मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १० डिसेंबर, २०२३

झिम्मा २



समाजातील सृजनशीलता झपाट्यानं लोप पावत आहे किंवा माहितीमायाजालावरील माहितीच्या स्फोटामध्ये ती कुठंतरी दडून बसत आहे.  सहजरित्या उपलब्ध असलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेतांना सृजनशीलतेच्या बाबतीत पदरी निराशाच पडण्याची शक्यता असते. 

कोणत्याही कलाकृतीचा जीवनप्रवास ही खरंतर एक अभ्यासण्याजोगी घटना असायला हवी.  कथेतील मूळ कल्पनेचा उगम, तिचं विस्तारीकरण ह्यात लेखकांची प्रतिभा, त्यांच्या कल्पनाशक्तीने घेतलेल्या भराऱ्या ह्याचे वाचक प्रत्यक्ष साक्षीदार नसले तरी त्या कलाकृतीचा आनंद घेताना संवेदनशील वाचकांना त्याची अनुभूती मिळायला हवी. इथंच खरं कथाकार आणि वाचक ह्यांचं एक अदृश्य, घट्ट नातं जुळतं. जेव्हा ही कथा नाटक, चित्रपटाच्या माध्यमांद्वारे आपणांसमोर सादर केली जाते त्यावेळी खरंतर दिग्दर्शकाच्या कौशल्याची कसोटी असते. मूळ कथेच्या गाभ्याला फारसा धक्का न लावता नाटक, चित्रपट माध्यमांना योग्य अशा स्वरूपात  ही कलाकृती सादर करणे म्हणजे तारेवरील कसरत असते. 

आठवडाभर कार्यालयीन कामात जुंपून घेतल्यानंतर फुरसतीच्या वेळात वयानुसार निर्माण झालेल्या आवडीमुळे चांगल्या नाटक, चित्रपटाच्या शोधात असलेला मी ! खरा प्रश्न इथं आहे. चांगलं म्हणजे नक्की काय? आपल्याला नक्की काय आवडतं ह्यावर आपण फारसा विचार करत नाही. काल पाहिलेल्या झिम्मा २ ह्या चित्रपटाच्या कालावधीत  विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. चित्रपटाला कथा म्हणून काही नव्हतीच. लेक डिस्ट्रिक्टची निसर्गरम्य पार्श्वभूमी ही चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू! मी आणि प्राजक्ता चित्रपट संपल्यानंतर कथेच्या, त्यातील पात्रांच्या,  व्यक्तिमत्त्वांच्या किंवा चित्रपटातील नात्यांच्या खोलीविषयी बोलत होतो. काही इंग्लिश चित्रपटात कथेला मोठा जीव नसला तरीही त्यातील संवादातील आणि  नात्यांतील विविध छटांच्या सादरीकरणामुळं ते प्रेक्षणीय बनतात. आमच्या चांगल्या चित्रपटाच्या व्याख्येत ह्या बाबींचा समावेश होतो. 

चित्रपटात विविध वयोगटातील भाराभर नायिका आणि मोजून दोन पुरुष व्यक्तिमत्वे आहेत. इंग्लिश व्यक्तिमत्वाला नायक म्हणायला  वाव नसल्यानं दोन नायक म्हणण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे,  इतकी सगळी पात्रं आपली भूमिका कशी उत्तम होईल ह्याकडेच लक्ष देत आहेत असं वाटत राहतं. त्यामुळं अधूनमधून येणाऱ्या शाब्दिक कोट्यावर आपण मनमुराद हसत राहतो. चित्रपट कोणत्याही क्षणी संपला असं सांगितलं तरीही आपल्याला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळं खरोखरच ज्यावेळी चित्रपट संपतो तेव्हाही आपल्याला काही वाटत नाही. पार्किन्सन ह्या गंभीर आजारासंदर्भात देण्यात आलेला सामाजिक संदेश ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो. ना धड तो संदेश दिला जात नाही ना चित्रपटाच्या कथेला त्यामुळं वाव मिळतो / गती मिळते.  चित्रपट ही काही मिसळ वगैरे नाही ज्यात नामांकित कलाकार, निसर्गरम्य पार्श्वभूमी, सामाजिक संदेश वगैरे एकत्र आणलं की एक चांगली कलाकृती बनेल. 

मराठी चित्रपटांचे उभरत्या इंग्लिश कलाकारांना योगदान ह्या मुद्द्यावर ह्या चित्रपटाला गुण प्रदान करता येतील. झिम्मा ३ / ४ वगैरे भागात जर्मन, फ्रेंच, इटली वगैरे देशांतील कलाकारांचा विचार करता येऊ शकेल.  

असे चित्रपट शहरी भागातील स्त्रीच्या समस्यांना कितपत योग्य स्वरूपात सादर करतात ह्याविषयी मोठी साशंकता निर्माण होते. व्यक्तिरेखांच्या खोलीच्या अभावी ह्या स्त्रियांच्या समस्यांशी आपण फारसे जोडले जात नाहीत. मूलभूत सुविधा नसलेल्या गावात अगदी तुटपुंज्या पैशात आपला संसार चालविणाऱ्या स्त्रियांविषयी झिम्मा ३ - ४ वगैरे यायला हवा असा विचार मनात येतो. 

बाकी इनऑर्बिट मॉलमधील चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. एक चांगला लेखक आणि एक यशस्वी लेखक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गालिब नाटकातील  वाक्य चित्रपटांना सुद्धा लागू होते असं वाटलं. पॉपकॉर्नची पाचशे रुपयांच्या वरील किमतीची पुडकी विकत घेऊन चित्रपटगृहात वचावचा आवाज करत खाणारी टाळकी मोजकीच होती. सिनेमागृहातील आवाजाची पातळी काही वेळा कर्कश होती. प्रेक्षकांच्या  श्रवणयंत्रावर, हृदयाच्या ठोक्यांवर विपरीत परिणाम करणारी अशी होती. ह्यावर कोणीही आवाज उठविलेला दिसत नाही. जाहिरातींचा अतिरेक झाला होता. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नव्हतं. मॉलच्या फूड कोर्टमध्ये खचाखच नसली तरी बऱ्यापैकी गर्दी होती. पाश्च्यात्य देशांतील कंपनीमध्ये काम करून पैसा कमाविणारे बरेच लोक पाश्चात्य खाद्यपदार्थांवर पैसे खर्च करत होते.   मॉलमधून बाहेर पडताच मेट्रो स्टेशन आहे. त्याद्वारे प्रयेकी वीस रुपयांच्या तिकिटात दहा बारा  मिनिटांत वातानुकूलित ac डब्यात बसून घरी पोहोचलो.  रिक्षात बसून शंभर रुपये खर्च करत प्रदूषणात बसून घरी पोहाचण्यापेक्षा हे खूप बरं ! एकंदरीत देशाचे बरं चाललं आहेत. तुम्ही वर्तमानपत्रं, त्यातील अग्रलेख  न वाचता शहरात फिरत राहिलात तर लाईफ इज चकचकीत ! आयुष्य सुंदर आहे ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...