दोन पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर होत राहतं. आयुष्य हा मोठा कालावधी आहे. त्यामुळं ज्या कालावधीत आपल्या ह्या नात्यात थोडाफार तणाव निर्माण होतो त्यावेळी काही काळ शांत राहणं योग्य असं माझं मत! काही वर्षात संदर्भ बदलतात, आपण दुसऱ्या भुमिकेत प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या भूतकाळातील भुमिकेमागील विचारसरणी अधिक स्पष्टपणे समजू शकते. त्यामुळं कधीही कोणाविषयी टोकाचे गैरसमज करून घेऊ नयेत. प्रत्येकजण आपल्या भूमिकेत थोड्या प्रमाणात का होईना बरोबर असतो, प्रत्येकाच्या वागण्याबोलण्यामागे काही तरी कारण असतं.
आम्ही वाढलो तो काळ वेगळा होता. भारतानं मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं नव्हतं. माझ्या पहिली नोकरीत (जी मी पहिल्या आठवड्यातील गुरुवारी सोडली) मला मोजका पगार मिळणार होता. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित नोकऱ्या भारतात अत्यल्प प्रमाणात असल्यानं पारंपरिक नोकऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. पारंपरिक नोकऱ्यांचे प्रमाण अगदी कमी होतं. त्यावेळी असलेल्या कमी पगारांमुळं स्वतःच घर घेण्याचा विचार जर केलाच तर तो वयाच्या चाळीस - पंचेचाळीशीनंतर करावा अशी मनोधारणा होती.
घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असली तरीही पैसे जपून वापरावेत ही मानसिकता होती. हॉस्टेलला जाताना आठवड्याभरासाठी शंभर रुपये घेऊन जात असू, आणि ते ही पुरेसे होत. वसई स्टेशन ते रमेदी हे तिकीट बहुदा एक रुपया होते. ह्या बससाठी आम्ही अर्धा अर्धा तास स्टेशनवर वाट पाहत असू.
हे सर्व सांगण्याचा हेतू हा केवळ त्याकाळची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सांगणं इतकाच आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही बऱ्यापैकी आनंदी होतो. 'दिल ही छोटा, छोटी सी आशा !' असला प्रकार होता. मी फारसा महत्वाकांक्षी नव्हतो. आयुष्यावर नियंत्रण मिळवावं असं वाटावं इतका आत्मविश्वास बहुदा नव्हता. अशी पार्श्वभूमी सोबतीला घेऊन आम्ही व्यावसायिक जीवनात आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात प्रवेश करणार होतो. केवळ प्रामाणिक मनोभावनेने व्यावसायिक, वैवाहिक जीवनात प्रयत्न करत जीवन व्यतित करावं ही मानसिकता होती आणि जी आमची एक मोठी जमेची बाजू होती.
त्यानंतर आयुष्य जसं उलगडत गेलं तसं आम्ही त्याला स्वीकारलं. आयुष्यातील सुरुवातीच्या काळात मिळालेल्या शिकवणुकीमुळं भविष्यात जर बिकट परिस्थिती उद्भवली तर आपल्याजवळ अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकी तरी बचत असावी हा विचार आम्ही कायम आयुष्यभर बाळगला. २००४ साली अमेरिकेत असताना निर्वासित लोकांच्या निवाराघरात जाऊन मी स्वयंपाक केला होता. वीस - पंचवीस कोबी कापले होते. त्यावेळी तिथल्या संचालिकेने सांगितलेले बोल माझ्या सदैव लक्षात राहिले आहेत. ती म्हणाली, "ही लोक ह्या निर्वासितांच्या छावणीत राहत आहेत म्हणून ह्यांच्याकडे तुच्छतेनं पाहू नका. अमेरिकेतील कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाचे ओळीनं तीन - चार निर्णय चुकीचे ठरले तर त्याच्यावर ही पाळी येऊ शकते." हे वाक्य जरा जास्तच प्रमाणात माझ्या डोक्यात भरून राहिलं आहे.
हल्लीच्या काळात विवाह का करावा हा मोठा गहन प्रश्न बनला आहे. माणसं जसजशी आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक स्वावलंबी होत चालली तसतसं हे घडणं क्रमप्राप्तच होतं. विवाहानंतर जीवन परिपूर्ण होतं असं आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? नक्कीच नाही. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो, कोणतंही जोडपं आदर्शवत नसते. माणसाला आयुष्यभर आपल्या सर्व त्रुटींसह स्विकारणारं, आपली सर्व भयं ज्याला अगदी मोकळेपणानं सांगू शकतो, ज्याला हक्काने आपल्या महत्त्वाच्या क्षणी हाक मारु शकतो असं कोणीतरी हवं असतं. लहानपणी ही भूमिका बजावणारे आईवडील, भावंडं आयुष्यभर आपल्याला पुरे पडू शकत नाहीत. आपला साथीदारच आपल्याला अशी साथ देऊ शकतो किंबहुना त्यानं/ तिनं अशी साथ द्यावी अशी अपेक्षा असते. बहुतेक सर्वांसाठी एकटेपणा हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकण्याची शक्यता असते. मराठीत म्हण आहे - 'रिकामी मन सैतानाचे घर' ! माणूस एकटा राहिला की मनात नको नको ते विचार येतात, खाण्यापिण्याच्या वेळांवर, आहारावर नियंत्रण राहत नाही. माणसाला फारसा मोकळा वेळ मिळू न देणं हा विवाहसंस्थेचा एक छुपा फायदा आहे.
आता चर्चेचा ओघ "योग्य साथीदाराची निवड कशी करावी ?" ह्या मुद्दयाकडे नेऊयात. आयुष्यभर आनंदानं विवाहबद्ध राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आयुष्यभराच्या कालावधीत पती पत्नी दोघांच्या स्वभावात बरेच बदल घडत असतात. लग्नाआधी समोरच्या माणसाची जी ओळख आपल्याला असते ती बहुदा हिमनगाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या भागाइतकी असते. माणसाचं खरं रूप त्याच्यासोबत चोवीस तास राहायला सुरुवात केल्यानंतर समजायला लागतं. पण ह्यात एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आपल्याला आपणच किती कळलो आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे. लग्नाआधीचं स्वातंत्र्य काही / बऱ्याच प्रमाणात लोप पावतं. पण ही काही नकारात्मक गोष्ट नाही. लग्नानंतर आपल्याला आपली ओळख पटली आणि साथीदाराच्या वागण्याची कल्पना आली की आपण आपल्यात योग्य असे बदल घडवून आणून ह्या नात्यात गोडवा आणू शकतो. Every relationship needs a owner. हे स्वामित्व स्त्री किंवा पुरुष ह्यापैकी कोणीही घेऊ शकतं. ह्या स्वामित्वात मला नक्की काय अभिप्रेत आहे? सुरुवातीच्या काळात काही वेळा शाब्दिक अपमान सहन करावा लागणं, घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी घेणं, वाद झाल्यावर इगो बाजूला ठेऊन काही वेळानं पुन्हा संवाद सुरु करण्यात पुढाकार घेणं अशा काही गोष्टींचा समावेश होतो. आपल्या साथीदाराला नक्की काय आवडतं, कोणती गोष्ट अजिबात खपत नाही ह्याची अभ्यासपूर्ण माहिती करून घेणं हे महत्वाचं असतं.
हे मुद्दे लक्षात घेता आपला साथीदार व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणे ही सुखी वैवाहिक जीवनातील एकमेव महत्वाची गोष्ट नाही हे आपल्या ध्यानात येईल. हल्ली स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक स्त्रीने आपल्यापेक्षा वरचढ असा साथीदार मिळावा अशी अपेक्षा बाळगणं योग्य ठरणार नाही. लौकिकार्थाने कमी यशस्वी नवऱ्याकडे एक चांगला माणूस म्हणून पाहणं हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या पार्श्वभूमीवरून (background) त्याविषयी पूर्वग्रह बनवू नये.
साथीदाराने आपल्या महत्वाच्या क्षणी आपल्यासाठी उपलब्ध असणं ही प्रत्येक विवाहित व्यक्तीची महत्वाची गरज असते. आणि हे उपलब्ध असणं हे केवळ त्या जागी असण्यानं नव्हे तर मनानं तिथं पूर्णपणे असण्यानं असावं. साथीदाराविषयी असणारी Empathy हा वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणारा सर्वात मोठा घटक आहे. ही Empathy आपल्या वागण्यातून, आपल्या संवादशैलीतून प्रतित व्हायला हवी. हे सर्व मुद्दे काहीसे विस्कळीत स्वरूपात मांडले आहेत पण ह्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यावसायिक यश हा एकमेव मुद्दा आपल्या साथीदाराची निवड करताना डोळ्यासमोर नसावा.
ह्यापुढील विचार अस्ताव्यस्त असणार आहेत. त्यामुळं संयम बाळगावा ही विनंती.
१. अमेरिकेत २००७ सालापर्यंतच्या वास्तव्यात माझ्या संपर्कात आलेल्या काही अमेरिकन सहकाऱ्यांच्या बाबतीत एक समान धागा दिसून आला होता. ह्या सर्वांच्या पहिल्या लग्नाची परिणिती घटस्फोटात झाली होती. पण त्यामुळं हताश न होता त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यात मात्र हे पठ्ठे गुण्यागोविंदानं नांदत होते. माझा त्यावेळचा माईक त्या कालावधीत माझ्याशी बऱ्यापैकी मोकळेपणानं बोलायचा. त्यानंच एकदा सहजपणं सूचित केलं की पहिल्या लग्नबंधनात प्रवेश करताना ही माणसं बहुदा अवास्तव अपेक्षा बाळगत असावीत. पण दुसऱ्या लग्नात मात्र त्यांचे पाय जमिनीवर आलेले असतात, सहचारिणीशी जुळवून घेण्यासाठी जे काही बदल घडवून आणावे लागतात त्यांची मानसिक तयारी त्यांनी केलेली असते. काहीसा मनोरंजक मुद्दा!
२. अमेरिकेत असताना अजून एक गोष्ट वारंवार जाणवायची. सार्वजनिक आयुष्यात बरेच नियम सामोरे यायचे आणि सर्वजण त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करायचे. त्यामुळं आयुष्य अगदी सुरुळीतपणे पार पडायचं. रस्त्यावरील सिग्नलचे पालन,मार्गिकांना उगाचच छेद न देणारे चालक, मोठाल्या दुकानात वर्षोनुवर्षे मिळणाऱ्या ताज्या भाज्या, मासे, केक ह्यामुळं मेंदूवर ताण असा पडायचा नाही. आपल्या देशात कसा मेंदू अगदी सतर्क अवस्थेत राहतो. कार चालवताना उजव्या, डाव्या बाजूने अचानक अवतीर्ण होणारे बाईक / रिक्षावाले, वाटलं म्हणून समोरून आत्मविश्वासानं रस्ता पार करणारा पादचारी ह्यामुळं मेंदू जागृत असतो. ह्या उदाहरणातून घेण्याचा मुद्दा हा की आपल्या मेंदूला एकदा की सुस्पष्ट पर्याय उपलब्ध असलेले आयुष्य जगायची सवय झाली की थोडी जरी क्लिष्ट परिस्थिती आली की तो बिचारा गोंधळून जातो.
३. वरील उदाहरणाचा दाखला घेऊन एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धतीत वाढलेल्या मुलांचा विचार करूयात. एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलांना आयुष्यात चूक किंवा बरोबर, आनंद किंवा वाईट ह्यामधील ज्या असंख्य छटा आयुष्य आपल्यासमोर सादर करू शकतं त्या दैनंदिन जीवनात अगदी सहजासहजी पाहायला मिळायच्या. त्यामुळं लग्नाला (आयुष्यातील अशी एक घटना जी आपल्यासमोर चूक किंवा बरोबर ह्यामधील अगणित शक्यता सादर करू शकतं) सामोरं जाताना ही मुलं अजाणतेपणी त्यासाठी सज्ज झालेली असायची. "दैनंदिन आयुष्यात तू चुकलास" असं कोणी सांगितलं तर मोठा प्रलय आला अशी परिस्थिती उद्भवत नाही ही शिकवणूक एकत्र कुटुंबपद्धतीनं दिल्यानं नवरे मंडळींना सतत त्यांच्या चुका दाखविल्या गेल्या तरीही आपण आयुष्यात काही बरोबर करूच शकत नाही असा न्यूनगंड वगैरे निर्माण होत नसे.
४. वरील उदाहरणाचे दूरगामी परिणाम झाले. स्त्रियांना एकत्र कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य अनुभवायला न मिळाल्यानं त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. हळूहळू त्याचं परिवर्तन प्रत्यक्ष आचरणात यायला लागलं. काहींनी ही स्वातंत्र्याची कास स्वतः धरली तर काहींनी हे बीज आपल्या पोटात वाढणाऱ्या पुढच्या पिढीकडं सुपूर्द केलं. पुढील पिढीला अनुकूल वातावरण मिळाल्यानं त्यांनी आपल्या आचारविचारांतून ह्या स्वातंत्र्याला कवटाळलं. हे स्वातंत्र्य मिळालं, ज्याची आस धरली ते मिळाल्याचा déjà vu क्षण आला. पण पुढं काय? आयुष्य खूप दीर्घकालीन असतं. विविध टप्प्यावर ते आपल्याला एकच प्रश्न वारंवार विचारत राहतं. गतआयुष्यातील आपल्या निर्णयांचं परीक्षण करायला भाग पाडत राहतं. नव्या पिढीनं हा मुद्दा ध्यानात घ्यायला हवा.
५. Giving it back to Society - समाजऋणाची परतफेड - मनुष्यजातीच्या आरंभीस बलवान टोळ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर बुद्धिमान माणसांनी आपल्या बुद्धीद्वारे हळूहळू समाजव्यवस्थेचा ताबा घेतला. पुढं हे चालू ठेवायचं असेल तर सुशिक्षित स्त्री - पुरुषांनी आपला वंश पुढे वाढवायला हवा. ह्या मुद्द्यामुळं मला बुरसटलेल्या विचारसरणीचा संबोधिण्यात येण्याची शक्यता ध्यानात घेऊन सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित करत आहे.
६. सद्यपिढीने दाखविलेला संवादकलेचा प्रचंड अभाव - सद्य पिढीनं विवाहसंस्थेविषयी बहुतांश नकारात्मक संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवले. चाळीस - पन्नास वर्षे संसार केलेली जोडपी सुद्धा जेव्हा सर्वांसमोर एकमेकांचा अपमान करतात, पूर्ण आयुष्याचा फक्त आणि फक्त नकारात्मक हिशोब मांडतात, तेव्हा ही विवाहसंस्था फक्त दिखाऊ / दांभिक आहे का असा विचार नवीन पिढीच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. विवाहसंस्थेच्या बाबतीत व्यक्त केल्या जाणाऱ्या नकारात्मक संदेशाच्या तुलनेत अगदी खरेखुरे वाटणारे सकारात्मक संदेश तुलनेनं खूपच कमी आढळतात.
७. तिरंगी सामना - हा केवळ माझा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांत मांडल्यामुळं मी वेडा आहे अशा निष्कर्षापर्यंत तुम्ही कृपया येऊ नकात. सर्वशक्तिमानानं विश्वाची निर्मिती केली. मनुष्यानं हळूहळू आपल्या बुद्धीचे प्रताप दाखविण्यास सुरुवात केली. भूमातेवरील सर्वोत्तम बुद्धिमान माणसांनी जर आपल्या प्रज्ञेचा पुरेपूर वापर केला तर कधीतरी ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या वर्चस्वाला आव्हान देऊन कदाचित आपल्याला विस्थापित करतील असं भय हल्ली सर्वशक्तिमानाला वाटू लागलं असावं. त्यामुळं मनुष्यांना विचलित करण्यासाठी त्यानं संगणकांच्या माध्यमातून AI / ML चा किडा आपल्या डोक्यात घुसवला आहे. AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक भविष्यात सर्वशक्तिमान आपल्या बाजूनं ओढून घेईल आणि मग सुरु होईल तो सर्वशक्तिमान आणि AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक एका बाजूला आणि बुद्धिमान माणसं दुसऱ्या बाजूला असा लढा ! आता ह्या सर्वात विवाहसंस्थेचा संबंध काय हे अजून तुम्हांला कळलं नसेल तर सांगू इच्छितो की बुद्धिमान मनुष्यांच्या मनात "पुढील पिढी निर्माण करण्याचं प्रयोजनच काय?" असल्या नसत्या शंका निर्माण करण्याचं काम सर्वशक्तिमान करत आहे. नवीन पिढीनं हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
लेखाची सुरुवात कुठं झाली आणि शेवट कुठं झाला !! असो मी आणि लेख जरी भरकटला असला तरी ह्यातील महत्वाचे मुद्दे ध्यानात घ्यावेत ही विनंती ! आणि मुद्दा ७ हा खासच आहे, त्यावर नक्की विचार करा!!
वा छान
उत्तर द्याहटवा