मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

ज्ञानकण!




अलीकडच्या काळात वाचनात / ऐकण्यात आलेले काही ज्ञानकण 

१) कोणत्याही कंपनीत जसजसं तुम्ही वरच्या पदावर जात राहता तसतसं तुमच्या जबाबदारीमधील संदिग्धतेचे प्रमाण वाढत जाते; त्याचबरोबर अपयशाबद्दल सबबी देण्याची तुम्हांला दिलेली सवलत झपाट्यानं कमी होते. 

२) भले तुम्ही तुमच्या संघटनेमधील छोटे मोठे निर्णय घेण्याचा अधिकार कनिष्ठ पातळीकडे सुपूर्द करु शकता, (किंबहुना तो तुम्ही तसा करायलाच हवा) परंतु त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी मात्र सदैव तुम्हांकडेच राहील. 

३) हल्लीच्या काळातील एक लोकप्रिय वाक्य ! ज्या गोष्टी / जे गुण  तुम्हांला एका विशिष्ट पदापर्यंत घेऊन येतात, त्याच गोष्टींच्या / त्याच गुणांच्या आधारे त्यापुढील वाटचाल आपण करु शकु हे मानणं चुकीचं ठरु शकतं. 

४) विधान ३ ला आव्हान देणारं विधान ! तुमच्यातील उणिवांवर सदैव लक्ष देऊ नकात ! तुमच्या सामर्थ्यस्थळांवर लक्ष दिल्यास तुम्ही पुढे बरीच मजल मारु शकाल ! 

५) विधान ४ ला पुरक विधान ! तुमच्यातील उणिवा ह्या जन्मीच दुर करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या उणिवा झाकणाऱ्या माणसांचं कोंडाळं तुमच्याभोवती गोळा करा ! ह्या माणसांची करियरमध्ये योग्य प्रगती होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची ! 

६) आपण एखादया पदावर खरोखर प्रभावीपणे काम करत आहोत की नाही ह्याचा शहानिशा करणं म्हटलं तर अवघडच ! त्या भुमिकेच्या मानसिकतेमध्ये राहुन हे परीक्षण करणं शक्य नाही. ज्याप्रमाणे रंगमंचावर विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला आपल्या भुमिकेची सार्थता जाणुन घेण्यासाठी गॅलरीत स्वतःला कल्पून स्वतःकडे अलिप्तपणे पाहता यायला हवं त्याचप्रमाणे विशिष्ट पदावर काम करणाऱ्या आपल्या स्वतःचे गॅलरीत बसुन आपणास परीक्षण करता यायला हवं ! 

७) काही न करता चहा / कॉफीचा कप हातात घेऊन एखादया उद्यानातील कारंजांचा आनंद घेण्याची क्षमता तुमच्याकडं असावी ! न जाणो अशा स्थितीतुनच तुम्हांला स्वतःचा Gallery View घेण्याची क्षमता विकसित करता येईल. 

८) पुरेशा माहितीअभावी निर्णय घेता येत नाही म्हणुन निर्णय घेणं पुढं ढकलणं हे एका विशिष्ट वेळेनंतर खुप चुकीचं / गुन्हेगारी स्वरुपाचं ठरतं. उपलब्ध माहितीला पुरेशा माहितीत परिवर्तित करण्यासाठी भोवतालच्या वातावरणाची तुम्हांला सखोल माहिती असावी. आपण ह्या बाबतीत जर कमी पडत असु तर त्याची तुम्हांला तात्काळ जाणीव व्हायला हवी !

९) जर तुमच्या कामाचं स्वरुप, तुमच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सतत तणाव आणत असतील तर काही काळ स्वतःला गांभीर्यानं घेणं सोडुन द्या ! काही ठिकाणी तुम्ही प्रभाव पाडु शकला नाहीत तरीही पृथ्वी फिरायची काही थांबत नाही !

१०) चिकाटी , जिद्द, अपयशानं खचुन न जाणं हे मोठे गुण आहेत ! बंद खोलीच्या आत होणाऱ्या मोठ्या पातळीवरील मिटींग्स मध्ये तुम्ही सदैव विजयी होणार नाहीत ! परंतु त्यातुन जर तुम्ही योग्य धडा घेण्याची क्षमता दर्शविलीत तर  तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे !


आदित्य पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...