मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

पार्थेनियम गवत !

सध्या सुट्टीचे दिवस असल्यानं घराच्या अवतीभोवती फिरणं होतं. फिरणं म्हटलं की दोन चार झाडं झुडपं दिसतात. दोन चार झाडं झुडपं दिसली की आपसुक भ्रमणध्वनी उचलुन दोन चार छायाचित्रं काढली जातात ! दोन चार छायाचित्रं काढली गेली की ती फेसबुक आणि व्हाट्सअँप जाण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो! असंच परवाच्या फोटोंबाबत झालं. वाडीतील गवताचे दोन चार फोटो चांगले आले, फेसबुकवर टाकले ! नेहमीप्रमाणं दोन चार लाईक झाले, दिवस सार्थकी झाल्यासारखा वाटला. 

रात्री अचानक एका चिकित्सक मित्राचा मेसेज आला. हा मित्र कोणत्या बाबतीत चिकित्सकपणा दाखवेल ह्याचा भरवसा नसतो! 

पहिला प्रश्न - "तुमच्याकडं देखील काँग्रेस आहे?" 

आता हा मित्र आणि मी एकाच लोकसभा, विधानसभा मतदारसंघात असल्याची मला पक्की खात्री ! बाकी महानगरपालिकेच्या वॉर्डाबाबत तो एकच असल्याची खात्री नाही ! त्यामुळं मी थोडा साशंक झालो. पण अचानक लक्ष गेलं ! त्यानं माझ्या स्टेटसला टॅग करुन प्रश्न विचारला होता ! 




आता डोक्यात प्रकाश पडला ! लहानपणी किर्लोस्कर मासिकात बहुदा ह्या काँग्रेस गवताविषयी मोठा लेख वाचला होता! ह्या मित्रानं त्या आठवणींना उजाळा दिला होता ! १९५० - ६० च्या दरम्यान भारतात अमेरिकेतुन गहु आयात केला होता. त्याकाळी भारतात हरितक्रांती झाली नसावी, त्यामुळं भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण नसावा. त्यामुळं दुष्काळाच्या वेळी हा मिलो गहू आयात करण्याची वेळ भारतावर आली. ह्या गव्हांच्या बोटींसोबत ह्या गवताच्या बिया अनाहुत पाहुण्यासारखा भारतात चंचुप्रवेश करता झाला आणि पाहतापाहता देशभर पसरला ! ह्या गवताचे शास्त्रीय नाव खरंतर वेगळं पण काँग्रेसच्या राजवटीत हे गवत भारतभर पसरलं म्हणुन आपल्या देशात त्याला काँग्रेस गवत हे नांव पडलं. 

हे गवत खुपच त्रासदायक आहे. एकदा पसरलं की बाकीच्या पिकांचा नाश करतं. प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा सहजरित्या टिकाव धरतं. मित्रानं ह्या सर्व माहितीला उजाळा तर दिलाच पण अधिकच्या माहितीची लिंक सुद्धा पाठवली.  हे गवत सध्या हिवाळ्यातील दवावर जोमानं फोफावेल, उन्हाळ्यापर्यंत सहज टिकाव धरुन राहील. मित्र माहिती पुरवत होता. 

वाडीतील चित्र आठवुन त्याच्या म्हणण्याची पुरेपूर खात्री वाटत होती. वाडीचा बराचसा भाग ह्या गवताने व्यापुन टाकला होता. ऑक्टोबर महिन्यात भाग पुर्ण साफ करुनसुद्धा दोन महिन्यात हे गवत पुन्हा उगवलं होतं. 


फुलवाले गवत आहे त्याला काँग्रेस गवत म्हणतात. मला ही संकल्पना पुर्णपणे समजवावी ह्या हेतुने तो म्हणाला. आज थोडं ह्यावर फुरसतीने वाचन केलं तर ह्या गवताची उपद्रवता ध्यानात आली. एकदा ह्या गवताने तुमच्या शेतीत चंचुप्रवेश केला की त्याचा पुर्णपणे बिमोड करणे फार जिकिरीचं काम बनतं !



लहानपणी मी लावलेल्या सुबाभुळचीसुद्धा अचानक आठवण झाली. मोठ्या कौतुकानं आणलेलं हे सुबाभुळ अगदी वेगानं वाढलं आणि वर्ष - दोन वर्षात वाडीचा भाग त्यानं व्यापुन टाकला. शेवटी स्थानिक वृक्षच खरे आपल्यासाठी धार्जिणे ! 

बाकी परत काँग्रेस गवताकडं ! मित्रानं म्हटल्याप्रमाणं ह्याला फुलं येतात ! मेहनतीनं फोटो काढले तर सुंदरही येतात. 





आता भोळ्याभाबड्या फुलपाखरांना आपण कोणत्या गवतावर बसतो आहोत ह्याची पर्वा नसावी! त्यामुळं ती बिचारी ह्या गवतावर मोठ्या आनंदानं बसली होती! 



छान किती दिसते फुलपाखरु !
ह्या वेलीवर ,काँग्रेस गवतावर 
छान किती दिसते फुलपाखरु !!!

(तळटीप - संपुर्ण पोस्ट हे गवत काँग्रेस गवत आहे ह्या गृहितकावर आधारित आहे. ते गवत काँग्रेस गवत नसल्यास मी जबाबदार नाही !!  वाद नसावा  म्हणुन माहितीमायाजालावरुन काँग्रेस गवताचे शास्त्रीय नाव शोधुन पोस्टचे शीर्षक दिले आहे !)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...