मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १७ मार्च, २०२५

ती पाच मिनिटं !


प्रसंग १ 

आपण बऱ्याच वेळा अगदी उच्च पदावरील व्यवस्थापकांसमोर एखाद्या विषयावर सादरीकरण करतो. इथं अगदी मुद्देसुद आणि धोरणात्मक असं बोलावं लागतं. अशा वेळी चुकीला वाव नसल्यानं अशा सादरीकरणाची तयारी काही दिवस / आठवडे आधीपासून करावी लागते. एक चांगली किंवा आवश्यक सवय म्हणून काहीजण (त्यात मी समाविष्ट ) अशा सादरीकरणाच्या वेळी वापरण्याची संहिता (स्क्रिप्ट साठी खोलवर शब्द) लिहून काढतात, त्याचा सराव करतात. योग्य शब्द वापरले जावेत, महत्वाचे मुद्दे योग्य क्रमाने यावेत, चेहऱ्यावरील हावभाव / ठासून मांडायचा एखादा मुद्दा ह्यांचा सराव व्हावा हा ह्यामागील हेतू असतो. 

आपण कसून सराव करतो. तो दिवस उजाडतो, आपण त्या मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश करतो. काही ओळखीच्या, काही अनोळखी लोकांना हॅलो म्हणतो. मनात कुठंतरी उजळणी सुरु असते. इथं सर्व स्क्रिप्ट आठवण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. इथं आवश्यक असतं ते महत्वाचे दोन तीन मुद्दे लक्षात ठेवणं. ते महत्वाचे मुद्दे कोणते ह्याविषयी संभ्रम नसावा. बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्याला १० मिनिटं बोलायला मिळेल असं सांगितलेलं असतं पण मिळतात दोन मिनिटं! अशा वेळी हे महत्वाचे मुद्दे कामी येतात. तुम्ही कितीही प्रदीर्घ सराव करा, पण ही महत्वाच्या मुद्द्यांची उजळणी करणारी शेवटची पाच मिनिटं सदैव लक्षात असू द्यात. 

प्रसंग २ 

परदेशी प्रवास करताना आपण आपापल्या सवयीनुसार तयारी करतो. काही लोक आठवडा आठवडा तयारी करतात. माझे एक जेष्ठ सहकारी केवळ अर्धा तासात बॅग्स भरतात, कारण नक्की काय न्यायचं आहे ह्याविषयी असणारी सुस्पष्टता! असो पण आपल्यासारख्या साध्या माणसांसाठी ज्यावेळी विमानतळावर नेण्यासाठी येणारी कॅब यायला पाच मिनिटं उरतात त्यावेळी समोर असणाऱ्या त्या दोन भल्या मोठ्या चेक इन बॅग्स, म्हणायला छोट्या पण ठासून सामान सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या केबिन बॅग्स पाहून उगाचच मन सैरभैर होतं. आपण काही विसरत तर नाही आहोत अशी भिती निर्माण होते. अशा वेळी फक्त आपलं पारपत्र, मोबाईल (ज्याद्वारे आपण तिकीट, आरोग्य विमा वगैरे वगैरे मिळवू शकतो) आणि परकीय चलन घेतलं आहे की नाही हे पाहावं ! ह्या गोष्टी विसरलात तर दुर्धर प्रसंगाला तोंड द्यायला लागेल. 

प्रसंग ३ 

पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित ह्यातील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश मिळत असे. एक एक गुणांच्या फरकावर तुमचा एखाद्या महाविद्यालयातील / शाखेतील प्रवेश निश्चित होत असे किंवा हुकत असे. अशा परिस्थितीत ह्या विषयांच्या पेपरच्या वेळी परीक्षादालनात प्रवेश करण्याआधीची ती शेवटची पाच मिनिटं अगदी महत्वाची असतात. काहीजण संपूर्ण पुस्तक त्या पाच मिनिटांत चाळण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण डोळे मिटून ध्यान लावून मनातल्या मनात उजळणी करतात. मी मला जे धडे अगदी व्यवस्थित येत असत त्याची डोळे मिटून उजळणी करत असे. ' फील गुड' फॅक्टर (स्वयंम आत्मविश्वासाची भावना) घेऊन परीक्षादालनात प्रवेश करावा हा हेतू असे. 

आपल्या व्यवसायानुसार, आयुष्यानुसार अशी ही महत्वाची पाच मिनिटं वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतील. मी मांडली ती वानगीदाखल काही उदाहरणं ! आता शेवट एक काहीसा भावनात्मक ! आयुष्यातील शेवटची पाच मिनिटं माणसाच्या मनात नेमके काय विचार घेऊन असतील. आपल्याला खरोखर जाणवत असेल का ही आपली शेवटची पाच मिनिटं आहेत ते? जर खरोखरच जाणवले तर आयुष्याची गोळाबेरीज आपण ह्या पाच मिनिटांत मांडू शकू का? आणि ती मांडता आली तर आपल्याला नक्की काय आठवेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आठवणीतल्या कविता - आजीचे घड्याळ

काल सायंकाळी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातून नाटक पाहून बाहेर पडताना मॅजेस्टिकचे पुस्तक प्रदर्शन दिसलं.  'दोन वाजून बावीस मिनिटं' ह्या...