बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत. त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती बदलत राहतात पण बदलत्या काळातील वस्त्र परिधान करण्याच्या आधुनिक चालीरिती मनात काही अगंभीर विचार निर्माण करतात.
लहानपणी फक्त लहान मुलंच शॉर्ट्स (Shorts - आखूड विजार - हा मराठी ब्लॉग असल्यानं मराठी शब्द एकदा का होईना वापरतोय!) घालून घराबाहेर पडत, शाळेत जात वगैरे वगैरे! मोठी माणसं मात्र फुल पँट (लांबी विजार) परिधान करूनच बाहेर पडत. त्याकाळातील माझ्यासारख्या "जमेल तेव्हा कर्मठ" माणसानं हल्ली माणसं कशी धोतर, टोपी वगैरे परिधान न करता बाहेर पडतात असा लेख लिहिला असावा. असो, त्यावेळची लहान मुलं मोठी झाली पण त्यांची शॉर्ट्स प्रति निष्ठा मात्र कायम राहिली. हे समजण्यासारखं होतं पण ज्या व्यक्ती आमच्या लहानपणी तरुण होत्या आणि तात्कालीन चालीरितीप्रमाणे फुल पँट परिधान करत असत; त्यांतील बऱ्याच जणांनी आपली निष्ठा शॉर्ट्सला बहाल केल्याचं हल्ली वारंवार आढळून येत आहे.
माझ्या एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. त्याचंही हेच निरीक्षण होतं. परंतु शॉर्ट्स परिधान करून सार्वजनिक जीवनात वावर करणाऱ्या आपल्या समवयस्क आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शॉर्ट्स आचारसंहिता' लागू करावी असे त्याचं म्हणणं पडलं. 'शॉर्ट्स आचारसंहिता' हा शब्द ऐकताच माझ्या भुवया माझ्या नकळत उंचावल्या गेल्या. ते पाहून त्यानं आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी बाह्या सरसावल्या. त्याच्या म्हणण्यातील काही ठळक मुद्दे !
१. सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्याची पद्धती पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडं आली. ह्या पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीनं शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठणं आवश्यक आहे. मी त्याच्या ह्या मुद्द्याचा तात्काळ विरोध केला. शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठीच ह्यातील बरेच सज्जन बाहेर पडतात हा मुद्दा तुझ्या लक्षात कसा येत नाही ह्यावर मी आश्चर्य व्यक्त केलं. तरीही ही विशिष्ट पातळी म्हणजे तुला काय अभिप्रेत आहे असा रोखठोक प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर त्याच्याकडं उत्तर तयार होतं. तो म्हणाला, एक विजेचा दिवा उजव्या किंवा डाव्या बाजूला पेटवून आपण काटकोनातील समोरच्या दिशेकडं तोंड करून उभं राहिलं असता दिव्याच्या समोरील भिंतीवर पडलेल्या आपल्या छायेत वर्तुळाचा कंस, अर्धाकृती व्यास वगैरे दिसता कामा नये. आपलं पोट वगैरे सुटलेलं असता कामा नये हे त्याला म्हणायचं आहे हे कळायला मला थोडा वेळ लागला.
२. घरी परिधान करायच्या शॉर्ट्स (ह्याला मराठी भाषेतील सर्वमान्य असणारा शब्द मी महत्प्रयासानं टाळत आहे) सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्याचा आत्मविश्वास जरी तुमच्याकडे असला तरी सार्वजनिक जीवनात तुम्हांला वावरताना पाहणाऱ्या लोकांच्या अनुभवाविषयी तुम्ही थोडीतरी अनुकंपा बाळगावी. त्याचा हा मुद्दा ऐकून मला सकाळी बाजारात दृष्टीस पडणाऱ्या अनेक व्यक्तींची आठवण झाली. त्याचा हा मुद्दा मी मनापासून मान्य केला. शॉर्ट्सचा थ्री फोर्थ हा राजमान्य प्रकार परिधान करणे उचित राहील. ह्यात आपल्या जवळील असलेल्या तथाकथित शॉर्ट्स ला पाऊण मापावर आणण्याचा दीडशहाणपणा करू नये.
३. शॉर्ट्स परिधान करायचंच झाल्यास वर साजेसा असा टी शर्ट घालणे योग्य राहील. त्याला शॉर्ट्स मध्ये खोचणं उचित नाही. टी शर्ट आणि शॉर्ट्स ह्यांच्यात रंगसंगती असावी. "हे जरा थोडं अति होतंय असं नाही का वाटत तुला ? " मी न राहवुन माझ्या मनातील बोललो.
मित्रानं गंभीर चेहरा केला. तो बोलता झाला, "आदित्य, एक समाज आपला अतिआत्मविश्वास सध्या ओसंडून चालला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशात आहोत ना, मग आम्हांला हवं तसं वागलं तर काय हरकत आहे असा विचार करणं चुकीचं आहे, कारण हल्ली आपल्यापैकी बरेच परदेशी जातात आणि तिथं आपण इथल्या काही सवयी घेऊन जातो. त्यामुळं एक समाज म्हणून आपल्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो"
विषयाला फारच गंभीर वळण लागलं होतं. मी वातावरण थोडं हलकं करण्यासाठी त्याला विचारलं, "मग काय सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्यासाठी परवाना वगैरे लागू करण्याचा विचार आहे का तुझा ?" तो ही लगेचच हसला. म्हणाला सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स घालून वावरताना फोटो असल्यास पाठवून दे, मग कळवतो.
पोस्टच्या सुरुवातीला दिलेला फोटो त्याला पाठवला आहे. अजून काही त्याचं उत्तर आलं नाही ! बघुयात. बाकी सर्व पोस्टभर काही वाचकांना शॉर्ट्स ऐवजी शॉटस (मद्याचा इवलासा घोट) ची सतत आठवण येत राहिल्यास अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा