मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ जुलै, २०२०

मराठी - पुढील प्रवास !




एका मराठी उदयोन्मुख लेखकांच्या गटावर काही महिन्यांपुर्वी मला आमंत्रित केलं गेलं. ह्या गटावरील वास्तव्य मला मनापासुन आनंद देऊन जात आहे. विविध विषयांवरील लिखाण, त्यावरील अभ्यासपुर्ण आणि थोड्या प्रमाणात मिश्किलतेकडं झुकणाऱ्या प्रतिक्रिया वाचण्यात एक समाधान आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वी आणि मराठीत व्यक्त होण्याची क्षमता बाळगुन असलेली व्यक्तिमत्वं इथं आहेत ! इथले ऍडमिन लोक जबरदस्त आहेत, आठवड्याभरात प्रसिद्ध केल्या गेलेल्या लेखांचं अभ्यासपुर्ण विश्लेषण ते नियमितरित्या प्रसिद्ध करतात. 

ह्या गटाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे हा गट तुम्हांला तुमच्या लेखावर टिप्पण्या देऊन सदैव प्रोत्साहन देतो. मी ह्या बाबतीत आळशी किंवा काहीसा स्वकेंद्रित आहे. आपलं लिहुन झालं की मी मोकळा असा काहीसा स्वार्थी दृष्टिकोण मी बाळगतो. त्याचं समर्थन करावयास कामाची सबब आहेच. 

आज ह्या गटाचा  चौथा वाढदिवस ! त्यानिमित्त एक झुम बैठक आयोजित करण्यात आली आहे. तिथं य धमाल केली जाईल ह्याविषयी मी निःशंक आहे ! कारण मंडळी आहेतच उत्साहाचा झरा म्हणुन ओळखली जाणारी ! 
ह्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यासमोर काहीसा गंभीर विषय मांडत आहे ! (नाहीतरी माझ्याकडुन दुसरी काय अपेक्षा करावी? ) प्रारंभ मराठी भाषेपासून करत उगाचच व्यावसायिक जगात चक्कर मारुन मी अखेरीस त्या गटाकडं येईन ! त्या समुहापुढं मांडलेलं हे मनोगत ! 

सुरवात करुयात ती पुढील पन्नास वर्षानंतर मराठी साहित्याचं काय  चित्र असेल ह्या मुद्द्यापासुन ! दहा वर्षांपुर्वी मराठीत काही चांगलं नवीन लिहिलं जात नाही म्हणुन एक खंत व्यक्त केली जात होती आज तो प्रश्न नाहीय . कारण गुणवंत मराठी लोकांना लिहिण्याचं माध्यम माहितीमायाजाळाने, ब्लॉग्सने उपलब्ध करुन दिलं आहे. लोक ही माध्यमं आत्मविश्वासानं वावरत सुद्धा आहेत ! 

पन्नास वर्षानंतरची  (२०७० साल) मराठी मंडळी इतक्या मोठ्या संख्येनं, विविध विषयांवर मराठीत व्यक्त होतील का?  प्रश्नाचे दोन पैलु आहेत. मराठी भाषेत व्यक्त होऊ शकणारी मंडळी त्यावेळी अस्तित्वात असतील पण त्यांचा आत्मविश्वास दांडगा असेल का? आणि आत्मविश्वास दांडगा असणारी मराठी मंडळी मराठीतुन व्यक्त होण्याची क्षमता बाळगुन असतील का ? ह्यामागं मराठी माध्यमातील शिकणाऱ्या मराठी मुलांचं कमी होणारं प्रमाण हा कळीचा मुद्दा ! मराठी माध्यमातुन शिकणं ही समस्या नाही, सोबत गुणवान मुलांचा सहवास न मिळणं आणि पुर्वीइतके दर्जेदार शिक्षक उपलब्ध नसणं ही मुळ समस्या आहे. 

आता वळूयात ते Definition of Success म्हणजे समाजाने मान्य केलेल्या यशस्वितेच्या व्याख्येकडे ! International School मध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देणाऱ्या पालकांची मानसिकता कोणती असावी?  आपल्या पाल्याने एक यशस्वी कारकीर्द बनवावी, त्यासाठी अनुकूल व्यक्तिमत्व बनवावं  ह्यासाठी ह्या International School मदत करतील हा ह्यामागचा  प्रामुख्यानं विचार असतो. माझा जो काही अनुभव आहे त्यावरून ह्या शाळा तुमच्या मुलांना एक उत्तम बाह्यरूपी पॅकेज बनविण्यासाठी उपयुक्त आहेत. पण संकल्पनांचा जो उत्तम गाभा विकसित करावा लागतो त्यात मात्र ह्या शाळा बऱ्याच अंशी कमी पडतात असं माझं वैयक्तिक मत आहे. हा उत्तम गाभा एकतर नैसर्गिकरित्या तुमच्यात असावा लागतो आणि त्यावर तुमच्या पालकांनी सुरुवातीच्या जडणघडणीच्या वर्षांत संस्कार करायला हवेत. अशी गुणवान  मुलं ज्यावेळी ह्या शाळांच्या नजरेत सातवी - आठवीत येतात  त्यावेळी ह्या शाळा त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतात कारण त्यानंतर येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी  ,  संभाषणकला विकसित करणे वगैरे गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध असते. परंतु ह्या इयत्तांपर्यंत जर तुमच्याकडं पाया विकसित झाला नसेल तर मात्र तुमची मुलं दहावी, बारावी ह्या टप्प्यांत हरवु शकतात कारण ह्या केवळ बाहयरूपी अस्तित्वात असलेल्या आकर्षक पॅकेजचा पर्दाफाश ह्या स्थितीत होतो. 

साधारणतः १९८० च्या आसपास बनविलेल्या यशस्वितेच्या व्याख्येचे पुनर्परीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी अभियंता, डॉक्टर ह्या पासुन सुरु झालेली यशस्वितेची व्याख्या मध्यंतरीच्या काळात माहिती आणि संगणक क्षेत्रातील करियरपर्यंतच विस्तारली गेली.  माहिती आणि संगणक क्षेत्रातील करियर ४० -४५ च्या वयोगटापलीकडं टिकविण्यात केवळ २० -२५ % टक्के लोकांनाच यश येते हे आजचे सत्य आहे. ह्यास काही अंशी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांनंतर व्यवस्थापकीय भुमिकांकडे धाव घेण्याची मनोवृत्ती कारणीभुत आहे. २०२० सालातील घटनांमुळं एक वलयांकित नसलेलं पण मनःशांती देऊ शकणारं  करियर, एक नेकीनं करता येण्यासारखा उद्योगधंदा ह्या गोष्टी यशस्वितेच्या व्याख्येत समाविष्ट व्हायला हव्यात. ह्या गोष्टी समाविष्ट झाल्या की त्या पिढीचे संसार सुखाचे होतील, त्यांना आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळ मिळेल ही माझी भोळीभाबडी आशा ! 

आता ह्यात हा उदयोन्मुख मराठी लेखकांचा गट काय करु शकतो? २२२२ साली (हो २२२२ साली ) ज्या वेळी मागील दोन शतकांतील मराठी साहित्याचा आढावा घेतला जाईल त्यावेळी ह्या गटानं  मराठी भाषेत जी मोलाची भर घातली असेल त्याची नोंद घेतली जावी. मराठी साहित्यातील सद्यकाली अस्तित्वात असणारे साहित्यप्रकार अधिक सुदृढ करणे, नवीन साहित्यप्रकारांची निर्मिती करणे ह्यासारख्या गोष्टींमध्ये ह्या गटानं मोलाचा वाटा उचललेला असावा ! सर्वांत महत्वाचं म्हणजे मराठी संस्कृतीत तुम्ही कितीही यशस्वी असलात तरी नम्रतेची कास धरुन राहण्याची जी वृत्ती कित्येक पिढ्या अस्तित्वात आहे.  तिला कसं टिकवुन धरावं ह्यासाठी ह्या गटानं कामगिरी बजावलेली असावी! हे शक्य होण्यासाठी मराठी माध्यमातील शिक्षणात कालानुरूप बदल घडवत ते कसं टिकविता येईल आणि यशस्वितेच्या नव्या व्याख्येत बसणारी मुलं मराठी माध्यमाच्या शाळा कशा प्रकारे घडवु शकतील ह्यावर किमान चिंतन तरी घडवुन आणावं ! 

ह्या अपेक्षा त्या गटाकडुनच नव्हे तर प्रत्येक सुजाण मराठी नागरिकाकडून बाळगाव्यात असं मला वाटतं !

शनिवार, १४ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - ३



आपण अवेळी विचारलेल्या प्रश्नामुळं आजोबांचे ज्ञानदायी संभाषण अचानक थांबलं ह्याची चुटपुट लागु आजींना लागुन राहिली. तीच चुटपूट घेऊन लागु आजी रात्री झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्या लवकर उठल्या. आकाशवाणीवर मंगल प्रभात हा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होता. भल्या पहाटे "घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ! उठी लवकरी वनमाळी " ही शाहीर होनाजी बाळा ह्यांची अमर भुपाळी ऐकुन त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या आपसुकच ओल्या झाल्या. "जुनं ते सोनं" असं पुटपुटतच त्या घराबाहेर पडल्या. 

आसमंतात एक सुखद असा गारवा भरुन राहिला होता. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. लागु आजी प्रसन्न मनानं मंदिराकडील रस्त्यावर चालु लागल्या. 

"गुड मॉर्निंग आजी !" मागुन आवाज आला तशा त्या थांबल्या. 

"सुप्रभात वेदा !" आजींनी सुहास्य मुद्रेनं वेदाला अभिवादन केलं. 

"कशा आहात तुम्ही, आजी?" वेदाने त्यांना विचारलं. 

"मी मजेत आहे ! तू कशी आहेस, जॉगिंग झालं का? " आजी म्हणाल्या. 

"हो, तुम्ही कुठं मंदिरात निघालात का? वेदाने त्यांना विचारलं. 

त्यांची मान होकारार्थक प्रतिसाद देतेय ह्याचा पुसटसा अंदाज येताच "मी सुद्धा येते तुमच्या सोबत !" वेदाने घोषित करुन टाकलं. खरंतर काही वर्षांपुर्वी आजीचे देवळात जाण्याविषयीचे नियम अगदी कडक होते. सकाळची आंघोळ न केलेल्या वेदाला आपल्यासोबत मंदिरात घेऊन जायला त्या कदापि तयार झाल्या नसत्या. पण वयानुसार त्यांच्या स्वभावात बराच फरक पडत चालला होता. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या माणसांसाठी आपल्या नियमांत थोडेफार बदल करण्यास त्या अनुभवानं शिकल्या होत्या. 

देवदर्शन झालं. देवापुढं बराच वेळ डोळे मिटुन नमस्कार करणाऱ्या वेदाला पाहुन पुन्हा एकदा लागु आजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. इतक्या तरुण वयात नवऱ्यासोबत न पटल्याने घटस्फोट घेऊन वेदा एकटी राहत होती. व्यवस्थापनाची पदवी घेतलेली वेदा एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या अधिकारी पदावर होती. आपलं देवदर्शन आटोपलं तसं आजी भिंतीपाशी असलेल्या बाकांवर येऊन बसल्या. मिनिटा दोन मिनिटांनी वेदाही त्यांच्या बाजुला येऊन बसली. का कोणास ठाऊक पण नेहमी उत्साहानं भरलेली वेदा देवळात मात्र अगदी शांत झाली होती. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग अचानक वेदाला न राहवुन तिनं आजींच्या कुशीत आपलं डोकं लपविले. 

"का ग वेडाबाई ! काय झालं ?" आजींनी तिला विचारलं. 

"काही नाही ! -" एका हळव्या क्षणावर मात करत वेदा सावरली होती. 

हिच्याशी आज सविस्तर बोलावंच असा विचार आजींच्या मनात आला. इतक्यात अचानक कालचे आजोबा आजींना दिसले. 

"आजोबा !" आजींनी आपल्या मोकळ्या स्वभावाला  अनुसरुन आजोबांना मोठ्यानं साद दिली. 

"अरे वा तुम्ही आज मंदिरात सकाळीच भेटलात !" आजोबांनी त्यांचे स्वागत केले! 

"या बसा ना इथं ! आजींनी वेदाच्या बाजुला त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली. जणू काही आपण आजोबांना गेले कित्येक वर्षे ओळखत आहोत ह्या थाटात आजीबाईंनी वेदाला आजोबांचा परिचय करुन दिला. आजोबांना वेदाने पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतलेल्या विषयाची बरीच माहिती होती. त्यामुळं त्या दोघांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या. लागु आजी आपल्या परीनं त्या संभाषणात सहभागी होत होत्या. 

"सर्वतोपरी प्रयत्न करुनसुद्धा सुखाचं माप सर्वांच्या पदरात देव का देत नाही? " वेदाच्या तोंडुन अचानक आलेल्या ह्या  प्रश्नानं आजी जरी दचकल्या तरी आजोबा मात्र स्थितप्रज्ञ होते. 

"तु एक गहन प्रश्न विचारलास मुली ! आपण सर्वांनी आपल्या सुखाच्या झोळ्या इतक्या मोठ्या बनवुन ठेवल्या आहेत की बिचारा भगवंत आपल्या सर्वांसाठी पुरेनासा झाला आहे !" आजोबा उत्तरले. 

"असं नाही हो आजोबा ! माझ्या अगदी किमान माफक अपेक्षा होत्या! त्याच्यासाठी सर्व करिअरचा त्याग करण्याची माझी तयारी होती. पण का कोणास ठाऊक, आमच्या तारा  कधी जुळल्याच नाहीत ! " अचानक स्वतःभोवती घातलेले सर्व बांध झुगारुन देऊन वेदा बोलली. 

"मुली, आपण सर्वांनी आपली आयुष्य ना खुप क्लिष्ट बनवुन ठेवली आहेत ! पुर्वी कसं साधं सोपं असायचं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी  चांगलं आणि वाईट अशी दोन वर्तुळं बनवलेली असायची. समाजाला तुमच्यासाठी जे काही चांगलं वाटतंय त्या वर्तुळात तुम्हांला सक्तीनं ढकललं जायचं ! वडीलधारी माणसांचा, समाजाचा हा निर्णय पटला नाही तरी सर्वजण स्वीकारत असत. आयुष्य जरी परिपुर्ण नसलं तरी केवळ आपल्या बाबतीतच असं घडत नाहीए, आपल्या सोबत बरेचजण आहेत केवळ ह्या गोष्टीवर सारेजण समाधान मानुन आयुष्य कंठीत करत असत. 

आता ना  चांगलं, वाईट अशी दोनच पर्यायांची वर्तुळं राहिली नाहीत. प्रत्येक निर्णयासाठी आपल्याभोवती  पर्यायांची अनेक वर्तुळं बनली आहेत.  प्रत्येक वर्तुळात चांगलं, वाईट वेगवेगळ्या प्रमाणात वास्तव्य करुन आहे. पुर्वी समाजासाठी ग्राह्य असलेली चांगल्या वाईटाची व्याख्या आता व्यक्तिसापेक्ष बनली आहे. त्यामुळं तुझं बरोबर की माझं ह्याच्या पलीकडं जाऊन एकत्रितपणे आयुष्य व्यतित करण्याची दोघांकडे असलेली इच्छाशक्ती हाच सर्वात महत्वाचा घटक ठरत चालला आहे !" 
आजोबांनी आपलं लांबलचक बोलणं एका दमात सांगुन टाकलं. 

वेदा आणि आजी दोघीही अगदी एकाग्रचित्तानं  त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचं बोलणं संपलं तरीही त्यांची भारावलेली अवस्था कायम होती. अचानक वेदाचा फोन वाजला तसं ती फोन घेऊन थोडी बाजुला गेली. आजीची तंद्री काही काळ कायमच होती. एका मिनिटातच वेदा परतली तर आजीला एकटीलाच पाहुन आश्चर्यचकित झाली. 

"आजी! आजोबा कुठं गेले? " वेदाने विचारलं. 

"अगंबाई कुठं गेले असतील ! " आजी दचकल्याच !

काहीवेळानं दोघीही मंदिराबाहेर पडुन इमारतीच्या दिशेनं चालु लागल्या. वेदाशी बोलत असल्या तरी आजीबाईंच्या मनात मात्र आजोबांचे काल आणि आज अचानक नाहीसे होणे हा निव्वळ योगायोग असणं कितपत शक्य आहे ह्यावर विचारमंथन सुरु होते. 

(क्रमशः)

आधीच्या भागांच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post_10.html


मंगळवार, १० मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - २





अरविंद गोखले आणि विनायक राऊत चालत चालत जवळच असलेल्या उद्यानात  येतात. प्रत्यक्षात होळी सुरु असताना मालिकेतसुद्धा होळी सुरु असायलाच हवी असा काही नियम नसल्यानं इथं इस्त्री केलेल्या शुभ्र कपड्यांमध्ये मंडळी होळी खेळताना आढळत नाहीत. एका दाट छाया देणाऱ्या वडाच्या झाडाखाली दोघेजण बैठक मारतात.  हवापाण्याच्या गप्पा सुरु होत असतानाच त्यांच्या बाजुला काही अंतरावर एक आजोबा  येऊन बसतात. त्यांच्याकडे  एक नजर टाकुन दोघेजण गप्पा सुरु ठेवतात. 

विनायक - "लेका अरविंद ! तुला खरोखरीच सुदैवी म्हणायला हवं !"

अरविंद - (काहीसा दचकुन ) "का रे बाबा ? अचानक तुला काय झालं?"

विनायक - "अरे मस्त प्राध्यापकाची नोकरी ! सकाळ संध्याकाळ मस्त नोकरीच्या वेळा ठरलेल्या ! संध्याकाळी येऊन चांगली घासाघीस करुन भाज्या खरेदीला पण तुला वेळ मिळतो ! अमेयने सुद्धा चांगला IT मधला जॉब शोधला. नाहीतर आमची मानसी बघ ! कसलं संतसाहित्याचा अभ्यास करण्याचं खुळ डोक्यात घेऊन बसली आहे ! राहता राहिलो मी ! इंटरनेटवर वेळच्या वेळी भाजीपाला मागविण्यासाठी सुद्धा मला रिमाइंडर ठेवावा लागतो

अरविंद - "अरे किती बोललास एकदम ! असं एकदम काही बोलण्याचं तुला सुचतंच कसं ?

विनायक - (चेहऱ्यावरील मिश्किल भाव लपविण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता !) "महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयावर तासंतास डोस देतो तेव्हा रे ?"

"आयुष्यातील यश म्हणजे नक्की काय हो? " अचानक बाजुनं आवाज येतो. दोघेही दचकुन पाहतात. प्रश्न बाजुला बसलेल्या आजोबांनी विचारलेला असतो. 

" मुबलक पैसाअडका, सुखी कुटूंब, अंगणात चारचाकी वाहन वगैरे वगैरे !" आपला मिश्किल स्वभाव परक्या माणसासमोर सुद्धा लपवुन ठेवणं विनायकाला आवडत नसे ! 

आजोबा - "बाळा, तु फारसं गंभीरपणे ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही हे ठाऊक आहे मला ! पण अरविंद आणि अमेयच्या यशाची व्याख्या तु कोणत्या मापदंडावर केली आहेस हे जाणुन घेण्यासाठी मी उत्सुक आहे!"

विनायक - (प्रकरण काहीसं गंभीर वळण घेत आहे असा सुप्त संदेश त्याच्या मेंदुने एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचवला होता !) "नाही म्हणजे अरविंदकडे आयुष्याच्या योग्य टप्प्यावर असलेली फुरसत  आणि अमेयकडं आयुष्याच्या उमेदीच्या काळात असलेला उज्ज्वल भवितव्याचा मार्ग विचारात घेऊन मी हे म्हणालो !"

अरविंद, विनायक आणि त्यांच्यासोबत एक वयस्क गृहस्थ वडाच्या झाडाखाली बसले आहेत, विनायकाच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव आहेत हे पाहुन उद्यानात नुकत्याच प्रवेश करत्या झालेल्या लागुआजींना राहावेनासे झाले. विनायक कधी संकटात सापडला असेल तर त्याला मदत करण्याचा आव आणुन त्याला अधिक संकटात टाकणे त्या आपले परमकर्तव्य समजत असत. त्यांना येताना पाहुन अरविंदने सरकुन त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली !

आजोबा - "तुझा विचार काही प्रमाणात योग्य आहे. आयुष्यात यश म्हणजे काय ह्याचा आपण बऱ्याच वेळा खोलवर विचार करतच नाही. आपणासमोर असलेली यशाची काही उदाहरणं म्हणजेच यशाच्या सर्व उपलब्ध शक्यता अशी समजुत आपण करुन घेतो."

लागु आजी - "विनायक मी ही तेच म्हणत होते. तु उगाचच अंतिम निष्कर्षाकडं लगेच धाव घेतोस ! "

आपली खोडी काढण्याची खुमखुमी आजींना आली असावी असा निष्कर्ष विनायकाने काढला. इथं आपण गप्प राहणं इष्ट असा अजुन एक संदेश त्याच्या मेंदूनं त्याला पाठवला. 

आजोबा - "तरुणपणी असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी ही तुमच्या आयुष्यातील यशाची पहिली पायरी ! पण ह्या आणि त्यापुढील पायरीवर पोहोचण्यासाठी आणि टिकुन राहण्यासाठी तुम्ही आयुष्यातील कित्येक महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता असते.  शालेय / 

महाविद्यालयीन जीवनातील खेळण्यात व्यतित केलेला वेळ हा तुमच्या पुढील आयुष्यातील उत्तम तब्येतीसाठी तुम्ही केलेली गुंतवणूक असते. 

एखादी कला विकसित करणे म्हणजे ताणतणावाच्या प्रसंगातुन मुक्त होण्यासाठी तुमच्याकडं असणारा हुकमी एक्का असतो. 

तुम्ही जोडुन ठेवलेली मित्रमंडळी, नातेवाईक म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा भारी गुंतवणूक ! 

मुलांवर केलेल्या संस्कारांतून जर तुम्हांला एक संतुलित व्यक्तिमत्व घडविता आलं तर आयुष्यातील चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना ही मुलं सामोरी जाऊ शकतात. "

आजोबांना अजुन बरंच काही बोलायचं होतं बहुतेक ! पण विनायकाचे विस्फारलेले डोळे पाहुन आजींना राहवलं नाही. 

आजी - " अहो आजोबा तुम्ही मंदिरात कीर्तन वगैरे करता का हो?"  

आजींचा हा अवेळी प्रश्न ऐकुन अरविंदच्या तोंडातुन आपसुक चकचक असा आवाज आला. 

आजोबा - (सस्मित चेहऱ्यानं !) "नाही मी इतका ज्ञानी माणुस नाही !"

अचानक समोर आलेल्या वडापावच्या गाडीमुळं ह्या तिन्ही लोकांची ज्ञानलालसेची स्थिती भंग झाली. वडापाववाल्याकडं फेरी मारुन आजोबांना तुम्ही वडापाव घेणार का असं विचारण्यासाठी म्हणुन ही मंडळी परत आली तोवर आजोबा अचानक गायब झाले होते. ह्या तिघांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि काहीसे अपराधी भाव होते. आजोबांना किमान नाव तरी विचारायला हवं होतं ही भावना त्यांच्या मनात दाटुन आली होती. आजीनी कीर्तनाचा प्रश्न विचारायला नको होता ह्याविषयी आजींसकट तिघांचेही एकमत झालं. 

(क्रमशः )
आदित्य पाटील 

रविवार, ८ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - १






एक मराठी मालिका ब्लॉग द्वारे ....   

विजयनगर एका महाराष्ट्रीयन नगरातील एक वसाहत. ह्या वसाहतीमधील काही कुटुंबांच्या जीवनासोबत फुलणारी ही  एक कथा !

श्री. गोखले - "सीमा तुला काही मदत हवी आहे का? मला दहा मिनिटात निघावं लागेल. आज सकाळी सात वाजताचे लेक्चर आहे."

सौ. गोखले - "मदत  वगैरे नको , झालाच हा डबा तयार ! "

सीमानं दिलेला डबा घेऊन अरविंद महाविद्यालयात जाण्यासाठी आपली कार सुरु करतात. इतक्यात त्यांना आपल्याच इमारतीतील राऊत दिसतात. त्यांच्या एकंदरीत जोशावरुन हे मॉर्निंग वॉकला निघाले असावेत असा कयास गोखले बांधतात.  

श्री. गोखले - "गुड मॉर्निंग राऊत! अहो आश्चर्यम ! आज तुम्ही इतक्या भल्या पहाटे ! "

श्री. राऊत  - "कसलं आश्चर्य न कसलं काय ! सध्या वर्क फ्रॉम होमचे दिवस आले आहेत त्यामुळं प्रवासाचा वाचलेला वेळ इथं मॉर्निंग वॉकसाठी सत्कारणी लावावा असा निर्धार केला आहे ! बघुयात किती दिवस टिकतो तो !

श्री. गोखले - "अरे वा चांगला निर्धार केला आहे ! असाच चालु ठेवा ! येतो मी !"

गोखलेंचा महाविद्यालयातील दिवस सुरळीत पार पडतो. संध्याकाळी साडेचार वाजता घरी आल्यानंतर फ्रेश होऊन चहापोहे घेऊन ते फेरफटका मारण्यासाठी खाली उतरण्याच्या तयारीत असतात. 

सौ. गोखले - "अहो ऐकलं का ! जरा थोडं पुढं जाऊन अमेयसाठी थोडे आवळे घेऊन या! रात्रीच्या घरी येण्याच्या वेळेचा पत्ताच नाही ! चांगलं आवळा सरबत करुन ठेवते म्हणजे ऍसिडिटी कमी व्हायला थोडीफार मदत होईल! 

श्री. गोखले - "ठीक आहे !"

सौ. गोखले - "आणि हो मी जिमला जाणार आहे ! जर मला यायला उशीर झाला तर कुकरला भात लावून ठेवा ! म्हणजे मी आल्यावर लगेच जेवायला बरं !

अरविंदच्या कपाळावर उठू पाहणारी आठी प्रयत्नपुर्वक टाळुन तो खाली उतरतो. वरच्या मजल्यावरुन येणाऱ्या लिफ्टमध्ये आधीच मानसी असते. 

मानसी - "काका कसे आहात तुम्ही ? "

श्री. गोखले - "मी कसा असणार ? मी मजेत आहे . तू कशी आहेस?"

मानसी - " मी ही मजेत आहे ! आम्ही कलाशाखेच्या वीसजणी ज्ञानेश्वरांच्या आणि महाराष्ट्रातील इतर संतांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी म्हणुन आळंदी आणि काही गावांना भेट देणार आहोत !"

श्री. गोखले - (अत्यंत कौतुकाच्या स्वरात !) अरे वा ! मानसी खुप छान ! कधी वेळ मिळाला तर घरी ये ना ! तुम्ही केलेल्या संतसाहित्याच्या अभ्यासाविषयी मला बरंच काही जाणुन घ्यायचं आहे ! 

मानसी - "नक्की काका ! येते मी !"

बराच वेळ अरविंदच्या  (अर्थात श्री. गोखलेंच्या ) मनात मानसीविषयी विचार घोळत राहतात. राऊत इतका IT मधला यशस्वी व्यावसायिक पण त्याच्या मुलीने, मानसीने जाणीवपुर्वक कलाशाखेची निवड केली होती ! आणि आपण मात्र विज्ञानाचे प्राध्यापक असुन मात्र अमेयच्या संशोधनाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं नाही !

विचाराच्या तंद्रीतच अरविंद भाजीवाल्याच्या ठेल्यावर पोहोचतो. आवळ्याच्या भावाची चौकशी करत असतानाच त्याला पुन्हा एकदा राऊत दिसतो! त्याच्या पाठीवर थाप देत हसत हसत अरविंद म्हणतो - "लेकाच्या तुझं वर्क फ्रॉम होम मस्त चालू आहे हे दिसतंय !" विनायक राऊतच्या चेहऱ्यावरील काहीसे ओशाळल्याचे भाव बघुन अरविंदला उगाच ह्याची थट्टा केली असे वाटतं ! "अरे ते जाऊ दे ! तुझ्या मानसीचे कौतुक करावे तितकं थोडं ! हल्लीच्या पिढीत आपल्या परंपरांचा अभ्यास करण्याची वृत्ती फारच क्वचित दिसते !

श्री. राऊत  - "अरे परंपरा वगैरे आपल्या जागी ठीक आहेत! पण हिच्या नोकरीचं काय होणार ह्याचीच मला चिंता लागुन राहिली आहे ! बाकी तुझी खरेदी झाली का? तुला वेळ असेल तर मस्त आपण ह्या पार्कात बसुयात का? दिवसभराचं काम आटपुन टाकलंय मी !"

"ही काय विचारायची गोष्ट झाली?" आपण आवळे योग्य किमतीत घेत आहोत ना ह्याविषयी अजुनही साशंक असलेला अरविंद विनायकला म्हणाला !

(क्रमशः )

आदित्य पाटील 

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

मराठी पाऊल पडते…


मुंबई मराठी माणसाची राहिली नाही ही खंत अगदी हल्ली हल्ली पर्यंत काही मराठी माणसं बोलून दाखवायची. आता ते ही बोलून दाखवत नाहीत. गेल्या काही वर्षांत जे काही झालं ते आपण सर्व जाणून आहोत. एखादे शहर जेव्हा अचानक अफाट वेगाने वाढू लागतं तेव्हा विविध पातळींवर संधी निर्माण होतात. जसे की मोठ्या बँकेत, बहुदेशीय कंपनीत किंवा मोठ्या भारतीय कंपनीत नोकरी करणे अशा पांढरपेशा क्षेत्रातील संधी जशा उपलब्ध असतात तसेच अगदी किराणा मालाची दुकान टाकणे, रिक्षा चालविणे , इस्त्रीची दुकान काढणे, भाजीची दुकान उघडणे ह्याही संधी उपलब्ध असतात.
मागील काही वर्षात सरसकट बहुतांशी मराठी माणसाने पांढरपेशा क्षेत्रातील संधींवर लक्ष केंद्रित केले. ह्या क्षेत्रात जसे जन्मजात हुशारीला महत्त्व आहे तसेच चिकाटीला सुद्धा! बरीच मराठी बुद्धिमान माणसे आपल्या बुद्धीच्या जोरावर अगदी सर्वोच्च पदांवर जाऊन पोहोचली. परंतु सर्वसाधारण मराठी माणसांची बऱ्याच वेळा कोंडी होताना दिसते. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे चिकाटीचा अभाव आणि सतत डोके वर काढणारा स्वाभिमान! प्रत्येक कंपनीने स्वीकारलेलं एक धोरण, एक संस्कृती असते. एकदा का त्या कंपनीत राहायचा निर्णय घेतला की त्या धोरणाशी, त्या संस्कृतीशी सुसंगत असं वागणं, अशी विचारसरणी अंगिकारण अपेक्षित असतं. राहायचं त्या कंपनीत परंतु मनातून, बोलण्यातून त्या कंपनीच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त करायची हे योग्य नव्हे. ही वृत्ती कंपनीत पुढे जाण्यास हानिकारक ठरू शकतेआजच लोकसत्तेत "स्वाभिम्यान" ह्या मथळ्याखाली सध्या गाजणारी बातमी वाचली. कंपनीत टिकून राहायचं असलं तर बऱ्याच वेळा स्वाभिम्यान करावा लागतो. आपला स्वाभिमान नक्कीच दाखवावा पण तो योग्य वेळ आल्यावर!
तसंच चिकाटीबाबत! जग कितीही बदलो, गरजेच्या वेळी जो माणूस हमखास उपलब्ध असतो, त्या माणसाची कदर मालक, कंपनी सदैव करणारच! ही चिकाटी, कामांच्या वेळच्या बाबतची शिस्त अंगीकारणं आवश्यक आहे.
आता दुसऱ्या प्रकारच्या संधींविषयी! वसईच्या होळीबाजारात घाऊक बाजारात भाजी विकत घेऊन त्याची किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या भैय्याने एका चांगल्या बिल्डींगमध्ये सदनिका घेतली, त्याची मुले इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकतात हे काही वर्षांपूर्वी मी ऐकलं होतं त्यावेळी मला आश्चर्य वाटलं होतं पण आज अजिबात वाटत नाही. आजूबाजूला नेहमी संधी उपलब्ध होत असतात, उघड्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. मध्येच एकदा असाच मी शनिवारी साडेसहाच्या सुमारास एकटाच वसईला जात होतो, म्हणजे बाकी सर्व आधीच शुक्रवारी गेले होते. तर वाटेत एका पोलिस अधिकाऱ्याने लिफ्ट मागितली. मी दहिसर चेकनाक्याच्याच दिशेने जात असल्याने लिफ्ट दिली. त्या पाच मिनिटात मी त्यांची आणि त्यांनी माझी चौकशी केली. त्यात त्यांनी जमिनी विकून गळ्यात सोनसाखळी मिरवणाऱ्या आणि वीस पंचवीस लाखाच्या गाड्या फिरवणाऱ्या काही समुदायाच्या मानसिकतेविषयी टीका केली. हे किती काळ टिकणार हा त्यांचा प्रश्न होता. गाडीतून उतरता उतरता "काळानुसार बदलता येणे ही बऱ्याच मराठी माणसांची समस्या आहे" असे गंभीर विधान त्यांनी केलं.पुढे वसईपर्यंत पोहोचेपर्यंत मी बराच वेळ त्यांच्या विधानावर विचार करत होतो.
मराठी माणूस कष्टाधारित व्यवसायाकडे अजूनही कमी प्रमाणात का वळतो? तर समाजात असलेल्या तथाकथित प्रतिष्ठेला तडा जाऊ नये म्हणून असेच उत्तर बऱ्याच वेळा आपणास आढळते. भुकेने मरायची वेळ आली तरी चालेल पण ही प्रतिष्ठा महत्त्वाची अशी परिस्थिती असते. ह्यात एकंदरीत समाज सुद्धा जबाबदार आहे. अकरावीची आठवण! रुपारेल सारख्या हुशार मुलांच्या कॉलेजात शिकत असताना एके दिवशी सततच्या अभ्यासाला वैतागून मी म्हणालो, "राहून दे हा अभ्यास! मी पुढे शेती वाडी करीन!" बाजूलाच शिवाजी पार्कात राहणारा देशमुख नावाचा मित्र होता. पार्कात राहत असल्याने जीवनाविषयीच्या त्याच्या संकल्पना स्पष्ट होत्या. तो म्हणाला, "तुझी वाडी किती मोठी आहे ते मला माहित नाही! पण कितीही मोठी असली तरी तुला शिकून जितकी चांगली बायको मिळेल तितकी वाडी करून मिळणार नाही!" त्यावेळी मला त्याचे हे विधान पटलं नाही पण आज बऱ्याच वेळा मी परिस्थिती पाहून मला त्याची आठवण येते.
अजून एक बाब, आपल्या लग्नसमारंभात आपण विविध लोकांशी भेटतो. ह्यात समाज विविध क्षेत्रातील लोकांना कशी वागणूक देतो हे ही आपण पाहतो. लबाडीने पैसा कमावून श्रीमंत झालेला माणूस जोवर अशा समारंभात कष्टाने रोजीरोटी कमावणाऱ्या माणसापेक्षा जास्त भाव खात राहील तोवर आपल्या समाजात कष्टाधारित उद्योगांना कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही!
असो आजच्या स्थितीत मराठी माणसापुढे काय संधी आहेत ह्याचा थोडा विचार करूयात! वाईट वाटून घेता हे तर मानायला हवे की मुंबई शहराच्या बाबतीत - We have missed the Boat! पूर्वी देशांतर करून प्रगती साधायची संधी जशी पूर्ण पणे साधली नाही तशीच! पण जगात नेहमीच संधी असणार! अजूनही भारतात विकसित होणारी छोटी शहरे आहेत. तिथे समूहाने स्थलांतरित होण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे! कोटीचे घर मुंबईत कसे घेणार असा विचार करीत मुंबईत दुःखाने आयुष्य काढण्यापेक्षा असलेल्या पुंजीच्या आधारे आपल्यासारख्या मित्रांना एकत्र करून एखाद्या गावात जाऊन मोठी जमीन विकत घेऊन तिथे शेती वा अन्य उद्योग करणे अजूनही शक्य आहे. धोपटमार्गाने जाण्यात स्पर्धा खूप असते कारण सर्वजण त्यात उतरतात. पण वेगळ्या मार्गाने जाण्यात मात्र कमी स्पर्धेचे एक सुख असतं.
बाकी  आजच्या "स्वाभिम्यान" शीर्षकामागे थोडी चेष्टेची सर होती असे मला वाटून गेलं. पण बाकी काही असो मला मात्र हा उपलब्ध सर्व पर्यायांचा अभ्यास करून शांत डोक्याने घेतलेला निर्णय वाटला. "युद्धात जिंकले पण तहात हरले" ही म्हण बदलायची वेळ आली आहे!
शेवटी जाता जाता, मराठी माणसाचं शाब्दिक कोटी करायचं वेड मात्र जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार बुवा! शाब्दिक कोटी असली की आपलं लक्ष कसं पटकन वेधलं जात! ह्या ब्लॉगपोस्टला "स्वाभिम्यान आणि मराठी पाऊल पडते… " असे शीर्षक देण्याचा मोह मी फार कसोशीने टाळला बरं का मंडळी!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...