मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

वाङनिश्चय (Engagement) सोहळा - एक वाढतं प्रस्थ

महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त्या त्यांनी लोकरोषाची पर्वा न करता प्रत्यक्षात अंमलात आणण्यास सुरुवात केली. सद्यकालीन महाराष्ट्रदेशीसुद्धा चंगळवादाचं वाढतं प्रस्थ वसईग्रामस्थित (केवळ माहितीमायाजालावर कार्यरत असलेल्या) एका तथाकथित समाजसुधारकाच्या नजरेस खुपलं आणि तिथंच ह्या पोस्टने जन्म घेतला. 

मी शक्यतोवर वादग्रस्त लिखाण टाळतो. आत्तापर्यंत लिहिलेल्या पोस्टमध्ये मदिराप्राशनास समाजमान्यता, रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ह्या दोन सर्वांत खळबळजनक अशा पोस्ट्स म्हणता येतील. 

मदिराप्राशनास  समाजमान्यता ह्या पोस्टचा माझ्या मित्रमंडळींवर फारसा काही परिणाम झाला नाही. अशा पार्टीमध्ये मला बोलवुन ते फॉर्मात आले की माझी टर उडवायला त्यांना मजा येत असल्यानं अजूनही मला तिथं बोलावलं जातं. पण अशाच एका पार्टीत मित्रमंडळी मदिरेच्या आस्वादात रंगली असता मी आणि माझ्यासारख्या एका अरसिक माणसानं मटण - वडे ह्यांचा  फडशा पाडला. त्यामुळे ह्या मित्रमंडळीतील आमची लोकप्रियता काहीशी कमी झाली.
रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ह्या पोस्टनंतर जी काही लग्न अटेंड केली तिथं नवदांपत्याला शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेल्यावर वधू माझ्याकडं काहीशी रागानं पाहत आहे असा भास मला होऊ लागला. (ह्यात माझा ब्लॉग किती लोकप्रिय आहे हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा यत्न नाही ह्याची नोंद घेण्यात यावी!)

Engagement च्या वाढत्या प्रस्थाविषयी खरंतर मला बऱ्याच दिवसांपासून लिहायचं आहे. पण होतं काय की ही भावना एखाद्या वाङनिश्चय सोहळ्याला हजेरी लावल्यावर प्रबळ होते, परंतु ज्याचा पाहुणचार झोडपला त्याला कसं वाटेल ह्या विचारानं मी थांबतो. आजचा दिवस असा आहे की शेवटच्या वाङनिश्चय सोहळ्याला हजेरी  लावुन बरेच दिवस झाले आहेत आणि पुढील वाङनिश्चय सोहळा दृष्टीक्षेपात नाही, त्यामुळं ही पोस्ट लिहायचं धारिष्ट्य मी करु इच्छितो. 

वाङनिश्चय सोहळ्याचं मुख्य उद्दिष्ट काय इथुन सुरुवात करुयात! आमची Engagement झाली त्या काळात (म्हणजे अगदीच काही ५० वर्षांपूर्वी वगैरे नाही ) ज्यांचं लग्न जमलंय त्या दोघांना राजरोसपणे फिरता यावं, गावातील स्थानिक चौकस लोकांना आपल्या विचारशक्तीला जास्त ताण द्यायला लागु नये म्हणुन हा सोहळा केला जायचा. सोहळा बऱ्याच वेळा घरीच केला जायचा, दोन्हीकडची मिळून चाळीस - पन्नास मंडळी हजर असायची. सोहळ्याला सगळेच हजर नसले तरी जे लोक उपस्थित आहेत त्यांनी ही बातमी सर्वत्र पसरवावी अशी त्यांच्याकडुन माफक अपेक्षा असायची. 

परिस्थिती बदलली, काळ बदलला. ज्यांचं लग्न जमलंय त्यांनीच राजरोसपणे फिरावं असा नियम केव्हाचा मागं पडला. त्यामुळं ह्या सोहळ्याचा हेतु काय असा प्रश्न पडू शकतो. लोकांना बातमी कळावी असा हेतू साध्य करायचा असेल कोणीही झुकेरबर्ग साहेबांनी उपलब्ध करुन दिलेल्या FB स्टेटसची (बहुदा committed / engaged ) मदत घेऊ शकतो. हे सर्व असलं तरी वाङनिश्चय सोहळ्याचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. "अजुन फक्त अक्षता टाकल्या असत्या तर लग्न सुद्धा लागलं असतं" असं म्हणावं इतक्या थाटामाटात हा सोहळा साजरा केला जातो. आणि खर्च सुद्धा अफाट केला जातो. 

आता पंडितांनी म्हटल्याप्रमाणं दुसऱ्या बाजूनं विचार करूयात. मुलामुलीच्या आईवडिलांची ऐपत आहे, हौशी मंडळी आहेत, पाहुण्यांना सुद्धा असे समारंभ अटेंड करायची हौस आहे मग तुला काय करायचंय असला प्रश्न मला विचारला जाऊ शकतो. अजुन पुढं जायचं म्हटलं तर कॅटरर, छायाचित्रकार लोकांना अधिकच्या business  संधी मिळुन अर्थव्यवस्थेला चालना मिळते असंही म्हटलं जाऊ शकतं. 

आता सारांशाकडं जाण्याआधी (महर्षीं लक्ष असूद्यात) हा आक्षेप केवळ वाङनिश्चय  सोहळ्याशीच मर्यादित नसुन संगीत, मेहंदी, pre-wedding shooting वगैरे प्रकारांना सुद्धा लागू आहे.  

सारांश - माझे मुख्य आक्षेप खालील प्रमाणे 
१) समाजात नक्की काही टक्के लोकं अशी आहेत ज्यांची विवाहबंधनात अडकणाऱ्या एका जोडप्यामागं चार - पाच समारंभ करण्याची ऐपत नाही, पण एक नुकत्याच रुढ पडू लागलेल्या एका प्रथेच्या दबावाखाली येऊन त्यांना काहीशा जबरदस्तीनं असे समारंभ आयोजित करावे लागतात आणि ज्याचा आर्थिक दबाब त्यांच्यावर येऊ शकतो. 

२) समाज आपला मोकळा वेळ कसा व्यतित करतो ह्यावर समाजाचं भवितव्य अवलंबुन असतं. ह्यासाठी समाजापुढं दोन पर्याय असतात - पहिला म्हणजे वाचन, बौद्धिक activities मध्ये वेळ व्यतित करणे आणि दुसरा म्हणजे विविध प्रकारचे समारंभ आयोजित करुन त्यात वेळ वाया घालविणं. काहीशी चिंतेची बाब म्हणजे एक समाज म्हणुन आपली वाटचाल दुसऱ्या पर्यायाकडं चालली आहे असं मला वाटतं.  



Disclaimer (हात झटकणे ) - ह्यात  कोणत्याही समाजबांधवांच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही. 

1 टिप्पणी:

  1. खरं तर एकदम महत्त्वाचा प्रश्न मांडलास. आता यातून किती जणांचे प्रबोधन होऊन प्रत्यक्षात त्यानुसार वागतील यावर लेखकाच्या ब्लॉगला दिलेल्या वेळेचे यशापयश ठरेल

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...