मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

स्वप्रतिमेशी संघर्ष !


सोशल मीडियावरील संघर्षाविषयी आज सकाळी एक सुंदर स्टेट्स वाचलं. दुसऱ्या कोणी आपल्याशी वादाचा पवित्रा घेतला म्हणुन लगेचच आपणही युद्धाची तयारी करायला नको. त्यांना शांततेनं जिंका ! 

ह्या स्टेट्सला आरंभबिंदु घेऊन आजची ही पोस्ट! भोवताली बऱ्याच प्रमाणात स्वप्रतिमेशी संघर्ष भरुन राहिला आहे की काय अशी परिस्थिती आहे! स्वप्रतिमेच्या अभ्यासात  असं जाणवतं की ह्यात दोन टप्प्यांचा समावेश होतो. बाह्यजगानं मान्य केलेली आपली प्रतिमा आणि त्या प्रतिमेत आपल्या स्वभावानुसार बदल करुन बनवलेलं स्वप्रतिमेचं रुप !

प्रत्येक मनुष्य जन्मतः एक स्वप्रतिमा बाळगुन असतो. ही झाली अनुवंशिकतेने लाभलेली स्वप्रतिमा ! बालपणीच्या काही वर्षात आईवडील, नातेवाईक ह्या स्वप्रतिमेला घडविण्यात हातभार लावतात.  ह्या वर्षात प्रत्यक्षातील प्रतिमा आणि ही घडविण्यात आलेली प्रतिमा ह्यात जितकं साधर्म्य तितकं भविष्यकाळाच्या दृष्टीनं उत्तम ! 

एका क्षणी हे बालक स्वप्रतिमेच्या परीक्षणास सुरुवात करते. व्यक्ती तितक्या प्रकृती ! काहींना आपलं हे स्वप्रतिमेचं मनात साकारलं गेलेलं रुप प्रथमक्षणी आणि आयुष्यभर बेहद आवडतं. अशी माणसं बऱ्यापैकी ठाम स्वभावाची असतात. स्वप्रतिमा परिपुर्ण आहे का वगैरे विचार करण्याच्या फंदात ते पडत नाहीत. ही माझी प्रतिमा आहे ना ! मग ती जशी आहे तशी मी स्वीकारणार अशी ह्यांची विचारधारणा असते ! स्वप्रतिमा स्वीकारलेली माणसं म्हणुयात यांना आपण ! ह्या विचारधारणेत समजुतदारपणाच्या ते बेफिकिरीच्या विविध छटा असतात. छटा कोणतीही असो पण हल्लीच्या जगात ही माणसं सुखी राहण्याची शक्यता जास्त असते. 

आता वळुयात ते स्वप्रतिमेशी संघर्ष करणाऱ्या माणसांकडं ! ह्यातही दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील लोक आपली जी काही स्वप्रतिमा जाणवत आहे त्याविषयी दुःख बाळगुन असतात. परंतु हे दुःख आपल्याकडेच ठेवण्याची त्यांची मनोवृत्ती असते. काहीशी संवेदनशील असतात ही माणसे! जमेल तसं आपल्यापरीनं ह्या प्रतिमेला शांततेनं बदलायचा  प्रयत्न करत राहतात ही माणसे! दुसऱ्या प्रकारातील माणसांचा संघर्ष मोठा क्लेशदायक  असतो; त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठी ! त्यांचा हा संघर्ष बाह्यजगतासाठी दृश्यमान असतो. उदाहरणं अनेक आहेत. सध्या सोशल मीडिया खुपच intrusive (योग्य मराठी शब्द आगाऊ?) झाली आहे. फेसबुकचं उदाहरण घेवुयात ! आपण आपली प्रोफाईल पाहत असताना short videos नावाचा प्रकार उगाचच मध्ये येतो. त्यात लोकांचे आपल्याकडं लक्ष वेधुन घेण्यासाठी ज्या थराला काहीजण विशेषतः मुली जातात त्यावेळी केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी हे असले सवंग प्रकार करण्याची गरज आहे का हा प्रश्न पडतो! कदाचित ह्यातुन मोठया चित्रपटासाठी वाव मिळेल अशी आशा बाळगुन असतील. प्रतिमेचा संघर्ष सोशल मीडियावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही दिसत राहतो. ह्यात मोठ्या समूहानं आपल्याला स्वीकारलं पाहिजे ह्यासाठी आपण जे काही नाही आहोत ते रुप स्वीकारण्याचा प्रयत्न केला जातो. 

ह्यावर उपाय काय? आपण जसे आहोत तसंच आपल्याला स्वीकारावं ! बोलायला हे सोपं पण ही निर्वाणा स्थिती आहे जी कमी जणांना लाभु शकते. आपण जसं आहोत तसंच स्वतःला स्वीकारायचं म्हटलं म्हणजे काही वेळा एकट्यानं बराच वेळ व्यतित करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. पण जरी बाकीच्या लोकांशी आपण संपर्क कमी केला तरी प्राणी, पुस्तकं / ग्रंथ आणि निसर्ग ही अशी मंडळी आहेत जी तुम्हांला तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारतात ! मग स्वप्रतिमेशी संघर्ष संपुष्टात येतो आणि लाभते एक नीरव शांतता!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...