खरंतर ही पोस्ट मी लिहिण्यात अर्थ नाही, म्हणजे मला ही पोस्ट लिहिण्याचा नैतिक अधिकार असे माझ्या ब्लॉगवर मनापासून प्रतिक्रिया देणारे मोजके सुहृद उरले आहेत ते म्हणु शकतात. तरी ही सवयीचा गुलाम असल्यानं ही पोस्ट! सुरुवातीला पोस्टची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काही उदाहरणं
१. हल्ली ज्याचा बोलबाला आहे असं बहुचर्चित तंत्रज्ञान वापरून तुम्ही ज्यावेळी तुमचं पहिलं प्रेसेंटेशन बनवता त्यावेळी ह्या तंत्रज्ञानानं निर्माण केलेली आकर्षक स्लाईड पाहून तुम्ही अगदी प्रभावित होता. त्यानं वापरलेल्या प्रभावी संज्ञा, अगदी व्यावसायिक पद्धतीनं आलेखाद्वारे मांडलेली माहिती पाहून आपण ह्याआधी हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात का केली नाही हा विचार तुमच्या मनात नक्कीच येतो.
काही दिवस जातात. तुम्ही अजून काही प्रेसेंटेशन्स बनवता, तुमच्या सहकाऱ्यांनी बनविलेली प्रेसेंटेशन्स पाहता. मग अचानक तुम्हांला जाणवतं की कुठंतरी ह्या साऱ्या प्रेसेंटेशन्स मध्ये सारखेपणा आलेला आहे. त्या प्रभावी संज्ञा, ते आकर्षक आलेख तुमच्या समोर येण्याची वारंवारता वाढली आहे. तुम्ही सावध होता, मग तुम्हांला जाणवतं की ह्या तंत्रज्ञानाची जी काही निर्मिती आहे ती जशीच्या तशी स्वीकारणं धोक्याचं असतं, त्यानं जे काही निर्माण केलं आहे ते तपासून पाहायला तज्ञ माणूस हवाच ! Human in the loop म्हणतात तो हाच ! सध्यातरी तो हवाच !
२. सोशल मीडियावर बरेचजण आपल्या जीवनातील आनंदाच्या बातम्या जाहीर करतात. इथं शेअर हा शब्द न वापरण्याचा निर्धार केल्यानं जाहीर हा काहीसा जशाचा तसा अर्थ न व्यक्त करणारा शब्द वापरला आहे. 'आनंदाची बातमी' ह्या शब्दप्रयोगाची व्याप्ती ५:५७ च्या चर्चगेट विरार लोकलमध्ये उडी मारून खिडकीची जागा मिळाली पासून ते माझी भारतीय T २० संघात निवड झाली इतकी मोठी असू शकते. पण त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये बहुदा ९०% खालील प्रतिक्रियांचा समावेश असतो. आता मराठी लोकसुद्धा मराठीतून प्रतिक्रिया देत नसल्यानं प्रातिनिधिक म्हणवल्या जातील अशा प्रतिक्रिया देण्याइतपत माहिती उपलब्ध नाही.
"Wow! That's awesome!"
"Congratulations!"
"I'm so happy for you!"
"That's great news!"
"I'm thrilled for you!"
"Fantastic!"
"That's amazing!"
आता ५:५७ च्या विरार लोकल मध्ये खिडकीची जागा मिळाली ही बातमी सोशल मीडियावर टाकणारा विद्वान "I'm thrilled for you!" ह्या प्रतिक्रियेला कसे उत्तर देत असेल ते माहिती नाही. पण सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच प्रतिक्रिया आपण आयुष्यातील सर्व घटनांसाठी वापरत असल्यानं समोरील व्यक्तीला आपल्या प्रतिक्रियेच्या, भावनांच्या खरेखुरेपणाविषयी साशंक व्हायला होतं. ह्यात ग्यानबाची मेख अशी ज्या क्षणी आपण अनेकांच्या आयुष्याचा हिस्सा होण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण खरेतर कोणाच्याच आयुष्यात नसतो.
३. श्रीमान प्रथिन ह्या गृहस्थानं बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात खळबळ माजवली आहे. तो दररोज मांसाहारी आहार करणाऱ्या लोकांच्या घरात चिकन, अंडी घेऊन येतो. पूर्वी पांढरा रस्सा, तांबडा रस्सा ह्या क्वचितच घरी बनणाऱ्या डिशेस आज बनविल्या जात हे ऐकूनच अत्यानंदाच्या भावनांनी उचंबळून येणाऱ्या माणसांच्या मनात आज दररोज बनणाऱ्या ह्या डिशेसच्या उल्लेखानं थोडीही खळबळ निर्माण होत नाही.
४. बऱ्याच धार्मिक, सामाजिक समारंभांना हल्ली एक साचेबंदपणा येऊ लागला आहे. मर्यादित वेळेमुळे विवाह, मुंज वगैरे समारंभातील धार्मिक विधी बऱ्याच वेळा एक सोपस्कार म्हणून पार पाडावे लागतात. अर्थात ह्याला अपवाद असतातच. सामाजिक समारंभांना बेगडी रूप आलं आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. त्यातील भाषणं, एकमेकांचं कौतुक करण्याची वृत्ती, कोणताही वाद न होऊ देण्याची घेतलेली खबरदारी ह्यामुळं अशा समारंभांत कधीकधी अगदी वैतागून जायला होतं.
पहिलं उदाहरण देण्याचं प्रयोजन असं की हे नवीन तंत्रज्ञान जसं एका साचेबंद पद्धतीनं उत्तर, माहिती देण्याची शक्यता महत्तम असते त्याचप्रमाणे आपण सुद्धा हल्ली एका साचेबद्ध पद्धतीनं बोलु चालू लागलो आहोत!
दुसऱ्या उदाहरणात मला अभिप्रेत असलेला मुद्दा हा की नाती, मैत्री ह्या मध्ये वेळ गुंतवावा लागतो. पूर्ण मनापासून वेळ गुंतवला तरच ह्या नाती, मैत्रीमध्ये खरंखुरेपण येऊ शकतं. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे केवळ असतं ते तोंडदेखलेपण ! प्रगतीच्या पुढील टप्प्यांमध्ये आपल्या वेळेवर संगणक, भ्रमणध्वनी, कार्यालय अधिक हक्क गाजवत राहतात. मग उरलेल्या वेळात केवळ त्या चेकबॉक्स वर टिक करायचं म्हणून आपण तोंडदेखलेपणानं प्रतिक्रिया देत राहतो. आता हे पूर्णपणे चुकीचं असं म्हणता येणार नाही. किमान आपण प्रयत्न तरी करत असतो!
तिसऱ्या उदाहरणातील मुद्दा अति परिचयात अवज्ञा ! सतत संपर्कात राहिल्यानं नातेसंबंधातील गोडवा कमी होण्याचं भय असतं.
पण जपण जर खरोखर गंभीरपणे विचार केला तर हे सारं अपरिहार्य आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर मनुष्य भावनांपासून फारकत घेणार हे विधीलिखित आहे. आजही जगातील विविध मनुष्य समुदाय त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार आपल्या भावना वेगवेगळ्या प्रमाणात नियंत्रित करायला शिकले आहेत. उत्क्रांतीच्या टप्प्यावर सर्वात पुढे असणारी माणसं आपली जीवनशैली पूर्णपणे यंत्रांशी सर्वप्रथम जुळवून घेतील.
जाता जाता ह्या पोस्टमधील हे हसतमुख बाळ ! हल्लीच्या बहुचर्चित तंत्रज्ञानाला मी असं चित्र बनविण्याची विनंती केली असता त्यानं मला मोजके दोन तीन प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची मी उत्तरं दिल्यानंतर तात्काळ हे हसतमुख बालक माझ्यासमोर आलं. केवळ भावनांचं खरेखुरेपण हरवलं नसावं, आपल्या भोवतालच्या बऱ्याच गोष्टींच्या खरेखुरपणाबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !
खरे आहे ते मित्रा. आपण जितके तंत्रज्ञानाचा उपयोग करून वेळ वाचवायचा प्रयत्न करत आहोत तितके आपण भाव नाशून्य, एकसुरी, पण राजकीयदृष्ट्या तटस्थ आणि म्हणून शक्यतो वाद टाळणारे बनत आहोत. मराठीचा जास्तीत जास्त वापर करून शक्यतो स्वनिर्मित नैसर्गिक प्रतिक्रिया देत आहे. निदान म्हणून तरी डोक्याला आणि बुद्धीला ताण देतो आहे.
उत्तर द्याहटवा