मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

चलनगाथा



८ नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांच्या जीवनात बरीच उलथापालथ झाली. आयुष्यातील अशाश्वततेचा आपण एका अनपेक्षित पातळीवर अनुभव घेतला. ह्या निमित्ताने मनातील विविध विचारांचा हा आढावा!

१> संयम  - आपला बराचसा संयम नेहमी प्रवासात खर्ची कामी यायचा. आता आपणास ATM / बँकेच्या रांगेत संयम दाखवावा लागला. पाऊण तास रांगेत उभं राहिल्यानंतर आपल्या आधीच्या माणसाला पैसे मिळावेत आणि आपला क्रमांक येताच ATM ने "संपले रे माझे पैसे! उद्या पुन्हा प्रयत्न कर!" असं म्हणावं हा अनुभव सुद्धा मी घेतला. आपल्यासारखे समदुःखी रांगेत उभे असताना सर्वांचा विचार करुन केवळ एकाच कार्डचा वापर करुन पैसे काढावेत जेणेकरुन रांगेतील अजुन एका माणसाला पैसे मिळु शकतील ही सामाजिक जाणीव काही जणांनी दाखविली तर काहींनी नाही! 

ह्या निमित्ताने आपणा सर्वांच्या मनातील अजून एक भयाचं प्रदर्शन झालं ते म्हणजे भारतातील अफाट लोकसंख्येचं भय! आपल्या पिढीचं कसबसं निभावलं; आपल्या पुढील पिढीचं काय होणार हे भय आपल्या सर्वांच्या (किंवा बऱ्याच जणांच्या)मनात आहे. ह्यावर उपाय म्हणुन काहीजण परदेशात स्थलांतरित होतात, बरीचजण पै पै साठवून पुढील पिढीला काही आधार जमा करतात. बऱ्याच वेळा हे भय स्पर्धात्मक पातळीवर कमी पडण्याचं नसतं तर समाजात जो दांडग्या वृत्तीचा प्रभाव वाढीस लागला आहे तो पुढील काही वर्षात कोणतं रूप धारण करेल ह्याविषयीच्या असणाऱ्या साशंकतेमुळं असतं. मध्यमवर्गीय माणसं सेकंड होम करुन आपलं पुढील पिढीच्या भवितव्याच्या साशंकतेबद्दलच आपलं कर्तव्य आटोपतात तर काही हपापलेली माणसं पुढील दहा पिढ्यांना पण पुरून उरेल इतकी संपत्ती गोळा करतात. 

नवीन नोटांच्या बाबतीत सुद्धा हेच आढळलं! मला समजा भाजीवाली, कामवाली ह्यांना देण्यासाठी पुढील आठवडाभरासाठी ३ हजार रुपयांची गरज आहे तर ते ३ हजार मिळाल्यावर सुद्धा काहीसं कमी गर्दीचं  ATM दिसल्यावर मी पुन्हा रांगेत उभा राहणार! कारण हेच की समजा अचानक ATM काही दिवस बंद पडली तर हे मनातील भय!     

२> राष्ट्रीय एकात्मता - एक राष्ट म्हणून आपणास एकत्र आणणारे घटक म्हणजे आपली सेना, क्रिकेटर आणि अधूनमधून केजरी.. ह्या नोटांनी सुद्धा आपणास एक राष्ट्र म्हणून मोठ्या प्रमाणावर एकत्र आणण्यास हातभार लावला. समाजातील अफाट वेगाने प्रचंड संपत्ती गोळा केलेल्या काही लोकांविषयी सामान्य जनतेच्या मनात राग आहे. आणि अशा लोकांना सध्या अस्तित्वात असणारे कायदे काही करू शकत नाहीत ह्याविषयी प्रचंड संताप आहे. ह्या नोटबंदी प्रकरणाने अशा लोकांना काही प्रमाणात तरी त्रास झाला असावा अशी सामान्यांची समजूत आहे आणि त्यामुळं आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण ह्या निर्णयाला पाठिंबा द्यायला हवा ही मनोवृत्ती बऱ्याच प्रमाणात आढळून येते. 

३> नवीन तंत्रज्ञान  - आमच्या वसईत चिन्मय गवाणकर आणि तरुण पिढी काही सामाजिक संस्थांमार्फत सामाजिक उपक्रम राबवित असतात. नोटबंदी ही एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची संधी म्हणून ह्या गटानं 'डिजिटल वसई' हा उपक्रम वसईत राबवू घातला आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत आपल्या दुकानात कॅशलेस / डिजिटल पद्धतीनं पेमेंट कसं स्वीकारायचं ह्या विषयी वसईभरातील दुकानदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे! अत्यंत कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे! 

शेवटी एक सारांश - आपल्या जीवनावर अनिष्ट परिणाम करु शकण्याची क्षमता असणारे काही घटक (अफाट लोकसंख्या, भविष्यातील नोकरीधंद्यांची अशाश्वतता, कोलमडू शकणारी वाहतूक व्यवस्था) सभोवताली अस्तित्वात आहेत. पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करुन आपण आपलं जीवन एका परिपूर्ण चित्राप्रमाणं चाललंय असं समजून जगत असतो. हयातील कोणताही घटक केव्हातरी आपला हिसका दाखवणारच! त्यामुळं त्यावेळी आपला संयम दाखवणं, बदल घडवू पाहणाऱ्या सामाजिक उपक्रमांना आपल्यापरीनं प्रोत्साहन देणं ह्या गोष्टीतरी किमान आपण करु शकतो!  

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

Trapped - भाग ६




आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 


इतक्या खोलवर संवादानंतर योगिनी अगदी भावनिकदृष्ट्या दमून गेली होती आणि पहिल्यांदाच तिला आपल्या जिवाची सुद्धा भिती वाटू लागली होती. त्याच्या बोलण्यावरुन खरंतर स्वामी बुद्धिमान वाटत होता; पण त्याचा लढा होता तो त्यांच्यासारख्याच बुद्धिमान असलेल्या त्याच्या संपूर्ण प्रजातीशी! स्वामीच्या म्हणण्यानुसार आता तिला सर्व काही आठवणार होतं; आणि बाकीच्या मनुष्यजातीशी संपर्क साधायला ती आता पुर्णपणे मुक्त होती. 
असंच आर्यनला उचलून घ्यावं आणि तडकाफडकी पोलिसांकडे जावं असा तिच्या मनात विचार आला. पण पाठमोऱ्या बसलेल्या आणि आपल्या ऑफिसच्या कामात गढून गेलेल्या स्वामीकडे पाहून तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. "ह्याला इथं असा एकट्यालाच टाकून आपण फक्त आपला विचार करायचा? हा तर स्वार्थीपणाच होईल." 
नेमकं त्याच क्षणी स्वामीनं मागं वळुन पाहिलं, तशी ती दचकली. ह्याला अजुनही आपल्या मनात काय चाललंय ते समजतंय की काय? पण स्वामी मात्र सहजच वळून पाहत होता. कदाचित आर्यनसोबत  योगिनीसुद्धा झोपी गेली की काय हे तपासून पाहत होता.  
त्याच्या चेहऱ्यावरून फारसा काही बोध न झाल्यानं योगिनी कसनुसं हसली. "मी पटकन बाजारात जाऊन येऊ! तुझ्या आवडीचं काही खायला घेऊन येते!" ती म्हणाली. "आर्यनला माझ्यासोबत नको सोडूस एकटा!" स्वामी अगदी गंभीर चेहऱ्यानं म्हणाला. योगिनीला अशाश्वत भवितव्याच्या वास्तवाची जाणीव झाली. "ठीक आहे, साडेअकरा झाल्यात! तुझ्या आवडीचा पिझ्झाच मागवूया इथं!" परिस्थिती सावरुन घेत योगिनी म्हणाली. 
स्वामीला त्याच्या आवडीच्या पिझ्झाचा अगदी मनसोक्त आस्वाद घेत असताना पाहून योगिनीचे डोळे आपसुक भरुन आले. सारं काही मिळाल्यासारखं वाटत होतं पण ते सर्व काही क्षणभंगुर असल्याची जाणीव मनाला एखाद्या तप्त अग्नीच्या चटक्याप्रमाणं जाळत होती. अचानक तिच्या मनात एक प्रश्न आला. पण हा प्रश्न स्वामीला विचारणं कितपत प्रशस्त राहील ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. पण पिझ्झा खाऊन अगदी तृप्त झालेल्या स्वामीची नजर तिच्या काहीशा संभ्रमावस्थेतील चेहऱ्याकडे गेली आणि त्यानं तिला विचारलंच, "काय झालं योगिनी?" 
"नाही म्हणजे... '" योगिनीचा प्रश्न तिच्या ओठातच रेंगाळत होता. 
"योगिनी - जे काही मनात असेल ते विचारुन घे! आपल्यापाशी बोलण्यासाठी किती वेळ आहे हे आपल्याला माहित नाही!"
"समजा तुला जावं लागलं आणि आधीचा स्वामी ह्या देहात प्रकट झाला; तर त्याला मधल्या काळात काय झालं ते सारं आठवेल का?"
कधी नव्हे तो स्वामी गोंधळलेला वाटला योगिनीला! 
"हं .. मी तुला ह्याविषयी खात्रीलायकरित्या सांगु शकत नाही! त्याचं काही दिवस तू निरीक्षण करीत राहा आणि मग अंदाज घे! बहुदा त्याला अशा सर्व काही घटना आठवतील ज्या ह्या शरीरात कोणीतरी वेगळा राहून गेलाय हे त्याला समजायच्या दृष्टीनं निरुपद्रवी असतील!" स्वामीने आपलं मत नोंदविलं. 
आपल्याला कितीतरी अनिश्चिततेचा सामना करावा लागणार आहे ह्याचा मनात आडाखा बांधण्याचा प्रयत्न करणारी योगिनीचा ह्या सर्व थकव्याने कधी डोळा लागला हे तिला समजलं सुद्धा नाही. 

आर्यनच्या रडण्याच्या आवाजानं योगिनीला जाग आली. तेव्हा आपल्याला किती वेळ झोप लागली होती हे तिला समजेना. सोफ्यावर झोपलेल्या स्वामीला पाहून तिला काहीसं आश्चर्य वाटलं. हा असा दुपारच्या वेळी कसा काय झोपला बरं? तिच्या मनात शंका आली. आर्यनला शांत करेस्तोवर स्वामी सुद्धा जागा झाला होता. एखादं भयंकर स्वप्न पाहून भयभीत झालेल्या माणसाप्रमाणं त्याच्या चेहऱ्यावर भाव होते. 

"ह्याला चांगला चहा करून दिला म्हणजे ह्याची झोप उडेल" योगिनीने मनातल्या मनात विचार केला. ती उठून स्वयंपाकघराकडे जाऊ लागली तितक्यात "एक कप मस्तपैकी कॉफी बनव गं, लाडके !" ह्या स्वामीच्या वाक्यानं तिच्या मनात एक तीव्र संवेदनेची लहर उमटून गेली. हा नक्कीच पूर्वीचा स्वामी परतला होता.  
घरात कॉफी नव्हतीच. मनाचा मोठा हिय्या करून ती बाहेर आली. "कॉफी नाहीये , चहा केला तर चालेल का? " तिनं स्वामीकडं पाहत कसंबसं विचारलं. 
"का कॉफी संपली कशी? " काहीशा रागीट मुद्रेनं स्वामी म्हणाला. 
"आतापुरता चहा ठीक आहे, पण आजच्या आज कॉफी घेऊन ये!" इतकं म्हणून स्वामीने टीव्हीवर क्रिकेट सामना सुरु केला. 
गॅसवर चहाचं आधण ठेवताना योगिनीच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. ज्याच्या आठवणीत तिनं इतकी वर्षे काढली त्याचं हे नवरेपणातील रूप तिला अगदी धक्कादायक होतं. आणि तिला परग्रहवासियांबरोबरचा लढा देखील लढायचा होता तो पण एकटीनं!

(क्रमशः)

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

Ventilator



एकत्र कुटुंबातील नात्यांचे एक सुंदर चित्रीकरण! ह्या चित्रपटात मला जाणवलेल्या, भावलेल्या काही मानवी स्वभावाच्या छटा!


  1. एकत्र कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पाहिला गेलं तर लग्न, जन्म मृत्यू, आजारपण ह्या नियमीत घडणाऱ्या गोष्टी! ज्या वेळी त्या ह्या कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडतात त्यावेळी त्यांच्याकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन बराच वेगळा असतो आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात त्यावेळी आपण अगदी वेगळ्या भावनांचा अनुभव घेतो. त्यावेळी बाकीच्या लोकांच्या वागण्यामुळं कदाचित आपल्याला विरक्तपणा येऊ शकतो. पण जीवनरहाट चालू ठेवण्याचं जो अविरत दबाब आज आपण सर्वजण अनुभवत आहोत त्यामुळं त्या बाकीच्या सर्वांचं वागणं आपण समजून घ्यायला हवं.
  2. एकत्र कुटुंबात ज्यांचं मत मोलाचं मानलं जातं अशा मोजक्या व्यक्ती असतात. जसजसा काळ पुढं सरकत जातो तसतसं नवीन व्यक्ती पुढं येतात आणि सूत्र आपल्या हाती घेतात. अशा वेळी  वयोमानापरत्वे ज्या व्यक्तीच्या हातून सूत्र  निघून गेलेली असतात त्यानं ते वेळीच ओळखायला हवं. नाहीतर चित्रपटातील भाऊ (आशुतोष गोवारीकर ह्याचे वडील) ह्यांना काही प्रसंगात ज्या चेष्टेला तोंड द्यावं लागलं तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 
  3.  जारी नातेवाईकाला पाहायला जायचा प्रसंग - प्रसंग सुखाचा असो व दुःखाचा! त्याला एक सोहळा बनविण्याची जी वृत्ती अशा एकत्र कुटुंबात दिसून येते त्याचं एक हलकंफुलकं चित्रण गजाभाऊ (गजानन कामेरकर) ह्यांच्या आजारपणाच्या निमित्तानं दिसतं. 
  4. एकत्र कुटुंबातील एक सर्वांपेक्षा यशस्वी पुरुष! त्याला बाकीच्या सदस्यांकडून मिळणारी खास वागणूक! आणि त्यानेसुद्धा सर्वांना समजुन घेण्याचा खास प्रयत्न! आशुतोष गोवारीकरचा अभिनय अगदी लीलया आणि यशस्वी माणसाचं वागणं दाखवणारा! 
  5. मुलगा आणि वडील ह्यांच्या नात्यांचं एक खोलवर विश्लेषण! आपल्या भारतीय कुटुंबात बऱ्याच वेळा पिता - कन्या आणि माता -पुत्र ह्यांचं बऱ्यापैकी चांगलं जमतं. पण पिता आणि पुत्र ह्यांच्या उदाहरणात बऱ्याच वेळा संवादांची कमतरता जाणवते. आणि ह्या संवादांच्या अभावाने बऱ्याच वेळा गैरसमज निर्माण होतात आणि आयुष्यभर टिकुन राहतात. ह्या नात्यातील दोन क्षण महत्वाचे असतात.  
  6. अ) ज्या क्षणी मुलगा आपलं शिक्षण संपवून स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करीत असतो त्यावेळी पित्यानं त्याला कोणत्या प्रकारे वागणुक देतो  ह्यावर ह्या नात्याचं सुदृढपण अवलंबून असतं. 
  7. ब ) ज्या क्षणी पिता आपला सक्रियपणा गमावून बसतो आणि आधारासाठी पुत्रावर अवलंबू पाहतो त्यावेळी पुत्र कोणत्या प्रकारे वागतो हे ह्या नात्याचा पुढील प्रवास ठरवतं. 
  8. ह्या चित्रपटात एक गोष्ट खास प्रकर्षानं जाणवते. माणसं त्यांना खंत लावून गेलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि त्याचा बदला घेण्याची संधी आयुष्यभर शोधत राहतात. मग हा बदला कधी बोलण्यातून तर कधी कृतीतून घेतला जातो.    
  9. चाळिशीतील पुरुष - आशुतोष आणि त्याच्या सोबत असणारा त्याचा भाऊ! दोघेही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि एकत्र कुटुंबातील आपल्या जबाबदाऱ्या मुख्यत्वेकरुन महत्वाचे निर्णय घेण्याचे पार पाडणारे! ह्या दोघांनी ह्या व्यक्तिरेखा अगदी सुरेख रंगविल्या! 
  10. ऐशीतील पुरुष - गात्रं थकलेली! आणि आपलं एकंदरीत महत्वाचं स्थान गमावलं गेल्याची खंत मनात बाळगणारा! आशुतोषच्या वडिलांची भूमिका निभावणाऱ्या जेष्ठ अभिनेत्यांनी ही व्यक्तिरेखा अगदी उत्तमरित्या निभावली आहे! 
  11. लग्न झालेली बहीण - आपल्या वडिलांच्या आठवणी, त्यांचं उमेदीच्या काळातील कर्तृत्व कायम मनात जतन करुन ठेवणाऱ्या  बहिणीची भुमिका सुकन्या कुलकर्णी मोने ह्यांनी  अगदी उत्तमरीत्या वठविली आहे.  
  12. अवयवदान - हा खरंतर सामाजिक जाणीव दर्शविण्याचा उत्तम मार्ग! पण जी व्यक्ती ह्या भावनिक कठीण प्रसंगातुन जात आहे तिचीभावुकता लक्षात घेणं सुद्धा कसं महत्वाचं आहे ह्याचा उत्तम संदेश इथं मिळतो.  
  13. अशा कुटुंबातील छोट्या छोट्या गोष्टींवरून बरीच वर्षे टिकणारी भांडणं / वाद - विवाद! कदाचित ह्या गोष्टी बाहेरच्या जगात वावरणाऱ्या लोकांना क्षुल्लक वाटत असतील पण केवळ त्या विश्वात वावरणाऱ्या लोकांसाठी मात्र त्या गोष्टींतील जय - विजय हे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. 
  14. पैशाचा प्रश्न - अशा प्रसंगी ज्याच्यावर हा दुर्धर प्रसंग ओढवला त्याची आर्थिक बाजू सांभाळणं'सुद्धा किती महत्वाचं आहे हा संदेशसुद्धा हा चित्रपट हळूच देतो. 
 जितेंद्र जोशींचा, आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी आणि अन्य मात्तबर अभिनेत्यांचा अभिनय सुरेख! Toilet ह्या मुलभूत हक्कासाठी भांडणाऱ्या अभिनेत्रीचा अभिनय धमालच! एकंदरीत एक सुरेख चित्रपट! मस्ट सी! आणि हो हॉलिवूडवासी प्रियांका चोप्रा हिचे एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याबद्दल अभिनंदन !

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

एका नोटेचे महाभारत !



सध्या खरंतर आत्येबहिणीने (प्राची) दिलेल्या एका मुंगीचे महाभारत ह्या पुस्तकाचं वाचन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकसत्तेतील ह्या पुस्तकाचं आणि एक झाड दोन पक्षी ह्या पुस्तकाचं परीक्षण वाचुन मीच तिच्याकडे ह्या पुस्तकाची मागणी केली. पण अशी पुस्तकं वाचताना मनातील बाकी सर्व विचार बाजूला ठेवून त्या पुस्तकात पुर्णपणे समरस व्हायला अजुनही जमत नाही. 

असो एका मुंगीचे महाभारत ह्या शीर्षकावरून आजच्या ह्या पोस्टचं शीर्षक! ह्या आठवड्याच्या आरंभीस पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातुन रद्द करण्यात आल्या. ह्या घोषणेचा विविध लोकांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम झाला आणि त्याचे पडसाद अजुनही सुरु आहेत आणि अजून काही काळ सुरु राहतील. 

ह्या घटनेकडे आपण काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. गेल्या १० - २० वर्षात समाजातील यशस्वी लोकांचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. यश हे लोकांनी अर्जित केलेल्या पैशाच्या प्रमाणात मोजलं जाऊ लागलं आहे. ह्या यशाच्या दर्शनी स्वरूपाला आपण भुलून जाऊन एकंदरीत परिस्थितीचं वास्तववादी परीक्षण करु इच्छित नाही. आपल्या मनाच्या कोण्या एका कोपऱ्यात आपलं हे यश आणि एकंदरीत परिस्थिती यांचं एक विस्तृत चित्र दडून असत पण आपण हा क्षण, हा काळ जी सुखद भावना देत आहे ती इतक्या तात्काळ विसरण्याची तयारी दर्शवित नसल्यानं ह्या बाकीच्या प्रतिकुल घटकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. 

केवळ चलनी नोटांच्या मार्फत बहुतांशी व्यवसाय करणारे लोक बराचसा कर चुकवितात आणि हा घटक त्यांच्या यशाचा पाया बनतो. बाह्य देशातील अर्थव्यवस्थेला पूरक अशी काम भारतातुन करणारे व्यावसायिक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या बाळगून आहेत. ही झाली काही उदाहरणं! आणि अशा लोकांकडे आलेल्या पैशाच्या सुजेमुळे चित्रपट, मॉल, पर्यटन हे व्यवसाय भरभराटीला आले आहेत. 

५००, १००० रुपयांच्या नोटा रद्दबातल झाल्यानं पहिल्या प्रकारातील व्यावसायिक अडचणीत येऊ शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालामुळं  अजून काही व्यावसायिक अडचणीत येऊ शकतात. आणि अशा वर्गाची खर्च करण्याची शक्ती वा इच्छा जर मर्यादित झाली तर ह्या वर्गाच्या spending power वर अवलंबून असणारे अनेक उद्योग धोक्यात येऊ शकतात. 

सारांश - आपल्या समाजाची दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता वा इच्छाशक्ती फार कमी झाली आहे. शाश्वत उद्योगधंदे म्हणजे शेती आणि पारंपरिक अभियांत्रिकी (Civil, Electrical, Mechanical)! ह्यात स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये मोठाली धरणे, कारखाने हे अभिप्रेत आहे. अशा शाश्वत उद्योगांचा सखोल अभ्यास करुन देशाची, जगाची येत्या काही वर्षातील गरज लक्षात घ्यायला हवी आणि त्यानुसार पावलं उचलायला हवी!
नाहीतर आपण पाचशेच्या नोटा संपविण्यासाठी पेट्रोलपंपावर गर्दी करत बसु आणि बँकात रांगा लावत बसू! आणि येणाऱ्या काळातील अधिक गंभीर संकटे आपल्या ह्या वृत्तीला हसत आपली मोर्चाबांधणी करत बसतील!

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

आतले आणि बाहेरचे

आपल्या कळत नकळत आपली स्वभाववैशिष्टये आपल्या वर्तवणुकीचा कब्जा घेत असतात. जन्मतः आपण एक विशिष्ट स्वभाव, सवयी घेऊन आलेलो असतो. आणि जो मनुष्यगट ह्या स्वभावाशी, सवयीशी साधर्म्य दर्शवितो त्या मनुष्यगटाकडे आपण नैसर्गिकपणे ओढले जातो, त्याच्याशी आपण affinity दर्शवितो. 

आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर आपण नैसर्गिकरित्या ज्या गटाचे सदस्य नसतो त्या गटाकडे आपण आकर्षित होऊ शकतो. ह्यात व्यावसायिकरित्या पुढे जाण्याची ओढ, काही विशिष्ट वयानंतरसुद्धा तरूणपणा सिद्ध करण्यासाठी तरुणाईच्या गटाकडे पडणारी पावलं अशा काही उदाहरणाचा समावेश होतो. अशा उदाहरणात जिथं आपण त्या गटाचे नैसर्गिकरित्या सदस्य नसतो त्या उदाहरणात "आतले" बनुन राहण्यासाठी आपल्याला थोड्याफार अथवा जास्त प्रमाणात मेहनत करावी लागते.   

थोडं वेगळं उदाहरण! एखाद्या नटून थटून भरलेल्या लग्नाच्या मांडवात अथवा एखाद्या conference मध्ये  आपण ज्या क्षणी प्रवेश करतो त्यावेळी आपण हा बाह्यपणा पुरेपूर अनुभवत असतो. आपली वेशभूषा, अशा माणसाने भरलेल्या जागेतलं आपलं सुरुवातीचं वावरणं हे सर्व काही लवकरात लवकर "आतलं" बनण्यासाठीची आपली धडपड ह्या प्रकारात मोडतं.  ह्यात लवकरात लवकर हा भाग फार महत्वाचा! लवकरात लवकर आपल्याला स्वीकारलं जावं ह्यासाठी आपण वेषभूषेवर अवास्तव खर्च करतो. सुरुवातीची काही मिनिटं आपलं वागणं जणूकाही आपल्यावर हजारो कॅमेरे रोखले गेले आहेत ह्या प्रकारातील असतं. 

मुद्दा असा आहे की जर आपण "बाहेरचा" ह्या प्रकारात राहुन दाखविण्याची तयारी, मानसिक कणखरता काही काळ दर्शविली तर आयुष्य बरंच सोपं होऊ शकतं. ह्यातही दोन प्रकार येतात - 
पहिला म्हणजे काही काळ "बाहेरचा" बनुन राहणं 
दुसरा म्हणजे कायमस्वरूपी "बाहेरचा" बनुन राहणं. 

पोस्टचा उद्देश इतकाच - आपली अशी काही धडपड चालू असेल तर ती नक्की कशासाठी ह्याचं उत्तर किमान स्वतःला माहित करुन घ्या! 

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...