मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

Sunday, September 24, 2023

वैचारिक सुस्पष्टता


आपलं स्वतःच असं एक जग असतं.  या जगात आपण, आपला मेंदू, आपलं मन, आपलं  वैयक्तिक / व्यावसायिक जीवन सारं सारं  काही असतं.  जीवनात आपण काही गोष्टी मनापासून करत असतो तर बरंच काही एक व्यक्ती म्हणून आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडण्यासाठी करत असतो. जस जसं आपलं वय वाढत जातं तसं जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत जातं.  

जबाबदाऱ्या तर सर्वांनाच असतात पण त्याचं ओझं बनवायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. जबाबदारीचं ओझं बनणं हा एक प्रवास असतो. ह्या प्रवासाची  प्रामुख्याने दोन कारणे असतात.  पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या पार पडण्याची मनापासून इच्छा उरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पार पडण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक किंवा मानसिक ताकद आपण आपल्यापाशी नसते. जबाबदाऱ्यांनी त्रासलेली माणसं सदैव आपल्या भोवती दिसत असतात किंवा आपणच जबाबदाऱ्यांनी त्रासलेलो आहोत  हे आपल्याला जाणवत असतं. 

जर आपल्याकडे विचारांची सुस्पष्टता असेल तर जबाबदाऱ्यांचं ओझं बनवायचं आपण टाळू शकतो.  यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.  

१) पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासमोर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व एका कागदावर लिहून काढाव्यात.  यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांची यादी वेगवेगळी असावी.  

२) वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये आपला वेळ कसा विभागावा याची सुस्पष्टता सुरुवातीलाच आपल्याकडं असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ  वैयक्तिक जबाबदाऱ्यांना ६० टक्के वेळ आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांना ४० टक्के वेळ! ह्यात छंदाला वेगळा वेळ द्यायचा की नाही हा सुद्धा महत्वाचा निर्णय तुम्हांला घ्यायचा असतो. हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे, आयुष्यात आपल्याला नक्की महत्वाचं काय आहे ह्याचा निर्णय तुम्हांला घेता आला पाहिजे आणि आपण असा निर्णय का घेत आहोत हे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या  व्यक्तींना स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. 

३) त्यानंतर यातील दोन्ही यादीतील सर्व जबाबदाऱ्यांना प्राधान्यक्रमाच्या उतरत्या मांडणीने लिहून काढाव्यात.   म्हणजे सर्वात महत्त्वाची जबाबदारी आधी आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या उतरत्या क्रमाने! 

४)  हे सर्व लिहून झाले की मग या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती साधनं, तंत्रं  आणि मार्ग उपलब्ध आहेत याचीही यादी बनवावी.  एखादी जबाबदारी पार पडण्यासाठी जर आपल्याकडे विविध पर्याय  उपलब्ध असतील तर त्यातील नक्की कोणत्या तंत्राचा वापर करावा याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे.  

५)  बऱ्याच वेळा हा निर्णय न घेता आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये उगाचच क्लिष्टता निर्माण होते.  योग्य वेळी निर्णय न घेता येणे आणि परिपूर्णतेचा अट्टाहास धरणे या दोन कारणांमुळे  आपल्या जबाबदाऱ्या बराच काळ आपल्या यादीवर तशाच कायम राहतात.  "Problems don't age well" असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं.  म्हणजेच आपण एखादी समस्या जर बराच काळ तशीच भिजत ठेवली तर ती गहन स्वरूप धारण करते. त्यामुळे एखादी जबाबदारी पार पडताना त्यामध्ये एक विशिष्ट प्रमाणात अचूकता असल्याची  आपल्याला खात्री  झाली की तो निर्णय घेऊन मोकळ व्हावं. 

६) प्रत्येक माणसाच्या कुवतीनुसार तो आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपैकी काही विशिष्ट जबाबदाऱ्याच पार पडू शकतो. मुद्दा ३ मध्ये उल्लेख केलेला प्राधान्यक्रम काळानुसार बदलत जातो.  त्यामुळे ज्या जबाबदाऱ्यांवर आपण लक्ष केंद्रित करत आहोत त्या जबाबदाऱ्या त्या क्षणी आपल्या प्राधान्यक्रमाच्या नक्की कोणत्या स्थानावर आहेत आणि पार पडताना आपण बाकीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना हा या गोष्टीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  बऱ्याच वेळा प्राधान्य कामातील खालच्या क्रमांकावर असलेल्या गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे आवश्यक असते.  

७) सहाव्या मुद्द्याचं थोडं वेगळं रूप. ही जी तुम्ही प्राधान्यक्रमाची यादी बनवत असता  ती यादी बनवताना हा प्राधान्यकम केवळ वर्तमान काळाला डोळ्यासमोर ठेवून बनवण्याची चूक करू नये. आपण  वर्तमानकाळातील घेतलेल्या बऱ्याचशा निर्णयांचे परिणाम दिसण्यासाठी भविष्यकाळ उजाडावा लागतो.  त्यामुळे एखाद्या जबाबदारीविषयी आज घेतलेला निर्णय हा भविष्यकाळाला डोळ्यासमोर घेऊन घेण्यात यावा.  आता तुम्ही म्हणाल की भविष्यकाळ कोणी पाहिला आहे आणि आजच्या निर्णयाची भविष्यकाळात काय परिणीती होणार आहे हे आम्ही आज कसे काय सांगू शकणार? मुद्दा अगदी बरोबर आहे.  परंतु एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांच्या परिणामांचे दायित्व सुद्धा घ्यावे लागते.  

हे सर्व वाचून जर तुम्हाला दडपण आले असेल तर ते दडपण काही प्रमाणात दूर करण्याचा सुद्धा माझ्याकडे मार्ग आहे. आतापर्यंत  आपल्या मागच्या अनेक  पिढ्यांनी  घेतलेले सर्व निर्णय काही अगदी अचूक होते असे नाही.  तरीही त्यांनी आपल्या परीने योग्य प्रयत्न करत आपलं आयुष्य जगत आपल्या पुढील पिढीसाठी जमेल तितके प्रयत्न केले.  

त्यामुळे तुम्ही लहान असा वा मोठे असा  प्रत्येक दिवशी तुम्ही नक्की काय करायचं याचा सकाळी विचार करा, त्यावर दिवसभर जमेल तितके प्रयत्न करा.  बाकी आयुष्यभर आपल्याकडून काय घडलं किंवा नाही घडलं त्याची काळजी करण्याची जबाबदारी त्या सर्व शक्तिमानावर सोडून द्या.  रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपटातील जुनी गाणी ऐकत शांतपणे हे एक चांगलं  आयुष्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना! 


Thursday, August 31, 2023

व्यक्तीस्वातंत्र्याच्या कोषाकडे!






कालच्या लोकसत्तेतील "पालक की मारक" हा विचारप्रबोधक अग्रलेख वाचला. केवळ नामांकित  वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशामागे लागून जगण्याशी संबंधित अनेक अंगाचा अभ्यास आनंददायी असू शकतो याचा अंदाज नसलेल्या आपल्या समाजात अजूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांची हाव सुटत नाही  असा विचार मांडणारा हा अग्रलेख! अधोरेखित  वाक्य अग्रलेखातून जसच्या तसं उचललेलं !

आता यावरील माझे विचार. 

मागच्या पिढीने शिक्षणाचा आधार घेत आपलं राहणीमान मध्यमवर्गीय जीवनस्तराकडे उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पूर्वीच्या चांगल्या राहणीमानाच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना या वेगळ्या पातळीवर होत्या. १९९० च्या दशकात जे आर्थिक उदारीकरणाचे धोरण आपल्या देशानं स्वीकारलं त्यामुळे एखाद्या वादळामुळे शेतीवाडीची जशी वाताहत होते त्यासारखी  परिस्थिती आपल्या समाजाची आणि त्याच्या मानसिक स्थैर्याची झाली. या उदारीकरणामुळे  आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या विविध पर्यायांच्या उपलब्धतेमुळे जीवनातील नव्या पैलूची (चंगळवादी आयुष्याची) आपल्या समाजाला ओळख झाली.  

आजचं कोणतंही वर्तमानपत्र उघडलं की अत्यंत आकर्षक जाहिरातींचा आपल्यावर भडिमार होत असतो.  त्यामध्ये लाख-लाख रुपयांचे भ्रमणध्वनी, तीस चाळीस लाखांच्या गाड्या,  दोन कोटी पासून ज्यांची किंमत सुरू होते अशा आलिशान सदनिका,  किमान चार-पाच लाख रुपये शुल्क असलेल्या परदेशवारी यात्रा,  विविध रंगीत टेलिव्हिजन संच, वातानुकूलन प्रणाली, महागडे  रेफ्रिजरेटर ह्यांचा समावेश असतो.  समाजातील काही मनं स्थिर असतात. आपली क्षमता, आपल्याला लाभलेला संस्काराचा वारसा, जीवनाकडून आपल्याला नक्की काय हवंय ह्याविषयी कमालीची सुस्पष्टता ती बाळगून असतात. त्यामुळं असल्या जाहिरातींपासून विचलित न होण्याची म्हणायला गेलं तर देणगी त्यांना लाभलेली असते. 

अजूनही बरीचशी मध्यमवर्गीय कुटुंब अशी आहे की जी जुन्या विचारसरणीला अनुकूल असे आयुष्य जगत असतात. परंतु बऱ्याच वेळा हा स्वखुशीने घेतलेला निर्णय नसून परिस्थितीसमोर हार मानून स्वीकारलेली एक अपरिहार्य अशी जीवन पद्धती असते. त्यामुळेच पालकवर्ग आणि काही प्रमाणात विद्यार्थीसुद्धा या परिस्थितीवर मात करण्यासाठी नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात.  त्यामुळं जो वर्ग अजूनही आपला आर्थिक स्तर उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना हा विचार पटणं सहजशक्य नाही. "नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे आवश्यक नाही" ही विचारसरणी आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्या लोकांकडून येण्याची शक्यता जास्त! 

अजून एक मुद्दा की अजूनही आपला बहुतांश समाज सामाजिक जीवनाशी आपली नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.  भारतीय सामाजिक जीवन हे एका विशिष्ट किंमतीवरच उपलब्ध असतं.  तुम्ही जेव्हा जेव्हा भारतीय सामाजिक जीवनात सहभागी होता त्यावेळी तुम्ही त्या संपूर्ण समाजाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी हवे तसे टक्केटोमणे देण्यास मारण्याचा अधिकार प्रदान करत असता.  बऱ्याच वेळा हे टक्केटोमणे हे तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात यासंबंधी असतात.  टक्केटोमणे मारणारी लोक स्वतः किती यशस्वी आहेत किंवा त्यांनी आयुष्यात नक्की कायमिळविलं  आहे हा मुद्दा गौण असतो.  इथं तुम्हाला दोन पातळीवर निर्णय घ्यायचा असतो.पहिली पातळी म्हणजे सामाजिक जीवनात तुम्हांला सहभागी व्हायचं आहे की नाही आणि दुसरी पातळी म्हणजे जर तुम्ही सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलात तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या तुमच्यावर होणाऱ्या टिप्पणीला तुम्ही किती महत्त्व देता! जर तुम्हाला या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्यात यश लाभत असेल किंवा तितकी मानसिक कणखरता तुम्ही दाखवू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या मर्जीने  जीवन जगता येतं. 

प्रश्न असा आहे की इतकी मानसिक कणखरता आपल्या समाजाकडे खरोखर उरली आहे का?  ही मानसिक कणखरता आणण्यासाठी आपला स्वतःशी संवाद असणे आवश्यक आहे.  स्वतःशी असलेला संवाद आणि नजीकच्या नातेवाईकांशी,  मित्रांशी  असलेला संपर्क आपल्याला समाजाच्या टिप्पणीपासून विचलित न होण्याची शक्ती देऊ शकतो.  अजूनही समाजाचा एक भाग ही कणखरता दाखवतो आणि आपल्या मर्जीनुसार जीवन जगतो. 

पुढील पिढीच्या बाबतीत एक गोष्ट होण्याची शक्यता मला वाटतेय. आज समाजाला जी बाकीच्या समाजाशी नाळ टिकून ठेवण्याची गरज वाटत आहे की बहुदा पुढच्या पिढीला वाटणार नाही.  आजच्या सामाजिक समारंभात आढळून येणारे दांभिकपण हे पुढच्या पिढीला या सामाजिक समारंभांपासून दूर लोटणारे ठरेल.  मग आपली स्थितीसुद्धा पाश्चात्य देशांसारखी होण्यास वेळ लागणार नाही, जिथे प्रत्येकजण आपल्याभोवती  व्यक्तीस्वातंत्र्याचा कोष विणून त्यात मग्न असेल. मनुष्यउत्क्रांतीतील हा पुढील टप्पा असेल.  


Saturday, June 24, 2023

Wilmington Delaware Diaries - भाग ४ अमिश गाव

ब्रँडीवाईन स्टेट पार्कची भेट आटोपती घेऊन आम्ही अमिश गावाच्या दिशेनं कूच केलं.  
विकिपीडिया वरून अमिश लोकांची थोडक्यात ओळख अशी देता येईल. 




The Amish (/ˈɑːmɪʃ/; Pennsylvania German: Amisch; German: Amische), formally the Old Order Amish, are a group of traditionalist Anabaptist Christian church fellowships with Swiss German and Alsatian origins.[2] They are closely related to Mennonite churches, a separate Anabaptist denomination.[3] The Amish are known for simple living, plain dress, Christian pacifism, and slowness to adopt many conveniences of modern technology, with a view neither to interrupt family time, nor replace face-to-face conversations whenever possible, and a view to maintain self-sufficiency. The Amish value rural life, manual labor, humility and Gelassenheit (submission to God's will).

थोडक्यात सांगायचं झालं तर अमिश लोक आपली साधी राहणी, साधा वेष, आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत धीम्या गतीने केलेला स्वीकार ह्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत.  ग्रामीण पद्धतीनं जीवनाचा स्वीकार, नम्रता, मनुष्यबळाचा वापर करून केलेली शेती ह्या अमिश लोकांच्या खास बाबी म्हणता येतील. त्यांच्या विषयी अधिक माहिती  https://www.amishvillage.com/ ह्या संकेतस्थळावर मिळविता येईल. 
 
विल्मिंग्टनपासून कारने साधारणतः सव्वा तासाच्या अंतरावर पेनसिल्व्हेनिया राज्यात ही अमिश लोकांची वसाहत आहे.  हा प्रवास हिरवाईच्या सानिध्यात अगदी मन प्रसन्न करून गेला. 



ह्या गावाच्या आसपास पोहोचताच अमिश लोकांच्या वसाहतीच्या खुणा दिसू लागल्या. ह्या चित्रात बहुदा त्यांचा बाजार भरला असावा. 


अमिश लोकांच्या वसाहतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे खूप दूरवरून दिसणारे कॉर्न silos. मक्याच्या पिकाचं भरघोस उत्पादन करून त्यांच्या साठवणीसाठी हे उभारण्यात येतात. 


इथं आम्ही अमिश गावात प्रवेश केला.  अमिश गावात आपले स्वागत आहे हे सांगणारा हा बोर्ड ! 



इथं आम्ही प्रत्येकी सव्वीस डॉलर्सचे बसचे तिकीट घेतले. बस बारा वाजता सुटणार होती. त्याआधी आम्ही पार्कात फेरफटका मारला. तिथं मेंढा, मोर, वळू, बदके असे विविध प्राणी गुण्यागोविंदाने नांदत होते. म्हणजे हो बदके सोडून बाकी सर्वांना बंदिस्त करून ठेवलं होतं. 



वळू अगदी समाधिस्थ अवस्थेत बसला होता. एकंदरीत तेच बरं होतं म्हणायचं. 




अमिश लोक कार वापरत नाहीत, त्यांची खास अशी बग्गी सुद्धा इथं होती. 







अमिश लोकांनी बनविलेली परंपरागत आयुधं सुद्धा इथं व्यवस्थितपणे मांडून ठेवली होती. 









अमिश लोकांच्या शाळेचा उल्लेख पुढं येईल. ह्या एकवर्गीय शाळेची प्रतिकृती इथं बनविण्यात आली होती. 






बारा वाजले आणि आम्ही बसमध्ये प्रवेश केला. सोळा जणांच्या बसमध्ये सत्या, मी, एक बहुदा कोरियन जोडपं आणि बारा गुजराथी बंधू - भगिनी होत्या. हे सर्व एडिसन गावावरून आले होते. पुढील दीड तास आम्ही ह्या बसमध्ये होतो. बसचे चालक एक वयस्क अमेरिकन गृहस्थ होते. त्यांचा आवाज अगदी खणखणीत होता.  त्यांनी आम्हांला अमिश लोकांविषयी खूप छान माहिती दिली. ही माहिती मी आता इथं नमूद करत आहे.  बाकी फोटो बसमधून काढलेले अमिश लोकांच्या शेतीचे आणि त्यानंतर त्यांच्या दुकानाचे. तिथं मी एका अमिश बाईला हॅलो केलं !! ही एक खास घटना !

आता बसचालकाने दिलेली माहिती. 

पुढील दीड तासभर आपण अमिश लोकांच्या वसाहतीचा फेरफटका मारणार आहोत. अमिश लोक त्यांच्या चेहऱ्याचे फोटो घेऊ देणे पाप समजतात. त्यामुळं तुमच्यापैकी कोणी जर त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हांला तात्काळ बसमधून उतरविले जाईल.  इथं एक तर तुम्ही अमिश असता किंवा इंग्लिश ! अमिश घरात फोन नसतो. काही काळापूर्वी त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत फोन असावा अशी विनंती केली. त्यामुळं त्यांना काही घरांबाहेर फोन बसविण्यास परवानगी देण्यात आली. इंग्लिश माणसाचं घर अमिश माणसानं विकत घेतलं की त्याला घरातील विद्युतपुरवठा खंडित करावा लागतो. त्यासाठी त्याच्याकडं एक वर्षाची मुदत असते. 

अमिश लोक शेतीसाठी आधुनिक उपकरणांचा वापर करत नाहीत. तंबाखू हे मुख्य पिकांपैकी एक पीक आहे. ऍलोपॅथी उपचारप्रणाली वापरण्यावर त्यांचा भर नसतो. प्रामुख्यानं ते होमिओपॅथीचा वापर करतात. परंतु अगदीच आणीबाणी उद्भवली तर ते मोठ्या इस्पितळातसुद्धा जातात. बहुतांश वेळा ते बिलाचा भरणा रोकड पैशानं करतात. आणि ते थेट पैसे देत असल्यानं त्यांची घासाघीस करण्याची क्षमता अगदी चांगली असते. 

अमिश मुलगा मुलीकडे  आपल्या प्रेमाची थेट वाच्यता करू शकत नाही. त्याआधी तिच्या आईवडिलांची परवानगी घेणं आवश्यक असते. मुलीला नाही म्हणण्याचा अधिकार असतो. अमिश ज्ञातीत घटस्फोटाला परवानगी नाही. लग्नाआधी पाच वर्षांपर्यंत मुलगा - मुलगी एकत्र राहू शकतात. ह्या काळात त्यांनी एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून घेणं अपेक्षित असते. 

ह्या दोघांनी एकदा लग्नाला संमती दर्शविली की बिशपच्या परवानगीने लग्नाची घोषणा होते. नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत हिवाळ्यामुळं शेतीची कामे थंडावली असतात. त्यामुळं ह्याच काळात बहुतांश अमिश लग्ने होतात. लग्ने मंगळवार किंवा गुरुवारी होतात. 

अमिश स्त्रियाच लग्नातील जेवण बनवितात. लग्नाला साधारणतः ३०० ते ५०० लोक उपस्थित राहतात. दुपारचे भोजन अगदी साग्रसंगीत असते. त्यानंतर नवविवाहित दांपत्याला आलेल्या भेटी उघडण्याचा कार्यक्रम असतो. सायंकाळी मोजके लोक भोजनासाठी असतात. दुपारच्या मेजवानीतील उरलेले पदार्थ ह्या भोजनात समाविष्ट असतात. 

अमिश शाळेत स्त्रिया शिक्षिकेची भुमिका बजावतात. शाळा फक्त आठवीपर्यंत असते. शाळेत फक्त गणित आणि इतिहास हे विषय शिकविले जातात. त्या स्त्रीचा विवाह झाल्यानंतर ती शाळेत शिकवू शकत नाही. 


हा माहितीजालावरून घेतलेला फोटो!  ह्या बग्गीची किंमत चौदा हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. बग्गीला टायर लावण्यास अजून बिशपमार्फत परवानगी देण्यात आली नाही. 




अमिश माणसाने केलेली शेती आणि इंग्लिश माणसानं केलेली शेती ह्यात मूलभूत फरक असतात. अमिश माणूस मक्याच्या दोन भागांमध्ये गवताची लागवड करतो. गवताने जमिनीची धूप थांबावी असा उद्देश ! अमिश माणूस जमिनीच्या उंचसखल भागानुसार पिकांची लागवड करतो. 






प्रत्येक अमिश कुटुंबाकडं सरासरी ३० ते ६० एकर जमीन असते. बस ड्रायव्हरने एक शेत दाखविले. त्या शेतकऱ्याचे शेत अपवाद होतं. त्याच्याकडं १०० एकर जमीन आहे. त्याची तीन मुले त्याला शेतीच्या कामात मदत करतात. 





अमिश स्त्रिया रविवार व्यतिरिक्त बाकीचे सर्व दिवस कपडे धुतात. पुलीचा वापर करून कपडे उंचावर वाळविण्यासाठी दोरीवर टांगलेले असतात. प्राण्यांनी ते खराब करू नयेत हा त्यामागील हेतू ! 




मोठ्या आकाराच्या टोमॅटो आणि टरबुजांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. 



आम्ही अमिश लोकांच्या दुकानात खरेदीसाठी (म्हणजे फेरफटक्यासाठी) गेलो. तिथं अनेक गोष्टी विक्रीसाठी होत्या. 













अशा प्रकारे दीड तासांची एक आगळी वेगळी सहल संपली. सायंकाळी भारतात फोन केल्यावर मी सुद्धा अमिश जीवनपद्धती स्वीकारण्याचा मनसुबा व्यक्त केला. तू स्वीकारणार असशील तर आम्ही सुद्धा तिथं येऊन अमिश पंथ स्वीकारू असे मला सांगण्यात आलं. त्यामुळं अमिश जमातीत एकाची भर होता होता राहिली !

Sunday, June 11, 2023

Wilmington Delaware Diaries - भाग३ Brandywine state park

शनिवार दिनांक १० जून २०२३ 




सकाळी नाष्टा आटोपून ब्रँडीवाईन स्टेट पार्कच्या दिशेनं मार्गस्थ झालो. ब्रँडीवाईन ह्या नावानं काही वाचकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उद्यानात मात्र ह्या दोन्ही गोष्टींना परवानगी नाही. सकाळ अतिप्रसन्न होती. तापमान बहुदा ७० अंश फॅरेनहाईटच्या आसपास असावं. पार्कच्या दिशेनं जाणारा रस्ता हा नेत्रसुख देणारा असा आहे.  



उद्यानात शिरताक्षणी दिसणारं उद्यानात जाणाऱ्या रस्त्याचं आणि त्यानंतर असणाऱ्या इटुकल्या पाऊलवाटचं हे विहंगम दृश्य.  इथं लहान मुलं, तरुण / वृद्ध जोडपी चालण्यासाठी, सायकल चालविण्यासाठी आली होती. समोरासमोर येताच सुस्मित वदनाने सुप्रभात म्हणत होती. 



हिरव्या रंगांच्या ह्या मनसोक्त उधळणीनं मन अगदी प्रसन्न झालं होतं. बऱ्याच दिवसांनी अगदी बालपण स्वीकारून ह्या निसर्गात एकरूप होण्याची इच्छा निर्माण झाली. हवेतील ताजेपणा मनाच चैतन्याची उधळण करत होता. ह्या हिरव्या रंगाच्या मैफिलीत आपलं पिवळेपण मिरवणाऱ्या ह्या इवल्याशा फुलाने लक्ष वेधून घेतलं. 


बाजूला नितळ पाण्याची नदी वाहत होती. वातावरणात पक्ष्यांचा नादरव मनाच्या प्रसन्नतेला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवत होता. पाण्याची शुद्धता मनाला भावत होती. छोटे सर्पवगातील जीव आनंदात पाण्यात मनसोक्त पोहत होते. 








ह्या महाकाय वृक्षाने किंबहुना त्याच्या आकारानं लक्ष वेधून घेतलं. 


वाटेत कापून ठेवलेले हे ओंडके वास्तवाची जाणीव करून देत होते. 

पुन्हा एकदा इवलुश्या फुलांनी लक्ष वेधून घेतलं. 


उद्यानात दिसणारे महाकाय वृक्ष, त्यांचा विस्तार निसर्गापुढं  नतमस्तक होण्याची भावना निर्माण करत होता.  सारं काही विसरून जावं आणि इथंच राहावं असं वाटत होतं. 









निसर्गाला देशाची, खंडांची बंधनं नसतात. वृक्ष, तृण, पक्षी, मासे सर्वांसोबत आपण ह्या बंधनापलीकडं नातं जोडू शकतो. खरंतर इथून पाय निघत नव्हता. पण आमिश वसाहतीला भेट द्यायची होती आणि ती उत्सुकता मनाला स्वस्थ बसून देत नव्हती. 


वैचारिक सुस्पष्टता

आपलं स्वतःच असं एक जग असतं.  या जगात आपण, आपला मेंदू, आपलं मन, आपलं  वैयक्तिक / व्यावसायिक जीवन सारं सारं  काही असतं.  जीवनात आपण काही गोष्ट...