मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

बिबट्या माझा शेजारी


'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्या हक्काच्या वामकुक्षीसाठी निघण्याच्या तयारीत होते. आजचा दिवस तसा शांत गेला होता.  तसंही जगभर काय अगदी आपल्या वॉर्डाच्या पलीकडील कोणत्याही बातमीनं त्रास करून घ्यायची लेले ह्यांना सवय नव्हती. त्यामुळं आपल्या शहरात बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या येत असल्या तरीही तो आपल्या वॉर्डात फिरकणार नाही असा काहीसा त्यांना विश्वास होता. 

लेले आपल्या खुर्चीवरून उठणार तितक्यात 'गुर्रर्र गुर्रर्र' अशा खणखणीत आवाजानं त्यांना दचकवलं. बंद दरवाजा उघडून जसा राजबिंडा बिबट्या कार्यालयात प्रवेश करता झाला तसं लेले ह्यांना ब्रह्मांड आठवलं. आपण भ्रमणध्वनीवर फुकाचा वेळ न घालवता वेळीच घरी गेलो असतो तर हा दुर्धर प्रसंग आपल्यावर ओढवलाच नसता ह्या विचारानं ते प्रचंड अस्वस्थ झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याकडं सुद्धा स्मार्टफोन होता. बिबट्यानं तो चालू केला आणि कोणतंतरी अँप सुरु करून तो गुरकावला. "बसा लेले बसा! घाबरू नका !" स्मार्टफोननं बिबट्याचं म्हणणं लेलेंच्या भाषेत त्यांना सांगितलं. प्रसंगावधान राखून लेलेंनी सुद्धा "बिबट्याजी स्थानापन्न व्हा !" काही थंड वगैरे घेणार का?" अशा शब्दांत त्याचं स्वागत केलं.  

पुन्हा बिबट्या काहीसं स्मार्टफोनमध्ये पुटपुटला. "बिबट्याजी वगैरे काय? मी कोणी होतकरू नगरसेवक वगैरे वाटलो की काय तुम्हांला ?" स्मार्टफोनने बिबट्याच्या भावना लेलेंपर्यंत पोहोचवल्या. "आपण कसं काय येणं केलंत आम्हां गरीबाच्या घरी?" लेलेंचा मेंदू आता खुपच सक्रिय झाला होता. ते जे काही स्मार्टफोनमधील अँप आहे ते बिबट्याला आपल्या भावना चांगल्या प्रकारे पोहोचवत आहे ह्यावर त्यांचा प्रचंड विश्वास बसला होता. 

"मला तुमच्या सोसायटीत फ्लॅट भाड्यानं घ्यायचा आहे !" बिबट्या म्हणाला. "काय, काय म्हणालात? फ्लॅट भाड्यानं घ्यायचाय?" डोळे विस्फारून लेले म्हणाले. "त्यात काय वावगं आहे? आम्ही तुमच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करू?" "आम्ही म्हणजे .. ?" "मी आणि माझी पत्नी !" बिबट्या आत्मविश्वासानं म्हणाला. 

प्रकरण एकदम गंभीर होते. "सोसायटीची सभा बोलवावी लागेल, बहुमतानं जो काही निर्णय होईल तो मान्य करावा लागेल" लेलेंनी आपल्याकडचं प्रभावी शस्त्र बाहेर काढलं. लगेचच बिबट्याच्या चेहऱ्यावरील निर्माण झालेले क्रुद्ध भाव लेलेंनी हेरले. 'सर सलामत तो सभा पचास !" असं आपल्यासाठी म्हणीचे रूप बनवून त्यांनी झटपट सर्व रिकामी अर्ज बिबट्यासमोर मांडले. पुन्हा वैतागलेला बिबट्या पाहून त्यांनी स्वतःहूनच सर्व अर्ज जमतील तसे भरून टाकले. सोसायटीचं नांव पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यांत खुपत होतं. ह्या वेडपट स्मार्टफोनने काननचा अर्थ बिबट्याला सांगितला असावा म्हणुनच तो बाकीच्या चांगल्या चांगल्या सोसायट्या सोडून इथं कडमडला असावा ह्याविषयी त्यांची पक्की खात्री झाली.  दुपारी जेवणाला उशीर झाला म्हणून लेलेंना घरून सारखे फोन येत होते, ते त्यांनी अर्थातच घेतले नाहीत. तासाभरात सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले होते. लेले ह्यांनी सर्व काही धैर्य एकवटून आमच्या सोसायटीच्या सदस्यांच्या जीवाला काही धोका नाही ना असा प्रश्न विचारला. फ्लॅट मिळाल्यानं खुश झालेल्या बिबट्यानं मान डोलावत अजिबात नाही असं खुणेनं सांगितलं. "मी संध्याकाळी माझं सामान घेऊन शिफ्ट होतो" जाता जाता बिबट्या म्हणाला. बिबट्या गेला तसं लगेचच लेलेंनी आपल्यावर ओढवलेला अनावस्था प्रसंग व्हाट्सअँपच्या माध्यमातुन सर्व सोसायटीच्या सदस्यांना कळवला. लगेचच सर्वजण धावत कार्यालयात येतील अशी वेडी आशा लेले बाळगून होते. पण थोड्याच वेळात सर्वजण आपापल्या खिडक्यांतून लेलेंना धीर देण्यासाठी डोकावून पाहत असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं.  वॉचमननं बिबट्याला आत सोडलंच कसं? रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली का? असे प्रश्न घेऊन लेले त्याच्याकडं गेले. बिचारा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबकारे मारल्यानंतर त्याला जागं केलं तर तो जीव मुठीत घेऊन पळून गेला. एव्हाना सोसायटीवर लोकांच्या कल्पनाशक्तीला मोकळं रान मिळालं होतं. लेलेंनी बिबट्याला म्हटलं, "बिबट्या फ्लॅट लेले !" वगैरे वगैरे विनोद लोक टाकत होते. इतक्यात लेलेंना घरून फोन आला. "त्या बिबट्याबरोबर गप्पा मारून झाल्या असतील जेवायला लवकर घरी या ! मी पुन्हा पुन्हा जेवण गरम करणार नाही ! " आज्ञाधारक लेले खाली मान घालून घरी परतले. चप्पल काढून घरात प्रवेश करत नाही तोच "पटकन जेऊन घ्या, ते टीव्ही चॅनेलवाले कधी पोहोचतील ह्याचा भरंवसा नाही. आणि हो त्यांना मुलाखत द्यायची असेल तर ती सोसायटीच्या ऑफिसमध्येच द्या. इथं इतक्या सगळ्या लोकांना चहा करायला दूध घरात नाही आणि कालच ते सर्व घर स्वच्छ पुसून घेतलंय ! बाकी मुलाखत देताना तो दिवाळीत नवीन शर्ट घेतला आहे तो घाला !"  स्वच्छ लादी, संपलेलं दूध आणि आपला जीव ह्यात नक्की प्राधान्यक्रम कसा लावायचा हे लेलेंना समजेनासं झालं. 

संध्याकाळी बिबट्या आणि त्याची सहचारिणी सदनिकेत शिफ्ट झाले. बिबट्या शिफ्ट होतोय म्हणजे नक्की काय करतो ह्याविषयी लेलेंना खूपच कुतूहल होते. "त्यात काय मोठा विचार करायचा? दोन तीन मारलेल्या प्राण्यांना तोंडात घेऊन येतील दोघं?" आत्मविश्वासानं त्यांची बायको म्हणाली. चार वाजता वॉचमन विना भकास वाटत असलेल्या प्रवेशद्वारातुन ते दोघं प्रवेश करते झाले तेव्हा आपल्या बायकोचा अंदाज इतका अचुक कसा काय ठरला हे पाहून लेलेंच्या मनात अभिमान, कौतुक, असूया वगैरे संमिश्र भावना उमटल्या. "मी तुम्हांला सांगितलं होतं ना !" हे वाक्य तिच्या नजरेद्वारे स्पष्टपणे सांगितलं जात होतं. 

महिनाभरानंतर 
कानन सोसायटी आणि लेले इंटरनेट सेलेब्रिटी झाले होते. बिबट्या आणि लेले, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून व्यवस्थित बोलू शकत होते. आपण मॉर्निंग वॉकला एकत्र जाऊयात असं फ्लॅटमध्ये राहून कंटाळलेल्या बिबट्यानं कालच लेलेंना कळवलं होतं. पैसे कमवायची ही मोठी संधी आहे असं लेलेंचा मुलगा म्हणाला होता. बिबट्यासोबत एकत्र चालतानाचे रील्स बनवून इंटरनेट दणाणुन सोडुन टाकुयात असे तो म्हणाला. बाकी बिबट्याच्या चरितार्थाला सुद्धा मदत होईल असं काही करू असे तो म्हणाला. ह्या संवादाने प्रेरित होऊन  "आज खीर चांगली झाली आहे, ती बिबट्याच्या घरी घेऊन जाऊ का? " अशी लेलेंची सौ. त्यांना विचारत होती. 

लिमये, जोशी ह्यांचे कुत्रे घराबाहेर यायलाच तयार नव्हते. त्यामुळं त्यांच्या घरात भलत्याच समस्या उद्भवल्या होत्या. बिबटया स्मार्टफोनवरूनच चिकन, मटण मागवत असल्यानं त्याच्या फिटनेसच्या समस्या होऊ शकतील असे सौ. बिबट्या ह्यांना वाटत होते. बाकी चिकन, मटण घेऊन येणारे डिलिव्हरी माणसं पहिल्यांदा चुकून बिबट्याच्या फ्लॅटपर्यंत गेली होती, पण बिबट्यानं दार उघडताच त्यांची पळता भुई थोडी झाली होती. लेलेंनी वॉचमनची समजूत काढून त्याला परत कामावर बोलावलं होतं. आता तो बिबट्याच्या घरची सर्व डिलिव्हरी खालीच घेत असे. एकंदरीत लेलेंच्या रटाळ आयुष्यात अगदी धमाल सुरु झाली होती. 

बाकी फ्लॅटबाहेर चपला काढून ठेवल्या म्हणून बिबट्याला सोसायटीतर्फे पहिली नोटीस मिळाली. त्या चपलांचा हा तो फोटो !! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बिबट्या माझा शेजारी

'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्...