मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २१ जुलै, २०२६

समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना - भाग १






समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना पाळायची मार्गदर्शक तत्त्वं !

मी समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना बहुतांशी ब्लॉगपोस्टचा वापर करत असल्यानं ह्या लेखातील बहुतेक मुद्यांचा रोख ब्लॉगपोस्टशी (तो ही मराठीतील) संबंधित आहे. 

१.  तुम्ही व्यक्त होण्याची सुरुवात केल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर तुमची एक स्वतःची ओळख (ब्रँड) तयार होतो. विविध निकषांवर तुमच्या लिखाणाला, व्यक्त होण्याला जोखलं जाऊन तुमचा एक स्वतःचा वाचकवर्ग तयार होतो. त्यात जाणकार वाचकवर्ग, चांगलं वाटून घेण्यासाठी येणारा वाचकवर्ग आणि अनेक इतर वाचकवर्गांचा समावेश होतो. सांख्यिकीशास्त्राच्या दृष्टीकोनातुन पाहिलं असता जाणकार वाचकवर्ग, चांगलं वाटून घेण्यासाठी येणारा वाचकवर्ग ह्यांचं प्रमाण बाकी वर्गाच्या दृष्टीनं कमी असतं. तुम्ही लिहिता / व्यक्त होता कोणासाठी ह्याची जाणीव तुम्हांला असणं आवश्यक असते. 

२. मराठीत एखाद्या वाक्यात विशिष्ट अर्थासाठी कोणता शब्द वापरावा ह्यासाठी तुमच्याकडं विविध पर्याय असतात. ह्यात तुम्ही नेमका कोणता शब्द वापरता, तो त्या वाक्यात / पोस्टमध्ये चपखल बसतो की नाही ह्या मुद्यावर जाणकार वाचकवर्ग तुम्हांला प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या जोखत असतो. त्या शब्दाच्या निवडीवर तुमचं भाषाज्ञान, तुमचा विषयाचा आवाका दिसुन येतो. हा शब्द त्या वाक्यात नेमक्या ठिकाणी वापरला गेला आहे की नाही ह्यावर तुमची बुद्धिमत्ता काही प्रमाणात जोखली जाते. 

३. संपुर्ण लेखात तुम्ही एकूण किती मुद्दे (त्यांची पुनरावृत्ती न करता) मांडले आहेत, त्यांची क्रमवारी योग्य प्रमाणात लावली आहे का? ते एकमेकांशी विसंगत आहेत का ? विसंगत असल्यास तुम्हांला ते जाणवलं आहे का? जाणवल्यास ही विसंगती मान्य करून त्याविषयी तुम्ही काही बोलता आहात का ? हे मुद्दे तुमची विश्वासार्हता ठरवतात. 

४. तुम्ही जर अनेक वर्षे व्यक्त होत असाल तर तुमची विचारसरणी वर्षोनुवर्षे सुसंगत राहिली आहे का ? की तुम्ही तुमच्याच काही वर्षांपूर्वीच्या विचारांशी फारकत घेतली आहे का ह्याकडं सुद्धा जाणकारांचं लक्ष असतं. 

५. तुम्ही तुमच्या पोस्टमधील प्रत्येक शब्दाचं, वाक्याचं उत्तरदायित्व किती गांभीर्यानं घेता ह्यावर सुद्धा तुमचं परीक्षण होत असतं. ही गोष्ट गेल्या काही दिवसतीलच नव्हे, तर तुमच्या प्रत्येक पोस्टला लागु होत असते.  दहा वर्षांपूर्वी आपल्या मनात नेमके कोणते विचार आले होते, त्यांचं ह्या पोस्टमध्ये नक्की कसं परिवर्तन झालं हे तुम्हांला कितपत आठवतं हे महत्वाचं ठरतं. त्यावेळच्या आपल्या विचारसरणीत काही चूक झाली झाली असेल हे कालांतरानं आपल्याला जाणवलं तर ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आपल्याकडं हवा. 

६. मी शुद्धलेखनात प्रचंड मार खातो / मला शुद्धलेखनात सुधारणेस प्रचंड वाव आहे. माझे मराठीचे शब्दभांडार मर्यादित आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या लेखनशैलीविषयी मी बराचसा अनभिज्ञ आहे. त्यामुळं काही जाणकार वाचक माझ्या लिखाणापासून दुरावतात. पण त्याला इलाज नाही. स्वानंद हा माझं लिखाणाचा मुख्य हेतू आहे. 

(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...