मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

सद्यकाळात संस्कारांचे महत्त्व


म्हटलं तर सर्व काही आलबेल आहे पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकतंय असं सध्याच्या समाजातील कौटुंबिक  परिस्थितीविषयी म्हणता येईल. काही काळापूर्वी समाजात, घरात वागण्याच्या चालीरिती ह्याविषयी काहीसे लवचिकता नसणारे नियम रुढ होते. ह्या नियमांची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेणारी वरिष्ठ माणसं घरात, गावांत असत. हे नियम न पाळणाऱ्या बाळगोपाळांचे आणि प्रसंगी मोठ्यांचे कान पकडण्याचा, त्यांना दोन शब्द सुनाविण्याचा अधिकार ह्या वरिष्ठ माणसांना होता. 

पुर्वापार ही पद्धती, हे मॉडेल व्यवस्थित चाललं. आता ह्यातील व्यवस्थित ह्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. ह्या पद्धतीमुळं आपण येणाऱ्या नवीन पिढीला दाबून ठेवलं, त्यांना फुलण्याची संधी दिली नाही वगैरे आक्षेप घेतले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये Pandora's Box हा शब्दप्रयोग वापरला जातो. एखादा पर्याय सर्वांना उपलब्ध करुन दिल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांची जर आपल्याला कल्पना करता येत नसेल तर तो पर्याय उपलब्ध करुन देऊच नये असा साधारणतः मतितार्थ असतो. कदाचित ह्याच विचारामुळं आपल्या पूर्वजांनी काहीसं कठोर अथवा कर्मठ म्हणता येईल असं धोरण स्वीकारलं होतं.  

ह्या धोरणाविरुद्ध पिढ्यानुपिढ्या काहीशा दबल्या आवाजात होणाऱ्या कुजबुजीचं गेल्या दोन तीन पिढ्यांत जवळपास बंडखोरीत झालं.  हे काहीसं अतिरंजित वर्णन झालं. अजुनही परंपरांचं व्यवस्थित पालन करणारी अनेक कुटुंब भोवताली आहेत, फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आता पोस्टचा ओघ परत मुक्त विचारसरणीकडं वळवुयात. आपल्या कुटुंबातील परंपरांना, चालीरितींना पूर्णपणे बगल देऊन आपल्या इच्छेनुसार वागणारा असा हा वर्ग. त्यांच्या ह्या वागण्याला तात्पुरतं बंडखोरी म्हणुयात. ह्या बंडखोरीमागं विविध कारणं असु शकतात. 

१) जसा काळ बदलत गेला तसं परंपरांचे हस्तांतरण करताना त्यामागील मूळ हेतू नवीन पिढीला व्यवस्थित समजावून देणं आवश्यक होतं. ह्यासाठी नवीन पिढीला आपल्या बरोबरीची वागणूक देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं आवश्यक होतं. बऱ्याच कुटुंबात हे घडलं नाही. 

२) नवीन पिढीचा वेगानं पाश्चिमात्य / आधुनिक जीवनपद्धतीशी संपर्क आला, त्या झंझावाताने नवीन पिढी काहीशी बहकली. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व काही ह्या जीवनपद्धतीने आपल्या पुढ्यात ठेवलं.  आपल्या संस्कृतीचा ह्या झंझावातापासून बचाव करण्यासाठी ज्या सुसंवादाची गरज होती त्यात आपण कमी पडलो. 

ह्या झंझावाताला येऊन किंवा आपल्या चालीरितींच्या परीक्षेचा काळ सुरु आता काही वर्षे उलटली आहेत. जसं आता युक्रेन पलटवार करु पाहतोय किंवा वेगवान गोलंदाजांनी आघाडीच्या तिघा चौघांना परत पाठविल्यानंतर वर्षोनुवर्षे मधली फळी आणि यष्टीरक्षक आपला डाव सावरतात तसं आपल्याला आपल्या चालीरीती सावरण्याचा प्रयत्न करता येईल हा महत्वाचा मुद्दा इथं मी मांडू पाहत आहे. 

आपल्या संस्कृतीशी फारकत घेऊन स्वतंत्र वागण्याचा आनंद घेणाऱ्या पिढीला कदाचित ह्यातील त्रुटी जाणवु लागल्या असतील. प्रत्यक्ष जीवनातील त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रसंगामुळं आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी आपल्याला विशिष्ट पद्धतीनं वागण्याचा आग्रह का केला हे त्यांना उमजलं असेल. हीच वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा परंपरा, चालीरीती ह्यांना काळानुसार योग्य रुपात सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. 

हल्लीच्या काळात एकटेपणाच्या भावनेनं बऱ्याच जणांना ग्रासलं आहे. जुन्या काळातील जमेल तितक्या गोष्टींचा काळानुसार बदललेल्या स्वरुपात स्वीकार केल्यास मानसिक स्थैर्यास नक्कीच मदत होऊ शकेल. नवीन जीवनपद्धतीचा तर आपणांस स्वीकार करायचाच आहे पण त्या प्रवासात जुन्या चालीरीती, जुने संस्कार ह्यांची योग्य रुपात मदत घेतल्यास भविष्य सुखकारक होईल. हा लढा प्रत्येक घराघरातून लढला गेला पाहिजे.  

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

माझे कालवणाचे प्रयोग !

पाककलेतील कौशल्याच्या अनेक पातळी असाव्यात. त्यातही देशानुसार, प्रांतानुसार विविध चविष्ट पदार्थ बनविले जात असतात. त्यामुळं कौशल्य मापनासाठी नवीन परिमाण उपलब्ध होत असतं. माझा आणि पाककलेचा संबंध क्वचितच येतो. ज्यावेळी पत्नी घरात नसेल किंवा पूर्वी अमेरिकेत एकट्यानं गेलो असता मी स्वयंपाक करत असे / असतो. माझ्या स्वयंपाकाची एक खासियत आहे, त्याला कोणी चविष्ट म्हणू शकणार नाही पण तो भूक भागविण्यासाठी एक चांगला पर्याय असतो. मला शिकविण्यात आलेल्या पाककृतींचे मी तंतोतंत पालन करतो. माझी पाककौशल्याची पातळी किमान म्हणून गणली जाऊ शकते. 

आज हा स्वयंपाक करण्याचा प्रसंग ओढवला. रविवारी स्वयंपाक करायचा असेल तर खरं म्हणजे चिकन हा एक सोपा उपलब्ध पर्याय असतो. कांदा, हळद, मसाला आणि बटाटा ह्यांच्या संगतीला चिकन खुलून उठतं.  अगदीच धाडस करायची इच्छा असेल तर भोपळी मिरची चिकनसोबत अशा पाककृतींचे धाडस करावे. पण आज मी त्याहूनही एक मोठं धाडस केलं त्याची ही थोडक्यात कहाणी. 

आज मी आणि सोहमच असल्यानं झोमॅटो हा स्वाभाविक पर्याय होता. पण फ्रीजमध्ये असलेल्या माशाची आठवण झाल्यानं आम्हांला हा पर्याय सुचविण्यात आला. मला सविस्तर पाककृती देण्यात आली तर मी करीन असे मी म्हणालो. साधारणतः अर्ध्या तासात एक सविस्तर पाककृती व्हाटसअँपवर अर्थात इंग्लिश मध्ये मला देण्यात आली. त्याचं हे भाषांतर. 

१. सकाळी उठताक्षणी फ्रीज मधून मासे बाहेर काढून ठेवणे. (Thaw ह्या शब्दाचं स्वैर भाषांतर)
२. प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मासे स्वच्छ धुवून घ्यावेत. उरलेसुरले कल्ले वगैरे साफ करावेत. स्वच्छ धुतलेला मासा बाजूला ठेवावा. 
३. आता वाटणाची तयारी करायला घ्यावी 
- कोथिंबीर जुडी स्वच्छ धुवून घ्यावी 
- लसण्याच्या आठ ते दहा कळ्या सोलून, धुवून घ्याव्यात. ह्यात त्यांचा सेमीमधील आकार नमूद न करण्यात आल्यानं मी माझ्या अंदाजानुसार ह्यात थोडाफार फेरफार केला. 
- कमी तिखटाच्या दोन मिरच्या मधोमध कापून बिया काढून घ्याव्यात. माझा स्वयंपाक सुरु असताना सोहमने फेरी मारली आणि बिया काढू नयेत ह्यावर आमचं एकमत झालं 
- नखाइतकं आलं. ही सूचना धुडकावून लावत मी मनसोक्त आलं टाकलं. 
- कडीपत्त्याची दहा ते बारा पाने. 
- बिया काढून एक टोमॅटो. सोहमने आधी केलेल्या ऑम्लेटमधील उरलेला अर्धा टोमॅटो सुद्धा ह्यात समाविष्ट करण्यात आला. 
- फ्रीझर मध्ये खिसुन ठेवलेल्या खोबऱ्यातील दोन मोठे चमचे इतकं खोबरं सुरीने काढून घेणे. फ्रीझर मधील विविध डब्यातील खोबऱ्याचा डबा नक्की कोणता हे ठरविण्यासाठी सोहमची मदत घेण्यात आली. 

इतकी मेहनत घेऊन वाटणासाठी बनविण्यात आलेली कच्ची सामुग्री ! 


खोबरं म्हणून वापरण्यात आलेला पांढऱ्या रंगाचा फ्रीझरमधील पदार्थ 

खसखसून धुण्यात आलेले मासे  (केवळ साबण वापरण्याचे बाकी ठेऊन) 



पाककृतीचा पुढील भाग 

४. वरील कच्ची सामुग्री मिक्सर मध्ये घालून मोजक्या पाण्यासहित अगदी चांगली दळून घ्यावी. अपघाताची शक्यता ध्यानात घेता मिक्सरच्या भांड्याच्या झाकणावर हात धरावा. 

हेच ते दळलेले वाटण !



५.  आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यातून स्वयंपाकघरातील तांब्याचा बेस असलेल्या दोन भांड्यातील मोठ्या भांड्यात हस्तांतरित करावं. 

६. त्यात एक चहाच्या चमच्याइतकी हळद टाकावी. इथं चुकून मोठा चमचा हळदीच्या भांड्यात होता. पण ते नशिबानं माझ्या ध्यानात आलं. 

७.  ** चहाच्या चमच्याइतका मसाला. (पूर्ण रेसिपीचा उलगडा होऊ नये म्हणून काही ठिकाणी ** चा वापर)

८. **  चमचे मीठ ! (खरंतर कापून पण मी भरभरुन घेतलं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य म्हणून अजुन थोडं टाकलं !!)

९. दोन मोठे चमचे तेल. (हे नेमकं संपलं होतं.  मोठ्या डब्यातून काढावं लागलं!)

१०. चवीनुसार चिंचेचं पाणी (हे मिळालंच नाही !!)

हे सर्व केल्यानंतरचा हा फोटो ! 



११. आता अर्धा भांडं भरुन पाणी ! भांडं अर्ध झाकून साधारणतः दहा मिनिटं उकळावं. माशाला तू शिजला का रे हे विचारावं. त्यानं हो म्हणताच गॅस बंद करावा.  कालवणाचा हा फोटो !


आताच जेवून उठलो. बहुदा पाणी थोडं जास्त झालं. पण एकंदरीत चव चांगली होती. पाककृती लिहिणाऱ्याचं आणि स्वयंपाक करणाऱ्याचे कौतुक! 

ह्या सर्व प्रकारात मासे धुणे आणि वाटण करणे ह्या वेळ घेणाऱ्या कृती आहे. बाकी शिजविण्याचा वेळ किमान आहे! 

ह्या सोबत कोळंबी फ्राय करावी असे सोहम म्हणाला. ही सोपी पाककृती असल्यानं मी स्वतः केली. ह्यात कांदा एकसमान कापणे आणि मंद आचेवर संयमाने तो थोडासा तांबूस होईस्तोवर भाजणे ह्या महत्वाच्या बाबी असाव्यात. ह्यात मी कापून बटाटा टाकण्याचा निर्णय घेतला. परंतु कोळंबी लवकर शिजते, त्यामुळं बटाटयाच्या कापाही लवकर शिजण्यासाठी बारीक कापाव्यात हे ध्यानात राहिलं नाही. Masterchef Australia कोळंबी अगदी कमी वेळ शिजवितात हे बऱ्याच वेळा घरी ऐकलं होतं. त्यामुळे संभ्रमात पडून शेवटी बटाटा थोडा कच्चा राहिला ! पण मसाला आणि कोळंबीची चव ह्यामुळे अंतिम पाककृती चविष्ट झाली. 





महागाईच्या झळा! दोनशे रुपयाची इवलीशी कोळंबी ! वसईला हे चित्र पाहताच तुमच्यामुळे कोळीणी भाव वाढवतात हे वाक्य नक्की ठरलेलं ! 




अशा प्रकारे एका धाडसाचा यशस्वी शेवट !

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

शोधिशी मानवा

 


सहसा ऑक्टोबर महिन्यात अनुभवायला मिळणारं परतीच्या पावसाचं वातावरण ह्या आठवड्यात वसईत अनुभवायला मिळालं. सायंकाळी सहानंतर ढगांचा गडगडाट आणि त्यामुळं येणारा थंडावा मनाला सुखावून जातो. झोपही गाढ लागते. पुढील आठवड्याला सामोरं जाण्याचं एक बळ मिळतं. हा परतीचा पाऊस नसावा ही आशा !

दोन वर्षांच्या खंडानंतर मांडलई गावातील गणपती पाहायची संधी मिळाली. गावातील शांत वातावरणात घराघरांतून फिरत गणपती बाप्पाचं दर्शन घेणं मनाला खूप सुखावतं. गणपतीबाप्पा सुद्धा निवांतपणे आनंदात असतात. ते  आपल्याकडं प्रेमळ नजरेनं पाहत आहेत असा भास होतो. खरंतर गणपती पाहायला जायचं ते चालतच अशी पुर्वीची पद्धत! पण काही कारणांनी त्यात बदल झाला आहे. 

दोन तीन दिवस वसईत मुक्काम झाला की काहीबाही सुचतं. आताच संध्याकाळी असंच काहीतरी झालं. भोवताली एकंदरीत मूळ भावनेला बाजूला सारुन त्याभोवताली आपण निर्माण केलेल्या आकर्षक आवरणांनाच  माहात्म्य प्राप्त झालं आहे की काय असं वाटु लागतं. ह्यामागचं कारण काय असावं ही कुतूहलभावना मनात निर्माण झाली. जगातील बरं - वाईट, यौग्य - अयोग्य काय हे ठरविण्याचा अधिकार पूर्वी मोजक्या जाणकार व्यक्तींच्या हाती होता. आता आपण हा अधिकार सर्वांच्या हाती दिला. 

त्यामुळं परीक्षण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या मूळ गुणधर्माकडं परीक्षणाचा रोख न राहता त्या गोष्टीच्या आकर्षकतेकडे भर दिला जातो. ह्या परिस्थितीत आता बदल होण्याच्या पलीकडं स्थिती गेली आहे. त्यामुळं उगाचच तक्रारभावना मनात बाळगण्यापेक्षा ह्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला हवं ते कसं मिळविता येईल ह्याचा शोध घ्यायला हवा. चविष्ट घरगुती जेवण, शांत वातावरणातील घरगुती गणपती, प्रमाणपत्राचा ध्यास न घेता केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा केलेला सखोल अभ्यास, नेहमीच्या बोर्डात शांतपणे छापील पुस्तकांच्या आधारे अभ्यास करणारी मुलं सर्व काही अस्तित्वात आहे, फक्त ते कुठंतरी दडलं गेलं आहे. 

महानगरातील बहुसंख्य जनता ज्याप्रकारे जीवन जगत आहे त्यानुसार (ऍमेझॉन, उबेर, झोमॅटो, स्वीगी आधारित) जीवन जगणं हा आपला निर्णय आहे. असं जीवन जगताना आपल्याला काही प्रमाणात गुदमरायला होत असेल एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की हे जीवन जगण्याची सक्ती आपल्यावर कोणी केली नाही. काहीशा विस्मृतीत गेलेल्या जीवनातील मनाला शांत करणाऱ्या गोष्टीना पुन्हा आपल्या जीवनात समाविष्ट करुन घेता येऊ शकतं. मुंबई ब वरील मंगलप्रभात, डी डी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम शोधून काढून पाहावेत. खासगी वाहिन्यांनी जणू काही शांतपणे बोलणं चालणं आपल्याला विसरायला लावण्याचा चंग बांधला आहे की काय अशी स्थिती निर्माण केली आहे. देवपूजा जमेल तेव्हा करुन पहावी, बरं वाटतं. आपल्या चुका देव कसा माफ करतोय हे पाहून आनंद होतो. घरकाम केलं तरीही बरं वाटतं. सतत आपण दिमतीला भ्रमणध्वनी, संगणक ठेवत असल्यानं सतत अधिकारात राहण्याची आपल्याला सवय लागून राहते. हातात झाडू घेतला की काही काळ का होईना आपल्या भोवतालच्या खऱ्या विश्वात आपला प्रवेश होतो. 

गेल्या आठवड्यातील गुरुवारी सुरु झालेल्या कार्यालयातील समस्येनं (प्रॉडक्शन इश्यू) ह्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पिच्छा पुरवला. त्यामुळं मेंदू भणभणला होता. ह्या समस्या जरी निपटल्या तरी त्यांचे सखोल विश्लेषण करणारे  प्रदीर्घ कॉल्स तुमची वाट पाहत असतात. ह्या समस्येचं मूळ कारण तुमच्या टीमकडे अंगुलिदर्शन करत असेल तर अशा प्रदीर्घ कॉल्सची प्रतीक्षा करताना झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. परंतु चांगल्या कंपनीत कोणा व्यक्तीला, अथवा टीमला दोषी न ठरवता ह्या चुकांमधून आपल्याला कसं काय शिकता येईल ह्यावर भर दिला जातो. ह्या आठवड्यात पुन्हा एकदा त्याचा सुखद प्रत्यय आला. जगातील चांगुलपणा काहीसा विरळ झाला असला तरी त्याच्या अस्तित्वाविषयी पुन्हा एकदा खात्री पटली. सद्ययुगात तुमच्या बाबतीत सदैव चांगलं कदाचित होत नसेल परंतु जर जगातील मुलभूत तत्त्वांवर अढळ श्रद्धा ठेवत जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच  तुमच्या प्रयत्नांना यश मिळेलच, ह्याची खात्री हे जग देत आहे आणि देत राहील !!

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...