Saturday, November 21, 2015

अश्रू - वि. स. खांडेकर

Netbhet.com
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि. स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक. कथा म्हणून बघितली तर साधीसुधी. एका आदर्शवादी शिक्षकाचा १९५० च्या आसपास तुटपुंज्या पगारात संसार चालविण्यासाठी, आपल्या मुलाचा एक साधा ३० रुपयाची सायकल आणून देण्याचा हट्ट पुरविण्यासाठी आणि आपल्या बहिणीच्या लग्नासाठी २००० रुपये हुंडा जमा करण्यासाठी चाललेला संघर्ष हे वरवर पाहता दिसणारे कथेचे सार! खांडेकर आपल्या मराठी भाषेच्या वैभवाची खैर करताना आढळतात
वानगीदाखल 'रात्र तलम चंदेरी  वस्त्र नेसून विश्वाच्या वीणेवर विश्रांतीची शांत रागिणी आळवू लागली होती . तिच्या एकेक मध्यम  स्वराची एकेक सुंदर तारका होत होती'.काळानुसार मराठी भाषेत कसकसे बदल होत गेले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि १९५० च्या दशकातील भाषेचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून ह्या पुस्तकाची निवड होऊ  शकते

कथेतील  महत्वाचे पात्र नायकाच्या पत्नीचे. ती जरी नायकाची पत्नी असली तरी नायिका नाही. ह्या एकत्र कुटुंबात सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आयुष्य व्यतित करणे हीच तिची कहाणी आहे, हेच तिचे विश्व आहे. 
कहाणीत खांडेकरांनी उमेच्या मनात शंकरविषयी असलेल्या प्रितीभावनेचे सुरेख वर्णन केलं आहे. कथेतील उमेची प्रिती जशी मूक आहे तशीच खांडेकर ह्या भावनेसाठी वापरलेली भाषा सुद्धा सूचक आहे. 
बाह्य जगाच्या दृष्टीने अगदी सामान्य असलेल्या आपल्या पतीला उमा मात्र अगदी मनापासून पूजत असते. आपल्याच वाट्याला आर्थिक तंगी का यावी असला प्रश्न तिला पडत नाही. समजा हीच परिस्थिती आजच्या युगातील एखाद्या जोडप्याच्या वाट्याला आली असती तर त्या पत्नीला आपल्या पतीविषयी असे निरामय प्रेम जपणे शक्य झाले असते का?
ह्याचं उत्तर नाही असण्याचीच शक्यता जास्त आहे. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे हल्लीच्या युगात स्त्रीचे विश्व उमाइतके मर्यादित राहिलं नाही. ते खूप व्यापक बनलं आहे. ह्या स्त्रीच्या मनात सुरु असणाऱ्या विचारचक्राची वैविधता बरीच व्यापक बनली आहे. जीवनात येणाऱ्या विविधांगी अनुभवामुळे व्यापक बनणारे हे विचारचक्र ह्या आधुनिक स्त्रीला मानसिक समाधानाच्या उंच पातळ्यांवर नेऊन ठेवते आणि अशा प्रकारे मानसिक समाधान अनुभवणारी स्त्री ज्यावेळी आपल्या पतीशी संवाद साधते त्यावेळी जर तिचा वारंवार अपेक्षाभंग होत असेल तर ती हळूहळू स्वतःभोवती एक कोश विणू लागते आणि मग तारा कधी जुळल्याच जात नाहीत. हल्लीच्या युगातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या पुरुषास ही विवंचना बाजूला ठेवून आयुष्यातील बाकीच्या बाबींच्या जोरावर आपल्या पत्नीशी चांगल्या प्रकारे सुसंवाद साधणे कितपत शक्य आहे?

ह्या पुस्तकाच्या आरंभी खांडेकरांनी प्रस्तावनासदृश्य 'दोन शब्द' लिहिले आहेत आणि शेवटी ह्या पुस्तकाची 'पार्श्वभूमी' लिहिली आहेत
'दोन शब्द' मधून खांडेकरांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. १९३० साली लिहिलेल्या "हृदयाची हाक" ह्या कादंबरीला त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांच्या लेखन कर्तृत्वाचा आलेख उंचावतच राहिला होता. पण काही कालावधीनंतर ते काहीसे सुप्तावस्थेत गेले. अश्रू ह्या कादंबरीआधीची दहा वर्षे त्यांची कोणतीही कादंबरी प्रकाशित झाली नाही. ह्या सर्वांची मीमांसा त्यांनी ह्या "दोन शब्द" ह्या प्रस्तावनेत केली आहे

"पार्श्वभूमी" मध्ये ते १९०० सालच्या आसपास हरिभाऊ आपटे ह्यांनी वर्णिलेल्या मध्यमवर्गाचा संदर्भ देतात. आणि ती परिस्थिती १९५० सालापेक्षा कशी वेगळी होती ह्याचे पृथ्थकरण करतात. गेल्या शंभर वर्षात मागे वळून पाहिले असता जीवनात खूपच स्थित्यंतरे झाली आहेत असं त्यांना जाणवलं. मला ही एक महत्वाची बाब वाटली. हल्लीची म्हणजे २०१५ सालची मंडळी सुद्धा आमच्या लहानपणी असं होतं तसं होतं असे म्हणत असतात. अगदी नेमकी तीच भावना १९५० च्या सुमारास खांडेकरांच्या मनात सुद्धा होती. म्हणजे फारसे काही चिंतेचे कारण नाही हो मंडळी

खांडेकरांच्या नजरेतून गेल्या काही वर्षात यंत्रयुगाने सामाजिक जीवन व्यापून टाकलं. ह्या यंत्रयुगाने सामान्य माणसांच्या जीवनात ज्याप्रमाणे सुखसोयींच्या संधी उपलब्ध केल्या त्याचप्रमाणे अनेक पटींनी क्लिष्टताही निर्माण केली. खांडेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर "सुंदर फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखावरून भयंकर साथीचे जंतू जिकडे तिकडे पसरावेत, तसे ह्या युगाचे कर्तुत्व विचारवंतांना वाटू लागलं आहेहे युग ज्याप्रमाणे कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवर उपाय आणते त्याचप्रमाणे अणुबॉम्बची विध्वंसकतासुद्धा हे युग निर्माण करते. पुन्हा एकदा यंत्रयुगाविषयी खांडेकरांनी जी भावना व्यक्त केली आहे नेमकी तीच आज संगणकयुगाविषयी बाळगून आहोत. यंत्रयुग झालं , आज संगणकयुग बहुदा आणखी काही वर्षांनी यंत्रमानव आणि संगणक ह्यांचं एक संयुक्त युग असेल आणि त्यात माणसे कुठेतरी जीव मुठीत धरून हीच भीती व्यक्त करतील. कालाय तस्मे नमः!! 

गेल्या पन्नास वर्षात दिसलेला अजून एक फरक खांडेकर मांडतात. टिळक आगरकरांनी जो स्वार्थत्यागाचा आणि ध्येयवादाचा कित्ता घालून दिला तो महाराष्ट्रातील पुढल्या दोन पिढ्यांना पुरला. नव्या इंग्रजी शिक्षणाचे फायदे जुन्या विद्येकडून तिकडे वळलेल्या मध्यमवर्गीयांच्या पदरात पडले. त्यामुळे बराच काळ आदर्शवाद बाळगताना सुद्धा आर्थिक विवंचनेचे सावट मध्यमवर्गीयांवर कधी आलेच नाही. पण पहिल्या महायुद्धानंतर मात्र परिस्थिती पालटली. आणि मग त्यानंतर गांधींजीचा उदय झाला. मध्यमवर्गीयांचा ध्येयवाद अजूनही काही प्रमाणात शाबूत राहिला होता. पण इंग्रजी अंमल जसजसा सुस्थिर होऊ लागला तसतसा मध्यमवर्गीयांचा एकजिनसीपणा मोडला. त्यांच्या परंपरागत निष्ठा द्विधा झाल्या. समाजातील एक थर आर्थिक ध्येयांच्यामागे धावताना दिसला

खांडेकरांची विश्लेषणशक्ती अत्यंत खोलवर आहे ह्याची प्रचीती ह्या पार्श्वभूमी लेखनातून वारंवार येत राहते. पैशाची ऊब नसली की माणसाच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.खालच्या वर्गातील लोकांची पैशाच्या अभावी जी कुतरओढ होते ती शारीरिक गरजांची असते; ह्या उलट पैशाअभावी मध्यमवर्गीयाला मात्र भावनिक आणि वैचारिक कुतरओढीला सामोरे जावे लागते. अगदी खालच्या वर्गाने परंपरेने आणि परिस्थितीने त्याच्या इच्छा, वासना आणि अपेक्षा मर्यादित केलेल्या असतात. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख मध्यमवर्गाइतके ह्या वर्गाच्या वाट्याला येत नाही
जवळजवळ वीस पाने खांडेकर आपल्याला ह्या अगदी खोलवर विश्लेषणाने खिळवून ठेवतात. अखेरीस ते एक महत्वाचा मुद्दा मांडतात
जगाच्या दृष्टीने अतिशय सामान्य व्यक्तीचे चित्र रंगवणे कितपत महत्वपूर्ण आहे? त्याच वेळी त्यांचे दुसरे मन त्यांना उत्तर देई, "विसाव्या शतकानं दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सर्वसामान्य माणसाला दिलेलं महत्त्व!" असामान्यत्वाचे आकर्षण जगाला वाटावे हे स्वाभाविक आहे. पण जीवनातील अधिक भाग कुणाचा असतो? मुठभर असामान्यांचा की शेकडा नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजवर राजांनी, वीरांनी,संतांनी, तत्वज्ञानी लोकांनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी ह्या सामान्य माणसाला बोलू दिले नव्हते पण आज ह्या सामान्य माणसाची वेळ आली आहे. सामान्य माणूस भलेही काही असामान्य करत नसेल पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चुकीचे पाऊल न उचलण्याचा पराकोटीचा संयम हा मध्यमवर्गीय दाखवतो आणि तेच ह्याचे असामान्यत्व!!

खरंतर केवळ कथा वाचून मी ज्यावेळी पुस्तक बाजूला ठेवलं तेव्हा केवळ भाषा वैभवाच्या शाही प्रदर्शनाने मी सुखावून गेलो होतो. कथेचा अचानक झालेला शेवट मला काहीसा रुचला नव्हता. पण दुसऱ्यांदा पुस्तक जेव्हा हाती घेतलं तेव्हा "दोन शब्द" आणि "पार्श्वभूमी" नजरेस पडलं आणि मग ह्या पुस्तकाकडे पाहण्याचा एक दुसरा दृष्टीकोन मिळाला. कथेतील नायकाचं जे व्यक्तिमत्व आहे , त्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची उलगड खांडेकरांच्या ह्या मनोगतातून मिळाली. पुस्तकं कसं वाचावं हे ह्या खांडेकरांनी समजावून दिलं. घाईघाईने  पाने नजरेआड करणे म्हणजे पुस्तक वाचणे नव्हे हे मला जाणवलं. खांडेकरांसारखा व्यासंगी लेखक असेल तर पुस्तक कसं अगदी मन लावून वाचावं हे मी शिकलो! मराठी भाषेतील ह्या श्रेष्ठ साहित्यिकाचे धन्यवाद! नाताळच्या सुट्टीत ह्या पुस्तकाचे अजून एक वाचन करावे असं म्हणतोय, अजून बरेच पैलू उलगडतील हे नक्की!! 

No comments:

Post a Comment

The Sun Does Shine

  ऍंथोनी रे हिंटन ह्या गृहस्थाचं हे आत्मचरित्र. आपण न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली आयुष्यातील तीस वर्षे तुरुंगात व्यतित करताना आयुष्यातील अनम...