काल अगंबाई सासुबाई मध्ये सासरेबुवांनी आपल्या गरीब बिचाऱ्या सुनेची बाजु घेत किट्टी पार्टी करणाऱ्या स्त्रीवर्गाला काही सुनावलं. किट्टी पार्टी हा मोठा चर्चेचा विषय होऊ शकतो. आपल्या व्यावसायिक, कौटुंबिक आयुष्याच्या पलीकडं एक जग असावं असं प्रत्येकाला वाटणं आवश्यक आहे. व्यावसायिक, कौटुंबिक आयुष्य हे बऱ्याच वेळा जबाबदाऱ्यांनी भरलेलं असतं. त्यात बहुतांशी वेळा सर्व बुरखे बाजुला सारुन स्वतःला आपल्या मुळ स्वरुपात व्यक्त होता येत नाही. त्यामुळं सर्व वयोगटातील माणसं अशा औपचारिक आयुष्याच्या पलीकडील आपल्या अस्तित्वाच्या शोधात असतात. किट्टी पार्टी हे त्याचंच एक उदाहरण होय. पण बाकीच्या अनौपचारिक जीवनाच्या उदाहरणापेक्षा किट्टी पार्टी थोड्या जास्त चर्चेत राहतात.
औपचारिक आयुष्य जबाबदाऱ्यांनी भरलेलं, काहीसं बंधनकारक, तणावदायी असा ढोबळमानाने ग्रह करुन गेला असल्यानं अनौपचारिक आयुष्यात आपल्याला मुक्तपणे वावरुन तणावमुक्त होता येईल अशा अपेक्षेनं आपण त्यात प्रवेश करतो. ह्या अनौपचारिक जगातील सुरुवातीचा मधुचंद्राचा काळ ओसरु लागताच मग हे ही जग गैरसमज, हेवेदावे, त्यातुन निर्माण होणारे तणाव ह्यापासुन मुक्त नाही ह्याची जाणीव आपणास होते. औपचारिक आणि अनौपचारिक आयुष्यातील अपेक्षित अनुभवांचं केलेलं वर्गीकरण आणि अनौपचारिक आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभव ह्यांची फारकत होण्यास सुरवात होते.
विविध लोक ह्या परिस्थितीला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जातात. काही लोक ह्या ही जगातीलअपरिपुर्णतेला स्वीकारुन तिथलं आपलं अस्तित्व कायम ठेवतात. कारण त्यांना एकटेपणा कोणतीही किंमत देऊन चुकवायचा असतो. काही लोक मात्र ह्यामुळं पुन्हा एकला माझा मार्ग ह्या तत्वाचा स्वीकार करतात. हा पर्याय पुन्हा एकदा स्वीकारल्यावर आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनातील अपरिपुर्णता पुन्हा एकदा त्रासदायक होऊ लागते.
आता थोडा त्रयस्तपणे ह्याच्याकडे पाहुयात. आपल्या मनुष्यजातीच्या मेंदुच्या विचारपद्धतीत सर्वशक्तिमानाने काहीशी त्रुटी निर्माण करुन ठेवली आहे असं मानण्यास वाव आहे. रिकामी वेळ मिळाला असता बहुतांशी लोक by default आराम, चकाट्या पिटणे असे उद्योग करु लागतात. रिकामी वेळ मिळाल्यास वाचन, बागकाम, समाजसेवा वगैरे करणारी लोक तुलनेने कमी असतात. ह्यातील समाजसेवा ह्या संज्ञेची हल्ली इतकी व्यापक व्याख्या झाली आहे की त्यावर मौन धारण करणेच योग्य! जगातील बऱ्याच समस्या मनुष्यजातीने रिकाम्या काळात केलेल्या निरर्थक, स्वस्वास्थ्यास आणि समाजस्वास्थ्यास घातक अशा कृतींमुळे निर्माण होतात असे मानण्यास वाव आहे.
मग सर्वशक्तिमानाने असं का केलं असावं? असं म्हणजे समाजस्वाथ्याची व्याख्या एक बनवायची आणि रिकाम्या वेळात बहुतांशी मनुष्यजातीला समाजस्वास्थ्याच्या विरोधात वागण्याची सुप्त इच्छा त्यांच्या मेंदुत पेरुन ठेवायची. ह्यात तुम्ही असा मुद्दा उपस्थित करु शकता की समाजस्वास्थ्याची व्याख्या सर्वशक्तिमानाने बनविलेली नाही, ती आपणच बनवली आहे. हा मुद्दा बरोबर आहे. त्यामुळं पुढे जाऊयात!
समजा सर्वांच्या मनात चांगले विचार आले असते, सर्वजण सदैव कष्ट करत राहिले असते, सर्वांनी मिळुन खूप धान्य पिकवले असते, दुधाचे प्रचंड उत्पादन केले असते, उत्तमोत्तम वस्त्रे निर्माण केली असती! तर आपण सर्वजण सुखी झालो असतो का? कदाचित हो ! पण हे शक्य होत नाही, कारण स्वतंत्र विचार करणारा मेंदु आपणास मिळाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजांची पूर्ती, स्वतःच्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी ही इच्छा, दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवता यावं ही प्रबळ इच्छा, ज्ञानाची / कलेची ओढ ह्या विविध पातळ्यांवर हा मेंदु कार्यरत असतो. बहुदा मेंदुविरहित मानव समाज आणि मेंदूसह मानव समाज हे दोन पर्याय सर्वशक्तिमानापुढे असावेत. त्यातील मेंदूसह मानवसमाजाच्या पर्यायाचा संभाव्य धोक्यासहित स्वीकार करण्याचं त्यानं पत्करलं असावं. त्यामुळं किट्टी पार्ट्यांसहित जगातील सर्व समस्यांना सर्वशक्तिमानाचा हा निर्णयच जबाबदार आहे ह्या निष्कर्षाप्रती मी येऊन पोहोचलो आहे ! ह्या निर्णयाचा प्रतीकात्मक पश्चताप म्हणुन तो किट्टी पार्ट्यांत सहभागी होणाऱ्या लोकांना मेंदुचा किमान वापर करुन देत असावा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा