीवर शिक्कामोर्तब होण्याआधीच सरांची भुमिका कोणी वठवायची ह्यावरुन  वादही सुरु झालेत म्हणे !!

बायोपिक किंवा पुस्तकात टाकण्यासाठी उपयोगी पडू शकणाऱ्या सरांच्या काही आकर्षक मुद्रा !!

















जाता जाता १९९३ साली आलेल्या सर ह्या चित्रपटातील हे गाणं बहुदा सरांना डोळ्यासमोर ठेवून लिहलं असावं !!

आज हमने दिल का हर किस्सा तमाम कर दिया !!
आज हमने दिल का हर किस्सा तमाम कर दिया !!
Sir sir ho sir we love you!! 

रविवार, ८ जुलै, २०१८

VNU


श्री गणेशाय नमः !!

एखाद्या विषयाला गवसणी घालण्याची आपली जर कुवत नसेल तर त्याच्या नादाला लागु नये हे माझं तत्त्व!  त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आणि तिचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी असेल की जे समजायला आपल्याला कठीण पडणार असेल तर त्यावर पोस्ट लिहायची धारिष्ट्य करु नये असा खरा तर माझा समज! परंतु एकदा मजेमजेत मी तुझ्यावर पोस्ट लिहितो म्हटल्यावर विनूने ते त्याच्या मनाच्या असंख्य कोपऱ्यांपैकी एका कोपऱ्यात घट्ट लिहुन घेतले . ह्या माणसाची निरीक्षणशक्ती अफाट ! मी साधारणतः शनिवारी मोठाले ब्लॉग लिहितो हे त्याच्या ध्यानात आलं असणार. त्यामुळे काल रात्री त्यानं विचारणा केली AP माझ्यावरचा ब्लॉग झाला की नाही लिहुन!  आता त्यानंच  विचारला म्हणजे ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न जरी पूर्ण तयारीनिशी नसला तरी तो खपवून घेतला जाईल यामुळे आजचं हे धारिष्ट्य !

विनायक सुभाष पंडित! अग्निपथमधील अमिताभ बच्चनच्या विजय दीनानाथ चौहान नावाइतकेच किंबहुना अंमळ जास्तच भारदस्त! विनुचे मुळचे गाव चिंचणी जवळचे वरोर! पंडित कुटुंबीय हे एकंदरीत संस्कृतीचे मोठे पुजारी असावेत असा विनूकडे पाहून अंदाज बांधता येतो. त्याचे आजोबा राजकारणी (११ वर्षे सरपंच) आणि समाजकारणी असल्यानं गावात त्यांचा खुप मान आणि दरारा होता. तेथील मंदिर उभारण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता.  विनुची आई मुळ वसईची आणि तिची नोकरीची शाळा दहिसरला आणि वडिलांची बदली पंचायत समिती ठाण्याला झाली. ह्या कारणास्तव विनुचे आई वडील वसईत स्थानिक झाले. विनू मात्र लहानपणापासून जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा गावी जाऊन जायचा रहायचा. त्याच्या म्हणण्यानुसार दीड-दोन वर्षाचा असल्यापासून तिथं जाऊन तो एकटा राहायचा. आता विनूला ज्याने कोणी जवळून पाहिलं आहे किंवा त्याचा फेसबुक अवतार अनुभवला आहे त्या सर्वांना विनूवर आणि त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा ही नेहमीच संभ्रमात  टाकणारी बाब आहे. पण दीड वर्षाचा बाळ विनु वरोर गावी एकटा जाऊन रहायचा ही विश्वास ठेवण्याजोगी बाब आहे. एक मात्र खरं की विनूला आपल्या गावाची प्रचंड ओढ आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रितीभाती अगदी त्यांचा पूर्ण अर्थ समजावून घेऊन परिपुर्णपणे पार पाडण्याकडे त्याचा कल असतो. सकाळी साडेतीन वाजता उठून पूर्ण चालीरीतिपुर्ण दिवाळीची पहिली आंघोळ पार पडणारा विनु  हा एकमेव माझ्या माहितीतील तरुण असावा. त्याच्या पहिल्या आंघोळीच्या उघड्याबंब फोटोंमुळे त्याची तुलना सलमान खानशी होऊ लागली असावी असा मला संशय आहे. विनूला गरिबांचा सलमान खान म्हणण्यात येतं त्यांना सलमान खानचा तेरे नाम हा चित्रपट ११३ वेळा पाहिला आहे असे त्याचे म्हणणे आहे. 

आत्ता इथे जरी मी विनू म्हणत असलो तरी खरं ते आहे VNU! यामध्ये पहिला V विनायकचा, N निहिरा आणि U उमिकाचा! हे सर्व जुळवून आणण्यासाठी ह्या पठ्ठ्यानं आपल्या मुलीचं नांव U वरुन ठेवण्याचा अट्टाहास धरला असावा.  ह्याने शालेय शिक्षण घेतलं ते वसईच्या RP  वाघ हायस्कूलमध्ये! बाकी सर्व आम्ही मित्रमंडळी न्यू इंग्लिश स्कूलची असल्याने अधुनमधुन हा आपल्यातला नाही अशी भावना आमच्यात निर्माण होते. परंतु या भावनेनिमित्त निर्माण झालेल्या आमच्या दुजाभावाला तो एकटा पुरून उरण्याची क्षमता तो बाळगुन आहे. त्याला RP  वाघची मंडळी एकत्र का आणता आली नाहीत असा मला मनात पडलेला प्रश्न कधीतरी त्याला विचारावासा वाटतो परंतु त्याविषयी तो काही फारसं वाईट वाटून घेणार नाही. ही न्यु इंग्लिश स्कुलची पोर इतकी हुशार कशी ही शंका लहानपणापासुन त्याच्या मनात खदखदत असली तरी ती प्रत्यक्षात बोलुन दाखवेल तो विनु कसला? 

विनूची विनोद बुद्धी जबरदस्त आहे आणि या विनोदबुद्धीला मराठी भाषेचे भाषेवरील त्याच्या प्रभुत्वाचे सहाय्य लाभले असल्याने तो जातिवंत विनोदाची हमखास पेरणी करू शकतो. त्याच्या तोडीस तोड विनोद करणारे हेमंत डोंगरे सर आणि राहुल ठोसर आणि बाकी काही त्यांची मित्रमंडळी एकत्र आली की मग एकमेकांना देण्यात येणाऱ्या कोपरखळ्यांची बहार उडवून दिली जाते. परंतु यातील काही संज्ञा ह्या केवळ त्या निवडक लोकांनाच माहीत असतात त्यामुळे आपल्याला मात्र केवळ त्या कळल्यासारखं करुन हसण्याचे नाटक करावं लागतं. 

स्पष्ट सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी विनु स्थूल होता. त्याला त्याआधी सुद्धा बऱ्याच जणांनी या वास्तवाची जाणीव करून दिली असणार. म्हणा तो ज्या ग्रुपमध्ये वावरतो तिथं एखादं सत्य सभ्यपणे सांगण्याची पद्धत नाही किंवा तिथं सत्य उतरण्याआधीच त्या ग्रुपकडून तुम्हाला ते भयानक परखडपणे सांगितलं जाण्याची पद्धत आहे. त्यामुळे तो स्थूल होण्याच्या बरेच आधी त्याला हे सांगण्यात आले असणार. त्यानं कित्येक वर्ष त्यावर काहीच केलं नव्हतं. परंतु सहा महिन्यांपूर्वी नक्की काय झालं कुणास ठाऊक! विनूने फिटनेसचे वेड डोक्यात घेतले. सकाळचा सूर्योदय ज्यांना गेले कित्येक वर्षे पाहिला नसेल असा हा विनू सहा वाजता उठून सायकलिंगला जायला लागला. वसईतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटन खेळाडू हेमंत डोंगरे सर यांच्याकडून बॅडमिंटनची शटल्स मिळावीत म्हणून त्यांच्या मनधरण्या करू लागला. डोंगरे सरांनी शटल्स देणे जरी त्याच्या हाती नसले तरी सायकलिंग करणा मात्र त्याच्या हाती होतं त्यामुळे जिद्दीने सायकलिंगचा पाठपुरावा करून त्यांना गेल्या सहा महिन्यात तब्बल 20 किलो वजन घटवले. विनु हा पट्टीचा पोहणारा आहे. आफ्रिका खंडातील अमॅझॉन खोऱ्यातील विहिरीत दोन वर्षांपुर्वी वसईतील काही मंडळी अत्यंत धाडस करुन पोहण्यास गेली होती. त्यावेळी लाल शर्टात असणारा हा विनु! विहिरीच्या पाण्यात बोचकं वगैरे प्रकारांचं प्रदर्शन करण्यात विनूचा हातखंडा आहे हे मी ऐकुन आहे !


मित्रांच्या वाढदिवसांची फेसबुकवर अतिशोयक्ती अलंकारयुक्त आणि विनोदाचे कारंजे निर्माण करणारी पोस्टर्स बनवण्यात विनूचा हातखंडा आहे. जोपर्यंत विनुचे पोस्टर येत नाही तोपर्यंत लोकं बेचैन होऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू करीत नाहीत. त्याच्या या पोस्टर्समुळे वसईमध्ये तुम्हाला असंख्य जागतिक दर्जाचे लेखक, व्यवसायिक, खेळाडू वगैरे असण्याचा भास होईल. ते जे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेचे प्रकार म्हणतात ना! त्याचा वापर करून जर कोणी विनूच्या फेसबुक पोस्टचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सर्व पोस्ट पृथ्वीवरील माणसाच्या नसून हा मनुष्य आणि त्याची मित्रमंडळी मागची काही शतकं आणि पुढची काही दशके यामध्ये वेगाने पुढे मागे करीत आहेत असा त्यांना भास होण्याची शक्यता आहे. 

विनू स्वतःचे लग्न हे जमवून म्हणजे घरच्यांनी जमवून दिलेले लग्न असे म्हणतो. परंतु याविषयीदेखील शंका घेण्यास प्रचंड वाव आहे. घरच्यांकडून स्थळ आले आणि मग मी ते पुढे नेले असे तो म्हणतो. आता त्याच्या या विधानाची खातरजमा जमा करुन घेण्यास अजिबात वाव नाही. काही काळापूर्वी म्हणजे अगदी गेल्यावर्षीपर्यंत विनू विनोदी गाणी बनवून की फेसबुक वर टाकायचा. त्याची गायन कला आणि विनोदबुद्धी यांचा उत्तम संगम या गाण्यांमधुन आढळून येत असे. परंतु पूर्ण धमाल करणारा तरुण  ते एक जबाबदारीने वागणारा मध्यमवर्गीय गृहस्थ हा जो विनूचा प्रवास गेल्या काही महिन्यांपासून चालू झालो आहे त्यामुळे त्याचे फेसबुक वरील हे गायन संपले असे मानण्यास वाव आहे सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्याचे विनू वर्जन तुम्हाला कुठे सापडलं तर पहा!!!

विनूला राजकारणाविषयी भरपूर काही माहिती आहे. तो एका विशिष्ट पक्षाशी ओढ बाळगून आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचा तो हिरीरीने वैयक्तिक पातळीवर पुरस्कार करतो किंवा त्यांच्यावरील टीकेला तो सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या सर्व प्रकारात तो समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काही विशिष्ट मर्यादेपर्यंत काळजीसुद्धा घेतो. राजकारणाविषयी त्याच्या मनात प्रचंड ओढ असली तरीसुद्धा राजकारणासाठी लागणारा धूर्तपणा माझ्यात नाही असे तो म्हणतो आणि त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहतोय असे तो म्हणतो काही प्रमाणात ते सत्य असावे. विनूच्या अंगी छायाचित्रणाची सुद्धा कला आहे परंतु आपला स्वयंघोषित छायाचित्रकार मित्र राहुल ठोसर याच्या फेसबुक लाईक्स वर गदा येऊ नये म्हणून तो आपली छायाचित्रकारिता आणि त्याचे सोशल मीडियावरील प्रदर्शन मर्यादित ठेवतो. तरीदेखील त्याचे छायाचित्रकारितेतील कौशल्य अशा फोटोमधुन डोकावत राहते. 


वसईतील कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनात तो सक्रिय सहभाग घेतो. विनुची भारतीय रितीविषयीची ओढ त्याच्या विविध सामाजिक / सांस्कृतिक उपक्रमांतून परिवर्तित होते. अस्तंगत होत चाललेल्या ढोल संस्कृतीला पुनर्जीवन देण्याच्या उदात्त हेतूनं स्थापन झालेल्या वसईतील ढोल पथकाचा तो सक्रिय सभासद आहे. महाराष्ट्रदिन, दसरा अशा पवित्र सणांच्या दिवशी हे ढोल पथक वसईच्या मुख्य भागातुन मिरवणुक काढतात. त्या निमित्त विनुची फेसबुकावरील ही पोस्ट त्याच्या मराठीवरील प्रभुत्वाची जाणीव करुन देते. 

गर्व आहे #महाराष्ट्रीय असण्याचा
अभिमान आहे #ढोल_ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची #संस्कृती
#निष्ठा आहे आपल्या #मराठी मातीशी
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

ह्या माणसाचं आधीचं स्थूलपण त्याच्या खवय्येपणातुन आलं आहे. पारंपरिक पदार्थाचं त्याला भारी वेड असावं. यंदाच्या उन्हाळ्यात त्याच्याकडुन (म्हणजे अर्थात त्याच्या फेसबुकवरील पोस्टवरुन) मला ही रायत ह्या पदार्थाची रेसिपी कळली. 

हॉटेलमधले पंजाबी, गुजराथी, मारवाडी पदार्थ आवडीने खाणारा पण घरच्या #पारंपारिक खाद्यपदार्थांवर अक्षरशः हात,बोट चाटून/पुसून यथेच्छ #ताव मारतो तो खरा #मराठी. आपल्या पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची चव काही औरच..

छोटे गावठी आंबे पिकायला लागले की, आमच्या घरात आठवड्यातून किमान ५-७ वेळा बनणारा पदार्थ म्हणजे रायत.

आंब्याच्या रसात #नारळाचे दूध टाकून त्यात #मिरची_पूड, #मीठ, #गूळ आणि #मोहरीची पावडर टाकून एकत्र केले की झाले रायत. पोळी, भाता सोबत खायला योग्य. पण वाटीत याच्या रसात बुडवलेल्या #बाठ्यासोबत अगदी #बोट चाखून, चोखुन खाण्याची धन्यता काही वेगळीच..

एप्रिल - मे मोसमातील अजूनही बरेच पदार्थ बनायचे बाकी आहेत. आधी #आईने आणि आता #बायकोने असे वेगवेगळ्या मोसमातील पदार्थ बनवण्याची #परंपरा टिकवून ठेवली असल्याने त्याची चव आणि मजा घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचेही #आभार..

विनु यंदाच्या मोसमात खुप बिझी असणार आहे. नावातच गणपती असणारा विनु परम गणेशभक्त! वसईत त्यानं शाडू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुबक गणेश मुर्ती उपलब्ध करुन दिल्या आहेत. 
 

ह्या उपक्रमासाठी आणि एकंदरीत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी विनुला आणि त्याच्या कुटुंबियांना मनःपुर्वक शुभेच्छा !

शनिवार, १७ जून, २०१७

अजातशत्रू, अष्टपैलू व्यक्तिमत्व - उज्ज्वल !



व्यक्ती आणि वल्ली श्रुंखलेतील हे तिसरं पुष्प ! दुसऱ्या आणि तिसऱ्या पुष्पांमध्ये  बराच कालावधी गेला ह्याला विविध कारणं आहेत. आज ज्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंचं वर्णन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तो प्रयत्न कितपत झेपणार ह्याविषयी असलेली साशंकता हे ह्यातील मुख्य कारण! फारशी पुर्वतयारी न केल्यानं पहिल्या दोन व्यक्तिमत्वांवर सुद्धा काहीसा अन्याय झाला आहे त्या चुकीची दुरुस्ती भविष्यात केव्हातरी!

आजचं व्यक्तिमत्व आहे श्री. उज्ज्वल म्हात्रे.  एखादी व्यक्ती प्रसिद्ध होण्यामागं त्या व्यक्तीचं व्यावसायिक यश, सामाजिक कार्य, मनमिळाऊपणा , उमदं व्यक्तिमत्व, कुटुंबवत्सल वृत्ती, एखाद्या व्यक्तीच्या मदतीसाठी सर्वस्व झोकुन देण्याची वृत्ती असे गुण कारणीभूत असतात. बऱ्याच वेळा एक व्यक्ती एक गुण असा आपणास अनुभव येतो. पण उज्ज्वल ह्यांच्या बाबतीत मात्र हे सर्व गुण एकत्र सामावलेले दिसुन येतात. 

ह्या ब्लॉगपोस्ट मध्ये उज्ज्वल ह्यांना संबोधित करताना आदरार्थी एकवचन वापरावं की त्यांचा उल्लेख एकेरी करावा ह्याबाबतीत मोठा द्विधा प्रसंग निर्माण झाला आहे. परंतु उज्ज्वल ह्याचा स्वभाव लक्षात घेता मी त्याला एकेरी संबोधण्याचं स्वातंत्र्य घेत आहे.   

सामाजिक कार्य 

वसईत विविध सामाजिक स्तरांवर उज्ज्वल कार्यरत असतो. स्वतः जरी अंधेरीला राहत असला तरी तो बहुतांशी सर्व कार्यक्रमांसाठी जातीनं वसईला हजर राहतो. सुरुची बाग समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम असो, डिजिटल इंडिया मोहिमेच्या निमित्तानं वसईतील कोळीवाड्यातील कोळी बांधवाना कॅशलेस व्यवहाराचं प्रशिक्षण असो किंवा वसईतील आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्किंगचं माहात्म्य सांगण्याचं व्यासपीठ असो ह्या सर्वांमध्ये त्याचा सारख्याच उत्साहानं सहभाग असतो. 

डिजिटल इंडिया मोहिमेच्या निमित्तानं त्यानं आपल्या कंपनीतील बराचसा व्यवसाय स्थानिक उभरत्या उद्योजकांना देऊन एक नेक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं.  

वसईच्या सामाजिक जीवनातील तीन महारथी पहा इथं एकत्र आले आहेत त्या समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतामोहिमेनिमित्त ! 





सामाजिक कार्य करून झाल्यानंतर नक्कीच ह्या माशाचा आस्वाद घेण्याइतकी रसिकवृत्ती उज्ज्वल बाळगुन आहे.  




डिजिटल माध्यमातुन कोळीणीला पेमेंट करताना तिच्याशी माशाच्या भावाविषयी घासाघीस कशी करायची ह्या विषयी मित्रमंडळींना  मार्गदर्शन करण्यासाठी उज्ज्वल एका व्हाट्सअँप ग्रुपची स्थापना करणार असं मी ऐकून आहे.

व्यासपीठावर आपलं ज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं उज्ज्वल मांडतो आणि त्यामुळं त्याला वसईतील कार्यक्रमांत आग्रहाचं बोलावणं असतं. 



म्हणतात ना की एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळू नये! उज्ज्वलनं केलेली अनेक सत्कार्य अनामिक राहण्याच्या त्याच्या निर्णयाचा आदर म्हणून मी इथं उद्धृत करत नाही. 

आपल्या भोवताली असलेल्या आपल्या मित्रमंडळींच्या अज्ञानाविषयी उज्ज्वलला बरीच तळमळ आहे. त्यामुळं तो त्यांना अधुनमधून जीवनविषयक सल्ले देत असतो. परंतु ही अज्ञानी बाळे ज्ञान मिळविण्याच्या अमुल्य संधीचा वापर न करता उज्ज्वलला बाबाजी म्हणून संबोधितात. परंतु हताश न होता उज्ज्वल आपलं ज्ञानवाटपाचं कार्य व्हाट्सअँपवर अखंडपणे चालू ठेवतो. 


उमदं व्यक्तिमत्व 

हॉलिवूड, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट ह्या तिन्ही सिनेउद्योगात लीलया सामावुन जाण्यासारखं व्यक्तिमत्व उज्ज्वलला लाभलं आहे. 

हॉलिवूडमधील नायकासाठी  फिट होणारे त्याचे हे फोटो ! 





बॉलीवूडमधील नायकासाठी फिट होणारा त्याचा हा फोटो!



आणि हा खास मराठमोळा उज्ज्वल! 



बहुदा ह्यातील कोणत्या व्यवसायाची निवड करावी ह्याविषयी खात्री न झाल्यानं उज्ज्वल चित्रपटव्यवसायापासून दूर राहिला असावा आणि त्यामुळं चित्रपटसृष्टी एका देखण्या अभिनेत्याला मुकली. 

कुटुंबवत्सल वृत्ती

व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीनं पुढाकार घेणारा उज्ज्वल तितकाच कुटुंबवत्सल आहे. आपल्या बिझी कार्यभारातून कुटुंबासाठी वेळ काढण्यासाठी तो तितकाच आग्रही असतो. 




मध्यंतरी त्याच्या मुलानं आपल्या पित्याविषयी आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त केल्या. 



I keep coming back to one thought. Never will you meet a man who more faithfully lived his values.

My father is a teacher of all things. His method is simple and "street forward". He teaches by example. 

At any age, when faced with an ethical dilemma, after reflection, study, or even rationalization, I find myself coming back to one simple question. What would Dad do? His character is the foundation of my concise.

My father is strong in body, in spirit, and in commitment. My father never let another man down. He fulfills every obligation he ever undertakes. His word is his bond.


परवाच दहावीचा निकाल लागला त्यात उज्ज्वलचा भाऊ प्रीतम म्हात्रे ह्याच्या मुलानं म्हणजेच पौरसनं ९८.८०% टक्के मिळवुन संपुर्ण वसई तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याबद्दल पौरस, त्याचे मातापिता, उज्ज्वल  आणि संपुर्ण म्हात्रे परिवाराचं मनःपुर्वक अभिनंदन !

व्यावसायिक यश 



उज्ज्वल हा ओरिएंट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेच्या डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे. ह्या कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीचा देशभर आणि जगभर खप वाढविण्यासाठी तो आणि त्याची सेल्स टीम सतत झटत असते. गेल्या पंचवीस वर्षात ह्या कंपनीला काही मोठी, बहुमान्य अशी अनेक डील्स जिंकून देण्यात उज्ज्वलने मोठा वाटा उचलला आहे. कंपनीचे धोरणआखणी, व्यवस्थापनीय सल्लागार ह्या बाबतीत उज्ज्वलने  गेल्या २२+ वर्षांत आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या कामानिमित्त त्याने चाळीसहुन अधिक देशांचा प्रवास केला आहे. इतके सर्व देश पाहिल्यावर उज्ज्वल जेव्हा "गड्या आपला देशच बरा!" असं मोठ्या अभिमानानं म्हणतो त्यावेळी त्याच्या ह्या म्हणण्याला नक्कीच वजन असतं.   

ओरिएंट टेक्नॉलॉजी ही एक आपल्या कर्मचारी वर्गाच्या हितासाठी झटणारी कंपनी आहे. ह्या कंपनीनं आपल्या कर्मचारीवर्गाला वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांना बदलत्या काळासोबत आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचं बाळकडू दिलं आहे. ह्या कंपनीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी उज्ज्वल स्वतः कंबर कसुन जोमानं मेहनत घेतो.  

उज्ज्वलनं पंचवीस वर्षांपूर्वी जी दूरदृष्टी दाखवली ती अत्यंत कौतुकास्पद आहे. ज्या काळात बहुतांशी मध्यमवर्ग नोकरीच्या मागे धावत असे त्याकाळात त्यानं संगणकीय क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा दूरगामी निर्णय घेतला आणि तो आपली बुद्धी आणि मेहनत ह्याच्या जोरावर यशस्वी करुन दाखवला. आपण मोठ्या मेहनतीनं मिळविलेल्या स्थानाचा वापर करत त्यानं अनेक होतकरू मध्यमवर्गीय मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  


क्रिकेट  

आम्ही शाळेत माजी विद्यार्थ्यांची स्पर्धा NPL (New English School Premier League) आयोजित करत असतो. ह्या आयोजनाच्या वेळी उज्ज्वलचा खूप आधार असतो. उज्ज्वल स्वतः एक जबरदस्त फलंदाज आहे. २०१२ साली NPL सुरु होण्याआधी १९८३, ८५ आणि ८८ ह्या तीन बॅचनी काही ओव्हरआर्म सामन्यांचे आयोजन केलं होतं. ८३ विरुद्ध ८८ ह्या सामन्यात त्यानं आघाडीला फलंदाजीला जाऊन जबरदस्त आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केलं होतं. परंतु बाकीच्या ८३ च्या सहकाऱ्यांनी साथ न दिल्यानं त्याचा संघ सामना हरला. त्यानंतर मात्र त्यानं प्रत्येक सामन्यात ८८ ला पराभूत केलं आहे. बाकी सर्व संघांशी जोमानं खेळणारा ८८ चा संघ ८३चे अमोल आणि उज्ज्वल सामोरे आले की गडबडून जातो हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. पुढील वर्षी तुझ्या बाबांच्या संघाला थोडीफार संधी देऊ हे त्यानं सोहमला ह्या NPLच्या वेळी दिलेलं आश्वासन तो कितपत पाळतो हे पाहुयात! 

उज्ज्वलच्या क्रिकेटकौशल्याची वर्णनं करताना आम्ही सर्वजण आपल्या मराठी भाषेतील कौशल्य पणाला लावतो! ही पहा घारीसारखी तीक्ष्ण नजर!



२०१७ च्या NPL मधला त्यानं चित्त्याची धाव घेऊन केलेला धावबाद हा NPL
च्या इतिहासात १००० वर्षे संस्मरणात राहील ह्यावर सर्वांचं एकमत आहे. 

यंदाच्या NPL स्पर्धेच्या विजेत्या १९८३ संघासोबत उज्ज्वलचा हा फोटो ! 




मनमिळाऊ व्यक्तिमत्व  

उज्ज्वलला जो कोणी भेटतो तो त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचं सदैव गुणगान करत राहतो. कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही सामाजिक / आर्थिक स्थरातील लोकांशी उज्ज्वल सारख्याच मोकळेपणानं मिसळू शकतो. कोणत्याही विषयावर एखादं Engaging Conversation (गुंगवून ठेवणारं संभाषण) करण्यात फार मोजकी लोक उज्ज्वलचा हात धरू शकतील. 

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तो माझ्यासोबत जे. पी. मॉर्गनच्या व्यवसायाविषयी सहजपणं तासनतास बोलू शकतो पण सामाजिक माध्यमात कंपनीविषयी काही बोलायचं नाही ही ढाल पुढे करून मी माझं सव्वा लाखाची झाकली मूठ तशीच ठेवतो. त्याचप्रमाणं दरवर्षी NPL निमित्तानं त्याची आणि माझ्या मुलाची सोहमची मैत्री द्विगुणित होत चालली आहे. सोहमला असलेलं गाड्याचं आकर्षण लक्षात घेऊन तो त्याच्याशी सुद्धा पाच दहा मिनिटं गप्पा मारण्यात व्यतीत करतो. 

एखाद्याला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत उज्ज्वल पाळतो हे मी ऐकून होतो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला मी घरी काही मित्रांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळी आला. केवळ मला दिलेला शब्द पाळण्यासाठी तो अंधेरीहून रात्री १० वाजता आला आणि केवळ १० मिनिटं आमच्यासोबत घालवुन पुन्हा आपल्या कामासाठी निघून गेला.   

इतक्या व्यग्र वेळापत्रकात सुद्धा उज्ज्वलची विनोदबुद्धी कार्यरत असते. सोशल मीडियावर कोणी अगदी गंभीर उपदेश करणारा मेसेज वगैरे टाकला असेल तर वरवर निरागस वाटणारा पण खरंतर मिश्किल असणारा प्रश्न विचारण्यात उज्ज्वलचा हातखंडा आहे. म्हात्रे कुटुंब विरुद्ध पाटील कुटुंब वगैरे काल्पनिक लढे निर्माण करुन मला तो शाब्दिक लढ्यासाठी प्रवृत्त करत असतो.  

त्याच्याविषयीच्या ह्या काही परिचितांच्या /  मित्रगणांच्या प्रतिक्रिया 

१> He is very nice person at heart and easy to get along with, easily approachable, down to earth. So many Good qualities he has..

२> Energetic; any time ready for any work for others. 

३> उज्ज्वल जितक्या सहजरित्या लवकर लोकांशी मिक्स होतो ते अत्यंत कौतुकास्पद आहे. 

४> उज्ज्वल आणि माझी ओळख फक्त तीन चार वर्षांपुर्वी शाळेत झाली पण त्याच्याशी बोलताना असं कधी जाणवलं नाही की आताच ओळख झालीय! असं वाटत राहतं की कित्येक वर्षांपासुन आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. 

बाकी लिहिण्यासारखं अजुन बरंच आहे उज्ज्वलविषयी ! मला पामराला जितकं जमलं तितकं लिहिलं! मित्र उज्ज्वल सर्वांच्या चुकांना मोठ्या मनानं माफ करतो ह्याविषयी मी निःशंक आहे! 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...