मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २३ मार्च, २०२५

आठवणीतल्या कविता - आजीचे घड्याळ


काल सायंकाळी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातून नाटक पाहून बाहेर पडताना मॅजेस्टिकचे पुस्तक प्रदर्शन दिसलं.  'दोन वाजून बावीस मिनिटं' ह्या नाटकानं खूप आनंद दिला. बऱ्याच काळानं खुर्चीला खिळवून ठेवणारं, कलाकारांचा वास्तववादी अभिनय  आणि प्रत्येक प्रसंग अगदी अलगदपणे खुलवत अनपेक्षित शेवटाकडं प्रवास करणारं  असं हे नाटक ! पुस्तक प्रदर्शन पाहून नकळत पावलं तिथं वळली. अर्ध्या तासानं मीना प्रभूंची वाचायची राहून गेलेली काही प्रवासवर्णनाची पुस्तकं, 'आठवणीतील कविता' ह्या  जुन्या काळात शाळेत शिकलेल्या आठवणीतील कवितांच्या संग्रहाचे दोन भाग आणि इतर काही पुस्तकं घेऊन आम्ही बाहेर पडलो.  प्राजक्ताला मराठी कवितांची खास आवड असल्यानं ही कवितासंग्रहांची खरेदी झाली. 

ह्या कविता संग्रहाचे एकूण चार भाग आहेत. जुन्या काळातील मराठी जीवनाचं प्रतिबिंब घडविणारे असे हे चार भाग. ह्या पुस्तकाच्या संकल्पनेचे बीज कसं रुजलं आणि त्यातून ही एक सुंदर कलाकृती कशी निर्माण झाली हे आपल्याला ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत अगदी सविस्तर वाचायला मिळतं.  पुढील काळात जमेल तसं ह्यातील एकेक कवितेचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करीन.  एक सुवर्णयुग म्हणता येईल असा कालावधी आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी अनुभवला. त्यातील प्रतिभावान कवी, लेखकांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यानं ह्या कालावधीतील काही सुवर्णक्षणांना कागदावर नोंदवलं. प्रत्येक मराठी माणसानं अशा कलाकृती नक्कीच वाचाव्यात. असा सुवर्णकाळ परत येईल अशी भाबडी आशा मनात बाळगावी !

आजची कविता 

कवी - केशवकुमार 
 

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

रसग्रहण 

सर्वप्रथम ह्या कवितेसोबत असलेलं चित्र आपल्याला जुन्या काळात ओढून नेतं. अनेक नातवंडांना आपल्या मायेनं न्हाऊ घालणारी ह्या चित्रातील आजी आपल्याला आपल्या आजीची नक्कीच आठवण करून देते. सर्वात धाकट्या नातवाच्या चेहऱ्यावरील अचंबा चित्रकारानं हुबेहूब टिपला आहे. वयानं थोड्या मोठ्या अशा नाती मात्र आजीच्या सहवासात अगदी निश्चिन्तपणे तिच्या समोर बसल्या आहेत किंवा लाडीकपणे तिला मिठी मारून तिची माया अनुभवत आहेत. आजीच्या कथेत कितीही भय निर्माण झालं तरी शेवट मात्र सुखद असणार ह्याची अनुभवानं त्यांच्याकडे आलेली आश्वासकता बहुदा त्या छोट्या नातवाकडं नाही! 

आजीकडं घड्याळ नाहीच किंबहुना आजी हेच घड्याळ हे सर्व वाचकांना ठाऊक आहे. पण थेट त्याचा उल्लेख न करता आजीचं नातवांप्रती असणारं प्रेम, धाक, त्यांनी शिस्तबद्ध राहावं ही कळकळ कवितेतील विविध उदाहरणांतून आपल्यासमोर येते.  सकाळी पहाटे अभ्यासासाठी मला उठव हे एकदा का आजीला सांगितलं की अगदी बिनधास्त गाढ झोपून जावं हे नातवंडांना ठाऊक आहे. आजी आपल्या नातवंडांवर कसे संस्कार करत असे हे ही ह्या कवितेतून अलगदपणे आपल्यासमोर उलगडत जातं. नातवंडांनी वक्तशीरपणा न दाखवल्यास चिडणाऱ्या आजीचा लटका राग आपल्यासमोर 'घणघणा घंटाध्वनी', 'लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा' ह्या शब्दप्रयोगातून येतो. रूपकातून सारं काही कसं अलगदपणे व्यक्त करावं हे मागच्या पिढीकडून शिकावं. मला तर असं वाटत राहतं की खरी प्रगत तर ती पिढी होती. शेवटच्या कडव्यात आजीचं घड्याळ दैनंदिन नव्हे तर आठवडाभरातील वार, वर्षभरातील सणांचा सुद्धा कसा हिशेब ठेवत असे हे सांगायला कवी विसरत नाही. मग हळूच आठवत येते ती रविवारी संकष्टी आहे हे सांगणाऱ्या आई / ताई / सासूबाईंच्या फोनची ! अशी आजी असेल तर नातवंडाचं भावविश्व समृद्ध होणारच, आयुष्यभरात निराशेला कसं बाजूला सारून आयुष्य जगावं ह्याची शिकवण त्यांना आपसूकच मिळणार !
 
येईल का कधी परत असा काळ आणि ते आजीचं घड्याळ ?

1 टिप्पणी:

  1. छान, साधी सोपी कविता आणि सुरेख रसग्रहण. आजी चा असा सहवास आपल्या पिढीला क्वचितच लाभला असेल, परंतु या कवितेतील आजीची सर्व दिनचर्या आम्ही आईच्या रुपात अनुभवली. पुढील पिढीला ही कविता कदाचित समजणार नाही.

    उत्तर द्याहटवा

आठवणीतल्या कविता - आजीचे घड्याळ

काल सायंकाळी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातून नाटक पाहून बाहेर पडताना मॅजेस्टिकचे पुस्तक प्रदर्शन दिसलं.  'दोन वाजून बावीस मिनिटं' ह्या...