मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
चित्रपट मालिका गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट मालिका गीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १८ जानेवारी, २०२६

क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम


एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चित्रपटाची चांगल्या पद्धतीनं निर्मिती केल्याबद्दल 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' च्या सर्व चमूचे अभिनंदन! ह्या वाक्यातील मनःपुर्वक शब्दाचा वापर हेतुपुरस्सर टाळला आहे त्याची कारणे पोस्टच्या पुढील भागात उलगडतील अशी आशा ! 

ह्या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित बरेचजण ह्या विषयावर प्रत्यक्ष आयुष्यातही अगदी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यामुळं ह्या चित्रपटाविषयी फार मोठ्या अपेक्षा बाळगुन गेलो होतो. 

सकारात्मक परीक्षण  

१. सचिन खेडेकर ह्यांनी चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलेलं मनोगत हा ह्या चित्रपटाचा सर्वोच्च बिंदु!  मराठी माध्यमाच्या शाळा का टिकायला हव्यात ह्याची कारणमीमांसा अत्यंत तर्कशुध्दपणे त्यांनी मांडली. योग्य त्या परवानगीनिशी हे मनोगत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध व्हायला हवं.  मुलांना मातृभाषेत शिकविलेल्या संकल्पना अत्यंत सखोल पद्धतीनं समजतात हा मुद्दा बऱ्याच जणांनी आधी मांडुन झाला आहे. पण आंतरराष्ट्रीय बोर्ड आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला, मराठी संस्कृतीला मुलांपर्यंत पोहोचु देतच नाहीत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला.  खरेतर ह्या मुद्द्यावर भारतातील सर्व राज्यातील लोकांनी एकत्र येऊन बदल घडविण्याचा प्रयत्न करायला हवा.

२. चित्रपट राज्यातील मराठी शाळा कशा झपाट्यानं बंद पडत आहेत ह्याची सखोल आकडेवारी क्षणभर का होईना आपल्यासमोर मांडतो. 

३. मराठी भाषेच्या शाळा बंद पडण्यामागं आर्थिक कारणं कोणत्या प्रकारे जोडली गेली आहेत ह्याचं विश्लेषण सुद्धा चित्रपट आपल्यासमोर मांडतो. 

४. बहुसंख्य मराठी भाषिक लोकांनी, त्यांच्या खासकरून इंग्लिश माध्यमात शिकलेल्या / शिकत असलेल्या मुलामुलांनी हा चित्रपट पाहिल्यास नक्कीच त्यांना एक महत्वाचा दृष्टिकोन मिळेल! 

५. मराठी माध्यमाच्या शाळा टिकविणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसुन सर्व नागरिकांचा त्यात सहभाग असायला हवा हा एक संदेश चित्रपट देतो. त्याच वेळी इंग्लिश माध्यमात मुलांना प्रवेश घेण्यामागची पालकांची जी रास्त कारणे आहेत ती  सुद्धा चित्रपट आपल्यासमोर आणतो. 


टीकात्मक परीक्षण 

१.  एक अत्यंत महत्त्वाचा विषय, चिन्मयी सुमितसारख्या ह्या विषयावर तळमळीनं काम करणाऱ्या जाणकारांचा चित्रपट निर्मितीमधील सहभाग ह्या अनुकूल गोष्टी असून देखील चित्रपटाचा बहुतांश भाग हा सवंग लोकप्रियतेसाठी चित्रीत केला गेला आहे असं मला वाटत राहिलं.  सचिन खेडेकरांचे जे मनोगत अगदी चित्रपटाच्या शेवटी आपल्यासमोर येतं त्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर बौद्धिक चर्चा संपुर्ण चित्रपटभर करण्याची उत्तम संधी दवडण्यात आली आहे. ह्या कंपूला बौद्धिक विरोध करणारा त्यांचा सहकारी पहिल्या चर्चेनंतर विरोधी मते न पटल्याने निघुन जातो तो कायमचाच ! त्याचं पात्र चित्रपटभर ठेवून एक चांगली चर्चा घडवून आणण्याची संधी गमावण्यात आली आहे.  

२. वीस वर्षांपूर्वी दोन मुलं, एक मुलगी नाईट आउट साठी पुरातन वास्तुत जातात हा न पटणारा संदर्भ चित्रपट देतो. विद्यार्थ्यांचा शिक्षिकेवर असलेला क्रश दाखविणं किमान ह्या विषयाच्या चित्रपटात टाळता आलं असतं. 

३. चित्रपटातील बरीचशी  पात्रं वीस - पंचवीस वर्षांच्या कालावधीत तीच ठेवली असता सायली संजीवची निर्मिती सावंत कशी झाली हे न उलगडणारं कोडं आपल्या मेंदुचा भुगा करत राहतं. 

४. का कोणास ठावूक पण सचिन खेडेकर ह्यांचा अभिनय मला कधीच आवडला नाही. आपण चित्रपटातील बाकी कलाकारांपेक्षा काहीसे श्रेष्ठ असं त्यांना वाटत असावं असा मला भास होत राहतो. 

माझं मत 

१. मराठी माध्यमाच्या शाळा पुढे दीर्घकाळ चालवता येण्यासाठी समाजाला प्रचंड इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. जर आपली अर्थव्यवस्था स्थानिक उद्योगधंद्यांवर अवलंबुन असती, युवकांना त्यांच्या नोकऱ्या शाबूत ठेवण्यासाठी आपल्या संस्कृतीचं ज्ञान असणं आवश्यक असतं तर मराठी / इतर स्थानिक भाषेच्या शाळा आपसुक सुरु राहिल्या असत्या. पण आपण राहतो त्या समाजातील जवळपास  ८० % नोकऱ्या पाश्चात्य अर्थव्यवस्थेंवर अवलंबुन आहेत. हा एक मोठा प्रतिकुल घटक आहे.

२. सचिन खेडेकरांच्या भाषणातील एक मुद्दा उचलुन मी एक विचार मांडू इच्छितो. मराठी माध्यमाच्या शाळा आपल्याला का टिकवायच्या आहेत? ह्याचं नक्की कारण आपण जाणुन घ्यायला हवं.  खेडेकरांनी म्हटल्याप्रमाणं आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कृती ह्याची ओळख आपल्या पुढील पिढ्यांना होत राहायला हवी, मराठी भाषेचं  सखोल वैभव आपल्या पुढील पिढयांना ज्ञात असायला हवं. मग सध्या पेव फुटलेल्या शाळांमधुनच मराठीचे सखोल ज्ञान देण्यावर, आपल्या संस्कृतीचा / इतिहासाचा सखोल परिचय करून देण्यावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर? स्थानिक इतिहास सुद्धा मराठी भाषेत शिकवा बाकी विज्ञान, गणित हे विषय इंग्लिश भाषेत शिकवणं सुरु ठेवा ! बघा मंडळी विचार करून पहा! पुर्ण मराठी माध्यमाच्या शाळांमधून आपल्या पिढीनं अनुभवलेली निरागसता काळाच्या उदरात केव्हाच गडप झाली आहे, आता आपण मराठी माध्यमाच्या शाळा जरी टिकवू शकलो तरी ही निरागसता परत आणू शकणार नाहीत.

३. माझा बालवाडीपासूनचा शालेय मित्र अनुप २००९ - २०१० च्या आसपास म्हणाला होता. शाळेतुन बाहेर पडल्यावर काही गोष्टी unlearn कराव्या लागल्या होत्या असं काहीसं तो म्हणाला होता. अगदी बरोबर होतं त्याचं म्हणणं!  शाळेत शिकवलं जाणारं सर्व काही बरोबर, मोठ्या लोकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर, त्याला आव्हान देऊ नये अशा काही गोष्टी अशी काहीशी मानसिकता मराठी माध्यमाच्या शाळांनी कदाचित निर्माण केली. हल्लीच्या जगात ही मानसिकता काही प्रसंगी दूर ठेवणं आवश्यक बनतं. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकुन माझं काही बिघडलं नाही, मी बघा किती उच्च पदावर पोहोचलो असं म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी मला आदर आहेच, पण जर इंग्लिश माध्यमात मी शिकलो असतो तर ह्यापेक्षा देखील अजुन पुढे गेलो असतो का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून पाहावा ही माझी नम्र विनंती ! 

बाकी मुंबई मेट्रोच्या स्टेशनातून बाहेर पडणारी मार्गिका थेट चकचकीत मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करते हे पाहुन माझा ऊर भरून आला. तो अवाढव्य आवाका असलेला मॉल शनिवारी संध्याकाळी सुद्धा काही प्रमाणात ओसाड होता, हे पाहून मनाला बरं वाटलं म्हणजे लोक सायंकाळी घरी मराठी पुस्तकांचं कुटुंबासोबत वाचन वगैरे करीत असतील असे विचार मनात आले! 

माझं मत 

शनिवार, ११ मे, २०२४

नाच ग घुमा !

 

शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे आणि सारंग साठ्ये ह्यांच्या नितांत सुंदर अभिनयानं सजलेला हा चित्रपट एक महत्वाचा सामाजिक विषय आपल्यासमोर मांडतो. 

आपल्या घरात घरकामासाठी आपल्या मदतीला येणारी स्त्री आपला स्वतःचा संसार सांभाळून, घरकामं आटपून मगच आपल्या घरी येत असते हे आपल्या सर्वांना मनाच्या एका कोपऱ्यात ठाऊक असतं. पण जेव्हा दैनंदिन दिवसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतानाची तारेवरची कसरत सुरु होते त्यावेळी ह्या गोष्टीचा विसर पडतो. कदाचित घरच्या स्त्रीच्या तोंडून ह्या स्त्रियांना बोलणी ऐकावी लागतात. ही बोलणी उशिरा येण्यावरून, छोट्या चुकांवरून असू शकतात. दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करत असताना अशी बोलणी करणं हे किती अपमानास्पद असू शकतं ह्याची जाणीव हा चित्रपट करुन देतो. बऱ्याच वेळेला घरकामात मदत करणाऱ्या ह्या स्त्रियांची गावाकडील घरं बऱ्यापैकी मध्यमवर्गीय असतात. परंतु तिथं उदरनिर्वाहाचं माध्यम उपलब्ध नसल्यानं नाईलाजानं त्यांना शहरात स्थलांतर करावं लागतं. इथलं राहणीमान एकट्याच्या पगारात परवडण्यासारखं नसल्यानं मग ह्या स्त्रियांना ही कामं स्वीकारावी लागतात. 

चित्रपटात दाखविल्याप्रमाणं एकदा का घरातील स्त्री आणि ह्या घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांचे भावबंध जुळले की ह्या स्त्रिया अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणं ह्या घरातील कामं करतात. चित्रपटात म्हटल्याप्रमाणं मुक्ता बर्वे कधी घरातील कपाटांना कुलुपं लावत नाही, आपल्या मुलीला बिनधास्त नम्रताच्या स्वाधीन करून जाते, मुलीच्या शाळेत आपल्यानंतर नम्रताचा फोन नंबर देते. हे सारं पैशाच्या पलीकडील असतं. आणि हो ह्या स्त्रियांच्या अचानक घेतलेल्या सुट्टयांमुळं त्यांचा पगार कमी करण्याचं कठोर कृत्य टाळावे. तुम्हांला ह्या पगारात कपात केल्यानं / न केल्यानं फारसा फरक पडत नाही, पण त्यांना त्यांच्या संसारात मोठा फरक पडू शकतो हे लक्षात ठेवावं. 

मुंबईतील प्रत्येक स्त्रीनं बघावा असा हा चित्रपट! Empathy (कल्पनेनं दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्या व्यक्तीच्या भावना जाणून घेण्याची कुवत!) ही भावना ह्या स्त्रियांच्या बाबतीत दाखवावी ही जाणीव हा चित्रपट अगदी सुरेखपणे दर्शकांना करून देतो. चित्रपटाचे सादरीकरण अगदी परिपूर्ण नसले तरीही मुख्य संदेश, ही जाणीव दर्शकांपर्यंत अगदी अचूकपणे पोहोचवतो. बाकी ह्या संपूर्ण पोस्टमध्ये ह्या घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांना ज्या नेहमीच्या संज्ञेने संबोधिले जाते त्याचा वापर मी हेतुपूर्वक टाळला आहे. त्यांना सन्मानानं वागणूक देण्याच्या प्रक्रियेतील ह्या संज्ञांचा वापर न करणे ही पहिली पायरी असू शकते. 

 

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

खो गये हम कहाँ - Method to Madness


नव्या वर्षात काही नवीन गोष्टी ठरवून तर काही अचानक होतात. खरं तर 'खो गये हम कहाँ' हा माझ्या पठडीत बसणारा चित्रपट नव्हे पण थोडा वेळ हा काय वेडेपणा आहे हे पाहू असा विचार करत पहायला सुरुवात केलेल्या ह्या चित्रपटानं काहीसं मला धरून ठेवलं. दोन तीन दिवसात हा चित्रपट जवळपास पूर्ण पाहिला.  कर्मठ पद्धतीचा चष्मा घालून पाहिलं असता ह्यातील तिन्ही पात्रांची वागणूक मूर्खपणाची वाटते. पण काही वेळानं ह्या वेडेपणात एक सुसंगती आढळून येते. नव्या पिढीच्या जीवनात स्थिर होण्याच्या संघर्षाला, त्यांना सामोरे जावं लागणाऱ्या नात्यांमधील क्षणभंगुरतेला हा चित्रपट व्यवस्थित आपल्यासमोर सादर करतो. 

प्रत्येकानं यशस्वी व्हायलाच हवं असा सुप्त संदेश सर्वत्र पसरविणारं आजचं जग. पण प्रत्येकजण  जगाच्या व्याख्येनुसार यशस्वी होऊ शकणार नाहीत हे कटू सत्य. त्यामुळं आपण जगाच्या दृष्टीनं जरी यशस्वितेच्या सर्वोच्च पातळ्या गाठू शकलो नसलो तरी आपल्या क्षमतेनुसार सिद्ध करून दाखविण्याची ह्या वर्गाची धडपड हा चित्रपट सुरेखरित्या सादर करतो.  स्वतःची जिम उभारण्याची जिद्द बाळगून असलेला नायक. पर्सनल ट्रेनर म्हणून सन्मानाचे मोजके पण अपमानाचे अनेक क्षण झेलणारा! त्याची कुतरओढ कुठेतरी मनाला खिन्न करते. 

हल्लीच्या युगातील तरुण पिढीच्या नातेसंबंधातील संभ्रम सुरेखरित्या इथं सादर करण्यात आला आहे. दोन प्रेमिकांना केवळ प्रेम हा घटक सदैव एकत्र ठेवू शकत नाही. प्रेमाच्या अनेक छटा असतात, बऱ्याच वेळा लग्नबंधनाशिवाय एकत्र आलेल्या जोडप्यात एकासाठी  शारीरिक आकर्षण हा महत्वाचा मुद्दा असू शकतो, तर दुसऱ्यासाठी आर्थिक स्थैर्य! पण केवळ हेच घटक असतील तर ज्याच्या / जिच्याविषयी अधिक आकर्षण वाटू शकते किंवा जो / जी अधिक आर्थिक स्थैर्य देऊ शकते अशी व्यक्ती आयुष्यात आल्यास आधीचं नातं सहजासहजी तुटू शकतं. असं घडल्यास आपण केवळ वापरले गेलो आहोत, आपलं आयुष्यातील अयशस्वीपण आपल्या नातेसंबंधावर परिणाम करू शकतात असले अनेक विचार ह्या व्यक्तींच्या मनात येऊ शकतात. आत्मसन्मानाला मोठी ठेच लागू शकते. 

निर्माता / दिग्दर्शकाला खरोखर वरील संदेश द्यायचा होता की नाही हे माहिती नाही. पण मला हा संदेश मिळाला. केवळ एका विशिष्ट विचारसरणीने विचार करणाऱ्या मला ह्या चित्रपटाने मला काहीशी चपराक दिली. नवीन पिढीची मानसिकता समजून घेण्यासाठी जमल्यास हा चित्रपट बघा. अनन्या पांडेचा उल्लेख ह्यापुढील पोस्टमध्ये टाळला जाईल किंवा केल्यास आदरानं केला जाईल हा निर्धार सुद्धा मी केला आहे !

रविवार, १० डिसेंबर, २०२३

झिम्मा २



समाजातील सृजनशीलता झपाट्यानं लोप पावत आहे किंवा माहितीमायाजालावरील माहितीच्या स्फोटामध्ये ती कुठंतरी दडून बसत आहे.  सहजरित्या उपलब्ध असलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेतांना सृजनशीलतेच्या बाबतीत पदरी निराशाच पडण्याची शक्यता असते. 

कोणत्याही कलाकृतीचा जीवनप्रवास ही खरंतर एक अभ्यासण्याजोगी घटना असायला हवी.  कथेतील मूळ कल्पनेचा उगम, तिचं विस्तारीकरण ह्यात लेखकांची प्रतिभा, त्यांच्या कल्पनाशक्तीने घेतलेल्या भराऱ्या ह्याचे वाचक प्रत्यक्ष साक्षीदार नसले तरी त्या कलाकृतीचा आनंद घेताना संवेदनशील वाचकांना त्याची अनुभूती मिळायला हवी. इथंच खरं कथाकार आणि वाचक ह्यांचं एक अदृश्य, घट्ट नातं जुळतं. जेव्हा ही कथा नाटक, चित्रपटाच्या माध्यमांद्वारे आपणांसमोर सादर केली जाते त्यावेळी खरंतर दिग्दर्शकाच्या कौशल्याची कसोटी असते. मूळ कथेच्या गाभ्याला फारसा धक्का न लावता नाटक, चित्रपट माध्यमांना योग्य अशा स्वरूपात  ही कलाकृती सादर करणे म्हणजे तारेवरील कसरत असते. 

आठवडाभर कार्यालयीन कामात जुंपून घेतल्यानंतर फुरसतीच्या वेळात वयानुसार निर्माण झालेल्या आवडीमुळे चांगल्या नाटक, चित्रपटाच्या शोधात असलेला मी ! खरा प्रश्न इथं आहे. चांगलं म्हणजे नक्की काय? आपल्याला नक्की काय आवडतं ह्यावर आपण फारसा विचार करत नाही. काल पाहिलेल्या झिम्मा २ ह्या चित्रपटाच्या कालावधीत  विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. चित्रपटाला कथा म्हणून काही नव्हतीच. लेक डिस्ट्रिक्टची निसर्गरम्य पार्श्वभूमी ही चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू! मी आणि प्राजक्ता चित्रपट संपल्यानंतर कथेच्या, त्यातील पात्रांच्या,  व्यक्तिमत्त्वांच्या किंवा चित्रपटातील नात्यांच्या खोलीविषयी बोलत होतो. काही इंग्लिश चित्रपटात कथेला मोठा जीव नसला तरीही त्यातील संवादातील आणि  नात्यांतील विविध छटांच्या सादरीकरणामुळं ते प्रेक्षणीय बनतात. आमच्या चांगल्या चित्रपटाच्या व्याख्येत ह्या बाबींचा समावेश होतो. 

चित्रपटात विविध वयोगटातील भाराभर नायिका आणि मोजून दोन पुरुष व्यक्तिमत्वे आहेत. इंग्लिश व्यक्तिमत्वाला नायक म्हणायला  वाव नसल्यानं दोन नायक म्हणण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे,  इतकी सगळी पात्रं आपली भूमिका कशी उत्तम होईल ह्याकडेच लक्ष देत आहेत असं वाटत राहतं. त्यामुळं अधूनमधून येणाऱ्या शाब्दिक कोट्यावर आपण मनमुराद हसत राहतो. चित्रपट कोणत्याही क्षणी संपला असं सांगितलं तरीही आपल्याला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळं खरोखरच ज्यावेळी चित्रपट संपतो तेव्हाही आपल्याला काही वाटत नाही. पार्किन्सन ह्या गंभीर आजारासंदर्भात देण्यात आलेला सामाजिक संदेश ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो. ना धड तो संदेश दिला जात नाही ना चित्रपटाच्या कथेला त्यामुळं वाव मिळतो / गती मिळते.  चित्रपट ही काही मिसळ वगैरे नाही ज्यात नामांकित कलाकार, निसर्गरम्य पार्श्वभूमी, सामाजिक संदेश वगैरे एकत्र आणलं की एक चांगली कलाकृती बनेल. 

मराठी चित्रपटांचे उभरत्या इंग्लिश कलाकारांना योगदान ह्या मुद्द्यावर ह्या चित्रपटाला गुण प्रदान करता येतील. झिम्मा ३ / ४ वगैरे भागात जर्मन, फ्रेंच, इटली वगैरे देशांतील कलाकारांचा विचार करता येऊ शकेल.  

असे चित्रपट शहरी भागातील स्त्रीच्या समस्यांना कितपत योग्य स्वरूपात सादर करतात ह्याविषयी मोठी साशंकता निर्माण होते. व्यक्तिरेखांच्या खोलीच्या अभावी ह्या स्त्रियांच्या समस्यांशी आपण फारसे जोडले जात नाहीत. मूलभूत सुविधा नसलेल्या गावात अगदी तुटपुंज्या पैशात आपला संसार चालविणाऱ्या स्त्रियांविषयी झिम्मा ३ - ४ वगैरे यायला हवा असा विचार मनात येतो. 

बाकी इनऑर्बिट मॉलमधील चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. एक चांगला लेखक आणि एक यशस्वी लेखक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गालिब नाटकातील  वाक्य चित्रपटांना सुद्धा लागू होते असं वाटलं. पॉपकॉर्नची पाचशे रुपयांच्या वरील किमतीची पुडकी विकत घेऊन चित्रपटगृहात वचावचा आवाज करत खाणारी टाळकी मोजकीच होती. सिनेमागृहातील आवाजाची पातळी काही वेळा कर्कश होती. प्रेक्षकांच्या  श्रवणयंत्रावर, हृदयाच्या ठोक्यांवर विपरीत परिणाम करणारी अशी होती. ह्यावर कोणीही आवाज उठविलेला दिसत नाही. जाहिरातींचा अतिरेक झाला होता. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नव्हतं. मॉलच्या फूड कोर्टमध्ये खचाखच नसली तरी बऱ्यापैकी गर्दी होती. पाश्च्यात्य देशांतील कंपनीमध्ये काम करून पैसा कमाविणारे बरेच लोक पाश्चात्य खाद्यपदार्थांवर पैसे खर्च करत होते.   मॉलमधून बाहेर पडताच मेट्रो स्टेशन आहे. त्याद्वारे प्रयेकी वीस रुपयांच्या तिकिटात दहा बारा  मिनिटांत वातानुकूलित ac डब्यात बसून घरी पोहोचलो.  रिक्षात बसून शंभर रुपये खर्च करत प्रदूषणात बसून घरी पोहाचण्यापेक्षा हे खूप बरं ! एकंदरीत देशाचे बरं चाललं आहेत. तुम्ही वर्तमानपत्रं, त्यातील अग्रलेख  न वाचता शहरात फिरत राहिलात तर लाईफ इज चकचकीत ! आयुष्य सुंदर आहे ! 

शनिवार, २८ मे, २०२२

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

 


सद्य:स्थितीवर अत्यंत समर्पक, संयत असं भाष्य करणारं हे नाटक! चाळ पाडून उभ्या राहिलेल्या फ्लॅट संस्कृतीत राहणारी  इंदिरा आजी. तिच्या सोबतीला पेइंग गेस्ट म्हणून राहणारी कॉलेजयुवती निधी. निधीचं वयाला अनुसार असं बिनधास्त वागणं आजीला जरी वरवर  खटकत असलं तरी तिच्या वागण्यातील सच्चेपणा आजीला भावलेला असतो. आजीचा मुलगा अमेरिकेत आणि मुलगी बदलापूरला. आजीनं ह्या परिस्थितीला स्वीकारुन निधीसोबत आपल्या आयुष्याची घडी बसवलेली असते. अचानक काही कारणांमुळं प्रथम नातवाला आणि मग मुलीला आपल्या नवऱ्यासोबत आपल्या आईच्या घरी रहायला यावं लागतं. ती येणार म्हणून निधीला त्या घरातून बाहेर पडावं लागतं. आजीला खरंतर मनापासून हा निर्णय पटलेला नसतो तरीही काहीशा नाईलाजानं ती तो स्वीकारते. कथानकात अजून दोन उपकथानकं आहेत ती म्हणजे आजीच्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या बहिणीची आणि निधीच्या आईबाबांची. पुढं कथानक वेगळं वळण घेतं.  शेवटी आजीला एक तिच्या आतापर्यंतच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशी पण ठाम भुमिका घ्यावी लागते. 

नाटक मनापासुन आवडलं. कथा अगदी घराघरांत घडणारी. आता जी ऎशींच्या आसपास पोहोचलेली पिढी आहे तिनं आपल्या आधीच्या पिढीचं आणि नवीन पिढीचं सारं काही अगदी मन लावुन केलं. पण त्यातील काही जणांच्या बाबतीत आपल्या अपत्यांसोबत राहण्याचं भाग्य आलं नाही. विविध कारणांस्तव नवीन पिढीतील काहीजणांना  ह्या ऐंशीच्या घरात पोहोचलेल्या पिढीसोबत रहायला जमत नाही. आपल्या मुलांना आपल्यासोबत राहता येत नाही किंवा रहायचं नाही हे सत्य ज्यावेळी त्यांच्या समोर आलं त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला असणार, काहीशी कटुता आली असणार. त्यांच्यातील काहीजण बहुदा कायमचे निराश बनले असणार, पण काही जणांनी मात्र बदलणाऱ्या जगाचं हे वास्तव स्वीकारलं. "World around you is changing, embrace the change" काहीशा अशा अर्थाचं वाक्य निधी आजीला बोलते. आजीला ते मनापासुन पटतं. आजीच्या तोंडच्या म्हणी, त्यांतील जीवनाचं सार सांगणारा अर्थ निधीला भावत राहतो, तर निधीच्या बोलण्याचालण्यातुन आजीसमोर उघडणारं नवीन जगाचं दालन आजीला हवंहवंसं वाटणारं ! नातवंडं आणि आजी- आजोबांचं जमणारं Bonding हे गेले कित्येक पिढ्या चालत आलेलं एक गोड नातं नाटक सुरेखरित्या उलगडून दाखवतं. ह्या ऐंशीच्या पिढीनं एकदा का हे नवीन जगाचं वास्तव स्वीकारलं की मग त्यांना जाणीव होते ती आपल्या "स्पेस" ची! आपण आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टींचा गेले कित्येक वर्षे त्याग केला त्या गोष्टींना नव्यानं एकदा आपल्या आयुष्यात सामावुन घेण्याची हीच संधी आहे हे त्यांना जाणवतं. आजी म्हणते तसं मग कलकलाट नकोसा होतो, शांतता / एकांत प्रिय वाटू लागतो. महिनोंमहिने आपल्या मुलांपासून दूर राहिल्यावर मग त्या एकट्या काळात जी माणसं सोबतीला येतात त्यांच्यांशी ह्या आजीआजोबांचे ऋणानुबंध निर्माण होतात. रक्ताच्या नात्यापलीकडं असलेले हे बंध बऱ्याच वेळा खऱ्या नात्यापेक्षा गहिरे बनतात. खरा प्रश्न त्या वेळी निर्माण होतो ज्यावेळी मुलगा-मुलगी अचानक पुन्हा आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात प्रवेश करु इच्छितात. आयुष्यातील सर्वात मोठं गृहितक ज्यावेळी कोलमडताना पहावं लागतं त्यावेळी मुलांमुलींना मोठा धक्का बसू शकतो.  

बदलत्या जगातील एक महत्वाचं सत्य नाटक कळत नकळत अधोरेखित करतं. पुर्वी माणसं भावनिकदृष्ट्या कणखर असल्यामुळं असेल कदाचित पण आयुष्यभर मोजक्याच लोकांशी भावबंध जोडून पूर्ण आयुष्य व्यतित करण्याची क्षमता बाळगून असत. हल्ली आयुष्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे मोकळ्या वेळात तुम्हांला खूप अस्थिर करणारं तुमचं मन. ह्या काहीशा कमकुवत क्षणी तुम्हांला जे कोणी साथ देतं, तुमच्यासाठी जे कोणी उपलब्ध असतं त्यांच्यासोबत तुम्ही जोडले जाता. आजी निधीशी ह्याच कारणामुळं जोडली जाते, तीही आपल्या मुलीपेक्षा घट्ट बंधाने !

चाळीस - पन्नाशीच्या आसपास पोहोचलेली पिढी म्हणायला गेलं तर स्वार्थी वाटु शकते. आपल्या गरजांसाठी आपल्या आईवडिलांचा वापर करुन घेणारी . नाटकात ह्या पिढीची बाजू  मांडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. म्हणजे ही काही उणीव आहे असं नाही तर नाटक आपल्या कथानकाशी प्रामाणिक राहतं.  राहता राहिली ती नातवंडं.  आपल्या आईवडिलांचं आयुष्य जवळून बघणारी आणि त्यावर आपली मतं मांडण्याची मुभा मिळालेली. त्यांचं हे आपल्या आईवडिलांच्या आयुष्यावर व्यक्त होणं बहुदा आईवडिलांना आवडत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा ते संवाद अचानक कमी करुन टाकतात, भरल्या घरात एकलकोंडे आयुष्य जगत राहतात.  

नाटक अगदी सुरेख जमलेलं ! संवाद, जुन्या म्हणींचा समर्पक वापर, वंदना गुप्ते (आजी), निधी, प्रतीक्षा लोणकर, ईशान साऱ्यांचा अभिनय, नवीन पिढीच्या जीवनशैलीचे केलेलं अगदी हुबेहूब चित्रण ह्या साऱ्या नाटकाच्या समर्थ बाजु ! नाटकाच्या पुर्वार्धात काहीशी उत्साहानं आयुष्य जगणारी आजी मध्यंतरानंतर मात्र तिच्या आयुष्यातील घडामोडींनी हताश होते.हा हताशपणा वंदना गुप्ते ह्यांनी खूप सुरेखपणे साकारला आहे. ठिगळ, पत्ते ह्यांचे रुपकात्मक उल्लेख नाटकात अगदी चपखल बसतात. घरात वाजणाऱ्या फोनकडे चालत जाताना "हो आलो" वगैरे बोलण्याची पद्धत अगदी मस्तच! घरात दिवाणखान्यात असलेल्या गणपतीशी आजीचं असलेलं नातं, मुलीनं हा गणपती इथं शोभत नाही म्हटल्यानंतर होणारी तिची निराशा, वयानुसार गणपतीला गणोबा म्हणण्याइतपत त्याच्याशी झालेलं सख्य, सारं काही अप्रतिम ! 

हे नाटक नाटक रहात नाही. ते प्रेक्षकांना थेट प्रश्न विचारतं, त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेल्या भुमिकेविषयी विचार करायला भाग पाडतं. नाटकाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं तिन्ही पिढींनी मिळून बघण्यासारखं हे नाटक! खास करुन एकत्र कुटुंबपद्धतीच्या झपाट्यानं होत असलेल्या अस्ताच्या काळात नवीन पिढीला आपल्या पुढील दोन पिढींच्या विचारसरणीची झलक दाखवून देणारं सुद्धा !  

नाटक हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सद्यपरिस्थितीत आधीच्या पिढ्यांनी आपल्याला दिलेल्या संस्कारी आयुष्याचा ठेवा आपण आपल्या पुढील पिढीला देऊ शकत नाही ह्या गोष्टीचं काहीसं अपराधीपण मी बाळगून असतो. पण असे ताकदीचे कलाकार, असं अर्थपूर्ण नाटक एक मोठा आशेचा किरण दाखवतं. पुढील पिढीला देखील आपल्याशी जोडण्याची क्षमता बाळगतं. घरात दहा वर्षाच्या वरील मुलं असतील तर त्यांच्यासोबत नक्की बघण्यासारखं हे अर्थपूर्ण नाटक! 

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

सई बिराजदार - एक मराठी मैत्रीण !







 

हल्ली सुरु असलेल्या मालिकांमध्ये सुसह्य अशी मालिका म्हणजे माझा होशील ना  ? सुसह्य अशासाठी की प्रेक्षकांना आपल्याकडं खेचुन घेण्यासाठी उगाचच ह्यात थिल्लर गोष्टींचा आधार सध्या तरी घेण्यात आलेला नाही.  मालिकेत चित्रित करण्यात आलेलं आदित्य आणि त्याच्या मामांचं घर हा एक संस्कृतीचा उत्तम ठेवा ! एका कुटुंबप्रमुखाच्या आज्ञेत बाकी सर्व मंडळी गुण्यागोविंदानं कशी राहु शकतात ह्याचं वास्तववादी  चित्रण इथं आढळतं. कुटुंबप्रमुख ह्या पदावरील व्यक्तीचं प्रत्येक मत, त्याचं वागणं कुटुंबातील सर्व व्यक्तींना पटत असतं असं नाही, किंबहुना पटत नसतंच ! तरीही सर्वजण एकत्र राहतात. एकत्र का राहायचं ह्याचा प्रश्न कोणाला पडत नाही. पुर्वीच्या काळी दुसरा पर्याय नव्हता म्हणुन एकत्र राहायचे सारे ! आजच्या काळात पर्याय आहेत म्हणुन बरेचजण विखुरले ! मागच्या काळातील एकत्र राहण्यातील ज्या ज्ञात चुका आहेत त्या ओळखुन पुन्हा जिव्हाळ्याच्या माणसांना एकत्र आणता येईल का?  असो हा दुसऱ्या एका लेखाचा विषय !

आजच्या पोस्टचा विषय - सई बिराजदार! मालिकेतील आदित्यची  मैत्रीण ! प्रत्येक मराठी युवकाला अशी एक मैत्रीण असावीच ! मालिकेतला आदित्यचं सध्याचं चित्रण मध्यमवर्गीय वर्गातील ! अनेक संस्कृतीप्रिय मामांसोबत एकत्र राहणारा आदित्य आपसुक शिस्तबद्ध बनलेला आहे. आपल्याहुन मोठ्या पिढीसोबत बराच काळ व्यतित करावा लागत असल्यानं त्याच्या स्वभावात काहीसं गांभीर्य आलं आहे. महत्प्रयासानं पहिली नोकरी मिळाली असली तरी तिथला खाष्ट बॉस त्याला पहिल्या नोकरीच्या आनंदाच्या भावनेपासुन वंचित ठेवत आहे. अशा वेळी अचानक भेटलेली सई !

एखाद्या सुंदर तरुणीकडं प्रेयसी म्हणुन पहायचं असेल तर आपलं घराणं, आपलं शिक्षण, आपला पगार हे घटक  तिच्या घराण्याच्या जावई म्हणुन असलेल्या अपेक्षांना पुऱ्या पडणाऱ्या असाव्यात ही बऱ्याच मराठमोळ्या तरुणांची विचारसरणी ! बहुदा मराठी मुलं आपल्या आईवडिलांच्या आणि इतर मोठ्या मंडळींच्या संसाराचं जरा जास्तच निरीक्षण करत राहतात. त्यामुळं प्रेम क्षणभर पण बाकीचं कर्तव्य आयुष्यभर हीच भावना त्यांच्या मनात प्रामुख्यानं राहते. इथंही आदित्य सईला मैत्रिण म्हणुनच स्वीकारतो तो बहुदा ह्या घटकांमुळं ! तिला आपण आयुष्यात सुखी ठेवू शकणार नाही ह्या त्यानं समज करुन घेतला आहे! मनानं आदित्य कदाचित वीस - तीस वर्षे मागच्या काळात वावरत असावा असं मानल्यास वावगं ठरणार नाही !

सई ! सुंदर, श्रीमंतीचा आत्मविश्वास बाळगुन असणारी पण गर्व नसणारी, रोखठोक बोलणारी,  पारंपरिक संस्कारांविषयी आदर बाळगणारी सई ! आपल्या मनाविरुद्ध आपले आईवडील ज्याच्याशी आपलं लग्न लावुन देत आहे अशा श्रीमंत डॉक्टरला स्पष्ट नकार देणारी बंडखोर सई !आदित्य भेटल्यावर आपण त्याच्या प्रेमात  पडलो आहोत हे तिला तात्काळ कळलंय ! मुली ह्या बाबतीत मुलांपेक्षा स्मार्ट असतातच म्हणा ! पण तिच्यावर संस्काराचा अदृश्य प्रभाव आहे ! तिचे वडील जरी तिच्या आईच्या सईसाठी श्रीमंत वर शोधण्याच्या प्रयत्नांना वरवर साथ देत असले तरी ते बहुदा संस्कारप्रिय आहेत. मुलींचा स्वभाव काहीसा वडिलांवर जात असल्यानं सईसुद्धा संस्कारी ! आपल्याला आदित्य जरी आवडत असला तरी तो ह्या क्षणी प्रेमाचा इजहार (वजनदार उर्दु शब्द) करण्यास तयार नाही ह्याची तिला जाणीव आहे. तिला त्याविषयी घाई नाही ! तो आपल्याशी मोजकं बोलला, अधूनमधून दिसला तरी तिला ते पुरेसं आहे ! 

सई खट्याळ आहे. फार काळ हा खट्याळपणा दाबुन ठेवणं तिला जमणारं नाही! त्यामुळं गंभीर-गंभीर आदित्याची ती अधुनमधून खोडी काढते! ह्या आठवड्यात तर तिनं हद्दच केली ! शिस्तप्रिय आदित्यला तिनं एक दिवस एकदम बिनधास्त वागायला पटवलं ! खुप धमाल केली त्या दोघांनी ! त्रास देणाऱ्या बॉसची सुद्धा त्यांनी फिरकी घेतली!  
पण मग बॉसनं ओरडल्यावर आदित्यचं हे बिनधास्तपणाचं उसनं अवसान गळुन पडलं ! त्याच्यातल्या कर्तव्यदक्ष भावनेनं त्याच्यावर पुर्ण ताबा मिळविला. उगाच सईच्या नादी लागुन आपण हा मस्तीखोरपणा केला असं त्याला वाटलं ! मग त्याच्या तब्येतीची काळजी करत त्याला ऑफिसला जाऊ नको असं सांगणाऱ्या सईला तो वाटेल ते बोलला! चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तात्काळ तिथुन निघुन गेली ! पण तो चक्कर येऊन पडला हे कळताच तात्काळ धावत त्याच्या घरी आली ! 

ह्या मालिकेच्या पट्कथाकारांचं, निर्मात्यांचं अभिनंदन ! ह्या क्षणापर्यंत त्यांनी एका सुंदर, मराठी संस्कृतीशी नातं राखणाऱ्या कलाकृतीची निर्मिती केली आहे ! पुढं आदित्य - सईचं काय होईल ? लग्न झालं तर हे नातं असंच सुंदर राहील का? अशा प्रश्नांचा उगाच विचार करायला नको ! काही गोष्टी, काही क्षण गोठवुन ठेवावेत असे असतात, अशाच वळणावर असलेली ही मालिका! 
नितांतसुंदर अभिनयाबद्दल सई, आदित्य आणि मामा मंडळींचं खूप अभिनंदन ! 

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

दो आँखें बारह हाथ आणि शांताराम

शनिवारी रात्री लोकसभा वाहिनीवर दो आँखें बारह हाथ हा १९५७ सालचा व्ही. शांताराम यांचा गाजलेला चित्रपट पाहण्याचा योग आला. ह्यात योग येण्यासारखं काही विशेष असले प्रश्न मनात उपस्थित होऊन देऊ नकात ! हा चित्रपट तज्ञ मंडळींसोबत पाहत असल्यानं काही वेगळी माहिती सुद्धा मिळाली, त्यामुळं चित्रपटाची लज्जत अजुनच वाढली! 

चित्रपटाचं शीर्षक "दो आँखें बारह हाथ" च का ह्यावर मिनिटभर चर्चा झाली! मोठ्या आईनं हा चित्रपट १९५७ साली पाहिला असल्यानं ह्या चित्रपटातील अट्टल गुन्हेगारांची संख्या किती ह्याबाबतीत तिच्या मनात क्षणभर संभ्रम निर्माण झाला. पण मग बारह हाथ वरुन गुन्हेगार सहाच असावेत असा निष्कर्ष तिनं काढला ! माझं मन क्षणभर कार्यालयीन कामकाजात गेलं. शांताराम व्यवस्थापक आणि सहाजण  म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी ! पण व्यवस्थापकानं केवळ डोळयांची भुमिका बजावता कामा नये त्यानं Hands-on असायला हवं ! त्याला प्रोग्रॅमिंग सुद्धा करता यायला हवं. हा विचार मनात आलाच होता.  पण चित्रपटात नंतर शांताराम प्रत्यक्ष स्वतः कामासाठी ह्या सहाजणांसोबत उतरतो. त्यावेळी चित्रपटाचं शीर्षक दो आँखें चौदा हाथ असायला हवं होतं असा मनात विचार आलाच !

ह्या सहा बेरड गुन्हेगारांच्या मानसिकेत बदल घडविण्याचा निर्धार व्ही. शांताराम आपल्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त करतात. आपल्या अधिकाऱ्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांची परवानगी घेऊन एका ओसाड भागात ह्या सहा जणांना घेऊन येतात. मग सुरु होतो तो एक मोठा प्रवास ! ह्या गुन्हेगारांच्या सवयी सहजासहजी बदलणाऱ्या नसतात! परंतु माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वेळोवेळी शांताराम त्यांना जाणवुन देत राहतात. कुठंतरी ह्या बाह्यरूपी पाषाणहृदयी वाटणाऱ्या बेरड गुन्हेगारांच्या मनात ओलावा निर्माण होत जातो. चित्रपटात मग संध्या प्रवेश करते. 

हा चित्रपट १९५७ सालचा ! शांताराम ह्यांचा जन्म १९०१ सालचा ! म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचं वय ५५ च्या आसपास असावं ! पण चित्रपटातील त्यांच्या रंगरुपावरून ते खुप तरुण वाटत राहतात! शांताराम ह्यांनी एकंदरीत तीन लग्न केली ही माहिती मला काल कळली ! त्यांच्या प्रथम पत्नी विमलाबाई ह्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी, जयश्री सौहृदाचे संबंध कायम ठेवले. १९५० ते १९६० कालावधीत शांताराम आणि संध्या ह्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट केले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि कालांतरानं विवाहबद्ध झाले. संध्या आणि त्यांच्या वयात खुप अंतर होते ! विमलाबाई ह्यांनी संध्या हिच्याशी सुद्धा आयुष्यभर चांगले संबंध ठेवले ! ही सारी माहिती माहितीमायाजालावरुन साभार ! 

चित्रपटातील गाणी मोजकी पण सुरेख! 

सैंया झूठों का बड़ा सरताज निकला

ह्या गाण्यात वाद्य वाजवत जाणारी संध्या - आणि तिच्या मागं वाजत जाणारं ते छोटेसे शानदार वाद्य - ताशा ! हे पाहुन मोठी आईने अजुन आठवणी काढल्या. प्रकाशमामाला हा असा ताशा आणला होता. तिचे काका शांताराम ह्यांच्या अभिनयाचे मोठे चाहते होते वगैरे ! संध्या मोठी धीराची मुलगी ! इतक्या ओसाड भागातुन खेळणी विकायला जाताना तिला भय हा प्रकार माहिती नव्हता. ह्या बेरड गुन्हेगारांचा खट्याळपणा जागृत झाल्यावर ते तिची चेष्टामस्करी करीत. पण ही धीट मुलगी त्यांचा चांगलाच समाचार घेई ! 

ऐ मालिक तेरे बंदे हम 

हे एक अत्यंत अर्थपूर्ण गाणं !  

हे सर्वशक्तिमाना ! आयुष्यातील आमच्या सर्व चुका माफ कर ! आमच्याकडुन चांगली सत्कर्मे घडोत, आमचा जीवनप्रवास प्रामाणिकतेच्या मार्गानं होवो ! ज्या वेळी सर्व काही वाईट घडत असतं, आमचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो अशावेळी तुच आमच्या मदतीला धावून येतोस आणि आमच्या जीवनातील अंधःकार नाहीसा करतोस ! मनुष्याच्या अंगी अनेक कमतरता आहेत; त्यामुळं त्याच्या आयुष्यात अनेक दुःख निर्माण होतात! पण तु ही सारी दुःख दूर करतोस ! सध्याच्या करोनाच्या काळात अंगी धीर येण्यासाठी हे एक उत्तम गाणे ! 

संध्याने ह्या चित्रपटात आणि नवरंग मध्ये अत्यंत सुरेख नाच केलेत. परंतु ह्या काठिण्यपूर्ण नाचांमुळं तिला नंतर पाठीचा त्रास जडला ही जाणकारांनी दिलेली माहिती ! शांताराम ह्यांचं आडनाव कठीण असल्यानं त्यांनी व्ही शांताराम असं सुटसुटीत नाव स्वीकारलं ! पहिल्या बायकोपासुन चार आणि दुसरी बायको जयश्री हिच्यापासुन तीन अशी एकूण सात अपत्यं होती. संध्यानं सर्वांना आपलीच मुलं मानलं ! सध्या संध्या आपल्या मुलांच्या आधाराने जीवन व्यतित करत आहे ही माहिती कळली ! 

पुढं चित्रपटात मंडईतील भाजीविक्रेत्याला ह्या नव्या भाजीउत्पादकांपासुन स्पर्धेचं भय वाटु लागतं. खरंतर त्या मंडईतील दलालाचा समाचार घेण्यास ही मंडळी समर्थ होती! परंतु आपण कोणावरही हात उगारणार नाही ह्या शांताराम ह्यांना दिलेल्या वचनामुळं ते मुकाट्यानं मार सहन करतात. नंतर ह्याच दलालाच्या नीच कृतीमुळं शांताराम एका बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतात. परंतु ही मंडळी त्यांचा वारसा चालविण्याचा निर्धार व्यक्त करतात ! आणि आकाशातुन पाहणाऱ्या शांताराम ह्यांच्या दोन डोळ्यांच्या साक्षीनं चित्रपट संपतो ! 

ह्या काळातील जीवनातील साधेपणा त्याकाळातील चित्रपटांत सुद्धा उतरला आहे. साधी सरळ कथा, नितांत सुंदर अभिनय करणारे कलाकार, अर्थपुर्ण गाणी, जीवन उत्कटतेने जगणारी चित्रपटातील पात्रं ह्यामुळं हा चित्रपट प्रेक्षणीय बनतो ! मान हलवत, नजर डोळ्याच्या एका कोपऱ्यातुन दुसऱ्या कोपऱ्यात वेगानं हलविणारी संध्या लक्षात राहिली. पुर्वीच्या छायागीतमध्ये वारंवार प्रक्षेपित होणारं "आधा हैं चंद्रमा रात आधी " हे गाणं सुद्धा आठवलं ! 

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

Chemical Hearts !

 


प्राईम व्हिडिओवर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादा चित्रपट randomly निवडुन तो पाहण्याची सवय गेले काही आठवडे मला लागली आहे. जाहिरातीचा व्यत्यय नसेल तर चित्रपटाचा निखळ आनंद आपण लुटू शकतो. आज असाच अचानक निवडलेला चित्रपट  Chemical Hearts !

टीनएज हा अस्थिर मनोवस्थेचा काळ ! चित्रपटात ह्या विषयावर उत्तम भाष्य आहे ! बाल्यावस्था ते प्रौढपण ह्यातील ही संक्रमणावस्था !  मेंदु, शरीरामध्ये ह्या मोजक्या वर्षात प्रचंड बदल घडत असतात. खरंतर ह्या मुलांना ह्या काळात संवादांची, भावनिक आधाराची गरज असते. परंतु आपण मोठे होत आहोत, आपल्याला स्वतंत्रपणे वागता आलं पाहिजे, निर्णय घेता आले पाहिजेत ह्याचा अप्रत्यक्ष दबाब ह्या मुलांवर असतो. त्यामुळं आधीच गोंधळलेली ही मुलं काहीशी विचित्र वागु लागतात. साधारणतः ह्याच काळात त्यांच्या पालकांच्या आयुष्यातसुद्धा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता बळावते ! 

चित्रपट ह्या परिस्थितीवर उत्तम पण काहीसं अतिरेकी भाष्य करतो !  टीनएज  काळ(आपण पौगंडावस्था ही शब्द वापरु  शकतो !) हा प्रचंड दुःखाचा काळ आहे . ह्यातुन  केवळ सुदैवी माणसेच सुखरूपपणे  बाहेर  पडतात आणि पुढील आयुष्यात  आनंदानं जगु शकतात. 

ह्या  काळात एखाद्या रिलेशनशिपमध्ये  स्वतःला गुंतवून  घेणं ओघानेच आले . ह्यात बऱ्याच वेळा  peer pressure चा  भाग  असतोच . हल्लीच्या काळात त्यात अजुनही अधिक गुंतागुंतीच्या प्रकारांची भर पडली आहे. 

चित्रपटाच्या कथानकातील मुख्य पात्रे दोन ग्रेस टाऊन आणि हेन्री पेज. ग्रेस आपल्या आधीच्या स्थिर नात्यातून एका दुर्दैवी अपघातामुळे बाहेर फेकली जाते. ह्यात तिला बराच मार लागतो आणि तिचा देखणा, खेळाडु असलेला प्रियकर मरण पावतो! एखाद्या स्थिर नात्यातून बाहेर पडल्यानंतरचा काळ फार कठीण असतो. टीनएज कालावधीत ह्याची काठिण्यपातळी अजुन वाढते ! चित्रपट ह्यावर उत्तम भाष्य करतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या नात्यात (रिलेशनशिपमध्ये) गुंतलेले असता त्यावेळी तुमच्या मेंदुत आनंद निर्माण करणारी रसायने निर्माण होत असतात. ह्या कालावधीत तुम्हांला ह्या रसायनांची आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या आनंदाची सवय झालेली असते. तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी जगु शकत नाही असं म्हणता त्यावेळी त्यात ह्या रसायनांचा मोठा हातभार असतो! ग्रेसचा दुसऱ्या नात्यात स्थिरावण्याचा संघर्ष सुरु असताना हेन्री मात्र आपल्या पहिल्याच नात्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. इंग्लिश शब्दाचा वापर करत बोलायचं झालं तर ग्रेस आपल्या पहिल्या नात्याचं बॅगेज बाळगत असते. ते झटकन फेकुन देणं तिला जमत नसल्यानं अधूनमधून तिचं वागणं अचानक विचित्र बनतं. हेन्री आपल्यापरीने तिला सांभाळुन घेत राहतो. एखादी गोष्ट ग्रेसला आवडली नाही तर त्यामागं तिच्या आधीच्या रिलेशनशिपचा संदर्भ असु शकतो हे त्याला सहजासहजी कळत नाही. पण एकदा कळल्यानंतर मात्र तो खूप सुंदर प्रयत्न करतो ! 

गावाबाहेर असलेली एक निर्मनुष्य जागा ! इथं ह्या दोघांमध्ये सुंदर संवाद घडत राहतात ! इथं एक पाण्याचा प्रवाह असतो आणि त्यात रंगीबेरंगी मासे असतात. ह्यात पाय सोडून बसुन राहणं ग्रेसला खूप आवडतं ! आपल्या अपघातानंतर आपल्या थेरपीसाठी ह्या जागी मी यायचे असंही ती म्हणते. ती झाली शारीरिक जखमा भरुन काढण्यासाठीची थेरपी, पण ह्याच ठिकाणी ती हेन्रीच्या सोबतीनं आपल्या मानसिक जखमा भरुन काढण्याचा प्रयत्न करत राहते. एका प्रसंगी ती आपल्या आधीच्या प्रियकरासोबत लग्नासाठी निवडलेला पेहराव ह्या पाण्यात सोडुन देते. आधीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मी सज्ज आहे असा काहीसा प्रतीकात्मक संदेश ! 

चित्रपटातील काही वाक्यं स्मरणीय ! चित्रपटाच्या आरंभी ग्रेस हेन्रीला म्हणते, आपण म्हणजे काय तर अणूंचा एकत्र आलेला समुह ! काही काळापुरती हे अणु एकत्र येतात; आपण आयुष्य जगतो आणि मग पुन्हा हे अणु विखरले जातात. आसमंतात एखाद्या ताऱ्याच्या रुपात आपलं अस्तित्व राहत असावं ! 

पुढं कुठंतरी दोघंही आयुष्यात वेगळ्या दिशेनं निघुन जाण्याचा निर्णय घेतात. इथं एकमेकांच्या विषयी आदर बाळगत वेगळं होणं महत्वाचं ! त्यावेळी ग्रेस हेन्रीला म्हणते, "हेन्री तु एका चांगल्या अणूंचा समुह आहेस !" हा नवीन काळाचा अजुन एक गुणधर्म ! चित्रपटाचा सुखांत व्हायलाच हवा असं बंधन नाही किंबहुना एखाद्याविषयी सुमधुर स्मृती बाळगत आयुष्य जगणं हा सुद्धा दोघांच्या कहाणीचा सुखांत असु शकतो ! 

लिली आणि ऑस्टिन ह्यांचा अभिनय सुंदर! लिली रेनहार्ट ही अत्यंत गुणी अभिनेत्री ! पुढे चांगलंच नाव कमवेल असा माझा अंदाज !!

रविवार, २८ जून, २०२०

अनुपमा १९६६


शनिवारी रात्री ९ वाजता जेव्हा मन साप्ताहिक सुट्टीमुळं निर्माण झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणी असतं त्यावेळी लोकसभा वाहिनी सुरु करुन त्यावर कोणता चित्रपट दाखविला जात आहे हे मी बऱ्याच वेळा तपासुन पाहतो. काही अनमोल रत्नं ह्यावेळी प्रदर्शित केली जातात. काल रात्री प्रदर्शित केला गेलेला आणि आज दुपारी पुनर्प्रसारित केला गेलेला अनुपमा हे एक असंच अनमोल रत्न !

पत्नीवर अपार प्रेम असणारा पती तरुण बोस ! बाळंतपणात आपल्या पत्नीला गमावुन बसल्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूला आपली नवजात मुलगीच जबाबदार आहे असा ग्रह करुन घेतो; आणि आयुष्यभर बाळगत बसतो. तरीही आपल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावं, तिचं लग्न एखाद्या सुस्थितीतल्या घरात व्हावं असं प्रेमळ पित्याला वाटणाऱ्या सर्व भावना त्याच्या मनात असतात. 

चित्रपटातील संगीत श्रवणीय ! 

धीरे धीरे मचल ये दिले बेकरार 
कुछ दिल ने कहा 
या दिल की सुनो दुनियावालो 

ही ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी !  सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला! शर्मिलेचे सौंदर्य मोहक ! भुमिकेतील शालीनता कायम ठेवत आयुष्यात धर्मेंद्र आल्यानंतरचा होणारा बदल तिनं सुरेख साकारलाय ! धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आरशात पाहिलं आहेस स्वतःला ? तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल! देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात ! डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला ! शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे! चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते! त्यामुळं हिला बहुदा चालता येत नसावं असा काही काळ माझा ग्रह झाला होता ! 

चित्रपटाची पातळी अभिजात. अर्थपुर्ण संवांदांची रेलचेल!  प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा ! आपल्या मालकाकडं आयुष्यभर  नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम ! आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन! जाता जाता ती सांगते! 

धर्मेंद्र कथानकाची गरज म्हणुन कथालेखक असतो असं जरी बराच काळ वाटत राहिलं तरी आपलं प्रेम प्रेयसींपुढं व्यक्त करण्यासाठी त्याला त्यानं लिहिलेल्या कादंबरीची बरीच मदत होते. भावना थेट व्यक्त करण्यात जास्त धोका वाटत असल्यास अशा अप्रत्यक्ष मार्गाचा प्रथम वापर करणे  ह्याला धोरणात्मक चाल असं म्हटलं जातं !

जाता जाता चित्रपटातील बंगला सुद्धा मला आवडुन गेला ! चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला.  हे सारं आपण का गमावलं ?  ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो ! May be Sharmila effect! 

एक गोष्ट नमूद करायची राहुन गेली. हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटांत परगावी एकट्याच निघालेल्या नायक - नायिकेचं चित्रीकरण असलेला हा अजुन एक चित्रपट. भारतीय रेल्वेने कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात अशी अनमोल भुमिका बजावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची नावे सांगा! जा सिमरन जी ले अपनी जिंदगी ! 

शनिवार, १४ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - ३



आपण अवेळी विचारलेल्या प्रश्नामुळं आजोबांचे ज्ञानदायी संभाषण अचानक थांबलं ह्याची चुटपुट लागु आजींना लागुन राहिली. तीच चुटपूट घेऊन लागु आजी रात्री झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्या लवकर उठल्या. आकाशवाणीवर मंगल प्रभात हा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होता. भल्या पहाटे "घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ! उठी लवकरी वनमाळी " ही शाहीर होनाजी बाळा ह्यांची अमर भुपाळी ऐकुन त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या आपसुकच ओल्या झाल्या. "जुनं ते सोनं" असं पुटपुटतच त्या घराबाहेर पडल्या. 

आसमंतात एक सुखद असा गारवा भरुन राहिला होता. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. लागु आजी प्रसन्न मनानं मंदिराकडील रस्त्यावर चालु लागल्या. 

"गुड मॉर्निंग आजी !" मागुन आवाज आला तशा त्या थांबल्या. 

"सुप्रभात वेदा !" आजींनी सुहास्य मुद्रेनं वेदाला अभिवादन केलं. 

"कशा आहात तुम्ही, आजी?" वेदाने त्यांना विचारलं. 

"मी मजेत आहे ! तू कशी आहेस, जॉगिंग झालं का? " आजी म्हणाल्या. 

"हो, तुम्ही कुठं मंदिरात निघालात का? वेदाने त्यांना विचारलं. 

त्यांची मान होकारार्थक प्रतिसाद देतेय ह्याचा पुसटसा अंदाज येताच "मी सुद्धा येते तुमच्या सोबत !" वेदाने घोषित करुन टाकलं. खरंतर काही वर्षांपुर्वी आजीचे देवळात जाण्याविषयीचे नियम अगदी कडक होते. सकाळची आंघोळ न केलेल्या वेदाला आपल्यासोबत मंदिरात घेऊन जायला त्या कदापि तयार झाल्या नसत्या. पण वयानुसार त्यांच्या स्वभावात बराच फरक पडत चालला होता. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या माणसांसाठी आपल्या नियमांत थोडेफार बदल करण्यास त्या अनुभवानं शिकल्या होत्या. 

देवदर्शन झालं. देवापुढं बराच वेळ डोळे मिटुन नमस्कार करणाऱ्या वेदाला पाहुन पुन्हा एकदा लागु आजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. इतक्या तरुण वयात नवऱ्यासोबत न पटल्याने घटस्फोट घेऊन वेदा एकटी राहत होती. व्यवस्थापनाची पदवी घेतलेली वेदा एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या अधिकारी पदावर होती. आपलं देवदर्शन आटोपलं तसं आजी भिंतीपाशी असलेल्या बाकांवर येऊन बसल्या. मिनिटा दोन मिनिटांनी वेदाही त्यांच्या बाजुला येऊन बसली. का कोणास ठाऊक पण नेहमी उत्साहानं भरलेली वेदा देवळात मात्र अगदी शांत झाली होती. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग अचानक वेदाला न राहवुन तिनं आजींच्या कुशीत आपलं डोकं लपविले. 

"का ग वेडाबाई ! काय झालं ?" आजींनी तिला विचारलं. 

"काही नाही ! -" एका हळव्या क्षणावर मात करत वेदा सावरली होती. 

हिच्याशी आज सविस्तर बोलावंच असा विचार आजींच्या मनात आला. इतक्यात अचानक कालचे आजोबा आजींना दिसले. 

"आजोबा !" आजींनी आपल्या मोकळ्या स्वभावाला  अनुसरुन आजोबांना मोठ्यानं साद दिली. 

"अरे वा तुम्ही आज मंदिरात सकाळीच भेटलात !" आजोबांनी त्यांचे स्वागत केले! 

"या बसा ना इथं ! आजींनी वेदाच्या बाजुला त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली. जणू काही आपण आजोबांना गेले कित्येक वर्षे ओळखत आहोत ह्या थाटात आजीबाईंनी वेदाला आजोबांचा परिचय करुन दिला. आजोबांना वेदाने पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतलेल्या विषयाची बरीच माहिती होती. त्यामुळं त्या दोघांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या. लागु आजी आपल्या परीनं त्या संभाषणात सहभागी होत होत्या. 

"सर्वतोपरी प्रयत्न करुनसुद्धा सुखाचं माप सर्वांच्या पदरात देव का देत नाही? " वेदाच्या तोंडुन अचानक आलेल्या ह्या  प्रश्नानं आजी जरी दचकल्या तरी आजोबा मात्र स्थितप्रज्ञ होते. 

"तु एक गहन प्रश्न विचारलास मुली ! आपण सर्वांनी आपल्या सुखाच्या झोळ्या इतक्या मोठ्या बनवुन ठेवल्या आहेत की बिचारा भगवंत आपल्या सर्वांसाठी पुरेनासा झाला आहे !" आजोबा उत्तरले. 

"असं नाही हो आजोबा ! माझ्या अगदी किमान माफक अपेक्षा होत्या! त्याच्यासाठी सर्व करिअरचा त्याग करण्याची माझी तयारी होती. पण का कोणास ठाऊक, आमच्या तारा  कधी जुळल्याच नाहीत ! " अचानक स्वतःभोवती घातलेले सर्व बांध झुगारुन देऊन वेदा बोलली. 

"मुली, आपण सर्वांनी आपली आयुष्य ना खुप क्लिष्ट बनवुन ठेवली आहेत ! पुर्वी कसं साधं सोपं असायचं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी  चांगलं आणि वाईट अशी दोन वर्तुळं बनवलेली असायची. समाजाला तुमच्यासाठी जे काही चांगलं वाटतंय त्या वर्तुळात तुम्हांला सक्तीनं ढकललं जायचं ! वडीलधारी माणसांचा, समाजाचा हा निर्णय पटला नाही तरी सर्वजण स्वीकारत असत. आयुष्य जरी परिपुर्ण नसलं तरी केवळ आपल्या बाबतीतच असं घडत नाहीए, आपल्या सोबत बरेचजण आहेत केवळ ह्या गोष्टीवर सारेजण समाधान मानुन आयुष्य कंठीत करत असत. 

आता ना  चांगलं, वाईट अशी दोनच पर्यायांची वर्तुळं राहिली नाहीत. प्रत्येक निर्णयासाठी आपल्याभोवती  पर्यायांची अनेक वर्तुळं बनली आहेत.  प्रत्येक वर्तुळात चांगलं, वाईट वेगवेगळ्या प्रमाणात वास्तव्य करुन आहे. पुर्वी समाजासाठी ग्राह्य असलेली चांगल्या वाईटाची व्याख्या आता व्यक्तिसापेक्ष बनली आहे. त्यामुळं तुझं बरोबर की माझं ह्याच्या पलीकडं जाऊन एकत्रितपणे आयुष्य व्यतित करण्याची दोघांकडे असलेली इच्छाशक्ती हाच सर्वात महत्वाचा घटक ठरत चालला आहे !" 
आजोबांनी आपलं लांबलचक बोलणं एका दमात सांगुन टाकलं. 

वेदा आणि आजी दोघीही अगदी एकाग्रचित्तानं  त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचं बोलणं संपलं तरीही त्यांची भारावलेली अवस्था कायम होती. अचानक वेदाचा फोन वाजला तसं ती फोन घेऊन थोडी बाजुला गेली. आजीची तंद्री काही काळ कायमच होती. एका मिनिटातच वेदा परतली तर आजीला एकटीलाच पाहुन आश्चर्यचकित झाली. 

"आजी! आजोबा कुठं गेले? " वेदाने विचारलं. 

"अगंबाई कुठं गेले असतील ! " आजी दचकल्याच !

काहीवेळानं दोघीही मंदिराबाहेर पडुन इमारतीच्या दिशेनं चालु लागल्या. वेदाशी बोलत असल्या तरी आजीबाईंच्या मनात मात्र आजोबांचे काल आणि आज अचानक नाहीसे होणे हा निव्वळ योगायोग असणं कितपत शक्य आहे ह्यावर विचारमंथन सुरु होते. 

(क्रमशः)

आधीच्या भागांच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post_10.html


मंगळवार, १० मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - २





अरविंद गोखले आणि विनायक राऊत चालत चालत जवळच असलेल्या उद्यानात  येतात. प्रत्यक्षात होळी सुरु असताना मालिकेतसुद्धा होळी सुरु असायलाच हवी असा काही नियम नसल्यानं इथं इस्त्री केलेल्या शुभ्र कपड्यांमध्ये मंडळी होळी खेळताना आढळत नाहीत. एका दाट छाया देणाऱ्या वडाच्या झाडाखाली दोघेजण बैठक मारतात.  हवापाण्याच्या गप्पा सुरु होत असतानाच त्यांच्या बाजुला काही अंतरावर एक आजोबा  येऊन बसतात. त्यांच्याकडे  एक नजर टाकुन दोघेजण गप्पा सुरु ठेवतात. 

विनायक - "लेका अरविंद ! तुला खरोखरीच सुदैवी म्हणायला हवं !"

अरविंद - (काहीसा दचकुन ) "का रे बाबा ? अचानक तुला काय झालं?"

विनायक - "अरे मस्त प्राध्यापकाची नोकरी ! सकाळ संध्याकाळ मस्त नोकरीच्या वेळा ठरलेल्या ! संध्याकाळी येऊन चांगली घासाघीस करुन भाज्या खरेदीला पण तुला वेळ मिळतो ! अमेयने सुद्धा चांगला IT मधला जॉब शोधला. नाहीतर आमची मानसी बघ ! कसलं संतसाहित्याचा अभ्यास करण्याचं खुळ डोक्यात घेऊन बसली आहे ! राहता राहिलो मी ! इंटरनेटवर वेळच्या वेळी भाजीपाला मागविण्यासाठी सुद्धा मला रिमाइंडर ठेवावा लागतो

अरविंद - "अरे किती बोललास एकदम ! असं एकदम काही बोलण्याचं तुला सुचतंच कसं ?

विनायक - (चेहऱ्यावरील मिश्किल भाव लपविण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता !) "महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयावर तासंतास डोस देतो तेव्हा रे ?"

"आयुष्यातील यश म्हणजे नक्की काय हो? " अचानक बाजुनं आवाज येतो. दोघेही दचकुन पाहतात. प्रश्न बाजुला बसलेल्या आजोबांनी विचारलेला असतो. 

" मुबलक पैसाअडका, सुखी कुटूंब, अंगणात चारचाकी वाहन वगैरे वगैरे !" आपला मिश्किल स्वभाव परक्या माणसासमोर सुद्धा लपवुन ठेवणं विनायकाला आवडत नसे ! 

आजोबा - "बाळा, तु फारसं गंभीरपणे ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही हे ठाऊक आहे मला ! पण अरविंद आणि अमेयच्या यशाची व्याख्या तु कोणत्या मापदंडावर केली आहेस हे जाणुन घेण्यासाठी मी उत्सुक आहे!"

विनायक - (प्रकरण काहीसं गंभीर वळण घेत आहे असा सुप्त संदेश त्याच्या मेंदुने एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचवला होता !) "नाही म्हणजे अरविंदकडे आयुष्याच्या योग्य टप्प्यावर असलेली फुरसत  आणि अमेयकडं आयुष्याच्या उमेदीच्या काळात असलेला उज्ज्वल भवितव्याचा मार्ग विचारात घेऊन मी हे म्हणालो !"

अरविंद, विनायक आणि त्यांच्यासोबत एक वयस्क गृहस्थ वडाच्या झाडाखाली बसले आहेत, विनायकाच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव आहेत हे पाहुन उद्यानात नुकत्याच प्रवेश करत्या झालेल्या लागुआजींना राहावेनासे झाले. विनायक कधी संकटात सापडला असेल तर त्याला मदत करण्याचा आव आणुन त्याला अधिक संकटात टाकणे त्या आपले परमकर्तव्य समजत असत. त्यांना येताना पाहुन अरविंदने सरकुन त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली !

आजोबा - "तुझा विचार काही प्रमाणात योग्य आहे. आयुष्यात यश म्हणजे काय ह्याचा आपण बऱ्याच वेळा खोलवर विचार करतच नाही. आपणासमोर असलेली यशाची काही उदाहरणं म्हणजेच यशाच्या सर्व उपलब्ध शक्यता अशी समजुत आपण करुन घेतो."

लागु आजी - "विनायक मी ही तेच म्हणत होते. तु उगाचच अंतिम निष्कर्षाकडं लगेच धाव घेतोस ! "

आपली खोडी काढण्याची खुमखुमी आजींना आली असावी असा निष्कर्ष विनायकाने काढला. इथं आपण गप्प राहणं इष्ट असा अजुन एक संदेश त्याच्या मेंदूनं त्याला पाठवला. 

आजोबा - "तरुणपणी असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी ही तुमच्या आयुष्यातील यशाची पहिली पायरी ! पण ह्या आणि त्यापुढील पायरीवर पोहोचण्यासाठी आणि टिकुन राहण्यासाठी तुम्ही आयुष्यातील कित्येक महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता असते.  शालेय / 

महाविद्यालयीन जीवनातील खेळण्यात व्यतित केलेला वेळ हा तुमच्या पुढील आयुष्यातील उत्तम तब्येतीसाठी तुम्ही केलेली गुंतवणूक असते. 

एखादी कला विकसित करणे म्हणजे ताणतणावाच्या प्रसंगातुन मुक्त होण्यासाठी तुमच्याकडं असणारा हुकमी एक्का असतो. 

तुम्ही जोडुन ठेवलेली मित्रमंडळी, नातेवाईक म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा भारी गुंतवणूक ! 

मुलांवर केलेल्या संस्कारांतून जर तुम्हांला एक संतुलित व्यक्तिमत्व घडविता आलं तर आयुष्यातील चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना ही मुलं सामोरी जाऊ शकतात. "

आजोबांना अजुन बरंच काही बोलायचं होतं बहुतेक ! पण विनायकाचे विस्फारलेले डोळे पाहुन आजींना राहवलं नाही. 

आजी - " अहो आजोबा तुम्ही मंदिरात कीर्तन वगैरे करता का हो?"  

आजींचा हा अवेळी प्रश्न ऐकुन अरविंदच्या तोंडातुन आपसुक चकचक असा आवाज आला. 

आजोबा - (सस्मित चेहऱ्यानं !) "नाही मी इतका ज्ञानी माणुस नाही !"

अचानक समोर आलेल्या वडापावच्या गाडीमुळं ह्या तिन्ही लोकांची ज्ञानलालसेची स्थिती भंग झाली. वडापाववाल्याकडं फेरी मारुन आजोबांना तुम्ही वडापाव घेणार का असं विचारण्यासाठी म्हणुन ही मंडळी परत आली तोवर आजोबा अचानक गायब झाले होते. ह्या तिघांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि काहीसे अपराधी भाव होते. आजोबांना किमान नाव तरी विचारायला हवं होतं ही भावना त्यांच्या मनात दाटुन आली होती. आजीनी कीर्तनाचा प्रश्न विचारायला नको होता ह्याविषयी आजींसकट तिघांचेही एकमत झालं. 

(क्रमशः )
आदित्य पाटील 

रविवार, ८ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - १






एक मराठी मालिका ब्लॉग द्वारे ....   

विजयनगर एका महाराष्ट्रीयन नगरातील एक वसाहत. ह्या वसाहतीमधील काही कुटुंबांच्या जीवनासोबत फुलणारी ही  एक कथा !

श्री. गोखले - "सीमा तुला काही मदत हवी आहे का? मला दहा मिनिटात निघावं लागेल. आज सकाळी सात वाजताचे लेक्चर आहे."

सौ. गोखले - "मदत  वगैरे नको , झालाच हा डबा तयार ! "

सीमानं दिलेला डबा घेऊन अरविंद महाविद्यालयात जाण्यासाठी आपली कार सुरु करतात. इतक्यात त्यांना आपल्याच इमारतीतील राऊत दिसतात. त्यांच्या एकंदरीत जोशावरुन हे मॉर्निंग वॉकला निघाले असावेत असा कयास गोखले बांधतात.  

श्री. गोखले - "गुड मॉर्निंग राऊत! अहो आश्चर्यम ! आज तुम्ही इतक्या भल्या पहाटे ! "

श्री. राऊत  - "कसलं आश्चर्य न कसलं काय ! सध्या वर्क फ्रॉम होमचे दिवस आले आहेत त्यामुळं प्रवासाचा वाचलेला वेळ इथं मॉर्निंग वॉकसाठी सत्कारणी लावावा असा निर्धार केला आहे ! बघुयात किती दिवस टिकतो तो !

श्री. गोखले - "अरे वा चांगला निर्धार केला आहे ! असाच चालु ठेवा ! येतो मी !"

गोखलेंचा महाविद्यालयातील दिवस सुरळीत पार पडतो. संध्याकाळी साडेचार वाजता घरी आल्यानंतर फ्रेश होऊन चहापोहे घेऊन ते फेरफटका मारण्यासाठी खाली उतरण्याच्या तयारीत असतात. 

सौ. गोखले - "अहो ऐकलं का ! जरा थोडं पुढं जाऊन अमेयसाठी थोडे आवळे घेऊन या! रात्रीच्या घरी येण्याच्या वेळेचा पत्ताच नाही ! चांगलं आवळा सरबत करुन ठेवते म्हणजे ऍसिडिटी कमी व्हायला थोडीफार मदत होईल! 

श्री. गोखले - "ठीक आहे !"

सौ. गोखले - "आणि हो मी जिमला जाणार आहे ! जर मला यायला उशीर झाला तर कुकरला भात लावून ठेवा ! म्हणजे मी आल्यावर लगेच जेवायला बरं !

अरविंदच्या कपाळावर उठू पाहणारी आठी प्रयत्नपुर्वक टाळुन तो खाली उतरतो. वरच्या मजल्यावरुन येणाऱ्या लिफ्टमध्ये आधीच मानसी असते. 

मानसी - "काका कसे आहात तुम्ही ? "

श्री. गोखले - "मी कसा असणार ? मी मजेत आहे . तू कशी आहेस?"

मानसी - " मी ही मजेत आहे ! आम्ही कलाशाखेच्या वीसजणी ज्ञानेश्वरांच्या आणि महाराष्ट्रातील इतर संतांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी म्हणुन आळंदी आणि काही गावांना भेट देणार आहोत !"

श्री. गोखले - (अत्यंत कौतुकाच्या स्वरात !) अरे वा ! मानसी खुप छान ! कधी वेळ मिळाला तर घरी ये ना ! तुम्ही केलेल्या संतसाहित्याच्या अभ्यासाविषयी मला बरंच काही जाणुन घ्यायचं आहे ! 

मानसी - "नक्की काका ! येते मी !"

बराच वेळ अरविंदच्या  (अर्थात श्री. गोखलेंच्या ) मनात मानसीविषयी विचार घोळत राहतात. राऊत इतका IT मधला यशस्वी व्यावसायिक पण त्याच्या मुलीने, मानसीने जाणीवपुर्वक कलाशाखेची निवड केली होती ! आणि आपण मात्र विज्ञानाचे प्राध्यापक असुन मात्र अमेयच्या संशोधनाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं नाही !

विचाराच्या तंद्रीतच अरविंद भाजीवाल्याच्या ठेल्यावर पोहोचतो. आवळ्याच्या भावाची चौकशी करत असतानाच त्याला पुन्हा एकदा राऊत दिसतो! त्याच्या पाठीवर थाप देत हसत हसत अरविंद म्हणतो - "लेकाच्या तुझं वर्क फ्रॉम होम मस्त चालू आहे हे दिसतंय !" विनायक राऊतच्या चेहऱ्यावरील काहीसे ओशाळल्याचे भाव बघुन अरविंदला उगाच ह्याची थट्टा केली असे वाटतं ! "अरे ते जाऊ दे ! तुझ्या मानसीचे कौतुक करावे तितकं थोडं ! हल्लीच्या पिढीत आपल्या परंपरांचा अभ्यास करण्याची वृत्ती फारच क्वचित दिसते !

श्री. राऊत  - "अरे परंपरा वगैरे आपल्या जागी ठीक आहेत! पण हिच्या नोकरीचं काय होणार ह्याचीच मला चिंता लागुन राहिली आहे ! बाकी तुझी खरेदी झाली का? तुला वेळ असेल तर मस्त आपण ह्या पार्कात बसुयात का? दिवसभराचं काम आटपुन टाकलंय मी !"

"ही काय विचारायची गोष्ट झाली?" आपण आवळे योग्य किमतीत घेत आहोत ना ह्याविषयी अजुनही साशंक असलेला अरविंद विनायकला म्हणाला !

(क्रमशः )

आदित्य पाटील 

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

मैं बावली हुँ तेरी !


"वत्सा, पुरे झाला तुझा आडमुठेपणा !" भगवंताचे संतप्त उदगार माझ्या कानात पडताच मी प्रचंड हादरलो. 
"तुला ह्या क्षणी झोपेतुन जागे होण्याची इच्छा असली तरी मी माझा संदेश दिल्याशिवाय तसं होऊ देणार नाही हे लक्षात असु देत !" भगवंत म्हणाले. 
"भगवंता, माझा नक्की प्रमाद काय झाला हे कृपा करुन सांगाल का?" मी म्हणालो. 
"तुझ्या ब्लॉगमधुन तू सद्यःकालीन कलाकृतींना अजिबात स्थान दिलं नाही. ह्यात दोन शक्यता आहेत. एक तर तु सद्यःकालीन कलाकृतींपासून पुर्णपणे अनभिज्ञ आहेस किंवा तु त्यांना हेतुपुरस्पर  पुर्णपणे दुर्लक्षित ठेवलं आहे." भगवंतांचा पारा खाली उतरण्याची चिन्हं दिसत नव्हती. 
"मला माफ करा भगवंत ! माझी चुक मला पुर्णपणे मान्य आहे. पण सद्यकालीन कलाकृती ह्या संज्ञेचा व्यापक अर्थ ध्यानात घेता तुमचा रोख नक्की कशावर आहे हे ह्या पामरास तुम्ही सांगितलं तर बरं होईल !" 
"तु सद्यःकालीन हिंदी गाण्यांवर एकही पोस्ट लिहिली नाहीस!" भगवंतांचा राग काहीसा निवळला होता.  
"ठीक आहे मी प्रयत्न करतो!" मी म्हणालो. मी ही गाणी पाहतच नाही असं खोटं बेधडकपणे बोलण्याचा मोह मी समोर भगवंत असल्यानं टाळला. भगवंतांकडे ह्याविषयी अधिक चौकशी करण्याची माझी मनिषा भगवंत अचानक अंतर्धान पावल्यानं अपुर्णच राहिली. 

दिवस उजाडताच मी भगवंतांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी म्हणुन केबल टीव्ही सुरु केला. सकाळसकाळी ही गाणी मी सुरु केली आहेत हे पाहुन घरात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पण अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडं वेळ नव्हता. अचानक मी एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करत असल्याची मला जाणीव होऊ लागली. समोर मैं बावली हुँ तेरी ! ह्या गाण्यावर नायक नायिका नृत्य करत / थिरकत होते!

जो अख लड़ जावे 
सारी रात नींद ना आवें 
मैनूं बड़ा तडपावे 
दिल कहीं चैन ना पावे !

कदाचित भगवंतांनी केलेल्या किमयेचा परिणाम म्हणुन मला ह्या गाण्यातील भावार्थ पुर्णपणे उमगु लागला होता. हे नाथा,  आपली नजरानजर काय झाली आणि  तु माझी चैन, झोप सर्व काही हिरावुन घेतलं आहेस. 

मैं बावली हूँ तेरी 
तू जान हैं ना मेरी। 
एक प्यार ही माँगा था 
किस बात की हैं देरी !
ये रात कभी ना आवे ! 

मी तुझ्या प्रेमात हरवुन गेली आहे, वेडी झाल्ये आहे. तू माझे सर्वस्व आहेस. मी तुझ्याकडे केवळ प्रेम मागितलं आहे, ATM कार्ड आणि पासवर्ड थोडाच मागितला आहे? मग तू ह्या गोष्टीसाठी इतका वेळ का लावत आहेस ? 

शेवटच्या ओळींचा अर्थ लावताना मला सर्वप्रथम लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो  ह्या गाण्याची आठवण झाली. अचानक भगवंतांची संतप्त मुद्रा माझ्यासमोर प्रकट झाली. 
"अरे वेड्या! गीतकार ह्या ओळीतून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छितो, की परीक्षेआधीची ही शेवटची रात्र आहे! गपचुप अभ्यास करा, ही रात्र परत येणार नाही, नंतर पस्तावाल  !" 

ह्या गाण्याचा उदात्त अर्थ समजल्यानं मी धन्य झालो होतो. इतके दिवस उगाचच ह्या नवीन काळातील  उत्तमोत्तम गाण्यांचा अर्थ समजुन घेण्याचा आपण प्रयत्न सुद्धा केला नाही ह्या भावनेमुळं मी पश्चात्तापदग्ध झालो होतो. परदेशी बातम्यांच्या वाहिन्या पाहण्यापेक्षा अशी भावार्थाने भरलेली गाणी पाहता यावीत ह्यासाठी केबल प्लॅनमध्ये बदल करण्याचा माझा मानस पक्का झाला होता. 

केवळ अर्थ समजला म्हणुन मी धन्य झालो आहे ही गोष्ट भगवंतांना पटली नसावी. शेवटी भगवंतच ते ! 

"तु गाणं केवळ ऐकलं की पाहिलं सुद्धा?" माझ्या कानात आवाज आला. 

"हो पण सकाळसकाळी दिवाणखान्यात हे गाणं पाहायला फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती !" मी हळु आवाजात पुटपुटलो! 

"अरे मुर्खा, नायक - नायिकेचा फिटनेस पाहिलास का? सद्यःकालीन तरुण पिढी इंटरनेटच्या अधीन होऊन आपली शारीरिक तंदुरुस्ती गमावुन बसत आहे. त्यांनी आपल्या फिटनेसकडे पुन्हा एकदा लक्ष द्यावे असा सुप्त संदेश युवापिढीला देण्यात आला आहे !"   मी हे शब्द ऐकुन पुर्णपणे हेलावुन गेलो. 

"ह्यापुढील असंच एखादं उदबोधक गाणं सुचवाल का?" असा प्रश्न विचारण्याचा माझ्या मनात विचार आला. परंतु भगवंत आधीच नाराज झाल्यानं त्यांची अधिक नाराजी ओढवुन घेण्याचा धोका पत्करण्यास मी तयार नव्हतो. "Lamborghini चलाये जाने हो" ह्या गाण्यातुन आर्थिक मंदीतून बाहेर पडून आर्थिक समृद्धी कशी संपादन करावी ह्याविषयी नक्कीच सुप्त संदेश दिला गेला असणार ह्याविषयी माझी पुरेपूर खात्री पटली आहे. त्यामुळे हे गाणे नवीन दृष्टीकोनातुन पाहण्याचा / ऐकण्याचा मी दृढ मानस केला. "शनिवारी सकाळी हा काय उद्योग सुरु आहे?" एक नजरेतुन घरातील बॉसने संदेश दिला आणि मी माझा हा उपक्रम तुर्तास स्थगित केला !

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

कोषावस्था!



सध्या मी सोनी टीव्हीची मराठी वाहिनीचा चाहता बनलो आहे.  या वाहिनीवरील रविवारी दुपारी दाखवल्या जाणाऱ्या नवीन मराठी चित्रपटांव्यतिरिक्त "ती फुलराणी" या मराठी मालिकेने माझे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्याच्या एका बंगल्यामध्ये चित्रीकरण केल्या जाणाऱ्या या मराठी मालिकेतील काही कलाकारांची पात्रे चांगल्या प्रकारे खुलवली केली आहेत.  

या पोस्टचा विषय आहे या मालिकेतील देवयानी या पात्राने वठवलेली भूमिका आणि तिची Denial अवस्थेत मध्ये जाणं! देवयानी ही एका श्रीमंत घराण्यातील सुंदर मुलगी! तिची शौनक या एका देखण्या आणि देशमुखांसारख्या खानदानी कुटुंबातील तरुणाबरोबर असणारी मैत्री लग्नामध्ये परिवर्तन होण्याच्या मार्गावर असताना एक फुलराणी येऊन या देवयानीच्या राजकुमाराला म्हणजेच शौनकला घेऊन जाते, त्याच्याशी विवाहसुद्धा करते. एक होऊ घातलेलं परिपूर्ण चित्र पुर्णपणे विस्कटून जातं.  परंतु या सत्याचा स्वीकार करण्यास देवयानी नकार देते, माझंच लग्न शौनकशी झालं आहे अशा समजुतीत त्याच्या घरी राहू लागते. या मालिकेत केव्हातरी देवयानी denial मध्ये राहत आहे अशा शब्दप्रयोगाचा वापर केला  गेला आणि माझं लक्ष या संज्ञेकडे वेधलं गेलं!

म्हणायला गेलं तर ही Denial म्हणजे नकाराची भावना नकारात्मकच असायला हवी! व्यावहारिक जगाच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी वास्तव स्वीकारायला हव्यात त्या गोष्टीला न स्वीकारता आपल्याला हवं असलेल्या स्थितीचं एक काल्पनिक चित्र बनवुन त्या भ्रमाने बनवलेल्या काल्पनिक विश्वात वावरणं याला आपण State of Denial असे म्हणू शकतो.  परंतु Denial हे प्रत्येक वेळी घातक किंवा चुकीचं असतं असं नाही. काही वेळा Denial मध्ये राहणे हे तुमच्यातील जिद्द जागृत करु शकतं,  व्यावहारिक जगाच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही साध्य करू शकता.  उदाहरणार्थ एखाद्या परीक्षेत दोन-तीन वेळा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला जग उपदेश देईल की ही परीक्षा पास होणे उत्तीर्ण होणे तुझ्या आवाक्यातील गोष्ट नाही, तु या परीक्षेचा नाद सोडून द्यावा यातच तुझं हित आहे. जर त्या विद्यार्थ्याने जगाचा हा सल्ला मानला तर तो आपलं ध्येय गाठू शकणार नाही. परंतु त्यानं जगाच्या सल्ल्याला धुडकावून लावून आपल्याच मनाला जे योग्य वाटतं त्यानुसार जिद्दीने प्रयत्न केले तर तो कदाचित यशस्वी होऊ शकतो! 

या उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात येते की काही प्रसंगी जगाच्या उपदेशाला विसरून जाऊन म्हणजे कोषावस्थेत राहून आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करणे योग्य ठरतं. परंतु या डिनायल स्टेट मध्ये दीर्घकाळ राहणे हे मात्र धोक्याचे असू शकते.  हा धोका टाळण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण डिनायल स्टेटमध्ये आहोत हे ओळखता यायला हवं.  दुसरी गोष्ट म्हणजे आपण एका विशिष्ट कारणासाठी या डिनायल स्टेटमध्ये जात आहोत हे आपल्या निकटच्या किमान एका व्यक्तीला तरी सांगून त्या व्यक्तीला आपल्यावर लक्ष ठेवण्यास व आपणास एखाद्या टोकाच्या भूमिकेपासून दूर ठेवण्यास त्या व्यक्तीची मदत घ्यावी.

व्यक्तीनं State of Denial मध्ये जाणं ह्यापुढील पातळी म्हणजे एखादं कुटुंब, एखादा समाज अथवा एखादा संपुर्ण देश सुद्धा ह्या अवस्थेत जाऊ शकतो.  व्यक्तीनं State of Denial मध्ये जाणं ह्याबाबतीत बहुतांशी वेळा केवळ त्या व्यक्तीचीच हानी होते परंतु सामाजिक पातळीवरील State of Denial मध्ये जाणं हे समाजस्वाथ्याच्या दृष्टीतुन धोकादायक ठरु शकतं. 

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

Bucket List!





गैर नाही काही तुझं स्वत्व जपणं...

कथा मधुरा साने हिची ! एका सुखी कुटुंबातील आयुष्य जगत असताना अचानक हृदय प्रत्यारोपणाचा प्रसंग येतो. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर जिच्यामुळं आपल्याला हे नवीन आयुष्य लाभलं त्या मुलीचा शोध घेताना मधुराच्या हाती गवसते ती त्या मुलीची बकेट लिस्ट आणि मग सुरु होतो एक स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रवास !

                                   मराठी पाऊल पडते ... !!!
चित्रपटात वाइन, व्हिस्की घे! बियर टकीला घेतला तर त्याबरोबर लिंबू घ्यायला विसरु नकोस असे सांगणारी आजेसासु आहे. परवा ती फुलराणी मध्ये सुनेसोबत ड्रिंक येणारी सासुबाई बघितली आणि आज नातसुनेला ड्रिंक्स घेताना नक्की काय करावं ह्याविषयी मार्गदर्शन करणारी आजेसासू पाहिली! नक्कीच मराठी पाऊल पडते ..... 

 Is bucket list related to mid life crisis...
बकेट लिस्ट काही वेळा असते ती राहून गेलेल्या मनातील खरोखरीच्या गोष्टींची (पहिला प्रकार) तर काही वेळा बनवली जाते ती जाणीवपुर्वक आपल्याला सर्वांनी गृहीत धरल्याच्या भावनेचा संताप येऊन (दुसरा प्रकार)!!

दुसऱ्या प्रकारात बकेट लिस्ट आणि मिडलाइफ (क्रायसेस) याचा संबंध असू शकतो काय? ज्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वेचली ती मुले, नवरा कालांतराने आपल्या आयुष्यात दंग होतात. केवळ वेळच्या वेळी घरी जेवण देणारी आई / बायको आणि घराचं नेटकेपण ठेवणारी एक व्यक्ती अशी आपली ओळख होऊ लागली आहे की काय अशा असा संशय वाटु शकतो अशा घटना जेव्हा काहीशा सातत्याने घडू लागतात त्यावेळी मनात एक अगतिकता किंवा नैराश्य निर्माण होते.  तिथुनच उगम होऊ शकतो बकेट लिस्टचा! 

बकेट लिस्ट काहीवेळा खरोखर मनाला आनंद देऊन जाते! परंतु काही वेळा मात्र या बकेट लिस्टचा पाठलाग करताना आपल्या भोवतालची माणसं काहीशी दुरावली जातात आणि त्यावेळी मग निर्णय घ्यायचा असतो की आपली बकेट लिस्ट महत्त्वाची की भोवतालच्या माणसांची मनं जपणं  महत्त्वाचं?

इथं कुटुंबातील बाकीच्या सदस्यांसोबत असलेला संवाद (communication) महत्वाची भुमिका बजावतो. तुम्ही बराच काळ बाकीच्या सर्वांना लाडिक सवयी लावुन मग जर एका सुंदर सकाळी अचानक जागं होऊन ही माझी बकेट लिस्ट आणि हे घरातील नवीन नियम असं सांगणं चुकीचं आहे. कुटुंबातील बाकीचे सदस्य तुमचे ह्या निर्णयातील stakeholders आहेत.  They should have seen it coming / heading their way. 

सोनी टीव्हीचे ह्या चित्रपटांबद्दल आभार ! मधल्या एका रविवारी दाखविल्या गेलेल्या बापजन्म ह्या चित्रपटावर पोस्ट नाही लिहिली. त्यात सुद्धा योग्य संवादाअभावी गैरसमजाने दुरावल्या  गेलेल्या कुटुंबाची कथा वर्णिली गेली आहे.  कदाचित बदलत्या काळात मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील सदस्यांमधील संवादाचा दर्जा हा एका प्रबंधाचा विषय होऊ शकतो! 

याबाबतीत पुरुष मात्र म्हणायला गेलं तर सुदैवी असतात. निवृत्तीच्या काळापर्यंत नोकरी-व्यवसायानिमित्त बिझी राहून आपलं महत्त्व जपून ठेवतात. त्या कालावधीत जर त्यांनी कोणता छंद जोपासला तरीही त्यांचं कौतुक होतं किंवा जर निवृत्तीनंतर हा छंद जोपासला तरीही त्यांचे कौतुक होते. 

बकेट लिस्ट मध्ये दडलंय काय?


बकेट लिस्ट हा एका यादीचा प्रश्न न राहता तो नवरा बायकोमधील विसंवादाचा प्रश्न असु शकतो!  गृहिणीला बऱ्याच वेळा गृहीत धरुन निर्णय घेतले जातात.  ह्या गोष्टीची खंत तिच्या मनात कायमची राहून गेलेली असते आणि एखादा प्रसंग असा घडतो ज्यावेळी आयुष्यभराची राहिलेली ही खंत अचानक बाहेर पडते.  त्याप्रसंगी तिने दिलेली प्रतिक्रिया भोवतालच्या लोकांना आपण हिला कसं  गृहीत धरले याची जाणीव करुन देतो. 



यामध्ये नवऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. स्त्री आयुष्याच्या एका टप्प्यावर माहेरापासुन बऱ्यापैकी दुरावली जाण्याची शक्यता वाढीस लागते. सासरची मंडळी अवतीभवती असली देखील काही गोष्टी बोलण्यासाठी मात्र फक्त नवरा लागतो. नवरा या गोष्टी शांतपणे ऐकून घेत नसेल किंवा नवऱ्याशी खऱ्या अर्थानं संवाद साधता येत नसेल (ह्यात रोमान्सचा सुद्धा समावेश असु शकतो) तर मग मात्र स्त्री कोणता निर्णय घेईल हा स्त्रीवर आणि तिच्या निराशेच्या पातळीवर अवलंबून राहतो. 

नवरा हा जरी महत्वाचा घटक असला तरी ह्यात मुलं सुद्धा महत्वाची भुमिका बजावतात. बऱ्याच वेळा होतं काय की नवरा उदारमतवादी होऊ शकतो पण मुलं आईच्या बाबतीत कर्मठ बनतात. बाकी सर्वांनी आधुनिक बनलं तरी चालेल पण आईनं मात्र पारंपरिकच राहायला हवं अशी त्यांची भुमिका असु शकते. कदाचित ही प्राथमिक प्रतिक्रिया असु शकते; सुरुवातीच्या धक्क्यातुन बाहेर आल्यावर मग ही मुले आईचं हे नवीन रुप स्वीकारु शकतात. पुन्हा एकदा संवाद ही महत्वाची गोष्ट बनुन राहते. 


ह्या चित्रपटात  खरोखरच हृदय प्रत्यारोपण केलेल्या तरुण मुलीच्या बकेट लिस्टचा समावेश करणे आवश्यक होते का?  हा मला पडलेला प्रश्न!! केवळ मधुरा सानेची आपली स्वतःची अशी बकेट लिस्ट घेऊन त्याच्याभोवती पिक्चर गुंफता आला नसता का? प्रश्नाचे उत्तर द्या वाचक हो!!
बाकी चित्रपटातील भुमिकेला माधुरीनं योग्य न्याय दिला हे माझं मत!!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...