'२०२५ - आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा जरी चांगला लेख असला तरी छायाचित्रांनीच जास्त व्यापलेला होता अशी दिलखुलास प्रतिक्रिया मिळाली. तिचा स्वीकार करून २०२५ ने दिलेल्या काही शिकवणुकींची ही नोंद !
१. मनुष्य निसर्गाचा झपाट्यानं ऱ्हास करत आहे, हे न पटणारी आपल्यासारखी अनेक माणसं भोवताली भेटतात. परंतु भोवतालच्या परिस्थितीवर अशा माणसांच्या मतांचा काहीच प्रभाव पडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी २०१० साली ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी आपल्या लिखाणानं भोवतालच्या परिस्थितीत काही सकारात्मक बदल घडून येईल असा भोळा आशावाद बाळगुन होतो. हा आशावाद संपुन काही वर्षे झाली, पण ज्या मोजक्या लोकांना ही मतं वाचुन बरं वाटत राहतं त्यांच्यासाठी आणि माझ्या मानसिक समाधानासाठी माझं हे लिहिणं मी सुरु ठेवणार आहे.
२. कार्यालयात भोवताली असणारी बुद्धिमान तरूण मुलं ही मला भवितव्याविषयी असणारा माझा आशावाद कायम ठेवायला प्रचंड मदत करतात. ही केवळ बुद्धिमानच असतात असं नव्हे तर आपल्या पद्धतीनं संस्कृतीची जपणुक करण्याचा प्रयत्न ह्यातील काहीजण करत असतात. भोवताली सकारात्मकता आहे फक्त तिचा शोध घेता यायला हवा. संस्कृतीची जपणुक केवळ आपल्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीनंच केली जावी हा अट्टाहास चुकीचा!
३. माझ्या मनाविरुद्ध काही घडलं की त्यातील काही वेळा माझी प्रतिक्रिया अगदी टोकाची असते असं मला सांगण्यात आलं. ही प्रतिक्रिया पाहण्याचं भाग्य केवळ जवळच्या लोकांना लाभतं. आता माझं हे मुळ स्वरूपातील स्वभाववैशिष्टय. ह्याला बदलण्याचा प्रयत्न मी कोणत्या टोकापर्यंत करावा ह्याचा सखोल विचार मी करत आहे. माझे मी पण मी हिरावुन घ्यावं का? आपल्याला अप्रिय असणारी अशी घटना समोर घडणे ह्या क्षणापासुन आपली एक टोकाची प्रतिक्रिया बाहेर येणं ह्या क्षणापर्यंत आपल्या मेंदुत जे काही विचार येतात, त्यांचं विश्लेषण करून त्यावर आपण नियंत्रण मिळवु शकतो का असे ह्या अभ्यासाचं स्वरूप असु शकतं.
४. माझ्या लिखाणांत ऱ्हस्व-दीर्घाच्या असंख्य चुका असतात. ही बाब माझ्या ध्यानात गेले कित्येक वर्षे आणुन दिली जात आहे. मला शालेय जीवनात जे काही ऱ्हस्व-दीर्घाचे शिक्षण मिळालं ते ज्यात जतन करून ठेवलं होतं, त्या मेंदुच्या कप्प्यापर्यंत मी सध्या पोहोचु शकत नाही. भविष्यात मी व्यावसायिक जीवनापासुन निवृत्ती घेतल्यावर मेंदुला विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा ह्या कप्प्यापर्यँत मी कदाचित पोहोचु शकेन ह्याविषयी मी आशावादी आहे.
५. "आदित्य तु स्वतःचे इतकं कठोर परीक्षण करू नकोस" असं मला सांगण्यात आलं. आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची (नैतिक) जबाबदारी घेणं हे स्वभाववैशिष्टय काही प्रमाणात मी बहुदा दाखवलं असावं. ह्या स्वभाववैशिष्ट्याचा अभिमान वाटावा अशी छुपी भावना मी कदाचित बाळगुन असेन. पण ही अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट नाही, संघातील प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची योग्य शब्दांत जाणीव करून देता यायला हवी.
६. मध्यंतरी इतका व्यस्त कालावधी आला होता की कसोशीनं पुर्ण केलेला क्लिष्ट गोष्टींचा आनंद वाटुन घेण्याचीही उसंत नसे. केवळ पुर्ण न केलेल्या गोष्टींचं दडपण, झालेल्या छोट्यामोठ्या चुकांची खंत ह्याचा भावना प्रबळ होत असत. आघाडीची भुमिका बजावायची असेल तर नैराश्याला प्रयत्नपुर्वक दूर सारता येण्याची कला अवगत करायला हवी. तुम्ही जितके वरच्या पदावर जाता तितके तुम्ही एकटे बनता असं जरी म्हटलं तरी तुम्हांला घरी, कार्यालयात तुमची आधार परिसंस्था (सपोर्ट सिस्टिम) बनवता यायला हवी. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर दरवर्षी ह्या मुद्द्यावर तुम्हांला भरघोस गुंतवणुक करायलाच हवी.
७. भोवताली उथळपणा ओसंडुन वाहु लागला आहे. बरेचसे चित्रपट, रील्स, मालिका ह्यातुन सखोल असे काही हाती लागत नाही. पण त्यातुनही काही मोजके चित्रपट, नाटकं, पुस्तकं ह्यात खूप काही शिकायला मिळतं. अशा सखोलपणाचा आपल्याला प्रभावीपणे शोध घेता यायला हवा.
८. लोकांचं लक्ष वेधून घेत जीवन जगण्याची खुमखुमी दरवर्षी झपाट्यानं कमी करता यायला हवी. news on air ह्या अँपवरील रागम ह्या चोवीस तास सुरु असणाऱ्या वाहिनीने मला खूप मदत केली आहे. मेंदुला शांत ठेवण्यासाठी ह्या अँपवर सुरु असणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचा मला बराच उपयोग झाला. दीर्घकाळ तबला, सतार व इतर साधनांवर रियाज करणाऱ्या ह्या वादकांची तपस्या वाखाणण्याजोगीच ! त्यांची कलेविषयी श्रद्धा, वर्षोनुवर्षे त्यांनी घेतलेली मेहनत ही आपण घेऊ शकू का ? ह्या प्रश्नाचं उत्तर सदैव नकारात्मकच आलं.
९. आपण ज्यावेळी आपल्याला न आवडणाऱ्या परिस्थितीत सापडतो त्यावेळी आपल्यासमोर पुढील पर्याय असतात.
अ. मोठ्या धैर्यानं, तयारीनिशी परिस्थितीचा ताबा घेऊन उपस्थित सर्वांना आपल्या मर्जीनुसार वागण्यास भाग पाडावे.
ब. पर्याय अ मध्ये उल्लेखलेलं धैर्य किंवा आवश्यक तयारी जर आपणांजवळ नसेल तर मेहनत घेऊन ते अंगी बाणवून पर्याय अ स्वीकारावा.
क. पर्याय अ आणि ब स्वीकारायची आपली तयारी नसेल तर शांतपणे त्या परिस्थितीत कमीत कमी नुकसान होऊन देत तग धरावा. चांगली वा वाईट कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही त्यामुळं तग धरून राहणं हा सद्यःकाळात फार महत्वाचा गुणधर्म ठरत आहे. तग धरून राहताना संगीत मानापमान होत तर राहणारच ! त्याला पर्याय नाही !
१०. आपल्या सर्वांप्रमाणं माझ्या जीवनात सुद्धा AI ने खळबळ माजवली आहे. त्याच्या संगतीनं पुढचा प्रवास करताना सखोल ज्ञानाची कास धरून आपलं स्थान अबाधित ठेवणं हा सर्वात मोठा धडा मला २०२५ ने दिला. त्या अनुषंगानं ह्या पोस्टमध्ये घेतलेलं हे छायाचित्र ! आकर्षक छायाचित्र न देताही कितीजण खरोखर पोस्ट वाचण्यासाठी इथं येतात हे पाहण्याचा माझा हा प्रयत्न !
ह्या वर्षात अचानक हिरावुन घेतलेल्या प्रियजनांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत ही पोस्ट आवरती घेतो !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा