शनिवार, २१ मार्च, २०२६
विमानाचा U टर्न
शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६
Park Your Thoughts!
मराठी माध्यमातुन इंग्लिशचे धडे अगदी एकाग्रतेने गिरवुन व्यावसायिक जगात प्रवेश करून आता अनेक वर्षे लोटली. This is a boy. His name is Gopal. He is reading a book. इथून आमची इंग्लिशशी तोंडओळख झाली. इंग्लिश भाषेचा वापर करताना देखील मराठी भाषेचा पगडा कायम होता. सागर चित्रपट प्रसिद्ध झाला त्यावेळी डिंपलचे स्पेलिंग Dimpal असावे ह्याविषयी आमच्या सर्वांचं एकमत होतं. बरीच वर्षे उलटुन गेली. व्यावसायिक जगात नवनवीन वाक्प्रचारांचा वापर ज्यावेळी प्रथमच ऐकला त्यावेळी मनातील विनोदी बुद्धी जागृत झाली. हे वाक्प्रचार आता मी ही सर्रास वापरतो. पण अजुनही हे विनोदी विचार मनात अधुनमधून येत राहतात.
Keep Me Honest Here
खरा अर्थ - एखाद्या संदिग्ध विषयावर आपल्या समजुतीनुसार भल्या मोठ्या मीटिंगमध्ये आपण मोठमोठी वाक्यं बोलत असतो त्यावेळी आपली समजुतच चुकीची असेल तर आपल्या पुढील बोलण्याला काही अर्थच उरत नाही. अशा वेळी चारचौघात आपलं हसं होऊ नये म्हणून त्या बैठकीतील सर्वात ज्ञानी माणसाचे नांव घेऊन Keep Me Honest अशी प्रस्तावना करण्याची पद्धत आहे. असं बोललं की पुढं काहीही ठोकून द्यायला आपल्याला मोकळं रान मिळतं.
chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !
Park Your Thoughts
खरा अर्थ - मीटिंग मध्ये एकाच वेळी अनेक जण बोलायला लागले की त्यातील एक माणुस दुसऱ्याला "Park Your Thoughts" अशी विनंती करतो. आपल्या स्वतःच्या विचारांची शृंखला (Chain of thoughts) अबाधित राहावी असा स्वार्थी विचार त्यामागं असतो. आता दुसरा देखील ह्याला बोलू शकतो की "You Park Your Thoughts" पण हे सभ्य लोकांचं जग असल्यानं असं काही घडत नाही. बऱ्याच वेळा पहिल्याचं बोलणं संपेपर्यंत दुसरा एक तर आपले विचार विसरलेला असतो किंवा त्याच्या मुद्द्यातील हवा निघुन गेलेली असते!
chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !
आमच्या मनात आधीच इतके विचार असतात की नवीन विचारांना वाहनतळावर थांबवून ठेवायला जागाच नसते !
All things being equal
खरा अर्थ - दोन शक्यतांमध्ये निव्वळ तुलना करताना बाकीचे सर्व घटक समान असावेत.
chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !
Leap of Faith
खरा अर्थ - आपल्याजवळ असलेली माहिती, उपलब्ध सामुग्री ह्यांच्या आधारे एखादं मोठं आव्हान स्वीकारताना यशाची १०० टक्के खात्री नसताना देखील पुढं जाण्याचा धाडसी निर्णय घेणं !
Lock, Stock and Barrel
Groundhog Day -
हा वाक्प्रचार नसुन उत्तर अमेरिका आणि कॅनडा भागातील परंपरा आहे. दोन फेब्रुवारी रोजी जर groundhog नावाचा प्राणी आपल्या बिळातून बाहेर आला आणि आपली सावली पाहु शकला तर हिवाळा अजून सहा आठवडे टिकेल. आणि जर असं झालं नाही तर वसंत ऋतूचे आगमन लवकर होईल. यंदाचा groundhog चा कौल प्रदीर्घ हिवाळ्याच्या पारड्यात पडला आहे. आगामी भेटीसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे !
(विनोदी प्रतिमांसाठी chatgpt चे आभार !)
जाता जाता एक विनोदी विचार! मागील पिढ्यांतील पुरुष पुर्वसूचना न देता पाच सहा मित्रांना घरी अचानक भोजनासाठी आणण्याची Leap Of Faith वारंवार घेत असत. आम्ही मात्र हा विचार सदैव Park Your Thoughts मध्ये गुंडाळून ठेवतो.
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
जिव्हारी लागणारा पराभव ते मध्यान्हीच्या भोजनाची उचित वेळ !
हल्ली भारतीय संघांचे पराभव माझ्या जिव्हारी लागत नाही. मी असंवेदशील झालो की काय वगैरे गोष्टींवर चिंतन करायला मला सध्या वेळ नाही. सखोल अभ्यास करायला माझ्यासमोर बरेच कार्यालयीन विषय आहेत आणि ते मला पुरून उरताहेत ! असो जिव्हारी लागलेल्या पराभवांची यादी बनवायची झाली तर खालील पराभव डोळ्यासमोर येतात
१. शारजाह अंतिम सामना १९८६
२. भारत पाकिस्तान बंगलोर कसोटी सामना १९८७
३. भारत इंग्लंड रिलायन्स कप उपांत्य सामना वानखेडे १९८७
४.भारत श्रीलंका वर्ल्ड कप उपांत्य सामना कलकत्ता १९९६
५. भारत पाकिस्तान चेन्नई कसोटी सामना १९९९
मग माझ्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण आला. १९९९ सालच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ खराब कामगिरी करत असताना सायंकाळी सीप्ज़ बस स्थानकाबाहेर मी मित्रासोबत बसची वाट पाहत असताना तावातावानं भारतीय संघांतील खेळाडूंवर टीकेचे आसूड ओढत होतो. मी क्षणभराची उसंत घेतली तेव्हा ती संधी साधून मित्र म्हणाला, "आदित्य, तुझ्या जीवनातील आनंदासाठी तू अशा बाह्य घटकांवर इतका अवलंबून असशील तर ह्याचा अर्थ असा की तू तुझ्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात म्हणावा तसा गुंतलेला नाहीस आणि त्यात काही खास कामगिरी करत नाहीस !"
आपल्या जीवनातील अशा क्षणांचं महत्त्व समजायला आणि त्यातील संदेश अंगीवळणी पडायला कधी कधी वर्षे जातात. पण उशिरा का होईना त्यातील उपदेश आपण स्वीकारला तर आपलं भलं होतं. माझंही भलं झालं, म्हणजे माझा संताप होणं कमी होत गेलं. २००३ सालच्या वर्ल्ड कप मधील अंतिम फेरीतील पराभव, २००७ सालच्या वर्ल्ड कप मधील प्राथमिक फेरीत गारद होणे, २०१५ / २०१९ सालच्या वर्ल्ड कप मधील उपांत्य फेरीतील पराभव मी फारसे मनाला लावून घेतले नाहीत. पण राव १९ नोव्हेंबर २०२३ ने मात्र जबरदस्त चटका लावला. असो बाकी सर्व पराभवाच्या मी जून १९९९ मधील मित्राचा संदेश आठवून कार्यालयीन कामाकडं वळतो किंवा घरात उगाचच मदत करायचा प्रयत्न करतो.
असाच दुसरा संदेश माझ्या आईनं मला १९९८-९९ च्या सुमारास दिला होता. त्यावेळी मी सीप्ज़मधील ICH / Kaydees ह्या उपहारगृहात दुपारचे भोजन करायचो. वडिलांचा उल्लेख करून आई म्हणाली होती, "भाईंनी आयुष्यभर घरून जेवणाचा डब्बा नेला आहे! ह्या वयातही त्यांची तब्येत बघ !" हा संदेश सुद्धा अंमलात आणायला मला काही वर्षे गेली. पण तो स्वीकारला आणि खूप फरक पडला. पण पुन्हा आयुष्यात संदेह निर्माण झाला. कार्यालयात एक मित्र म्हणाला, "मला कामाचं खूप टेन्शन असलं की मी चमचमीत खातो, चिकन बिर्याणी मागवतो! ते माझं तणाव निवारक म्हणून काम करतं". मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. शनिवार / रविवार संध्याकाळी तणाव निवारक म्हणून नाही तर मूड (मनःस्थिती) सुधारक म्हणून आम्ही नूडल्स, मुर्ग मुस्स्लम वगैरे पदार्थ मागवतो. म्हणजे दहा - बारा जेवणं पडवळ, दुधी, गलका, शिराळा ह्या भाज्यांची (आईच्या शिकवणीमुळं) आणि बाकीची दोन - तीन जेवणं नूडल्स, मुर्ग मुस्स्लम ह्यांची - मूड बूस्टरच्या नावाखाली !
आता कार्यालयाची वेळ काहीशी वेगळी. म्हणून मी सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेतो. ह्या वाक्यात विसंगती ओतप्रोत भरली आहे. पण आयुष्यातील प्राधान्यक्रम आपल्याला कळायला हवा ! गरमागरम वरणभात,पडवळ, दुधी, गलका, शिराळा वगैरे आपल्या पोटात जावं असं आपल्याला वाटत असेल आणि तरीही कार्यालयाची मध्यान्हीची वेळ पाळायची असेल तर सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेता यायला हवं. जेवायला बसताना पोटाला समजावं लागतं की आज वीक डे आहे आणि हे दुपारचं जेवण आपण घेत आहोत ! बाकी रात्री सुद्धा ऑफिसात चपाती भाजी असा हलका आहार घ्यावा !
आता ह्या लेखातील दोन मुद्द्यांना जोडणारा दुवा म्हणजे गुवाहाटी सामन्यातील भारतीय संघांचा दारुण पराभव आणि प्रसारमाध्यमांनी उगाचच निष्पाप गौतम गंभीरवर उठवलेली टीकेची झोड! मुख्य कारण मला उमगलं आहे. तसा मी सर्वज्ञ वगैरे नसलो तरी बऱ्याच गोष्टी मला कळतात. तर सांगायची गोष्ट अशी की संपुर्ण भारतात एकच प्रमाणवेळ पाळायच्या अट्टाहासापायी ईशान्य भारतातील लोकांना साडेचार - पाच वाजता सूर्योदय पाहावा लागतो. बिचारा भारतीय संघ! त्यांना सकाळी नऊ वाजता सामना खेळायला मैदानावर यावं लागलं. त्याहून अधिक गंभीर गोष्ट म्हणजे दोन तासांच्या खेळानंतर अकरा वाजता त्यांना भोजनऐवजी चहा देण्यात आला. भोजनासाठी त्यांना एक वाजून वीस मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. इथंच सगळा गोंधळ झाला! मी जर सकाळच्या साडेदहा वाजता दुपारचे भोजन घेऊ शकतो तर त्यांना अकरा वाजता दुपारचं जेवण द्यायला काय हरकत होती? भले ते दुधी, पडवळ वगैरे भाजीचं का असेना! असो माझे सल्ले लोकं ऐकत नाहीत, नुकसान त्यांचंच आहे! त्यांना समज कधी येईल देव जाणे !
रविवार, ७ सप्टेंबर, २०२५
शॉर्ट्स गाथा
बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत. त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती बदलत राहतात पण बदलत्या काळातील वस्त्र परिधान करण्याच्या आधुनिक चालीरिती मनात काही अगंभीर विचार निर्माण करतात.
लहानपणी फक्त लहान मुलंच शॉर्ट्स (Shorts - आखूड विजार - हा मराठी ब्लॉग असल्यानं मराठी शब्द एकदा का होईना वापरतोय!) घालून घराबाहेर पडत, शाळेत जात वगैरे वगैरे! मोठी माणसं मात्र फुल पँट (लांबी विजार) परिधान करूनच बाहेर पडत. त्याकाळातील माझ्यासारख्या "जमेल तेव्हा कर्मठ" माणसानं हल्ली माणसं कशी धोतर, टोपी वगैरे परिधान न करता बाहेर पडतात असा लेख लिहिला असावा. असो, त्यावेळची लहान मुलं मोठी झाली पण त्यांची शॉर्ट्स प्रति निष्ठा मात्र कायम राहिली. हे समजण्यासारखं होतं पण ज्या व्यक्ती आमच्या लहानपणी तरुण होत्या आणि तात्कालीन चालीरितीप्रमाणे फुल पँट परिधान करत असत; त्यांतील बऱ्याच जणांनी आपली निष्ठा शॉर्ट्सला बहाल केल्याचं हल्ली वारंवार आढळून येत आहे.
माझ्या एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. त्याचंही हेच निरीक्षण होतं. परंतु शॉर्ट्स परिधान करून सार्वजनिक जीवनात वावर करणाऱ्या आपल्या समवयस्क आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शॉर्ट्स आचारसंहिता' लागू करावी असे त्याचं म्हणणं पडलं. 'शॉर्ट्स आचारसंहिता' हा शब्द ऐकताच माझ्या भुवया माझ्या नकळत उंचावल्या गेल्या. ते पाहून त्यानं आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी बाह्या सरसावल्या. त्याच्या म्हणण्यातील काही ठळक मुद्दे !
१. सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्याची पद्धती पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडं आली. ह्या पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीनं शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठणं आवश्यक आहे. मी त्याच्या ह्या मुद्द्याचा तात्काळ विरोध केला. शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठीच ह्यातील बरेच सज्जन बाहेर पडतात हा मुद्दा तुझ्या लक्षात कसा येत नाही ह्यावर मी आश्चर्य व्यक्त केलं. तरीही ही विशिष्ट पातळी म्हणजे तुला काय अभिप्रेत आहे असा रोखठोक प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर त्याच्याकडं उत्तर तयार होतं. तो म्हणाला, एक विजेचा दिवा उजव्या किंवा डाव्या बाजूला पेटवून आपण काटकोनातील समोरच्या दिशेकडं तोंड करून उभं राहिलं असता दिव्याच्या समोरील भिंतीवर पडलेल्या आपल्या छायेत वर्तुळाचा कंस, अर्धाकृती व्यास वगैरे दिसता कामा नये. आपलं पोट वगैरे सुटलेलं असता कामा नये हे त्याला म्हणायचं आहे हे कळायला मला थोडा वेळ लागला.
२. घरी परिधान करायच्या शॉर्ट्स (ह्याला मराठी भाषेतील सर्वमान्य असणारा शब्द मी महत्प्रयासानं टाळत आहे) सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्याचा आत्मविश्वास जरी तुमच्याकडे असला तरी सार्वजनिक जीवनात तुम्हांला वावरताना पाहणाऱ्या लोकांच्या अनुभवाविषयी तुम्ही थोडीतरी अनुकंपा बाळगावी. त्याचा हा मुद्दा ऐकून मला सकाळी बाजारात दृष्टीस पडणाऱ्या अनेक व्यक्तींची आठवण झाली. त्याचा हा मुद्दा मी मनापासून मान्य केला. शॉर्ट्सचा थ्री फोर्थ हा राजमान्य प्रकार परिधान करणे उचित राहील. ह्यात आपल्या जवळील असलेल्या तथाकथित शॉर्ट्स ला पाऊण मापावर आणण्याचा दीडशहाणपणा करू नये.
३. शॉर्ट्स परिधान करायचंच झाल्यास वर साजेसा असा टी शर्ट घालणे योग्य राहील. त्याला शॉर्ट्स मध्ये खोचणं उचित नाही. टी शर्ट आणि शॉर्ट्स ह्यांच्यात रंगसंगती असावी. "हे जरा थोडं अति होतंय असं नाही का वाटत तुला ? " मी न राहवुन माझ्या मनातील बोललो.
मित्रानं गंभीर चेहरा केला. तो बोलता झाला, "आदित्य, एक समाज आपला अतिआत्मविश्वास सध्या ओसंडून चालला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशात आहोत ना, मग आम्हांला हवं तसं वागलं तर काय हरकत आहे असा विचार करणं चुकीचं आहे, कारण हल्ली आपल्यापैकी बरेच परदेशी जातात आणि तिथं आपण इथल्या काही सवयी घेऊन जातो. त्यामुळं एक समाज म्हणून आपल्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो"
विषयाला फारच गंभीर वळण लागलं होतं. मी वातावरण थोडं हलकं करण्यासाठी त्याला विचारलं, "मग काय सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्यासाठी परवाना वगैरे लागू करण्याचा विचार आहे का तुझा ?" तो ही लगेचच हसला. म्हणाला सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स घालून वावरताना फोटो असल्यास पाठवून दे, मग कळवतो.
पोस्टच्या सुरुवातीला दिलेला फोटो त्याला पाठवला आहे. अजून काही त्याचं उत्तर आलं नाही ! बघुयात. बाकी सर्व पोस्टभर काही वाचकांना शॉर्ट्स ऐवजी शॉटस (मद्याचा इवलासा घोट) ची सतत आठवण येत राहिल्यास अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व !
रविवार, ७ जून, २०२०
मॅटर झालं !
ह्या मॅटर हो गया शब्दप्रयोगाची व्याप्ती विस्तृत आहे.
वैश्विक - सध्यातरी ह्या मंडळींनी हा शब्दप्रयोग अंतराळातील घटनांबाबत वापरल्याचे मी प्रत्यक्षात ऐकलं नसलं तरी एखादी उल्का पृथ्वीच्या जवळुन गेली तर मॅटर होते होते बच गया असं ते म्हणु शकतात !
जागतिक - जागतिक राजकारणात पाहिलं तर ट्रम्प आल्यापासुन त्याचं दररोज चीन, उत्तर कोरिया, इराण अशा देशांशी मॅटर होतंच राहतं!
आशिया - सध्या भारत आणि चीन ह्यांचं लडाख इथं मॅटर चालु आहे.
भारत - कोरोना ने जो जगभर आणि भारतात धुमाकूळ घातला आहे त्याचा स्कोप "मॅटर हो गया" च्या पलीकडचा आहे. इथं आपण मॅटर झालं ह्या संज्ञेचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत ! मॅटर झालं ह्या संज्ञेत जुजबी नुकसान करणाऱ्या आणि दीर्घकालीन दुष्परिणाम नसणाऱ्या घटनांचा अंतर्भाव होतो! त्यामुळे आपल्या राज्यात परत जायला उत्सुक असणाऱ्या असंख्य नागरिकांनी वांद्रा स्टेशनबाहेर गर्दी केली ही घटना मॅटर झालं ह्याच्या स्कोपमध्ये येते. पण जर का त्यामुळं अचानक दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला तर मात्र ती मॅटर झालं च्या परिघाच्या पलीकडं जाते!
शाळा / महाविद्यालयीन जीवन - लेक्चर बंक करुन जाताना शिक्षकांनी पकडणं, वर्गात फ्री लेक्चरला क्रिकेट खेळणं, पालकांची सही करण्याचं धारिष्ट्य केलं असता शिक्षकांच्या ते ध्यानात येणं वगैरे फुटकळ घटना मॅटर झालंच्या व्याप्तीत येतात. पुर्वी शाळेत मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं ही मॅटर होण्याची नांदी समजली जायची! पण त्याकाळी हा शब्दप्रयोग अस्तित्वात नव्हता !
घर ते शाळा / कॉलेज - स्कुल बसचा चालक आणि रिक्षाचालक ह्याची बाचाबाची होणे, रेल्वेचा पास संपला असता समोरुन टी. सी. येणं ह्या घटना मॅटर झालं म्हणुन गणल्या जातात.
सोशल मीडिया - व्हाट्सअँप, फेसबुकवरील दैनंदिन घटना जरी मॅटर हो गया इतकी महत्त्वाची नसली तरी कधीतरी तिथंही मॅटर होतात !
घर - ह्या वयोगटात घरी दररोज मॅटर व्हायलाच लागतं. एखाद्या दिवशी मॅटर नाही झालं तर काहीतरी मोठं मॅटर झालं असावं असा ह्यांना संशय येतो ! घरी मॅटर झालं ह्यात मोबाईलवर रात्री दोन - दोन वाजेपर्यंत खेळत राहणं जे पालकांच्या लक्षात येणं, आईनं दिलेलं महत्वाचं काम विसरुन येणं, बाबांना एखादं दुसरं उलट वाक्य बोलणं ह्या सर्व घटनांचा समावेश होतो !
आता आपण तथाकथित मोठ्यांनी ह्या मॅटर झालं ह्या संज्ञेकडून आणि पर्यायानं ह्या वयोगटाकडुन काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं ! जर लहान वयात त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मॅटरना ते इतके हसतखेळत सामोरे जाऊ शकतात तर आयुष्यात मोठं झालेल्या आपल्याला आयुष्यात सामोरे येणाऱ्या तथाकथित समस्यांकडे मॅटर झालं च्या चश्म्यातुन पाहायला काय हरकत आहे ! ही मंडळी मॅटर झालं हे सांगताना कधी दुःखी नसतात, तर त्यांच्या चेहऱ्यावर बहुतेक वेळा मिश्किल भावच असतात! आपणही त्यांच्याकडुन आयुष्याला सामोरे जाण्याचा हा दृष्टिकोन स्वीकारुयात !
आता बघा आठवडाभराची सुट्टी संपल्याने मी ही एक मोठी समस्या आहे असा चेहरा करुन बसलो होतो पण आता मात्र मी मॅटर हो गया असं स्वतःला समजावत आठवड्याला सामोरे जायला तयार झालो आहे !
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि . स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक . कथा म्हणून बघितली तर साधी सुधी . एका आदर्श वादी श...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...



