मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
कुटुंब नाती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुटुंब नाती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ मे, २०२१

जीवनात ही घडी !



ह्या आठवड्यात आमच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मागं वळून पाहताना आजची ही पोस्ट ! 

आमचं जमवून आणलेलं लग्न! स्थापत्यशाखेची अभियांत्रिकी पदवी घेताना काही खास कामगिरी बजावता आली नव्हती. तरीही पदव्युत्तर शिक्षणाचा अट्टाहास आणि स्थापत्यशाखेत सात-आठ महिने नोकरी केल्यामुळं पुढील काही वर्षे नोकरीत स्थिरस्थावर होण्याची चिन्हं दिसत नव्हती. मग योगायोगानं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव झाला. तिथंही सुरुवातीच्या काही महिन्यांच्या संघर्षास सामोरे जावे लागल्यानंतर मग मात्र देवाच्या कृपेनं जम बसला. दोन वर्षे अनुभव होत नाही तोवर इंग्लंडला जायची संधी मिळाली. साधारणतः ह्या काळातच घरी लग्न जमविण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या होत्या. पण कुठे खास प्रगती होत नव्हती. अशा वेळी इंग्लंडला जाऊन आल्यावर पाहू ह्या बोलीवर घरच्यांनी इंग्लंडला पाठवलं. 

ह्याच काळात आमच्या नात्यातील गणेश पाटील ह्यांची प्राजक्तासोबत FDC ह्या कंपनीत भेट झाली. त्यांची पत्नी कविता ही आमच्या हरेश्वर मामांची मुलगी. बोलता बोलता प्राजक्ताला त्यांनी माझ्या स्थळाविषयी सुचवलं. कोणत्याही मुलीचं लग्न जमायचं असेल तर किमान सात आठ मुलं पाहावी लागतात ही प्राजक्ताची तात्कालीन समजूत ! त्यामुळं पहिल्या काही स्थळांविषयी फारसं गांभीर्यानं घेऊ नये ह्या मताची ती होती. त्यामुळं तिनं कोणतंही दडपण न घेता अगदी सहजपणे घरी आपल्या आईला ह्या स्थळाची माहिती दिली.  तिच्या आईनं आपल्या भावजयीच्या म्हणजेच प्रणिता हिच्या कानावर ही गोष्ट घातली. प्रणिताताई ही माझ्या वडिलांच्या मामेभावाची मुलगी ! ती सर्व गोष्टीत अत्यंत नियोजनबद्ध ! तिनं पुढील सुत्रं आपल्या हाती घेतली. हे सर्व मी इंग्लंडमध्ये असताना चाललं होतं. 

आमच्या घरी एकतर माझ्या लग्नाची खूपच उत्सुकता होती किंवा दडपण असावं. त्यामुळं माझ्या आईनं माझ्या वहिनीसोबत प्राजक्ताची एक भेट घेतली.  ह्या भेटीनंतर वहिनीने आईच्या सांगण्यानुसार प्राजक्ताच्या स्तुतीपर एक मोठं ई-मेल मला पाठविलं. ही तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे वगैरे वगैरे ! तिथं इंग्लंडमध्ये कहाणीला वेगळं वळण मिळालं होतं. अमेरिकन एक्सप्रेसच्या ब्रायटन ऑफिसात तीन महिन्यासाठीची माझी नेमणूक आता दीर्घकालीन होण्याची चिन्हं दिसु लागली होती. माझं वर्क परमिट असल्यानं मी तिथं दोनतीन वर्षे तरी सहज राहू शकत होतो. पहिलाच परदेश दौरा आणि त्यात वास्तव्य दीर्घकाळ होण्याची शक्यता ह्यामुळं मी काहीसा भावुक बनलो होतो. अशावेळी वहिनीच्या ई - मेलचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. पुढे हिवाळा जसजसा वाढत गेला तसतसं मी माझ्या व्यवस्थापकांना भारतात परतु देण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ती फारशी मनावर न घेतल्यानं मी स्वतः तिकिटं बुक करुन काही दिवसांच्या सुट्टीच्या बोलीवर भारतात परतलो ! इंग्लंडहून भारतात परतण्यासाठी विमानात बसल्यावर भारतात प्राजक्ता नावाची मुलगी आपली वाट पाहत आहे अशी स्वप्नं मी रंगवत होतो ! 

इथं आल्यानंतर पहिल्या आठवड्यात आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीला चर्चेला कोणत्या गोष्टी घ्याव्यात ह्याची मी एका कागदावर नोंद करुन ठेवली होती. त्यात प्रामुख्यानं गणिताविषयी कितपत आवड आहे ह्याविषयी खास प्रश्नार्थक उल्लेख होता. परंतु हा कागद प्रत्यक्ष भेटीत बाहेर काढण्याची संधी मला मिळाली नाही किंवा सुचलं नाही.    साधारणतः पंधराव्या मिनिटाला मी माझ्या परीनं होकार सांगून टाकला. आता हा होकार सांगण्याचा माझ्याकडं अधिकार आहे असं सोयीस्कर गृहितक मी बनवलं होतं. प्राजक्ताला जरी परदेशी शिक्षणाची इच्छा असली तरी वसईला राहायला आवडेल असा तिनं उल्लेख केला. प्रत्यक्ष होकार द्यायला तिला अजून एक भेट लागली. आता लग्न जमवून मी परत इंग्लंडला जातो आणि मे महिन्यात लग्नासाठी परत येतो ह्या माझ्या प्रस्तावाला तिनं चांगल्या शब्दांत धुडकावुन लावलं. त्याकाळी तिची इंग्लिशमध्ये संवाद साधण्याची वारंवारता जास्त असल्यानं तिनं "We need to know each other better before marriage" ह्यासारखं काही वाक्य बोलल्याचं मला आठवतंय. डिसेंबर ते मे ह्या कालावधीत बरोबर पन्नास वेळा भेटल्यानंतर ६ मे २००१ रोजी आम्ही विवाहबंधनात अडकलो ! 

मागं वळून पाहता आमचे स्वभाव म्हणजे पृथ्वीचे दोन ध्रुव ! लहानपणापासुन अगदी शिस्तीत वाढला गेलेलो मी ! बहुदा मस्ती करणे हे माझ्या स्वभावात लहानपणापासुन नव्हतंच ! त्यात शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रतिमा ! प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व्हायला हवी हा काहीसा अट्टाहास ! क्रिकेटची खूप आवड ! घर आणि सभोवतालच्या परिसरातच जास्त रमणारा ! लग्नसमारंभ आणि बाकीचे सोशल इव्हेंट्स ह्यात सहभाग म्हणजे माझ्या दृष्टीनं सत्वपरीक्षेचा काळ ! चारचौघात गप्प असलो तरी जवळच्या लोकांत मात्र खुप बोलणारा ! चित्रपट आणि संगीताच्या बाबतीत हिंदी चित्रपटापलीकडं झेप नसणारा ! बोलताना समोरच्याचे मन दुखवू नये ह्यासाठी प्रयत्न करणारा ! हल्ली मात्र काही लोकांची मनं गैरसमजामुळं दुखावली गेली आहेत ! पुर्वी न रागावणारा म्हणून काही प्रमाणात मी ओळखला जायचो. हल्ली तेही बदलत चाललंय!  ऑफिसचे काम, क्रिकेट ह्यात डुंबवून घेणारा ! घरातील फ्युज उडाला तरी इलेक्टिशियनची गरज भासणारा ! कोणताही धोका पत्करण्याची तयारी नसणारा ! सकाळी पाच वाजता उठणं ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे ह्यावर ठाम विश्वास बाळगणारा ! 

प्राजक्ता काहीशी वेगळ्या धर्तीची ! सामाजिक समारंभात खूप रस घेणारी, समाजातील लोकांशी संपर्क ठेवणं आवडणारी, हाती घेतलेली गोष्ट निष्ठेनं पुरी करणारी मग त्यासाठी कितीही वेळ लागो. काहीशी स्पष्टवक्ती, जर का रागावली तर त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाणारी, नवनवीन गोष्टी शिकण्याची तीव्र इच्छा बाळगून असणारी, आयुष्य जगायचं तर जीवनातील योग्य गोष्टींचा पूर्णपणे आनंद लुटता यायला हवा ह्यावर ठाम विश्वास असणारी. इंग्लिश माध्यमात शिक्षण झालं असला तरीही आजोबांनी लावलेली मराठी वाचनाची आवड जोपासणारी, आता त्यात पेपर वाचनाचा अतिरेक होत आहे ही बाब वेगळी. घरात कोणतंही उपकरण बंद पडलं किंवा बिघडलं तर स्वतःहून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणारी. 

अमेरिका पहिली वारी २००२ फिनिक्स 

लग्नानंतर दोघांनीही काही महिने मुंबईत नोकरी केली.  वसईच्या घरी राहत असल्यानं घरच्यांनी सांभाळलं. प्राजक्ताने वसईतील मांसाहार प्राधान्य असलेल्या आहारपद्धतीचा स्वीकार केला. अचानक कंपनीनं मला अमेरिकेत पाठविण्याचा निर्णय घेतला. खरंतर ही कमी कालावधीसाठीची नेमणूक होती. परंतु मागच्या अनुभवामुळं कदाचित असेल पण प्राजक्तानं नोकरी सोडून माझ्यासोबत अमेरिकेला जावं असा आग्रह धरण्यात आला. तिनं ह्या निर्णयाला साथ दिली. अमेरिकेत पहिल्या भेटीत मला कार चालवता न आल्यानं तिची बऱ्यापैकी निराशा झाली. त्यात माझा अगदी काळजी करणारा स्वभाव. अमेरिकेत पहिल्या महिन्यातच फिनिक्समध्ये असताना लास वेगासला मित्रांसोबत जायची संधी होती. परंतु त्यानं कधी फिनिक्सच्या बाहेर गाडी चालवली नाही ह्या कारणामुळं मी त्यांच्यासोबत जायला नकार दिला.  सामान्यज्ञानाच्या बाबतीत माझ्याकडे आनंदी आनंद असल्यानं लास वेगासची महती मी जाणून नव्हतो. पुढे काही वर्षे अमेरिकेत राहून सुद्धा लास वेगास भेटीचा योग काही आला नाही. ही पहिल्या महिन्यात चुकलेली लास वेगास वारी लक्षात राहिली. 

तिथंही मी कामात स्वतःला अडकवून घेतलं. तरीही तिनं जमेल तसा माझ्या सहकाऱ्यांच्या पत्नींशी परिचय करुन स्नेहसंबंध प्रस्थापित केले. माझी वरण, भात, भाजी अशा भोजनाची आवड लक्षात घेऊन तिने ती पुरविण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. ह्या भेटीतच आम्ही ग्रँड केनयन, लॉस अँजेल्स डिस्नेलँड ह्यासारख्या सुप्रसिद्ध स्थळांना  भेटी दिल्या. अडीच महिन्यात दुसऱ्या प्रोजेक्टनिमित्त आम्हांला फिनिक्स सोडून फ्लोरिडाला स्थलांतर करावं लागलं. मी एकंदरीत अमेरिकन जीवनपद्धतीशी अनभिज्ञ असल्यानं तिनं ह्या पहिल्या भेटीत बऱ्याच गोष्टींत पुढाकार घेतला. फ्लोरिडाचे वातावरण फिनिक्सच्या मानानं खुपच आल्हाददायक होतं. त्यावेळी की वेस्टला दिलेली भेट संस्मरणीय ठरली. अमेरिकेच्या दक्षिण टोकाला असलेल्या ह्या बेटांच्या समूहांना जोडणारा रस्ता आपल्या मनात  समुद्राच्या मध्यातून प्रवास करण्याची भावना निर्माण करुन देतो. ह्या फ्लोरिडा भेटीत आम्हांला हॉटेलातच राहावे लागले. तिथं दिवसभर हॉटेलात एकटं राहण्याच्या कंटाळवाण्या प्रसंगांना तिनं तोंड दिलं. फ्लोरिडातील एक मोठा मॉल सॉग्रास मिल्स जवळ असल्यानं आमचे बहुतांश शनिवार रविवार तिथेच जात असत. तिचा विविध दुकानातील खरेदीचा उत्साह पाहून मी आश्चर्यचकित होत असे. ह्या उत्साहाशी बरोबरी करणे मला फारसं जमत नसे. 

ह्यावेळी मात्र कमी कालावधीसाठीची नेमणूक तितक्याच कालावधीसाठी ठरल्यानं आम्ही भारतात परतलो. त्यावेळी मी परदेशात स्थायिक व्हायला उत्सुक असल्यानं तिनं पुन्हा नोकरी शोधण्याचा तात्काळ प्रयत्न केला नव्हता. पण काही महिने वाट पाहून ती पुन्हा रुजू झाली आणि पुन्हा एकदा माझा परदेशगमनाचा योग आला! 

फ्लोरिडा २००३ 
ह्यावेळी कंपनीनं थोडी दीर्घमुदतीची ग्वाही दिल्यानं आम्ही पुन्हा द्विधा मनःस्थितीत सापडलो. शेवटी भारतीय मानसिकतेने विजय मिळविला; पुन्हा एकदा नोकरीचा राजीनामा देऊन ती माझ्यासोबत फ्लोरीडाला आली. इथला सुरुवातीचा काळ कठीण गेला. मला कामाचा खूप ताण होता आणि अपार्टमेंटमध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यावेळी आर्थिक गणित सुद्धा चुकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तिने मोठ्या जिद्दीनं त्याला तोंड दिले.ह्या भेटीत मात्र तिने मला लवकरात लवकर ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यास भाग पाडले आणि स्वतःही लेखी परीक्षा दिली. इथं IBM आणि TCS ह्या कंपनीचे बरेच कर्मचारी होते. त्यांच्या पत्नींच्या कंपूत प्राजक्ताचा सहजरित्या प्रवेश झाला. महिन्यातून एका शनिवारी ह्या महिला आपल्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी नवरेमंडळींकडे सोपवून आपली पार्टी करत असत. नवरे मंडळी रविवारी आपापसात क्रिकेटचे सामने खेळत असत/ माझ्या कंपनीचा मी एकमेव कर्मचारी असल्यानं मला IBM ने आपल्या संघात घेतलं होतं. आयुष्यातील सर्वोकृष्ट फलंदाजी ह्या तीन चार महिन्यात मी केली. TCS च्या गोलंदाजांनी माझा काहीसा धसका घेतला होता (काहीशी अतिशयोक्ती). ह्या भेटीत सोहमची चाहूल लागली असताना ऑफिसातील परिस्थिती बदलली आणि आम्हांला भारतात परत यावं लागलं. सोहमचा जन्म अमेरिकेत व्हावा ही आमच्या दोघांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यावेळी त्या गोष्टीचं वाईट वाटलं असलं तरी आता मात्र काही खेद नाही. भारतात परतलो. सोहमचे आगमन झाले. दोन्ही कुटुंबीय आनंदात होते.

न्यू जर्सी २००५
मला फ्लोरिडातुन इच्छा नसताना परत यावं लागल्यानं मी कंपनी बदलण्याचा निर्णय घेतला. नव्या कंपनीनं तीन महिन्यातच परत अमेरिकेला पाठवलं. ते तीन महिन्याच्या बोलीवर ! सोहम अगदी लहान असल्यानं त्या दोघांना सोबत घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. तिथं गेल्यावर इंग्लंडमधील अनुभवाची पुनरावृत्ती झाली. तीन महिन्यांची नेमणूक दीर्घकाळात परिवर्तित झाली. त्यामुळं  प्राजक्ता आणि सोहम ह्यांचा व्हिसा प्रोसेस करुन त्यांना अमेरिकत बोलाविण्याचा आम्ही निर्णय घेतला. ह्या सर्व प्रकरणात एकंदरीत पाच महिने मी एकट्यानं अमेरिकेत काढले. त्यावेळी सुद्धा प्राजक्ता भारतातुन "मला न्यूयॉर्क जवळ आहे तिथं फिरुन ये" वगैरे बजावत होती. मागच्या भेटीत शिकलेली पाककला आता उपयोगास येत होती. पाच महिन्यांनी ज्यावेळी ह्या दोघांचं अमेरिकेत आगमन झालं त्यावेळी मला सराईतपणे कार चालवताना पाहुन तिला खूप आनंद झाला होता. इथं मी स्थिरावल्यानंतर हे दोघे आल्यानं नक्कीच फरक पडला होता. त्यांना एक स्थिरावलेल्या घराचा अनुभव मिळाला. परंतु इथला हिवाळा मात्र ह्या दोघांसाठी खूप कंटाळवाणा ठरला. तरीही ख्रिसमसचे वातावरण उत्साह निर्माण करुन जात असे. 

त्यानंतरच्या उन्हाळ्यात मात्र आम्ही बऱ्यापैकी मौज केली. SUV चालवत एका दिवसात नायगारापर्यंत ३५० मैलांची मारलेली मी मजल प्राजक्ताला खूप प्रभावित करुन गेली. इथंही तिचा मोठा कंपू बनला होता. त्यांच्यासोबत ती संध्याकाळ व्यतित करत असे. प्राजक्ताला त्यावेळी खरेदीची खूप आवड होती. एखाद्या बॅगेत जास्तीत जास्त गृहोपयोगी वस्तू कशा सामावल्या जाऊ शकतात ह्याविषयी तिचे कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. पण त्या वजनदार बॅगा मला उचलायच्या असल्यानं मला ह्या कौशल्याची मनमोकळेपणानं कधी प्रशंसा करता आली नाही. सोहमला आणि आम्हांला भेटण्यासाठी आई भाई पुढील वर्षी आले. त्यांची ही भेट खरंतर सहा आठवड्यांचीच! सोहम पहिल्या दिवशी थोडा दूरदूर राहिला. पण त्यानंतर मात्र आई भाईंसोबत पूर्ण मनमोकळेपणानं खेळू लागला. इथं प्राजक्ताची विचारचक्रं फिरु लागली. भारतात आपले इतके नातेवाईक असताना आपण इथं भुतासारखं का राहावं असा प्रश्न तिनं मी एके दिवशी ऑफिसातून परतल्यावर केला. पुढील आठवडाभर मोठी चर्चा होऊन आई भाईंसोबत हे दोघेसुद्धा परततील असा निर्णय घेण्यात आला. मला एकटं सोडून जाताना ह्या सर्वांना मात्र खूप वाईट वाटत राहिलं. 

अमेरिका सोडली हा निर्णय योग्य की अयोग्य हा प्रश्न प्राजक्ताला केव्हाच पडला नाही ! मला मात्र अजूनही अमेरिका सोडण्याच्या निर्णयाच्या अचूकतेविषयी अधूनमधून शंका निर्माण होत राहतात. आता परत नोकरी सुरु न करता तिनं सोहमच्या संगोपनात स्वतःला वाहुन घेतलं.   पुन्हा एकदा पाच महिने एकट्यानं अमेरिकेत काढुन मी भारतात परतलो. वसईत राहायला मिळेल अशी तिची आशा होती. पण मला आता वसईहुन दररोज मुंबईला अपडाऊन करणे जमेनासे झाले होते आणि मग मी बोरिवलीला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. इथंही तिचा म्हटलं तर हिरमोडच झाला होता. पण माझ्या करिअरच्या दृष्टीनं योग्य होईल म्हणून तिनं ह्या निर्णयाला साथ दिली ! 

२००७ नंतर  

बोरिवलीला राहत असलो तरी बहुतेक शनिवार - रविवार आमच्या वसईला फेऱ्या होत राहिल्या. सोहमच्या शाळेच्या प्रत्येक सुट्टीच्या वेळी हे दोघे न चुकता वसईला यायचे. वसईच्या सर्व नातेवाईकांत तिनं एक उत्साही मुलगी म्हणुन आपली ओळख निर्माण केली. २०१० साली मी JPMC कंपनीत दाखल झालो. इथं मला जबाबदाऱ्या असल्या तरी वेळच्या वेळी सुट्टी घेण्याची संधी मिळत राहिली. खरंतर सुट्टीत घरी अराम करणे ह्यालाच माझी पहिली पसंद असायची. परंतु हळुहळू मला बदलविण्यात तिनं यश मिळविलं. कधी स्वतः तर कधी वीणा वर्ल्ड सारख्या कंपनीसोबत आम्ही भारताच्या विविध राज्यांत फिरु लागलो. प्रत्येक ठिकाणी आठवण म्हणून फोटो काढण्याचा छंद तिचाच ! सुरुवातीला ह्यावरुन मतभेद होत असले तरी हळूहळू मला त्याची ही सवय होऊ लागली. मी २०१० साली ब्लॉग लिहिण्यास आरंभ केला. बऱ्याच वेळा प्रूफरीडिंग साठी तिला मी पोस्ट वाचण्यासाठी देतो. ती जरी इंग्लिश माध्यमात शिकली असली तरी तिचं मराठी तिनं प्रयत्नपूर्वक जोपासलं आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा पोस्टमध्ये तिच्या अमुल्य सूचना असतात. तसंही इंग्लिश माध्यमातुन शिकली असल्यानं मी त्या भाषेसाठी तिचा सल्ला अधूनमधून घेत असतो. 

सोहम जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा अभ्यासाचा आवाका वाढत गेला. त्यामुळं एकाने त्याच्यासोबत घरी थांबणं क्रमप्राप्त होऊ लागलं.  त्यात मग माझ्या कार्यालयीन जबाबदाऱ्या सुद्धा वाढत गेल्या. माझ्या स्वभावानुसार मी आनंदानं ही घरी थांबण्याची जबाबदारी स्वीकारली. मधल्या काही वर्षांत मी सामाजिक समारंभ बऱ्यापैकी टाळले. सुरुवातीला ही गोष्ट स्वीकारायला तिला कठीण गेलं. पण मग माझा स्वभाव आणि सोहमचा अभ्यास हे पाहता तिनं ह्याचाही स्वीकार केला. मी एप्रिल महिन्यात आमच्या शाळेच्या NPL स्पर्धांच्या आयोजनात सहभागी होऊ लागलो. लोकांनी माझं कौतुक केलं. तिला ह्या गोष्टीचा मोठा अभिमान वाटला. काळानुसार तिनं आपल्या स्वभावात बदल घडवत आणले. सुरुवातीला फिनिक्स इथं असताना मला घरात विशेषतः बाथरुममध्ये मोठ्यानं गायची सवय होती.  तिनं त्यावेळी जवळपास माझ्यावर गायची बंदी घातली होती. कालांतरानं कदाचित माझ्या आवाजात सुधारणा झाली असावी किंवा तिच्या सहनशक्तीत वाढ ! त्यामुळं मी इथं आनंदानं आता नमूद करु इच्छितो की मला आता घरी गाण्याची परवानगी आहे. गेल्या वर्षी मी फेसबुकवर काही गाणी रेकॉर्ड करुन टाकली होती त्यात तिनं दिलेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा होता.  माझ्या व्यावसायिक जीवनाविषयी तिचा अव्यक्त पाठिंबा राहिला आहे. मी यशस्वी व्हायलाच हवं असा तिचा अट्टाहास नाही. उलट मागच्या बढतीच्या वेळी आता तु अजून व्यग्र होणार म्हणून ती काहीशी दुःखी झाली!  बस झालं आता, तू निवृत्त हो ! आपण जे आहे त्यात भागवु हा तिचा आवडता डायलॉग ! मला नसलं तरी सोहमला त्यामुळं उगागच तणाव येतो ! बिचारा ! 

माझा स्वभाव तसा सदैव टेन्शन घेण्याचा ! दुसऱ्या दिवशीसाठी घरात भाजी आहे की नाही पासून पुढील आठवड्यात एखादी महत्वाची बैठक आहे असली नानाविध कारणं मला घरातील वातावरण गंभीर करुन सोडण्यास पुरेशी ठरतात. शनिवार रविवारी सुद्धा संगणकासमोर ऑफिसचं काम करत किंवा बुद्धिबळ खेळत बसणं हा माझा छंद ! गेल्या काही वर्षांत ऑफिसात बढती मिळून जबाबदाऱ्या सुद्धा वाढत चालल्या आहेत. कदाचित एक माणुस म्हणून सुद्धा मी बदललो असेन. ऑफिसात जो काही थोडाफार एक सिनिअर व्यक्ती म्हणुन मान मिळतो त्याची घरी सुद्धा थोडीफार दखल घेतली जावी अशी अप्रत्यक्ष अपेक्षा कदाचित मी बाळगून असेन. नात्यात ह्या गोष्टीनं थोडाफार फरक पडत असावा. तिनं आता स्वतःला तबला, सतार आणि गायन अशा विविध छंदांत रमवून घेतलं आहे. मी तुला तुझी स्पेस देते, तू मला माझी स्पेस दे हे हल्ली हल्ली ऐकलेलं वाक्य ! माझ्या सदैव तणावाखाली राहण्याच्या स्वभावामुळं कधीकधी ती वैतागते ! 

बाकी नवराबायको म्हटले की दैनंदिन व्यवहारात दोन टोकं असल्याची उदाहरणं तर हवीतच ! आमच्या बाबतीत ती खूप आहेत ! घरात पंखा लावणं ही माझ्या दृष्टीनं अनावश्यक गोष्ट ! तर उगाचच चार - पाच वर पंखा लावून घरात इथं तिथं फिरणं हा तिचा आवडता छंद ! भर उन्हाळ्यात सुद्धा वाटीभर दही खाऊन सर्दी होण्याची भिती बाळगणारा मी तर उन्हाळ्यातील प्रत्येक दिवशी आईसक्रीम, दही, काकडी, कलिंगड  खाल्ल्याशिवाय झोप न येणारी ती ! आलं, लवंग असे मसाल्याचे पदार्थ आवडणारा मी तर ह्या उष्ण पदार्थांचा धसका घेतलेली ती ! लग्नाला जाताना पाच मिनिटांची तयारी पुरेशी असणारा मी आणि .... 

मागं वळून पाहता काही प्रमाणात आम्ही  एकमेकांना बदललं आहे ! मी काही प्रमाणात सामाजिक जीवनाची आवड निर्माण करुन घेतली.  मुळ आनंदी स्वभाव कायम ठेवला तरी ती काहीशी गंभीर बनली. तासंतास आता वाचन करु लागली. ती दैनिकातील सदरे खास करुन संपादकीय वगैरे प्रकार गंभीर स्वरुप धारण करु लागले आहेत ! तिच्या भाषेत आताशा मोठमोठाले क्लिष्ट शब्द येऊ लागले आहेत. सकाळी उठण्याच्या बाबतीत तिनं आपली मूळ वेळ कायम ठेवली असली तरी वसईच्या घरच्या वेळेनुसार लवकर झोपण्याची सवय तिनं लावून घेतली आहे. लग्नाआधी मुख्यत्वेकरुन पापलेट आणि चिकन हे प्रकार माहिती असणाऱ्या प्राजक्ताने आता मटण, विविध प्रकारचे मासे ह्या प्रकारात नैपुण्य संपादन केले आहे ! 

बाकी आमच्या काही सामायिक आवडी सुद्धा आहेत ! ताज्या भाज्या बाजारातुन आणुन काही वेळ त्यांची तारीफ करणे, हिरव्यागार वनराईने नटलेल्या ठिकाणी फिरायला जाणे,  गेल्या काही वर्षांपासुन शास्त्रीय संगीत ऐकणे वगैरे वगैरे ! गेल्या काही वर्षांत तिनं का कोणास ठाऊक पण शॉपिंग हा प्रकार सुद्धा अगदी कमी केला आहे. त्यामुळं आमच्यात एकमत आहे अशा गोष्टींच्या यादीमध्ये एक महत्वाची भर पडली आहे. मुंबईत फिरायचे असेल तर रिक्षा, बेस्ट आणि लोकल ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्तम वापर करावा ह्यावर आमचं ठाम एकमत आहे.  कार सारख्या गोष्टींवर फारसा पैसे खर्च करु नये, फक्त ड्रायव्हिंग करता यायला हवं.  संधी मिळाली तरी ओसाड जमिनीवर जंगल रुजवावं हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे ! फक्त जंगलातील झाडांच्या यादीवर एकमत होत नाही ही एक छोटी बाब ! 

खरंतर ह्या विषयावर लिहणं ही मोठी जोखमीची गोष्ट ! पण आज सकाळच्या पोस्टनंतर काही मित्रांनी आज वीस वर्षांच्या सहप्रवासावर एक पोस्ट अपेक्षित होती अशी टिपण्णी केली आणि प्राजक्ताने त्याला दुजोरा दिला म्हणून हे धारिष्ट्य ! अर्थात ह्या पोस्टचे प्रूफ रीडिंग तर झालंच आहे.  एकंदरीत आढावा घ्यायचा झाला तर वेगळ्या स्वभावांमुळं दैनंदिन जीवनात मतभेदाचे प्रसंग उद्भवण्याची सदैव शक्यता असणारा  पण एकंदरीत जीवनाविषयी समान दृष्टिकोन असल्यानं सुखकारक असा हा गेल्या वीस वर्षांचा प्रवास ! धन्यवाद FDC ! 

बुधवार, ५ जून, २०१९

सहकुटुंब भोजन !



काल निरर्थकपणे टीव्हीवर वाहिन्यांवर सर्फिंग करत असताना मी एका हॉलीवुड चित्रपटावर स्थिरावलो.  काही वेळानं तिथं एका कुटुंबाच्या सहभोजनाचा आनंददायी प्रसंग पहावयास मिळाला. एक आनंदी कुटुंब समोर ठेवलेल्या नानाविध चविष्ट पदार्थांनी युक्त अशा मेजवानीचा आस्वाद घेत होतं. वातावरण अत्यंत खेळीमेळीचं होतं.  आजोबा, आजी, त्यांची मुलं, नातवंडं अशी विविध वयोगटातील आनंदी माणसं एकत्रपणे त्या सणाच्या दिवशी मेजवानीचा आनंद लुटत होती.  पारंपरिक अमेरिकन कुटुंबात असा प्रसंग थँक्स गिविंग्जच्या दिवशी अनुभवायला मिळतो.  

हॉलिवूड चित्रपटात इटालियन, मेक्सिकन कुटुंबातसुद्धा अशा मेजवानीचा आनंद एकत्रपणे लुटणाऱ्या कुटुंबांचे चित्रीकरण आपल्याला आढळते.  आपल्याकडे सुद्धा अशा आनंदी प्रसंगाचं चित्रपटात केलेलं चित्रण आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाला आहे.  "हम साथ साथ है",  "हम आपके है कौन!"  अशा सुरज बडजात्या निर्मित लांबलचक वाक्यभर शीर्षक असलेल्या चित्रपटात असे प्रसंग हमखास असु शकतात.  ह्या कुटुंबासोबत त्यांना त्यांच्या ताटात आग्रहाने विविध स्वादिष्ट पदार्थ वाढणारे त्यांचे वर्षानुवर्षे असणारे सेवकसुद्धा आपल्याला आढळतात. परंतु या व्यक्तींना नोकर म्हणून अजिबात संबोधले जात नाही, कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच त्यांना प्रेमाची वागणूक दिली जाते.  मराठी चित्रपटात, बकेटलिस्टमध्ये सुद्धा फारशा मोठ्या नव्हे परंतु एकत्र जेवणाऱ्या कुटुंबाचे चित्रण आढळते.  इथं फरक असा की माधुरी एकच भाजी मसाले आणि विविध जिन्नसांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधुन बनवताना आपल्याला आढळते.  इथं  नोकरवर्गाची उपस्थिती आपल्याला जाणवत नाही. 

चित्रपटातील कुटुंबाची एकत्रित जेवण घेण्याचे हे प्रसंग आपलं लक्ष मराठी कुटुंबातील एकत्र जेवणाच्या कालपरत्वे दुर्मिळ होत चाललेल्या परंपरेकडे वेधून घेतात. पुर्वी ज्याकाळी लोकांचे शिक्षण, व्यवसाय हे आवाक्यात होते, त्यावेळी सायंकाळच्या जेवणास लोक सर्व कुटुंबातील सदस्य घरी उपस्थित असत व एकत्रपणे जेवण घेणे हे काहीसे बंधनकारक असायचे. तिथं बहुदा कुटुंबप्रमुख अत्यंत गंभीर चेहरा करून बसत असावा.  आपल्याकडून कोणत्याही पदार्थांमध्ये त्रुटी तर राहिली नाही या शंकेने आणि त्याप्रती निर्माण झालेल्या भयाने वावरणारी गृहिणीसुद्धा असायची. कुटुंबातील बालकवर्ग आपण दिवसातील केलेल्या अनेक प्रमादांपैकी कोणता प्रमाद आपल्याला इथं बोलणी खायला लावु शकेल ह्याची भिती बाळगुन असावा.  एकंदरीत काहीसे भयप्रद वातावरण या जेवणाच्या टेबलावर असावे असा मला संशय आहे. 

कालांतराने लोकांच्या शाळा-कॉलेजांच्या आणि नोकरीच्या वेळा बदलल्या.  त्यामुळे दैनंदिन जीवनात एकत्र जेवणाला बसण्याची वेळ क्वचितच येऊ लागली.  सुसंवादाची एक हुकलेली संधी या एका चांगल्या परंपरेला हळूहळू तिलांजली देण्यास कारणीभूत ठरू लागली.  एकत्र जेवण घेण्याची सवय दैनंदिन जीवनात सुटल्याने सुट्टीच्या दिवशीसुद्धा शक्य असुनसुद्धा संपुर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेताना दिसत नाही.  

यामागे नक्की कारणे काय असावीत? सद्यकालीन जगाच्या बहुतेक समस्यांमागे मोबाईलचा अतिवापर हे कारण असावे असं विधान सरसकटपणे केलं जातं. या धर्तीवर या परिस्थितीला म्हणजेच एकत्रितपणे कुटुंबाने जेवण न घेण्याच्या समस्येला मोबाईलचा अतिवापर काही प्रमाणात कारणीभूत आहे असे ढोबळमानाने विधान आपण करू शकतो.  परंतु या समस्येकडे काहीसे खोलवर जाऊन बघण्याची गरज आहे. एखाद्या प्रसंगात,  समारंभात व्यक्ती का सहभागी होते ह्याचं मुख्य कारण म्हणजे या सहभागामुळे काहीतरी एक आनंदी अनुभव मिळण्याची शक्यता त्या व्यक्तीला जाणवत असते! आता एकत्रित जेवण घेताना आनंदाचा कोणता अनुभव आपण सर्व व्यक्तींना मिळवून देत असतो हा प्रश्न सर्वांनी आपल्याला विचारणे आवश्यक आहे.  

कुटुंबप्रमुखाच्या दृष्टिकोनातून आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण घेत आहेत ही बाब आनंद देऊ शकते.  गृहिणीच्या दृष्टिने आपण मनापासून केलेल्या जेवणाचा आनंद आपल्या सर्व प्रिय व्यक्ती एकत्रितपणे बसुन घेत आहेत ही एक आनंददायी भावना या अनुभवातून मिळू शकते. जेवणातील एखादा पदार्थाची भट्टी जराशी सुद्धा चुकली तरी जितक्या तत्परतेने सदस्य आपली प्रतिक्रिया नोंदवितात त्याच तत्परतेने भट्टी जमुन आलेल्या पदार्थाचं कौतुक सुद्धा करणं गृहिणीला मोठी स्फुर्ती देऊ शकतं !  कुटुंबातील मुलांच्या दृष्टीनं मात्र हा प्रसंग ह्या काळातसुद्धा बऱ्याच घरांत धोक्याची नांदी देणारा असतो.  आईवडील याप्रसंगी आपण केलेल्या चुकांचा पाढा आपल्यासमोर वाचून दाखवणार ही सुप्त भिती  त्यांच्या मनात असू शकते.  भोजनप्रसंगी टीव्ही चालू ठेवून भोजन करण्याची पद्धत असेल तर संवादाच्या शक्यतेला अजून एक अडथळा निर्माण होतो.  या सर्व घटकांमध्ये माझ्यामते तरी कुटुंब प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी आहे.  कुटूंबप्रमुख म्हणजे पुरुष असे मी  गृहीत धरले आहे.  आता या गृहीतकामुळे माझा निषेध होण्याची शक्यता आहे! गृहिणीने जेवणाआधीचे दोन ते तीन तास जेवण बनवण्यात घालविले असल्याने जेवण होईस्तोवर ती हुश्श म्हणून सुटकेचा निश्वास टाकत असते!  त्यामुळे एकत्रितपणे जेवण घेताना संवाद सुरू ठेवण्याची तिच्याकडून अपेक्षा करणे हे काहीसे चुकीचे ठरते.  तिचं लक्ष बऱ्याच प्रमाणात आपण बनविलेल्या पदार्थांना सर्वांचा प्रतिसाद कसा मिळत आहे याकडं लागण्याची शक्यता आहे! कुटुंबातील मुलं ही नवीन पिढीची प्रतिनिधी आहेत.  संवादाचा आरंभ आपणसुद्धा करू शकतो या संकल्पनेची नवीन पिढीला जाणीव नाही. त्यांच्या मते आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही इतकी संवादाची त्यांच्याकडून कुटुंबातील बाकीच्या सदस्यांची अपेक्षा असावी. त्यामुळे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन ही मंडळी आपले लक्ष गॅझेटकडे वळवितात. अशावेळी त्यांना आणि गृहिणीला संवादात सहभागी करून घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाने काहीतरी मनोरंजक विषय चर्चेसाठी घेणे आवश्यक आहे. चर्चेमध्ये हे बाकीच्या सदस्यांना त्यांची मते विचारणे, ते मते मांडत असताना त्यांच्याकडे लक्ष देणे अशा वर्तवणुकीची कुटुंबप्रमुखाकडून अपेक्षा आहे.  कालांतरानं बाकीची मंडळी सुद्धा ह्यात पुढाकार घेतील. कुटुंबातील सदस्यांमधील बंध अतूट ठेवण्यासाठी एकत्रितपणे भोजन करणे हा एक सहज उपलब्ध असणारा मार्ग आहे, ती आपली परंपरा आहे. तिचं पालन जमेल तितकं आपण करुयात हेच सांगणं !

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

गवाक्ष



गेले १० - १५ दिवस सौमिल दौऱ्यावर होता. तिलोत्तमाला आपल्या जीवनात काही फारसा फरक जाणवला नव्हता. नाही म्हणायला गेलं तर विवाहानंतरच्या सुरुवातीच्या नावीन्याच्या दिवसानंतर समांतर रेषेतील आयुष्याची त्या दोघांना सवय झाली होती. 

दुपारची उन्हं खिडकीतुन आत येऊ पाहत होती. आपल्या जीवनात शिरू पाहणाऱ्या पण नकोशा असणाऱ्या माणसांप्रमाणं ह्या क्षणाला तिलोत्तमाला ही किरणंसुद्धा नको होती. तिला हवा होता एकांत! आपल्या मनात क्षणाक्षणाला घोंघावणाऱ्या आणि सदैव बदलत राहणाऱ्या विचारांची संगत तिला पुरेशी होती. आपल्या भोवतालचं साधं गाव अचानक नाहीसं होऊन तिथं आपल्या मनातील विविध भाव आपापली घरं उभारुन राहताहेत असं तिला वाटू लागलं होतं. समोरचं घर होतं ते औदासिन्याचं, त्याच्या पलीकडं निर्विकारतेचं वगैरे वगैरे !! दुःख, आनंद अशा टोकाच्या भावना शोधून सापडत नव्हत्या. त्यांची घरं कुठं असतील ह्याचा ती शोध घेऊ लागली. पश्चिमेकडं अजून अधिक झुकलेल्या दिनकराच्या लुडबुडणाऱ्या किरणांनी तिची विचारशृंखला खंडित केली. 

आपण दोघांनी मिळून आयुष्य अगदी एंजॉय करायचं असं सुरुवातीला सौमिल कधीतरी बोललेला तिला अधुरंसं आठवत होतं. पण नंतर मात्र जसजसं आयुष्य पुढं सरकत गेलं तसं ह्या समांतर रेषेतील आयुष्याची त्या दोघांना सवय झाली होती. तिलोत्तमा होती प्रसिद्ध चित्रकार! अमूर्त चित्रकारितेत तिचा बराच नामलौकिक होता. सौमिल होता एक उच्चपदस्थ शास्त्रज्ञ! म्हटलं तर दोघांची आयुष्यं सामान्यतेच्या बऱ्याच पलीकडं कुठंतरी अज्ञातात वावरणारी! पण ह्या अज्ञाताच्या प्रचंड विश्वात ते दोघं सुद्धा शेकडो मैल दूरवर होते. "आपण दूरवर आहोत ह्याचं दुःख नाही पण तुझ्याकडं पोहोचण्यासाठी नक्की कोणत्या दिशेला शोध घ्यायचा ह्याची यत्किंचितही कल्पना मला नाही ह्याची खंत आहे!" अशाच एका दुर्मिळ सानिध्याच्या क्षणी सौमिल म्हणाला होता. 

समोरच्या अर्धवट पूर्ण केलेल्या चित्राकडं  तिलोत्तमाची नजर गेली. अमूर्तातील कोणत्याही विशिष्ट आकाराचं तिला वावडं नव्हतं. एखादा विशिष्ट आकार काढताना फक्त त्या क्षणाशी आपण प्रामाणिक राहायचं इतकं तिला ठाऊक होतं. नंतर त्या चित्राचं विश्लेषण करणारी समीक्षक मंडळी त्या चित्रातील गर्भितार्थ समजुन घेण्यासाठी तिचा अगदी पिच्छा पुरवीत. त्यांनाही एखादं असं वेगळंसं स्मितहास्य देऊन तो क्षण निभावून नेण्याची कला तिनं चांगली साध्य केली होती. 

रेषा समांतर का धावतात - एकत्र येऊन एका रेषेत धावणं त्यांना जमत नाही म्हणून की समांतरतेच्या पलीकडील कोन स्वीकारल्यास वाढत जाणारं अंतर जो दुरावा निर्माण करेल तो सहन करण्याची ताकत नसते म्हणून! आपल्याच चित्रातील दोन समांतर रेषांकडे पाहून तिलोत्तमा विचार करत होती. 

आपली चित्रकला अमूर्त! त्यातून कोणता बोध घ्यायचा ते आपण आपल्या रसिकांवर सोपवून देतो. कारण आत्मविश्वासपूर्वक त्यातला अर्थ सांगायचा आपल्यात आत्मविश्वास नाही!  हा विचार येताच तिलोत्तमा काहीशी हादरली. हा विचार झटकून टाकायचा प्रयत्न करू लागली. पण तो विचार तसाच पुढं येत राहिला; अगदी त्या सूर्यकिरणाप्रमाणं! जशी चित्रकला तशी आपल्या आयुष्याची समांतरता! कारण सौमिलच्या रेषेजवळ स्वतःहून जाणं आपल्याला जमलं नाही! आपलं त्यानं कौतुक करावं ही आपली भावना आपल्या मनातच दाबून ठेवली आपण! कारण स्वतःहून कोणत्या भावनेला मोकळं करणं आपल्या स्वतःच्या स्वभावातच नव्हतं आपल्या! आपण उघडपणे ह्या समांतरतेविषयी कधी खंत व्यक्त केली नसली तरी एका रेषेतील आयुष्य किती आल्हाददायक असतं ह्याविषयीचं औत्सुक्य आपल्याला कधीच दाबून टाकता आलं नाही! 

तो विचार असाच आपला मार्ग संक्रमित करीत तिलोत्तमाला पूर्ण अस्वस्थ करुन गेला. तिची शांतता पुरती भंग करीत! आपल्या स्वकेंद्रिततेवर आपल्याच विचारानं इतका घणाणती घाव घालावा ह्याचं वैषम्य तिला लागून गेलं. समोरील गवाक्ष अर्धवट उघडी होती. आपलं आयुष्य आपण त्या गवाक्षाच्या उघड्या भागातून पाहिलं की काचेतून ह्याचाही तिला आता उलगडा होत नव्हता! बहुदा आपण बाहेर कधी पाहिलंच नाही केवळ आपण आतल्या आत घुटमळत राहिलो अशी समजूत तिनं करून घेतली. ह्या विचारानं तिला बरंच बरं वाटलं. सायंकाळचा थंड वारा एव्हाना त्या अर्ध्या खिडकीतून आत येऊ लागला होता. खिडकी बंद करत घोटभर दुध घेऊन तिलोत्तमा आपल्या अमूर्ताच्या पूर्णत्वाच्या प्रयत्नात गढून गेली.    
(संपूर्णतः काल्पनिक )

बुधवार, २५ मे, २०१६

एकोणतीस सक !!



लहानपणीची गोष्ट! सहावीत असताना शाळेत एका सरांनी वर्गात आम्हां मुलांना आव्हान दिलं, सर्वांसमोर येऊन २९ चा पाढा बोलुन दाखविण्याचं! मी ते स्वीकारलं का सरांनी ते मला स्वीकारायला भाग पाडलं हे आठवत नाही पण मी समोर आलो आणि २९ चा पाढा सुरु केला. २९ सक १७४ आणि २९ साता २०३ मध्ये कोठेतरी गडबडलो. गानू सर होते ते! त्यामुळे हातावर छडीचा प्रसाद घेऊन जागेवर परतण्याशिवाय पर्याय नव्हता.

नंतर कधीतरी मग लक्षात आलं. २९ चा पाढा थेट लक्षात ठेवायची गरज नाही. ३० चा पाढा संदर्भ ठेऊन आपल्याला २९ चा पाढा पटकन मिळविता येतो. थोडं पटापट मनातल्या मनात वजाबाकी करता आली पाहिजे इतकंच! २९ सक म्हटल्यावर ३० सक १८० दिसायला हवेत आणि त्यात ६ वजा करुन १७४ हे उत्तर मिळवता यायला हवं.

आयुष्य मग हळुहळू क्लिष्ट होत गेलं! २९ च्या पाढ्यापेक्षा नक्कीच जास्त क्लिष्ट! मग जाणवलं की २९ च्या पाढ्याचं तंत्र आयुष्यात बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडू शकतं. चर्चगेटवरुन कांदिवलीला जायचं असेल तर प्रत्येक वेळी बोरिवली स्लो गाडी पकडायचीच गरज नाही. कमी गर्दीच्या वेळी विरार जलद पकडुन बोरीवलीला येऊन मग मागं कांदिवलीला येऊ शकतो. ह्यात कमी गर्दीची वेळ कोणती ह्याचा निर्णय घेता यायला हवा. ह्या महिन्याच्या आरंभी मालवणहून ५१२ किमी टुकार रस्त्याने कुच करताना नाकी नऊ आले तेव्हाही जाणवलं की गोव्याला विमानाला जाणं आणि मग कमी अंतर रस्त्याने कूच करणं केव्हाही चांगलं झालं असतं!

आपल्या माणसांच्या नात्यांचं सुद्धा असंच काहीसं असतं नाही का! ह्या एकोणतीसच्या पाढ्याच्या विविध छटा आपणास अनुभवायला मिळतात ! 

१) आपण २९ च्या पाढ्यासारखी क्लिष्ट आकडेवारी पदोपदी छोट्या मोठ्या घटनांमध्ये करत राहतो. मागच्या एखाद्या प्रसंगात नक्की योग्य काय झालं असतं ह्याचाच काथ्याकुट करत बसतो. म्हणजे २९ सक १७६ कि १७४ ह्याचाच विचार करत असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपण प्रतिसादच देत नाही. खरंतर समोरच्याला १७० - १८० च्या मधलं कोणतंही उत्तर चाललं असतं कारण त्याला महत्व असतं ते आपल्या प्रतिसादाचे! पण आपण मात्र अचुकतेच्या नादापायी तो क्षण गमावुन बसतो! होतं काय की कालांतराने आपणास जरी त्या घटनेतील योग्य अयोग्यतेची जाणीव झाली आणि १७४ उत्तर मिळालं तरी समोरचा माणुस त्याचा २९ चा पाढा घेऊन फार पुढे गेलेला असतो. 

२)आयुष्य खुप गतिमान होत चाललं आहे. काही लोकांनी मनापासुन हे स्वीकारलं आहे आणि ते आपल्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि आप्तजन, मित्रमंडळी ह्यांच्याशी संपर्क साधुन असतात. अगदी परिपुर्ण नसला तरी सर्वांना वरवर खुश ठेवण्याइतका ! 

पूर्वी आयुष्य तुलनेने संथ होतं. मोजकी नाती आणि मित्रमंडळी होती. आणि वेळही होता त्यामुळे इच्छा असेल तर हे वैयक्तिक ऋणानुबंध परिपूर्णतेने जपता यायचे. ह्या काळातील काही मंडळी ह्या बदललेल्या युगात अजुनही अस्तित्वात आहेत. आणि वर उल्लेखलेल्या मंडळीशी संवाद साधताना त्यांना ही मंडळी काहीशी ढोंगी असल्याचा भास होतो ! पण लक्षात ठेवा दोन्ही विचारधारणा आपापल्या परीने योग्य आहेत!

मंडळी वरील म्हणणं पटलं अथवा न पटलं तरी बोला !
एकोणतीस सक …. !!

शुक्रवार, ४ मार्च, २०१६

Manu's Farm House Wedding!!

आमच्या लाडक्या मनुचा शुभविवाह रविवारी पार पडला. हा समारंभ अनेक बाबतीत सद्यकालीन विवाहांपेक्षा वेगळा ठरला. ह्या लग्नानिमित्त ही पोस्ट!

बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी म्हणजे घरी आणि बाजुच्या वाडीमध्ये लग्नसमारंभ पार पडला. १९९३ साली आमच्या घरी कुटुंबातील ह्या आधीचे लग्न झाले होते. त्यानंतर आमच्या कुटुंबियांचा गोतावळा वाढत गेला पण मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळे लग्नसमारंभ हॉलवर करण्याचे प्रमाण वाढलं. पण मनुने मात्र वाडीतच लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. आम्ही सर्वांनी मनुचा हा विचार उचलून धरला. 

आमच्या समाजातील रितीप्रमाणे आदल्या दिवशी मुहुर्त, काकण वगैरे विधी शनिवारी पार पडले. ह्या आदल्या दिवशीच्या रितींना प्रामुख्याने गावातील मंडळी हजर असतात.गावातील मंडळी ही ह्या रितींच्या बाबतीत अगदी तज्ञ असतात. त्यामुळे चुकून एखाद्या रितीमध्ये आपलं काही काम आल्यास निमुटपणे त्यांचं ऐकण्यात हित असतं

दिलीप कॅटरर्सकडे दोन्ही दिवसाच्या नास्ता आणि जेवणाचे कंत्राट होते. शनिवारी सकाळी वाफाळत्या उपम्याचा आस्वाद घेताना आम्ही मंडळी धन्य झालो. नास्ता झाल्यावर आलेल्या मंडळींचे स्वागत करणे आणि त्यांना नास्त्याचा आग्रह करणे ह्या भुमिका आम्ही चोख पार पाडल्या.मागच्या एका पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे लग्नसमारंभात पारंपारिक वेशभूषा करण्याचा उत्साह दाखविण्यात मी आणि माझी पत्नी म्हणजे दोन टोके आहोत. ह्याचा हा साक्षात पुरावा

 

सामाजिक बदल सदैव होत राहतात. नेहमीच्या जीवनात व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणारी नवीन पिढी आणि निवृत्त झालेली जेष्ठ पिढी ह्यांचा संपर्क सहसा येत नाही. पण अशा समारंभात मात्र ही गाठ हमखास पडते.ह्या दोन पिढीतील संवाद मनोरंजक होण्याची शक्यता अधिक असते. जेष्ठ पिढी आधी थोडे कुतुहल दाखवून ह्या नवीन पिढीच्या प्रतिनिधीकडून त्याच्या / तिच्या व्यवसायाविषयी थोडीफार माहिती काढून घेते. आणि मग मात्र आपले उपदेश किंवा निरीक्षण नवीन पिढीला ऐकवते. अशा वेळी दुसरा एखादा पाहुणा येऊन आपली सुटका करुन घेईल अशी आशा करण्याव्यतिरिक्त नवीन पिढीकडे मार्ग नसतो

मुहुर्ताच्या रिती यथासांग पार पडल्या. दुपारचे जेवण अगदी रुचकर होते. वसई आणि विरारच्या पलिकडील भागातील सोमवंशीय क्षत्रिय समाजातील मुहुर्ताच्या दिवशी केली जाणारी वाल वांग्याची भाजी अगदी स्वर्गीय आनंद देऊन जाते. ह्या लग्नातील सुद्धा ही भाजी विशेष आकर्षण होती. पनीर कुर्मा, खीर, मठ्ठा, फोडणी दिलेली खमंग डाल असा तोंडाला पाणी आणणारा रुचकर मेनु होता. मनुची आई दादी ह्या न्यु इंग्लिश स्कुलच्या माजी शिक्षिका. त्यामुळे शाळेतील बऱ्याच माजी शिक्षिकांनी ह्या लग्नाला हजेरी लावली

इतकं रुचकर जेवण घेतल्यावर मी काहीसा सुस्तावलो. अजूनही रिती सुरुच होत्या. उंबराचा मान, काकण वगैरे प्रकार सुरु होते. ह्या सर्व प्रकारात पुरुष मंडळींना काही भुमिका नसते. आमचे प्रदीपभाई म्हणतात त्याप्रमाणे मांडवाला शोभा आणण्याचं काम पार पाडायचं असते. हीच संधी साधून सर्वांच्या नजरा चुकवून मी हळूच अर्धा तास पहुडलो.घरीच लग्न असण्याचा हा फायदा होता. तितक्यात नवरदेवाकडील मंडळी हळद घेऊन आली. घाईघाईने शर्ट बदलून मी पुन्हा मांडवात हजर झालो. आता रीतींचा नवीन क्रम सुरु झाला होता. सायंकाळ होऊ लागली होती आणि वसईच्या सुप्रसिद्ध डासांनी मांडवाचा ताबा घेतला होता. ह्या हल्ल्यापुढे मांडवातील मंडळी हैराण झाली. नवरदेवाकडील पाहुण्यांनी काढता पाय घेतला

भारत पाकिस्तान सामना सुरु झाला होता. पाकिस्तानची खराब स्थिती पाहुन आम्ही सर्व टीव्हीपुढे दाखल झालो. काही वेळाने पुन्हा मांडवातून रात्रीच्या जेवणासाठी हाक आली. दिलीप कॅटरर्सच्या एकदम लाजबाब शाकाहारी बिर्याणीचा आम्ही आस्वाद घेतला. शुक्रवारी संकष्टी आल्याने शाकाहारी जेवणाचा हा सतत तिसरा दिवस होता आणि त्यामुळे मंडळींना ह्या बिर्याणीतल्या मसालेदार बटाट्यांना पाहून मनातल्या मनात चिकन पिसेसची आठवण होत होती. मनातील दुःख मनात ठेऊन आम्ही वेज बिर्याणीची तोंडभरून तारीफ करत होतो. एकदा का परिस्थिती स्वीकारली की मग वातावरणात प्रसन्नता आणण्यात कुचराई करायची? 

मनुच्या लग्नासाठी तिची मोठी बहीण, "चैतन्याचा खळखळता झरा", निऊ सहकुटुंब अमेरिकेहून आदल्या रात्री आली होती. लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रात्री बेंजो लावून सर्वांना मंडपात नाचायला लावण्यास तिला खुप मजा येते. त्यामुळे रात्रीची जेवणं संपल्यावर तिने ह्यावेळेला सुद्धा सर्वांना मंडपात बोलावलं. परंतु ती केवळ आदल्या दिवशी रात्री आल्याने हळुहळू तिला जेट लँगने गाठलं होतं. त्यामुळे तिने मग आम्हांला नाचातून मुभा दिली. आणि आधुनिक हिंदी गाण्यावर माझा एक वेडावाकडा डान्स पाहण्याची प्रेक्षकांची संधी हुकली.  

रविवारी सकाळी लवकरात लवकर तयार होऊन आम्ही मांडवात हजर झालो. मांडवाचे शोभिकरण चालूच होते. स्वरुप, सुश्रुत ह्यांनी रात्रभर जागरण करुन हे काम नियंत्रणात आणलं होतं. आमच्या घरासमोर पार्किंगला मोजकी जागा असल्याने आम्ही चर्चला विनंती करुन त्यांची पार्किंगची जागा मिळविली होती. परंतु ती जागा दहा वाजेपासुन उपलब्ध होणार होती. त्यामुळे गल्लीच्या तोंडावर उभे राहुन येणाऱ्या वाहनांना आम्ही नियंत्रित करत होतो. आमच्या शेजारच्या चौधरीबाई आणि त्यांच्या कुटुंबानेसुद्धा त्यांची पार्किंगची जागा आम्हांस उपलब्ध करुन दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

नवरा मुलगा गौरंग आणि वऱ्हाडी मंडळींचं मग नऊच्या सुमारास आगमन झालं. आमचा भाचा नीरज ह्याची बोर्डी गावात कलात्मक फुलांची शेती आहे. तिथुन नीरजने भेट दिलेली ही सुंदर फुलं! 

 

दिलीप कॅटरर्सने आज मेदुवडा, इडली सांबार असा नास्ता ठेवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त नास्ता झाला. भटजी कामाला लागले होते. आणि लग्नविधी अगदी जोरात सुरु झाले होते


आमची मनु वस्त्र डिझाईन क्षेत्रात काम करते. त्यामुळे तिच्या मैत्रिणीसुद्धा अगदी हाय फाय! अशीच एक पंजाब प्रांतातील मैत्रीण छायाचित्रणाचे काम करीत होती. तिचा विधी सुरु असतानाचा त्या क्षेत्रातील मुक्त वावर पाहुन एव्हाना हजर झालेल्या ज्येष्ठ मंडळीनी काहीशी नाराजी व्यक्त केली. ह्या लग्नातील मुख्य विधी लग्न लागल्यानंतर होणार होते. मांडवातील इतर गडबडीत मंगलाष्टके केव्हा सुरु झाली हे कळलं सुद्धा नाही. मग धावपळ करीत आम्ही अक्षता मिळविल्या आणि मनुच्या बाजूने जाऊन उभे राहिलो. इथेही बहुदा तिच्या छायाचित्रकार मैत्रिणीचा मुक्त वावर सुरु होता. मंगलाष्टके सुरु असताना तिने पोझ देण्यासाठी मनुला सांगितलं आणि मनुसुद्धा लग्नाकडे कानाडोळा करून पोझ द्यायला तयार झाली तेव्हा मात्र दाजींनी दोघांना खडसावलं. पाचाचे अंतर, चाराचे अंतर करता करता लग्न लागलं. आणि गुलाबपुष्पांचा वर्षाव झाला

भोजनमंडपाची क्षमता लक्षात घेता आलेल्या मंडळींना ताबडतोब भोजनमंडपात आमंत्रित करणे आवश्यक होते. आम्ही काही खाशी मंडळी हे काम हरीषभाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होतो. मुख्य भोजन सुरु करण्याआधी नेवैद्य दाखविणं, सर्व पदार्थांची चव घेऊन त्यांना मान्यता देणं ह्या सर्व कामात हरिषभाई पुढे होते. अख्खं लग्न वेळेवर, यथासांग पार पडण्यासाठी त्यांची उपस्थिती अत्यावश्यक असते.

लग्न लागल्यावर मातब्बर मंडळी पहिल्या रांगेत बसून परिस्थितीचा आढावा घेत होती. मांडवात उपस्थित असलेली कोणतीही व्यक्ती ह्या मातब्बर मंडळीच्या नजरेतुन सुटणं केवळ अशक्य होतं.




लग्न लागुन गेल्यावर रिती चालु होत्या. मग आम्हांला मांडवात पाहुण्यांना भेटण्याची संधी मिळाली. अशा वेळी बरीच जुनी मंडळी भेटतात. लहानपणीच्या आपल्या विश्वात ह्या मंडळींना खास स्थान असतं. पण नंतर काळाच्या ओघात आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला असतो. आणि मग अचानक अशा प्रसंगी ही मंडळी समोर येतात आणि मग जुन्या आठवणी जागृत होतात

रिती आटोपल्यावर मनु आणि गौरंग तयारीसाठी दिदीच्या घरात गेले आणि बालमंडळीनी स्टेजचा ताबा घेतला. खरंतर त्यांना तिथे खेळून देण्यात काही हरकत नव्हती. पण जुन्या लोकांना असले प्रकार का कोणास ठाऊक पण खटकतात आणि मग ते ह्या मुलांना ओरडतात. आताशा माझेही असेच व्हायला लागलं आहे!! बालकांनो त्या दिवशी तुम्हांला ओरडल्याबद्दल क्षमस्व! एव्हाना मनु आणि गौरंग तयार होऊन मांडवात परतले. स्टेजवर उभे राहण्याऐवजी त्यांनी मंडपात फिरुन सर्वांची भेट घेणं पसंत केलं. आगरकरानंतर महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा आणणारे म्हणुन ह्या जोडप्याचा समावेश व्हावा अशी माझी मनापासुनची इच्छा

एव्हाना भोजनमंडपातील गर्दी कमी होऊ लागल्याने आम्ही समाधानी होतो. भोजन मेनु मला खुणावत होता. मी संधी साधून रांगेत घुसलो आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ लागलो. इतक्यात हरिषभाईचे माझ्याकडे लक्ष गेले. "तुला ताट दिलेच कसे?" असा जहाल प्रश्न त्यांनी मला केला. त्या प्रश्नाचे गांभीर्य मला त्या वेळी कळलं नाही. मस्तपैकी जेवण आटपून, दोन ग्लास ताक पिऊन आणि दोन कप आईसक्रीम रिचवून माझा जडावला देह मांडवातील खुर्चीत विसावला. पाच दहा मिनिटे होत नाहीत इतक्यात मुख्य पंगतीची तयारी सुरु झाली. हरिषभाईंची शोधक नजर मांडवात चौफेर फिरत होती. आणि शेवटी जिसे डरते थे वोही बात हो गई! एका लग्नात दोनदा जेवण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग! मनु आणि गौरंग ह्यांनी मजेशीर उखाणे घेतले. दोघेही फक्त एकमेकाला ऐकू जाईल अशा आवाजात काहीतरी पुटपुटत होते. बहुदा लग्नानंतर जेवण कोणी करायचं वगैरे अशा राहून गेलेल्या बाबींवर निर्णय होत असावा! माझ्या बाजुला प्राजक्ता आणि वहिनी बसल्या होत्या. त्यांचेही दुसरे जेवण होते. वाढपी लोक आम्हां तिघांकडे संशयाने पाहत होते. सगळ्या पदार्थांना नाही नाही म्हणतात तर बसले तरी कशाला जेवायला असा बहुदा त्यांच्या मनात विचार चालु होता. कसबसं हा प्रसंग निभावून अधिक जडावलेला माझा देह मांडवातील खुर्चीत विसावला.

सर्व पाटील कुटुंबीय आणि माहेरकरणी एकत्र बसले होते. चेष्टामस्करी चालू होती. इतक्यात मनु आणि गौरंग आमच्या दिशेने येताना दिसले. बहुदा गौरंगला दोन निवांत क्षण हवे होते. परंतु आम्ही त्याला आमच्या कंपूत येऊन बसण्याची विनंती केली. नाही नाही म्हणता त्याने ती मंजुर केली. आमच्या प्रश्नांना त्याने समर्पक उत्तरे दिली. थोडक्यात आम्हां सर्वांना तो पुरुन उरला. परंतु नव्या जावयाची फारशी कठोर परीक्षा न घेण्याची आमची सवय आहे ही पार्श्वभुमी वाचकांनी आणि ही पोस्ट गौरंग वाचत असल्यास त्याने लक्षात घ्यावी

मनुची पंजाब प्रांतातील मैत्रीण एव्हाना पाठारे कुटुंबियांना एकत्र करुन नवविवाहित दांपत्यासोबत त्यांचा ग्रुप फोटो दीदीच्या घराच्या पायरीवर घेण्यात गुंग होती. पाठारे कुटुंबीय बहुदा गुणी लोकांनी भरलेले असावेत, कारण हा ग्रुप फोटो तसा झटपट आटोपला. मग खट्याळ पाटील कुटुंबियांची पाळी आली. वेळेकडे लक्ष ठेऊन असणाऱ्या हरिषभाईंना हा प्रकार फारसा पसंत पडला नाहीये हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. साधारणतः तीस लोकांना चार पायऱ्या आणि त्यापलीकडील ओटी ह्यावर उभे करून उंचीनुसार उभे करण्यात पंजाब प्रांतीय कन्येस बरेच प्रयास पडत होते. आंग्ल भाषेत ती आम्हांला सूचना देत होती. आमचा सर्वांचा उल्लेख "This one", "The tall one", "the short one" असा चालला होता. ग्रुपमधल्या शाब्दिक कोट्या इतक्या जोरात चालु होत्या की चेहऱ्यावर स्मित हास्य नव्हे तर खळखळते हास्य होते. पंजाबी कन्येचा संयम पणास लागला होता. "At the count of three, only those standing in last row should raise their toes" ह्या सुचनेचे पालन करता करता आमची हसूनहसुन पुरती मुरकुंडी वळली. बहुदा मागची रांग सोडून बाकी सर्वांनी आपल्या टाचा वरती केल्या होत्या. पंजाब प्रांतीय कन्येने भरपूर फोटो काढले. त्यातील एकतर ठीक आला असावा असे आम्ही देवाला साकडं घातलं आहे. ह्या प्रसंगानंतर गौरंगने आम्हां पाटील कुटुंबियांचा, त्यातील सुनांचा आणि जावयांचा पुरता धसका घेतला असेल तर नवल नाही

हरिषभाईंनी सुत्र आता पूर्णपणे हातात घेतली. भावपुर्ण प्रसंग होता. आमची लाडकी मनु आता पाठारे कुटुंबियांची लाडकी सून बनून चालली होती. तोंडावर हसू असलं तरी आम्ही सर्व मनुच्या आठवणीनी भावपुर्ण झालो होतो. आणि मग काही वेळातच पाठारे कुटुंबीयांनी आमच्या लाडक्या मनुसोबत दहिसरला प्रस्थान केलं.  

पुर्वी लग्नानंतर आठवडाभर तरी नातेवाईक घरी राहत. आता मात्र अर्ध्या तासात सर्व घर रिकामी झालं. आणि मनुची आठवण अधिकच तीव्र बनली

We miss you Manu! 
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा!!

 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...