मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अजिंक्य - एक संस्मरणीय विजय !

 


कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी, सूर्याजी ह्यांनी आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांच्या साथीनं रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला.  तानाजी आणि उदयभान ह्यांच्यात निकराची लढाई होऊन त्या दोघांचाही मृत्यू होतो. आपला सेनापतीच धारातीर्थी पडला हे पाहुन मावळे पळू लागतात. भावाच्या मृत्यूचं दुःख बाजुला सारुन सुर्याजी परतीचे दोर कापून टाकतो आणि मावळ्यांना सांगतो, "भित्र्यांनो पळता कुठे?  इथे तुमचा सेनापती मरून पडला आहे. मी परतीचे दोर कापले आहेत!" परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत हे कळताच मावळे मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडतात. मराठे लढाई जिंकतात आणि कोंढाणा मराठ्यांच्या ताब्यात येतो!

ऍडलेड येथे न भूतो न भविष्यती असा पराभव झाल्यावर भारतीय संघाची काहीशी अशीच परिस्थिती झाली होती. कर्णधार विराटला वैयक्तिक कारणामुळे  भारतात परतावे लागणार होते. शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध नसणार होता. अशावेळी अजिंक्य रहाणेच्या डोक्यावर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट चढवण्यात आला. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर आपल्याला कर्णधार बनावं लागेल हे त्याला ठाऊक होतं पण अशा परिस्थितीत कप्तानपदाची सूत्रं हाती घ्यावी लागतील ह्याची त्यानं बहुदा कल्पना केली नसावी ! 

१९ डिसेंबरला ज्यावेळी भारतीय संघ ३६धावांत गुंडाळला जाऊन हरला त्या संध्याकाळी भारतीय संघाच्या हॉटेलमधील वातावरणाची एक क्षणभर कल्पना करून पहा! आदल्या दिवशी सायंकाळी असलेली अत्यंत मोक्याची संधी आपण गमावली होती. ज्या पद्धतीने हॅझलवूड आणि कमिन्स यांनी भारतीय फलंदाजांचा फडशा पाडला होता त्यामुळे नक्कीच भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास रसातळाला गेला असणार. अशावेळी अजिंक्य राहणेच्या मनात कोणते विचार डोकावत असणार?

आज सामना जिंकल्यानंतर त्याला एक प्रश्न विचारण्यात आला, "या सामन्यासाठी खास काय तयारी केलीस? त्याचे उत्तर मार्मिक होतं! तो म्हणाला, "नियोजनासोबत एकंदरीत आपण कसे खेळतो आणि मैदानावर कोणती वृत्ती दाखवतो यावर बरंच काही अवलंबून असतं!" कालच्या पेपरात अजून एक पत्रकाराने त्याला विचारण्यात आलेला प्रश्न नमुद करण्यात आला होता.  "सल्ला घेण्यासाठी तु विराटला फोन केलेलास का?"  अजिंक्य त्यावर उत्तरला "हा  विराटसाठी आणि कुटुंबासाठी एक खास क्षण आहे! त्यात त्याला डिस्टर्ब करणं मी उचित समजत नाही !" त्या स्तंभकाराने म्हटलं होतं, " खरंतर त्या उत्तरात मी माझ्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करीन!" असा मतितार्थ होता ! 

आता वळुयात या सामन्यात नक्की काय झालं त्याविषयी! कोणत्याही सामन्यात विजय मिळवायचा असेल तर तुमचं दैव तुमच्या बाजूस काही प्रमाणात असावं लागतं. नक्कीच ह्या सामन्यात ते भारताच्या बाजूने होतं. दैवाला त्याचं श्रेय देऊन झाल्यावर ज्या बऱ्याच जबाबदाऱ्या अजिंक्य आणि भारतीय संघाने उत्तम रितीनं पार पाडल्या त्याविषयी !
सर्वप्रथम संघातील बदल!  शुभमन गिल, रिषभ पंत, जडेजा आणि सिराज असे चार नवे खेळाडु संघात घेण्यात आले! 
शुभमन गिल - १९५ ला ऑस्ट्रेलियन संघ सर्वबाद झाल्यावर स्टार्कने पहिल्याच षटकात मयंक अग्रवालचा बळी घेतला. शुभमनने आपल्या ज्येष्ठ खेळाडूंना ३६ धावांत सर्वबाद होताना गेल्या आठवड्यात  तंबूतून पाहिलं होतं. आता मैदानात आल्यावर पहिल्याच षटकात मयंकला बाद होताना नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहिलं. सलामीचा कसोटी सामना तोही मेलबॉर्नसारख्या गौरवशाली परंपरा असलेल्या मैदानावर आणि समोर जोशाने गोलंदाजी करणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज! परंतु त्यानंतर त्यानं ज्या पद्धतीने पुजाराच्या साथीनं बाकीच्या तासभराचा खेळ खेळून काढला , त्यातही ज्याप्रकारे काही चौकार मारले ते भारतीय संघाच्या मनोबलात मोलाची भर पाडण्यात कारणीभुत होते! तुम्ही किती धावा करतात हे नक्कीच महत्त्वाचं पण त्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या धावा बनवता हे त्याहुन महत्वाचं ! मैदानावर त्या बावीस यार्डच्या खेळीपट्टीवर वातावरण असतं तिथं एखादा खणखणीत स्ट्रेट ड्राइव्ह फलंदाजाला फार मनोबल मिळवुन देतो! हीच खेळी त्यानं दुसऱ्या दिवशी काही काळ आणि आज विजयी धाव होईपर्यंत दाखवली, ती मोलाची होती! पहिल्या दिवशी सायंकाळी समजा भारतानं दोन- तीन बळी गमावले असते तर सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ जोमानं परतला असता. रिषभ पंत ; त्याने सामन्यात काही झेल सोडले खरे परंतु त्यानं अजिंक्य सोबत जी भागीदारी केली ती मोलाची होती. पुन्हा एकदा तुम्ही किती धावा करतात हे नक्कीच महत्त्वाचं पण त्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या धावा बनवता हे त्याहुन महत्वाचं ! पंतने एक सकारात्मक भुमिका आणली. 

जडेजा, पंड्या ह्या दोन्ही खेळाडुंकडे परंपरागत फलंदाज किंवा गोलंदाज यांच्या व्याख्येतून पाहिले असता त्यांना स्पेशालिस्ट म्हणून गणले जायला तज्ञ लोक सुरुवातीला तयार नव्हते किंबहुना आजही नसतील. परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवु शकतो हा दुर्दम्य आशावाद त्यांच्या मनात ज्या प्रमाणात ठासुन भरला आहे ते अनन्यसाधारण आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्ध आपण हरलेला उपांत्य फेरीचा सामना आठवून पहा! तिथं आघाडीचे फलंदाज अत्यंत कमी धावांत बाद झाल्यानंतर ज्यापद्धतीने जडेजा खेळला होता ते कायमचे लक्षात राहील! ह्या सामन्यातील त्याची आणि अजिंक्यची भागीदारी केली तिनं सामन्याचा कल भारताच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकवला. जाडेजाने काही मोलाचे बळी सुद्धा घेतले. 

मोहम्मद सिराज! खरंतर  भारतीय संघातील कमकुवत गोलंदाज म्हणून हा मानला जात होता परंतु त्याने आपल्या या मर्यादेत राहून ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर खेळाडूंना बाद केलं! आता वळूयात ते अश्विन बुमराह यांच्या गोलंदाजीकडे! हल्ली एका प्रकारे आपण काही खेळाडूंवर विशिष्ट शिक्का मारून टाकतो! जसं की अश्विन फक्त भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळविण्याचा गोलंदाज!  परंतु या गुणी खेळाडुने ज्या पद्धतीने स्मिथला सतावले आहे त्यामुळे या भारतीय संघाच्या एक कायमची डोकेदुखी असलेल्या फलंदाजाचा आत्मविश्वास खूप कमी झाला आहे. आशा आहे की स्मिथला बाकीच्या मालिकाभर अश्विन आणि मंडळी असेच सतावत राहो! बुमराह यांच्याविषयी जितके प्रशंसोद्गार काढावे तितके कमी !  शमी दुखापतग्रस्त, ईशांत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात येऊ न शकलेला आणि उमेश यादव दुसऱ्या डावाच्या पहिल्या काही षटकातच दुखापतग्रस्त झालेला! अशावेळी ह्या बुमराहने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बऱ्यापैकी जेरीस आणलं आहे. आपल्या गोलंदाजीवर झेल सोडला असतानासुद्धा जो गोलंदाज चेहऱ्यावर हसू राखू शकतो अशा मोजक्या गोलंदाजापैकी एक बुमराह!

आता शेवटी अजिंक्यकडे वळूयात! त्यांना ज्या पद्धतीने या सामन्यात नेतृत्व केले ते सदैव लक्षात राहीलच पण त्याची फलंदाजीसुद्धा अप्रतिम होती. रविवारी ज्यावेळी भारत फलंदाजी करत होता त्यावेळी ढगाळ वातावरण होते. फलंदाजीसाठी परिस्थिती पुर्णपणे अनुकूल नव्हती. परंतु अजिंक्य खेळपट्टीवर टिकून राहिला! जे काही करायचे आहे ते पहिल्या डावातच करायचे आहे हे त्याच्या मेंदूनं चांगलं नोंदून ठेवलं होते. त्यानं जे काही फटके मारले ते डोळ्यांचे पारणे फिटणारे होते. त्यानं एक केवळ चेंडूला थोपटत आहे असं भासवणारा असा जो स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवून बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे गेला. बॅकफुटवर जात पॉईंट आणि कव्हर  यामधून चेंडूला अलगद दिशा दाखवत मेलबॉर्नसारख्या मोठ्या मैदानाच्या सीमारेषेपर्यंत प्रेमानं ढकलून द्यायची कला तोच जाणे! त्यानं केलेले गोलंदाजीतील बदल हे देखील अभ्यासण्याजोगे होते.  उमेश यादव अनुपलब्ध असताना अश्विन आणि सिराज ह्यांना त्यानं आलटून-पालटून योग्य रीतीने वापरले. स्मिथसाठी सदैव लेग स्लीप ठेवून शेवटी त्याला त्या जाळ्यात पकडलं.  गावस्कर, सचिन, राहुल आणि अजिंक्य ह्या मंडळींच्या  स्ट्रेट ड्राईव्हचा ख्रिसमस सुट्टीत केकसोबत चहापान करताना आनंद लुटण्यातील मजा काही औरच ! तसंच काल त्यानं एक रिव्यू घेतला. ह्या अपीलविषयी यष्टीरक्षक पंत फारसा आत्मविश्वासपुर्ण वाटत नव्हता परंतु रहाणेच्या मनानं ठरवलं की हा रिव्यू घ्यायचाच. आणि अगदी निसटत्या आवाजाच्या धाग्यावर भारतानं हा बळी मिळवला ! कॉलेजातील सतीशशी काल परवा चॅट केली. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील कष्टानं पुढे आलेल्या मुलाला अथक परिश्रमानंतर योग्य अशी मान्यता मिळाल्याबद्दल आम्ही दोघांनी संतोष व्यक्त केला. 

आता वळूयात ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे! काही वर्षांपुर्वी हेडन आणि स्लेटरची जोडी सलामीला यायची. कित्येक वेळा प्रथम फलंदाजी घेऊन हे दोघे, मधल्या फळीतील पॉन्टिंग, गिलख्रिस्ट मंडळी गोलंदाजांची मस्त पिटाई करायचे! त्यानंतर गोलंदाजीत मॅकग्रांथ, वॉर्न! हे होते Stalwarts (महान खेळाडु). त्यांचा दर्जा, आत्मविश्वास एका वेगळ्या पातळीवरचा असायचा. ह्या संघात ह्या दर्जाचे खेळाडु आहेत ते वॉर्नर, स्मिथ आणि स्टार्क! हॅझेलवूड आणि कमिन्सची वाटचाल त्या दिशेनं चालु आहे! ह्यातील वॉर्नर पहिले दोन सामने अनुपलब्ध होता. स्मिथ कधी नव्हे तो धावांसाठी झगडतोय. आणि स्टार्कच्या तंदुरुस्तीवर बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह असते! मला आपल्या संघाच्या कामगिरीतील श्रेय अजिबात कमी करायचं नाही, पण तिसऱ्या कसोटीत एकटा फिट असलेला वॉर्नर जरी परतला तरी चित्र पुर्णपणे वेगळं असणार ! आणि हो! म्हणायला गेलं तर मुंबई इंडियन्सचा कप्तान कदाचित भारतातर्फे खेळायला उपलब्ध होऊ शकतो! 

जाता जाता विराट आणि पृथ्वीविषयी दोन शब्द ! विराटला अजुनही बहुदा विलगीकरणात ठेवलं असल्यानं सकाळी पाच वाजता उठुन त्यानं चारही दिवस खेळ पाहिला असणार त्याविषयी शंका नाही! आता सामन्याचा बक्षीससमारंभ आटोपल्यावर अजिंक्य फ्रेश होऊन रूममध्ये बसल्यावर विराटनं नक्कीच त्याला फोन लावला असणार! त्या दोघांतील संवाद प्रत्येकानं आपापल्या कल्पनाशक्तीनुसार रचून कागदावर लिहावा, वाटल्यास सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा ! पृथ्वी शॉ - दुखापतीनंतर परतल्यावर ह्या गुणी खेळाडूच्या बाजुनं म्हणावं असं काही घडत नाहीये! मध्येच वाचनात आलेल्या लेखात म्हटल्यानुसार ज्येष्ठ खेळाडूंचा सल्ला घेऊन आपल्या तंत्रातील उणिवा दुर करणे हाच एकमेव मार्ग आहे! 

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे! मालिकेतील पुढील दोन सामन्यांत काय घडणार ते देव जाणे ! पण आजचा क्षण मात्र अजिंक्य आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विजिगीषु वृत्तीचा ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...