मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २८ मे, २०१८

आकाश पांघरुनी !!



मुंबईचं आपलं एक महत्त्व आहे, कोट्यावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ह्या महानगराने उचलून धरली आहे. परंतु एका शांत गावातील शांत झोपेपासुन ह्या शहरातील लोक फार फार दुर गेली आहेत.

वसईतील काही भागात या शांत झोपेचा अनुभव आपल्याला अजूनही घेता येतो. दहा वाजता सर्वसाधारणतः सर्व काही सामसुम होते. एकदा का मानवनिर्मित विजेचे दिवे मालवले की निसर्ग आपल्या प्रभेची करामत दाखविण्यास सुरुवात करतो.  आकाशात ढगांसोबत लपंडाव खेळत असलेला द्वादशी त्रयोदशीचा चंद्र खिडकीतून आपली शितल किरणे तुमच्या डोळ्यांना सुखावून टाकतो.  आकाशातील चांदण्या सुद्धा स्पष्ट दिसत असतात. 

इतकी निरव शांतता असते की काही अंतरावरील जाणाऱ्या एकल्या वाहनाचा आवाज देखील या शांततेचा पूर्ण भंग करून जातो.  रात्री क्वचितच दीड वाजता वगैरे झोपमोड झाली तर कधीतरी   मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेले आणि बहुदा भारताच्या पूर्वेकडील भागात जाणारं विमान आकाशातुन जातं. आणि त्याचा तो आवाज संपूर्ण आसमंताला व्यापून टाकतो. आपण ह्या सर्व परिसर, नभ ह्याचा एक नगण्य हिस्सा आहोत आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार आपण बाळगू नये ह्याची जाणीव खरंतर हा रात्रीचा आसमंत करुन देत असतो. पण ह्या जाणिवेचा स्पर्श फक्त काहींच्याच मनाला होतो. 

सध्या एसटी बंद पडली आहे किंवा शेवटच्या घटका मोजत आहे. नाहीतर पूर्वी साडेबारा, सव्वा अशा वेळी अत्यंत नियमाने धावणाऱ्या होळी एस. टी. बसेसचा आवाजसुद्धा यायचा.  

कधीतरी एखादं भटकं  कुत्रं आजूबाजूच्या मोकळ्या वाडीत फिरत जातं. त्याच्या पावलांचा आवाज स्पष्टपणे येत रहातो. एखादा रात्रकिडा सतत किर्रर्र आवाज करीत राहतो. कधीतरी एखादा सुका नारळ गॅरेजच्या पत्र्यावर जोरात आदळतो आणि दचकायला होतं. मे महिन्यात अधून-मधून मग आंबे पडण्याचा आवाज येत राहतो. ह्या परिसरात ज्यांचं बालपण गेलं आहे त्या बहुतेक सर्वांच्या लहानपणी भल्या पहाटे उठुन आंबे गोळा करण्याच्या मनोहर आठवणी आहेत.  आणि  जेव्हा-केव्हा  असे अंगणात झाडाखाली पडलेले  अनेक आंबे दिसतात  त्यावेळी  या मधुर आठवणी  जाग्या होतात. काल युरोपात फिरुन आलेले बाबाकाका आले होते. युरोपच्या आठवणीपेक्षा लहानपणी गोळा केलेल्या आंब्यांच्या आठवणी सांगण्यात त्यांना खूप रस होता!  स्वतः शोधून काढलेल्या  आणि  लपवून ठेवून  बेताबेताने खाल्लेल्या  ह्या आंब्यांच्या आठवणी  विसरणार तरी कसे !! मे महिन्याच्या शेवटी लाईट नियमानं जाते आणि मग अंगणातील काजव्यांची रांग उगाचच मनाला भावुक बनवून जाते. जेव्हा पहिला पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो त्यावेळी एखाद्या रात्री अचानक जमिनीतुन निघालेली पाखरं दिसेल त्या प्रकाशाच्या स्त्रोताच्या दिशेनं झेप घेतात आणि आपलं क्षणभराचं आयुष्य संपवुन टाकतात!

 या रात्रीच्या  शांततेमध्ये  काही अंतरावर असलेल्या  समुद्राची गाजसुद्धा  ऐकायला येते.  ह्या आवाजावरून  पाऊस किती दूर आहे  म्हणजे किती दिवसावर आहे ह्याचा अंदाज अण्णा वर्तवितात.  त्याचप्रमाणे  एखादा  ढग  ज्यावेळी आपल्या जलधारांनी  भूमातेला तृप्त करीत असतो त्यावेळी  त्याच्या सरींचा दुरवरुन आपल्यापर्यंत येणारा  आवाजसुद्धा  या शांततेत  स्पष्ट  ऐकू येतो.  इतकेच काय तर सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या  वसई स्टेशनवरुन जाणाऱ्या गाडीचा  आवाजसुद्धा  हिवाळ्यात  अगदी स्पष्टपणे  येतो.  

पाच वाजता रमेदी चर्चचा घंटानाद होतो आणि एका नवीन दिवसाचा आरंभ होतो! लहानपणापासुन सकाळ आणि ह्या घंटानादेची मनात एक गाठ बसुन गेली आहे! ही घंटा झाली की परिसरातील कुत्री भूकू लागतात , झाडावरील पक्षी ओरडू लागतात. 

हे सर्व  काही अगदी  मनात अलगद जपून ठेवावं असं! आपल्या  आधुनिकीकरणाच्या  हव्यासापायी  हे सर्व काही हळूहळू  अस्तंगत होत चालला आहे ही एक खंत आणि वाहतुकीच्या पुरेश्या सोयीअभावी इथुन दररोज मुंबईला जाता येत नाही ही दुसरी मोठी खंत !!

गुरुवार, १७ मे, २०१८

मी किती Predictable !!




तंत्रज्ञानाच्या मदतीने मनुष्य दिवसेंदिवस नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने उपलब्ध असलेल्या डेटाचं  विश्लेषण करुन भविष्यात त्या माहितीच्या स्त्रोताची वागणूक कशी असेल याविषयी अनुमान मानण्याचं बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आणि ह्या प्रयत्नाला  काही अंशी यशसुद्धा मिळत आहे. त्याचप्रमाणे एकंदरीत मनुष्याच्या सोशल मीडियावरील वागणुकीवरून त्याच्या वर्तणुकीविषयी तर्क काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रकारात मनुष्याचं वागणं हे एका विशिष्ट साचेबंद पद्धतीतून वर्तवता येईल हे एक मोठे गृहीतक आहे. 

आता ह्या गृहीतकाची अचूकता आपल्याला पडताळून पाहायची असेल तर एक मनोरंजक अभ्यास करता येईल.  पूर्वी मुलं वेगवेगळ्या गावांमध्ये शिकायची आणि हे शिक्षण मातृभाषेतून दिलं जायचं. शिक्षकांच्या किमान पात्रतेविषयी काही मार्गदर्शक तत्व असली तरी त्याविषयी फारसा आग्रह धरला जात असेल अस मला वाटत नाही. शिक्षक सुद्धा आपल्या स्वभावात वैविध्य बाळगुन असायचे.  त्यामुळे एकंदरीत व्हायचं काय की ज्या प्रकारे मुलं शिक्षण घ्यायची त्यामध्ये भरपुर वैविध्य असायचं. आणि त्यामुळं शालेय जीवन संपेपर्यंत वेगवेगळी व्यक्तिमत्वे विकसित व्हायची. 

सद्यकाळी असं घडू लागलं आहे की मुल जन्मल्यापासून आपण त्याच्या भोवतालचे घटक  साचेबंद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्यामुळे भविष्यातील मनुष्याचं  वागणं आणि विचारपद्धती ह्यांच्यात खरोखरच एक प्रकारची साचेबद्धता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ज्या काही प्रणाली असतील त्यांच्या  यशाची शक्यता वाढीस लागली आहे असं आपल्याला आढळून येईल.  आता दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर भविष्यात या साचेबद्धतेच्या पलीकडे जी माणसे विचार करू शकतील त्यांचं महत्व वाढीस लागेल. आणि जर त्यांच्या विचारामध्ये खरोखरच शुद्धता असेल तर त्यांना खरोखरच महत्त्व प्राप्त होईल.  आणि त्यामुळेच सर्वांनी सरसकट स्टिरीओटाईप जीवनपद्धतीच्या मागे लागणे चुकीचे आहे. 

हे सर्व सुचायचं कारण की गेल्या रविवारी पाहिलेला संताप सिनेमा राझी. खरंतर हा पिक्चर मी पाहिला सुद्धा नसता परंतु एका अग्रगण्य मराठी वर्तमानपत्रातील या चित्रपटाचे  परिक्षण वाचून मी हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला.  आता हल्ली  झालंय कसं ते पहा!! जेव्हा केव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी त्या चित्रपटाचे आघाडीचे कलाकार तथाकथित लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये किंवा शोमध्ये येऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करीत असतात. त्याच प्रमाणे ह्या चित्रपटाचे मीडिया पार्टनर असणारे रेडिओ स्टेशन, वर्तमानपत्र हे सर्व संभाव्य प्रेक्षकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत असतात.  या सर्व लोकांचं लक्ष्य असते ते खूप खोलवर विचार न करणारा समाजातील वर्ग.  आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ज्या काही प्रणाली विकसित होत आहेत त्या सर्वांचे  सर्वात मोठे गृहीतक म्हणजे हे सर्वजण निकालांची 100% अचूकता देण्याचं कबूल करत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की समाजातील जो काही सरसकट पद्धतीने विचार करणारा वर्ग आहे, तोच वर्ग ह्या सर्व प्रणालींचे लक्ष्य असणार आहे.

यंत्रमानव एक तर बाह्यशक्तीद्वारे आपल्यावर लादले जाऊ शकतात किंवा आपल्यातील काही जणांचे यंत्रमानवांत रुपांतर केले जाईल !! 

आपल्या वागण्यामुळे आपल्या भविष्याविषयी कोणाला तर्क बांधता येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या वागण्यामधे काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करा हेच या पोस्टचे सांगणे!! आणि काहीसे विवादास्पद विधान म्हणजे मातृभाषेतील शाळा, गावातील बालपण मुलांची ओरिजिनॅलिटी कायम ठेवण्यास मदत करतात !!

शनिवार, १२ मे, २०१८

१९८५ बॅच - सातत्याचे कौटुंबिक आणि सामाजिक भान !!



मध्यंतरीच्या काळात सर्व ठिकाणी स्नेहसंमेलनाची लाट पसरली होती. 
शालेय जीवनानंतर वीस-पंचवीस वर्षे दूर गेलेली मित्रमंडळी एकत्र येऊ लागली होती. ह्या एकत्र येण्यामागे सोशल मीडियाचा महत्त्वाचा हातभार लागला होता. पूर्वी एखाद्या माणसाला शोधणे म्हणजे त्याच्या घरी जाणं किंवा त्याच्या दूरध्वनी क्रमांकावर त्याच्याशी संपर्क साधणे हेच उपलब्ध साधने होती. त्यामुळे समजा एखाद्या मित्राने आपलं घर बदललं असेल किंवा तो शहर सोडून गेला असेल तर त्याला संपर्क करणे अत्यंत कठीण होत असे. परंतु सोशल मीडियाने मात्र यातील बहुसंख्य समस्यांचं  उत्तर आपल्याला उपलब्ध करून दिलं होतं. बरीचशी मित्र मंडळी फेसबुक, ट्विटर यासारख्या सामाजिक माध्यमांवर उपलब्ध असायची किंवा आहेत.  त्यामुळे त्यांना एकदा का या माध्यमांवर शोधून काढण्यात यश मिळालं की मग पुढील मार्ग सुकर होत असे. आणि असा एक मित्र मिळाला की तो अजुन काही जणांना आपल्या गटात सहभागी करून घेत असे. अशा या साखळी पद्धतीमुळे बरेच मित्र एकत्र येऊन अशी अनेक स्नेहसंमेलन  यशस्वी होण्यात हातभार लागला. 

बहुतांशी वेळा या सर्व स्नेहसंमेलनाचे पहिले पुष्प अत्यंत यशस्वीपणे पार पडते.  कित्येक वर्षानंतर एकत्र  आलेली मित्रमंडळी मोठ्या उत्साहानं  एकमेकांना भेटायची, एकमेकांची चौकशी करायची, शालेय जीवनातील आठवणींना उजाळा द्यायची आणि पुन्हा एकत्र भेटण्याचं आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घ्यायची. यानंतर मात्र अनेक गोष्टी पडद्यामागे घडायच्या. जसे की आपल्या सर्वच मित्रमंडळीच्या बदललेल्या स्वभावाला लगेचच सरावून घेणं प्रत्येकाला जमायचंच असं नाही. आपण त्या व्यक्तीच्या जुन्या प्रतिमेला मनात घट्ट धरून बसलेलो असतो आणि मग काहीवेळा त्या व्यक्तीचं बदललेलं रूप आणि स्वभाव आपल्याला जमत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या स्नेहसंमेलनात बरेच वेळा असे होतं की मोजकी माणसे जास्त पुढाकार घेतात आणि पुढील सर्व भेटींमध्ये आपल्याला ज्या गोष्टींमध्ये अधिक रस असतो त्याच गोष्टींचा प्राधान्य देण्याची त्यांची मानसिकताअसते. एकदा पहिल्या भेटीचा टप्पा पार पडला की पुढील भेटीत सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची वृत्ती असणे आवश्यक असते.  परंतु फार मोजक्या मित्रमंडळींनी ही मानसिकता दर्शविली. त्यामुळे झालं असं की बाकीची सर्व स्नेहसंमेलन दोन-तीन वर्षानंतर आपसूक बंद पडली.  पण आमच्या वसईत  मात्र एक असा गट आहे की जो गेले कित्येक वर्ष नित्यनेमाने आपलं हे एकत्र येण्याची सवय सतत टिकवुन आहे. 

आणि ही बॅच आहे ती म्हणजे १९८५ बॅच!  आता ही बॅच सातत्याने कशी काय भेटत राहते ह्या प्रश्न माझ्या मनात घोळत होता. माझ्या आधीच्या पोस्टमध्ये याचा सहज म्हणून मी उल्लेख केला असता डोंगरे सरांनी मला याचा जाब विचारला. आता डोंगरे सरांनी जाब विचारल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत तुम्ही वसईत राहत असाल तर करू शकत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून माझ्या मनातील विचार आणि त्याबाबत या बॅचची नोंदवलेली मतं इथे मी मांडु मांडत आहे. 

१) कोणताही गट सातत्याने जर संपर्कात राहायला हवा असेल तर त्या गटांमध्ये एक अदृश्य अशा केंद्रीय गटाचे अस्तित्व असायला हवं. हा अदृश्य (किंवा दृश्य असला तरी सुद्धा चालेल) गट बॅचचे हित ही बाब प्राधान्यक्रमावर ठेवून सक्रिय असायला हवा. ज्या क्षणी वैयक्तिक मसुदा  हा बॅचच्या हिताच्या आड येऊ लागतो त्याक्षणी मात्र या गटाचे सातत्य आणि मग पर्यायानं अस्तित्व धोक्यात येऊ शकते. नक्कीच १९८५ बॅचमध्ये अशा केंद्रिय गटाचं अस्तित्व काहीशा उघडपणे दिसून येतं आणि ही मंडळींची जबाबदारी ही बऱ्यापैकी अधोरेखित केली गेली आहे. या गटाने आपल्या स्नेहसंमेलनात ती एक कोणताही एकसुरीपणा येणार नाही यासाठी उपक्रमातील वैविध्य कायम ठेवलं आहे. ज्यावेळी ही मंडळी एकत्र येतात त्यावेळी नक्कीच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी बहुतांशी वेळ राखून ठेवला गेला असला तरीपण उरलेल्या वेळात काही गंभीर विषयांवर चर्चा करणे हे अनिवार्य असते. आता हे गंभीर विषय म्हणायला गेलात तर शाळेच्या उपक्रमासाठी बॅचचा सहभाग, सामाजिक उपक्रमातील सहभाग या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यावर सर्वांची अनुमती घेतली जाते. 

२) तुम्ही कितीही जवळचे मित्र असाल तरी ज्यावेळी तुम्ही बर्‍याच सातत्याने हे एकत्र भेटत असतात त्यावेळी जी काही आर्थिक उलाढाल होते त्यामध्ये पारदर्शकता असणं आवश्यक असतं. आणि ही बॅच प्रामुख्याने केंद्रीय गट या पारदर्शकतेची पुरेपूर काळजी घेतो आणि जे काही आर्थिक निर्णय आहे ते बहुमताने घेतले जातील याची काळजी घेतली जाते. 

३) आता अजून एक महत्वाचा मुद्दा ज्यावेळी तुम्ही संसारात पूर्ण जबाबदारीची भूमिका निभावत असता त्यावेळी जर तुम्ही तुमचा कार्यालयापलीकडचा वेळ सातत्याने सामाजिक उपक्रमात घालवलात तर तुमच्या कुटुंबियांना नक्कीच त्याविषयी आक्षेप घेण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे एका विशिष्ट वळणावर तुम्हाला जर हे तुमचं सततचं  भेटणं  टिकवायचं असेल तर तुम्हाला कुटुंबीयांना त्यात समाविष्ट करून घेणे अनिवार्य ठरतं. आणि याबाबतीत १९८५ समुहाने उत्तम कामगिरी बजावली आहे असे म्हणता येईल. त्यांच्या सर्वच नाही पण बऱ्याचशा स्नेहसंमेलनात किंवा भेटण्यामध्ये त्यांचे कुटुंबीय सुद्धा समाविष्ट असतात. त्यामुळे हा वैयक्तिक पातळीवरील सामाजिक event न राहता कौटुंबिक पातळीवरचा सामाजिक कार्यक्रम बनतो.  यात अजून एक गोष्ट! जे  माझं वैयक्तिक मत आहे; स्नेहसंमेलनात ज्यावेळी कुटुंबाला सहभागी करून घ्यायची वेळ येते त्यावेळी बऱ्याच वेळा मुलांना आपल्या पत्नींना सहभागी करून घेण्यात काही आक्षेप नसतो. परंतु आपल्या नवरा मुलींना मात्र आपल्या नवर्‍यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी पुरेपूर इच्छा नसते कारण आपल्या स्वातंत्र्यावर काहीशी गदा येऊ शकते अशी त्यांची भावना असते.  ह्या समूहानं हा प्रकार सुद्धा यशस्वीरित्या सांभाळला असावा असे म्हणता येईल. 

४) तुम्ही ज्यावेळी कुटुंबियाच्या अनुपस्थितीत भेटत असता त्यावेळी असणारी चेष्टामस्करीची पातळी आणि ज्यावेळी तुम्ही कुटुंबीयांसोबत भेटता त्यावेळची चेष्टामस्करीची पातळी वेगळी असायला हवी आणि ह्याच भान या बॅचने बऱ्यापैकी सांभाळले आहे. 

५) आता दोन महत्वाच्या गोष्टी आणि ज्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा एका विशिष्ट गटातील लोक दुरावली जाण्याची शक्यता असते.  ह्यातील  पहिली गोष्ट म्हणजे मदिराप्राशन! ह्या बॅचने ज्यावेळी मुली एकत्र भेटत असतील त्यावेळी मदिराप्राशन कटाक्षाने दूर ठेवण्याची काळजी घेतलेली दिसून येतं.  दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली असं आढळून येतं ही बरीच मंडळी ही एक तर राजकीय क्षेत्रात पक्षांशी निगडित असतात किंवा त्यांची एका विशिष्ट राजकीय विचारांशी कडवी बांधिलकी असते. ही बांधिलकी त्यांना इतकी महत्त्वाची वाटत असते की त्यापुढे आपल्या लहानपणापासून चालत आलेल्या मैत्रीचा बळी देण्यास देखील ते तयार असतात परंतु या बॅचने मात्र याविषयी बरीच प्रगल्भता  दाखवली आहे. कोणाच्याही  राजकीय विचारांवर आक्षेप नाही किंवा चर्चेस विरोध नाही  परंतु ही चर्चा एका विशिष्ट पातळीवर थांबवणे हे केंद्रीय गटाने बऱ्याच प्रमाणात यशस्वीरित्या दाखवला आहे. 

६) बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सहकारी / सहअध्यायी बाह्यजगात खूप यशस्वी असतो आणि हे आपलं यशस्वीपण मिरवून घेण्यासाठी म्हणून ह्या स्नेहसंमेलनांचा वापर एक प्लॅटफॉर्म म्हणून करण्याची मानसिकता काही जणांत दिसून येते. आणि त्यामुळे होतं काय की ती व्यक्ती आणि त्याचे जवळचे एक-दोन मित्र हे अशा एकत्र येणाऱ्या समारंभाचा पूर्ण कब्जा घेतात आणि त्यामुळे बाकीचे लोक हळूहळू दुखावले आणि मग दुरावले जातात. या बॅचमध्ये सर्व लोकांनी हा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली आहे हे जाणवून येते. 

७) या बॅचमधील  केंद्रीय गटामध्ये वसईत राहणाऱ्या आणि वसईत यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या लोकांचे प्रमाण उल्लेखनीय प्रमाणात दिसून येते. त्यामुळे सातत्याने या एकत्रीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे या मंडळींना बऱ्यापैकी साध्य होतं. आता परत वळूया ते कुटुंबांना एकत्र घेऊन मिळण्याच्या तयारीविषयी! ही मंडळी जेवणाचे कार्यक्रम आयोजित करतात त्यावेळी चूल बंद आणि डबा संस्कृती हे दोन प्रकार आढळून येतात. याचा अर्थ असा होतो की तुमचे कुटुंबीय तुमच्या सोबत समारंभासाठी आले नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून कार्यक्रमात बनवले गेलेले खाद्यपदार्थ डब्यात घेऊन घरी जाऊ शकता. आता खरतर हा झाला आळशीपणा!! परंतु अशा या आळशी वृत्तीला सामाजिक जाणिवेचे गोंडस नाव देऊन ही बॅच हा प्रकार अत्यंत लोकप्रियकरत असल्याचं आढळून येते. त्यामुळे यजमानावर मेन्यूतील सर्व पदार्थ  भरपूर प्रमाणात बनवणे बंधनकारक दिसते . यजमान हा सातत्याने मंडपात फिरताना दिसतो.  एकतर तो तुम्हांला मनापासुन आग्रह करत असावा किंवा उरलेले पदार्थ डब्यासाठी  पुरेसे होतील की नाही याविषयी आपल्या मेंदूत गणित जुळत असावा!!!

८) जीवनातील सर्व रसांचे अनुभव स्नेहसंमेलनात यायला हवेत आणि यातील एक रस आहे तो म्हणजे विनोद!! आता विनोद निर्मिती सातत्याने करायची म्हटली म्हणजे तुमच्यासमोर याच गटातील दोन-तीन बकरे असणं आवश्यक आहे आणि या व्यक्ती ज्यांना सातत्याने लक्ष्य केलं जातं त्यांनीसुद्धा विनोद हे घेण्याची खेळ खेळीमेळीने घेण्याची तयारी दाखवली हवी!! या गटात असे हक्काचे बरेच ग्राहक आहेत आणि त्यांना लक्ष्य करून विनोद निर्मिती केली जाते परंतु या विनोद निर्मितीचा दर्जा आणि हा नेहमी अभिजात ठेवला जातो किंवा जात असावा!!

९) आता वळूयात या गटातील स्वभाववैशिष्ट्याविषयी!! आता प्रत्यक्ष व्यक्तींची नावे घेणार नाही परंतु वर्णनावरून त्यांना ओळखणे फार कठीण जाणार नाही. 
पहिली व्यक्ती जिला विनोदाची आणि शाब्दिक कोटींची उत्तम जाण आहे!! शालजोडीतील देण्यात आणि दिलेले समजून घेण्यात ह्या व्यक्तीचा हात कोणी धरू शकणार नाही. एकंदरीत कोणत्याही चर्चेचा दर्जा एका विशिष्ट पातळीच्या खाली जाणार नाही याची काळजी ही व्यक्ती घेत असावी. आता वळुयात दुसऱ्या व्यक्तीकडे!! ही व्यक्ती अत्यंत शालीन स्वभावाची अशी आहे. अत्यंत शांत आणि सुसंस्कृत असा ह्या व्यक्तीचा स्वभाव आहे आणि त्यामुळे या गटाचा सुसंस्कृतपणा कायम राहण्यास खूपच मदत होते.  त्यानंतर आपण वळूयात ते या गटातील गायक मंडळींकडे!! यातील काही खरोखरीचे गायक उत्तम गायक आहेत जे मैहफिल अगदी रंगतदार करुन टाकतात तर काहीजण असेही आहेत की त्यांच्याकडे गुणवत्तेची दैवी देणगी नसली तरी जबरदस्त उत्साह आहे!! स्वानंद हेच कवीचे सर्वोत्तम पारितोषिक होय असे वाक्य दहावीच्या पुस्तकात होते. ह्या गटाच्या एका कार्यक्रमाला  मी हजेरी लावली होती त्यावेळी अशा या आत्मविश्वासाने भारून गेलेल्या व्यक्तींची गाणी ऐकण्याचा दुर्मिळ योग आला!! परंतु या गटाचे मोठेपण असे की त्यांनी ह्या उत्साहमूर्तीला पुरेपूर प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे या कार्यक्रमात एकंदरीत जबरदस्त मजा आली!!

आता सारांशाकडे वळण्याआधी काही इतर गोष्टी ! ही बॅच प्रत्येक महिन्यातील पहिल्या आठवड्यात मागील महिन्यांत ज्यांचे वाढदिवस झाले त्या सर्वांना एकत्र बोलावून केक कापण्याचा समारंभ साजरा करते. त्यामुळे सातत्य कायम ठेवण्याच्या प्रयत्नात एक वैयक्तिक झालर येते. 
वसईच्या जवळपास जो दुर्गम असा ग्रामीण भाग आहे तिथं ही मंडळी जाऊन आपलं सामाजिक कार्य करत असतात. आता ह्यात सुद्धा पावसाळ्याच्या मौसमात हे सामाजिक कार्य करता करता सहलीचा हेतु आपसुक साध्य होतो. 
सामाजिक कार्य करताना काही वेळा बॅचपलीकडं जाऊन ते वसईतील मान्यवर लोकांना सहभागी करुन घेतात. आणि ह्यामुळं ह्या पोस्टच्या शेवटी जे फोटो समाविष्ट केले आहेत त्यात ह्या बॅचबाहेरील वसईतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा फोटो तुम्हांला दिसेल !!
आपल्या बॅचमधील सर्व मित्र मैत्रिणींना सहभागी होता यावं ह्यासाठी होम पिकअप आणि होम डिलिव्हरीची सोय कारवाले सदस्य करुन देतात. 

न्यू इंग्लिश स्कुलच्या त्या काळी ज्या बॅच होत्या त्यांच्या काही सामायिक खासियत असायच्या. त्यावेळी बहुतांशी मुलं मुली एकमेकांशी बोलत नसत. ह्या बॅचमध्ये ह्या विषयावर चर्चेला हात घातला असता एकमत आढळुन येत नाही. ह्यातील विशिष्ट मुलांकडे संशयाची सुई झुकताना दिसते. त्या काळच्या बॅचची अजुन एक खासियत म्हणजे त्यावेळच्या मुली ह्या मुलांवर खार खाऊन असायच्या. आपल्या वर्गातील मुलांची शिक्षकांकडे तक्रार करण्याची अगदी सुक्ष्म संधी सुद्धा त्या सोडत नसत. अर्थात ह्या विषयांवर आता ३३ वर्षानंतर चर्चा केली असता एकमत होण्याची शक्यता नसल्यानं मी हा विषय जास्त ताणुन धरला नाही. परंतु ह्या सर्व शोधप्रकरणात ह्या बॅचची मुले इंदिरा गांधी ह्यांचं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी वर्गाबाहेर खिडकीतुन उद्या मारुन बाहेर पळाली होती अशी काहीशी १००% खात्रीलायक नसलेली बातमी हाती आली होती. अजुन बरणी वगैरे फोडण्याच्या प्रकाराची कुजबुज सुद्धा ऐकू आली पण त्याचा फारसा पाठपुरावा मी केला नाही. 

आता वळुयात ते काहीसे सारांशाकडे!! वर उल्लेखलेले घटक हे महत्त्वाचे असले तरी सर्वात महत्त्वाचा घटक मात्र वेगळाच आहे!! तुमच्या मनामध्ये आपल्या बालमित्रांना मित्रांसोबत वेळ घालवण्याची मनापासून इच्छा असणे हे सर्वात महत्त्वाचे!! ही इच्छा जर तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत  वरच्या स्थानावर असेल तर तुम्ही बाकीचे सर्व अडथळे दूर करू शकता.  सतत संघर्षाने व्यापलेल्या या जीवनात आपलं असं जिव्हाळ्याचं  बेटं अचानक गवसतं  आणि अनपेक्षितरित्या सापडलेल्या ह्या जिव्हाळ्याच्या बेटाला धरून ठेवण्याची  प्रबळ इच्छा या गटात आढळून येते!!

 या गटाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!!


आता पाहुयात ती ह्या बॅचच्या सामाजिक बांधिलकीची  आणि स्नेहसंमेलनाची झलक दर्शविणारी काही छायाचित्रे !!









बुधवार, ९ मे, २०१८

NPL गाथा - भाग १

२००८ च्या आसपासचा तो काळच झपाटलेला होता. न्यु इंग्लिश स्कूल वसईच्या सर्व बॅचेसमध्ये स्नेहसंमेलनाचे वारे जोरात चालू होते. कालांतराने त्यांचा जोश कमी झाला. परंतु काही बॅच याला अपवाद आहेत जसे की १९८५!  मध्यंतरी तर ह्या बॅचची एका आठवड्यात दोन - दोन स्नेहसंमेलने  झाली होती. त्यांच्या ह्या सातत्याचे मूळ कारण शोधणं हा एका प्रबंधाचा विषय होऊ शकतो!  त्या कालावधीत या सर्व बॅचनी स्नेहसंमेलनाचा सपाटा चालू केला होता. सुरुवातीचा जोश ओसरल्यावर मग त्यातील विविध मंडळींनी विविध उपक्रम चालू केले. काहीजण शाळेसंबंधित कार्यक्रमात, सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात अशा विविध प्रकारच्या उपक्रमात गढुन गेले होते. 

१९८८ बॅचमध्ये मात्र रविवारी सकाळी सुरुच्या बागेमध्ये क्रिकेट खेळण्याचं वेड पसरले होते. हे लोक सुरुवातीला ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असत.  थोड्या दिवसातच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला होता. पुढील दोन-तीन वर्ष काही विशेष घडलं नाही. परंतु २०११  सालच्या आसपास मात्र त्यातील काही जणांची खुमखुमी शांत होत नसल्यामुळे ह्या खुमखुमीचे परिवर्तन १९८५ बॅचसोबत ओव्हरआर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात झालं. या सामन्यामध्ये १९८५ बॅचचे नेतृत्व टिवळीवाडी येथील प्रसिद्ध खेळाडू संजय राऊत यांनी केलं. या सामन्यात प्रत्यक्ष खेळ चालू असताना १९८५ संघ विजयी होत आहे असा भास होत होता. परंतु स्कोअर लोकांमध्ये काही वेगळंच गणित शिजत होतं. विशाल पाटील आणि १९८५ चे परांजपे हे दोघं स्कोअरर होते.  आणि सामन्याच्या शेवटी अचानक १९८८ संघ विजय झाला ही बातमी घोषित करण्यात आली. ह्या सामन्यात १९८२ चे संजिव पाटील आणि विवेक काणे हे तटस्थ पंच नेमण्यात आले होते. १९८३ ला सहभागी करुन अजुन काही असे आठ षटकांचे ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने झाले. 

२०१२ साली मात्र ही डोकी अजून पुढचा विचार करू लागली. सर्व बॅचना एकत्र आणून बॉक्स क्रिकेट मध्ये सामने खेळवले तर अजुन मजा येईल असा प्रश्न विचार पुढे आला. आणि त्याचंच परिवर्तन झालं ते NPL म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल premier league च्या आयोजनात!
२०१२ साली साधारणतः सहा ते सात संघांच्या सहभागाने या स्पर्धेची सुरुवात झाली. त्यावेळी ही स्पर्धा रविवारी सकाळी सुरू होत असे आणि दुपारी बारा वाजेपर्यंत आटपत असे. पहिल्या वर्षीच्या आयोजनात बऱ्याच प्रमाणात नवखेपणा होता. 





त्यावेळी वयाचा विचार न करता सर्व सहभागी संघांना विविध गटात विभागण्यात आले होते. त्यामुळे २००५ चा संघसुद्धा १९८२ संघासमोर सामना खेळायला उभा ठाकला आहे असे चित्र दिसले होते. पहिल्या वर्षीचा अंतिम सामना २००५ आणि १९८५ या दोन संघात झाला आणि त्यात २००५ संघाने सहजगत्या विजय मिळवला. 

हळूहळू संघांची संख्या वाढू लागली आणि २०१४ साली ही स्पर्धा दिवस-रात्र स्वरूपात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सहभागी संघांना ज्युनियर लीग आणि सीनियर लीग या दोन गटात विभागण्यात आलं होतं. ह्या स्पर्धेच्या प्रवासाविषयी आपण पुढील काही भागात पाहुयात. आजच्या या भागात NPL मध्ये भाग घेण्यात आलेल्या विशेष काही विशेष खेळाडू आपण पाहूयात. सुरुवातीच्या काही वर्षात गोलंदाजाच्या action वर काही बंधनं नव्हती. त्यामुळे हात कसाही वळवून चेंडू लेग स्पिन अथवा ऑफस्पिन करण्यास गोलंदाजास परवानगी होती.  या काळात १९८२ चे संजीव पाटील हे प्रभावी गोलंदाज म्हणून पुढे आले होते.  त्यांच्यासोबत निरंजन सावंत हे प्रसिद्ध खेळाडू सुद्धा एनपील मध्ये भाग घेत आणि त्याने सुद्धा ही स्पर्धा उद्घाटनाच्या वर्षात गाजवली होती.  १९८२ संघ १९८५ संघासोबत एका अटीतटीच्या सामन्यात उपांत्य फेरीत हरला होता. १९८२ संघाचे नेतृत्व करणारे विवेक काणे आपल्या शालेय जीवनात एक शैलीदार फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. परंतु त्यांच्या फलंदाजीची फार मोजकी झलक एनपील मध्ये पहावयास मिळाली.  1981 च्या संघात डॉक्टर विजय फडके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन राऊत, श्री. जयकर यासारखी मोठी मंडळी समाविष्ट असतात. विजय फडके यांनी काही सामन्यांत चांगली फलंदाजी केली. या संघाने २ वर्षांपूर्वी एनपीएलमध्ये एक चित्तथरारक विजय सुद्धा मिळवला होता. १९८० ची बॅच मात्र स्पर्धेची स्पर्धा फी भरूनसुद्धा एका वर्षी सहभागी झाली नव्हती.  त्याची कसर त्या बॅचचे मिलिंद म्हात्रे सर यांनी प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होऊन भरून काढली. यावर्षीच्या एनपील मध्ये १९७८ च्या दिलीप राऊत आणि मित्रमंडळींनी १९९४ च्या बॅचवर चित्तथरारक विजय मिळवला. दिलीप राऊत ह्यांना ह्या विजयानंतर अनेक तास उत्साहाचं भरतं आलं होतं. ह्या बॅच मध्ये जेकब हे माजी प्रसिद्ध खेळाडू आहेत. ह्या वर्षी सुद्धा त्यांनी आपल्या फलंदाजीच्या तंत्रशुद्धतेची झलक दाखवली. 

एनपीएलच्या सामन्याच्या दिवशी जी धावपळ असते तीच धावपळ, तोच उत्साह यांच्या काही दिवस आधीसुद्धा दिसून येतो. १९८३ सारख्या उत्साही बॅच मोठ्या जोमाने रविवारी सकाळी, शनिवारी संध्याकाळी सराव करत असतात. २००२ बॅच जी गेले पाच वर्ष सातत्याने NPL चषक जिंकत आहे ती मात्र उमेळेसारख्या दुर्गम ठिकाणी जाऊन आपला सराव करत असते.  NPL ने  गेल्या काही वर्षात आपले ब्रँड तयार केले आहेत. जसे की कागदी चिठ्ठ्यांवर एक आठवडाआधी NPL चा draw  पाडणे, विविध बॅचना रंगीबेरंगी t-shirt देणे, (यावर्षी आम्हाला पोपटी हिरव्या रंगाचा टी-शर्ट मिळाला आणि त्यात भर म्हणुन टी-शर्टच्या मागील बाजूस आमची बॅचसुद्धा ठळक अक्षरात छापण्यात आली होती),  स्पर्धा चालू असताना मध्यंतरात सर्व बॅचचा म्हणून एक फोटो काढण्यात येतो. हा फोटो सुद्धा आयकॉनिक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. सर्व उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांना कोकम सरबत व बिर्याणी देण्यात येते. राहुल ठोसर हे गेले कित्येक वर्ष उत्साहाने या स्पर्धेच्या छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना २००२ बॅचचा व्यवस्थापक सुद्धा मानले जाते. यंदाच्या वर्षी त्यांनी आपल्या देहयष्टीला न साजेशा अशा चपळाईने क्षेत्ररक्षण करून एक धावचीत केला. दुर्दैवाने सर्वांचे फोटो काढणाऱ्या त्यांचा फोटो  मात्र कोणी काढला नाही. आणि ह्या दुर्मिळ क्षणाचा पुरावा आपल्याकडे आज नाही! सुगंधाताई आणि उमाताई पाटील (वसईतील नामवंत वकील) या सर्व उपस्थितांना वडापावचा नाश्ता प्रायोजित करतात. 

या NPL ने बर्‍याच आठवणी निर्माण केल्या आहेत. संदेशभाऊ वर्तक यांनी २०१४ साली लेग अंपायर म्हणून कार्यरत असताना जो एक धावचीतचा निर्णय दिला. त्यावेळी मुख्य अंपायर असलेले सुजित देवकर आणि संदेश यांच्यात एकमत न झाल्याने बराच काळ वादंगाची परिस्थिती निर्माण झाली होती. NPL च्या इतिहासातील हा एक लक्षात राहण्याजोगा प्रसंग आहे. काही बॅच  गेल्या वर्षात बऱ्याच वेळा समोरासमोर ठाकल्या आहेत आणि भारत - पाकिस्तान, इंग्लंड - ऑस्ट्रेलिया ह्या सारख्या परंपरागत लढतींचं स्वरुप त्यांना प्राप्त होऊ लागलं आहे. ह्या बॅचमधील जो संघ विजेता होतो तो संघ पुढील वर्षभर वसईत दुसऱ्या बॅचचा कोणीही भेटला तरी त्याची खिल्ली उडवत असतो.  त्या दिवशी उज्ज्वल म्हणाला तसे जेव्हा आम्ही म्हातारे होऊन तेव्हा संज्योतला २०१७ साली १९८३ च्या बॅचने  १९८७ ला अंतिम सामन्यात कसे पराभूत केले हे ऐकवू आणि आमच्या नातवंडांना सुद्धा या गोष्टी सांगू असे म्हणाला. 

संज्योतवरुन लक्षात आले की हा एकहाती आणि थोडीफार विकास राऊत ह्याची मदत घेऊन आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातो. संज्योत हा संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध आहे असे कधीच होत नाही. मला लग्नाला जाऊन यायचे आहे, वास्तुशांतीला हजेरी लावायची आहे अशी अनेक कारणे त्याच्याजवळ असतात. हे सर्व उद्योग पार पडून तो कसाबसा ठरलेल्या वेळी मैदानात हजर होतो. तो मैदानात हजर झाला की त्याचे निष्ठावंत शिलेदार अभिजीत पाटील आणि पराग पाटील हे त्याच्या सूचना ऐकण्यासाठी सज्ज होतात. हे दोघे विचारे वर्षभर क्रिकेटपासून कोसभर दूर असतात आणि ऐन सामन्याच्यावेळी क्षेत्ररक्षणात थोडीदेखील चूक झाली की संज्योतच्या रागीट शब्दांना त्यांना तोंड द्यावे लागते. एखाद्या सामन्यात संज्योतचा संघ हरला तर पुढील पाच मिनिटं तो आणि त्याचा संघ जिथे उभे असतील तिथे जाण्यात काही अर्थ नसतो.  तू असा शॉट कसा मारला, तुला साधा बॉल अडवता आला नाही!! अशी काही ठेवणीतली वाक्य त्याचे सहकारी सहन करीत असतात.  मग थोड्यावेळाने तो शांत होतो आणि आपलं दिलदार रूप आपल्या सहकाऱ्यांना परत एकदा दाखवतो. धीरज वर्तक आणि अमित दुबे हे दोन वयाला चाळिशीला पोहोचलेले नवतरुण आपल्याला सीनियर लीगमध्ये घ्यावे यासाठी गेली कित्येक वर्ष आयोजक समितीच्या मागे लागले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांची ही मनिषा पूर्ण झाली. दुर्दैवाने स्पर्धा जिंकण्याचं  त्यांचं स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकलं नाही. पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा!!

NPL च्या अजून काही गाथा पुढील काही भागात!! तोवर ह्या स्पर्धेच्या मागील काही वर्षातील संस्मरणीय क्षण !!






































मंगळवार, ८ मे, २०१८

गाव तसा स्वभाव ??



आतापर्यंतच्या जीवनक्रमात विविध गावच्या लोकांच्या संपर्कात आलो.  आधुनिकीकरणामुळे प्रत्येक गावाचं जे एक खास वैशिष्ट असतं ते हळूहळू लयाला जाऊ लागलं आहे. तरीसुद्धा साधारणतः  जी मंडळी पन्नास पंचावन्न ज्या वयोगटापलीकडची आहेत त्या लोकांनी आपल्या गावाची काही स्वभावगुणधर्म आपल्यामध्ये अजुनही राखून ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात किंवा बोलण्याचालण्यात जे काही स्वाभाविक घटक दिसून येतात त्यांची नोंद घेण्याचा या पोस्टद्वारे प्रयत्न करत आहे. 

सुरुवात करूयात पहिल्या गावापासून! ही गावातील बरीच लोकं ही खूप बडबडी आहेत. आपल्या मनात जे काय आहे ते चारचौघात किंवा घरी, फारसा विचार न करता किंवा विचारांना फिल्टर न लावता बोलणं हे त्यांचे वैशिष्टय आहे.  जणू काही आला मनात विचार आणि  टाकला बोलून !!
हे त्यांचं धोरण असतं! हे तसं ठीक परंतु काय होतं की त्यांच्याकडे काही फारसं स्वतःच गुपित राहत नाही.  त्यामुळं एखादा पत्त्यांचा डाव सर्व प्रतिस्पर्धी लोकांपुढे आपण दाखवावा त्याप्रमाणे त्यांच्या मनातील विचार सर्व दुनियेसमोर उघड होतात. मित्रांसाठी हे चांगलं असतं परंतु ज्या लोकांशी ह्यांचं  पटत नसतं त्यांना त्यांची ही गडबड त्रासदायक वाटू शकते.  त्याचप्रमाणे त्यांची धर्मपत्नी सुद्धा त्यांच्या सततच्या गडबडीला वैतागु शकते. 

आता वळूयात दुसऱ्या गावाकडे! या गावातील लोक असतात तसे भोळेभाबडे ! त्यांना फारसे छक्केपंजे माहीत नसतात. त्यांचं हे भोळेभाबडेपण त्यांच्या आयुष्याच्या लहानपणाच्या काळामध्ये एक मोठा सकारात्मक गुण म्हणून पुढे येतं. त्याचप्रमाणे पुर्वीच्या पिढीत आयुष्यभर जर तुम्ही हे भोळेभाबडेपण कायम ठेवलंत तरीसुद्धा सर्व गावातील लोक तुमचा आदर करीत असत!  या स्वभावधर्मातील एक मोठी उणीव म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या मुलाबाळांना जगात राहण्यासाठी जो धूर्तपणा / व्यावहारिकपणा आणि  त्याची किमान पातळी आवश्यक असते त्याचं तुम्ही बाळकडू देत नाहीत. त्यामुळे जेव्हा तुमची मुलं मोठी होतात त्यावेळी त्यांना आपल्यातील या उणिवेची जाणीव होते. याच्या मूळ कारणाचा ते शोध घेऊ लागतात आणि त्या शोध घेताना ते समजा या व्यक्तीच्या भोळेभाबडेपणाविषयी पोहोचले तर मग त्यांना या साध्या व्यक्तीच्या साधेपणाविषयी काहीसा राग येतो. 

तिसऱ्या गावातील लोक ही उत्तम निरीक्षक असतात. ती बाकीच्या लोकांचे उत्तम निरीक्षण करत असतात आणि जेव्हा ते आपल्या मूळ कंपूत येतात तेव्हा ही निरीक्षणं आपल्या मित्रवर्गासोबत शेयर करुन खळखळून हसतात. ही मंडळी व्यावहारिक असतात आणि आपला संसार उत्तमरित्या चालविण्याकडं ह्यांचा कल असतो. 

आधी म्हटल्याप्रमाणं हळूहळू ही गावाची स्वभाववैशिष्ट्ये (जी जात - धर्माच्या पल्याड असायची) ती  नाहीशी होऊ लागली आहेत. पुर्वी एका गावातील मुलगी दुसऱ्या गावात लग्न करुन जायची तेव्हा तिला एका वेगळ्या वातावरणात रुळून जायला लागायचं. पण मग कालांतरानं ही तुळस ह्या अंगणात अशी रुजून जायची की तिला आपलं मूळ गाव काहीसं परकं वाटू लागायचं.

आधुनिकीकरण आलं आणि झपाट्यानं साऱ्या काही गोष्टी घेऊन जायला निघालं आहे आणि त्यातलंच एक म्हणजे गावाचं स्वतःच असं एक स्वभाववैशिष्ट्य!!

बुधवार, २ मे, २०१८

वो शाम कुछ अजीब थी - भाग १


सुट्टीचा दिवस कसा जाऊ शकतो ह्याचे विविध प्रकार असतात. सुट्टीच्या दिवशी सुरवातीच्या काही तासातच त्या दिवशीचा पॅटर्न कसा आहे ह्याचा अंदाज बांधता येतो. माझ्या सुट्टीच्या एका पॅटर्नमध्ये येतो तो ipad वर गाणी ऐकण्याचा दिवस ! काल संध्याकाळी सुद्धा असा योग जुळून आला. 

हल्ली तुमच्या सोशल मीडियावरील किंवा इंटरनेट वापरातील privacy बाबत जो काही आरडाओरड ऐकू येतो त्याचा अनुभव इथंही आपणास येतो. मी यु ट्यूब सुरु केलं की ज्या गाण्यावर पहिला सर्च करतो ती ठराविक ४ - ५ गाणी आहेत. आणि त्यातील कोणतंही एक गाणं निवडलं की मग सुरु होतो तो जुन्या जमान्यातील गाण्यांत डुंबून जाण्याचा काळ !

मी ज्या गाण्यांपासुन  सुरुवात करतो त्या गाण्यांची यादी 

  1. आप यूं फासलों से गुजरते रहें दिल से कदमों की आवाज़ आती रहीं !
  2. ये मुलाकात एक बहाना हैं प्यार का सिलसिला पुराना हैं 
  3. हम चुप हैं के दिल सुन रहें हैं   . . दिल की धड़कन । ह्यात तब्बूच्या मोठ्या बहिणीनं काम केलं होतं 
  4. पत्ता पत्ता  बूटा बूटा - अमिताभ आणि जयाचं एक सुंदर गाणं
  5. तुज़से नाराज़ नहीं जिंदगी हैरान हूँ मैं  
  6. जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें 
  7. फिर वो ही रात हैं, फिर वो ही रात हैं ख़्वाब की 
  8. न जानें  क्यू होता हैं जिंदगी के साथ  अचानक  ये मन किसी के जाने बाद  

मग होतं काय की ह्या गाण्यांच्या आधारे १९८० च्या काळातील किशोर, लता, आशा ह्यांनी गायलेली गाणी एका मागोमाग येत राहतात आणि मी सुद्धा झपाटल्यागत माझे कान तृप्त करुन घेत राहतो. मग अचानक ध्यानात येतं अरे त्या आधीच्या कृष्ण धवल काळातील गाण्यांवर अन्याय होतोय. मग माझा मोर्चा वळतो तो खालील गाण्यांकडं 

  1. अजीब दास्ताँ हैं ये कहाँ शुरू कहाँ खत्म 
  2. लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो 
  3. चंदन सा बदन चंचल चितवन 
  4. चाँद फिर निकला मगर तुम ना आएं 
  5. वो शाम कुछ अजीब थी।
  6. जब भी ये दिल उदास होता हैं जाने कौन आसपास होता हैं 
आज ऑफिसला जायची घाई असल्यानं फारसा वेळ ह्या पोस्टला देऊ शकत नाही. पण पुढील काही दिवसात ही आणि अशीच गाणी घेऊन त्यात नेमकं काय आवडलं ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करीन !!

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...