मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १० मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - २





अरविंद गोखले आणि विनायक राऊत चालत चालत जवळच असलेल्या उद्यानात  येतात. प्रत्यक्षात होळी सुरु असताना मालिकेतसुद्धा होळी सुरु असायलाच हवी असा काही नियम नसल्यानं इथं इस्त्री केलेल्या शुभ्र कपड्यांमध्ये मंडळी होळी खेळताना आढळत नाहीत. एका दाट छाया देणाऱ्या वडाच्या झाडाखाली दोघेजण बैठक मारतात.  हवापाण्याच्या गप्पा सुरु होत असतानाच त्यांच्या बाजुला काही अंतरावर एक आजोबा  येऊन बसतात. त्यांच्याकडे  एक नजर टाकुन दोघेजण गप्पा सुरु ठेवतात. 

विनायक - "लेका अरविंद ! तुला खरोखरीच सुदैवी म्हणायला हवं !"

अरविंद - (काहीसा दचकुन ) "का रे बाबा ? अचानक तुला काय झालं?"

विनायक - "अरे मस्त प्राध्यापकाची नोकरी ! सकाळ संध्याकाळ मस्त नोकरीच्या वेळा ठरलेल्या ! संध्याकाळी येऊन चांगली घासाघीस करुन भाज्या खरेदीला पण तुला वेळ मिळतो ! अमेयने सुद्धा चांगला IT मधला जॉब शोधला. नाहीतर आमची मानसी बघ ! कसलं संतसाहित्याचा अभ्यास करण्याचं खुळ डोक्यात घेऊन बसली आहे ! राहता राहिलो मी ! इंटरनेटवर वेळच्या वेळी भाजीपाला मागविण्यासाठी सुद्धा मला रिमाइंडर ठेवावा लागतो

अरविंद - "अरे किती बोललास एकदम ! असं एकदम काही बोलण्याचं तुला सुचतंच कसं ?

विनायक - (चेहऱ्यावरील मिश्किल भाव लपविण्याचा यत्किंचितही प्रयत्न न करता !) "महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयावर तासंतास डोस देतो तेव्हा रे ?"

"आयुष्यातील यश म्हणजे नक्की काय हो? " अचानक बाजुनं आवाज येतो. दोघेही दचकुन पाहतात. प्रश्न बाजुला बसलेल्या आजोबांनी विचारलेला असतो. 

" मुबलक पैसाअडका, सुखी कुटूंब, अंगणात चारचाकी वाहन वगैरे वगैरे !" आपला मिश्किल स्वभाव परक्या माणसासमोर सुद्धा लपवुन ठेवणं विनायकाला आवडत नसे ! 

आजोबा - "बाळा, तु फारसं गंभीरपणे ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही हे ठाऊक आहे मला ! पण अरविंद आणि अमेयच्या यशाची व्याख्या तु कोणत्या मापदंडावर केली आहेस हे जाणुन घेण्यासाठी मी उत्सुक आहे!"

विनायक - (प्रकरण काहीसं गंभीर वळण घेत आहे असा सुप्त संदेश त्याच्या मेंदुने एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचवला होता !) "नाही म्हणजे अरविंदकडे आयुष्याच्या योग्य टप्प्यावर असलेली फुरसत  आणि अमेयकडं आयुष्याच्या उमेदीच्या काळात असलेला उज्ज्वल भवितव्याचा मार्ग विचारात घेऊन मी हे म्हणालो !"

अरविंद, विनायक आणि त्यांच्यासोबत एक वयस्क गृहस्थ वडाच्या झाडाखाली बसले आहेत, विनायकाच्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव आहेत हे पाहुन उद्यानात नुकत्याच प्रवेश करत्या झालेल्या लागुआजींना राहावेनासे झाले. विनायक कधी संकटात सापडला असेल तर त्याला मदत करण्याचा आव आणुन त्याला अधिक संकटात टाकणे त्या आपले परमकर्तव्य समजत असत. त्यांना येताना पाहुन अरविंदने सरकुन त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली !

आजोबा - "तुझा विचार काही प्रमाणात योग्य आहे. आयुष्यात यश म्हणजे काय ह्याचा आपण बऱ्याच वेळा खोलवर विचार करतच नाही. आपणासमोर असलेली यशाची काही उदाहरणं म्हणजेच यशाच्या सर्व उपलब्ध शक्यता अशी समजुत आपण करुन घेतो."

लागु आजी - "विनायक मी ही तेच म्हणत होते. तु उगाचच अंतिम निष्कर्षाकडं लगेच धाव घेतोस ! "

आपली खोडी काढण्याची खुमखुमी आजींना आली असावी असा निष्कर्ष विनायकाने काढला. इथं आपण गप्प राहणं इष्ट असा अजुन एक संदेश त्याच्या मेंदूनं त्याला पाठवला. 

आजोबा - "तरुणपणी असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी ही तुमच्या आयुष्यातील यशाची पहिली पायरी ! पण ह्या आणि त्यापुढील पायरीवर पोहोचण्यासाठी आणि टिकुन राहण्यासाठी तुम्ही आयुष्यातील कित्येक महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता असते.  शालेय / 

महाविद्यालयीन जीवनातील खेळण्यात व्यतित केलेला वेळ हा तुमच्या पुढील आयुष्यातील उत्तम तब्येतीसाठी तुम्ही केलेली गुंतवणूक असते. 

एखादी कला विकसित करणे म्हणजे ताणतणावाच्या प्रसंगातुन मुक्त होण्यासाठी तुमच्याकडं असणारा हुकमी एक्का असतो. 

तुम्ही जोडुन ठेवलेली मित्रमंडळी, नातेवाईक म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा भारी गुंतवणूक ! 

मुलांवर केलेल्या संस्कारांतून जर तुम्हांला एक संतुलित व्यक्तिमत्व घडविता आलं तर आयुष्यातील चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या प्रसंगांना ही मुलं सामोरी जाऊ शकतात. "

आजोबांना अजुन बरंच काही बोलायचं होतं बहुतेक ! पण विनायकाचे विस्फारलेले डोळे पाहुन आजींना राहवलं नाही. 

आजी - " अहो आजोबा तुम्ही मंदिरात कीर्तन वगैरे करता का हो?"  

आजींचा हा अवेळी प्रश्न ऐकुन अरविंदच्या तोंडातुन आपसुक चकचक असा आवाज आला. 

आजोबा - (सस्मित चेहऱ्यानं !) "नाही मी इतका ज्ञानी माणुस नाही !"

अचानक समोर आलेल्या वडापावच्या गाडीमुळं ह्या तिन्ही लोकांची ज्ञानलालसेची स्थिती भंग झाली. वडापाववाल्याकडं फेरी मारुन आजोबांना तुम्ही वडापाव घेणार का असं विचारण्यासाठी म्हणुन ही मंडळी परत आली तोवर आजोबा अचानक गायब झाले होते. ह्या तिघांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि काहीसे अपराधी भाव होते. आजोबांना किमान नाव तरी विचारायला हवं होतं ही भावना त्यांच्या मनात दाटुन आली होती. आजीनी कीर्तनाचा प्रश्न विचारायला नको होता ह्याविषयी आजींसकट तिघांचेही एकमत झालं. 

(क्रमशः )
आदित्य पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...