एक मराठी मालिका ब्लॉग द्वारे ....
विजयनगर एका महाराष्ट्रीयन नगरातील एक वसाहत. ह्या वसाहतीमधील काही कुटुंबांच्या जीवनासोबत फुलणारी ही एक कथा !
श्री. गोखले - "सीमा तुला काही मदत हवी आहे का? मला दहा मिनिटात निघावं लागेल. आज सकाळी सात वाजताचे लेक्चर आहे."
सौ. गोखले - "मदत वगैरे नको , झालाच हा डबा तयार ! "
सीमानं दिलेला डबा घेऊन अरविंद महाविद्यालयात जाण्यासाठी आपली कार सुरु करतात. इतक्यात त्यांना आपल्याच इमारतीतील राऊत दिसतात. त्यांच्या एकंदरीत जोशावरुन हे मॉर्निंग वॉकला निघाले असावेत असा कयास गोखले बांधतात.
श्री. गोखले - "गुड मॉर्निंग राऊत! अहो आश्चर्यम ! आज तुम्ही इतक्या भल्या पहाटे ! "
श्री. राऊत - "कसलं आश्चर्य न कसलं काय ! सध्या वर्क फ्रॉम होमचे दिवस आले आहेत त्यामुळं प्रवासाचा वाचलेला वेळ इथं मॉर्निंग वॉकसाठी सत्कारणी लावावा असा निर्धार केला आहे ! बघुयात किती दिवस टिकतो तो !
श्री. गोखले - "अरे वा चांगला निर्धार केला आहे ! असाच चालु ठेवा ! येतो मी !"
गोखलेंचा महाविद्यालयातील दिवस सुरळीत पार पडतो. संध्याकाळी साडेचार वाजता घरी आल्यानंतर फ्रेश होऊन चहापोहे घेऊन ते फेरफटका मारण्यासाठी खाली उतरण्याच्या तयारीत असतात.
सौ. गोखले - "अहो ऐकलं का ! जरा थोडं पुढं जाऊन अमेयसाठी थोडे आवळे घेऊन या! रात्रीच्या घरी येण्याच्या वेळेचा पत्ताच नाही ! चांगलं आवळा सरबत करुन ठेवते म्हणजे ऍसिडिटी कमी व्हायला थोडीफार मदत होईल!
श्री. गोखले - "ठीक आहे !"
सौ. गोखले - "आणि हो मी जिमला जाणार आहे ! जर मला यायला उशीर झाला तर कुकरला भात लावून ठेवा ! म्हणजे मी आल्यावर लगेच जेवायला बरं !
अरविंदच्या कपाळावर उठू पाहणारी आठी प्रयत्नपुर्वक टाळुन तो खाली उतरतो. वरच्या मजल्यावरुन येणाऱ्या लिफ्टमध्ये आधीच मानसी असते.
मानसी - "काका कसे आहात तुम्ही ? "
श्री. गोखले - "मी कसा असणार ? मी मजेत आहे . तू कशी आहेस?"
मानसी - " मी ही मजेत आहे ! आम्ही कलाशाखेच्या वीसजणी ज्ञानेश्वरांच्या आणि महाराष्ट्रातील इतर संतांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी म्हणुन आळंदी आणि काही गावांना भेट देणार आहोत !"
श्री. गोखले - (अत्यंत कौतुकाच्या स्वरात !) अरे वा ! मानसी खुप छान ! कधी वेळ मिळाला तर घरी ये ना ! तुम्ही केलेल्या संतसाहित्याच्या अभ्यासाविषयी मला बरंच काही जाणुन घ्यायचं आहे !
मानसी - "नक्की काका ! येते मी !"
बराच वेळ अरविंदच्या (अर्थात श्री. गोखलेंच्या ) मनात मानसीविषयी विचार घोळत राहतात. राऊत इतका IT मधला यशस्वी व्यावसायिक पण त्याच्या मुलीने, मानसीने जाणीवपुर्वक कलाशाखेची निवड केली होती ! आणि आपण मात्र विज्ञानाचे प्राध्यापक असुन मात्र अमेयच्या संशोधनाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं नाही !
विचाराच्या तंद्रीतच अरविंद भाजीवाल्याच्या ठेल्यावर पोहोचतो. आवळ्याच्या भावाची चौकशी करत असतानाच त्याला पुन्हा एकदा राऊत दिसतो! त्याच्या पाठीवर थाप देत हसत हसत अरविंद म्हणतो - "लेकाच्या तुझं वर्क फ्रॉम होम मस्त चालू आहे हे दिसतंय !" विनायक राऊतच्या चेहऱ्यावरील काहीसे ओशाळल्याचे भाव बघुन अरविंदला उगाच ह्याची थट्टा केली असे वाटतं ! "अरे ते जाऊ दे ! तुझ्या मानसीचे कौतुक करावे तितकं थोडं ! हल्लीच्या पिढीत आपल्या परंपरांचा अभ्यास करण्याची वृत्ती फारच क्वचित दिसते !
श्री. राऊत - "अरे परंपरा वगैरे आपल्या जागी ठीक आहेत! पण हिच्या नोकरीचं काय होणार ह्याचीच मला चिंता लागुन राहिली आहे ! बाकी तुझी खरेदी झाली का? तुला वेळ असेल तर मस्त आपण ह्या पार्कात बसुयात का? दिवसभराचं काम आटपुन टाकलंय मी !"
"ही काय विचारायची गोष्ट झाली?" आपण आवळे योग्य किमतीत घेत आहोत ना ह्याविषयी अजुनही साशंक असलेला अरविंद विनायकला म्हणाला !
(क्रमशः )
आदित्य पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा