समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना पाळायची मार्गदर्शक तत्त्वं !
मंगळवार, २१ जुलै, २०२६
समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना - भाग १
समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना पाळायची मार्गदर्शक तत्त्वं !
बुधवार, २४ डिसेंबर, २०२५
२०२५ - शिकवण
'२०२५ - आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा जरी चांगला लेख असला तरी छायाचित्रांनीच जास्त व्यापलेला होता अशी दिलखुलास प्रतिक्रिया मिळाली. तिचा स्वीकार करून २०२५ ने दिलेल्या काही शिकवणुकींची ही नोंद !
सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
२०२५ आठवणींच्या हिंदोळ्यावर
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
आपण असे का ?? - जावा २५ - जावा २१ ते मनुष्य १५०.४ - मनुष्य ११६.१.४
साधं सुधंचा अगदी मोजका वाचकवर्ग आहे. पण त्यांच्या प्रतिक्रियेच्या सखोलपणामुळं समाधान मात्र भरभरून मिळतं. प्रतिक्रिया खरंतर मुळ पोस्टपेक्षा गहन असतात! 'सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !' वर सुद्धा अशाच काही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणाऱ्या सखोल प्रतिक्रिया आल्या. त्यातील आपल्या समाज जीवनातील शिस्तीच्या उणिवेची ही प्रतिक्रिया मनोमन पटली.
आपल्या समाजजीवनाच्या अधःपतनाला सामाजिक शिस्तीची उणीव मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे वाटते. आपण भारतीय (मनोवृत्तीचे) लोक शेकडो/हजारो वर्षे कोणत्यातरी राज्यकर्त्याची प्रजा म्हणूनच जगत आलोय. आपण नागरिक कधीच नव्हतो आणि नाही! नागरिक म्हटलं की सामाजिक जबाबदारी, स्वयंशिस्त आली, जी आपल्या रक्तात नाही. आपण बेशिस्त लोकांची झुंड आहोत निव्वळ!!नियम पाळण्यासाठी भारतीय मनोवृत्तीला धाक आवश्यक असतो! स्वतःहून कुणीच नियम पाळणार नाही! पण हेच भारतीय परदेशात सुतासारखे सरळ असतात, कारण तिथे तिथल्या कायद्याचा धाक असतो.
एकंदरीत समस्या गहन आहे, तिची मुळं आपल्या भुतकाळात दडलेली आहेत. आपण प्रत्येकजण आपल्याला वाटतं तितक्या स्वतंत्र पद्धतीनं विचार करत नसतो. आपल्या पुर्वजांची मानसिकता आपल्या विचारशक्तीचा एक अविभाज्य घटक बनलेली असते. ही मानसिकता आपल्या मागील पिढ्यांनी अनुभवलेली असुरक्षितता, अनुभव सर्व काही आपल्या स्वभावात भिनवते.
आपल्या पुर्वजांच्या दृष्टीनं आपला स्वार्थ बाजुला ठेवून समाजहितास प्राधान्य देणं हा अनुभव कधीच सुखदायक ठरला नाही.आपल्या मागील बऱ्याच पिढ्या सदैव रोजीरोटीच्या संघर्षाच्या मानसिकेत खोलवर दडल्या गेल्या होत्या. त्यामुळं समाजाच्या दृष्टीनं विचार करण्याची चैन त्यांना कधीच परवडली नव्हती. आता रोजीरोटीचा संघर्ष आपल्या लोकसंख्येच्या काही हिश्श्यासाठी संपला, पण समाजहिताला आपल्या विचारप्रक्रियेचा भाग बनविण्याचं जे काही शिक्षण त्यांना नागरिकशास्त्रात मिळालं ते शालेय जीवनाबरोबरच मागे ठेवून ते सामाजिक जीवनात वावरू लागले.
कोणत्याही आज्ञावलीच्या भाषेच्या आवृत्त्या ठराविक कालांतरानं प्रसिद्ध होत राहतात. सध्या जावा ह्या programming language ची सर्वात नवीन आवृत्ती Java 25 आहे, त्याआधी Java 21 होती. माहितीजालावर शोध घेतला तर ह्या प्रत्येक आवृत्तीत नक्की कोणते बदल झाले हे अगदी अचुकपणे सांगितलं जातं. प्रत्येक आवृत्तीत सकारात्मक सुधारणा होत राहतात.
कदाचित आपल्या मानवजातीचं सुद्धा असंच काहीतरी असावं. प्रत्येक खंडात आपल्या विविध आवृत्त्या एकाच कालावधीत नांदत आहेत. कदाचित आपल्या देशात ८०% जनता "मनुष्य ११६.१.४" आवृत्तीवर आहे तर १०% जनता "मनुष्य १२६.४" आवृत्तीवर आहे वगैरे वगैरे! विकसित देशात बहुदा "मनुष्य १५०.४" वगैरे आवृत्या अस्तित्वात असाव्यात. "मनुष्य १५०.४" आवृत्ती "मनुष्य १२६.४" आवृत्तीपेक्षा सर्वच बाबतीत सरस असे मी अजिबात म्हणत नाहीय. पण सामाजिक जीवनातील शिस्त पाळण्याच्या बाबतीत, निसर्गसंवर्धन करण्याबाबतीत मात्र ती नक्कीच विकसित आहे. ह्या आवृत्त्या धर्म, भाषा ह्याच्या पल्याड असतात.
मनुष्यांच्या ह्या विविध आवृत्या जेव्हा सामुहिक स्थलांतरांमुळं एकमेकांच्या नजीकच्या संपर्कात येतात, तेव्हा विविध शक्यता उद्भवतात. विकसित संस्कृतीची / आवृत्तीची सहिष्णुता आणि आधीच्या आवृत्तीची दांडगाई ह्यांचा संघर्ष होऊ शकतो किंवा पारशी लोकांच्या प्रसिद्ध कथेप्रमाणे ते साखरेप्रमाणे दुधात मिसळून जाऊ शकतात.
एकाच देशात मात्र जेव्हा विविध आवृत्त्या सहजीवन जगतात त्यावेळी मात्र सुसंस्कृत आवृत्तीची कुचंबणा होऊ शकते. केवळ लिखाण, संवाद ह्या माध्यमातून आपली खंत एकमेकांकडे व्यक्त करणे ह्यापलीकडे त्यांच्याकडं पर्याय नसतो. असो पुढील काही दिवसांत प्रत्येक आवृत्तीचे गुणधर्म सविस्तर लिहून नवीन पोस्ट लिहायचा मानस आहे! बघुयात कितपत जमतं ते !
रविवार, २४ ऑगस्ट, २०२५
साप्ताहिक सुट्टीचा संभ्रम !
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
भावनांचं हरवलेलं खरंखुरेपण !
खरंतर ही पोस्ट मी लिहिण्यात अर्थ नाही, म्हणजे मला ही पोस्ट लिहिण्याचा नैतिक अधिकार असे माझ्या ब्लॉगवर मनापासून प्रतिक्रिया देणारे मोजके सुहृद उरले आहेत ते म्हणु शकतात. तरी ही सवयीचा गुलाम असल्यानं ही पोस्ट! सुरुवातीला पोस्टची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काही उदाहरणं
१. हल्ली ज्याचा बोलबाला आहे असं बहुचर्चित तंत्रज्ञान वापरून तुम्ही ज्यावेळी तुमचं पहिलं प्रेसेंटेशन बनवता त्यावेळी ह्या तंत्रज्ञानानं निर्माण केलेली आकर्षक स्लाईड पाहून तुम्ही अगदी प्रभावित होता. त्यानं वापरलेल्या प्रभावी संज्ञा, अगदी व्यावसायिक पद्धतीनं आलेखाद्वारे मांडलेली माहिती पाहून आपण ह्याआधी हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात का केली नाही हा विचार तुमच्या मनात नक्कीच येतो.
काही दिवस जातात. तुम्ही अजून काही प्रेसेंटेशन्स बनवता, तुमच्या सहकाऱ्यांनी बनविलेली प्रेसेंटेशन्स पाहता. मग अचानक तुम्हांला जाणवतं की कुठंतरी ह्या साऱ्या प्रेसेंटेशन्स मध्ये सारखेपणा आलेला आहे. त्या प्रभावी संज्ञा, ते आकर्षक आलेख तुमच्या समोर येण्याची वारंवारता वाढली आहे. तुम्ही सावध होता, मग तुम्हांला जाणवतं की ह्या तंत्रज्ञानाची जी काही निर्मिती आहे ती जशीच्या तशी स्वीकारणं धोक्याचं असतं, त्यानं जे काही निर्माण केलं आहे ते तपासून पाहायला तज्ञ माणूस हवाच ! Human in the loop म्हणतात तो हाच ! सध्यातरी तो हवाच !
२. सोशल मीडियावर बरेचजण आपल्या जीवनातील आनंदाच्या बातम्या जाहीर करतात. इथं शेअर हा शब्द न वापरण्याचा निर्धार केल्यानं जाहीर हा काहीसा जशाचा तसा अर्थ न व्यक्त करणारा शब्द वापरला आहे. 'आनंदाची बातमी' ह्या शब्दप्रयोगाची व्याप्ती ५:५७ च्या चर्चगेट विरार लोकलमध्ये उडी मारून खिडकीची जागा मिळाली पासून ते माझी भारतीय T २० संघात निवड झाली इतकी मोठी असू शकते. पण त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये बहुदा ९०% खालील प्रतिक्रियांचा समावेश असतो. आता मराठी लोकसुद्धा मराठीतून प्रतिक्रिया देत नसल्यानं प्रातिनिधिक म्हणवल्या जातील अशा प्रतिक्रिया देण्याइतपत माहिती उपलब्ध नाही.
"Wow! That's awesome!"
"Congratulations!"
"I'm so happy for you!"
"That's great news!"
"I'm thrilled for you!"
"Fantastic!"
"That's amazing!"
आता ५:५७ च्या विरार लोकल मध्ये खिडकीची जागा मिळाली ही बातमी सोशल मीडियावर टाकणारा विद्वान "I'm thrilled for you!" ह्या प्रतिक्रियेला कसे उत्तर देत असेल ते माहिती नाही. पण सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच प्रतिक्रिया आपण आयुष्यातील सर्व घटनांसाठी वापरत असल्यानं समोरील व्यक्तीला आपल्या प्रतिक्रियेच्या, भावनांच्या खरेखुरेपणाविषयी साशंक व्हायला होतं. ह्यात ग्यानबाची मेख अशी ज्या क्षणी आपण अनेकांच्या आयुष्याचा हिस्सा होण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण खरेतर कोणाच्याच आयुष्यात नसतो.
३. श्रीमान प्रथिन ह्या गृहस्थानं बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात खळबळ माजवली आहे. तो दररोज मांसाहारी आहार करणाऱ्या लोकांच्या घरात चिकन, अंडी घेऊन येतो. पूर्वी पांढरा रस्सा, तांबडा रस्सा ह्या क्वचितच घरी बनणाऱ्या डिशेस आज बनविल्या जात हे ऐकूनच अत्यानंदाच्या भावनांनी उचंबळून येणाऱ्या माणसांच्या मनात आज दररोज बनणाऱ्या ह्या डिशेसच्या उल्लेखानं थोडीही खळबळ निर्माण होत नाही.
४. बऱ्याच धार्मिक, सामाजिक समारंभांना हल्ली एक साचेबंदपणा येऊ लागला आहे. मर्यादित वेळेमुळे विवाह, मुंज वगैरे समारंभातील धार्मिक विधी बऱ्याच वेळा एक सोपस्कार म्हणून पार पाडावे लागतात. अर्थात ह्याला अपवाद असतातच. सामाजिक समारंभांना बेगडी रूप आलं आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. त्यातील भाषणं, एकमेकांचं कौतुक करण्याची वृत्ती, कोणताही वाद न होऊ देण्याची घेतलेली खबरदारी ह्यामुळं अशा समारंभांत कधीकधी अगदी वैतागून जायला होतं.
पहिलं उदाहरण देण्याचं प्रयोजन असं की हे नवीन तंत्रज्ञान जसं एका साचेबंद पद्धतीनं उत्तर, माहिती देण्याची शक्यता महत्तम असते त्याचप्रमाणे आपण सुद्धा हल्ली एका साचेबद्ध पद्धतीनं बोलु चालू लागलो आहोत!
दुसऱ्या उदाहरणात मला अभिप्रेत असलेला मुद्दा हा की नाती, मैत्री ह्या मध्ये वेळ गुंतवावा लागतो. पूर्ण मनापासून वेळ गुंतवला तरच ह्या नाती, मैत्रीमध्ये खरंखुरेपण येऊ शकतं. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे केवळ असतं ते तोंडदेखलेपण ! प्रगतीच्या पुढील टप्प्यांमध्ये आपल्या वेळेवर संगणक, भ्रमणध्वनी, कार्यालय अधिक हक्क गाजवत राहतात. मग उरलेल्या वेळात केवळ त्या चेकबॉक्स वर टिक करायचं म्हणून आपण तोंडदेखलेपणानं प्रतिक्रिया देत राहतो. आता हे पूर्णपणे चुकीचं असं म्हणता येणार नाही. किमान आपण प्रयत्न तरी करत असतो!
तिसऱ्या उदाहरणातील मुद्दा अति परिचयात अवज्ञा ! सतत संपर्कात राहिल्यानं नातेसंबंधातील गोडवा कमी होण्याचं भय असतं.
पण जपण जर खरोखर गंभीरपणे विचार केला तर हे सारं अपरिहार्य आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर मनुष्य भावनांपासून फारकत घेणार हे विधीलिखित आहे. आजही जगातील विविध मनुष्य समुदाय त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार आपल्या भावना वेगवेगळ्या प्रमाणात नियंत्रित करायला शिकले आहेत. उत्क्रांतीच्या टप्प्यावर सर्वात पुढे असणारी माणसं आपली जीवनशैली पूर्णपणे यंत्रांशी सर्वप्रथम जुळवून घेतील.
जाता जाता ह्या पोस्टमधील हे हसतमुख बाळ ! हल्लीच्या बहुचर्चित तंत्रज्ञानाला मी असं चित्र बनविण्याची विनंती केली असता त्यानं मला मोजके दोन तीन प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची मी उत्तरं दिल्यानंतर तात्काळ हे हसतमुख बालक माझ्यासमोर आलं. केवळ भावनांचं खरेखुरेपण हरवलं नसावं, आपल्या भोवतालच्या बऱ्याच गोष्टींच्या खरेखुरपणाबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !
मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५
आस स्वातंत्र्याची
रविवार, २२ जून, २०२५
भावनिक बुद्ध्यांक !
आयुष्यात एका वळणानंतर मनुष्याच्या जीवनातील संपत्ती, नुसता बुद्ध्यांक (IQ) ह्यांचं महत्त्व अग्रस्थानावर कायम राहत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळले तर ह्या वयात तुम्ही काहीतरी नेत्रदीपक करून दाखविण्याची शक्यता मावळू लागलेली असते. पस्तिशी - चाळिशीनंतर कुठंतरी आयुष्यातील उभारीचा काळ संपल्याची जाणीव मनात डोकावू लागते. मग सुरु होतो आपल्या जीवनाचा, भोवतालच्या परिस्थितीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याची धडपड. ह्या संदर्भातील काही मुद्दे.
१. ह्या वयातील व्यावसायिक, वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. आपण स्वतःच्या हुशारीवर, श्रीमंतीवर सर्व काही निभावून नेऊ शकतो हा अट्टाहास चुकीचा ठरू शकतो. त्यामुळं माणसं जोडून ठेवायला हवीत. आपली तत्त्वं आणि माणसं जोडून ठेवण्याची गरज ह्यातील सुवर्णमध्य साधता यायला हवा. तत्त्वांशी विशिष्ट प्रमाणाबाहेर केलेली तडजोड संवेदनशील माणसाला त्रासदायक ठरू शकते. इथं आपल्या भावनिक बुद्ध्यांकाची कसोटी लागते. त्रासदायक अशी तडजोड काही केल्यांनतर त्या परिस्थितीतून किती झटकन तुम्ही बाहेर येऊ शकता हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून असते.
२. व्यावसायिक, वैयक्तिक जीवनात तुमची कर्तव्यं असतात. ह्या कर्तव्यांना संबंधित अशा सर्व घटनांवर आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं असतं. एकलव्य बनायचं असतं. पण त्याच वेळी तुमच्या जीवनात घडणाऱ्या इतर घटनांमध्ये तुमची उपस्थिती, तुमचा सक्रिय सहभाग असतो. आपला दिवस, सप्ताह, महिना ह्यांचं एका काल्पनिक कागदावर चित्र आखून कर्तव्यं आणि त्या पलीकडील असलेल्या आयुष्याला त्यावर योग्य ते स्थान देणं हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकाचं महत्वाचं काम ! हे चित्र योग्य कालावधीनंतर बदलत राहतात. 'और क्या ऐहदे वफा होते हैं, लोग मिलते हैं जुदा होते हैं' प्रकार घडत राहतात.
३. हल्ली बरीच माणसं आयुष्यात काहीच घडलं नाही की निराश होतात. ह्या निराश होण्यासाठी काहीच न घडण्याचा कालावधी अगदी काही तासांपासून सुद्धा सुरु होऊ शकतो. इथं आपले संस्कार कामी येऊ शकतात. गॅजेटपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकं तुम्हांला स्वत्व गवसेल आणि एकदा का स्वत्व गवसलं की नैराश्यापासून दूर राहायला तुलनेनं सोपं जाईल. आपल्या शहरातील मोकळ्या जागांचा अभाव हा मोठ्या चिंतेचा विषय तो ह्याच कारणास्तव! ह्या अभावामुळं लोक घरात कोंडून घेऊ पाहताहेत किंवा महामार्गावर गाड्या घेऊन वाहतूककोंडीत भर घालीत आहेत.
४. आयुष्यात दीर्घकालीन आणि तात्कालिक ध्येयं असतात. त्यातही तुमची वैयक्तिक आणि संघटनेची ध्येयं असतात. सतत बदलणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीत सर्वांना सोबत घेत जाऊन ह्या ध्येयांच्या विविध छटांना न्याय देण्यासाठी आवश्यक असणारा गुणधर्म म्हणजे भावनिक बुद्ध्यांक !
५. आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वशक्तिमानाशी मिसळून जाण्याची प्रक्रिया जमेल तितकी लवकर सुरु करण्याची प्रगल्भता म्हणजे तुमचा भावनिक बुद्ध्यांक. ह्यासाठी देवांचे नामस्मरण करणे, स्वाभिमानाला योग्य ठिकाणी मुरड घालणे, सखोल वाचनात स्वतःला झोकून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
६. गावात वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भावनिक बुद्ध्यांक पाहून मी नेहमीच अचंबित होत आलो आहे. जीवनातील विविध घटनांकडे तटस्थपणे पाहण्याची प्रगल्भता ह्यातील बऱ्याच लोकांकडे असते. निसर्गाची असलेली जवळीक ह्यात मोठा हातभार लावत असावी असा माझा कयास. म्हणूनच पोस्टमध्ये एका डेरेदार वृक्षाचं छायाचित्र! पोस्टशी अजिबात संबंध नसणारी छायाचित्रं पोस्टमध्ये बिनधास्त जोडून देणे ही माझी सवय !
कालच्या वसई भेटीत घरच्या जाणकार मोठ्या लोकांसोबत केलेल्या चर्चेचा ह्या पोस्टमध्ये मोठा सहभाग आहे.
गुरुवार, १२ जून, २०२५
So what ..अर्थात तर मग काय ?
आधुनिक काळातील मला उमगलेल्या काही गोष्टी !
१. हल्ली बरीच माणसं, राष्ट्रं अधिकाधिक महत्वाकांक्षी बनताहेत. माणसांच्या महत्वाकांक्षांचा उगम नक्की कुठं झाला आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला आपली विचारप्रक्रिया भरकटत चालली आहे हे जाणवल्यानं मी हा प्रयत्न मी सोडून देतो.
२. माणसानं महत्वाकांक्षी असणं चांगलं. प्रगतीसाठी ते आवश्यकच आहे. फक्त ध्येयापर्यंत मार्गक्रमणा करताना आपण जे काही त्याग करतो, ज्या माणसांना गृहित धरतो / दुखावतो त्याची जाणीव असणं आवश्यक आहे. तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा.
३. ध्येय प्राप्तीनंतर त्याचा आपल्याला कोणत्याही बाह्य घटकांच्या मदतीशिवाय निखळ आनंद व्हायला हवा. आपल्या आनंदासाठी इतरांच्या कौतुकाची, दाद मिळण्याची अपेक्षा नसावी. आपल्या तोंडावर कौतुक करताना काही खोचक वाक्यं, शब्द वापरण्याची सवय काही जणांना असते. मनुष्यजातीची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्याची जाणीव ठेवावी. कोणीही किती मोठी प्रगतीची शिखरं गाठली तरी so what हा प्रश्न विचारला जाणार हे अपरिहार्य आहे.
४. चाळीस, पन्नाशीनंतर माणसं विचित्र वागु लागली आहेत. मी ही वेगळाच वागतो. आपण वेगळं वागतोय हा संदेश आपल्या मेंदूनं आपल्याला द्यावा ह्याची सूचना मेंदूला द्यावी. आपल्याला हे जाणवु देणारी माणसं भोवताली असतील तर आपण सुदैवी आहात. फक्त अशा माणसांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यांना पुढील प्रतिक्रिया देण्यासाठी परावृत्त करेल अशी आपली प्रतिक्रिया नसावी.
५. मुद्दा क्रमांक चार मुळे आपण आयुष्यभर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या माणसांपासून काही घटनांमुळं आपण दुखावलं जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. अशावेळी खंत न बाळगता शांतपणे बाजूला व्हावं. आपल्या दैनंदिन, कार्यालयीन कामात व्यस्त करून घ्यावं. जसं त्यांनी आपल्याला दुखावलं असं आपल्याला वाटतं तसंच आपण त्यांना दुखावलं असं त्यांना वाटत असावं ही शक्यता ध्यानात घेऊन गप्प बसावं.
६. जिथं आपल्या मताला किंमत नाही तिथं व्यर्थ / फुकाची गडबड करू नये.
७. मर्यादित कार्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दृढ असतो, त्याला दैनंदिन दिवसात तडा जाईल असं काही घडत नसतं. त्यामुळं त्याच्या नादाला लागू नये. सुसरबाई तुझी पाठ मऊ सांगून गप्प बसावं.
८. समाजातील एकमेकांविषयीचा विश्वास, आस्था झपाट्यानं लयाला जाऊ लागली आहे. ह्यासाठी कदाचित मुद्दा क्रमांक एक कारणीभूत आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या युगाला कलियुग म्हटलं त्यामागं हे मुख्य कारण असावं.
कालच वसईतील ज्ञानी माणसांनी 'जो पुरुष घरात शांत बसू शकतो तो समाधानी, त्याच्या जीवनात समस्या कमी!' असा संदेश पाठवला. ह्या संदेशाचे अनुकरण करत ऋतूकाळाप्रमाणे निसर्गात निर्माण होणाऱ्या हिरव्या भाज्या, डाळ, भात आणि मोजक्या वेळा सामिष आहार घेऊन सुखी जीवन जगावं!
सोमवार, १७ मार्च, २०२५
ती पाच मिनिटं !
प्रसंग १
आपण बऱ्याच वेळा अगदी उच्च पदावरील व्यवस्थापकांसमोर एखाद्या विषयावर सादरीकरण करतो. इथं अगदी मुद्देसुद आणि धोरणात्मक असं बोलावं लागतं. अशा वेळी चुकीला वाव नसल्यानं अशा सादरीकरणाची तयारी काही दिवस / आठवडे आधीपासून करावी लागते. एक चांगली किंवा आवश्यक सवय म्हणून काहीजण (त्यात मी समाविष्ट ) अशा सादरीकरणाच्या वेळी वापरण्याची संहिता (स्क्रिप्ट साठी खोलवर शब्द) लिहून काढतात, त्याचा सराव करतात. योग्य शब्द वापरले जावेत, महत्वाचे मुद्दे योग्य क्रमाने यावेत, चेहऱ्यावरील हावभाव / ठासून मांडायचा एखादा मुद्दा ह्यांचा सराव व्हावा हा ह्यामागील हेतू असतो.
आपण कसून सराव करतो. तो दिवस उजाडतो, आपण त्या मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये प्रवेश करतो. काही ओळखीच्या, काही अनोळखी लोकांना हॅलो म्हणतो. मनात कुठंतरी उजळणी सुरु असते. इथं सर्व स्क्रिप्ट आठवण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. इथं आवश्यक असतं ते महत्वाचे दोन तीन मुद्दे लक्षात ठेवणं. ते महत्वाचे मुद्दे कोणते ह्याविषयी संभ्रम नसावा. बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्याला १० मिनिटं बोलायला मिळेल असं सांगितलेलं असतं पण मिळतात दोन मिनिटं! अशा वेळी हे महत्वाचे मुद्दे कामी येतात. तुम्ही कितीही प्रदीर्घ सराव करा, पण ही महत्वाच्या मुद्द्यांची उजळणी करणारी शेवटची पाच मिनिटं सदैव लक्षात असू द्यात.
प्रसंग २
परदेशी प्रवास करताना आपण आपापल्या सवयीनुसार तयारी करतो. काही लोक आठवडा आठवडा तयारी करतात. माझे एक जेष्ठ सहकारी केवळ अर्धा तासात बॅग्स भरतात, कारण नक्की काय न्यायचं आहे ह्याविषयी असणारी सुस्पष्टता! असो पण आपल्यासारख्या साध्या माणसांसाठी ज्यावेळी विमानतळावर नेण्यासाठी येणारी कॅब यायला पाच मिनिटं उरतात त्यावेळी समोर असणाऱ्या त्या दोन भल्या मोठ्या चेक इन बॅग्स, म्हणायला छोट्या पण ठासून सामान सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या केबिन बॅग्स पाहून उगाचच मन सैरभैर होतं. आपण काही विसरत तर नाही आहोत अशी भिती निर्माण होते. अशा वेळी फक्त आपलं पारपत्र, मोबाईल (ज्याद्वारे आपण तिकीट, आरोग्य विमा वगैरे वगैरे मिळवू शकतो) आणि परकीय चलन घेतलं आहे की नाही हे पाहावं ! ह्या गोष्टी विसरलात तर दुर्धर प्रसंगाला तोंड द्यायला लागेल.
प्रसंग ३
पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित ह्यातील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश मिळत असे. एक एक गुणांच्या फरकावर तुमचा एखाद्या महाविद्यालयातील / शाखेतील प्रवेश निश्चित होत असे किंवा हुकत असे. अशा परिस्थितीत ह्या विषयांच्या पेपरच्या वेळी परीक्षादालनात प्रवेश करण्याआधीची ती शेवटची पाच मिनिटं अगदी महत्वाची असतात. काहीजण संपूर्ण पुस्तक त्या पाच मिनिटांत चाळण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण डोळे मिटून ध्यान लावून मनातल्या मनात उजळणी करतात. मी मला जे धडे अगदी व्यवस्थित येत असत त्याची डोळे मिटून उजळणी करत असे. ' फील गुड' फॅक्टर (स्वयंम आत्मविश्वासाची भावना) घेऊन परीक्षादालनात प्रवेश करावा हा हेतू असे.
आपल्या व्यवसायानुसार, आयुष्यानुसार अशी ही महत्वाची पाच मिनिटं वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतील. मी मांडली ती वानगीदाखल काही उदाहरणं ! आता शेवट एक काहीसा भावनात्मक ! आयुष्यातील शेवटची पाच मिनिटं माणसाच्या मनात नेमके काय विचार घेऊन असतील. आपल्याला खरोखर जाणवत असेल का ही आपली शेवटची पाच मिनिटं आहेत ते? जर खरोखरच जाणवले तर आयुष्याची गोळाबेरीज आपण ह्या पाच मिनिटांत मांडू शकू का? आणि ती मांडता आली तर आपल्याला नक्की काय आठवेल?
रविवार, २६ जानेवारी, २०२५
२०२४ अनुभव - भाग २
१. मनःस्वाथ्यासाठी लोक खरोखर संघर्ष करताना दिसताहेत. मी सुद्धा करतोय. माझा संघर्ष वेगळा आहे, तुमचा वेगळा असेल. जीवनातील एका क्षणी आपल्याला त्या क्षणापर्यंत ज्या गोष्टींसाठी आपण संघर्ष केला त्या गोष्टींतील काही प्रमाणातील निरर्थकता जाणवू लागते. मग आपण जीवनमार्ग नव्यानं रेखाटू इच्छितो. आपल्या जबाबदाऱ्या, चाकोरीबाहेरील निर्णय घेण्यासाठी लागणारी धमक वगैरे घटक आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवतात.
२. आमच्या क्षेत्रात 'Decision Engine' नावाचा एक प्रकार असतो. त्या बापड्याला सर्व माहिती पुरवली की तो आपल्याला एक निर्णय देतो जसे की ह्या ग्राहकाला कर्ज द्यायचं की नाही, द्यायचं झाल्यास किती द्यावं की निर्णय घेण्यासाठी अधिक माहितीची विनंती करावी. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात सुद्धा असंच एक किंवा काहींच्या डोक्यात अनेक 'Decision Engine' असतं / असतात.अगदी सोप्या सोप्या गोष्टी जसं की कुठं काय बोलावं, लिहावं इथून सुरु होणाऱ्या निर्णयापासून ते कार्यालयातील सर्वात मोठ्या आर्थिक परिणाम होऊ शकणारे निर्णय घेण्याचं काम हे Decision Engine (DE) करत असते. प्रगल्भ व्यक्तींकडं गोष्टींच्या क्लिष्टतेनुसार वेगवेगळी DE असावीत असा मला संशय आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या डोक्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन वावरत असते. कोणत्याही दिवशी, महिन्यात, वर्षात आपण ठरवलेली सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता शून्य असते. परंतु प्रत्येक दिवस, महिना, वर्ष ह्यांच्या आरंभी समोरील कामांचा प्राधान्यक्रम ठरविणं, त्यात वेळोवेळी योग्य फेरफार करणं आवश्यक आहे. ह्यासाठी तुमच्या त्या DE ची प्रगल्भता निर्णायक भूमिका बजावते.
कार्यालय असो की घर, आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून योग्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करता यायला हवं.
तुमच्या मेंदूत किती Decision Engines आहेत, ती भरकटलेली आहेत का वगैरेची जाणीव करून घ्या. माझं तसं ठीकठाक आहे असं मला वाटतंय. मी रात्री घरी परत येताना फक्त पूर्ण झालेल्या कामांचा विचार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो.
फक्त एक ते ऑनलाईन बुद्धिबळ खेळण्याचं २०२१ सालापासून लागलेलं व्यसन गेले एक वर्ष दूर ठेवलं होतं, ते परत सुरु झालंय!!
३. हल्ली लोकांना दुःखी राहणं अजिबात झेपत नाही असं मला वाटू लागलंय. दुःखापासून दूर पळण्यासाठी मदिराप्राशन हा एक मार्ग लोक वापरतात. त्यासोबत अवतीभोवती विविध कार्यक्रम, पार्टी ह्यांचे आयोजन करून त्यात मग्न राहण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून दुःखाचा विसर पडावा किंवा चांगलं वाटण्यासाठी नवीन कारणं मिळावीत. माझं तरी म्हणणं आहे की दुःखी असणं ह्यात काही वावगं नाही. जीवन हा शक्यतांचा खेळ आहे. दुःखापासून, समस्यांपासून काही काळासाठी दूर पळण्यासाठी आपण ज्या उपायांचा वापर करत आहोत ते उपाय भविष्यात नवीन दुःख तर निर्माण करणार नाहीत ना ह्याचा निर्णय तुमच्या Decision Engine ला घ्यायला लावा.
जानेवारी महिन्यात महिलावर्ग हळदीकुंकू कार्यक्रमाचं आयोजन करतात. वर्षअखेरीस लागून असलेल्या सुट्टीचा काळ संपल्याचे दुःख विसरण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात अशी मला शंका आहे.
४. तीस चाळीस वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अगदी साध्या पद्धतीनं पण त्या गोष्टींच्या मूळ हेतूला धक्का न पोहोचवता सादर केल्या जात, त्याच आता उगाचच धांगडधिंगाणा करत सादर केल्या जातात. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दूरदर्शनच्या कृष्णधवल युगात सादर केले जाणारे संगीताचे कार्यक्रम! फक्त आणि फक्त गाण्याच्या मूळ गाभ्यांकडं लक्ष केंद्रित करून हे सादर केले जात असत. आता कुठंतरी सादरीकरण आकर्षक करण्याच्या नादात दर्जाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असावं असं वाटत राहतं.
५. आमच्या कार्यालयात एक गोष्ट पाळण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकानं स्वतःच्या धोरणात्मक विचारांसाठी, क्लिष्ट आज्ञावली लिहिण्यासाठी सलग दोन-तीन तास राखून ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ही कामं करण्यासाठी तुम्हांला "झोन" मध्ये जाणं आवश्यक असतं. त्यामुळं स्वतःही उगाचच बैठकीमध्ये गुंतवून घेऊ नये आणि दुसऱ्यांना सुद्धा गुंतवू नये. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपला वेळ जपता यायला हवा. इथं योग्य प्रकारे नाही म्हणायला शिकणं ही गोष्ट आत्मसात करता यायला हवी. योग्य कारणासाठी नाही म्हणणं हा काही गुन्हा नव्हे हे ध्यानात घ्या!
६. कार्यालय असो की घर, कोणत्याही संवादातून आपल्याला कोणता निर्णय अपेक्षित आहे ह्याची तो संवाद सुरु करण्याआधी जाणीव असावी. तो निर्णय सर्वसमावेशक पद्धतीनं घेता यावा ह्यासाठी चर्चेला योग्य दिशेनं वळण देता यायला हवं. ही प्राथमिक पातळीवरील कला बहुसंख्य लोकांकडे नसते. त्यामुळं सर्वत्र गोंधळ माजलेला दिसतो.
७. आयुष्यात आनंदाची वा दुःखाची घटना घडली असता अगदी टोकाची प्रतिक्रिया न देण्याचा प्रयत्न करावा. Time Machine च्या आधारे साधारणतः पाच वर्षे पुढे जाऊन ह्या घटनेचे त्याकाळी परिणाम किती प्रमाणात असतील ह्याचा विचार करून मगच संयत प्रतिक्रिया द्यावी.
(कदाचित क्रमश: पण बहुतेक नाही !)
सोमवार, ६ जानेवारी, २०२५
२०२४ अनुभव - भाग १
२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय लिहायचं ह्याविषयी काहीच ठरवलं नाही.
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४
बालपणात (अति) गुंतलो मी !
'बालपणातील दिवस खरे सुखाचे दिवस' असं हल्ली बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. ह्या विधानाविषयी मला आक्षेप नाही. आयुष्यातील ह्या सुवर्णकाळात मनानं जर आपण जास्तच गुंतून राहिलो तर आयुष्यातील इतर गोष्टींवर परिणाम होऊ शकतो का ह्याचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न. ही माझी वैयक्तिक मतं असून त्यांचा कोणत्याही विशिष्ट गटावर , गावावर रोख नाही हे आधीच मी स्पष्ट करू इच्छितो. सोमवारी सकाळी हा लेख लिहिण्याचा भुंगा डोक्यात शिरल्यानं हा लेख अति संक्षिप्त स्वरूपात असणार आहे.
१. आपलं बालपण अगदी सुखात गेलं असेल तर आपण नक्कीच सुदैवी आहात. ह्या सुखी बालपणामागे आईवडील, लहान मोठी भावंडं आजी - आजोबा, काका, काकू , आत्या, मामा, मामी, मावशी ह्या मंडळींचा मोठा हातभार होता. आता आपण जसा बालपणीच्या आठवणींचा गवगवा करतो आहोत तसा गवगवा करण्याची संधी ह्या मंडळींना मिळाली होती का हे आठवून पाहण्याचा प्रयत्न करा.
२. बालपण सुखात गेलं, तुम्ही मोठे झालात. आता नवीन जबाबदाऱ्या आल्या, नवीन भूमिकांत तुम्ही प्रवेश केलात. मुलांच्या लहानपणी त्यांचे व्यवस्थित लाड केलेत. विशीत पोहोचलेल्या मुलांशी सुसंवाद सुरु ठेवण्यासाठी, त्यांच्या समस्या खरोखर जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? उत्तर होकारार्थी असेल खूप छान. तुमचं अभिनंदन. पण नसेल तर मग आताच विचार करायला हवा. आतापर्यंत घडलेलं आपलं व्यक्तिमत्व आपल्याला बालपणी मिळालेल्या शिकवणुकीमुळं घडलं. नवीन भूमिका, जबाबदाऱ्या पेलविण्यासाठी ह्या व्यक्तिमत्वाला नवीन पैलू पाडण्याचं काम तुम्ही केलंत का?
३. आतापर्यंत नोकऱ्या, व्यवसायही व्यवस्थित पार पाडलेत. इतक्या वर्षांची गुंतवणूक केल्यानं आता अधिक जबाबदारी असणाऱ्या संधी तुम्हांला कदाचित खुणावतील. त्या स्वीकारण्यासाठी आवश्यक असणारी नवीन कौशल्यं अवगत करण्याची, अधिक वेळ देण्याची गुंतवणूक करायला तुम्ही सज्ज आहात ना? मुद्दा असा आहे की अशी संधी मिळत असेल तर ती दवडू नका. अशा सामोऱ्या येणाऱ्या संधींचा स्वीकार करा. बालपणीच्या स्मृती मधुर आहेतच, त्या सवंगड्यांसोबत असलेले आपले बंध अतुलनीय आहेत . पण सद्यकाळात सुद्धा अशा आठवणी घडू शकतात, असे बंध जुळू शकतात हेही कुठंतरी लक्षात असायला हवं.
रविवार, २५ सप्टेंबर, २०२२
सद्यकाळात संस्कारांचे महत्त्व
म्हटलं तर सर्व काही आलबेल आहे पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकतंय असं सध्याच्या समाजातील कौटुंबिक परिस्थितीविषयी म्हणता येईल. काही काळापूर्वी समाजात, घरात वागण्याच्या चालीरिती ह्याविषयी काहीसे लवचिकता नसणारे नियम रुढ होते. ह्या नियमांची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेणारी वरिष्ठ माणसं घरात, गावांत असत. हे नियम न पाळणाऱ्या बाळगोपाळांचे आणि प्रसंगी मोठ्यांचे कान पकडण्याचा, त्यांना दोन शब्द सुनाविण्याचा अधिकार ह्या वरिष्ठ माणसांना होता.
पुर्वापार ही पद्धती, हे मॉडेल व्यवस्थित चाललं. आता ह्यातील व्यवस्थित ह्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. ह्या पद्धतीमुळं आपण येणाऱ्या नवीन पिढीला दाबून ठेवलं, त्यांना फुलण्याची संधी दिली नाही वगैरे आक्षेप घेतले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये Pandora's Box हा शब्दप्रयोग वापरला जातो. एखादा पर्याय सर्वांना उपलब्ध करुन दिल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांची जर आपल्याला कल्पना करता येत नसेल तर तो पर्याय उपलब्ध करुन देऊच नये असा साधारणतः मतितार्थ असतो. कदाचित ह्याच विचारामुळं आपल्या पूर्वजांनी काहीसं कठोर अथवा कर्मठ म्हणता येईल असं धोरण स्वीकारलं होतं.
ह्या धोरणाविरुद्ध पिढ्यानुपिढ्या काहीशा दबल्या आवाजात होणाऱ्या कुजबुजीचं गेल्या दोन तीन पिढ्यांत जवळपास बंडखोरीत झालं. हे काहीसं अतिरंजित वर्णन झालं. अजुनही परंपरांचं व्यवस्थित पालन करणारी अनेक कुटुंब भोवताली आहेत, फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आता पोस्टचा ओघ परत मुक्त विचारसरणीकडं वळवुयात. आपल्या कुटुंबातील परंपरांना, चालीरितींना पूर्णपणे बगल देऊन आपल्या इच्छेनुसार वागणारा असा हा वर्ग. त्यांच्या ह्या वागण्याला तात्पुरतं बंडखोरी म्हणुयात. ह्या बंडखोरीमागं विविध कारणं असु शकतात.
१) जसा काळ बदलत गेला तसं परंपरांचे हस्तांतरण करताना त्यामागील मूळ हेतू नवीन पिढीला व्यवस्थित समजावून देणं आवश्यक होतं. ह्यासाठी नवीन पिढीला आपल्या बरोबरीची वागणूक देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं आवश्यक होतं. बऱ्याच कुटुंबात हे घडलं नाही.
२) नवीन पिढीचा वेगानं पाश्चिमात्य / आधुनिक जीवनपद्धतीशी संपर्क आला, त्या झंझावाताने नवीन पिढी काहीशी बहकली. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व काही ह्या जीवनपद्धतीने आपल्या पुढ्यात ठेवलं. आपल्या संस्कृतीचा ह्या झंझावातापासून बचाव करण्यासाठी ज्या सुसंवादाची गरज होती त्यात आपण कमी पडलो.
ह्या झंझावाताला येऊन किंवा आपल्या चालीरितींच्या परीक्षेचा काळ सुरु आता काही वर्षे उलटली आहेत. जसं आता युक्रेन पलटवार करु पाहतोय किंवा वेगवान गोलंदाजांनी आघाडीच्या तिघा चौघांना परत पाठविल्यानंतर वर्षोनुवर्षे मधली फळी आणि यष्टीरक्षक आपला डाव सावरतात तसं आपल्याला आपल्या चालीरीती सावरण्याचा प्रयत्न करता येईल हा महत्वाचा मुद्दा इथं मी मांडू पाहत आहे.
आपल्या संस्कृतीशी फारकत घेऊन स्वतंत्र वागण्याचा आनंद घेणाऱ्या पिढीला कदाचित ह्यातील त्रुटी जाणवु लागल्या असतील. प्रत्यक्ष जीवनातील त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रसंगामुळं आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी आपल्याला विशिष्ट पद्धतीनं वागण्याचा आग्रह का केला हे त्यांना उमजलं असेल. हीच वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा परंपरा, चालीरीती ह्यांना काळानुसार योग्य रुपात सर्वांच्या समोर आणलं पाहिजे.
हल्लीच्या काळात एकटेपणाच्या भावनेनं बऱ्याच जणांना ग्रासलं आहे. जुन्या काळातील जमेल तितक्या गोष्टींचा काळानुसार बदललेल्या स्वरुपात स्वीकार केल्यास मानसिक स्थैर्यास नक्कीच मदत होऊ शकेल. नवीन जीवनपद्धतीचा तर आपणांस स्वीकार करायचाच आहे पण त्या प्रवासात जुन्या चालीरीती, जुने संस्कार ह्यांची योग्य रुपात मदत घेतल्यास भविष्य सुखकारक होईल. हा लढा प्रत्येक घराघरातून लढला गेला पाहिजे.
शनिवार, ६ मार्च, २०२१
तुमच्या, आमच्या, सर्वांच्या कार्बन पाऊलखुणा !!!
माणसं निरागसतेनं सोशल मीडियावर वावरत असतात. म्हणजे ते आपल्या निरागसतेविषयी स्वतःला ठामपणे बजावत असतात. आपला सोशल मीडियावरील वावर हा मनात कोणताही वाईट हेतु न बाळगता असतो असं सर्वांनाच वाटत असतं. परंतु खरोखर पाहता असला काही प्रकार असतो का ह्याविषयी मी साशंक आहे !!
प्रत्यक्ष जीवनात जसा आपल्या उपस्थितीने काहीजणांना आनंद होतो तर काहींना नाही! तसलाच काहीसा प्रकार सोशल मीडियावरसुद्धा असतो. तुमच्या किमान तटस्थ उपस्थितीची एक लक्ष्मणरेषा असते; तुम्ही जोवर त्या मर्यादेत असता तोवर तुमचं अस्तित्व कोणालाच खटकत नाही. पण विविध कारणास्तव लोक ही मर्यादा ओलांडतात.
कधी आयुष्याच्या एका टप्प्यावर लोकांचा आत्मविश्वास बळावतो आणि ते जगापुढे सादर होतात. काही उदाहरणांत लोकांना आपल्या भिडस्तपणावर मात करण्यात यश मिळते आणि मग ते सातत्यानं जगापुढं सादर होऊ लागतात.
जगापुढं एखाद्या व्यक्तीनं सादर होण्यास सुरुवात करणे ही एक विश्लेषण करण्यास योग्य अशी घटना आहे. सोशल मीडियावर सादर होणाऱ्या माणसांसाठी सोशल मीडियाने आधीच काही विशिष्ट विशेषणांची यादी बनविलेली असते. सोशल मीडियावरील तुम्ही निर्माण केलेल्या काही डेटा पॉईंट्सच्या आधाराने त्यातील काही विशेषणे तुमच्याशी जोडली जातात. बऱ्याच वेळा वेगवेगळे गट तुम्हांला वेगवेगळ्या विशेषणांशी जोडतात.
आपल्या सोशल मीडियावर व्यक्त होण्याच्या गरजेला प्राधान्य द्यावं की आपण कोणत्या विशेषणांशी जोडले जात आहोत ह्याची चिंता करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न! सोशल मीडियावर व्यक्त होण्याची गरज काही जणांच्या बाबतीत अगदी तीव्र असते. त्या क्षणाला व्यक्त झाल्याशिवाय चैन पडत नाही अशी ही अवस्था असते.
व्यक्त होणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा दोन शक्यता संभवतात. काहीजण आपल्याशी जोडल्या जाणाऱ्या विशेषणांची चिंता करत असल्यानं घाबरत-घुबरत व्यक्त होतात तर काहीजण विशेषणांची अजिबात चिंता करत नाहीत आणि अगदी मुक्तपणे व्यक्त होतात !
पोस्टचे शीर्षक काहीसं गैरसमज निर्माण करणारे आहे. काहीजणांचा सोशल मीडियावरील वावर बऱ्याच जणांना आनंददायी असतो. त्यामुळं सरसकट त्याला कार्बन पाऊलखुणा संबोधणे योग्य नाही. तरीही तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालात तर नक्कीच कोणाला तरी तुमच्या वावराचा काहीसा त्रास झाला असेल ही शक्यता निर्माण होते!
त्यामुळं दररोज रात्री झोपण्याआधी स्वतःशीच खालील काही वाक्यं म्हणणे इष्ट !
हे सर्वशक्तिमाना !
सोशल मीडियावरील आज माझ्या अल्पमतीला अनुसरुन मी काही प्रमाणात वावर केला !
ह्या वावराने जाणता अजाणता भूतलावरील प्रेमळ व्यक्तींना कष्ट पोहोचले असू शकतात.
ह्या घटनेबद्दल मला नक्कीच वाईट वाटतंय !
ह्या कष्टनिर्मितीचे अचुक विश्लेषण जर मला प्राप्त झालं तर नक्कीच मी माझ्या वावरात बदल घडवुन आणीन!!!
गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०
स्वप्रतिमेशी संघर्ष !
सोशल मीडियावरील संघर्षाविषयी आज सकाळी एक सुंदर स्टेट्स वाचलं. दुसऱ्या कोणी आपल्याशी वादाचा पवित्रा घेतला म्हणुन लगेचच आपणही युद्धाची तयारी करायला नको. त्यांना शांततेनं जिंका !
ह्या स्टेट्सला आरंभबिंदु घेऊन आजची ही पोस्ट! भोवताली बऱ्याच प्रमाणात स्वप्रतिमेशी संघर्ष भरुन राहिला आहे की काय अशी परिस्थिती आहे! स्वप्रतिमेच्या अभ्यासात असं जाणवतं की ह्यात दोन टप्प्यांचा समावेश होतो. बाह्यजगानं मान्य केलेली आपली प्रतिमा आणि त्या प्रतिमेत आपल्या स्वभावानुसार बदल करुन बनवलेलं स्वप्रतिमेचं रुप !
प्रत्येक मनुष्य जन्मतः एक स्वप्रतिमा बाळगुन असतो. ही झाली अनुवंशिकतेने लाभलेली स्वप्रतिमा ! बालपणीच्या काही वर्षात आईवडील, नातेवाईक ह्या स्वप्रतिमेला घडविण्यात हातभार लावतात. ह्या वर्षात प्रत्यक्षातील प्रतिमा आणि ही घडविण्यात आलेली प्रतिमा ह्यात जितकं साधर्म्य तितकं भविष्यकाळाच्या दृष्टीनं उत्तम !
एका क्षणी हे बालक स्वप्रतिमेच्या परीक्षणास सुरुवात करते. व्यक्ती तितक्या प्रकृती ! काहींना आपलं हे स्वप्रतिमेचं मनात साकारलं गेलेलं रुप प्रथमक्षणी आणि आयुष्यभर बेहद आवडतं. अशी माणसं बऱ्यापैकी ठाम स्वभावाची असतात. स्वप्रतिमा परिपुर्ण आहे का वगैरे विचार करण्याच्या फंदात ते पडत नाहीत. ही माझी प्रतिमा आहे ना ! मग ती जशी आहे तशी मी स्वीकारणार अशी ह्यांची विचारधारणा असते ! स्वप्रतिमा स्वीकारलेली माणसं म्हणुयात यांना आपण ! ह्या विचारधारणेत समजुतदारपणाच्या ते बेफिकिरीच्या विविध छटा असतात. छटा कोणतीही असो पण हल्लीच्या जगात ही माणसं सुखी राहण्याची शक्यता जास्त असते.
आता वळुयात ते स्वप्रतिमेशी संघर्ष करणाऱ्या माणसांकडं ! ह्यातही दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील लोक आपली जी काही स्वप्रतिमा जाणवत आहे त्याविषयी दुःख बाळगुन असतात. परंतु हे दुःख आपल्याकडेच ठेवण्याची त्यांची मनोवृत्ती असते. काहीशी संवेदनशील असतात ही माणसे! जमेल तसं आपल्यापरीनं ह्या प्रतिमेला शांततेनं बदलायचा प्रयत्न करत राहतात ही माणसे! दुसऱ्या प्रकारातील माणसांचा संघर्ष मोठा क्लेशदायक असतो; त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठी ! त्यांचा हा संघर्ष बाह्यजगतासाठी दृश्यमान असतो. उदाहरणं अनेक आहेत. सध्या सोशल मीडिया खुपच intrusive (योग्य मराठी शब्द आगाऊ?) झाली आहे. फेसबुकचं उदाहरण घेवुयात ! आपण आपली प्रोफाईल पाहत असताना short videos नावाचा प्रकार उगाचच मध्ये येतो. त्यात लोकांचे आपल्याकडं लक्ष वेधुन घेण्यासाठी ज्या थराला काहीजण विशेषतः मुली जातात त्यावेळी केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी हे असले सवंग प्रकार करण्याची गरज आहे का हा प्रश्न पडतो! कदाचित ह्यातुन मोठया चित्रपटासाठी वाव मिळेल अशी आशा बाळगुन असतील. प्रतिमेचा संघर्ष सोशल मीडियावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही दिसत राहतो. ह्यात मोठ्या समूहानं आपल्याला स्वीकारलं पाहिजे ह्यासाठी आपण जे काही नाही आहोत ते रुप स्वीकारण्याचा प्रयत्न केला जातो.
ह्यावर उपाय काय? आपण जसे आहोत तसंच आपल्याला स्वीकारावं ! बोलायला हे सोपं पण ही निर्वाणा स्थिती आहे जी कमी जणांना लाभु शकते. आपण जसं आहोत तसंच स्वतःला स्वीकारायचं म्हटलं म्हणजे काही वेळा एकट्यानं बराच वेळ व्यतित करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. पण जरी बाकीच्या लोकांशी आपण संपर्क कमी केला तरी प्राणी, पुस्तकं / ग्रंथ आणि निसर्ग ही अशी मंडळी आहेत जी तुम्हांला तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारतात ! मग स्वप्रतिमेशी संघर्ष संपुष्टात येतो आणि लाभते एक नीरव शांतता!
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...






























