मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

Enough is not ...


गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक चांगलं वाक्य वाचायला मिळालं. Enough is not quantity; but it is a decision. पुरेसं हे एक प्रमाण नसुन तो एक निर्णय असतो. नेहमीप्रमाणं हे वाक्य मी माझ्या अनेक मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांच्यात चर्चेसाठी घेऊन गेलो. 

वाक्याचा अर्थ सर्वांनाच खुप भावला. मला इतका पगार मिळाला की मी समाधानी होईल, मला दादरला मोठी सदनिका मिळाली की मी सुखी होईन अशा आणि तत्सम सुखसमाधानाच्या आपण रेखा आखुन घेतो. पण भोवतालची परिस्थिती सदैव बदलत राहते. एक विशिष्ट पगारच, विशिष्ट उपनगरातील सदनिकाच आपणाला का हवीहवीशी वाटते? कारण ह्या घटकांशी आपण आपली विशिष्ट जीवनशैली, समाजातील आपली पत ह्या गोष्टींचा संबंध मनात जुळवून ठेवतो. कदाचित आपण मनातल्या मनात सुखाचं एक मोठंसं क्लिष्ट समीकरण बनवून ठेवतो. 
सुख = सदनिकेचे आकारमान ^ २ + ३.१४ * पगार + ... अजुन बरंच काही!

होतं काय की आपण सुखाची ही व्याख्या घेऊन काहीशा अजुन उच्चभ्रु गटात सहभागी व्हायला गेलो की आपल्याला कळुन चुकतं की तिथं सुखाच्या व्याख्येत केवळ सदनिकेच्या आकारमानाचा वर्ग पुरेसा नाही तर तिथं त्याचा घन घेतला जातो. तुमच्याकडील High End गाड्यांची संख्या समीकरणात समाविष्ट केली जाते. 

मग मात्र आपल्याला समजुन चुकतं की सुख, समाधान, चवीचं खाणं, चांगले कपडे, दागिन्यांची / वाहनांची हौस ह्याला कुठंच मर्यादा नाहीत! मर्यादा असल्या त्या आपल्या मनात आहेत. भाकरीचा, ब्रेडचा तुकडा खाऊन रस्त्यावर वाहनांच्या कोलाहलात झोपणारा गरीब माणुस आणि चमचमीत जेवण रिचवुन आलिशान शयनगृहात झोपणारा श्रीमंत ह्यांच्या समाधानाची पातळी कदाचित एकच असु शकते ! 

नेकीनं केलेल्या माझ्या प्रयत्नांची पातळी माझं समाधान ठरवेल हा निर्णय घेऊन पहा. कदाचित आयुष्य सोपं होईल ! 

पोस्ट आटोपती घेतोय. कारण इथंही पोस्टचा आकार नव्हे तर त्यातील सार महत्वाचं आहे. वाचकमंडळी सुज्ञ असल्यानं त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला ह्याविषयी तिळमात्र शंका नाही ! 

हरि मुखे म्हणा  Enough is not ...!!

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

मैं बावली हुँ तेरी !


"वत्सा, पुरे झाला तुझा आडमुठेपणा !" भगवंताचे संतप्त उदगार माझ्या कानात पडताच मी प्रचंड हादरलो. 
"तुला ह्या क्षणी झोपेतुन जागे होण्याची इच्छा असली तरी मी माझा संदेश दिल्याशिवाय तसं होऊ देणार नाही हे लक्षात असु देत !" भगवंत म्हणाले. 
"भगवंता, माझा नक्की प्रमाद काय झाला हे कृपा करुन सांगाल का?" मी म्हणालो. 
"तुझ्या ब्लॉगमधुन तू सद्यःकालीन कलाकृतींना अजिबात स्थान दिलं नाही. ह्यात दोन शक्यता आहेत. एक तर तु सद्यःकालीन कलाकृतींपासून पुर्णपणे अनभिज्ञ आहेस किंवा तु त्यांना हेतुपुरस्पर  पुर्णपणे दुर्लक्षित ठेवलं आहे." भगवंतांचा पारा खाली उतरण्याची चिन्हं दिसत नव्हती. 
"मला माफ करा भगवंत ! माझी चुक मला पुर्णपणे मान्य आहे. पण सद्यकालीन कलाकृती ह्या संज्ञेचा व्यापक अर्थ ध्यानात घेता तुमचा रोख नक्की कशावर आहे हे ह्या पामरास तुम्ही सांगितलं तर बरं होईल !" 
"तु सद्यःकालीन हिंदी गाण्यांवर एकही पोस्ट लिहिली नाहीस!" भगवंतांचा राग काहीसा निवळला होता.  
"ठीक आहे मी प्रयत्न करतो!" मी म्हणालो. मी ही गाणी पाहतच नाही असं खोटं बेधडकपणे बोलण्याचा मोह मी समोर भगवंत असल्यानं टाळला. भगवंतांकडे ह्याविषयी अधिक चौकशी करण्याची माझी मनिषा भगवंत अचानक अंतर्धान पावल्यानं अपुर्णच राहिली. 

दिवस उजाडताच मी भगवंतांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी म्हणुन केबल टीव्ही सुरु केला. सकाळसकाळी ही गाणी मी सुरु केली आहेत हे पाहुन घरात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पण अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडं वेळ नव्हता. अचानक मी एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करत असल्याची मला जाणीव होऊ लागली. समोर मैं बावली हुँ तेरी ! ह्या गाण्यावर नायक नायिका नृत्य करत / थिरकत होते!

जो अख लड़ जावे 
सारी रात नींद ना आवें 
मैनूं बड़ा तडपावे 
दिल कहीं चैन ना पावे !

कदाचित भगवंतांनी केलेल्या किमयेचा परिणाम म्हणुन मला ह्या गाण्यातील भावार्थ पुर्णपणे उमगु लागला होता. हे नाथा,  आपली नजरानजर काय झाली आणि  तु माझी चैन, झोप सर्व काही हिरावुन घेतलं आहेस. 

मैं बावली हूँ तेरी 
तू जान हैं ना मेरी। 
एक प्यार ही माँगा था 
किस बात की हैं देरी !
ये रात कभी ना आवे ! 

मी तुझ्या प्रेमात हरवुन गेली आहे, वेडी झाल्ये आहे. तू माझे सर्वस्व आहेस. मी तुझ्याकडे केवळ प्रेम मागितलं आहे, ATM कार्ड आणि पासवर्ड थोडाच मागितला आहे? मग तू ह्या गोष्टीसाठी इतका वेळ का लावत आहेस ? 

शेवटच्या ओळींचा अर्थ लावताना मला सर्वप्रथम लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो  ह्या गाण्याची आठवण झाली. अचानक भगवंतांची संतप्त मुद्रा माझ्यासमोर प्रकट झाली. 
"अरे वेड्या! गीतकार ह्या ओळीतून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छितो, की परीक्षेआधीची ही शेवटची रात्र आहे! गपचुप अभ्यास करा, ही रात्र परत येणार नाही, नंतर पस्तावाल  !" 

ह्या गाण्याचा उदात्त अर्थ समजल्यानं मी धन्य झालो होतो. इतके दिवस उगाचच ह्या नवीन काळातील  उत्तमोत्तम गाण्यांचा अर्थ समजुन घेण्याचा आपण प्रयत्न सुद्धा केला नाही ह्या भावनेमुळं मी पश्चात्तापदग्ध झालो होतो. परदेशी बातम्यांच्या वाहिन्या पाहण्यापेक्षा अशी भावार्थाने भरलेली गाणी पाहता यावीत ह्यासाठी केबल प्लॅनमध्ये बदल करण्याचा माझा मानस पक्का झाला होता. 

केवळ अर्थ समजला म्हणुन मी धन्य झालो आहे ही गोष्ट भगवंतांना पटली नसावी. शेवटी भगवंतच ते ! 

"तु गाणं केवळ ऐकलं की पाहिलं सुद्धा?" माझ्या कानात आवाज आला. 

"हो पण सकाळसकाळी दिवाणखान्यात हे गाणं पाहायला फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती !" मी हळु आवाजात पुटपुटलो! 

"अरे मुर्खा, नायक - नायिकेचा फिटनेस पाहिलास का? सद्यःकालीन तरुण पिढी इंटरनेटच्या अधीन होऊन आपली शारीरिक तंदुरुस्ती गमावुन बसत आहे. त्यांनी आपल्या फिटनेसकडे पुन्हा एकदा लक्ष द्यावे असा सुप्त संदेश युवापिढीला देण्यात आला आहे !"   मी हे शब्द ऐकुन पुर्णपणे हेलावुन गेलो. 

"ह्यापुढील असंच एखादं उदबोधक गाणं सुचवाल का?" असा प्रश्न विचारण्याचा माझ्या मनात विचार आला. परंतु भगवंत आधीच नाराज झाल्यानं त्यांची अधिक नाराजी ओढवुन घेण्याचा धोका पत्करण्यास मी तयार नव्हतो. "Lamborghini चलाये जाने हो" ह्या गाण्यातुन आर्थिक मंदीतून बाहेर पडून आर्थिक समृद्धी कशी संपादन करावी ह्याविषयी नक्कीच सुप्त संदेश दिला गेला असणार ह्याविषयी माझी पुरेपूर खात्री पटली आहे. त्यामुळे हे गाणे नवीन दृष्टीकोनातुन पाहण्याचा / ऐकण्याचा मी दृढ मानस केला. "शनिवारी सकाळी हा काय उद्योग सुरु आहे?" एक नजरेतुन घरातील बॉसने संदेश दिला आणि मी माझा हा उपक्रम तुर्तास स्थगित केला !

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

फ्रान्स, निराशावाद आणि मी !



आमच्या केबल टीव्हीवर काही धाटणीबाहेरच्या वाहिन्या सुद्धा येतात. ह्यात CGTN (चिनी वाहिनी), DW TV (जर्मन वाहिनी), RT (रशियन वाहिनी), France TV ह्या आणि इतर काही वाहिन्यांचा समावेश होतो. जाहिरातींनी  व्यापलेल्या टीव्हीच्या स्क्रीनवरील उर्वरित भागातुन डोकावणाऱ्या  वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या जसे की महाराष्ट्रातील पिकांची परिस्थिती, उत्तर भारतातील टोल नाक्यावर घातलेला गुंडांचा हैदोस वगैरे बघण्याची इच्छा नसेल तर मग मी ह्या वाहिन्यांकडे वळतो. तसं पाहिलं तर सह्याद्री आणि दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवरील बातम्या पाहण्यास मला आवडतं. पुर्ण पडद्यावर कोणत्याही जाहिरातींचा नसलेला अडथळा, आक्रस्ताळेपणाने न ओरडणारे, चित्रविचित्र हावभाव न करणारे निवेदक असले की मला शांत वाटतं. 

CGTN (चिनी वाहिनी) वर अनेक उदबोधक कार्यक्रमांचे प्रक्षेपण केलं जाते. त्यावर पाश्चात्य देशातील निवेदक सुद्धा असतात. आणि चिनी सरकारचा कायम पुरस्कार केला जात नाही. त्यांचा Big Story हा कार्यक्रम सुद्धा उदबोधक असतो. गुगलवर Big Story + CGTN + Archive असा शोध घेतला असता अनेक माहिती देणाऱ्या लिंक्स सापडतील. 

आजच्या पोस्टचा विषय France TV वर ह्या आठवड्यात पाहिलेल्या फ्रान्स राष्ट्रातील नकारात्मकता (Pessimism) हा आहे.  फ्रान्स राष्ट्रातील नकारात्मकतेविषयी सखोल चर्चा घडवुन आणली जात होती. चर्चेची सुरुवात आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या फ्रान्समधील लोकांनी नकारात्मक भुमिका स्वीकारलीच कशी ह्या विस्मयकारी सुरातून झाली. मग चर्चेचा ओघ तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुम्ही जीवनात आनंदी असणं ह्याचा थेट संबंध असतोच असे नाही इथं गेला. चर्चेत भाग घेणारी अनेक मंडळी असल्यानं एकानं अचानक फ्रान्स राष्ट्रात नकारात्मकता पिढ्यानपिढ्या ठासुन भरली आहे असे छातीठोकपणे प्रतिपादन केले. त्यानंतर शालेय जीवनातील आणि इतर सामाजिक व्यासपीठावरील तारुण्यातील अनुभव कदाचित ह्या नकारात्मकतेला कारणीभुत ठरत असतील असा सूर आळवला गेला. प्रत्यक्ष मन:स्थितीपेक्षा त्या मनःस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेत / शब्दप्रयोगात कदाचित नकारात्मकता भरली असावी असाही संशय व्यक्त केला गेला. एकंदरीत पुढील पिढी आपल्यापेक्षा अधिक आनंदी आयुष्य जगू शकेल ह्याविषयी फारसं कोणी आशावादी दिसलं नाही. 

हा कार्यक्रम पाहुन एका तत्त्वावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सर्वमान्य समस्या आयुष्यातुन निघुन गेल्या की माणुस, समाज नवनवीन समस्यांचा शोध घेऊ लागतो. ह्या नवनिर्मित समस्यांच्या वसाहतीकरणात विद्वान लोक चर्चेच्या माध्यमातुन मोलाचा हातभार लावतात. पण एक गोष्ट मला जाणवली. एकंदरीत पुढील पिढी आपल्यापेक्षा अधिक आनंदी आयुष्य जगू शकेल ह्याविषयी फारसं कोणी आशावादी दिसलं नाही.  हा भाग कदाचित आपल्या भारतीयांना सुद्धा लागु होत आहे. आपल्या आधीच्या पिढी किमान शिक्षणानं आपली पुढील पिढी आपला जीवनस्तर उंचावु शकेल असा आशावाद बाळगुन होती. आजची पिढी  कदाचित सध्याचा जीवनस्तर बऱ्यापैकी उंचावल्यामुळं जीवनस्तर ह्याहुन अधिक उंचावणं म्हणजे चंगळवादाच्या आहारी जाण्याचं भय बाळगुन आहे. मागच्या पिढीला संस्कारी समाजाचं बऱ्यापैकी वरदान लाभलं होतं. आज हे कवच पुर्णपणे भेदले गेले आहे. थोडक्यात माझ्या मानसिक गोंधळात अधिक भर पडली आहे. परत आपल्या मराठमोळ्या वाहिन्यांकडं मोर्चा वळविलेला बरा ! आणि हो फ्रेंच पुरुष अगदी देखणे, रसिक वगैरे जे काही वाचलं होतं त्यामुळं निर्माण झालेल्या प्रतिमेला धक्का पोहोचला तो वेगळाच ! 

नंतर दोनच दिवसांनी CGTN टीव्हीवर एल साल्वाडोर मधुन अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडुन निघालेल्या आणि वाळवंटांतील अत्यंत कठोर हवामानामुळं मृत्यमुखी पडलेल्या तरुणावर आधारित एक ४५ मिनिटांचा कार्यक्रम पाहावयास मिळाला. अचानक खऱ्या समस्यांचं वास्तविक दर्शन पाहुन मन हेलावुन गेलं ! 

यंद्याच्या वर्षी कंपनीच्या सुट्ट्यांच्या वाटपात काहीसा वेगळेपणा आल्यानं आज सुट्टी मिळाली! खरं तर चांगलं काही गोड गोड बोलायला हवं होतं पण .... 

रविवार, १२ जानेवारी, २०२०

अल्याड पल्याड !



काल अगंबाई सासुबाई मध्ये सासरेबुवांनी आपल्या गरीब बिचाऱ्या सुनेची बाजु घेत किट्टी पार्टी करणाऱ्या स्त्रीवर्गाला काही सुनावलं. किट्टी पार्टी हा मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो. आपल्या व्यावसायिक, कौटुंबिक आयुष्याच्या पलीकडं एक जग असावं असं प्रत्येकाला वाटणं आवश्यक आहे.  व्यावसायिक, कौटुंबिक आयुष्य हे बऱ्याच वेळा जबाबदाऱ्यांनी भरलेलं असतं. त्यात बहुतांशी वेळा सर्व बुरखे बाजुला सारुन स्वतःला आपल्या मुळ स्वरुपात व्यक्त होता येत नाही. त्यामुळं सर्व वयोगटातील माणसं अशा औपचारिक आयुष्याच्या पलीकडील आपल्या अस्तित्वाच्या शोधात असतात. किट्टी पार्टी हे त्याचंच एक उदाहरण होय. पण बाकीच्या अनौपचारिक जीवनाच्या उदाहरणापेक्षा किट्टी पार्टी थोड्या जास्त चर्चेत राहतात. 

औपचारिक आयुष्य जबाबदाऱ्यांनी भरलेलं, काहीसं बंधनकारक, तणावदायी असा ढोबळमानाने ग्रह करुन गेला असल्यानं अनौपचारिक आयुष्यात आपल्याला मुक्तपणे वावरुन तणावमुक्त होता येईल अशा अपेक्षेनं आपण त्यात प्रवेश करतो. ह्या अनौपचारिक जगातील सुरुवातीचा मधुचंद्राचा काळ ओसरु लागताच मग हे ही जग गैरसमज, हेवेदावे, त्यातुन निर्माण होणारे तणाव ह्यापासुन मुक्त नाही ह्याची जाणीव आपणास होते. औपचारिक आणि अनौपचारिक आयुष्यातील अपेक्षित अनुभवांचं केलेलं वर्गीकरण आणि अनौपचारिक आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव ह्यांची फारकत होण्यास सुरवात होते. 

विविध लोक ह्या परिस्थितीला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातात. काही लोक ह्या ही जगातीलअपरिपुर्णतेला स्वीकारुन तिथलं आपलं अस्तित्व कायम ठेवतात. कारण त्यांना एकटेपणा कोणतीही किंमत देऊन चुकवायचा असतो. काही लोक मात्र ह्यामुळं पुन्हा एकला माझा मार्ग ह्या तत्वाचा स्वीकार करतात. हा पर्याय पुन्हा एकदा स्वीकारल्यावर आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनातील अपरिपुर्णता पुन्हा एकदा त्रासदायक होऊ लागते. 

आता थोडा त्रयस्तपणे ह्याच्याकडे पाहुयात. आपल्या मनुष्यजातीच्या मेंदुच्या विचारपद्धतीत सर्वशक्तिमानाने काहीशी त्रुटी निर्माण करुन ठेवली आहे असं मानण्यास वाव आहे. रिकामी वेळ मिळाला असता बहुतांशी लोक by default आराम, चकाट्या पिटणे असे उद्योग करु लागतात. रिकामी वेळ मिळाल्यास वाचन, बागकाम, समाजसेवा वगैरे करणारी लोक तुलनेने कमी असतात. ह्यातील समाजसेवा ह्या संज्ञेची हल्ली इतकी व्यापक व्याख्या झाली आहे की त्यावर मौन धारण करणेच योग्य! जगातील बऱ्याच समस्या मनुष्यजातीने रिकाम्या काळात केलेल्या निरर्थक, स्वस्वास्थ्यास आणि समाजस्वास्थ्यास घातक अशा कृतींमुळे निर्माण होतात असे मानण्यास वाव आहे. 

मग सर्वशक्तिमानाने असं का केलं असावं? असं म्हणजे समाजस्वाथ्याची व्याख्या एक बनवायची आणि रिकाम्या वेळात बहुतांशी मनुष्यजातीला समाजस्वास्थ्याच्या विरोधात वागण्याची सुप्त इच्छा त्यांच्या मेंदुत पेरुन ठेवायची. ह्यात तुम्ही असा मुद्दा उपस्थित करु शकता की समाजस्वास्थ्याची व्याख्या सर्वशक्तिमानाने बनविलेली नाही, ती आपणच बनवली आहे. हा मुद्दा बरोबर आहे. त्यामुळं पुढे जाऊयात! 

समजा सर्वांच्या मनात चांगले विचार आले असते, सर्वजण सदैव कष्ट करत राहिले असते, सर्वांनी मिळुन खूप धान्य पिकवले असते, दुधाचे प्रचंड उत्पादन केले असते, उत्तमोत्तम वस्त्रे निर्माण केली असती! तर आपण सर्वजण सुखी झालो असतो का? कदाचित हो ! पण हे शक्य होत नाही, कारण स्वतंत्र विचार करणारा मेंदु आपणास मिळाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजांची पूर्ती, स्वतःच्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी ही इच्छा, दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवता यावं ही प्रबळ इच्छा, ज्ञानाची / कलेची ओढ ह्या विविध पातळ्यांवर हा मेंदु कार्यरत असतो. बहुदा मेंदुविरहित मानव समाज आणि मेंदूसह मानव समाज हे दोन पर्याय सर्वशक्तिमानापुढे असावेत. त्यातील मेंदूसह मानवसमाजाच्या पर्यायाचा संभाव्य धोक्यासहित स्वीकार करण्याचं त्यानं पत्करलं असावं. त्यामुळं किट्टी पार्ट्यांसहित जगातील सर्व समस्यांना सर्वशक्तिमानाचा हा निर्णयच जबाबदार आहे ह्या निष्कर्षाप्रती मी येऊन पोहोचलो आहे ! ह्या निर्णयाचा प्रतीकात्मक पश्चताप   म्हणुन तो किट्टी पार्ट्यांत सहभागी होणाऱ्या लोकांना मेंदुचा किमान वापर करुन देत असावा !

रविवार, ५ जानेवारी, २०२०

नात्यांचा जीवनक्रम !



नात्यांचे अनुबंध प्रत्येकाभोवती कळत नकळत गुंतले जातात. काही नाती रुढार्थानं नावं बाळगुन असतात तर काहींना तितकेही भाग्य नसतं. नाती कधी, कुठं जुळावी ह्याविषयी लिखित नियम असणं शक्य नाही. ह्या  पोस्टमध्ये नाती म्हणजे रक्ताची नाती, मैत्रीची नाती असे सर्व काही अर्थ अभिप्रेत आहेत. 

आयुष्याच्या पुर्वार्धात माणसाला बरीच नाती आपसुकच मिळतात. लहानपणीची नाती ही वारसाहक्कानं मिळालेली असतात. बालपणी अनुभवलेल्या नात्यांत खुपदा निरागसतेचा अनुभव आल्यामुळं आपण एकंदरीत नात्यांविषयी  खुप आशादायक दृष्टिकोन घेऊन पुढील आयुष्यात पाऊल ठेवतो.  शिक्षण संपल्यानंतर  माणसाचं आयुष्य खुपच गतिमान बनतं . त्यामुळं काही मोजकी नाती सोडली तर बाकीच्या नात्यांकडं लक्ष देण्यास फुरसत मिळत नाही. 

एखाद्या नात्याचा जीवनक्रम कसा असतो? जीवनक्रम म्हणजे नक्की काय? नातं जुळणं, दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना ओळखुन घेऊन नातं स्थिरतेकडं नेणं आणि मग त्यानंतर नात्यांतील स्थिरतेचा काळ ! आदर्श स्थितीमध्ये नात्यांचा जीवनक्रम काहीसा वर उल्लेखल्याप्रमाणं असायला हवा ! परंतु जीवनात आदर्श असं काही नसतं ! त्यामुळं ह्या नात्यांच्या जीवनक्रमात बरेच चढावउतार येतात. सहजासहजी जुळू शकणारी नाती काही कारणानं  जुळत नाहीत, कमी माहितीवर आधारित नाती जोडली जातात आणि मग अपेक्षाभंगाचं शल्य उरी बाळगत निभावली जातात किंवा मोडली जातात, काही नाती सुरुवातीच्या काळात अत्यंत वादळी प्रवास करुन त्यातील प्रवाशांना शहाणं करुन सोडतात, आपल्या भुमिकांच्या आणि नात्यांच्या पुर्नव्याख्येनंतर मग एक शांत संयत वाटचाल करतात. काही शहाणी नाती आयुष्यभर समजुतदार प्रवास करतात. काही उत्साही नाती आयुष्य अगदी रसरसुन जगतात. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर माणुस स्वतःकडं अलिप्ततावादी दृष्टीनं पहायला शिकतो. हा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी येत असला तरी तो कधीतरी नक्कीच यायला हवा. ह्या घटनेनंतर मनुष्याच्या आयुष्यातील नात्यांमध्ये काहीसा फरक पडत असावा. नात्यांतील उत्कटता काहीशी संपुष्टात येत असावी! अहम भावनेचा त्याग करुन माणसं स्वत्वाच्या शोधात निघतात ! आपल्या संपुर्ण आयुष्याकडं तटस्थेनं पाहण्याची क्षमता त्यांच्यात येते ! पैलतीराचा शोध वगैरे म्हणतात ते हेच असावं कदाचित !  

वायनाड भेटीच्या वेळी काढलेल्या दोन छायाचित्रांची ह्यावेळी आठवण झाली. दूरवर पाहिस्तोवर दिसणारी हिरवाई , जाणवणारी शांतता! आयुष्यात सुद्धा अशी मनःस्थिती लाभणं किती भाग्याचं नाही का?




Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...