मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
जुना काळ - नवा काळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जुना काळ - नवा काळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

दिवाळी




सणांना तोटा नसलेल्या भारतदेशात दिवाळी सणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मनात दडून बसलेल्या बालपणीच्या दिवाळीच्या मनोहर आठवणी, त्यावेळी चिंताविरहित भावनेत अनुभवलेले आनंदाचे, कौतुकाचे क्षण आपण कितीही मोठे होत गेलो तरी दर दिवाळीला मनःपटलावर नव्यानं उमटत राहतात. मग सुरु होते ती आजच्या काळात त्या आठवणींना शोधण्याची, पुन्हा अनुभवण्याची धडपड!

दिवाळी खरंतर तीन-चार दिवसांची. पण ह्या तीन - चार दिवसांनी उत्साहानं आयुष्य जगण्याची उमेद वर्षभर पुरणारी. आपल्यापासून कायम दूर निघून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणी दररोज तर येत असतातच पण दिवाळीच्या दिवसांत त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवते. त्यांना बरं वाटलं असतं अशा पद्धतीनं दिवाळी साजरी करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वर्षी बरेचजण दिवाळीनिमित्त भेटायला आले. जुन्या आठवणी निघाल्या. खरंतर आयुष्याच्या एका टप्प्यानंतर आपण स्वतंत्ररित्या आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायला शिकलो असतो. परंतु आधीच्या पिढीचं भोवताली असणं खूप आश्वासक असतं. अगदी कसोटीच्या प्रसंगी त्यांचा सल्ला अगदी सुखावह असतो. त्यांच्या निघून जाण्यानं प्रचंड एकाकी वाटत राहतं. आपल्यापरीनं आयुष्यात गुंतून घेत ह्या एकाकीपणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वयात वरच्या पिढीचं छप्पर असणं खूप आधार देणार असतं हे बोलणारा सुजित भेटला. अभ्यंगस्नानासाठी सकाळी लवकर उठणं नक्कीच महत्वाचं पण साडेतीन म्हणजे जास्तीच लवकर होते अशी काहीशी हळुवार तक्रार प्रज्ञाताईनं केली.  गावातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना भेटायला निघालेला राकेश तासभर गप्पा मारत बसला. कधीही हक्कानं गप्पा मारायला येऊ शकतो अशा घरांपैकी तुमचं हे घर हे त्याचं वाक्य लक्षात राहिलं. पूर्वी गावागावांत आदरानं ज्यांच्याकडं पाहिलं जायची अशी काही घरं असायची. परंपरा, शिष्टाचार कसे पाळावेत हे ज्यांच्याकडून शिकावं अशी ही घरं असायची. काळाच्या ओघात ही घरं, त्यातील आदरणीय माणसं विखुरली गेली आणि संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत अशा संस्था नाहीशा झाल्या.    

सण हा समूहानं साजरा करण्याचा प्रसंग. सणाच्या आठवणी कुटुंब, घर, गांव, मित्रमंडळी ह्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या असतात. ज्यांनी हे अनुभवलं आहे ती सारी माणसं आयुष्यभर ह्या आठवणींसोबत जगत राहतात. सणांचं खरं सणपण अनुभवण्यासाठी जुन्या परंपरा, आठवणींना शक्य तितका उजाळा देत ते कुटुंबासमवेत घरी  साजरे करणं हेच इष्ट होय. रस्त्यातील ट्रॅफिक जॅममध्ये स्वतःला कोंडून घेत बऱ्याच कालावधीनंतर रिसॉर्टवर पोहोचुन साजरी केली गेलेली दिवाळी आता मूळ धरु पाहतेय! बघुयात काय होतंय ते ! 

बलिप्रतिप्रदेच्या दिवशी भल्या पहाटे घरातील कचरा घराबाहेर काढून थोड्याफार थंडीत आंघॊळ केल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळात लिहलेली ही पोस्ट ! बळी तो कान पिळी! 

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

दुरावलेली दिवाळी !





मौशी म्हणाली दिवाळीवर काहीतरी लिही. बरेच दिवस गुडी गुडी लिहुन काहीसं समाधानी वाटत नव्हतं. म्हणुन मग वाक्य लिहिलं 

"बालपणीच्या त्या रम्य आठवणींचा शोध दर दिवाळीत सुरुच आहे
ती रम्य दिवाळी अजून दुरवर जाण्याची प्रथा यंदाही चालूच आहे"

काहीजणांना लगेचच संदर्भ लागला, काहीजणांना नाही लागला आणि काही जणांनी मला माफ केलं. ज्यांना लागला त्यात मोठ्या भावाच्या मित्रानं FB वर दिलेली प्रतिक्रिया "अगदी मनातलं" लाखमोलाची. शाळेच्या ग्रुपवर मात्र मला रोखठोक प्रश्न विचारण्यात आला - 

बालपणची दिवाळी आणि आताची दिवाळी यात काय फरक आहे?
फराळ ,कंदिल, नातलग , मित्रमंडळ (अजून वाढल) सगळ तर तसच आहे 

आता प्रश्न रोखठोक होता. एखादं नाट्यमय वाक्य लिहुन फेसबुकवर लाईक घ्यायचे पण त्या वाक्याचं स्पष्टीकरण मात्र आपण ज्याच्या त्याच्यावर सोडायचं हे योग्य नव्हे. त्यामुळं हा प्रश्न विचारणाऱ्या अनघाचे आभार !

आता आज सोमवार सकाळ! त्यामुळं ४० - ४५ मिनिटांत जे काही सुचेल ते खरडवुन ही पोस्ट संपवावी लागेल, त्यामुळं ही पोस्ट अगदी थेट मुद्द्यांच्या रूपांत !

  1. पुर्वीच्या दिवाळीत घरात प्रत्येकाला मिळणारी जागा छोटी असली तरी त्यातील एकोप्यानं, माणसांच्या संख्येनं ते घर खुप मोठं बनुन जायचं. संपुर्ण घराचे अलिखित नियम असायचे आणि घरातील सर्वजण धाकानं नव्हे तर एका विशिष्ट श्रद्धेनं हे नियम पाळायचे. नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा ह्या दिवशी चार, साडेचारला उठणं हे सक्ती म्हणुन नव्हे तर त्या वर्षीच्या दिवाळीच्या आठवणीसाठी मनापासुन जमायचं. 
  2. वर्षात नवीन कपडे मिळण्याच्या मोजक्या प्रसंगांपैकी (बहुतेकांसाठी एकमेव प्रसंगांपैकी ) दिवाळी हा एकमेव प्रसंग असायचा. त्यामुळं आपण ह्या नवीन कपड्यात हे आरश्यात (fb वर नव्हे )कसे दिसतो पाहण्याची खूप उत्सुकता असायची. 
  3. भाऊबीजेच्या दिवशी सर्व आत्या, लग्न झालेल्या बहिणी घरी यायचे. माणसं, माणसांच्या जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या झाल्या नव्हत्या की भाऊबीजेच्या दिवशी सर्वांना एकत्र जमणं शक्य होऊ नये ! आजी, काका काकी, मामा मामी, आत्या आत्याजी, मावशी, सर्व भावंडं - आपल्या संपुर्णत्वाची जाणीव देणारी ही नाती. दिवाळीत ही सारी एकत्र यायची आणि आपल्याला मानसिक समाधानाच्या खूप खूप उंच पातळीवर घेऊन जायची. आता ही सारी एकत्र नाही भेटत.
  4. आमच्यासारख्या काही कुटुंबात लहानपणीचा काही काळ अगदी चुलीवर पाणी तापवुन आंघोळ करावी लागायची. ज्यांनी सकाळी चार वाजता उठुन पेंगत पेंगत चुलीवर स्वतःसाठी पाणी तापवलंय त्यांना त्यातील अवर्णनीय मजा माहितच असेल. 
  5. नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी सात वाजता आंघोळ आटोपल्याने प्रचंड मोकळा वेळ असायचा आणि लोक गावातील नातेवाईक, मित्रमंडळींकडे घरी बनविलेल्या फराळाचा आनंद घेण्यासाठी जायची. हल्ली सकाळी कसबसं सात वाजता उठुन आंघोळी आधी WA, FB शुभेच्छा पाठविण्याची पद्धती रुढ झाली आहे आणि नातेवाईक, मित्रमंडळींसोबत दिवसा भेटण्याची पद्धत दुर्मिळ होत चालली आहे. 
  6. सकाळी एकत्र केलेल्या फराळात बहुतांशी पदार्थ घरी बनविलेले असतं आणि एखाद - दुसरा मिठाईच्या दुकानातील असे. अजुनही घरी पदार्थ बनतात पण त्यातील बरेच पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळं त्यांचं दिवाळीपण मागे सरत चाललं आहे. आणि दुकानातील मिठायांनी फराळाच्या ताटातील मानाचं स्थान पटकावलं आहे. 
  7. पुर्वी मुलांना पोहणं, फटाके फोडणं हे शिकविण्यासाठी पालकांची सोबत लागत नसे. प्रत्येक परिसरातील मुलांचा गट जीवनावश्यक गोष्टींचं हे 'transition' नवीन मुलांना करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असे. त्यामुळं कोणतीही माळ बिनधास्त कशी फोडायची आणि फटाके संपत आले की लवंगी, केपा, टिकली वगैरे छुटपूट फटाक्यांकडे कधी आपला मोर्चा वळवायचा हे मुलांना लगेचच कळायचं. 
यादी अजुन वाढू शकते पण सोमवार सकाळ असल्यानं थांबायला हवं. पण ह्यात एक मुद्दा! हे सर्व काही लहानपणीच्या नजरेतुन ज्यावेळी जबाबदारी अगदी शुन्य असायची. त्यावेळी मोठ्या असलेल्या आपल्या आईवडिलांना, काका - काकुंना, आत्या, मावश्यांना पण ही दिवाळी आनंदमयी वाटायची का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न! पण आयुष्यात काही आदर्शवत वाटणाऱ्या गोष्टींचा जास्त उहापोह न करता त्यांचं आपल्या मनातील आदर्शपण तसंच कायम ठेवावं हेच योग्य अशी माझी भुमिका  ! दिवाळी redefine होतेय हेच खरं! कदाचित २०३७ साली मागे वळुन पाहिलं तर २०१७
सालची दिवाळी अगदी पारंपरिक वाटेल! 
कालाय तस्मै नमः !

सोमवार, २३ मे, २०१६

इस्त्री



शाळा आणि महाविद्यालयातील गोष्ट! तो काळ एकतर वेगळा होता किंवा मी वेगळा होतो किंवा दोन्हीही! म्हणजे शाळेच्या वेळी खात्रीपुर्वक मी सांगु शकतो की आम्ही सर्वजण बिना इस्त्रीचे कपडे परिधान करायचो. महाविद्यालयात माझ्या बाबतीत परिस्थिती बदलली नव्हती आणि आजुबाजूच्या मुलांचे निरीक्षण करुन त्यांनी इस्त्री केलेले कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्याइतकी माझी कुतुहूलशक्ती विकसित झाली नव्हती. पण बहुदा रुपारेल आणि SPCE ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे आधिक्य असलेल्या कॉलेजात माझं शिक्षण झाल्याने बहुतांशी हीच परिस्थिती असावी असं मला वाटत! 

नंतर मग नोकरीला लागल्यापासुन मात्र परिस्थिती बदलली. इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घालुन जाणे ही काळाची गरज बनली. विरार लोकलमधुन अंधेरीला उतरेपर्यंत हे कपडे इस्त्री केले आहेत ह्यावर कोणी विश्वास ठेऊ शकत नसे. पण "मी इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घातले!" असं मानसिक समाधान का काय म्हणतात ना ते मात्र मिळायचं!

माझे वडील ऑफिसला जाईतोवर स्वतःचे कपडे स्वतः घरी इस्त्री करत. प्रत्येक कपडा अगदी मन लावुन व्यवस्थित! त्यावर पाण्याचे थेंब शिंपडायचे, प्रत्येक बाहीची घडी अगदी व्यवस्थित पडली आहे ह्याची खातरजमा करुन घेत! माझ्याकडे काही बाबतीत व्यवस्थितपणा आहे असे लोक म्हणतात आणि पत्नी सुद्धा म्हणते! म्हणजे नक्की असावा ! पण इस्त्री करण्याबाबतीत मात्र माझ्याकडे इतका काटेकोरपणा नाही. साधारणतः पाच मीटर अंतरावरुन पाहणाऱ्या माणसाला मी इस्त्री केलेले कपडे घातले आहेत असा भास / विश्वास व्हायला हवा इतक्या काटेकोरपणे इस्त्री करावी हे माझे धोरण! वडील निवृत्त झाले आणि मग आम्ही इस्त्रीवाला पकडला. हे लोक जशी मस्त इस्त्री करतात तशी आपल्याला सुद्धा एकदा का होईना करता यावी ही माझ्या मनात जबरदस्त इच्छा! "त्यांची इस्त्री वेगळी असते !" बायकोने मला समजावल्यावर मी काहीशा अविश्वासाने आणि काहीशा नाराजीने तिच्याकडे पाहिलं. 

पुढे अमेरिका गाठली. तिथं इस्त्रीवाला कुठून मिळणार आणि असला तरी आपल्याला दररोजच्या दररोज कोठे परवडणार? अमेरिकेतील लोकांचे एक वागणं आपल्या सर्वांना लगेच लक्षात येईल. जी काही धमाल करायची ती शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रात्रीपर्यंत! रविवारी का कोणास ठावूक, मंडळी काहीशी दुःखात वाटायची. हाणून सर्वजण घरकामाला लागलेले दिसायचे. आमच्या वसाहतीत कपडे धुवायची यंत्रे सार्वजनिक ठिकाणी असल्याने बरीच पुरुषमंडळी तिथंच भेटायची. पुढे मग रविवारी जास्तच गर्दी व्हायला लागल्यापासुन मग मी माझ्या कपडे धुण्याच्या वेळा बदलल्या ही गोष्ट वेगळी! 

असो तर अमेरिकेत असताना रविवारी रात्रीचे जेवण आटोपलं की मग मी आठवड्याचे सर्व कपडे इस्त्री करायला घ्यायचो! एकदम ब्रह्मानंदी टाळी लागणे वगैरे प्रकार नसला तरी मस्तपैकी मी विचारमग्न व्हायचो. चिंतातुर जंतु असलेल्या माझ्या मनात पुढील आठवड्यात वाढुन ठेवलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणते विचार येणं शक्य नव्हते. परंतु हा वेळ मला आवडायचा! माझ्या मनाला तो येणाऱ्या आठवड्यासाठी तयार करण्यासाठी खूपच मदत करीत असे! प्राजक्ता सुरुवातीला सूचना करी पण नंतर तिने माझा नाद सोडला होता. तुझी इस्त्री आणि तुझे ऑफिस - मला काय त्याचं ! अशा निष्कर्षापर्यंत काही काळाने ती येऊन पोहोचली होती. सोहम एक दोन वर्षाचा असेल. हा काहीतरी भयंकर प्रकार आहे हे इस्त्रीने तापलेल्या कपड्यांना स्पर्श करुन त्याने समजुन घेतलं होतं आणि त्यामुळे तो त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नसे. ह्या कारणांमुळे मी आणि माझी इस्त्री असा हा अर्धा तास अगदी एकांताचा काळ मला मननासाठी मिळे! 

आज अचानक हे सर्व इस्त्रीप्रकरण आठवायचं कारण म्हणजे मे महिना आणि इतर काही कारणांमुळे माझ्यावर इस्त्रीची वेळ आली. पुन्हा एकदा मन विचारात गुंतलं. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करणे हे आपल्याला अगदी वास्तवात ठेवण्यासाठी खूप मदत करतं ह्याची जाणीव मला झाली. पैसा टाकुन सोयी मिळविता येतात ह्यात काही संशय नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण ह्या सोयी मिळाल्याने जो मोकळा वेळ मिळतो त्याचा व्यवस्थित वापर न करता आल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जमिनीवर बसुन इस्त्री करणे हा एक उत्तम व्यायाम आहे असे मी म्हणतो. त्याचप्रमाणे त्या वेळात आपण आपल्या भ्रमणध्वनीपासून दुर राहतो आणि त्यामुळे घरातील लोकांशी संवाद साधण्याची शक्यता वाढीस लागते. आणि तुमच्याकडे कितीही पैसा असो स्वतः बाजारात जाऊन जीवनावश्यक गोष्टी विकत घेता येणं, प्राथमिक पातळीवरील स्वयंपाक करता येणे, इस्त्री करता येणे, घरातील सर्व उपकरणे आई / पत्नीच्या अनुपस्थितीत वापरता येणे हे प्रसंग तुमच्यावर कधी ना कधी तरी ओढवणारच! त्यावेळी तुम्हांला ते निभावता आले पाहिजेत हे नक्की! 

आधुनिक काळ आपल्यापुढे एका आभासी विश्वाचे चित्र रेखाटण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे मुलभूत तत्वांना आपण दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत. पण अगदी निकटच्या भविष्यात ही मुलभूत तत्वे आपल्या खऱ्या महत्त्वासकट आपल्यासमोर उभी ठाकतील ह्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही! 

हे सर्व काही आज सकाळी कराव्या लागलेल्या इस्त्रीच्या दोन कपड्यांपायी !! :)

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

सुपूर्दता



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या आपण प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणू शकतो. उदाहरणे द्यायची झाली ती अनेक, मला आवडलेले उदाहरण म्हणजे अडचण / धोका व्यवस्थापन (Risk Management). ऑफिसात अशा प्रकारच्या व्यवस्थापनासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली जाते आणि ती बर्याच वेळा तपासून सुद्धा पाहिली जाते. आपल्या जीवनात सुद्धा याची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. घरकामवाल्या बाईने न सांगता सोमवारी सुट्टी मारणे, मुलाची शाळेची बस न येणे ह्या छोट्या छोट्या आपत्कालीन प्रसंगासाठी आपल्या सर्वांकडे Plan B तयार असणे आवश्यक असते. तसा तो आपल्याकडे तयार असतो पण तो चर्चिला / तपासाला गेलेला नसतो.
असो आज मला अशाच एका विषयावर लिहायचे आहे आणि तो म्हणजे Knowledge Transition अर्थात माहिती, संस्कृती यांची एका व्यक्तीकडून दुसर्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्दता ! मागच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंबात ही सुपूर्दता नकळत होत असे, कारण देणारा आणि घेणारा दोघेही एका घरात राहत, एकाच प्रकारच्या व्यवसायात मग्न असत. परंतु आजच्या शहरात राहणाऱ्या पिढीमध्ये मात्र हे वहन बर्याच बाबतीत अपूर्णच राहिले. प्रत्येक ज्ञातीचे संस्कार, चालीरिती ह्या बर्याच प्रमाणात मागच्या पिढीकडून आजच्या पिढीकडे सुपूर्द झाल्याच नाहीत. आता ह्या बाबतीत सुपुर्दतेची गरज आहे किंवा नाही यावर मतभेद होवू शकतात. ठीक आहे परंतु किमानपक्षी ह्या गोष्टी लिखित स्वरुपात तरी उपलब्ध करून ठेवावायला हव्यात असे माझे म्हणणे. म्हणजे आज नाही पण पुढे कधीतरी कोणास हे संस्कार, चालीरिती माहित करून घ्यावेसे वाटले तर माहितीचा स्तोत्रच नाही अशी परिस्थिती नको! असो बहुधा ह्या स्थितीचे गांभीर्य मोठ्या शहरात जास्त असावे, छोट्या शहरात, गावांत मात्र ही सुपूर्दता यशस्वीरीत्या होत असावी असा भाबडा विश्वास बाळगूया!

बदलांचा मागोवा!


असे म्हणतात की सद्ययुगात एकच गोष्ट कायम आहे आणि ती म्हणजे बदल! खाजगी क्षेत्रातील यशस्वी कंपन्या हे सत्य ओळखून आहेत आणि जगातील संभाव्य बदलांचा मागोवा घेत त्यानुसार भविष्यकाळातील धोरणे आखण्यासाठी ह्या कंपन्यांनी सल्लागार लोकांची नेमणूक केली असते. ज्या कंपन्यामध्ये अशा पदांवर योग्य व्यक्ती असतात त्याच कंपन्या कालौघात टिकून राहतात. परंतु बाकीच्या क्षेत्रांचे काय? स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासनपद्धतीचा अंगीकार केला. त्याचबरोबर छुप्या रूपाने काही गोष्टी घडल्या. ज्या विशिष्ट वर्गाने आधी बराच काळ भारतीय सामाजिक जीवनावर आधिपत्य गाजविले त्या समाजाला राजकारणापासून पद्धतशीररित्या दूर ठेवले गेले. त्यामुळे भारतीय समाज त्या वर्गातील अंगजात असलेल्या नेतृत्वगुणाला मुकला. स्वातंत्र्यकाळापासून आजवर भारताने प्रगती तर केली परंतु नक्कीच आजचे चित्र पाहता आपणास आशादायक भविष्यकाळ दिसत नाही. खाजगी क्षेत्र असो की राजकारण असो, एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडील प्रगतीसाठी 'तिथे पाहिजे जातीचे' म्हणजेच त्या कामासाठी योग्य व्यक्तीच हवी ही उक्ती सार्थ ठरते. आपल्या देशातील लोकशाही पद्धतीच्या संरचनेमुळे लोकानुनय करण्याऱ्या धोरणांचाच स्वीकार केला जातो. प्रादेशिक पक्षांचे वाढलेले सामर्थ्य देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अश्या धोरणांच्या आड येते. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्या भारतात तयार होणारे अभियान्त्रिक पदवीधर. पुढील २० वर्षात भारताला आणि जगाला किती अभियान्त्रिक पदवीधरांची गरज आहे आणि एकंदरीत उद्योगधंद्यांची वाढ कोणत्या दिशेने होणार आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा पूर्ण अभाव सध्याच्या राजकीय नेतृत्वात दिसतो. साधारणतः १५ वर्षापूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली. त्यासाठी आपण तयार नव्हतो. मग काय झाले तर बाकीच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील लोक त्या क्षेत्रात शिरले. प्राथमिक पातळीवरील कामे करण्यासाठी हे ठीक होते परंतु नवीन product निर्माण करणे अशा विकसित स्वरूपांच्या कामासाठी आपण तयार नव्हतो. आजची स्थिती काय आहे तर आपण फक्त माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते निर्माण करण्यावर लक्ष देत आहोत. अभियांत्रिकीच्या मुलभूत शाखांमध्ये (स्थापत्य, विद्दुत, mechanical ) भविष्यातील गरज काय आहे याचा अभ्यास करण्याच्या दूरदृष्टीचा / किंवा ह्या दूरदृष्टीच्या क्षमतेचा पूर्ण अभाव आपल्या राज्यकर्त्यांकडे दिसतो. वाईट इतक्याच गोष्टीचे वाटते की खाजगी क्षेत्रात ह्या सर्व प्रश्नांचा दूरगामी विचार करू शकणारे अनेक व्यवस्थापक आहेत. परंतु सद्य राजकीय प्रणाली अशा सक्षम लोकांना भविष्यातील धोरणे ठरविण्यासाठी समाविष्ट करून घेत नाही. काही अपवाद आहेत जसे की नंदन निलकेणी यांचा UIDAI प्रकल्पातील समावेश! परंतु लालफितीचा मुकाबला करण्यात त्यांची अर्धी शक्ती वाया जात असल्याचे जाणवते.

जाता जाता हेच म्हणावेसे वाटते, भारताचे सध्याचे यश दोन घटकांमुळे आहे एक खाजगी क्षेत्रातील सक्षम नेतृत्व आणि चांगुलपणावर विश्वास ठेवून जीवनातील असंख्य अडचणींचा शांतपणे मुकाबला करणारा मध्यमवर्ग. परंतु आपल्या देशाची ही एक उत्तम स्थिती आपण राजकीय क्षेत्रातील दूरदृष्टीच्या अभावामुळे वाया घालवीत आहोत हीच खंत. ह्या राजकीय प्रणालीत बदल कोण आणि कसे आणणार हाच खरा प्रश्न आहे.

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...