मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

कोलाहलाच्या पलीकडं !


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र उघडताच वाचलं.  ८८ वगैरे ठीक आहे, त्यापुढील ०९ ह्या अपूर्णांक भागाचं आणि ते खात्रीलायकरित्या सांगू शकणाऱ्या अधिकाऱ्यांचं मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे.  सोमवार सकाळ असल्यानं गेल्या दोन दिवसांत अनाघ्रात होऊ पाहणारं मन अशा बातम्या वाचुन काही वेगळा विचार करू लागतं. तलावाच्या पाण्याची पातळी जशी अचुकपणे मोजता येते तशी आपल्या मनाच्या समाधानाची पातळी मोजता येऊ शकेल का ? हा आज मनात आलेला विचार !

प्रत्येक मनाच्या समाधानाच्या पातळीवर परिणाम घडवुन आणणारे विविध घटक असतात. ह्यातील काही आपल्याला जाणवतात तर काही जाणवत नाहीत. अगदी झोप व्यवस्थित लागली की नाही, प्रॉडक्शन इश्यु आला की नाही,  घरातील सोमवार सकाळचं वेळापत्रक अगदी मिनिटानुसार चाललंय की नाही ह्या तात्कालीन घटकांपासुन आरंभ होत ह्यांची व्याप्ती खूप दूरवर पोहचत राहते. सकाळी तीन वाजता जाग आली असतांना कार्यालयीन कामांबाबत आलेला एखादा धोरणात्मक विचार किती अचुकपणे सकाळी सात वाजता आपण आठवु शकतो असे आणि अनेक वेगवेगळे विचार आपल्या मनाच्या समाधान पातळीवर इष्ट वा अनिष्ट परिणाम करू शकतात. 

आपण बऱ्याच वेळा भोवतालच्या दैनंदिन जीवनाच्या कोलाहलात अडकलेलो अडतो. आपल्यासोबत आपलं बिचारं मनसुद्धा असंच काहीसं अडकलेलं असतं. शनिवार / रविवार संध्याकाळ ह्या बिचाऱ्या मनासाठी राखुन ठेवाव्यात असं मला सदैव वाटत राहतं. अगदी शांतपणे बसलं की सुरुवातीच्या अर्ध्या तासात मन त्या कोलाहलाच्या जंजाळातुन आपल्याला मुक्त करतं. त्यापुढं त्याला मिळतो तो अगदी मुक्त प्रदेश! जणु काही एखाद्या हिमालयाच्या शिखरावरुन उड्डाण करत निळ्याशार गगनांत मुक्त विहार करणारा राजबिंडा गरुड !   प्रत्येकाचं मन वेगळं तसं उड्डाण करण्याचं त्याचं गगन वेगळं, त्याला खुणावणारी क्षितिज वेगळं ! कोणी संगीताच्या, कोणी विज्ञानाच्या, कोणी साहित्याच्या, कोणी अध्यात्म्याच्या गगनांत विहार करू लागतं किंबहुना करू शकतं. प्रश्न असा आहे की आपण आपल्या मनाला ही संधी देतो का? मी इथं केवळ दोन तीन तासांची गोष्ट सांगतोय, पण जर  आपण वर्षोनुवर्षे गुहेत तपस्या करणाऱ्या मुनींचा किंवा पुर्ण आयुष्य संशोधनाला वाहून घेतलेल्या शास्त्रज्ञांचा विचार केला तर ते आपापल्या क्षेत्रांत किती खोलवर गेले असतील ह्याचा विचार करून थक्क व्हायला होतं. ह्या प्रवासाच्या शेवटी कुठंतरी तो सर्वशक्तिमान असतो. प्रत्येकजण आपला इथला प्रवास आटोपून त्याच्याकडं जाईल त्यावेळी नक्कीच त्याला प्रश्न विचारला जाईल की तुझ्या आयुष्यात मनुष्यजातीच्या ज्ञानात भर पडेल असं काही केलं का? ९९.९९९९९ टक्के लोकांचे उत्तर नकारार्थी असलं तरीही पुढचा प्रश्न विचारला जाईल की त्या दृष्टीनं मी प्रयत्न तरी केला पाहिजे असा विचार तरी मनात आला का? 

पुन्हा कधी जर चांगली फुरसत मिळाली तर हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून पहा !   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...