मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
जीवनज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवनज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

 


दोन पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर होत राहतं. आयुष्य हा मोठा कालावधी आहे. त्यामुळं ज्या कालावधीत आपल्या ह्या नात्यात थोडाफार तणाव निर्माण होतो त्यावेळी काही काळ शांत राहणं योग्य असं माझं मत! काही वर्षात संदर्भ बदलतात, आपण दुसऱ्या भुमिकेत प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या भूतकाळातील भुमिकेमागील विचारसरणी अधिक स्पष्टपणे समजू शकते. त्यामुळं कधीही कोणाविषयी टोकाचे गैरसमज करून घेऊ नयेत. प्रत्येकजण आपल्या भूमिकेत थोड्या प्रमाणात का होईना बरोबर असतो, प्रत्येकाच्या वागण्याबोलण्यामागे काही तरी कारण असतं.

आम्ही वाढलो तो काळ वेगळा होता. भारतानं मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं नव्हतं. माझ्या पहिली नोकरीत (जी मी पहिल्या आठवड्यातील गुरुवारी सोडली) मला मोजका पगार मिळणार होता. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित नोकऱ्या भारतात अत्यल्प प्रमाणात असल्यानं पारंपरिक नोकऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. पारंपरिक नोकऱ्यांचे प्रमाण अगदी कमी होतं. त्यावेळी असलेल्या कमी पगारांमुळं स्वतःच घर घेण्याचा विचार जर केलाच तर तो वयाच्या चाळीस - पंचेचाळीशीनंतर करावा अशी मनोधारणा होती.

घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असली तरीही पैसे जपून वापरावेत ही मानसिकता होती. हॉस्टेलला जाताना आठवड्याभरासाठी शंभर रुपये घेऊन जात असू, आणि ते ही पुरेसे होत. वसई स्टेशन ते रमेदी हे तिकीट बहुदा एक रुपया होते. ह्या बससाठी आम्ही अर्धा अर्धा तास स्टेशनवर वाट पाहत असू.

हे सर्व सांगण्याचा हेतू हा केवळ त्याकाळची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सांगणं इतकाच आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही बऱ्यापैकी आनंदी होतो. 'दिल ही छोटा, छोटी सी आशा !' असला प्रकार होता. मी फारसा महत्वाकांक्षी नव्हतो. आयुष्यावर नियंत्रण मिळवावं असं वाटावं इतका आत्मविश्वास बहुदा नव्हता. अशी पार्श्वभूमी सोबतीला घेऊन आम्ही व्यावसायिक जीवनात आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात प्रवेश करणार होतो. केवळ प्रामाणिक मनोभावनेने व्यावसायिक, वैवाहिक जीवनात प्रयत्न करत जीवन व्यतित करावं ही मानसिकता होती आणि जी आमची एक मोठी जमेची बाजू होती.

त्यानंतर आयुष्य जसं उलगडत गेलं तसं आम्ही त्याला स्वीकारलं. आयुष्यातील सुरुवातीच्या काळात मिळालेल्या शिकवणुकीमुळं भविष्यात जर बिकट परिस्थिती उद्भवली तर आपल्याजवळ अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकी तरी बचत असावी हा विचार आम्ही कायम आयुष्यभर बाळगला. २००४ साली अमेरिकेत असताना निर्वासित लोकांच्या निवाराघरात जाऊन मी स्वयंपाक केला होता. वीस - पंचवीस कोबी कापले होते. त्यावेळी तिथल्या संचालिकेने सांगितलेले बोल माझ्या सदैव लक्षात राहिले आहेत. ती म्हणाली, "ही लोक ह्या निर्वासितांच्या छावणीत राहत आहेत म्हणून ह्यांच्याकडे तुच्छतेनं पाहू नका. अमेरिकेतील कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाचे ओळीनं तीन - चार निर्णय चुकीचे ठरले तर त्याच्यावर ही पाळी येऊ शकते." हे वाक्य जरा जास्तच प्रमाणात माझ्या डोक्यात भरून राहिलं आहे.

हल्लीच्या काळात विवाह का करावा हा मोठा गहन प्रश्न बनला आहे. माणसं जसजशी आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक स्वावलंबी होत चालली तसतसं हे घडणं क्रमप्राप्तच होतं. विवाहानंतर जीवन परिपूर्ण होतं असं आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? नक्कीच नाही. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो, कोणतंही जोडपं आदर्शवत नसते. माणसाला आयुष्यभर आपल्या सर्व त्रुटींसह स्विकारणारं, आपली सर्व भयं ज्याला अगदी मोकळेपणानं सांगू शकतो, ज्याला हक्काने आपल्या महत्त्वाच्या क्षणी हाक मारु शकतो असं कोणीतरी हवं असतं. लहानपणी ही भूमिका बजावणारे आईवडील, भावंडं आयुष्यभर आपल्याला पुरे पडू शकत नाहीत. आपला साथीदारच आपल्याला अशी साथ देऊ शकतो किंबहुना त्यानं/ तिनं अशी साथ द्यावी अशी अपेक्षा असते. बहुतेक सर्वांसाठी एकटेपणा हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकण्याची शक्यता असते. मराठीत म्हण आहे - 'रिकामी मन सैतानाचे घर' ! माणूस एकटा राहिला की मनात नको नको ते विचार येतात, खाण्यापिण्याच्या वेळांवर, आहारावर नियंत्रण राहत नाही. माणसाला फारसा मोकळा वेळ मिळू न देणं हा विवाहसंस्थेचा एक छुपा फायदा आहे.

आता चर्चेचा ओघ "योग्य साथीदाराची निवड कशी करावी ?" ह्या मुद्दयाकडे नेऊयात. आयुष्यभर आनंदानं विवाहबद्ध राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आयुष्यभराच्या कालावधीत पती पत्नी दोघांच्या स्वभावात बरेच बदल घडत असतात. लग्नाआधी समोरच्या माणसाची जी ओळख आपल्याला असते ती बहुदा हिमनगाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या भागाइतकी असते. माणसाचं खरं रूप त्याच्यासोबत चोवीस तास राहायला सुरुवात केल्यानंतर समजायला लागतं. पण ह्यात एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आपल्याला आपणच किती कळलो आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे. लग्नाआधीचं स्वातंत्र्य काही / बऱ्याच प्रमाणात लोप पावतं. पण ही काही नकारात्मक गोष्ट नाही. लग्नानंतर आपल्याला आपली ओळख पटली आणि साथीदाराच्या वागण्याची कल्पना आली की आपण आपल्यात योग्य असे बदल घडवून आणून ह्या नात्यात गोडवा आणू शकतो. Every relationship needs a owner. हे स्वामित्व स्त्री किंवा पुरुष ह्यापैकी कोणीही घेऊ शकतं. ह्या स्वामित्वात मला नक्की काय अभिप्रेत आहे? सुरुवातीच्या काळात काही वेळा शाब्दिक अपमान सहन करावा लागणं, घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी घेणं, वाद झाल्यावर इगो बाजूला ठेऊन काही वेळानं पुन्हा संवाद सुरु करण्यात पुढाकार घेणं अशा काही गोष्टींचा समावेश होतो. आपल्या साथीदाराला नक्की काय आवडतं, कोणती गोष्ट अजिबात खपत नाही ह्याची अभ्यासपूर्ण माहिती करून घेणं हे महत्वाचं असतं.

हे मुद्दे लक्षात घेता आपला साथीदार व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणे ही सुखी वैवाहिक जीवनातील एकमेव महत्वाची गोष्ट नाही हे आपल्या ध्यानात येईल. हल्ली स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक स्त्रीने आपल्यापेक्षा वरचढ असा साथीदार मिळावा अशी अपेक्षा बाळगणं योग्य ठरणार नाही. लौकिकार्थाने कमी यशस्वी नवऱ्याकडे एक चांगला माणूस म्हणून पाहणं हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या पार्श्वभूमीवरून (background) त्याविषयी पूर्वग्रह बनवू नये. 

साथीदाराने आपल्या महत्वाच्या क्षणी आपल्यासाठी उपलब्ध असणं ही प्रत्येक विवाहित व्यक्तीची महत्वाची गरज असते. आणि हे उपलब्ध असणं हे केवळ त्या जागी असण्यानं नव्हे तर मनानं तिथं पूर्णपणे असण्यानं असावं. साथीदाराविषयी असणारी Empathy हा वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणारा सर्वात मोठा घटक आहे. ही Empathy आपल्या वागण्यातून, आपल्या संवादशैलीतून प्रतित व्हायला हवी. हे सर्व मुद्दे काहीसे विस्कळीत स्वरूपात मांडले आहेत पण ह्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यावसायिक यश हा एकमेव मुद्दा आपल्या साथीदाराची निवड करताना डोळ्यासमोर नसावा.

ह्यापुढील  विचार अस्ताव्यस्त असणार आहेत. त्यामुळं संयम बाळगावा ही विनंती.

१. अमेरिकेत २००७ सालापर्यंतच्या वास्तव्यात माझ्या संपर्कात आलेल्या काही अमेरिकन सहकाऱ्यांच्या बाबतीत एक समान धागा दिसून आला होता. ह्या सर्वांच्या पहिल्या लग्नाची परिणिती घटस्फोटात झाली होती. पण त्यामुळं हताश न होता त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यात मात्र हे पठ्ठे गुण्यागोविंदानं नांदत होते. माझा त्यावेळचा माईक त्या कालावधीत माझ्याशी बऱ्यापैकी मोकळेपणानं बोलायचा. त्यानंच एकदा सहजपणं सूचित केलं की पहिल्या लग्नबंधनात प्रवेश करताना ही माणसं बहुदा अवास्तव अपेक्षा बाळगत असावीत. पण दुसऱ्या लग्नात मात्र त्यांचे पाय जमिनीवर आलेले असतात, सहचारिणीशी जुळवून घेण्यासाठी जे काही बदल घडवून आणावे लागतात त्यांची मानसिक तयारी त्यांनी केलेली असते. काहीसा मनोरंजक मुद्दा!

२. अमेरिकेत असताना अजून एक गोष्ट वारंवार जाणवायची. सार्वजनिक आयुष्यात बरेच नियम सामोरे यायचे आणि सर्वजण त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करायचे. त्यामुळं आयुष्य अगदी सुरुळीतपणे पार पडायचं. रस्त्यावरील सिग्नलचे पालन,मार्गिकांना उगाचच छेद न देणारे चालक, मोठाल्या दुकानात वर्षोनुवर्षे मिळणाऱ्या ताज्या भाज्या, मासे, केक ह्यामुळं मेंदूवर ताण असा पडायचा नाही. आपल्या देशात कसा मेंदू अगदी सतर्क अवस्थेत राहतो. कार चालवताना उजव्या, डाव्या बाजूने अचानक अवतीर्ण होणारे बाईक / रिक्षावाले, वाटलं म्हणून समोरून आत्मविश्वासानं रस्ता पार करणारा पादचारी ह्यामुळं मेंदू जागृत असतो. ह्या उदाहरणातून घेण्याचा मुद्दा हा की आपल्या मेंदूला एकदा की सुस्पष्ट पर्याय उपलब्ध असलेले आयुष्य जगायची सवय झाली की थोडी जरी क्लिष्ट परिस्थिती आली की तो बिचारा गोंधळून जातो.

३. वरील उदाहरणाचा दाखला घेऊन एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धतीत वाढलेल्या मुलांचा विचार करूयात. एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलांना आयुष्यात चूक किंवा बरोबर, आनंद किंवा वाईट ह्यामधील ज्या असंख्य छटा आयुष्य आपल्यासमोर सादर करू शकतं त्या दैनंदिन जीवनात अगदी सहजासहजी पाहायला मिळायच्या. त्यामुळं लग्नाला (आयुष्यातील अशी एक घटना जी आपल्यासमोर चूक किंवा बरोबर ह्यामधील अगणित शक्यता सादर करू शकतं) सामोरं जाताना ही मुलं अजाणतेपणी त्यासाठी सज्ज झालेली असायची. "दैनंदिन आयुष्यात तू चुकलास" असं कोणी सांगितलं तर मोठा प्रलय आला अशी परिस्थिती उद्भवत नाही ही शिकवणूक एकत्र कुटुंबपद्धतीनं दिल्यानं नवरे मंडळींना सतत त्यांच्या चुका दाखविल्या गेल्या तरीही आपण आयुष्यात काही बरोबर करूच शकत नाही असा न्यूनगंड वगैरे निर्माण होत नसे.

४. वरील उदाहरणाचे दूरगामी परिणाम झाले. स्त्रियांना एकत्र कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य अनुभवायला न मिळाल्यानं त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. हळूहळू त्याचं परिवर्तन प्रत्यक्ष आचरणात यायला लागलं. काहींनी ही स्वातंत्र्याची कास स्वतः धरली तर काहींनी हे बीज आपल्या पोटात वाढणाऱ्या पुढच्या पिढीकडं सुपूर्द केलं. पुढील पिढीला अनुकूल वातावरण मिळाल्यानं त्यांनी आपल्या आचारविचारांतून ह्या स्वातंत्र्याला कवटाळलं. हे स्वातंत्र्य मिळालं, ज्याची आस धरली ते मिळाल्याचा déjà vu क्षण आला. पण पुढं काय? आयुष्य खूप दीर्घकालीन असतं. विविध टप्प्यावर ते आपल्याला एकच प्रश्न वारंवार विचारत राहतं. गतआयुष्यातील आपल्या निर्णयांचं परीक्षण करायला भाग पाडत राहतं. नव्या पिढीनं हा मुद्दा ध्यानात घ्यायला हवा.

५. Giving it back to Society - समाजऋणाची परतफेड - मनुष्यजातीच्या आरंभीस बलवान टोळ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर बुद्धिमान माणसांनी आपल्या बुद्धीद्वारे हळूहळू समाजव्यवस्थेचा ताबा घेतला. पुढं हे चालू ठेवायचं असेल तर सुशिक्षित स्त्री - पुरुषांनी आपला वंश पुढे वाढवायला हवा. ह्या मुद्द्यामुळं मला बुरसटलेल्या विचारसरणीचा संबोधिण्यात येण्याची शक्यता ध्यानात घेऊन सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित करत आहे.

६. सद्यपिढीने दाखविलेला संवादकलेचा प्रचंड अभाव - सद्य पिढीनं विवाहसंस्थेविषयी बहुतांश नकारात्मक संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवले. चाळीस - पन्नास वर्षे संसार केलेली जोडपी सुद्धा जेव्हा सर्वांसमोर एकमेकांचा अपमान करतात, पूर्ण आयुष्याचा फक्त आणि फक्त नकारात्मक हिशोब मांडतात, तेव्हा ही विवाहसंस्था फक्त दिखाऊ / दांभिक आहे का असा विचार नवीन पिढीच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. विवाहसंस्थेच्या बाबतीत व्यक्त केल्या जाणाऱ्या नकारात्मक संदेशाच्या तुलनेत अगदी खरेखुरे वाटणारे सकारात्मक संदेश तुलनेनं खूपच कमी आढळतात.

७. तिरंगी सामना - हा केवळ माझा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांत मांडल्यामुळं मी वेडा आहे अशा निष्कर्षापर्यंत तुम्ही कृपया येऊ नकात. सर्वशक्तिमानानं विश्वाची निर्मिती केली. मनुष्यानं हळूहळू आपल्या बुद्धीचे प्रताप दाखविण्यास सुरुवात केली. भूमातेवरील सर्वोत्तम बुद्धिमान माणसांनी जर आपल्या प्रज्ञेचा पुरेपूर वापर केला तर कधीतरी ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या वर्चस्वाला आव्हान देऊन कदाचित आपल्याला विस्थापित करतील असं भय हल्ली सर्वशक्तिमानाला वाटू लागलं असावं. त्यामुळं मनुष्यांना विचलित करण्यासाठी त्यानं संगणकांच्या माध्यमातून AI / ML चा किडा आपल्या डोक्यात घुसवला आहे. AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक भविष्यात सर्वशक्तिमान आपल्या बाजूनं ओढून घेईल आणि मग सुरु होईल तो सर्वशक्तिमान आणि AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक एका बाजूला आणि बुद्धिमान माणसं दुसऱ्या बाजूला असा लढा ! आता ह्या सर्वात विवाहसंस्थेचा संबंध काय हे अजून तुम्हांला कळलं नसेल तर सांगू इच्छितो की बुद्धिमान मनुष्यांच्या मनात "पुढील पिढी निर्माण करण्याचं प्रयोजनच काय?" असल्या नसत्या शंका निर्माण करण्याचं काम सर्वशक्तिमान करत आहे. नवीन पिढीनं हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

लेखाची सुरुवात कुठं झाली आणि शेवट कुठं झाला !! असो मी आणि लेख जरी भरकटला असला तरी ह्यातील महत्वाचे मुद्दे ध्यानात घ्यावेत ही विनंती ! आणि मुद्दा ७ हा खासच आहे, त्यावर नक्की विचार करा!!


रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

वैचारिक सुस्पष्टता


आपलं स्वतःच असं एक जग असतं.  या जगात आपण, आपला मेंदू, आपलं मन, आपलं  वैयक्तिक / व्यावसायिक जीवन सारं सारं  काही असतं.  जीवनात आपण काही गोष्टी मनापासून करत असतो तर बरंच काही एक व्यक्ती म्हणून आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडण्यासाठी करत असतो. जस जसं आपलं वय वाढत जातं तसं जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत जातं.  

जबाबदाऱ्या तर सर्वांनाच असतात पण त्याचं ओझं बनवायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. जबाबदारीचं ओझं बनणं हा एक प्रवास असतो. ह्या प्रवासाची  प्रामुख्याने दोन कारणे असतात.  पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या पार पडण्याची मनापासून इच्छा उरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पार पडण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक किंवा मानसिक ताकद आपण आपल्यापाशी नसते. जबाबदाऱ्यांनी त्रासलेली माणसं सदैव आपल्या भोवती दिसत असतात किंवा आपणच जबाबदाऱ्यांनी त्रासलेलो आहोत  हे आपल्याला जाणवत असतं. 

जर आपल्याकडे विचारांची सुस्पष्टता असेल तर जबाबदाऱ्यांचं ओझं बनवायचं आपण टाळू शकतो.  यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.  

१) पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासमोर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व एका कागदावर लिहून काढाव्यात.  यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांची यादी वेगवेगळी असावी.  

२) वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये आपला वेळ कसा विभागावा याची सुस्पष्टता सुरुवातीलाच आपल्याकडं असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ  वैयक्तिक जबाबदाऱ्यांना ६० टक्के वेळ आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांना ४० टक्के वेळ! ह्यात छंदाला वेगळा वेळ द्यायचा की नाही हा सुद्धा महत्वाचा निर्णय तुम्हांला घ्यायचा असतो. हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे, आयुष्यात आपल्याला नक्की महत्वाचं काय आहे ह्याचा निर्णय तुम्हांला घेता आला पाहिजे आणि आपण असा निर्णय का घेत आहोत हे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या  व्यक्तींना स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. 

३) त्यानंतर यातील दोन्ही यादीतील सर्व जबाबदाऱ्यांना प्राधान्यक्रमाच्या उतरत्या मांडणीने लिहून काढाव्यात.   म्हणजे सर्वात महत्त्वाची जबाबदारी आधी आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या उतरत्या क्रमाने! 

४)  हे सर्व लिहून झाले की मग या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती साधनं, तंत्रं  आणि मार्ग उपलब्ध आहेत याचीही यादी बनवावी.  एखादी जबाबदारी पार पडण्यासाठी जर आपल्याकडे विविध पर्याय  उपलब्ध असतील तर त्यातील नक्की कोणत्या तंत्राचा वापर करावा याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे.  

५)  बऱ्याच वेळा हा निर्णय न घेता आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये उगाचच क्लिष्टता निर्माण होते.  योग्य वेळी निर्णय न घेता येणे आणि परिपूर्णतेचा अट्टाहास धरणे या दोन कारणांमुळे  आपल्या जबाबदाऱ्या बराच काळ आपल्या यादीवर तशाच कायम राहतात.  "Problems don't age well" असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं.  म्हणजेच आपण एखादी समस्या जर बराच काळ तशीच भिजत ठेवली तर ती गहन स्वरूप धारण करते. त्यामुळे एखादी जबाबदारी पार पडताना त्यामध्ये एक विशिष्ट प्रमाणात अचूकता असल्याची  आपल्याला खात्री  झाली की तो निर्णय घेऊन मोकळ व्हावं. 

६) प्रत्येक माणसाच्या कुवतीनुसार तो आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपैकी काही विशिष्ट जबाबदाऱ्याच पार पडू शकतो. मुद्दा ३ मध्ये उल्लेख केलेला प्राधान्यक्रम काळानुसार बदलत जातो.  त्यामुळे ज्या जबाबदाऱ्यांवर आपण लक्ष केंद्रित करत आहोत त्या जबाबदाऱ्या त्या क्षणी आपल्या प्राधान्यक्रमाच्या नक्की कोणत्या स्थानावर आहेत आणि पार पडताना आपण बाकीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना हा या गोष्टीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  बऱ्याच वेळा प्राधान्य कामातील खालच्या क्रमांकावर असलेल्या गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे आवश्यक असते.  

७) सहाव्या मुद्द्याचं थोडं वेगळं रूप. ही जी तुम्ही प्राधान्यक्रमाची यादी बनवत असता  ती यादी बनवताना हा प्राधान्यकम केवळ वर्तमान काळाला डोळ्यासमोर ठेवून बनवण्याची चूक करू नये. आपण  वर्तमानकाळातील घेतलेल्या बऱ्याचशा निर्णयांचे परिणाम दिसण्यासाठी भविष्यकाळ उजाडावा लागतो.  त्यामुळे एखाद्या जबाबदारीविषयी आज घेतलेला निर्णय हा भविष्यकाळाला डोळ्यासमोर घेऊन घेण्यात यावा.  आता तुम्ही म्हणाल की भविष्यकाळ कोणी पाहिला आहे आणि आजच्या निर्णयाची भविष्यकाळात काय परिणीती होणार आहे हे आम्ही आज कसे काय सांगू शकणार? मुद्दा अगदी बरोबर आहे.  परंतु एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांच्या परिणामांचे दायित्व सुद्धा घ्यावे लागते.  

हे सर्व वाचून जर तुम्हाला दडपण आले असेल तर ते दडपण काही प्रमाणात दूर करण्याचा सुद्धा माझ्याकडे मार्ग आहे. आतापर्यंत  आपल्या मागच्या अनेक  पिढ्यांनी  घेतलेले सर्व निर्णय काही अगदी अचूक होते असे नाही.  तरीही त्यांनी आपल्या परीने योग्य प्रयत्न करत आपलं आयुष्य जगत आपल्या पुढील पिढीसाठी जमेल तितके प्रयत्न केले.  

त्यामुळे तुम्ही लहान असा वा मोठे असा  प्रत्येक दिवशी तुम्ही नक्की काय करायचं याचा सकाळी विचार करा, त्यावर दिवसभर जमेल तितके प्रयत्न करा.  बाकी आयुष्यभर आपल्याकडून काय घडलं किंवा नाही घडलं त्याची काळजी करण्याची जबाबदारी त्या सर्व शक्तिमानावर सोडून द्या.  रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपटातील जुनी गाणी ऐकत शांतपणे हे एक चांगलं  आयुष्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना! 


गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

व्यक्तीस्वातंत्र्याच्या कोषाकडे!






कालच्या लोकसत्तेतील "पालक की मारक" हा विचारप्रबोधक अग्रलेख वाचला. केवळ नामांकित  वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशामागे लागून जगण्याशी संबंधित अनेक अंगाचा अभ्यास आनंददायी असू शकतो याचा अंदाज नसलेल्या आपल्या समाजात अजूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांची हाव सुटत नाही  असा विचार मांडणारा हा अग्रलेख! अधोरेखित  वाक्य अग्रलेखातून जसच्या तसं उचललेलं !

आता यावरील माझे विचार. 

मागच्या पिढीने शिक्षणाचा आधार घेत आपलं राहणीमान मध्यमवर्गीय जीवनस्तराकडे उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पूर्वीच्या चांगल्या राहणीमानाच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना या वेगळ्या पातळीवर होत्या. १९९० च्या दशकात जे आर्थिक उदारीकरणाचे धोरण आपल्या देशानं स्वीकारलं त्यामुळे एखाद्या वादळामुळे शेतीवाडीची जशी वाताहत होते त्यासारखी  परिस्थिती आपल्या समाजाची आणि त्याच्या मानसिक स्थैर्याची झाली. या उदारीकरणामुळे  आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या विविध पर्यायांच्या उपलब्धतेमुळे जीवनातील नव्या पैलूची (चंगळवादी आयुष्याची) आपल्या समाजाला ओळख झाली.  

आजचं कोणतंही वर्तमानपत्र उघडलं की अत्यंत आकर्षक जाहिरातींचा आपल्यावर भडिमार होत असतो.  त्यामध्ये लाख-लाख रुपयांचे भ्रमणध्वनी, तीस चाळीस लाखांच्या गाड्या,  दोन कोटी पासून ज्यांची किंमत सुरू होते अशा आलिशान सदनिका,  किमान चार-पाच लाख रुपये शुल्क असलेल्या परदेशवारी यात्रा,  विविध रंगीत टेलिव्हिजन संच, वातानुकूलन प्रणाली, महागडे  रेफ्रिजरेटर ह्यांचा समावेश असतो.  समाजातील काही मनं स्थिर असतात. आपली क्षमता, आपल्याला लाभलेला संस्काराचा वारसा, जीवनाकडून आपल्याला नक्की काय हवंय ह्याविषयी कमालीची सुस्पष्टता ती बाळगून असतात. त्यामुळं असल्या जाहिरातींपासून विचलित न होण्याची म्हणायला गेलं तर देणगी त्यांना लाभलेली असते. 

अजूनही बरीचशी मध्यमवर्गीय कुटुंब अशी आहे की जी जुन्या विचारसरणीला अनुकूल असे आयुष्य जगत असतात. परंतु बऱ्याच वेळा हा स्वखुशीने घेतलेला निर्णय नसून परिस्थितीसमोर हार मानून स्वीकारलेली एक अपरिहार्य अशी जीवन पद्धती असते. त्यामुळेच पालकवर्ग आणि काही प्रमाणात विद्यार्थीसुद्धा या परिस्थितीवर मात करण्यासाठी नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात.  त्यामुळं जो वर्ग अजूनही आपला आर्थिक स्तर उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना हा विचार पटणं सहजशक्य नाही. "नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे आवश्यक नाही" ही विचारसरणी आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्या लोकांकडून येण्याची शक्यता जास्त! 

अजून एक मुद्दा की अजूनही आपला बहुतांश समाज सामाजिक जीवनाशी आपली नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.  भारतीय सामाजिक जीवन हे एका विशिष्ट किंमतीवरच उपलब्ध असतं.  तुम्ही जेव्हा जेव्हा भारतीय सामाजिक जीवनात सहभागी होता त्यावेळी तुम्ही त्या संपूर्ण समाजाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी हवे तसे टक्केटोमणे देण्यास मारण्याचा अधिकार प्रदान करत असता.  बऱ्याच वेळा हे टक्केटोमणे हे तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात यासंबंधी असतात.  टक्केटोमणे मारणारी लोक स्वतः किती यशस्वी आहेत किंवा त्यांनी आयुष्यात नक्की कायमिळविलं  आहे हा मुद्दा गौण असतो.  इथं तुम्हाला दोन पातळीवर निर्णय घ्यायचा असतो.पहिली पातळी म्हणजे सामाजिक जीवनात तुम्हांला सहभागी व्हायचं आहे की नाही आणि दुसरी पातळी म्हणजे जर तुम्ही सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलात तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या तुमच्यावर होणाऱ्या टिप्पणीला तुम्ही किती महत्त्व देता! जर तुम्हाला या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्यात यश लाभत असेल किंवा तितकी मानसिक कणखरता तुम्ही दाखवू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या मर्जीने  जीवन जगता येतं. 

प्रश्न असा आहे की इतकी मानसिक कणखरता आपल्या समाजाकडे खरोखर उरली आहे का?  ही मानसिक कणखरता आणण्यासाठी आपला स्वतःशी संवाद असणे आवश्यक आहे.  स्वतःशी असलेला संवाद आणि नजीकच्या नातेवाईकांशी,  मित्रांशी  असलेला संपर्क आपल्याला समाजाच्या टिप्पणीपासून विचलित न होण्याची शक्ती देऊ शकतो.  अजूनही समाजाचा एक भाग ही कणखरता दाखवतो आणि आपल्या मर्जीनुसार जीवन जगतो. 

पुढील पिढीच्या बाबतीत एक गोष्ट होण्याची शक्यता मला वाटतेय. आज समाजाला जी बाकीच्या समाजाशी नाळ टिकून ठेवण्याची गरज वाटत आहे की बहुदा पुढच्या पिढीला वाटणार नाही.  आजच्या सामाजिक समारंभात आढळून येणारे दांभिकपण हे पुढच्या पिढीला या सामाजिक समारंभांपासून दूर लोटणारे ठरेल.  मग आपली स्थितीसुद्धा पाश्चात्य देशांसारखी होण्यास वेळ लागणार नाही, जिथे प्रत्येकजण आपल्याभोवती  व्यक्तीस्वातंत्र्याचा कोष विणून त्यात मग्न असेल. मनुष्यउत्क्रांतीतील हा पुढील टप्पा असेल.  


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

गोंधळलेली मध्यमवयीन माणसं


आयुष्य आपल्यापुढं काय वाढून ठेवेल हे नक्की सांगता येत नाही. तुम्हांला जाणवो  वा ना जाणवो  पण ह्या पोस्टमध्ये विनोदाची पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंतरिक मानसिक गोंधळ हा बहुसंख्य भारतीय मध्यमवयीन  माणसांच्या प्राक्तनात लिहिला असावा. ह्याला अपवाद दोन प्रकारची माणसं. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला आयुष्याचं कोडं उलगडण्याची सुतराम शक्यता नाही हे पूर्णपणे उमजलेली माणसं. त्यामुळं त्यांना विचार न करता वागण्याचा परवाना मिळालेला असतो. मजेत जगतात ही माणसं. दुसरा प्रकारात आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं हे जाणवलेली माणसं. हल्लीच्या भाषेत म्हणायचं झालं तर पूर्णपणे sorted असतात ही माणसं. आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वागतात. कोणत्या लोकांशी कधी संपर्क ठेवावा हे त्यांना नक्की माहिती असतं. बऱ्यापैकी मजेत आयुष्य जगता येतं त्यांना. फक्त अशी लोक कदाचित जाणते अजाणतेपणी दुसऱ्यांचा वापर करून घेण्याची शक्यता असते. 

आता वळुयात पोस्टच्या केंद्रस्थानी असलेल्या जमातीकडं - गोंधळलेली मध्यमवयीन माणसं! इथं ही माणसं का गोंधळलेली असतात ह्याविषयी मी विविध मुद्दे सादर करत आहे. 

१. मोकळा वेळ - ह्या मध्यमवयीन  माणसांचा बालपणीचा काळ आईवडिलांकडून आज्ञा स्वीकारण्यात, त्यानंतर नवऱ्याला आज्ञा देण्यात / बायकोकडून आज्ञा घेण्यात आणि मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त गेलेला असतो. अचानक एका टप्प्यावर आज्ञांची देवाणघेवाण विविध कारणांस्तव मंदावते, मुलं स्वावलंबी होतात. इतका प्रचंड वेळ फावला वेळ ह्या वर्गात दाखल झाल्यानं ह्या माणसांचा मेंदू अगदी गोंधळून जातो. देवानं आपल्याला इतका महत्वाचा मनुष्यजन्म दिला आणि त्यातील तासनतास, दिवसेंदिवस आपण असेच वाया घालवत बसलो तर पूर्ण आयुष्याचा हिशोब मांडायला बसल्यावर देव आपल्याला ओरडेल अशी त्यांना भिती वाटू लागते. त्यातच भर म्हणून उमराव जान मधील - तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी  ह्या ओळी त्यांच्या कानावर पडतात. त्यामुळं आपण एखादा छंद जोपासला पाहिजे ह्याचा त्यांना साक्षात्कार होतो. 

काही जणांना काही कारणास्तव मोकळा वेळ मिळत नाही. 'भला उसके पास मोकळा वेळ हैं और मेरे पास क्यू नहीं ?' ह्या विचारानं ते गोंधळून जातात. 

२. न उमगलेल्या गोष्टी - प्रत्येक माणसाला आयुष्यात न समजलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कधीतरी समजू शकतात हा विश्वास बाळगून ही माणसं आयुष्य जगत असतात. पण एका क्षणी ह्या गोष्टी आपल्याला कधीच समजू शकणार नाहीत ह्याची त्यांना जाणीव होते. त्यामुळं त्यांच्या गोंधळात अजून भर पडते. वानगीदाखल काही उदाहरणं 

अ . शेअरबाजारातील चढावउतार. आपण प्रचंड अभ्यास करून घेतलेल्या शेयर्सचे आपण गुंतवणूक केल्यानंतर गडगडणे !

ब. Age is just a number - अमीरखान वगैरे मंडळीचे आवडतं असलेल्या ह्या वाक्याचं मराठी भाषांतर 'वय हा एक केवळ आकडा आहे' हे असावं का आणि असल्यास त्याचा नक्की अर्थ काय?

क. TOI  बरोबर येणाऱ्या बॉम्बे टाईम्स चे नामांतर मुंबई टाईम्स करावं म्हणून अजून कोणी आंदोलन कसं छेडलं नाही? त्यातील जे कोणी सेलेब्रिटी आहेत त्यातील बहुतांश लोकांना आपण कसं काय ओळखत नाही?

ड. प्रत्येक देशाकडं असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणात त्या देशानं चलन बाळगावं असं ह्या माणसांनी लहानपणापासून ऐकलेले असते. ह्यामागचं नक्की कारण दहा मित्रांनी दहा बैठकीत समजावून सांगितल्यावर सुद्धा आपल्या डोक्यात प्रकाश का पडत नाही 

अशी ही यादी वाढतच जाते 

३. आपण ज्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो अशा लोकांची दिवसेंगणिक कमी होत जाणारी संख्या - हळुहळू आपलं फार कमी लोकांशी पटत आहे ह्याचा साक्षात्कार ह्या लोकांना होतो. ह्यासाठी ही लोक सुरुवातीला दुसऱ्यांना दोषी धरतात. मग काही काळानं कदाचित खरी समस्या आपणच आहोत ह्याची जाणीव त्यांना होऊ लागते. हे आपल्या बाबतीत कसं काय होऊ शकते ह्याचा प्रचंड धक्का त्यांना बसतो. बिचारी अजूनच गोंधळून जातात. 

मध्यमवर्गीय माणसं गोंधळून जाण्याची तीन कारणं आपण पाहिलीत. आता ही लोक ह्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहुयात. 

१. छंद - आपल्याला काही छंद असायला हवा ह्याची जाणीव त्यांना होते. ह्या वयात छंद जोपासणं हे काहीसं कठीण जात असलं तरीही हे लोक जिद्दीनं प्रयत्न करतात. ब्लॉग लिहिणं, कविता करणं, फुलांचे फोटो काढणं, किशोरकुमारची गाणी गाणं, वनात शांत बसलेल्या पक्ष्यांना कॅमेरात टिपणं वगैरे वगैरे. जोवर हा छंद आपला वेळ योग्य रितीनं व्यतीत करण्यासाठी आपण जोपासत आहोत तोवर ठीक. ज्याक्षणी आपण कौतुकाच्या अपेक्षेनं हे करायला जातो तिथं गोंधळ होतो. छंदामध्ये योग्य अंशी विरक्ती समाविष्ट असावी. 

२. कंपू - आपल्यासारख्या समविचारी लोकांचा कंपू बनवून चर्चा, सामाजिक कार्य करणे वगैरे वगैरे. काहीजणांना कंपू बनवून विधायक कार्य करायचं असतं, तर काहीजणांना केवळ धमाल करायची असते तर काहीजणांना काही भव्यदिव्य ध्येयाच्या पडद्याआडून वेळ घालवायचा असतो, आपली प्रसिद्ध होण्याची भूक भागवून घ्यायची असते. एक गोष्ट मात्र खरी की असे कंपू चांगली कामं नक्कीच करतात. त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. फक्त ह्यात गटबाजी होऊ नये, किंवा एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे असले प्रकार होऊ नयेत आणि योग्य वेळ येताच आपण बाजूला होऊन नवीन लोकांना संधी देता यायला हवी. आणि हो कंपूच्या माध्यमातून मदिराप्राशनाचे वाढतं प्रमाण अगदी चुकीचं. पण हल्ली ह्या मुद्द्यावरून लोक अगदी आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळं ह्यावर न बोललेलंच बरं !

ह्या आधी मांडलेला मुद्दा पुन्हा एकदा मांडतोय. तुम्ही जर स्वतःला काही चांगल्या गोष्टीत व्यस्त ठेवू पाहत असाल तर वाचन, संगीतश्रवण, निसर्ग ह्यासारखे उत्तम पर्याय नाहीत. सर्वशक्तिमानाकडं परतण्याच्या मार्गावर असताना एक समृद्ध व्यक्तिमत्व होऊन त्याच्याकडं परतणं केव्हाही इष्ट !

एक गोंधळलेला माणुस 

रविवार, १ जानेवारी, २०२३

न चल अकेला !




कोणी काही म्हणो माणुस एकटाच असतो. म्हणावं तर लहानपणीचा काळ ह्याला अपवाद असतो. आईवडिलांच्या मायेच्या ऊबेत जीवनाचा उषःकाल व्यतीत केलेल्या बालकास नंतर मात्र परखड वास्तवास सामोरे जावं लागतं. 

काहीजणांना हे वास्तव सहन करण्याची क्षमता उपजत प्राप्त झालेली असते. त्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं. आयुष्यात यश / अपयशाला सामोरे जावं लागणं, सुखद / दुःखद घटनांना तोंड द्यावं लागणं ह्या सर्वांना ह्या व्यक्ती फारशा न डगमगता सामोऱ्या जातात. मनाचा खंबीरपणा ही एक देणगी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना लाभली असते असं आपण म्हणू शकतो. लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणं, लोक आपल्याविषयी काय म्हणतील ह्याविषयी विचार करण्यात फारसा वेळ न दवडणे अशा व्यक्तिवैशिष्ट्यामुळं ही माणसं आपल्याला हव्या त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. 

दुसऱ्या प्रकारची व्यक्तिमत्वं एका वेगळ्याच संघर्षाला तोंड देत असतात. लोकांनी आपल्याला स्वीकारावं, हे स्वीकारलं आहे ह्याची वेळोवेळी दृश्य स्वरूपात दखल घ्यावी अशी ह्यांची सुप्त अपेक्षा असते. वाढत्या वयानुसार ही अपेक्षा उघडपणे व्यक्त न करता आल्यानं  ह्या व्यक्तींचा काहीसा कोंडमारा होत राहतो. ह्यांच्या नशिबानं जर ह्यांना असा साथीदार अथवा सुहृद मिळाला जो ह्यांच्या ह्या दखलीकरणाच्या  अपेक्षेच्या भावनेला उमजू शकेल तर त्यांचं आयुष्य सुखकारक होऊ शकते. 

पण सर्वचजण असे सुदैवी नसतात. आयुष्यातील वयानुसार आलेल्या जबाबदाऱ्या पार पडत राहणं हेच ह्यांच्या नशिबात असतं. आता जग इतकं भावनाशून्य होत चाललं आहे की आपल्या भोवताली असणाऱ्या अशा व्यक्तींची आपल्याला बऱ्याच वेळा जाणीव सुद्धा होत नाही. लौकिकार्थानं ह्या व्यक्तींचं आयुष्य एक सरळ रेषेत व्यवस्थित चाललेलं असतं. पण कौतुकाच्या एका किमान अपेक्षेपासून ह्या व्यक्ती वंचित राहतात.  अशा व्यक्ती ओळखाव्या कशा? बोलण्यात उत्साह नसणं, आपल्या आवडीनिवडीविषयी फारसा चोखंदळपणा न दाखविणे, समारंभात केवळ एक उपचार म्हणून उपस्थित असणं वगैरे वगैरे! 

ही पोस्ट आटोपशीर आहे. उद्देश्य एकच ! भोवताली असलं व्यक्तिमत्व आहे का ह्याचा शोध घ्या आणि त्यांची वेळोवेळी दखल घ्या. जगाचं झपाट्यानं अलिप्तीकरण होत आहे. माणसं एकटी पडत चालली आहेत. त्यांना परत उमेद देण्यासाठी तुमचा एक दूरध्वनी , एक भेट पुरेशी आहे. कोणी काही म्हणेल ह्याचा विचार न करता अशा लोकांनां स्वतःहून भेटा, त्यांच्याशी बोला. 

ही पोस्ट माझ्या शाळेच्या मित्रांना समर्पित जे आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून आपल्या मित्रांना भेट देत आहेत. मी काहीसा ह्या बाबतीत दोषी आहे. माझे लिखाण आणि माझे आचरण ह्यात काहीशी विसंगती आहे. योग्य वेळी ही विसंगती दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन.   

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Pushing ourselves to the brink! (कडेलोटाच्या दिशेनं )


संदेशभाऊ वर्तक ह्यांना शनिवारी सायंकाळी बोरिवली ते नायगांव हे तीस किलोमीटर अंतर कारने कापण्यासाठी तीन तास लागले. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अचानक पावसानं इन्फिनिटी मॉलच्या बाजुच्या रस्त्यावर मी कारमध्ये एकाच ठिकाणी दहा मिनिटं अडकून होतो. मालाड ते बोरिवली ह्या टप्प्यात मेट्रोच्या कामामुळं मेट्रोच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला अत्यंत खडबडीतपणा आला आहे आणि दुसऱ्या कडेला वाहनं अनधिकृतरित्या पार्क करुन ठेवलेली असतात. त्यामुळं बऱ्याच वेळा कृत्रिमरीत्या वाहतुक कोंडी होत राहते. नागरिक मग उलट्या दिशेनं वाहनं चालविणे, सिग्नल तोडणे असले प्रकार करत राहतात. 

प्रचंड वेगानं अजूनही वाढत असलेल्या मुंबई महानगराच्या पाणी, वीज पुरवठ्याच्या गरजा त्याच प्रमाणात वाढत चालल्या आहेत. संबंधित यंत्रणा अजुन तरी ह्या गरजा पुर्ण करण्यात यशस्वी होत असली तरी ही यंत्रणा अत्यंत तणावाखाली असल्याचं वेळोवेळी जाणवत राहतं. सध्यातरी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरमिश्रित कौतुकाची भावना असली तरीही भविष्यात कुठंवर ते वाढत्या शहराच्या गरजांना तोंड देऊ शकतील ह्याविषयी चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 

मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या परिसंस्थेवर सुद्धा ताण पडत राहतो. इतकं सारं असलं तरीही विनु म्हणत असल्याप्रमाणं मुंबईतील परिसंस्था बिनबोभाट सुरु ठेवण्याकडं अधिकृत यंत्रणेची महत्तम शक्ती खर्च पडत असते. मुंबईत तुमच्याकडं पैसा असेल तर सर्व काही मिळू शकते. गावात तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही तुम्हांला सुद्धा वीजपुरवठा खंडित होणं, अनियमित पाणीपुरवठा वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागतं. ह्या सर्व प्रकारांमुळं गांव सोडून मुंबईकडं / परदेशात धाव घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळं मुंबई आणि महानगरांवर अधिक ताण पडत राहतो. 

आमच्या एका घरातून एका दिवसात बाहेर पडणारा कचरा पाहून चिंता वाटू लागते. तीच गोष्ट ई-कचऱ्याच्या बाबतीत! भ्रमणध्वनी, संगणक ही सारी मंडळी मोजक्या वर्षांत एकतर कालबाह्य किंवा नादुरुस्त होतात. लगेचच आपण नवीन घेण्याच्या मागे धाव घेतो. तीच गोष्ट थोड्याफार फरकानं टीव्ही, कार ह्यांच्या बाबतीत. दहा वर्षात ह्या गोष्टी बदलाव्या लागण्याची शक्यता अधिक असते. ऍमेझॉन, झोमॅटो, स्विगी आपल्यासाठी सोयीचे, पण एका शर्टांसोबत, एका मसाला डोश्यासोबत त्यांनी आपल्या घरात आणून टाकलेलं प्लॅस्टिक, आवरणाचा कचरा भयंकर असतो. आपल्यापैकी मोजके लोक प्लॅस्टिक रिसायकल करतात. झोमॅटो, स्वीगीने आपल्या शरीरात आणलेल्या जास्तीच्या कॅलरी जाळण्यासाठी आपल्यातील काहीतरी जिममध्ये जातात, काही जात नाहीत. दोन्ही वर्गातील काही लोकांना विविध आरोग्य समस्येनं ग्रासण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मोठाली इस्पितळं, आरोग्यविमा ह्या संस्था आता तिथं होणाऱ्या अविश्वसनीय खर्चामुळं आता आश्वासक ऐवजी भितीदायक वाटू लागल्या आहेत. 

आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपण पृथ्वी कोणत्या स्थितीत सोडणार आहोत हा प्रश्न मनाला भेडसावत राहतो.  गावांमध्ये  उपलब्ध असणाऱ्या उपजीविकेच्या पर्यायांची  कमतरता किंबहुना असे पर्याय निर्माण करण्यात एक राष्ट म्हणून आपल्याला आलेलं अपयश हे महत्वाचं कारण ज्यामुळं सर्वांना शहराकडं धाव घ्यायची आहे. शहरात, परदेशात एकदा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर सुरु होते ती प्रतिष्ठेची शर्यत! तुमचं घर, नोकरी, कार, तुमच्या सहलींची ठिकाणं, तुमच्या मुलांचा शैक्षणिक प्रवास / यश  ह्यावरुन तुमचं मूल्यमापन करण्यात रस असणारी मंडळी !  तुम्हांला सामाजिक वर्तुळाचा भाग बनून राहायचं असेल तर ह्या मंडळींशी पडणारी तुमची गाठ अनिवार्य आहे.  सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातील मुखपृष्ठाला ज्यावेळी जाहिरातीची पहिली दोन तीन पानं मागच्या क्रमांकावर ढकलतात त्यावेळी समाजाच्या प्राधान्यक्रमाची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. मान्यवर व्यक्ती तंबाखूच्या जाहिराती करतात त्यावेळी भोवताली खरोखरच चिंतादायक परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याची खात्री पटते.  

हे कसं थांबविता येईल ह्याचा आता आपण विचार केला नाही तर पुढील काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की हल्ली कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यामुळं आपण आपला विचार करावा. ठेवले ईश्वरे तैसेची राहावे ! ह्या उक्तीला अनुसरुन वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करावा. प्रगती करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा पण एका मर्यादेपलीकडं स्वतःला खेचू नये. महानगराच्या बाहेर सुद्धा अनेक मंडळी आनंदात राहतात. ती कशी काय आनंदात राहू शकतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात आपण आपल्याभोवती निर्माण केलेल्या गैरसमजुतींचे जाळं दूर करण्यात नक्कीच यश मिळेल ! 

Happy Sunday! 

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

निवडीचा संभ्रम

सोमवार सकाळी मी अत्यंत शिस्तबद्ध मनःस्थितीत असतो.  साधारणतः लोक १ जानेवारीला वर्ष कसं घालवायचं ह्याविषयी जे काही निर्धार व्यक्त करत असतात त्याप्रमाणं मी रविवारी सायंकाळी / सोमवारी सकाळी आठवडा कसा शिस्तीत घालवायचा ह्याविषयी मनसुबे रचतो. आज सकाळी एक तास कार्यालयीन काम अगदी गंभीरपणानं केल्यानंतर हा निर्धार मोडकळीस आल्यानं ही पोस्ट लिहीत आहे किंवा ही पोस्ट लिहायचा विचार आल्यानं हा निर्धार मोडला जात आहे. विषय काही नसताना सुद्धा लोकांना छळायचं हा सुप्त मनसुबा ही पोस्ट लिहिताना मनात आहे. 

सध्या महिलांचा T20 आशिया चषक बांगलादेशात खेळला जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात वगैरे आपण कल्पना करु शकणार नाहीत असे देश सुद्धा सहभागी होत आहेत. ह्या महिला ज्या चित्रविचित्र आवाजात सामनाभर ओरडत असतात त्यामुळं घरातील शांततेचा भंग होतो असं आमचं म्हणणं आहे. संयुक्त अरब अमिरात संघात बहुसंख्य भारतीय वंशांच्या महिला आहेत. त्यात एक गोखले सुद्धा आहे! बांगलादेशात एकाच मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे. त्या दिवशी ह्या स्पर्धेत मोठा चमत्कार झाला. थायलंड संघानं पाकिस्तान संघाला नमविले. दुसऱ्या दिवशी आपण विविध प्रयोग करुन पाकिस्तान संघाकडून हरण्यात यश मिळविलं. 

भारताचा महिला संघ म्हणा की पुरुष संघ असो, आपल्याकडं गरजेपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असल्यानं सातत्यानं आपण बदल घडवत राहतो. Only thing which is constant in current world is CHANGE हे वाक्य टाळ्या मिळविण्यासाठी चांगलं असलं तरी ह्या बहुपर्यायानं आणि त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या सततच्या बदलांमुळं भारतीय महिला क्रिकेट संघ,  पुरुष क्रिकेट संघ आणि एकंदरीत भारतीय शहरी नागरिक पुर्णपणे गोंधळलेला आहे. ह्या बहुविध पर्यायांतुन आपल्यासाठी नक्की कोणता पर्याय चांगला हेच मुळी आपल्याला समजेनासं झालं आहे. भारतीय पुरुष संघात निवड होऊ शकणारे जे काही वीस बावीस खेळाडू आहेत ते ही जबरदस्त मानसिक तणावाखाली आहेत. जर तुम्ही रोहित शर्मा अथवा विराट कोहली नसाल तर तुम्ही सतत दोन - तीन खेळीनंतर संघाबाहेर जाता. 

BCCI अगदी मनाला येईल तसं वागत राहतं. आपला मूळ (कदाचित तथाकथित ह्या विशेषणासहित ) संघ ऑस्ट्रेलियाला पाठवून आपल्या fringe player च्या संघासहित दक्षिण आफ्रिकेच्या खऱ्या संघासहित पन्नास षटकांचे सामने बिनधास्त खेळतोय. वर्षातील बावन्न रविवारपैकी किती रविवार भारतीय संघ टीव्हीवर जाहिरातींचं उत्पन्न मिळवून देतो ह्याचं विश्लेषण मी निवृत्त झाल्यावर नक्की करणार आहे. तोवर भारताचे (पुरुष आणि महिला) अ, ब , क वगैरे संघ नक्की रविवारी खेळत असतील. इतके सर्व खेळाडू पस्तिशीच्या आसपास निवृत्त झाल्यावर त्यांना समालोचक म्हणून काम मिळण्यासाठी अधिक सामने नक्कीच असायला हवेत. 

घरी घेतलेल्या जिओमुळं सुद्धा विविध पर्याय माझ्यासमोर उभे आहेत. हे पर्याय टीव्ही, भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत. नशिबानं पाच सहा महिन्यातच ह्या बहू पर्यायांचा उबग येऊन त्यातील मोजक्या पर्यायांकडंच मी हल्ली वळतो. 

एकंदरीत आपल्याकडं काहीच नसणं हा जसा प्रश्न असू शकतो तसंच बरेच पर्याय असणं हा तितकाच गंभीर प्रश्न असू शकतो. शहरी भारतीय समाजाचा हाच मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळं आपल्या स्वतःसाठी , कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याचा निर्णय जे घेऊ शकतात तेच लोक ह्या काळात समाधानी राहू शकतात. 

जाता जाता माझ्या एका अमेरिकन व्यवस्थापकाचं आवडतं वाक्य - Let Perfect be not the enemy of Good. परिपूर्ण निवडीचा शोध घेतांना आपल्यासमोर आलेल्या चांगल्या पर्यायांना सातत्यानं धुडकावून लावण्याची चूक करु नकात ! 

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

शोधिशी मानवा

 


सहसा ऑक्टोबर महिन्यात अनुभवायला मिळणारं परतीच्या पावसाचं वातावरण ह्या आठवड्यात वसईत अनुभवायला मिळालं. सायंकाळी सहानंतर ढगांचा गडगडाट आणि त्यामुळं येणारा थंडावा मनाला सुखावून जातो. झोपही गाढ लागते. पुढील आठवड्याला सामोरं जाण्याचं एक बळ मिळतं. हा परतीचा पाऊस नसावा ही आशा !

दोन वर्षांच्या खंडानंतर मांडलई गावातील गणपती पाहायची संधी मिळाली. गावातील शांत वातावरणात घराघरांतून फिरत गणपती बाप्पाचं दर्शन घेणं मनाला खूप सुखावतं. गणपतीबाप्पा सुद्धा निवांतपणे आनंदात असतात. ते  आपल्याकडं प्रेमळ नजरेनं पाहत आहेत असा भास होतो. खरंतर गणपती पाहायला जायचं ते चालतच अशी पुर्वीची पद्धत! पण काही कारणांनी त्यात बदल झाला आहे. 

दोन तीन दिवस वसईत मुक्काम झाला की काहीबाही सुचतं. आताच संध्याकाळी असंच काहीतरी झालं. भोवताली एकंदरीत मूळ भावनेला बाजूला सारुन त्याभोवताली आपण निर्माण केलेल्या आकर्षक आवरणांनाच  माहात्म्य प्राप्त झालं आहे की काय असं वाटु लागतं. ह्यामागचं कारण काय असावं ही कुतूहलभावना मनात निर्माण झाली. जगातील बरं - वाईट, यौग्य - अयोग्य काय हे ठरविण्याचा अधिकार पूर्वी मोजक्या जाणकार व्यक्तींच्या हाती होता. आता आपण हा अधिकार सर्वांच्या हाती दिला. 

त्यामुळं परीक्षण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या मूळ गुणधर्माकडं परीक्षणाचा रोख न राहता त्या गोष्टीच्या आकर्षकतेकडे भर दिला जातो. ह्या परिस्थितीत आता बदल होण्याच्या पलीकडं स्थिती गेली आहे. त्यामुळं उगाचच तक्रारभावना मनात बाळगण्यापेक्षा ह्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला हवं ते कसं मिळविता येईल ह्याचा शोध घ्यायला हवा. चविष्ट घरगुती जेवण, शांत वातावरणातील घरगुती गणपती, प्रमाणपत्राचा ध्यास न घेता केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा केलेला सखोल अभ्यास, नेहमीच्या बोर्डात शांतपणे छापील पुस्तकांच्या आधारे अभ्यास करणारी मुलं सर्व काही अस्तित्वात आहे, फक्त ते कुठंतरी दडलं गेलं आहे. 

महानगरातील बहुसंख्य जनता ज्याप्रकारे जीवन जगत आहे त्यानुसार (ऍमेझॉन, उबेर, झोमॅटो, स्वीगी आधारित) जीवन जगणं हा आपला निर्णय आहे. असं जीवन जगताना आपल्याला काही प्रमाणात गुदमरायला होत असेल एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की हे जीवन जगण्याची सक्ती आपल्यावर कोणी केली नाही. काहीशा विस्मृतीत गेलेल्या जीवनातील मनाला शांत करणाऱ्या गोष्टीना पुन्हा आपल्या जीवनात समाविष्ट करुन घेता येऊ शकतं. मुंबई ब वरील मंगलप्रभात, डी डी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम शोधून काढून पाहावेत. खासगी वाहिन्यांनी जणू काही शांतपणे बोलणं चालणं आपल्याला विसरायला लावण्याचा चंग बांधला आहे की काय अशी स्थिती निर्माण केली आहे. देवपूजा जमेल तेव्हा करुन पहावी, बरं वाटतं. आपल्या चुका देव कसा माफ करतोय हे पाहून आनंद होतो. घरकाम केलं तरीही बरं वाटतं. सतत आपण दिमतीला भ्रमणध्वनी, संगणक ठेवत असल्यानं सतत अधिकारात राहण्याची आपल्याला सवय लागून राहते. हातात झाडू घेतला की काही काळ का होईना आपल्या भोवतालच्या खऱ्या विश्वात आपला प्रवेश होतो. 

गेल्या आठवड्यातील गुरुवारी सुरु झालेल्या कार्यालयातील समस्येनं (प्रॉडक्शन इश्यू) ह्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पिच्छा पुरवला. त्यामुळं मेंदू भणभणला होता. ह्या समस्या जरी निपटल्या तरी त्यांचे सखोल विश्लेषण करणारे  प्रदीर्घ कॉल्स तुमची वाट पाहत असतात. ह्या समस्येचं मूळ कारण तुमच्या टीमकडे अंगुलिदर्शन करत असेल तर अशा प्रदीर्घ कॉल्सची प्रतीक्षा करताना झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. परंतु चांगल्या कंपनीत कोणा व्यक्तीला, अथवा टीमला दोषी न ठरवता ह्या चुकांमधून आपल्याला कसं काय शिकता येईल ह्यावर भर दिला जातो. ह्या आठवड्यात पुन्हा एकदा त्याचा सुखद प्रत्यय आला. जगातील चांगुलपणा काहीसा विरळ झाला असला तरी त्याच्या अस्तित्वाविषयी पुन्हा एकदा खात्री पटली. सद्ययुगात तुमच्या बाबतीत सदैव चांगलं कदाचित होत नसेल परंतु जर जगातील मुलभूत तत्त्वांवर अढळ श्रद्धा ठेवत जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच  तुमच्या प्रयत्नांना यश मिळेलच, ह्याची खात्री हे जग देत आहे आणि देत राहील !!

बुधवार, १८ मे, २०२२

वल्हव रे नाखवा हो !


पावसाळा जवळ येतोय. काही दिवसांतच काजव्यांचं आगमन येईल. काजवे पाहणं एक नयनरम्य आणि सोबत खूप काही शिकवून जाणारा अनुभव असतो.  दाट अंधाऱ्या पार्श्वभूमीवर काही वेळच आपल्या प्रकाशाची झलक दाखवणारा काजवा आपल्यासाठी तरी नंतर गायब होतो. आपल्याला आपलं  आयुष्यसुद्धा तुलनेनं दीर्घकाळ वाटत असलं तरी विश्वाचा प्रदीर्घ कालावधी पाहता आपलं आयुष्य विश्वपटलावर एखाद्या काजव्याप्रमाणंच असतं. 

आयुष्यात खंबीर राहण्याशिवाय पर्याय नसतो. खंबीर राहणं म्हणजे मनाला संतुलित अवस्थेत ठेवणं.  आयुष्यातील घडामोडीचे हेलकावे येतात, मनाची नौका डगमगते. मनाची नौका डगमगणे ह्यात चुकीचं काही नाही पण नावाड्याने तिला लगेचच सावरणं आवश्यक असतं. मनाला गरज असते आधाराची! काहीवेळा हा आधार जवळची माणसं पुरवतात तर काही वेळा संगीत, निसर्ग ह्यांच्याकडं धाव घ्यावी लागते. संगीत, निसर्ग ह्यांच्याकडं धाव घेण्यात एक फायदा असतो, ही माध्यमं एखाद्या विशाल पाषाणासारखी अचल असतात. आपल्याकडं सातत्यानं सुखावह लहरी प्रक्षेपित करत राहण्याची क्षमता हे बाळगून असतात, आवश्यकता असते ती आपल्याला त्यांच्याशी संवादाचं माध्यम प्रस्थापित करता येण्याची!

हे सारं काही आज सकाळी काहीशा गोंधळलेल्या मनाला शांत करणाऱ्या यु ट्यूबवरील लताजींच्या मराठी गाण्यांच्या  मैफिलीला सर्मपित ! जुन्या गाण्यांचं एक खास असतं. त्यातील बहुतांश ओळी खूप अर्थपूर्ण असतात. शांतपणे ही गाणी ऐकत असताना ह्या ओळी, हे शब्द त्यांच्या अर्थासहित मनाला जाऊन भिडतात. कदाचित त्यात जीवनाचा व्यापक अर्थ भरलेला असतो. शांत मन ह्या ओळींचा आपल्या समजुतीप्रमाणं अर्थ लावतं, जगरहाटीमध्ये आपला गोंधळ एकट्याचाच नाही हे मनाला कदाचित उमगतं आणि मन एका नव्या जोमानं नवीन दिवसाला सामोरं जायला सज्ज होतं ! 

मंगळवार, १० मे, २०२२

आयुष्य म्हणजे ..

 


एका टप्प्यानंतर आयुष्य म्हणजे 

आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणींसोबत केलेला प्रवास  

सर्व काही ठीक चाललं आहे हे स्वतःला समजविण्याचा एक वेडा प्रयत्न 

झालेल्या गैरसमजांना सोबत घेऊन जीवनप्रवास सुरु ठेवण्याची अगतिकता 

संभाव्य गैरसमजांना टाळता यावं ह्यासाठी सतत जागरुक राहण्याची गरज 

लोकांच्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष प्रतिक्रियांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची निकड 

झपाट्यानं जीवनमूल्यं बदलणाऱ्या जगात स्वत्व टिकविण्याची एक धडपड 

भोवतालच्या आक्रमक वृत्तींना आपल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा संयम  

आनंदाच्या क्षणी देखील मर्यादेत राहण्याची समज  

आयुष्यभरातील मोठ्या गोंधळाला दिवसातील छोट्या छोट्या आनंदानं उत्तर देण्याचा प्रयत्न 

स्वतःच्या स्वभावाशी बराच काळ केलेल्या संघर्षानंतर त्या स्वभावाला स्वीकारण्याची आलेली उमज 


शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

एक संध्याकाळ



सायंकाळी घरातील खिडकीत बसून रस्त्यावरुन फिरायला जाणाऱ्या माणसांचं निरीक्षण करणं हा एक जीवनानुभव आहे. सायंकाळी माणसं काहीशी भावुक होत असावीत. आपल्या पूर्वजांच्या मनात सुर्यास्तानंतर येणाऱ्या अंधारामुळं एक भयाची भावना मनात निर्माण होत असावी. त्यानंतर हजारो वर्षे गेली असली तरी ती भावना रेंगाळलेल्या रुपात आपल्या मनात कुठंतरी असावी आणि त्यामुळं आपण भावुक होत असू असा माझा कयास. पण त्यासाठी टीव्ही, मोबाईलपासून आपण दूर असावं ही पूर्वअट ! बऱ्याच दिवसांनी अशी निरीक्षण संधी आज मला मिळाली. ह्यात जोडपी होती, मैदानावर खेळून हातात बॅट, बॉल घेऊन परतणारी मुलं होती, कष्टाचं काम आटपून घरी परतणारे मजूर होते.

एकत्र फिरायला जाणाऱ्या जोडप्याचं निरीक्षण करणं हा एक खास अनुभव असतो.  तिला खूप काही बोलायचं असतं. तो बऱ्याच वेळा मनाविरुद्ध तिच्या आवडीखातर घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळं तिच्या बोलण्याकडं अगदी एकाग्रतेनं लक्ष देणं हे एकंदरीत अवघडच असतं. त्याच्या मनात कदाचित ऑफिसातील कामाचे, आर्थिक घडीचे किंवा IPL लिलावाचे विचार घोळत असतात. अधून मधून "असं होय?" "तिला काहीच काय कळत नाही का?" वगैरे प्रश्न विचारुन आपली तन्मयता सिद्ध करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असतो. त्यात काहीतरी चुकीचे प्रश्न विचारुन त्याचं तिच्या बोलण्याकडं लक्ष नाही हे तो सिद्ध करतो. पण केवळ त्याच्याकडं लटक्या रागानं पाहण्याव्यतिरिक्त किंवा त्याला चापटी मारण्याव्यतिरिक्त ती काहीच करत नाही. त्यानं आपल्या बोलण्याकडं लक्ष द्यावं अशी तिची अपेक्षाच नसते मुळी! तिला त्याचं आपल्यासोबत असणं महत्वाचं असतं. तिला बोलायचं असतं आणि ते ऐकून घेणारं कोणीतरी हक्काचं आपल्या सोबत आहे हेच तिच्यासाठी पुरेसं असतं. घर जसं जवळ येतं तेव्हा मात्र तिच्या बोलण्यात कदाचित सायंकाळच्या जेवणाचे विचार येऊ लागतात. मग तीही काहीशी गप्प होते. काळ जसा बदलेल तसं अर्थार्जन करणारी स्त्री आणि घर सांभाळणारा नवरा असंही चित्र दिसेल. अशी जोडपी फिरायला जातील तेव्हा कशी चर्चा होईल ह्याच्या विविध शक्यता मनात येतात. ही झाली तरुण जोडपी. वयस्क जोडप्यांची कथा काहीशी वेगळी असते. जे काही बोलण्यासारखं असतं ते आयुष्यभरात बोलून झालेलं असतं आणि त्यावर दिवसभर एकत्र असल्यानं सायंकाळी अजून काही खास बोलण्यासारखं नसावं. कदाचित आजोबा पुढं चालत असतील आणि आजी आपल्या बेतानं त्यांच्या मागे मागे चालत असतील. आयुष्यभर चालल्या तशा !

मैदानावर खेळून परतणारी मुलं म्हणजे मनुष्यजातीचा भविष्यकाळ! उत्साहाच्या चैतन्याचे झरे त्यांच्या चालण्याबोलण्यातून वातावरणात मिसळत असतात. मैदानावर आपण कसा पराक्रम गाजवला ह्याचा आढावा ते घेत असतात. कदाचित आपल्यातील एखाद्या मित्राची मजेत टर उडवत असतात आणि तो ही त्याचा आनंद घेत असतो. कष्टाचा दिवस आटोपून घरी जाणारे कष्टकरी पाहिले की आपसूक माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलो म्हणून ना दुःखाची भावना किंवा सुरक्षित भविष्याची खात्री आज देता येणार नाही म्हणून ना चिंतेची भावना. आपल्या स्वतःच्या कष्ट करण्याच्या क्षमतेवर अफाट विश्वास आणि त्या विश्वासावर आयुष्याचा लढा लढण्याची जिद्द. 

पाहता पाहता सूर्य मावळतो. मनुष्यजातीच्या जीवनसंघर्षांचं एक पान उलटलेलं असतं. ह्या पानावर लिहिले गेलेले असतात अनेक बरे वाईट अनुभव प्रत्येकाच्या नजरेतून ! आकाशात एव्हाना चंद्राने आपल्या शीतल किरणांची जादू पसरवलेली असते. शहरातील माणसं बहुदा ह्या जादूपासून अनभिज्ञ राहून केव्हातरी मध्यरात्रीनंतर झोपी जातील, गावातील माणसांना हा चंद्र बहुदा दर्शन देतीलच. पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे एक नवीन आशेनं दुसऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची.  

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

माझी दिनचर्या





मनात ठाम निर्धार करुन मी हिमालयाची त्या पायवाटीचा मार्ग धरला होता. बोचरे वारे, दूरवर दिसणारी हिमालयीन रानटी जनावरे ह्यांना न भीता मी शेवटी एकदाचा त्या महर्षींच्या गुहेसमोर पोहोचलो. माझ्या सुदैवानं काही वेळातच महर्षींची समाधी समाप्त झाली. 

स्मित हास्य करत महर्षी मला म्हणाले, " वत्सा, वसई क्षेत्री सर्व काही कुशल आहे ना ? 
मी - "हो महर्षी !"
महर्षी - "भोवताली इतके निर्बंध असताना तू इथंवर कसा काय येऊन पोहोचलास ?"
मी - "महर्षी,  मी स्वनिर्मित संकटात सापडलो आहे.  आपल्या मदतीसाठी इथंवर धाव घेतली आहे !"
इतक्यात टिंग असा आवाज येताच माझं लक्ष भ्रमणध्वनीकडं गेलं. 
महर्षी - "हा ध्वनी कसला?"
मी - (काहीशा अपराधी भावनेनं) - "माझ्या शनिवारी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टला लाईक आणि कमेंट आली आहे "
महर्षी (काहीसे प्रक्षुब्ध होऊन) :- "आपण इथल्या संवादाकडे लक्ष केंद्रित करुयात का ?"
मी - "हो महर्षीं. प्रमादाबद्दल क्षमा असावी"
महर्षी - "तुझी नक्की समस्या काय आहे ?"
मी - "हीच ती समस्या "
महर्षी - "नक्की समजेल असं बोलशील का "
मी - "कोणतेही काम एकाग्रतेनं करण्याची माझी क्षमता प्रत्येक दिवसाला कमी होत चालली आहे"
महर्षी - "हे असे का व्हावं ?"
मी - "मघाशी जे घडलं ते सदैव होत राहतं. हा भ्रमणध्वनी विविध संदेशांची सूचना देत राहतो आणि मी माझं मुख्य कामातील लक्ष गमावून बसतो !"
महर्षी - "ह्यावर उपाय काय असं तुला वाटतंय ?"
मी - "काही उपाय लागू पडतील असे मला वाटतंय, पण खात्री नाही"
महर्षी - "उदाहरणार्थ ?"
मी - "एक दररोजचं वेळापत्रक आखावे आणि त्यानुसार दिवस व्यतित करावा "

मान डोलावून संमती दर्शवित महर्षीनी मला अर्धा तास दिला.  महत्प्रयासाने मी खालील मजकूर नोंदविला 

पहाटे सूर्योदयाच्या किमान पंधरा मिनिटं आधी उठावं. ब्रश करुन एका प्रसन्न मनानं सूर्योदय पहावा. अशा ह्या प्रसन्न वेळी किमान दहा सूर्यनमस्कार, पाच उठाबशा आणि पाच सीटअप्स असा निसर्गाशी नातं जोडणारा व्यायाम करावं. सूर्यनमस्कार जसे जमतील तसे काढावेत. उगाचच त्यातील प्रत्येक स्थितीच्या अचूकतेविषयी साशंक होऊ नये. नाहीतर दुसऱ्या दिवसापासून हे सूर्यनमस्कार काढण्याची इच्छाशक्ती झपाट्यानं कमी होऊ शकते.  आपण अगदी तंदुरुस्त दिसावं असा स्वार्थी विचार करुन व्यायाम करु नयेत. आनंदी मनासाठी हा सकाळचा व्यायाम आपण करत आहोत ही भावना मनात ठेवावी. उठल्यापासून एका तासाच्या आत स्नान आटोपून घ्यावं. सकाळी लवकर स्नान केल्यानंतर सकाळच्या प्रत्येक क्षणाचा दर्जा, त्या क्षणातील तुमची एकाग्रता ह्यात कमालीची सुधारणा होते. स्नानानंतर पाठांतरशक्ती / इच्छाशक्तीनुसार मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्र पठण करावे. स्नानानंतर एक चषक धारोष्ण दूध प्राशन करावं. दूध प्राशन केल्यावर वाय फाय सुरु करावे पण ते केवळ कार्यालयीन ई - मेल्स तपासून पाहण्यासाठी. कार्यालयीन ई - मेल्समधील अगदी महत्वाच्या मेल्सना उत्तर द्यावं. बाकीच्यांचे वर्गीकरण करुन दिवसभरात त्यावर योग्य कार्यवाही करावी. ह्या नंतर शिरा, पोहे, उपमा असा गरमागरम नाश्ता घेत असताना दारी आलेल्या वर्तमानपत्रांचे वाचन करावे. ह्यातील मनाला क्लेशदायक बातम्या जसे की बेजबाबदार फटका मारुन पंतचे बाद होणे किंवा भारतीय गोलंदाज व फलंदाज ह्यांना एकत्रितपणे चांगली कामगिरी न करता येणे जमतील तितक्या टाळाव्यात. अग्रलेखाकडे नजर फिरवावी आणि न समजणारे तीन शब्द सापडल्यावर अग्रलेख वाचणे थांबवावे. नाश्ता आटोपल्यावर स्वयंपाकघरातील हिरव्यागार भाज्यांकडे लक्ष देऊन प्रसन्न व्हावं. ह्या क्षणी पंधरा मिनिटं सोशल मीडियाला बहाल करावीत पण ती केवळ वाचकाच्या भूमिकेत. कोणत्याही विषयावर आपले मतप्रदर्शन करणे प्रकर्षानं टाळावे. ह्यानंतर सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असल्यानं कार्यालयीन कामात शिरण्याची मानसिक तयारी करावी. शर्टाला इस्त्री करणे हा ह्या मानसिकेत शिरण्याचा जालीम उपाय आहे. लॅपटॉप, मोबाईल ही सर्व आयुधं विद्युतप्रभारीत करून ठेवावीत. पुढील नऊ तास फेसबुक लाईक, टिपण्णी, व्हाट्सअप चर्चा आणि ब्लॉग हिट्स संख्या ह्याकडे दुर्लक्ष करावे. रात्रौ नऊच्या आसपास कार्यालयीन कामं आटोपल्यावर जेवण आटोपून मगच मोबाईल हाती घ्यावा. जो काही धुमाकूळ, वादविवाद घालायचे असतील ते ह्यावेळी घालावेत. पार्श्वभूमीवर जुनी हिंदी गाणी सुरु ठेवावीत. रात्री दहा वाजता वाय फाय बंद करावे ! 

महर्षीनी त्या कागदावर नजर फिरवली आणि म्हणाले - "शुभस्य शीघ्रम !" 

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

जीवना कसा मी असा !


सद्यकाळात माणसं आपापल्या कोशात जाऊ लागली आहेत. माणसांच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती पुर्वापार अस्तित्वात होत्याच. सध्या त्यात काहींची भर पडली आहे तर काही अस्तित्वातील प्रकारांना सद्यकालानं नवीन पैलू प्राप्त करुन दिले आहेत. 

आशावादी आणि निराशावादी हा पूर्वापार चालत आलेला माणसांच्या वर्गीकरणाचा प्रकार! सध्या आशावादींना आपली मनोवृत्ती कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत तर निराशावादींना आपल्या स्वभाववैशिष्ट्यांना अनुकूल असे वातावरण सापडलं असल्यानं ते निराशेच्या गर्तेत खोलवर जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. 

आशावादी माणसांनी मनुष्यजातीच्या दृष्टिकोनातून पाहता एक अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी ती म्हणजे ही सकारात्मकता आपल्या भोवतालच्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांत पसरवायला हवी. ही सकारात्मकता पसरविताना समोरच्या माणसाचा विश्वास बसेल असे स्पष्टीकरण, अशी उदाहरणं द्यायला हवीत. मनुष्यजातीच्या बाबतीत सदैव चांगल्याच घटना घडतील असे नाही. मनुष्याचा इतिहास पाहता ह्याहून अधिक खडतर काळाला आपल्या पूर्वजांना सामोरे जावे लागले आहे; तेही तंत्रज्ञान इतके प्रगत नसताना. त्यावेळच्या माणसांना बहुदा जीवनाकडून सदैव आनंद अपेक्षित नव्हता. आपण मात्र सदैव आनंदी राहण्याची अपेक्षा करतो आणि तिथंच जीवन आपला वारंवार अपेक्षाभंग करतं. 

परत एकदा कोशात जाण्याकडं वळून माणसांच्या वर्गीकरणाचा एक नवीन प्रकार पाहुयात. पहिला प्रकार म्हणजे सदैव आपल्या भ्रमणध्वनीमध्ये / गॅझेटमध्ये गुंतून राहणारी, तिथे भेटणाऱ्या आभासी किंवा खऱ्या माणसांशीच जोडली जाणारी माणसं. ही माणसं अनुकूलतेच्या शोधात वेगवेगळ्या मालिका, चित्रपट धुंडाळत राहतात, किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या माणसांशीच संपर्क जोडत राहतात. ह्या विश्वातून प्रत्यक्ष जीवनात जो काही थोडा काळ ते येतात त्या वेळी ते कमीतकमी संवाद साधत असतात. ह्याउलट काही माणसांनी अजूनही स्वतःला ह्या मोहापासून दूर ठेवले आहे. प्रत्यक्ष जीवनातील वैविध्यपूर्ण माणसांसोबत संवाद साधणे किंवा आयुष्यातील खडतर प्रसंगाना स्वतःहून सामोरे जाणे असले प्रकार ही माणसे स्वखुशीने करत असतात. 

माणसांचा प्रकार कोणताही असो पण आपल्या नकळत आपल्या मेंदूत एक स्वतःविषयी आपल्याला कसं वाटत आहे / आपण कितपत आनंदी आहोत  ह्याचा एक निर्देशांक वावरत असतो. माणसं आपल्या अर्थाजनासाठी जो नोकरी व्यवसाय करतात त्यावेळी हा निर्देशांक बासनात गुंडाळून ठेवला जातो. दिवसातील ज्या क्षणी आपण त्या दिवशीची नोकरी व्यवसायाची आणि कौटुंबिक जबाबदारी आटपतो त्यावेळी हा स्वखुशीचा, आत्मसन्मानाचा निर्देशांक उसळी मारुन बाहेर येतो आणि माणसं ह्या निर्देशांकाच्या इच्छेनुसार वागू लागतात. ह्या अनुषंगानं माणसांचा एक नवीन प्रकार अस्तित्वात आला आहे.  जीवन ज्यांना ह्या निर्देशांकाच्या मर्जीनुसार काही काळ व्यतीत करण्याची संधी देते अशी काही माणसं तर ज्यांना देत नाही ती उरलेली माणसं !

कोणत्याही कोशाचा अतिरेक वाईटच ! प्रत्येक दिवस आपल्याला आयुष्य नव्या पद्धतीनं जगण्याची संधी देत असतो. आपल्या मागील आयुष्याच्या जीवनपद्धतीला कुरवाळून बसण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण नव्या पद्धतीनं दैनंदिन जीवनाकडं पाहण्याचे कष्ट क्वचितच घेतो. 

मनुष्यांच्या जीवनात हल्ली जास्त ताणतणाव का निर्माण झाला आहे ह्याचा मला प्रश्न पडतो. पण बहुदा ह्याचं उत्तर सोपं असावं असं मला वाटत रहातं. मनुष्यांची संख्या तर वाढलीच आहे; त्याचबरोबर स्वतःविषयी भ्रामक आत्मसन्मानाच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. ह्या आत्मसन्मानाच्या कल्पना आपल्या सभोवतालच्या वास्तविक आणि आभासी जीवनात विशिष्ट लहरी सोडत राहतात. जेव्हा दोन भिन्न व्यक्तींच्या भिन्न ध्येयाने प्रेरित लहरी एकमेकांवर आदळतात तेव्हा तणावनिर्मिती होते. काही काळानंतर मनुष्यांचा अवास्तव वाढलेला आत्मसन्मान हीच मनुष्यांची सर्वात मोठी समस्या बनणार आहे! मला माझ्या एका ज्येष्ठ अमेरिकन सहकाऱ्याने दिलेला सल्ला मी वारंवार वापरतो. तो म्हणाला होता, "आदित्य, कधीकधी स्वतःकडे गांभीर्यानं पाहणं सोडून दे! आयुष्य सोपं होईल ! 

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

भारत आणि India



आपण दोन वेगवेगळ्या देशात (भारत आणि इंडिया) जगतोय असे विचारवंत अधुनमधून म्हणत रहातात. विचारवंतांना अशी अर्थानी ओतप्रोत भरलेली वाक्यं सोडून सामान्यांना गोंधळवून टाकण्याची सवय आहे. वर्षोनुवर्षे अशा वाक्यांवर विचार करुन गोंधळून  एकदा जवळच्या मित्राजवळ अशा वाक्यांचा अर्थ न कळल्याची खंत मी बोलून दाखवली. तर तो अगदी सहज म्हणाला, "अरे त्यांना देखील त्याचा पूर्ण अर्थ कळला आहे असं थोडंच ! ज्याला जसा कळला तसा त्याचा अर्थ ! जशी हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट होती तसं !" ह्या मित्राचे मी चरण धरण्याचे बाकी होतो ! 

पण एकंदरीत खरं आहे हे विधान! आर्थिकदृष्ट्या, सामाजिक भानाच्या दृष्टिकोनातून आणि अनेक बाबींचा विचार करता प्रत्येक बाबतीत आपल्या भोवताली दोनच नाही तर अनेक प्रकारच्या (spectrum) व्यक्ती आढळतात.  आपण आपला दृष्टिकोन घेऊन सर्वांशी जीवनव्यवहार करत असतो; आपल्या भोवतालचे त्यांचा दृष्टिकोन घेऊन आपल्याशी वागत असतात. त्यामुळं नक्कीच मतभेद होत राहतात. "पूर्वीसारखी दुनिया राहिली नाही, अजून जिवंतपणी काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक!" हे देखील मागील पिढीतील लोकांचं आवडतं वाक्य. हल्लीची म्हणजे चाळीशी / पन्नाशीला आलेली पिढी सहसा हे वाक्य बोलताना आढळत नाही. समाज बदलण्याची इच्छा अथवा क्षमता नसली तरी समाजपरिवर्तनाची मोठाली विधानं करण्याची सवय मागच्या पिढीत होती. ऐकून बरं वाटायचं. कधीतरी दुनिया बदलेल अशी आशा वाटायची. हल्लीची पिढी शक्यतोवर ह्या विधानाचा वापर करताना दिसत नाही. इंटरनेट बंद पडायचं सोडून बाकी काहीही झालं तरी दुनियेचं काही बिघडत नाही ह्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. 

जरा खोलात शिरलं, तर "पूर्वीसारखी दुनिया राहिली नाही, अजून जिवंतपणी काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक!" ह्या विधानामागं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भारतीय संस्कृतीच्या जतन करण्याची इच्छा होती. एक व्यक्ती म्हणून जरी शक्य नसलं तरी एक समाज म्हणून आपण ह्या भारतीय संस्कृतीच्या जतनीकरणात हातभार लावु शकू हा ठाम विश्वास होता. दुर्देवानं आजच्या पिढीचा आपण एका समाजाचा घटक आहोत ह्यावरचाच  विश्वास ढळत चालला आहे. हे विधान बहुदा शहरांपुरतं योग्य असावं. शहरात आपल्याला आपला समाज दिसत नाही, जाणवत नाही. इथं समाज म्हणजे एखादा जात, भाषा, धर्म हे अधिष्ठान असलेला लोकसमूह नव्हे तर चांगल्या सुसंस्कृत जीवनाच्या ध्येयासाठी झटणारा लोकसमूह हा अर्थ अभिप्रेत आहे. 

समाजाशी असलेलं आपलं दैनंदिन आणि भावनिक जीवनातील नातं संपुष्ठात आलं की त्याचे अनेक विपरीत परिणाम होऊ शकतात. आपण कदाचित कमी संवेदनशील बनत असू, पैसे देऊन सर्व सेवा विकत घेता येतील ह्या तत्वांवर आपला दृढ विश्वास होऊ शकतो. पैसे नसतील तर आयुष्यात चांगलं असं काहीच होऊ शकत नाही असं वाटू लागतं. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान हमीभाव मिळाला पाहिजे ह्या विधानाशी जो थोडासुद्धा मानसिकदृष्टया जुळू शकत नाही, त्या माणसाची समाजापासून दूर जाण्याची प्रक्रिया अगदी पुढील टप्प्यात गेली आहे असे आपण म्हणू शकतो. 

वरील प्रश्न कदाचित India भागात प्रकर्षानं जाणवत असतील. पण हे प्रश्न आहेत हे करण्याची त्यांची कदाचित तयारी सुद्धा नसेल. ह्यापुढील पिढीत हे मुद्दे अजून गहन होत जाणार! एका स्वकेंद्रित समाजाकडे आपली वाटचाल होत राहील. त्यामुळं आपले प्रश्न आपणच सोडविण्याची तयारी करावी लागणार हे खरं ! समाजप्रिय, सणांना महत्व देणारे आपले समाजजीवन कायम कधीच टिकणार नव्हते. कारण आपले समाजजीवन टिकवायचे असेल तर आपली स्वतःची अर्थव्यवस्था बळकट हवी. पूर्वी एखादी संस्कृती जगभर पसरायची ती कदाचित सैन्यबळावर, आज कदाचित त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीवर तिथल्या संस्कृतीचे भवितव्य ठरते. जोवर दुसऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला पूरक म्हणूनच आपली अर्थव्यवस्था कार्यरत राहील तोवर आपल्या संस्कृतीची जोपासना करणे अधिकाधिक कठीण होत राहील! 

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

चाकोरीबाहेर




चाकोरीबाहेर जगण्याची इच्छा सद्यकालीन बहुतांश जनांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. किंबहुना समाजातील सद्यकाळाला अनुसरुन सर्वसाधारण जगणं म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था ह्यांचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे. ह्या व्यक्ती, संस्था ह्यांच्या अनुपस्थितीमुळं आपल्या वागण्यावरील अंकुश नाहीसा होत आहे. त्यामुळं जाणता अजाणता बहुतांश लोक त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी जगलेल्या जीवनापेक्षा वेगळं असं जीवन जगत आहेत.  

चाकोरीबाहेरील जगण्याची एक किंमत चुकवावी लागते ह्या गोष्टीचा असं जगणं जगु इच्छिणाऱ्या व्यक्तींना सुरुवातीला अंदाज येत नाही. ही किंमत चुकविणे ही काही अगदी अवघड गोष्ट आहे असं नव्हे पण ते सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी तुमच्याकडं खरोखर काही कौशल्य असायला हवं ! नाहीतर मोठ्या उत्साहानं घेतली भरारी, गगनी जाता गोंधळली स्वारी अशी अवस्था होण्याची दाट शक्यता असते. 

उगवणारा दिवस कसा असेल ह्याविषयी खात्री नसणे,  आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे ह्याविषयी विचारांची सुस्पष्टता नसणे, जवळच्या नात्यांना टिकविण्यासाठी जो वेळ खर्च करावा लागतो तो नसणे, गैरसमजांना दूर ठेवण्यासाठी जे भावनिक बंध निर्माण करावे लागतात त्यासाठी  मनाची असणारी आवश्यक प्रगल्भता नसणे हे सारे घटक चाकोरीबाहेर जगण्याच्या निर्णयाच्या सोबत आपल्याला स्वीकारावे लागतात. 

चाकोरीबाहेरील जगणे दोन पातळीवरील आहे.पहिली पातळी आहे ती एक समाज म्हणून आपण मागच्या पिढीच्या तुलनेनं चाकोरीबाहेरील जगणे जगत आहोत; पण ह्यात आपल्या सर्वांचा काही प्रमाणात नाईलाज आहे. आता हे जे काही बदल झाले त्यामुळं आपली जी ठोस नियमांत न बसणारी जीवनशैली निर्माण झाली त्याला पुढील पिढीसाठी चाकोरीतलं जगणं असं म्हणण्याची आपली इच्छा होऊ शकते. 

चाकोरीबाहेरील जगण्याची दुसरी पातळी म्हणजे वरील परिच्छेदातील एक समाज म्हणून निर्माण झालेल्या चाकोरीबाहेरील जगण्याहुन वेगळी अशी काही व्यक्तींनी निर्माण केलेली स्वतःची अशी जीवनशैली ! इथं मी चाकोरीपलीकडील जगणं म्हणजे काय ह्याचं एकही उदाहरण न दिल्यानं काहीशी अस्पष्टता आपल्या मनात राहील. पण हे जाणीवपूर्वक आहे. चाकोरीबाहेरील जगणं म्हणजे काय ह्याचा अर्थ व्यक्तीनुसार बदलतो आणि म्हणूनच मी मला अभिप्रेत असलेला अर्थ इथं नमूद करुन ह्या पोस्टद्वारे तुमच्यामनात येणाऱ्या विचारांना संकुचित करू इच्छित नाही ! 

चाकोरीत जगणाऱ्या लोकांना आयुष्याच्या उत्तरार्धात मनात काहीशी खंत निर्माण होऊ शकते. देवाने दिलेलं एकच आयुष्य, अगदी सर्वसाधारणपणे जगलो, विशेष काही वेगळं केलं नाही ही ती खंत ! स्वकेंद्रित जीवन जगावं ह्या विचारसरणीचा झपाट्यानं प्रसार होत असल्यानं त्याग हे ज्याचं अधिष्ठान आहे अशा चाकोरीतील जगणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होत जाणार आहे. आणि आपल्यासमोर येणार आहे तो स्थिर मनाचा अभाव असणाऱ्या लोकांची बहुसंख्यता असणारा एक आर्थिकदृष्टया सबळ समाज ! 

सोमवार, १९ जुलै, २०२१

गहन ही प्रक्रिया




व्यावसायिक जगात दैनंदिन विविध प्रक्रिया गुण्यागोविदानं घडत असतात. खरंतर त्या गुण्यागोविंदानं पार पडाव्यात म्हणून पडद्यामागं अनेक कलाकार मंडळी अविरत कार्यरत असतात.  माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अशाच काही प्रक्रियांबद्दल अत्यंत सखोल अभ्यास करण्यात आला. त्या चर्चेत मी सहभागी झालो. बरेच आठवडे लांबलेल्या ह्या चर्चेत विद्वान लोकांनी अनेक जुन्या संकल्पनांना उजाळा दिला आणि काहींना जन्म दिला. 

ह्या चर्चेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही व्यावसायिक प्रक्रियेचे काही महत्वाचे घटक असतात. 

सर्वात पहिला महत्वाचा घटक म्हणजे ती प्रक्रिया सुरु करण्याची कोणीतरी केलेली कृती. मी समजा टी शर्ट विकत घेणार आहे तर त्या टी शर्टच्या संगणक किंवा मोबाईलवरील प्रतिमेवर मी केलेला माऊस क्लिक, हा ह्या प्रक्रियेचा जनक. 

दुसरा घटक म्हणजे ही प्रक्रिया कशी घडावी ह्याविषयी त्या प्रक्रियेसंबंधी जबाबदार लोकांनी घालून दिलेले नियम. टी शर्ट विकत घेताना त्याच्या मूळ किमतीवर आदित्याच्या प्रोफाईलनुसार किमतीत किती फेरफार करायचा, आदित्यला जर हा टी शर्ट जंगलात नेऊन द्यायचा असेल तर त्यावर किती जास्तीची किंमत लावायची वगैरे वगैरे. 

तिसरा घटक म्हणजे त्या प्रक्रियेच्या प्रत्येक आवर्तनावर ठेवलेले नियंत्रण (Execution) ! ह्या सर्व प्रक्रियेतील विविध स्क्रीन्स प्रत्येक आवर्तनात ग्राहकांसमोर एका मागोमाग एक विशिष्ट क्रमानेच यायला हव्यात. 

चौथा घटक म्हणजे ही सर्व माहिती माहितीभंडारात साठवून ठेवणे. 

पाचवा घटक म्हणजे पहिल्या चार घटकांमध्ये समन्वय साधण्यास जबाबदार असणारी मंडळी ! त्याला Orchestrator असे भारदस्त नाव आहे. 

सहावा घटक म्हणजे लेखापरीक्षणासाठी पुढील काही वर्षे ह्या सर्व घटकांची, प्रक्रियेची माहिती व्यवस्थित साठवून ठेवणे. 

पोस्टचा विषय आता खरा सुरु होतोय.  व्यावसायिक जगाला विसरा हो ! आज पहिली शिफ्ट करुन लवकर मोकळा झालोय म्हणून तर हे सारे सुचतंय.  आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या एखाद्या प्रक्रियेला ह्या संकल्पनेचे पांघरुण घालण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारात तर बऱ्याच घटना घडत असतात. काही दररोज घडतात, काही साप्ताहिक, मासिक, वार्षिक तर काही कधीही घडू शकतात. अचानक मला पुरणपोळी बनविण्याची प्रक्रिया आठवली.  ह्या प्रक्रियेचे विश्लेषण करावं असं वाटलं. 

पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेतील पहिला घटक हा दोन प्रकारचा असू शकतो. एक तर दरवर्षी येणारी होळी ज्यात वार्षिक नियमितता आहे. दुसरा घटक म्हणजे घरातील मंडळींनी गृहिणीकडे पुरणपोळी बनवावी असा धरलेला आग्रह.  

ह्यातला दुसरा घटक पुरणपोळी कशी बनवावी ह्याविषयी त्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले नियम . दोन चपात्यांमध्ये पुरण पसरवून पुरणपोळी बनविणं ह्या एखाद्या घराण्यातील ग्राह्य नियम असू शकतो. फक्त त्याची ग्राह्यता घरात प्रस्थापित केली गेली पाहिजे. 

तिसरा घटक Execution म्हणजे पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेतील विविध उपक्रियांचा ठरविलेला क्रम आणि त्यांच्यासाठी ठरवून दिलेला वेळ. प्रत्येक पुरणपोळी बनविताना तो ठरलेला क्रम, ठरलेली वेळ चुकता कामा नये.  

चौथा घटक (काहीसे स्वातंत्र्य घेत) पुरणपोळ्या डब्यात नीट साठवून ठेवणे.   

पाचवा घटक म्हणजे घरातील कोणी एक व्यक्ती जी ह्या पहिल्या चार घटकांमध्ये समन्वय साधेल.  सर्व काही नीट घडलं तरच घरातील सदस्यांच्या ताटात खुसखुशीत पुरणपोळी पडणार.  

सहावा घटक लेखापरीक्षण ह्याचा संबंध कसा जोडावा हे काहीसं समजेनासं झालं.  पण मग लक्षात आलं की समजा कधी चुकून पुरणपोळ्यांचे गणित चुकलं तर ते का चुकलं ह्याची सविस्तर माहिती उपलब्ध असावी. पुढील दहा वर्षात भांडणात ह्या चुकून बिघडलेल्या पुराणपोळ्यांचा उल्लेख आला तर ह्या माहितीचे स्मरण असणे आवश्यक ठरेल! 

बघा म्हणजे घरात इतक्या अनेक प्रक्रिया घडत असतात. ह्यातील प्रत्येक प्रक्रियेत बऱ्याच वेळा हे वरील सहा घटक असतात. म्हणजे एकाच घरात एकाच वेळी किती अनोन्यसंबंध असणाऱ्या विविध प्रक्रिया आणि घटक घडत असतात. घरातील विविध मंडळींनी ह्यातील जमेल त्या प्रक्रिया आणि घटक ह्यांत परस्परसंमतीने भाग घ्यावा. ह्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा जर कोणी सदस्य घरात असेल तर उत्तमच !  

रविवार, २८ मार्च, २०२१

आदर्शवाद आणि वास्तविकता


आज सकाळी वसईतील थोर विचारवंतांनी एक सुवचन सर्वांसोबत शेयर केलं. 

(Degree of) Idealism increases in direct proportion to one's distance from the problem - John Galsworthy

आदर्शवादाचे प्रमाण तुमच्या मुळ प्रश्नापासूनच्या अंतराच्या समप्रमाणात असतं.  

खोलवर विचार करायला भाग पाडणारं सुवचन आहे हे ! आदर्शवाद ही काही वेळा चैनीची बाब असु शकते.  आदर्शवादी विधान करुन तुम्ही शांतपणे गोल्फ खेळायला जाऊ शकता किंवा चहाचे घुटके घेत आवडीचं संगीत ऐकू शकता.  अधुनमधून मी मराठीतील नामांकित वर्तमानपत्राच्या अग्रलेखावर नजर फिरवतो. इतिहासातील मोठमोठ्या तत्ववेत्त्यांच्या विधानांचा, मराठीतील जुन्या सुवचनांचा आधार घेत सद्यकालीन अधिकारपदावरील व्यक्तींवर टीकेचे आसुड ओढणे हा ह्या अग्रलेखकारांचा  आवडता छंद आहे. त्यांच्या वाचकांना सुद्धा त्यांचे हे शालजोडीतील वाचुन आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. 

आदर्शवाद आणि वास्तववाद ह्यात बऱ्याच वेळा मोठी दरी निर्माण होते. तरीही जगाचं रहाटगाडं व्यवस्थित चालण्यासाठी दोघांची आवश्यकता आहे. आदर्शवाद प्रत्येक व्यवसायात वेगवेगळ्या रुपात आढळतो. शाळातपासणीसाठी येणारे इन्स्पेक्टर, ऑफिसात येणारे ऑडीटर, काही घरातील पालक हे आदर्शवादाचे प्रतिनिधी! आदर्शवादाच्या Point Of View (दृष्टिकोनाचे) प्रतिनिधित्व करणारे ! काळानुसार ज्याची उत्क्रांती होते तो खरा आदर्शवाद ! नाहीतर त्या आदर्शवादाचं टिकुन राहणे कठीण राहते ! 

आपण व्यावसायिक क्षेत्रातील व्यवस्थापकाचे उदाहरण घेउयात ! इथं स्त्री व्यवस्थापकाचे उदाहरण घेतले आहे ! ही बिचारी वास्तविकतेच्या ओझ्यानं दबलेली असते. तिच्या बऱ्याचशा कृती विविध गट अगदी भिंगातुन निरखुन पाहत असतात.तिची  टीम जे काही आउटपुट देत असते ते विविध मापकदंडाच्या कठोर तपासणीखाली खरं उतरत आहे की नाही हे पाहण्यासाठी ऑडिटर लोकांचा संघ बसलेला असतो. तिच्या टीमने जी काही डिलिव्हरी केली आहे ती आपल्या requirement पासुन थोडीदेखील विचलित झालेली आढळली किंवा थोडी उशिरानं आली तर ग्राहकवर्ग तक्रार करण्यास तयारच असतो. हे सर्व काम करुन घेताना ही व्यवस्थापक आपल्या कर्मचारीवर्गाला चांगली वागणूक देत आहे की हे पाहण्यासाठी HR संघ सदैव जागृत असतो. ऑडिटर, ग्राहक, HR ही मंडळी त्या व्यवस्थापकाच्या व्यावसायिक जीवनातील आदर्शवादाची रुपं ! ह्या विविध आदर्शवादांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत वेळ उरलाच तर ती आपल्या घरगुती जीवनातील भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते ! पुरुष व्यवस्थापकाची गोष्ट काही ह्याहुन वेगळी नाही! बऱ्याच वेळा व्यावसायिक जीवनात आदर्शवाद अंमलात आणण्याचा प्रयत्न करताना आपल्या घरगुती जीवनात त्याला अपराधी भावनेनं जगावं लागतं !

ह्यात मला एकच मुद्दा सांगावासा वाटतो ! दैनंदिन पातळीवरील व्यवहार चालु ठेवण्यासाठी वास्तविकता आवश्यक असते ! ही वास्तविकता ठरवुन दिलेल्या नियमांपासुन एका विशिष्ट प्रमाणाबाहेर ढळू देणार नाही ह्याची चिंता आदर्शवाद वाहतो ! आदर्शवाद मानवी मुल्यांचे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करीत राहतो.  हे हस्तांतरण स्वीकारण्यास दुसरी पिढी कितपत तयार आहे ह्यावर त्या समाजाचे स्वास्थ अवलंबुन असते! हे हस्तांतरण स्वीकारण्यास तयार नसलेला समाज काही उदाहरणांमध्ये आदर्शवादाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न करतो. सध्या भोवताली जे काही चाललं आहे त्यात हेच घडत असावं असं वाटण्याजोगी परिस्थती आहे ! 

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

Ecosystem - परिसंस्था


 

भुतलावरील प्रत्येक व्यक्ती ही जगाची, देशाची, राज्याची, कंपनीची, सोसायटीची आणि तत्सम मानवनिर्मित प्रत्यक्ष वा आभासी सीमारेषांची अथवा गटांची सदस्य असते. ह्या प्रत्येक गटात समाविष्ट झाल्यावर ही व्यक्ती त्या गटाच्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत राहते. ह्या सर्व प्रकाराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहणारी ही आजची पोस्ट ! 

ह्या पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्क्रांती गेले कोट्यवधी वर्षी होत आहे. ह्या  प्रक्रियेमध्ये विविध जीव वेगवेगळ्या स्वरुपात भुतलावर अवतीर्ण झाले. त्यातील काही जीवांनी भोवतालच्या वातावरणातील बदलाला यशस्वीरीत्या तोंड दिले, तर काहींना ही बाब जमली नाही. डायनासॉरसारखे काही जीव परिसंस्थेच्या जीवनकालातील काही काळ बाकीच्या जीवांवर वर्चस्व गाजवु शकले, पण कालांतरानं झालेल्या बदलाला तोंड देता न आल्यानं नष्ट झाले. 

हे झाले एक दृश्य उदाहरण. पण आपल्याभोवती अशा अनेक परिसंस्था अदृश्य स्वरुपात अस्तित्वात असतात. आपण ह्या परिसंस्थेतील प्रभावशाली घटकांना एकतर ओळखण्यात कमी पडतो किंवा त्यांच्याशी कशा प्रकारे वागावं ह्याचा शास्त्रीय दृष्टीनं विचार करुन ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यात कमी पडतो. अशा काही परिसंस्थेच्या उदाहरणांकडे वळण्याआधी आपण परिसंस्थेत अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या स्थानाविषयी बोलुयात. 

परिसंस्थेत एखादी सदस्या  ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी तिला जी भुमिका दिली गेली असते त्या भूमिकेनुसार परिसंस्थेवर प्रभाव टाकण्याची  एक विशिष्ट क्षमता प्रदान केली गेली असते. विशिष्ट भुमिकेत राहुन परिसंस्थेवर प्रभाव टाकण्याची एक मर्यादा असते. ह्या मर्यादेपलीकडे प्रभाव टाकण्यासाठी सदस्याला वेगळ्या भुमिकेत शिरावं लागतं. वेगळ्या भुमिकेत स्वतःच्या  इच्छेनुसार हवं तेव्हा शिरता येत नाही. परिसंस्थेने प्रभावी भुमिकेत शिरकाव करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे घालुन दिली असतात. ह्या मार्गदर्शक तत्वानुसार विशिष्ट प्रभावी भुमिकेत शिरण्यासाठी आपण बाकी इच्छुकांपेक्षा अधिक पात्र आहोत हे त्या परिसंस्थेतील निर्णय घेणाऱ्या पंचमंडळींना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मार्गानं पटवुन देण्याची जबाबदारी आपली असते. 

वरील परिच्छेदाचे महत्व काय हे समजुन घेण्यासाठी आपण विशिष्ट उदाहरण पाहुयात! एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एका विशिष्ट कंपनीत काम करणारा कर्मचारी त्या कंपनीतील एका विशिष्ट विभागात बनल्या गेलेल्या परिसंस्थेचा घटक असतो. काही कर्मचाऱ्यांना आपलं जे काही स्थान आहे ते फक्त टिकवुन ठेवण्यात रस असतो. जोवर बाह्य घटक ह्या परिसंस्थेच्या समीकरणांवर घातक हल्ला चढवत नाहीत तोवर ह्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य स्थिर चालु शकते. मंदीसारख्या बाह्य घटकांमध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात खळबळ माजविण्याची क्षमता असते. 

कंपनीत काही जणांना प्रगतीच्या शिड्या वेगाने चढुन जायची इच्छा असते. इथं त्यांना परिसंस्थेच्या समीकरणांचे खोलवर ज्ञान असणे आवश्यक असते. कोणत्याही यशस्वी कंपनीमध्ये वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना आपलं स्थान टिकविण्यासाठी सातत्यानं उत्कृष्ट कामगिरीची आवश्यकता भासते. उत्कृष्ट कामगिरीच्या व्याख्या वेगानं बदलत राहतात. त्यामुळं ह्यातील काही वरिष्ठ पदांवरील व्यक्ती त्या स्थानांवरुन बाहेर फेकल्या जातात आणि कनिष्ठ पदातील व्यक्तीला ह्या स्थानावर जाण्याची संधी मिळु शकते. बऱ्याच वेळा अशी घटना ह्या कनिष्ठ व्यक्तीच्या ध्यानीमनी नसताना घडु शकते. त्यामुळं आपण आपल्या कामगिरीद्वारे, आचरणातून परिसंस्थेकडे सातत्यानं योग्य संदेश पाठवत आहोत ह्याचं भान राखणं आवश्यक असतं. 

काही परिसंस्थेतील समीकरणं by default एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले कौशल्य, त्या व्यक्तीची देहबोली ह्यासाठी अनुकूल असतात. त्या परिसंस्थेत ही व्यक्ती लवकर स्थिरावते, तिची वाढ जोमानं होते. तर काही वेळा ही समीकरणं प्रतिकुल असतात. मग व्यक्तीची चिडचिड होण्याची शक्यता निर्माण होते. एखाद्या परिसंस्थेत आपण स्वीकारलो गेलो आहोत की नाही ह्याचे पुरेसे संदेश परिसंस्था आपल्याकडं पाठवत राहते. हे संदेश आपल्यासाठी आहेत आणि त्यांचा नक्की अर्थ काय हे जाणुन घेण्याची परिपक्वता आपणाकडे हवी. काही जणांना हे अजिबात समजत नाही. अशावेळी अशी माणसं सदैव चिडचिड करत राहतात; पर्यायानं स्वतःचा  आणि परिसंस्थेचा वेळ घालवितात, नुकसान करतात. 

परिसंस्थेतील संघर्षाच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपल्यासाठी अनुकूल दुसऱ्या परिसंस्थेचा शोध घेणं इष्ट असतं. परंतु सद्य परिसंस्थेपेक्षा अधिक योग्य नवीन परिसंस्था शोधणं आणि तिथं स्थिरावणं हे कष्टदायी काम असतं, त्यात अनिश्चितता बऱ्याच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं बरेच लोक ह्या धोक्याला सामोरे जाण्यास तयार होत नाहीत. पण मग ह्या जाणीवपुर्वक निर्णयानंतर स्वतःची आणि भोवतालच्या लोकांची कमीतकमी चिडचिड व्हावी इतका तरी प्रयत्न करावा. 

कंपनीतील आयुष्य हे परिसंस्थेचे केवळ एक उदाहरण! लग्नानंतर मोठ्या एकत्र कुटुंबात प्रवेश करणारी सुन, मोठ्या सोसायटीच्या व्हाट्सअँप ग्रुपवर प्रवेश करणारा सदस्य अशी अनेक उदाहरणे आहेत जिथं परिसंस्थेची संकल्पना लागु पडते! 

जाता जाता आहिस्ता आहिस्ता ह्या चित्रपटातील निदा फाजली आणि खय्याम ह्या गुणवान जोडगोळीची ही संरचना ! 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता 

कहीं जमीं तो कहीं आसमा नहीं मिलता !

शुक्रवार, १९ जून, २०२०

Clarity of Thought Process !


कल्लोळ हा माणसांच्या वाढत्या संख्येमुळे होत नाही, तर तो माणसांच्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि सरलतेपासुन फारकत घेतलेल्या भावभावनांमुळे होतो. सद्यकाली ज्या माणसाला / स्त्रीला विचारप्रकियेतील सुस्पष्टता साध्य झाली तो माणुस / ती स्त्री सुखी झाली!  आयुष्यातील तुमच्या विचारप्रकियेतील सुस्पष्टता विविध टप्प्यात कोणत्या पातळीवर असावी ह्याची उकल करण्याचा हा प्रयत्न !

१. तुमची विविध कलागुणातील, क्षेत्रातील  क्षमता ! ह्यातील एक क्षेत्र कदाचित तुम्ही उपजिवीकेसाठी निवडलं असेल. आपण निवडलेल्या क्षेत्रात केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपण कुठवर पोहचू शकतो आणि प्रचंड मेहनत घेऊन कुठवर पोहचु शकतो हे जाणुन घेण्याची सुस्पष्टता ज्यांना लाभली, ते भाग्यवान ! 

प्रचंड मेहनत घेऊन जर आपण वरिष्ठ स्थानी पोहचु शकत असलो तर त्या स्थानाचे महत्व आणि त्या मेहनतीमुळं आपल्याला करावे लागणारे त्याग ह्याचा हिशोब ज्यांना करता आला ते भाग्यवान !

आपण निवडलेलं उपजीविकेचं क्षेत्र जबरदस्त प्रमाणात चुकलं ह्याची जाणीव चाळिशीनंतर होऊनसुद्धा जी माणसं त्याच्याकडं अगदी तटस्थ भावनेनं पाहु शकतात ती माणसं भाग्यवान !

२. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांच्या अचुकतेविषयी प्रौढी मिरवणं अथवा चुकांबद्दल पश्चाताप करणे ज्यांना टाळता आलं ते भाग्यवान !

३. जगात अब्जावधी लोक आहेत. त्यातील काही टक्के लोक यशस्वी होणार, काही लोकांची निवड राष्ट्रीय संघात होणार पासुन काही लोक नगरसेवक होणार ! व्यक्तीच्या दृष्टीकोनातुन पाहिलं तर हा तुमच्या नशिबाचा वगैरे खेळ असु शकतो ! पण जगाच्या दृष्टीतुन हा केवळ शक्यतांचा खेळ असतो. तुमची गुणवत्ता, योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्ही हजर असणे, काही योग्य लोकांची तुमची विचारसरणी जुळणं वगैरे घटक तुम्ही कुठवर जाऊन पोहोचता हे ठरवतात. त्यामुळं माझं नशीबच खराब वगैरे नाट्यमय वाक्य स्वतःशीच बोलणं टाळावं ! Probability ची संकल्पना आपल्यालाही लागु पडते हे ज्यांना समजलं ते भाग्यवान !

४. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर यशांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. काही  यशं / अपयशं लोकांना दृष्य स्वरुपात जाणवतात तर काही जाणवत नाहीत ! लोकांच्या नजरेस पडलेल्या तुमच्या यशस्विता / अयशस्वितेच्या पलीकडं जाऊन तुमच्या मनाला सुख देणारी काही यशं असतात. ती तुमच्या मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यात तुम्ही कायम बाळगुन ठेवु शकता ! हे ज्यांना उमगलं आणि अशा यशांचा पाठलाग करता येणं ज्यांना जमलं ते भाग्यवान !

५. जगातील बहुतांश लोकांच्या  आयुष्यात तुमचं स्थान विशिष्ट काळापुरता असतं. त्यानंतर ही माणसं अचानक तुमच्या आयुष्यातुन गायब होतात. कदाचित तुम्हीही लोकांच्या बाबतीत असं वागला असाल! त्यामुळं आपण ज्यांच्यात भावनिकदृष्ट्या गुंतलो आहोत ते आपल्याशी अशा प्रकारे वागु शकतात ह्याची जाणीव ज्यांना आहे ते भाग्यवान !  जिथं दोन्ही बाजुंनी आयुष्यभराचं व्यक्त / अव्यक्त नातं ठेवण्याची आस आहे अशी नाती ओळखता येणं आणि निभावता येणं हे ज्यांना जमलं ते भाग्यवान !

६. आपण अधुनमधुन चुकीचं वागतो! आपल्या चुका ज्यांना  लगेच, काही कालावधीत जाणवतात आणि ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी त्यांना ह्या चुकांबद्दल योग्य व्यक्तींची माफी मागु देते त्या व्यक्ती भाग्यवान ! 

७. आज जेवण काय करावं, कोणता शर्ट घालावा, ऑफिसात जाताना कोणता मार्ग घ्यावा, दीडशे रुपयाला ३ पापलेट्स घ्यावी की तीनशेला ८ असल्या प्रश्नांवर १० सेकंदात निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्ती भाग्यवान !

७. शेवटी शुक्रवारी सकाळी ब्लॉगपोस्ट लिहिण्याची जिद्द करुन आपल्या ऑफिसच्या कामाचा पुरता गोंधळ उडू शकतो, आपले प्रियजन आपल्यावर वैतागु शकतात ह्याची जाणीव असुनही ही जिद्द जो जोपासु शकतो तो ..... !!!

मंगळवार, २ जून, २०२०

समजुतदारपणाचा लेखाजोगा आणि Corona Times!!!


काही माणसं जन्मतः समजुतदार असं म्हटलं जातं. समजुतदार म्हणजे काय ह्याचा थोडा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न !

सामाजिक जीवन सुरळीत चालण्यासाठी मनुष्यजातीने शेकडो वर्षांच्या अनुभवांच्या आणि सामुहिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कायदे बनविले आहे. या कायद्यांच्या जोरावर सामाजिक जीवन सुरळीतपणे चालवण्याची मनिषा शासनकर्ते बाळगुन असतात. जर समाज सुशिक्षित आणि सुविचारी असेल तर शासनकर्त्यांची हे मनिषा बऱ्यापैकी पूर्ण होते. परंतु मनुष्यांच्या एखाद्या छोट्या समुहाच्या दैनंदिन कामकाजात  सुरळीतपणा हवा असेल तर तिथं कायदे लागू करता येणं शक्य नसते. 

प्रत्येक कुटुंबाचे, एखाद्या मित्रमंडळींच्या गटाचे आणि सामाजिक संस्थांचे काही अलिखित असे नियमअसतात. हे अलिखित नियम त्या गटांत वावरण्यासाठी सदस्यांना एक चौकट घालुन देतात.  ही चौकट काहीशी ऐच्छिक असते. त्यामुळं अलिखित नियम, बंधनांचा अभाव हे सर्व घटक अस्तित्वात असतानादेखील जी व्यक्ती प्रसंगी स्वतःकडे पडती बाजु घेत सामुहिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी पुढाकार घेते तिला समजूतदार व्यक्ती असे आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. 

आता प्रत्येक व्यक्तीचा समजुतदारपणा कुठून येतो याकडे आपण वळूयात! व्यक्तीला जन्मतः समजूतदारपणाची पुंजी मिळालेले असते. ही मूळ पुंजी बहुतांशी वेळा त्या व्यक्तीच्या वयानुसार अनुरुप असे रुप घेत त्या व्यक्तीचा समजूतदारपणा आयुष्यभर कायम ठेवण्यास मदत करते. समजूतदारपणाचे लहानपणीचे उदाहरण म्हणजे सर्व मुलं एकत्र खेळत असताना आपला चेंडू असूनही सदैव पहिल्या फलंदाजीचा आग्रह न धरणे हे असू शकते! मोठं झाल्यावर समजूतदारपणाला बहुआयामी बनावं लागतं!  आपल्याशी कठोर वागणाऱ्या लोकांशी आपणसुद्धा तसंच वागायला हवं हा अट्टाहास न धरणे हा समजूतदारपणा असू शकतो!!

आपल्याला समजूतदारपणाची जी पुंजी लहानपणी मिळालेली असते ती तशीच्या तशी आयुष्यभर पुरणे किंबहुना तिच्यावरील विश्वास अढळ रहाणे तसे कठीणच! समजूतदारपणा हा काही फुकटात येत नाही. समजुतदारपणा दाखवणाऱ्या व्यक्तीला त्याची काही प्रमाणात किंमत मोजावी लागते! काहीजणांना  त्यासाठी त्याग करावा लागतो तर कधी होणारा मानसिक संताप आतल्याआत दडून ठेवावा लागतो. 

ही शक्ती त्या व्यक्तीला नक्की देतं कोण?  प्रत्येक समजूतदार व्यक्तीचा समजुतदारपणावर विश्वास ठाम राहण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्यातरी एका आश्वासक स्त्रोताचा पाठिंबा लागतो. हा स्त्रोत "तू समजूतदार आहेस" आणि "जगाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, त्यामुळे तू सदैव समजूतदारच राहा" असे आणि तत्सम संदेश त्या व्यक्तीला सदैव देत राहतो !! 

आता पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळुयात ! कोरोनामुळं मनुष्यजातीचा सरासरी समजुतदारपणा आधीच खालावला गेला आहे. बरीच लोक आपल्या नेहमीच्या वर्तवणुकीच्यापेक्षा काहीशा वेगळ्या वर्तवणुकीचे प्रदर्शन करु लागले आहेत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी ! सामाजिक जीवनातील काही घटक बऱ्याचजणांना आपलं मनःस्वास्थ्य टिकवुन ठेवायला मदत करतात. ह्या स्वास्थ्यकारी स्त्रोतांशी संपर्क तुटल्यानं आणि हा संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्याचा नक्की कालावधी माहित नसल्यानं माणसं बैचैन झाली आहेत. 

अशा वेळी समाजातील समजूतदार व्यक्तींची जबाबदारी अधिकच वाढली आहे. आपल्या भोवताली वावरणाऱ्या व्यक्तींपैकी कोणाचं मनःस्वास्थ्य हे Breaking Point च्या आसपास पोहचत तर नाही ना ह्यावर ह्या मंडळींनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणं आवश्यक आहे. 

आता प्रश्न असा येतो की सामान्य परिस्थितीतील समजुतदार / समजंस माणुस कोरोना काळातील सुद्धा समजंस माणुस असेलच का? त्यांचे स्वास्थ्य टिकवणारे स्रोत त्यांना उपलब्ध राहतील का? समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा ह्या प्रश्नांची उत्तरच येत्या काळातील एखाद्या विशिष्ट समाजाच्या वाटचालीत महत्वाचा भाग घेतील ! एक वेळ करोनानंतर आर्थिक नुकसानीतुन बाहेर पडणे सोपं असु शकेल पण तुटलेल्या भावबंधांना जोडणं हे मात्र कठीण ठरु शकतं !


आदित्य पाटील 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...