मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

Trapped - भाग ५


"आर्यन" मुलाचं नाव "आर्यन"! हॉलमध्ये मोठ्यानं उदघोषणा झाली आणि सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. आपल्या आईच्या तब्येतीची खंत बाजुला ठेवून योगिनीनं आपल्या नवीन विश्वात प्रवेश केला होता. स्वामी अगदी सराईतसारखा सर्व नातेवाईकांशी मिळून मिसळून वावरत होता. 

बारसं आटपलं आणि सर्व पाहुणे आपापल्या घरी परतले. आर्यनला घेऊन मोठया आनंदात स्वामी आणि योगिनी घरी प्रवेश करते झाले. आर्यनच्या बाललीलांनी योगिनी अगदी मनापासुन खुश झाली होती. अचानक स्वामीला भ्रमणध्वनीवर फोन आला. 

"स्वामी, तुला दिलेली तीन वर्षांची मुदत आम्ही आता कमी करत आहोत. तुला पुढील महिनाअखेरी नवीन कामगिरीवर रुजू व्हावं लागेल." स्वामीचा बॉस निर्वाणीच्या स्वरात स्वामीला आज्ञा देत होता. स्वामीने फोन ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासीचं सावट पसरलं. "काय झालं स्वामी? " योगिनीने चिंतेच्या स्वरात विचारलं. ह्या क्षणी योगिनीला ह्यातलं काही सांगणं स्वामीला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळं त्यानं वेळ मारुन नेली. दिवसभर कार्यक्रमाच्या तयारीनं आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाने थकलेली योगिनी आर्यनच्या बाजुलाच काही वेळातच निद्राधीन झाली. रात्रीच्या चंद्राची किरणे त्या दोघांच्या निरागस चेहऱ्यावर पडली होती आणि त्या दोघांकडे पाहत रात्र जागवणाऱ्या स्वामीच्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरु होतं. 

पुढील काही दिवस स्वामीचं ऑफिसातील काम खूपच वाढलं होतं. किंवा त्यानं योगिनीला तसं सांगितलं होतं. आणि मग तो दिवस उगवला. स्वामीनं आज सुट्टी घेतली होती. योगिनीने बाळाला चांगलं न्हाऊ घातलं आणि आर्यन काही वेळातच झोपी पुन्हा गेला. स्वामीने मग आपलं काम सुरु केलं. योगिनीचं डोकं अचानक दुखू लागलं. "स्वामी स्वामी बघ ना! मला काही विचित्रच होतंय!" घाबरीघुबरी झालेली योगिनी स्वामीजवळ आली. आणि स्वामीने बाम म्हणुन तिला आपल्याजवळील एक लोशन दिलं. त्या लोशनच्या प्रभावाखाली योगिनी चांगली दोन तासभर झोपली होती आणि त्या वेळात स्वामीने आपल्याला हवे ते बदल घडवुन आणले होते. 

योगिनी उठली ती अगदी भयभीत होऊनच! तिच्या आधीच्या सर्व  आठवणी जागृत झाल्या होत्या. स्वामीकडं ती भयानं पाहत होती. 
"घाबरू नकोस योगिनी!" स्वामीने अगदी आश्वासक स्वरात तिला म्हटलं. 

"तुला जे काही आठवतंय ते सर्व खरं आहे! पण तुझा हा स्वामी आता बदलला आहे!" स्वामीच्या ह्या बोलण्यानं योगिनी अजुनच गोंधळली होती. 

"आमच्या प्रयोगाची खरी मुदत तीन वर्षे होती पण आता अचानक मला पुढील तीन दिवसात सर्व काही सोडुन पृथ्वीवरुन निघुन जावं लागणार आहे! आणि आता मी जे काही धाडस करीत आहे त्याचा थांगपत्ता जर माझ्या वरिष्ठांना लागला तर कदाचित हे आपलं शेवटचंच बोलणं असेल!" 

"तू हे जे काही बोलत आहे ते मला अजिबात समजत नाहीये!" योगिनीला आता धीर आला होता. 
"तू कोणतं धाडस करत आहेस? तू तर इथं शांतपणे माझ्याशी बोलत बसला आहेस!" ती पुढं म्हणाली. 

"मूळ योजनेनुसार आर्यन तीन वर्षाचा झाला की मी ह्या देहातुन निघुन जाणार होतो आणि तुझा मूळचा स्वामी सक्रिय झाला असता. आणि आम्ही आर्यनला आमच्या पद्धतीनं निरीक्षणाखाली ठेवला असता. आणि तुझ्या स्मृतीचा तो भाग कायमचा नाहीसा केला असता." स्वामी बोलत होता. 

"पण मी तुझ्यात गुंतत गेलो ते पाहुन आमच्या वरिष्ठांनी माझी मुदत लवकर संपविण्याचा निर्णय घेतला आणि मी ह्या देहातून बाहेर पडताना हा देहच नष्ट करण्याचा निर्णय घेतला!" स्वामीच्या बोलण्यानं योगिनीला धक्क्यावर धक्के बसत होते. 

"त्यामुळं मी आज हे धाडसी कृत्य केलं! तुझ्या स्मृतीचा तो भाग सक्रिय केला आणि मी बाहेर पडताच तुझा मूळ स्वामी परतेल ह्याची योजना केली आहे!" 

"खरंतर ही गोपनीय माहिती परक्या व्यक्तीला कळली तर आमची सुरक्षाप्रणाली सक्रिय होते आणि मग ज्या परकी व्यक्तीला हे रहस्य माहित पडलं असतं तिचा मानवी जातीशी संपर्क उपलब्ध विविध मार्गांपैकी एखाद्या मार्गानं कायमचा तोडला जातो!" स्वामीच्या ह्या बोलण्यानं योगिनीच्या डोक्यात प्रकाश पडला होता. 

"माझी आई बरी होईल ना स्वामी?" योगिनीने काकुळतीला येऊन स्वामीला विचारलं. 

"मला वेळ मिळाला तर नक्की होईल! पण माझ्या प्राधान्यक्रमात ते पहिल्या तिघांत नाहीये! " स्वामी काहीशा कठोरतेने म्हणाला. 

"मी सध्या आमच्या सुरक्षाप्रणालीला छेद दिला आहे आणि त्यामुळं मी तुझ्याशी इतकं सारं बोलू शकत आहे!" 

"स्वामी, हो तू स्वामी - तूच इथे थांब ना!" योगिनीच्या डोक्यातील विचारचक्र अगदी जोरात चाललं होतं. 

"तुला काय वाटलं, माझा आधीचा स्वामी परत आणुन तू माझ्यावर मोठी कृपा करतोयस? अरे मी आधी त्याच्यात पूर्ण भावनिकदृष्ट्या गुंतले होते त्यावेळी तुम्ही त्याला परत नेलंस! नंतर तुम्ही माझ्या स्मृतीशी खेळलात आणि माझ्या विस्मृतीचा फायदा घेऊन तू मला माझ्यात गुंतवलंस! आणि आता सोयीस्कररित्या तू मला सांगतोयस की आपल्या मूळच्या स्वामीकडे परत जा! त्याच्यात गुंत! अरे स्त्री हृदयाचा काय खेळ मांडला आहे तुम्ही! " योगिनीचा हा अवतार स्वामीला पूर्णपणे अनपेक्षित होता. 

"तू जर इथं थांबू शकत नसशील तर आम्हां दोघांना सुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल! तुझ्या विश्वात!!" योगिनीने आपल्या मनातील सर्व काही एका दमात बोलुन दाखवलं. 

"आर्यनला तर तसंही एके दिवस आमची लोक परत घेऊनच जातील!" स्वामी मोठ्या निर्विकारपणे म्हणाला. 

"का म्हणून!" योगिनी झोपलेल्या आर्यनकडे पाहत जवळपास ओरडलीच! 

"कारण तो आमचा आहे म्हणुन!" स्वामीच्या निर्विकारपणात काही फरक नव्हता. 

"तुमचा का म्हणून तुमचा?" योगिनीला अजून एक धक्का बसला होता. 

"त्याच्या बापाचं शरीर मनुष्याचं असलं तरी त्यात वास्तव्य करणारा मी परग्रहवासी आहे, हे गोष्ट विसरू नकोस योगिनी!"  स्वामीनं आपलं बोलणं जवळपास आटपत घेतलं. 

ह्या दोघांच्या जोराच्या बोलण्यानं आर्यनची झोप नाही म्हणा चाळवली गेली होतीच.

"आणि हो एक लक्षात ठेव! ह्या पुढं काहीही होऊ शकत. जरी मी तिसऱ्या दिवशी बाहेर पडणार असलो तरी कोणत्याही क्षणी मला परतावं लागण्याची शक्यता आहे! त्यामुळं All The Best!" स्वामीच्या डोळ्यात अश्रू खरोखर आले होते की आपल्याला भास झाला होता हे योगिनीला कळलं नाही!

(क्रमशः)


मागील भागाच्या लिंक्स
भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

Trapped - भाग ४



स्वामी आणि त्याच्या सहसदस्यांची मोठ्या तावातावानं चर्चा सुरु होती. सुधाताईंना पृथ्वीवासीयांपासुन shut off करायचं ह्याविषयी सर्वांचं एकमत होतं. पण योगिनीच्या भवितव्याविषयी मात्र सर्वांचं एकमत होत नव्हतं. शेवटी त्यांच्या मुख्यानं स्वामीला दटावलंच . "No emotions Swami. You will have to obey our instructions!" emotions हा शब्द स्वामीला प्रथमच ऐकायला मिळाला असला तरी दुसरं वाक्य मात्र त्याला पुर्णपणे समजलं.

सुधाताईंना कसं सुचलं कोणास ठाऊक पण त्यांनी अचानक आपल्या मुलाला म्हणजेच भावेशला फोन केला. योगिनीनं जे काही त्यांना सांगितलं होतं ते सर्वकाही त्यांनी भावेशला सांगितलं होतं! आणि भावेशच्या सुदैवानं सुधाताई आणि योगिनीच्या भवितव्याच्या चर्चेत गुंतलेल्या स्वामी आणि मंडळींच्या नजरेतून हे एका मिनिटांचं बोलणं हुकलं होतं. 

सुधाताई आणि योगिनी दोघीजणी कोल्हापुरच्या गाडीत बसल्या खऱ्या पण दोघांच्या मेंदूत आमुलाग्र बदल होत होते जे त्यांना झेपणं कठीण झालं होतं. रात्रीच्या वेळी त्या कोल्हापुरातल्या घरी पोहोचल्या खऱ्या पण तुम्ही तडकाफडकी इथं का आल्यात ह्या प्रश्नाचं उत्तर सुधाताईंकडे नव्हतं आणि आपली आई आपल्याशी खोटं का बोलली हे योगिनीला अजिबात कळत नव्हतं. 

दुसऱ्या दिवशीची सकाळ उगवली ती सुधीरभाऊंच्या कुटुंबात वादळ घेऊनच! सकाळी नित्यनेमानं साडेपाचला उठून बसणाऱ्या सुधाताई सात वाजले तरी झोपूनच होत्या. "दमली असेल कालच्या प्रवासानं बिचारी!" सुधीरभाऊंचा स्वतःचीच समजुत घालण्याचा संयम सात वाजेपर्यंत चहा न मिळाल्यानं संपुष्टात आला होता. "अगं सुधा, उठ आता सात वाजले बघ!" सुधीर ह्यांच्या हाकेनं सुधाताई उठल्या खऱ्या पण त्यांची आढ्याला लावून पाहणारी शुन्यातील नजर सुधीरभाऊंना भयभीत करुन गेली. सुधाताई त्यांना ओळखण्याची अजिबात चिन्हं दिसत नव्हतं. आपल्या आईबाबांच्या कोलाहलानं जागी झालेली योगिनी धावतच सुधाताईंच्या खोलीत आली. 

पुढील काही दिवस जोग कुटुंबियांना अगदी खडतर गेले. उत्तमोत्तम डॉक्टरांना सुधाताईंना दाखविण्यासाठी त्यांच्या अनेक फेऱ्या चालु होत्या. योगिनीने तर खुपच धावपळ केली. पहिल्याच दिवशी हा सगळा तणाव तिच्या झेपण्यापलीकडं गेला होता. नमिता तर शिकण्यासाठी पुण्यात होती आणि परीक्षा चालू असल्यानं तिला काही ताबडतोब येता येणार नव्हतं. कोणास ठाऊक पण का भावेश ह्या सगळ्या प्रकारापासून अलिप्त राहत होता.योगिनी आणि वडिलांना मदत करण्याऐवजी तो आपलं वागणंच निरखुन पाहतो आहे असंच तिला राहून राहून वाटत होतं. आई कोणालाच ओळखत नव्हती. तिच्या जवळपास कोणी गेलं की मोठं अकांडतांडव करायची! शेवटी मग गुंगीचं औषध देऊनच तिला शांत करावं लागायचं. सुधीरभाऊनी तर आशा सोडली होती. शेवटी हा सगळा तणाव असह्य होऊन तिनं स्वामीला फोन लावला. 

तिचा फोन येणं हे स्वामीला अपेक्षितच होतं. तो तात्काळ कोल्हापूरला धावतच आला.   "मी तिच्याशी बोलुन येतो!" स्वामी म्हणाला. बाकी सर्वजण अगदी दमल्यामुळं कोणी काही म्हटलं नाही. स्वामी तिच्याशी दहा पंधरा मिनिटं काही बोलला कोणास ठाऊक पण सुधाताई त्यानंतर अगदी माणसात आल्या. अगदी स्वतःच्या हातानं व्यवस्थित जेवल्या देखील! योगिनीला आपल्या नवऱ्याचं मोठं कौतुक वाटलं. स्वामी आठवडाभराची सुट्टी घेऊन कोल्हापुरात थांबला. आई बऱ्यापैकी नियंत्रणात आली. भावेशदेखील मोठ्या अदबीनं स्वामींशी वागत होता. 

योगिनीला गेले कित्येक दिवस एकटं राहण्याची वेळ आली नव्हती आणि जरी आली असती तरी तिला आता एकटेपणात देखील काही काही आठवणार नव्हतं! 

योगिनी ह्या सर्व प्रकारात मनानं स्वामीच्या खूप जवळ आली होती. आई थोडीफार बरी झाली आणि मग तिनंच आपण कोठेतरी फिरायला जाऊयात असं स्वामीला सुचवलं. आणि कधी नव्हे ते स्वामीने कामाचा काही बहाणा न करता मनालीची तिकिटं बुक केली होती. 

ती दोघं फिरायला गेली आणि आईचं वागणं पुन्हा बिनसलं. पुन्हा तिचं खोलीत बंद करुन घेणं, बाकी सर्वांपासुन दूर राहणं वगैरे प्रकार वाढीस लागले होते. सुधीरभाऊंची वाढीस लागलेली आशा मात्र पुन्हा मंदावली होती. पण भावेश मात्र आता आईकडे व्यवस्थित लक्ष देत होता. आणि ह्या दोघांना आपण फोन करुयात नको असं त्यानंच सुचविलं होतं. 

भावेशला बहुदा आईच्या वागण्यातील लय समजली होती. त्यामुळं तिला तिची स्वतःची स्पेस देऊन तिचा मूड चांगला राखण्याची त्याने कला साधली होती. सुधीरभाऊंनीसुद्धा आपल्या नशिबाला स्वीकारलं होतं.  आणि त्यामुळं स्वामी आणि योगिनी परस्पर सुट्टी आटोपुन मुंबईला परतले होते. 

दिवस नेहमीप्रमाणं मोठ्या गतीनं पुढं चालले होते. स्वामी कामात गढुन गेला होता. आज त्याला ऑफिसातून यायला काहीसा उशीर झाला होता. त्यानं घरी प्रवेश केला तर योगिनीचा चेहरा काहीसा प्रसन्न असल्याचं त्याला जाणवलं. फ्रेश होऊन तो आला आणि सोफ्यावर बसला. आणि त्याची नजर समोर भिंतीवर लावलेल्या कैलेंडरवर गेली. एका गोंडस बाळाचा फोटो त्यावर झळकत होता. त्याच्या डोक्यात प्रकाश पडायला काही सेकंद गेले आणि मग त्यानं परमानंदानं योगिनीकडं पाहिलं. "खरं की काय?" त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाला सीमा नव्हती. आपल्या ओढणीत चेहरा लपवत योगिनीनं मानेनंच होकार दिला! 

पुन्हा एकदा स्वामी आणि त्याच्या वरिष्ठांत मतभेद झाले होते. "Swami, you can't be emotional; the countdown has begun now! You have three more years to live on this planet!" त्याचा वरिष्ठ मोठ्या रागानं त्याच्याशी बोलत होता. "सॉरी सर! मी आपल्याकडं ह्या ग्रहावर कायमची राहायची परवानगी मागु इच्छितोय!" स्वामीच्या ह्या उत्तरानं अवाक झालेले त्याचे वरिष्ठ त्याच्याकडे पाहताच राहिले! emotions ह्या शब्दाशी स्वामी आता चांगलाच परिचित झाला होता. 

(क्रमशः)

मागील भागाच्या लिंक्स
भाग १
http://patil2011.blogspot.in/2016/09/trapped.html

भाग २
http://patil2011.blogspot.in/2016/09/trapped_18.html

भाग ३
http://patil2011.blogspot.in/2016/09/trapped_25.html

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

आकर्षक वेष्टन!



दोन तीन वर्षांपूर्वी ह्याच विषयावर एक पोस्ट लिहली होती. आता पोस्टला साधर्म्य असणारा शब्द स्फुट! पण स्फुट म्हटलं की एक किमान कलात्मक पातळी, साहित्यिक दर्जा असावी असा माझा समज! त्यामुळे मी आपला बापुडा ह्या लिखाणाला पोस्टच म्हणतोय!

IT सारख्या तुलनात्मकदृष्ट्या तरुण असणाऱ्या व्यावसायिक क्षेत्रात काम करताना मध्यंतरी आपण आता वयाने आणि विचाराने बुजुर्ग झाल्याची भावना वाढीस लागली होती. पण नंतर मग वयाने तरुण असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांशी चर्चा करताना काही सुखद धक्के मिळाले. त्याचाच सारांश म्हणजे आजची पोस्ट!

चर्चेची सुरुवात झाली आकाशवाणी, दूरदर्शनपासून! जर शांतपणे बातम्या ऐकायच्या असतील, गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर अजुनही आकाशवाणी आणि दुरदर्शनला पर्याय नाही! उगाच आरडाओरडा नाही आणि पाहुण्यांना बोलावून आपणच बोंबाबोब करण्याचा आक्रस्ताळेपणा / आगाऊपणा नाही! जीवन कसं शांत वाटतं! ५ मिनिटात मोजक्या पण महत्वाच्या बातम्या आणि त्यातसुद्धा शेवटच्या १ मिनिटात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा गोषवारा! सकाळी थोडं उशिरानं ऑफिसात जायचं असल्यानं रेडिओ चालू असतो आणि तो आम्ही बऱ्याच वेळा विविधभारती आणि मुंबई ब मध्ये फिरता ठेवतो. 

कार्यालयातील चर्चेत अजुन एक गोष्ट जाणवली. मुंबईबाहेर शहरात वाढलेली काही तरुण मुलं अजुनही पारंपरिक पद्धतीनं विचार करताना दिसतात. असाच एक मुलगा प्रत्येक पार्टीला येताना टाळाटाळ करायचा. जरा खोदून विचारलं असताना म्हणाला, "पार्टीतला धांगडधिंगा, नाचगाणी नाही जमत मला!" माझ्या मनातली गोष्ट थेट बोलला होता तो!

मग खोलवर विचार करताना काही गोष्टी जाणवतात. एक समाज म्हणुन आपण काहीसे loud बनत चाललो आहोत. आपण मुलांना ज्या प्रकारे सध्या वाढवतो आणि ज्या प्रकारे आधीची पिढी वाढली त्यात आमुलाग्र फरक दिसुन येत आहे. मूळ सत्व कमी प्रमाणात असलं तरी चालेल पण बाहेरचं आवरण आकर्षक असायलाच हवं असा गाढ समज एक समाज म्हणुन आपण करुन घेतला आहे आणि त्यामुळं सद्यकालीन प्रत्येक मुलं संगीत, चित्रकला, वक्तृत्वकला, नृत्य ह्या सर्व कलागुणांत प्राविण्य मिळविण्यासाठी झटत असताना दिसतोय! 

व्यावसायिक जगात नक्कीच स्वतःला presentable ठेवणं आवश्यक आहे. पण केवळ ह्या गुणांवर यशस्वी होऊ शकणाऱ्या मोजक्या जागा असतात. बऱ्याच जागी मूळ सत्व असणं आवश्यक आहे आणि जिथं वर्षानुवर्षांची मेहनत, संयतपणा ह्या गुंणाची आवश्यकता आहे. क्षणिक दिखाऊपणाला तिथं फारसं स्थान नाही. 

सारांश एकच - एक समाज म्हणुन आकर्षक वेष्टनाला आपण बहुदा गरजेपेक्षा जास्त महत्व देतोय! सध्या काही काळ हे सर्व खपून जाईल सुद्धा पण काही काळानं त्यावेळा आपल्याला वास्तवाची जाणीव होईल त्यावेळी कदाचित उशीर झाला असेल. आणि त्यावेळी कदाचित शांतपणे सुगम संगीत ऐकवणारी मुंबई ब सारखी स्टेशन अस्तित्वात सुद्धा नसतील!

(ह्या पोस्टमधल्या प्रतिमेतील दिसणाऱ्या व्हॉल्वचा रेडिओसारखा एक रेडिओ  आमच्या घरी जवळपास तीसवर्षे टिकला. वडिलांनी तो आमचे शेजारी जॉनी अंकल ह्यांच्याकडून जवळपास पाच सहा वेळा दुरुस्त करुन घेतला. ह्या रेडिओवरुन सकाळच्या सहा वाजता लागणाऱ्या मंगलप्रभात कार्यक्रमात लागणाऱ्या  "माझे माहेर पंढरी" ह्या भीमसेन जोशींच्या सुरेल आवाजातील गाण्यानं जाग येण्याचं भाग्य लाभणारी आमची सुदैवी पिढी!!) 

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

स्थलांतर!



मुंबईबाहेरील एखाद्या शहरास भेट दिली की काहीसं वेगळं जाणवतं. काहीसं वेगळं म्हणजे आयुष्य मुंबईत राहुन जितकं धकाधकीचं वाटतं तितकं सर्वत्र नाहीय, जगात जागेची कमतरता मुंबईत राहुन जितकी जाणवते तितकी सर्वत्र नाही ह्याची जाणीव होते. शांत जीवनाचं मुंबईच्या आसपासचं उदाहरण म्हणजे आमची वसई! पण तिथं चांगल्या नोकरीधंद्याच्या संध्या अजुन उपलब्ध नाहीत आणि नजीकच्या भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता कमी! त्यामुळं आयुष्यातील कित्येक वर्षे वसईच्या वास्तव्याशिवाय व्यतित करावी लागतात ह्याची मनाला खंत जाणवते. 
मग मनात विचार येतो तो अशा एखाद्या तुलनात्मक दृष्ट्या जागेची ऎसपैसता असणाऱ्या आणि रहदारी अजुनही काबुत असणाऱ्या भारतातील इतर शहरात नोकरीसाठी जाऊन वास्तव्य करण्याची मानसिकता  मुंबई आणि आसपासच्या भागातील तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे का? थोडं खोलवर पाहिलं तर ह्यात जाणवणारे काही सूक्ष्म मुद्दे !

१> मी  मुंबई सोडुन भारतातील इतर शहर असा उल्लेख केला. 'मुंबई सोडुन भारतातील इतर शहर' आणि 'मुंबई सोडुन जगातील इतर शहर'
ह्या दोन पर्यायांमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टीनं नक्की फरक कोणता? व्हिसा मिळविण्याचा आणि आपल्या मुलाबाळांना कशा प्रकारे वाढवु शकु ह्याचा विचार करण्याचा?

२> भारतातील इतर शहर आणि पुणं ह्या दोन पर्यायांमध्ये  निर्णय घेण्याच्या दृष्टीनं नक्की फरक कोणता? जागतिकीकरणाचा अजुन किती अनुभव आपल्याला आवश्यक आहे की आपण महाराष्ट्रातील शहरे आणि महाराष्ट्राबाहेरील शहरे ह्यांना एका तराजूत मांडुन त्यांची तुलना करु शकु?

३> स्थलांतर करण्याच्या ह्या निर्णयामधील वसईसारख्या गावातून आलेल्या आणि आपल्या गावाशी घट्ट नाळ टिकवुन असलेल्या तरुणांची मानसिकता आणि मुंबईसारख्या शहरात वावरुन survival instinct ला जास्त महत्व देण्याची गरज भासण्याची शक्यता निर्माण झालेल्या तरुणांची मानसिकता ह्यातील फरक काय? आता मुंबईत पण पार्ल्यासारखी उपनगरं अजुनही आपली घट्ट ओळख (identity) टिकवून आहेत. तिथं लहानपणापासुन वाढलेल्या तरुणास हा स्थलांतराचा निर्णय घेताना बाकीच्या तरुणांपेक्षा काही वेगळंपण जाणवेल का?

४> ही जी पर्यायी शहरं मी म्हणतोय ती किती काळ मुंबईला भेडसावणाऱ्या समस्यांपासुन स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतील? बंगलोर तर हळूहळू आवाक्याबाहेर जाऊ लागलंच आहे. हैद्राबाद आणि चेन्नईला किती वेळ लागणार?

५> समजा पती पत्नी पैकी एकालाच दुसऱ्या शहरात नोकरी / व्यवसायाची संधी मिळाली, तर घरकामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सदस्यास बाहेरच्या समाजाशी सोशल लाईफ मध्ये एकरुप होण्यास वाव मिळेल का?

असे अनेक मुद्दे विचार करण्यासारखे! पण एक गोष्ट मात्र खरी! भारतातील इतर शहरांत जाऊन वास्तव्य करणाऱ्या तरुणांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच जाणार! आजही आपल्या प्रत्येकाच्या ओळखीतल्या बऱ्याच मराठी तरुणांनी हा निर्णय घेतला आहे. भौगोलिक अंतर जरी शेकडोच्या घरात असलं तरी विमानानं ही शहरं तासा- दोन तासांच्या अंतरावर आहेत!  

मी काहीसा एकांगी विचार करतो असं मला जाणवतं! संस्कृती एका बाजुला आणि व्यावसायिक संधी दुसऱ्या बाजुला असा पर्याय ठेवला असता आयुष्याच्या ह्या वळणावर मी व्यावसायिक संधींचा पर्याय निवडताना मला जाणवतंय! त्यामुळं दुसरी बाजू जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल!

आजच्या पोस्टचा सारांश - भविष्यात तुम्ही किंवा तुमची मुलं भारतातील इतर शहरांत जाऊन कायमचं वास्तव्य करण्याची शक्यता वाढीस लागणार! आणि मग बहुदा निवृत्तीनंतर सुद्धा ह्यातील काहीजण तिथंच राहतील! आणि मग हैदराबादेत "आयुष्याची सायंकाळ व्यतित करणारा मराठी म्हातारा" वगैरे पुस्तके प्रसिद्ध होतील! बाकी ती मराठीत होतील की तेलगुमध्ये? देव जाणे!!

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

अदृश्य कॅमेरा!





माझं जीवनगाणं दररोज सुरु असतं. मी प्रत्यक्षात आणि सोशल मीडियाद्वारे अनेकांच्या संपर्कात येत असतो. ह्या संपर्कांचा अवधी बदलता असतो. ह्या अवधीत मी ज्या प्रकारे बोलतो, चालतो, आपली मतं मांडतो त्या माहितीच्या (data points) च्या आधारे लोक माझ्याविषयी आपली मतं बनवत असतात. पण प्रत्यक्ष मी कसा आहे, विविध प्रसंगी माझ्या मनात नक्की कोणते विचार आले आणि सामाजिक जीवनात वावरण्याच्या तारतम्याचे भान ठेवून मी माझे मूळ विचार कसे बदलले किंवा त्यांना कसं सौम्य रुप देऊन मग माझे आचरण केलं, हे नक्की मला तरी माहित असतं का? आणि प्रत्येक वेळी मी योग्य वागत असतो का? बहुदा नाही! कारण मी ह्या सर्व प्रसंगात आदित्य म्हणुन वावरत असतो. इतक्या वर्षांनंतर मी माझी जी काही मतं बनली गेली आहेत ही मतं माझ्या वागणुकीला प्रभावित करतात. 

समजा  एक आदर्श वागणुकीचा अदृश्य कॅमेरा माझ्या डोक्यापासून ३ - ४ फुटावर असता, आणि त्याला खालील गोष्टींचं फीड दिलं असतं 
१> माझ्या मेंदुतील चालू असणारे विचार
२> ह्या विचारांवर तारतम्यभावांची प्रक्रिया करुन मी प्रत्यक्ष वागणुकीआधी केलेले बदल 

आणि समजा ह्या कॅमेरानं मला खालील आउटपुट / विश्लेषण  दिलं असतं. 
१> माझी वागणुक आणि तात्कालीन परिस्थितीतील आदर्श वागणुक ह्यात असणारी तफावत!
२> काळानुसार माझ्या विचारपद्धतीत आणि आचरणात होणारे बदल!  

कल्पना तर भन्नाट आहे! पण बहुदा एक दोन दिवसातच मी ह्या कॅमेराचं विश्लेषण वाचणं सोडून दिलं असतं! आजच्या पोस्टचा संदेश इतकाच - असा कॅमेरा प्रत्यक्षात जरी अस्तित्वात नसला तरी आहे असं समजा आणि काही दिवस ह्यानं आपल्याला नक्की काय विश्लेषण दिलं असतं ह्याचा अंदाज बांधा! बराच विचार करता येईल आणि बरंच काही शिकता येईल!

आणि हो ह्या कॅमेरानं ज्या काही प्रतिमा दिल्या असत्या त्यातून माझे सध्या अति विरळ झालेले केस जरा आधीच समजले असते!! 

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

'काहे दिया परदेस' च्या निमित्तानं !



काही अपरिहार्य कारणांमुळं Trapped कथा रखडली आहे. अशातच काल निऊने 'काहे दिया परदेस' चा विषय काढला. आणि मग ह्या मालिकेवर पोस्ट लिहिण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही. 

मी मराठी मालिका पाहत नाही. म्हणजे स्वतःहुन पाहत नाही पण काही अपरिहार्य कारणांमुळं त्या माझ्या नजरेस पडतात. आणि माझा संताप होतो. मनोरंजन आणि समाजप्रबोधन ह्यांचा एकमेकांशी संबंध नसला तरी ठीक पण मनोरंजनाच्या माध्यमातुन आपण मोठ्या प्रमाणात मराठी कुटुंबांना आणि खास करुन गृहिणींना जुन्या मानसिकेत अडकवून ठेवत आहोत ह्याची जाणीव ह्या मराठी मालिकेच्या निर्मात्यांना नसावी ह्याचा प्रचंड खेद मला होतोय!

ह्या मालिकेतील उत्तर भारतीय कुटुंब अगदी खानदानी असल्याचा अभिमान त्या कुटुंबातील स्त्रियांच्या बोलण्यातुन जाणवतो. ह्याउलट मराठी कुटुंब आजुबाजूच्या कुटूंबांना डबे करुन पुरवणारे! उत्तर भारतीय कुटुंबाला आपल्या श्रीमंतीचा इतका अभिमान असेल तरीही उपजीविकेच्या माध्यमासाठी त्यांना मुंबईत यावं लागतं ह्याची जाणीव त्यांना कोणीही का करुन देत नाही? मराठी कुटुंबाच्या डबे बनविण्याविषयी माझा आक्षेप नाही पण कोणत्याही उद्योगास मोठं स्वरुप देण्याच्या वृत्तीचा जो अभाव बहुतांशी मराठी कुटुंबात आढळतो त्याचच प्रतिबिंब इथं दिसतं आणि मी खंतावतो!

एकंदरीत व्यावसायिक जगात वावरताना उच्चपदस्थ मराठी माणसं कमी प्रमाणात आढळताना दिसतात. त्याची मनात खंत असतेच आणि अशा वेळी मराठी मालिकांमध्ये उच्चपदस्थ मराठी माणसाचं वास्तववादी चित्रण क्वचितच आढळतं ह्याचा मोठा खेद होतो. "होणार सुन ह्या घरची" मध्ये एका यशस्वी मराठी उद्योजकाचे चित्रण दाखवलं गेलं पण ते वास्तववादी नव्हतं! सद्यकालीन ऑफिसात ज्या प्रकारचं वातावरण असतं त्याच्याशी १० टक्के सुद्धा साधर्म्य नव्हतं. बहुसंख्य मराठी गृहिणी ह्या मालिका पाहतात. आणि मागच्या काळात रमतात. आपली मुलं ह्या गृहिणी आणि आज्यांसोबत बराच वेळ काढतात. मुलं थोडी मोठी झाली की मग आपल्या काळासोबत न राहू शकलेल्या ह्या घरातील गृहिणी आणि आज्यांसोबत कनेक्ट होत नाहीत.

अजुन एक मुद्दा! बऱ्याच वेळा वास्तवात मराठी मुली परप्रांतीय मुलांशी संसार करताना आढळतात. पण त्या प्रमाणात परप्रांतीय मुली मराठी कुटुंबात लग्न होऊन येताना दिसत नाहीत. ह्यामागं नक्की काय कारण असावं? बाकी समाज ज्याप्रमाणात आपल्या घरातील मुलींना आपल्या ज्ञातीत विवाह करण्याचं बाळकडू देत असावा तितकं आपण देत नाही की मराठी मुली अधिक आधुनिक बनल्या आहेत? जाणकारांनी ह्यावर अभ्यास / विचार करावा आणि आपली मतं मांडावीत! 

घरात मराठी मालिका बघितलं जाण्याचं प्रमाण २० टक्के इतकं सिमीत ठेवावं आणि सर्व गृहिणींनी बाकीचा ८०% वेळ CNN, BBC, Discovery वगैरे वाहिन्या पाहण्यात घालवुन काळाच्या सोबत राहावं आणि आधुनिक जिजामाता बनावं असं मत व्यक्त करुन आजची पोस्ट संपवतो!

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...