शनिवार, ६ डिसेंबर, २०२५
बिबट्या माझा शेजारी
बुधवार, ४ जून, २०२५
वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !
मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं. हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली.
आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !
१. आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी.
२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी.
३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन.
४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो. पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते. सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
गेला राक्षस कुणीकडं?
लहानपणी आपण सर्वजण किंवा मी राक्षसाच्या गोष्टींनी अगदी भयभीत होत असू. राक्षस बहुदा गावाजवळील टेकडीवर राहायचा. राक्षसाचा देह महाकाय. त्याला भूक लागली की तो दणादण पावलं टाकीत टेकडीवरुन, पर्वतावरुन खाली उतरत असे. राक्षसानं टेकडीवर रहावं की पर्वतावर हे बहुदा त्याच्या आकारमानावर अवलंबुन असावं.
वाचलेल्या सर्व गोष्टींत राक्षस आणि गावकरी ह्याच्यात व्यवस्थित सामंजस्य होते. बकासुराला महिन्याला गाडाभर अन्नधान्य दिलं की तो गावकऱ्यांना बाकीचे दिवस त्रास देत नसे. ह्याआधीचे राक्षस इतके समजुतदार होते की नाही हे समजायला मार्ग नाही. राक्षसाला मोजकी कामे असावीत. दिवसाचं, आठवड्याचं किंवा महिन्याचं एकदाच खाऊन घ्यावं आणि मग झोपी जावं. पुन्हा भूक लागली की टेकडी, पर्वत जे काही असेल ते उतरावं आणि ...
गोष्टीत कधी वाचलं नाही पण बहुदा राक्षस एकटेच टेकडीवर रहात असावेत. त्यांनाही कदाचित समूहाने राहणाऱ्या माणसांचा हेवा वाटत असावा. ते ही कदाचित रात्री एकटेच टेकडीवर आकाशातील तारकांकडे पाहून उदास गाणी म्हणत असावेत. ह्याचाच परिणाम असेल बहुदा पण कालांतरानं राक्षस त्यांच्या मूळ रुपांतून नाहीसे झाले. एकट्यानं मनुष्यजातीपासुन वेगळं राहणं त्यांना कदाचित आवडलं नसावं. त्यांच्यात उत्क्रांती होत गेली. हळुहळू राक्षस मनुष्यरुपात बाकीच्या माणसांसोबत येऊन राहू लागले.
ह्या पर्वाच्या सुरुवातीच्या कालावधीत कदाचित बाह्यरुपाद्वारे राक्षस आणि इतर मनुष्यगण ह्यांच्यातील फरक समजू शकत असावा. पण त्यामुळं आपल्याला अजुनही वेगळी वागणुक मिळतेय ह्याला कंटाळून राक्षसांच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात मनुष्य आणि राक्षस ह्यांच्या बाह्यरुपातील उरलासुरला फरकही नाहीसा झाला. आता राहिला होता तो केवळ विचारातील, वागण्यातील फरक.
बाकीचा मनुष्यगण इतक्या कालावधीत गप्प बसला होता असे नाही. राक्षसाचे गुणधर्म, विचारसरणी ओळखायला आणि त्यावर मात करायला शस्त्रासोबत मंत्र, बोधपर कथा, संस्कार इत्यादी मार्गांचा अवलंब केला गेला. मनुष्यानं आपल्यावर अजुनही पूर्ण विश्वास ठेवला नाही ह्याचं राक्षसाला खूप वाईट वाटलं असणार. त्यामुळं हळूहळू राक्षसानं आता मनुष्यांच्या मनांत प्रवेश करायला सुरुवात केली. बहुतांश सर्व माणसांच्या वागण्यात आता हे गुण दिसु लागले आहेत.
त्यामुळं वाचकहो, अवतीभोवती टेकडी दिसलं तरी त्यावर राक्षस कुठे दिसतोय का ह्याचा शोध घेऊ नका!
रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१
ते दोन तास
ट्रिंग ट्रिंग ! रविवारी सकाळी घरच्या दूरध्वनीची बेल वाजली तसा मी कुतूहल भावनेनं व्यापून दूरध्वनीकडे गेलो. बरेच दिवसांत ही बेल वाजली नसल्यानं हा दूरध्वनी घरात आहे ह्याचाच मला विसर पडला होता.
मी - "हॅलो"
समोरचा माणूस - "हॅलो " (अति उत्साहानं )
आवाज ओळखीचा वाटल्यानं मी स्मरणशक्तीला ताण दिला.
मी - "अति गंभीर ?"
समोरचा माणूस - "काय ?" (काहीशा रागानं )
मी - "नाही म्हणजे आपण गेल्याच आठवड्यात बोललो ना !" ( सारवासारव करण्याचा प्रयत्न करत )
समोरचा माणूस - "हो तोच तो मी ! कसे आहात पंखवाले !"
मी - "ठीक आहे ! " (काहीशा रागानं )
समोरचा माणूस - "तर थेट मुद्दयाला हात घालतोय मी ! तुमच्या मागच्या आठवड्यातील पंखांच्या कल्पनाविस्तारावर आम्ही म्हणजे आमची कंपनी खूप खुश झाली आहे . त्यामुळं आज आम्ही तुमच्याकडं नवीन प्रस्ताव घेऊन आलो आहे !"
मी - "असं होय "
थोड्याच वेळात मी अतिगंभीर आणि त्याची एक स्त्री सहकारी ह्यांच्या सोबत व्हिडिओ कॉल वर होतो.
अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ प्रभात !"
मी - अतिगंभीरकडे पाहत "आपलं झालंय सुप्रभात!" त्याच्या सहकारीला "सुप्रभात !"
सहकारी - "आजचा आपला विषय आहे - ते दोन तास !"
मी - " लहानपणी शाळेत असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अर्धा तास ह्या विषयावर निबंध लिहिण्याची सवय वगळता मला असल्या विषयावर बोलायची अथवा लिहायची सवय नाही ! आणि मला अभ्यासानं व्यापून टाकल्यानं क्रिकेटर बनता आलं नाही अन्यथा वकार आणि अक्रमसमोर दोन तास असं मी नक्कीच लिहू शकलो असतो "
अतिगंभीर - " म्हणजे त्यांच्यासमोर दोन तास टिकला असता असं म्हणायचं आहे का तुम्हांला ? चांगला आत्मविश्वास आहे तुमचा "
सहकारी - "आपण जरा मुद्द्याकडे वळूयात का ? तर विषय असा आहे की एके दिवशी सकाळी अचानक तुम्हांला ह्या पृथ्वीचा पुढील दोन तासांनंतर सर्वनाश होणार आहे असं सांगण्यात आलं , तर तुम्ही ते दोन तास कसे घालवाल , त्यात काय काय कराल? तुम्हांला विचार करण्यासाठी म्हणून आम्ही काही वेळ देत आहोत ! आपण सायंकाळी चार वाजता भेटूयात !"
सायंकाळी चार वाजता -
अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ दुपार , संध्याकाळ !"
मी (त्रासिक मुद्रेने ) - "ठीक आहे, ठीक आहे "
अतिगंभीर - "तुम्ही इतके त्रस्त का दिसत आहात ? विचार करुन त्रास झाला का?"
मी (वैतागून ) - "अहो त्या विचारांपेक्षा झोप न झाल्यानं त्रास झालाय !"
सहकारी - "आपल्याला झालेल्या तसदीबद्दल आम्ही खरोखर तुमची माफी मागू इच्छितो . आपण हे थोडक्यात आटपुयात ! तर तुम्हांला नक्की काय वाटतंय !"
मी (उत्साहानं पुढ्यातील कागद वाचत ) -
१. "आमच्या इथं नाक्यावर एक मस्त केकचे नवीन दुकान निघालं आहे . काय एकाहून एक मस्त केक ठेवलेले असतात डिस्प्ले ला ! पण खूप महागडा आहे तो ! ही बातमी जाहीर झाली रे झाली की मी त्याच्याकडे धावत जाणार आणि सांगणार - अरे मित्रा , आता काय सर्वच नाश पावणार आहे ! तर आपण दोघे मिळून हे सर्व केक खाउयात ! "
सहकारीच्या चेहऱ्यावर काय हा बालिश विचार आहे ह्यांचा हे भाव स्पष्ट दिसत होते. तुम्हांला दुसरा कोणी मिळाला नाही का ह्या प्रकारच्या भावानं तिनं अतिगंभीरकडे पाहिलं. त्यामुळं विचलित न होता मी माझे वाचन पुढे सुरु ठेवले.
२."आयुष्यात मी काही जणांशी चुकीचं वागलो, काहींना काही सांगायचं राहून गेलं. ते ह्या दोन तासांत सांगण्याचा प्रयत्न करीन "
सहकारी (तिचे डोळे चकाकले होते) - "मग हे आत्ताच का नाही सांगायचं ?"
मी - "त्यानंतरचे परिणाम दोन तासांपलीकडं पेलण्याची कदाचित ताकत माझ्यात नाही म्हणून !"
सहकारी - "यादी तयार आहे ?"
मी - "नाही, त्यावेळेला जे आठवणार त्यांनाच "
३. "पुढे अब्जावधी वर्षानंतर पृथ्वीवर अथवा ह्या विश्वात नवीन जीवसृष्टी येईल. त्यांना संदर्भ म्हणून शेवटच्या दोन तासांत पृथ्वीवरील सोशल मीडिया, टीव्हीवरील बातम्यांच्या वाहिन्या ह्यावर कसा धुमाकूळ घातला गेला ह्याविषयी माझ्या क्षमतेनुसार नोंद ठेवीन !
अतिगंभीर - "विचारात घेण्यासारखी बाब आहे"
४. "जगातील महत्वाच्या माणसांना उद्देशून माझ्या फेसबुक वॉलवर संदेश लिहीन"
अतिगंभीर - "म्हणजे चीनचे अध्यक्ष माहिती आहेत, पण अजून कोणाला ?"
मी (त्याला लूक देत ) - " त्यांच्या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प, विराट कोहली "
सहकारी - "अय्या , विराटला काय मेसेज देणार तुम्ही ?"
मी - "म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे पण पाकिस्तानविरुद्ध पांड्याला का घेतला ह्याचा जबाब विचारीन !"
सहकारी (निराशेनं ) - "हम्म "
अतिगंभीर आणि सहकारी - "अजून काही?"
मी - "सध्या तरी इतकेच सुचतंय ! "
अतिगंभीर आणि सहकारी - "आपल्या अमूल्य वेळेबद्दल खूप खूप आभार ! आम्ही निघतो आता"
मी - "आभार कसले त्यात, येत जा असे अधूनमधून वेळ घालवायला. फक्त माझ्यावर एक कृपा करा "
अतिगंभीर आणि सहकारी (उत्साहानं ) - "कोणती ?"
मी - "त्या नाक्यावरील केकवाल्याला ह्यातलं काही सांगू नका !"
शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९
गहरा पानी
९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?
शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८
आदिम वसाहत!
शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८
चंद्रवसाहत - भाग १!
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
बुद्धिभेद
हल्ली सर्वसामान्य लोकांचे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्यात माझाही समावेश आहे. विषय बर्याच वेळा भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, प्रदूषण, लग्नातील नातेसंबंध ह्याविषयी फिरताना आढळतात. पण प्रत्यक्ष कृती शून्य! क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील विषय हे राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीऐवजी ह्या विषयांभोवतीच घुटमळताना दिसतात. वर्तमानपत्र आणि केबल वाहिन्या ह्यांवरील ह्या समस्यांचे चित्रण थोड्या थोड्या कालावधीने फिरत असते. एक महिना भ्रष्टाचार मग प्रदूषण मग स्त्रियांवरील अत्याचार असे हे चक्र फिरत असते. त्यात आपण मध्यमवर्गीय गुरफटून जातो पुन्हा नवीन विषयाकडे आपले लक्ष वेधले जाते. मूळ समस्या तशाच राहतात. कोणीतरी चाणक्य बसला आहे तिथे आपला बुद्धिभेद करायला
मनुष्यवस्तीलायक नवीन ग्रह - काय वाटेल ते!
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...

.jpeg)





