पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विविध तात्कालीन घटकांचा विचार करून ह्यातील एका पदार्थांची निवड करत असे.
आजच्या पोस्टमध्ये आपण संक्षिप्तपणे भारताच्या विविध प्रांतात वेगवेगळे न्याहारीचे पदार्थ सर्वमान्य का झाले असावेत, महाराष्ट्रात पोह्यांनी अग्रगण्य न्याहारीच्या पदार्थात स्थान का मिळवलं असावं? भावी वधूवरांना प्रथम भेटीच्या वेळी कांदापोहे का खाऊ घातले जातात आणि प्रोटीन वादळात पोह्यांचे भवितव्य काय ह्या प्रश्नांचा ऊहापोह करणार आहोत. खरंतर हा एक सखोल संशोधनाचा विषय आहे. पण मी थोडक्यात आटोपतं घेतलं आहे.
१. न्याहारीच्या पदार्थातील प्रांतीय वैविध्य
स्थानिक पिके प्रत्येक प्रांतात न्याहारीच्या पदार्थ निवडीत महत्वाचा घटक बनतात. दक्षिण भारतात तांदुळ मुबलक असल्यानं इडली, डोसा तर पंजाबात गव्हामुळं पराठा, महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, तांदूळ ह्यामुळं पोहे, उपमा, थालीपीठ तर बंगालमध्ये चक्क मासे सुद्धा न्याहारीच्या पदार्थात स्थान मिळवून आहेत.
हवामानाचा प्रभाव हा घटक लक्षात घेण्याजोगा आहे. पंजाबात जास्त उष्मांक मिळवून देणारे लोणी, तूप, पराठे तर तुलनेने उष्ण प्रदेशात हलके, पचनास सोपे असे इडली, पोहे असे पदार्थ पसंत केले जातात.
कष्टकरी समाज ऊर्जा देणारी न्याहारी पसंत करतो तर पांढरपेशा वर्ग हलकीफुलकी न्याहारी पसंत करतो. दक्षिण भारतात मंदिर संस्कृतीमुळे इडली, पोंगल यांसारखे सात्त्विक पदार्थ विकसित झाले.
मुघल प्रभावामुळे उत्तर भारतात पराठे आणि भरपूर मसालेदार पदार्थ लोकप्रिय असावेत तर पोर्तुगीज प्रभावामुळे गोव्यात काही विशिष्ट ब्रेड व बेकरी पदार्थ विकसित झाले.
मराठी गृहिणी, कुटुंब सात्विक, शालीन स्वभावाच्या असतात. सकाळच्या प्रसन्न घडीला तरी घरातील सात्विक वातावरण कायम राहावं म्हणून सात्विक पोहे निवडले जाण्याची शक्यता जास्त असते. पोहे बनविण्यासाठी लागणारे जिन्नस सहज उपलब्ध असतात आणि पोहे बनविण्यात तुलनेनं कमी वेळ लागत असल्यानं पुर्वीच्या गृहिणींना ज्ञानसाधनेस आणि हल्लीच्या गृहिणींना भ्रमणध्वनीसाधनेस पुरेसा वेळ मिळतो. घरातील पुरुषांनी पोहे बनविण्यात पुढाकार घ्यावा अशी चळवळ सुरु झाल्यास माझा तिला तात्विकदृष्ट्या पाठिंबा राहील.
वरील सर्व प्रकारांचा विचार करता महाराष्ट्रात पोहे न्याहारीच्या आघाडीच्या तीन पदार्थात स्थान पटकावून आहे.
२. पोह्यांचे एकूण प्रकार
पोह्यांचे एकूण प्रकार १७३ की १८९ ह्याविषयी तज्ञ मंडळीत सुद्धा एकमत होऊ शकत नाही. मी तज्ञ व्याख्येच्या जवळपास सुद्धा जात नसल्यानं मी फक्त पोह्यांच्या काही लोकप्रिय प्रकारांचा उल्लेख करून पुढील मुद्याकडे जातो. कांदा पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे, कोल्हापुरी पोहे, नागपुरी तर्री पोहे, कोकणी नारळ पोहे, दूध पोहे, दही पोहे, चिवडा पोहे (सणावाराचे), इंदोरी पोहे, सेव पोहे, उसळ-पोहे. बुधवार, शुक्रवार, रविवारी आमच्या घरी पोहे केल्यास त्यासोबत ऑम्लेट किंवा तत्सम अंडाजन्य पदार्थ दिला जातो. ह्या प्रकारास पोह्याच्या अधिकृत प्रकारात राजमान्यता मिळाली नाही.
पोह्यांचे प्रकार फक्त पाककृतीनुसारच नाही तर पोह्यांच्या जाडीवरूनही केले जातात. जाड पोहे, मध्यम पोहे, पातळ पोहे, लाल तांदळाचे पोहे वगैरे वगैरे. अजुन काही जाडीचा प्रकार / रंग असल्यास ह्या विषयात जो कोणी डॉक्टरेट करणार असेल त्यांनी त्यांचा उल्लेख करावा.
३. भावी वधुवर आणि कांदेपोहे
भावी वधुवर ज्यावेळी भेटतात त्यावेळी बहुदा कांदेपोहेच का निवडले जातात ह्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भावनिक आणि इतर इक कारणे आहेत.
अशा भेटींच्या वेळी भावी वधुवर आणि त्यांच्या कुटुंबातील संवाद हा महत्वाचा घटक असतो. अशा वेळी बनविण्यास सर्वात सोपा,जो बनविण्यात चुक होण्याची शक्यता कमी आहे (Low Risk), जो ग्रहण केल्यानं उपस्थित पाहुणे मंडळींच्या पचनसंस्थेला सर्वात कमी धोका आहे असा पदार्थ निवडणं योग्य आहे असं इतिहासानं मराठी लोकांना समजावलं असावं. आता सांस्कृतिक, भावनिक कारणं वगैरे काय आहेत असा विचारण्याचा दीडशहाणेपणा करू नकात. ते वाक्य प्रभावशाली होण्यासाठी ह्या दोन प्रकारांची भर घातली होती.
थोडा अधिक विचार करता समजा मसालाडोसा हा अशा भेटींच्या वेळचा राजमान्य पर्याय ठेवला असता तर नवऱ्या मुलाला चमचा काट्यानं मसाला डोसा खाता येत नाही, मुलीकडच्यांना एकही चटणी नीट बनवता आली नाही अशा कारणांमुळं होऊ घातलेली लग्न फिस्कटली असती.
आता तर कांदेपोहे कार्यक्रम ही एक सांस्कृतिक संज्ञा बनली आहे.
४. प्रोटीन वादळ आणि पोह्यांचे भवितव्य
आजकाल सोशल मीडिया, फिटनेस शिक्षक आणि सप्लिमेंट उद्योगामुळे "प्रोटीन" अपरिहार्य बनले आहे. अनेकदा असा आभास निर्माण होतो की न्याहारीत ३०-४० ग्रॅम प्रोटीन नसेल तर ती न्याहारीच नाही. या पार्श्वभूमीवर पोह्याला मागे पडण्याचा धोका संभवतो कारण पारंपरिक कांदापोह्यांच्या एका प्लेटमध्ये साधारण ४-६ ग्रॅम प्रोटीन असते. धोका पोह्यांना नाही, तर "फक्त पोहे पुरेसे आहेत" या विचाराला आहे. प्रोटीनमध्ये वाहून गेलेल्या लोकांसाठी पोह्याला नवीन रूपात यावं लागेल. कडधान्यं, दही, ताक, ज्यांना चालतं त्यांनी अंडी ह्यांच्यासोबत पोहे घ्यावेत.
एकंदरीत ज्यावेळी आपल्यासमोर नाश्त्याला पोहे समोर येतात त्यावेळी हे सर्व घटक ध्यानात घेऊन त्यांना मनमोकळी दाद द्यावी !
