मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३ जानेवारी, २०२१

Have you been to Tristan da Cunha?

 


जगातील सर्वात दुर्गम किंवा बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन दुर असलेली अशी मानवी वसाहत कोणती असावी असा शोध माहितीजालावर ह्या आठवड्यात घेतला. असा शोध घेण्याचा विचार माझ्या मनात का यावा असा प्रश्न निरर्थक आहे. असा शोध घेतला असता Tristan da Cunha हे नाव पहिल्या पाच नावांत येतं. बाकीच्या वसाहतींपेक्षा ही वसाहत खास लक्षवेधक ठरली ती बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन तिच्या असलेल्या दूरवर अंतरामुळं ! दक्षिण अटलांटिक महासागरात असलेलं हा ज्वालामुखीने निर्मित बेटांचा समुह आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन  शहरापासुन साधारणतः २३०० किमी अंतरावर, सेंट हेलेनपासून २१०० किमी अंतरावर आणि फॉकलँड बेटांपासून ३४०० किमी अंतरावर असणारा हे बेटांचा समुह ! आता फॉकलँड बेटं अर्जेंटिना आणि इंग्लंड ह्यांच्यात कधीकाळी झालेल्या युद्धामुळे माहिती आहेत, पण सेंट हेलेनचा संदर्भ कशासाठी तर ज्ञात मनुष्यवस्तीच्या कोणत्याही बिंदुपासुन हा बेटांचा समुह दूर आहे आणि तिथं गुण्यागोवींदाने मनुष्यवस्ती नांदत आहे ह्या साठी ! ह्या बेटांवर उतरण्यासाठी धावपट्टी अस्तित्वात नाही. त्यामुळं बाकीच्या पृथ्वीवासीयांशी संपर्क साधायचा असेल तर दक्षिण आफ्रिकेपासून सहा दिवसांच्या बोटीच्या प्रवासाव्यतिरिक्त पर्याय नाही. आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे वर्षातुन केवळ नऊ वेळा ह्या बोटीच्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध असतो. ह्या बेटांचा शोध कसा लागला आणि विविध शतकांमध्ये ह्या बेटाला धाडशी खलाशांनी कशी भेट दिली ह्याची मनोरंजक माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहेच पण ह्या बेटांच्या वेबसाईटवर तुम्हांला इथल्या रहिवाशांविषयी, ह्या बेटांच्या समुहातील प्रत्येक बेटाविषयी, इथं कसं यायचं ह्या सर्वांची इत्यंभुत माहिती मिळु शकते. सध्याची लोकसंख्या २४४ आहे आणि बेटांवर नवीन रहिवाशांना कायम वास्तव्याचा पर्याय उपलब्ध नाही. एक पर्यटक म्हणुन तुमचं स्वागत नक्कीच आहे. पण ज्या बोटीनं आलात त्या बोटीनेच बहुदा परतावं लागतं. 

पोस्टचा खरा विषय वेगळाच आहे! अशा बेटांवर जगण्याचा अनुभव कसा असावा? जगाची सध्याची लोकसंख्या जवळपास ७८० कोटी. त्यातील फक्त २४४ लोकांपैकी आपण एक ही भावना कशी असावी? बाकीच्या ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपासुन आपण दुरावले गेलो आहोत. जगाची प्रगती किती वेगानं होतं आहे आणि आपण मात्र असेच ! आपली मुलंसुद्धा प्रगतीपासुन वंचित राहणार! मनोरंजनाची मोजकी साधने, एकमेव पब वगैरे वगैरे ! आता हा दृष्टिकोन (Point of View) खरोखरी तिथल्या लोकांचा की त्यांच्यापासुन हजारो मैलांवर जगातील सर्वांत गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या शहरात आपलं बहुतांशी आयुष्य व्यतित करणाऱ्या आदित्यचा ? बहुदा केवळ आदित्यचा !

यु ट्युबवर ह्या बेटावरील एका तरुणाची मुलाखत पाहिली. ही बेटं इंग्लंडशी संलग्न! त्यामुळं बहुदा शिक्षणासाठी वगैरे ह्यातील काही तरुण मंडळी इंग्लंडला वगैरे जात असावी ! पण ह्या तरुणाला इंग्लंडमधील नियमांनी बांधलेलं जीवन आवडलं नव्हतं ! माझं स्वातंत्र्य मी तिथल्या वास्तव्यात गमावुन बसलो असा काहीसा त्याच्या बोलण्याचा सूर वाटला ! त्यानंतर  Tristan da Cunha  संबंधित काही व्हिडीओवरील टिपण्णी वाचल्या. भौतिकसुखाच्या मागे लागलेल्या त्या बहुतांशी ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपेक्षा ह्या शांत जीवन जगणाऱ्या २४४ लोकांपैकी एक बनायला मला आवडलं असतं असे बरेच लोक म्हणताहेत ! पण आता दोन आठवड्याच्या सुट्टीनंतर ज्या स्थितीत मी आहे त्यावरुन मला तरी Tristan da Cunha चे वास्तव्य जमलं नसतं असं वाटतंय. Tristan da Cunha जमायला तुम्ही बहुदा तिथंच जन्म घ्यायला हवा ! पुढील जन्म Tristan da Cunha वर होवो हे मागणं परमेश्वराकडे मागावं की नाही ह्याचा आज विचार करतोय !

मुलभूत गरजा पुर्ण झाल्यानंतर काही न करता जर माणसाला स्वस्थ बसता आलं तर मनुष्य बराच सुखी होऊ शकतो असं कधीतरी वाचलं होतं. हा काही न करता स्वस्थ बसु शकण्याचा  प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असु शकतो. काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्षे आणि कदाचित पुर्ण आयुष्यभर ! ह्यात आपण काय कमावतो आणि काय गमावतो ? शेवटी हिशोब शुन्यच असतो ! 

प्रेम धवन ह्यांचं १९७० च्या पवित्र पापी चित्रपटातील गाणे ह्या निमित्तानं आठवलं. "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं बहुत दुर बहुत दूर चला !" त्यांना जर Tristan da Cunha माहिती असतं तर कदाचित त्यांनी "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं Tristan da Cunha चला !" अशी शब्दरचना केली असती ! आणि खट्याळ किशोरकुमार ह्यांनी तिला नक्कीच उचित न्याय दिला असता !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...