मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
व्यावसायिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यावसायिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

ज्ञानकण!




अलीकडच्या काळात वाचनात / ऐकण्यात आलेले काही ज्ञानकण 

१) कोणत्याही कंपनीत जसजसं तुम्ही वरच्या पदावर जात राहता तसतसं तुमच्या जबाबदारीमधील संदिग्धतेचे प्रमाण वाढत जाते; त्याचबरोबर अपयशाबद्दल सबबी देण्याची तुम्हांला दिलेली सवलत झपाट्यानं कमी होते. 

२) भले तुम्ही तुमच्या संघटनेमधील छोटे मोठे निर्णय घेण्याचा अधिकार कनिष्ठ पातळीकडे सुपूर्द करु शकता, (किंबहुना तो तुम्ही तसा करायलाच हवा) परंतु त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी मात्र सदैव तुम्हांकडेच राहील. 

३) हल्लीच्या काळातील एक लोकप्रिय वाक्य ! ज्या गोष्टी / जे गुण  तुम्हांला एका विशिष्ट पदापर्यंत घेऊन येतात, त्याच गोष्टींच्या / त्याच गुणांच्या आधारे त्यापुढील वाटचाल आपण करु शकु हे मानणं चुकीचं ठरु शकतं. 

४) विधान ३ ला आव्हान देणारं विधान ! तुमच्यातील उणिवांवर सदैव लक्ष देऊ नकात ! तुमच्या सामर्थ्यस्थळांवर लक्ष दिल्यास तुम्ही पुढे बरीच मजल मारु शकाल ! 

५) विधान ४ ला पुरक विधान ! तुमच्यातील उणिवा ह्या जन्मीच दुर करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या उणिवा झाकणाऱ्या माणसांचं कोंडाळं तुमच्याभोवती गोळा करा ! ह्या माणसांची करियरमध्ये योग्य प्रगती होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची ! 

६) आपण एखादया पदावर खरोखर प्रभावीपणे काम करत आहोत की नाही ह्याचा शहानिशा करणं म्हटलं तर अवघडच ! त्या भुमिकेच्या मानसिकतेमध्ये राहुन हे परीक्षण करणं शक्य नाही. ज्याप्रमाणे रंगमंचावर विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला आपल्या भुमिकेची सार्थता जाणुन घेण्यासाठी गॅलरीत स्वतःला कल्पून स्वतःकडे अलिप्तपणे पाहता यायला हवं त्याचप्रमाणे विशिष्ट पदावर काम करणाऱ्या आपल्या स्वतःचे गॅलरीत बसुन आपणास परीक्षण करता यायला हवं ! 

७) काही न करता चहा / कॉफीचा कप हातात घेऊन एखादया उद्यानातील कारंजांचा आनंद घेण्याची क्षमता तुमच्याकडं असावी ! न जाणो अशा स्थितीतुनच तुम्हांला स्वतःचा Gallery View घेण्याची क्षमता विकसित करता येईल. 

८) पुरेशा माहितीअभावी निर्णय घेता येत नाही म्हणुन निर्णय घेणं पुढं ढकलणं हे एका विशिष्ट वेळेनंतर खुप चुकीचं / गुन्हेगारी स्वरुपाचं ठरतं. उपलब्ध माहितीला पुरेशा माहितीत परिवर्तित करण्यासाठी भोवतालच्या वातावरणाची तुम्हांला सखोल माहिती असावी. आपण ह्या बाबतीत जर कमी पडत असु तर त्याची तुम्हांला तात्काळ जाणीव व्हायला हवी !

९) जर तुमच्या कामाचं स्वरुप, तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सतत तणाव आणत असतील तर काही काळ स्वतःला गांभीर्यानं घेणं सोडुन द्या ! काही ठिकाणी तुम्ही प्रभाव पाडु शकला नाहीत तरीही पृथ्वी फिरायची काही थांबत नाही !

१०) चिकाटी , जिद्द, अपयशानं खचुन न जाणं हे मोठे गुण आहेत ! बंद खोलीच्या आत होणाऱ्या मोठ्या पातळीवरील मिटींग्स मध्ये तुम्ही सदैव विजयी होणार नाहीत ! परंतु त्यातुन जर तुम्ही योग्य धडा घेण्याची क्षमता दर्शविलीत तर  तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे !


आदित्य पाटील 

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

आजच्या युवकवर्गासमोरील आव्हानं !


वसई येथील सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ गेले कित्येक वर्षे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन बालक पालक मेळावा आयोजित करत असतं. ह्या वर्षीच्या बालक पालक मेळाव्यात त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

आज इथं मी सद्यकालीन नोकऱ्यांची अशाश्वतता या विषयावर बोलणार आहे.  आज नोकरी करणारा तरुण वर्ग आपल्या नोकरीच्या शाश्वततेविषयी जी काही गृहितके बाळगून आहे त्याविषयी त्यांच्या वैधतेविषयी आपण चर्चा करुयात. काही काळापूर्वी नोकऱ्यांमध्ये वयाच्या ५८- ६० वर्षांपर्यंत शाश्वती असायची, त्यानंतर निवृत्तीवेतन मिळायचं! एकंदरीत नोकरवर्गाचं जीवन शाश्वत असायचं! आज परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे.  नोकरीमध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्या पदासाठी आवश्यक कौशल्यं सतत बदलती असतात. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या तरुणवर्गाचे उदाहरण  आपण विचारात घेऊयात. त्यांनी समजा माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन  क्षेत्रात नोकरी घेतली असेल तर प्रत्येक वर्षी त्यांचा पगार वाढत जातो. आपण त्यांना मिळणारा पगार आणि कंपनीच्या दृष्टीने त्यांच्याकडे असणारी आवश्यक कौशल्ये यांचा आलेख काढला असता त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा एक क्षण येतो की त्यांना त्या पदावर ठेवणे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हा  क्षण येतोच असे नाही. काहीजण काळाची पावले ओळखून आपली कौशल्ये सतत विकसित करत राहतात. त्यामुळे ते यशाच्या पायऱ्या चढत जातात.  आपली कौशल्ये कशी  विकसित करत जावी हा एका  वेगळ्या संवादाचा विषय आहे. 

परत एकदा मूळ मुद्द्याकडे वळुयात! काळानुसार आपण आपली कौशल्यं विकसित न केल्यास आपलं करिअर हे साधारणतः ४० ते ४५ वयाच्या आसपास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकू शकते याची जाण तरुण वर्गाने ठेवावी. या अनुषंगाने येणारा पुढील मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन! हल्ली चांगल्या कंपन्यात नोकरीला लागलेल्या तरुणवर्गाच्या मागे कर्ज देणाऱ्या कंपन्या हात धुऊन पाठी लागलेल्या असतात. त्यांनी जाहिरात केलेल्या मालमत्तेचे अथवा कारचे वर्णन आपल्याला भुरळ पाडू शकते.  मग त्याचा परिणाम म्हणून आपण मोठाली कर्जे घेऊन बसतो. काही काळानंतर वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीमधील उच्च पदावरील तणाव आणि मासिक हप्ते वेळेवर भरण्याचा तणाव अशा विविध तणावांच्या गर्तेत तरुण वर्ग अडकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अंथरुण पाहून पाय पसरावेत या म्हणीची आठवण तरुण वर्गाने ठेवावी. आलिशान जीवनपद्धतीचा मोह नको असं मला म्हणायचं नाही परंतु व्यावसायिक जीवनात आपण नक्की कुठं आहोत ह्याचं भान ठेऊन मगच आर्थिक निर्णय घ्या! आपल्या Financial Liabilities आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरील आपली पकड ह्याची व्यवस्थित सांगड बसवा !

आता या विषयाशी काहीसा संबंधित परंतु वेगळा विचार! तरुण वर्ग आज या स्पर्धेमध्ये का उतरतो? एक समाज म्हणून आपण या तरुणवर्गावर किती दबाव अप्रत्यक्षपणे टाकत आहोत याचीदेखील जाणीव आपणास असणे आवश्यक आहे.  आजही भोवताली कमी तणावाच्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हांला तुमच्या उपजीविकेसाठी योग्य असतात. परंतु आपण समाजात अशा वलयांकित नसलेल्या नोकऱ्या करणाऱ्या तरुण वर्गाला काहीसे दुय्यम स्थान अप्रत्यक्षपणे देत असतो.  साधी नोकरी करणाऱ्या किंवा शेतीवाडी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यासाठी समाज तात्काळ तयार होत नाही हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रशस्त घर, मोठाल्या गाड्या ही प्रतिष्ठेची प्रतिमा आपण निर्माण करत चाललो आहोत;  त्यामध्ये आपण सर्वजण अडकत आहोत. परंतु ह्या या प्रतिष्ठेच्या प्रतिमेमागे असणारी मेहनतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चिततेचे सावट लक्षात असुद्यात. त्यामुळे भविष्याचे नियोजन करताना काहीशी सावधानतेची पावलं उचला अशीच माझी विनंती राहील!

(P.S. पोस्टच्या सुरुवातीचा फोटो आणि पोस्टचा विषय ह्याचा दुरान्वये संबंध नाही!)

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

Right To ... दुसरी बाजू



या विषयावरील मागील आठवड्यात व्हॉट्सऍपवर आलेली पोस्ट वाचली. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी आपली अनुपलब्धता घोषित करण्याचा हक्क आहे ह्याविषयीचं जे बिल मंजुरीसाठी पाठविण्यात आलं आहे त्याविषयी माहिती देणारी ही पोस्ट होती.  

व्यवस्थापक तरुण मुलांना कार्यालयीन वेळेच्या पलीकडे सुद्धा ई-मेल अथवा फोन कॉल करुन कामात गुंतवून ठेवतात. त्यामुळे या तरुणांच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हा त्यात अजून एक मुद्दा होता.  नक्कीच हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्याविषयींची जागरुकता कर्मचारी वर्गांमध्ये आणि खास करुन  व्यवस्थापनामध्ये असावी यासाठी हा लेख महत्त्वाचा होता! 

आज मी इथे काही मुद्दे मांडणार आहे ते दुसरी बाजू लक्षात घेण्यासाठी !!माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काही भूमिका या अत्यंत महत्त्वाच्या असतात.  वित्तीय कंपन्यांच्या मोठाल्या आर्थिक कारभाराची उलाढाल ही मंडळी सांभाळत असतात. ज्यावेळी प्रॉडक्शन विभागामध्ये काही त्रुटी निर्माण होतात,  त्यावेळी प्रत्येक मिनिट हे लाखमोलाचं असतं.  या त्रुटींमुळे प्रत्येक मिनिटाला त्या वित्तीय संस्थेचा हजारो डॉलर्स / पौंडांचा / रुपयाचा तोटा होत असतो.  अशावेळी तुम्ही योग्य माणसाला या त्रुटीनिवारणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करुन घेणे अनिवार्य असते. 
त्यामुळे अशा भूमिकेत जर आपण असाल तर रात्री-बेरात्री सुद्धा फोन कॉल येणे हे तुमच्या जॉब प्रोफाईलचा भाग असतो.  त्यामुळे मी रात्री केव्हाच उपलब्ध असणार नाही हे योग्य विधान ठरू शकत नाही. सरसकट प्रत्येक वेळी मी रात्री उपलब्ध नसेन परंतु जेव्हा अटीतटीचा प्रसंग असेल त्यावेळी मात्र तुम्ही मला संपर्क करू शकता ही अधिक सामंजस्याची भूमिका घेणे इष्ट ठरते. 

प्रॉडक्शन त्रुटीव्यतिरिक्त एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट डिलीवरीची अंतिम तारीख पाळता यावी यासाठी त्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींना कधीतरी रात्रभर थांबावे लागते परंतु नॉन प्रोडक्शन त्रुटींमध्ये हे प्रमाण अत्यल्प असायला हवे हे मात्र खरे!!

तुम्ही ग्राहकाच्या दृष्टीकोनातुन या विशिष्ट परिस्थितीचा विचार केले असता त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अडचणीतुन बाहेर काढणारा कोणी एक मसीहा आवश्यक असतो. आता या मसीहाला झोपेतून उठवावे की नाही हा निर्णय व्यवस्थापकाला घ्यावा लागतो. हा निर्वाणीचा प्रसंग एकदा का निभावून गेला की एका विशिष्ट व्यक्तीवर इतकी अवलंबिता असावी का असावी, आपणाकडे अनेक मसिहा का नसावेत या मुद्द्यांचा ऊहापोह उत्तम संघटना नक्कीच करतात.


इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडू इच्छितो. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र हे पूर्वीइतके आकर्षक आणि सोपे राहिले नाही. इथे स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे.  एका जागेसाठी बाहेर असंख्य उमेदवार उपलब्ध असतात. त्यामुळे तुमची गुणवत्ता हाच एकमेव निकर्ष लावला जात नाही तर तुमची कामाच्या बाबतीतील  बाह्यघटकांशी , सर्वांशी सामावून घेण्याची लवचिकता हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक बनतो.  जर तुमची गुणवत्ता ही अत्यंत उच्च असेल तर तुम्ही लवचिकता वगैरे गुणधर्म बाजूला ठेवू शकता. तुम्ही कसेही वागलात तरी तुमचे डिपार्टमेंट तुम्हाला सामावून घेईल ! पण जर तुम्ही सर्वसामान्यां पैकी एक असाल तर मग मात्र उगाचच मोडेन पण वाकणार नाही असा बाणा दाखवण्यात काही अर्थ नाही . 

जसं जसे तुम्ही सीनियर बनत जातात तसतसं एखाद्या जॉब मध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक मेहनत घ्यावी लागलेली असते.  त्यामुळे केवळ एखाद्या क्षणिक संतापामुळे, छोट्या मतभेदापायी  ही खूप मेहनतीने मिळवलेली पोझिशन सोडून पुन्हा एकदा बाह्य जगतातील लाखो लोकांपैकी एक बनून पुन्हा जॉब शोधण्याचा प्रक्रियेचा भाग बनणे हा काही योग्य पर्याय असू शकत नाही. 

प्रत्येक जॉबची एक अडचणीची बाजू असते. डॉक्टरांनासुद्धा मध्यरात्री बोलावणे येऊ शकतं!  क्रिकेटर, वैमानिकांना महिनोन् महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहावं लागु शकते ! ट्रॅफिक पोलिसाला उन्हापावसात रस्त्यांवर उभं राहुन वाहतुक नियंत्रण करावं लागतं ! त्याचप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना सुद्धा रात्री उशिरापर्यंत कार्यालयात त्यांच्या जॉब प्रोफाईलचा भाग असु शकतो ! ह्या परिस्थितीत बदल घडावा म्हणुन IT क्षेत्र योग्य प्रयत्न करत आहे! हे बदल पुर्ण अंमलात येईपर्यंत कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात हे लक्षात घ्यावे यासाठी ही पोस्ट!

रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

धोरणात्मक दिशा


व्यावसायिक जीवनात एका विशिष्ट पदानंतर आपल्याला धोरणात्मक दिशा ठरवणे आणि दैनंदिन कामात लक्ष देणे या दोन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधावा लागतो. बऱ्याच वेळा दैनंदिन काम कौशल्यानं हाताळण्याची तुमची खुबी तुम्हांला उच्चस्थ पदापर्यंत घेऊन आलेली असते. त्यामुळं दैनंदिन काम चोखपणे पार पाडण्याची सवय तुमच्यामध्ये भिनलेली असते. खरंतर दैनंदिन कामाकडुन लक्ष हळुवारपणे काढुन घेऊन धोरणात्मक दिशा ठरविण्याचा क्षण एकमेव नसतो. हे स्थित्यंतर काही काळ सुरु असतं. परंतु तुम्हांला हे स्वतःला उमजुन घ्यावं लागतं. आणि तुमची कंपनी तुम्हांला हे स्थित्यंतर यशस्वी व्हावं म्हणुन अनेक मदतीची साधनं सुद्धा उपलब्ध करुन देत असते.  

दैनंदिन कामात लक्ष घातले नाही तर त्याचे परिणाम तात्काळ दिसून येतात त्यामुळे आपली नैसर्गिक वृत्तीसुद्धा दैनंदिन कामांकडे लक्ष देण्याची असते. दैनंदिन कामे बऱ्याच वेळा छोट्या छोट्या स्वरुपाची असतात. त्यामुळं ती पुर्ण करुन मिळणाऱ्या instant accomplishment च्या भावनेचा मोह तुम्हांला पडु शकतो. परंतु त्यामुळे होतं काय की तुमचं धोरणात्मक बाबींकडे दुर्लक्ष होतं. धोरणात्मक निर्णयांचा अजुन एक गुणधर्म म्हणजे त्याचे परिणाम दूरगामी असतात आणि त्यांची अचुकता समजायला बराच वेळ द्यावा लागतो. 

कुशलतेने धोरणात्मक निर्णय घेणारे व्यवस्थापक मोठ्या संख्येनं निर्माण करण्यात आपल्याला म्हणावं तसं यश अजुनही आलं नाही. आणि यामागं बहुदा ह्यामागं आपली पारंपरिक मानसिकता आड येत असावी. नवीन शिक्षणपद्धती नक्कीच ही उणीव दुर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु शालेय पातळीवरील कुशल शिक्षकांचा अभाव हा मुलभूत संकल्पना दृढ असलेली पिढी निर्माण करण्याच्या आड येत असावा. त्यामुळं पुढील काळातील भारतीय व्यवस्थापकांची धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या पुढील वाटचालीत महत्वाचा घटक ठरु शकते. 

यात अजून समाविष्ट करण्यासारखा मुद्दा म्हणजे कोणत्याही संघटनेमध्ये मध्ये दोन प्रकारचे व्यवस्थापक असतात. पहिला प्रकार म्हणजे संघटनेच्या कनिष्ठ पदावरून उन्नती करत व्यवस्थापक बनलेले आणि दुसरा प्रकार म्हणजे कंपनीने व्यवस्थापकीय पदासाठी बाहेरून नेमणूक केलेले. ह्या पोस्टमध्ये पहिल्या प्रकारचे वर्णन अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे हा वर्ग धोरणात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीत काहीसा बचावात्मक पवित्रा घेताना दिसून येतो. याउलट बाहेरून आलेला आणि थेट व्यवस्थापक बनलेला वर्ग हा धोरणात्मक निर्णय घेण्यावर आपली शक्ती आणि लक्ष केंद्रित करीत असतो. संघटनेच्या दृष्टीने पाहिलं असता त्यांना या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थापकांचे योग्य मिश्रण आवश्यक असतं.

बऱ्याच वेळा असं आढळुन येतं की दुसऱ्या प्रकारातील व्यवस्थापक मंडळी ही एका कंपनीत दीर्घकाळ राहताना आढळत नाहीत. त्यांना पदोन्नतीच्या शिड्या झटपट चढायच्या असतात. त्यामुळे एखाद्या कंपनीतील धोरणात्मक निर्णय घेऊन जाण्याची संधी संपली की मग ते दुसऱ्या संघटनेच्या दिशेने किंवा त्याच संघटनेतील दुसऱ्या विभागात आपला मोर्चा वळवतात.

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...