मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

जिव्हारी लागणारा पराभव ते मध्यान्हीच्या भोजनाची उचित वेळ !



हल्ली भारतीय संघांचे पराभव माझ्या जिव्हारी लागत नाही. मी असंवेदशील झालो की काय वगैरे गोष्टींवर चिंतन करायला मला सध्या वेळ नाही. सखोल अभ्यास करायला माझ्यासमोर बरेच कार्यालयीन विषय आहेत आणि ते मला पुरून उरताहेत ! असो जिव्हारी लागलेल्या पराभवांची यादी बनवायची झाली तर खालील पराभव डोळ्यासमोर येतात 

१. शारजाह अंतिम सामना १९८६

२. भारत पाकिस्तान बंगलोर कसोटी सामना १९८७

३. भारत इंग्लंड रिलायन्स कप उपांत्य सामना वानखेडे १९८७ 

४.भारत श्रीलंका वर्ल्ड कप उपांत्य सामना कलकत्ता १९९६ 

५. भारत पाकिस्तान चेन्नई कसोटी सामना १९९९

मग माझ्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण आला. १९९९ सालच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ खराब कामगिरी करत असताना सायंकाळी सीप्ज़ बस स्थानकाबाहेर मी मित्रासोबत बसची वाट पाहत असताना तावातावानं भारतीय संघांतील खेळाडूंवर टीकेचे आसूड ओढत होतो. मी क्षणभराची उसंत घेतली तेव्हा ती संधी साधून मित्र म्हणाला, "आदित्य, तुझ्या जीवनातील आनंदासाठी तू अशा बाह्य घटकांवर इतका अवलंबून असशील तर ह्याचा अर्थ असा की तू तुझ्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात म्हणावा तसा गुंतलेला नाहीस आणि त्यात काही खास कामगिरी करत नाहीस !" 

आपल्या जीवनातील अशा क्षणांचं महत्त्व समजायला आणि त्यातील संदेश अंगीवळणी पडायला कधी कधी वर्षे जातात. पण उशिरा का होईना त्यातील उपदेश आपण स्वीकारला तर आपलं भलं होतं. माझंही भलं झालं, म्हणजे माझा संताप होणं कमी होत गेलं. २००३ सालच्या वर्ल्ड कप मधील अंतिम फेरीतील पराभव, २००७ सालच्या वर्ल्ड कप मधील प्राथमिक  फेरीत गारद होणे, २०१५ / २०१९ सालच्या वर्ल्ड कप मधील उपांत्य फेरीतील पराभव मी फारसे मनाला लावून घेतले नाहीत. पण राव १९ नोव्हेंबर २०२३ ने मात्र जबरदस्त चटका लावला. असो बाकी सर्व पराभवाच्या मी जून १९९९ मधील मित्राचा संदेश आठवून कार्यालयीन कामाकडं वळतो किंवा घरात उगाचच मदत करायचा प्रयत्न करतो. 

असाच दुसरा संदेश माझ्या आईनं मला १९९८-९९ च्या सुमारास दिला होता. त्यावेळी मी सीप्ज़मधील ICH / Kaydees ह्या उपहारगृहात दुपारचे भोजन करायचो. वडिलांचा उल्लेख करून आई म्हणाली होती, "भाईंनी आयुष्यभर घरून जेवणाचा डब्बा नेला आहे! ह्या वयातही त्यांची तब्येत बघ !" हा संदेश सुद्धा अंमलात आणायला मला काही वर्षे गेली. पण तो स्वीकारला आणि खूप फरक पडला. पण पुन्हा आयुष्यात संदेह निर्माण झाला. कार्यालयात एक मित्र म्हणाला, "मला कामाचं खूप टेन्शन असलं की मी चमचमीत खातो, चिकन बिर्याणी मागवतो! ते माझं तणाव निवारक म्हणून काम करतं".  मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. शनिवार / रविवार संध्याकाळी तणाव निवारक म्हणून नाही तर मूड (मनःस्थिती) सुधारक म्हणून आम्ही नूडल्स, मुर्ग मुस्स्लम वगैरे पदार्थ मागवतो. म्हणजे दहा - बारा जेवणं पडवळ, दुधी, गलका, शिराळा ह्या भाज्यांची (आईच्या शिकवणीमुळं) आणि बाकीची दोन - तीन जेवणं नूडल्स, मुर्ग मुस्स्लम ह्यांची - मूड बूस्टरच्या नावाखाली ! 

आता कार्यालयाची वेळ काहीशी वेगळी. म्हणून मी सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेतो. ह्या वाक्यात विसंगती ओतप्रोत भरली आहे. पण आयुष्यातील प्राधान्यक्रम आपल्याला कळायला हवा ! गरमागरम वरणभात,पडवळ, दुधी, गलका, शिराळा वगैरे आपल्या पोटात जावं असं आपल्याला वाटत असेल आणि तरीही कार्यालयाची मध्यान्हीची वेळ पाळायची असेल तर सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेता यायला हवं. जेवायला बसताना पोटाला समजावं लागतं की आज वीक डे आहे आणि हे दुपारचं जेवण आपण घेत आहोत ! बाकी रात्री सुद्धा ऑफिसात चपाती भाजी असा हलका आहार घ्यावा !

आता ह्या लेखातील दोन मुद्द्यांना जोडणारा दुवा म्हणजे गुवाहाटी सामन्यातील भारतीय संघांचा दारुण पराभव आणि प्रसारमाध्यमांनी उगाचच निष्पाप गौतम गंभीरवर उठवलेली टीकेची झोड! मुख्य कारण मला उमगलं आहे. तसा मी सर्वज्ञ वगैरे नसलो तरी बऱ्याच गोष्टी मला कळतात. तर सांगायची गोष्ट अशी की संपुर्ण भारतात एकच प्रमाणवेळ पाळायच्या अट्टाहासापायी ईशान्य भारतातील लोकांना साडेचार - पाच वाजता सूर्योदय पाहावा लागतो. बिचारा भारतीय संघ! त्यांना सकाळी नऊ वाजता सामना खेळायला मैदानावर यावं लागलं. त्याहून अधिक गंभीर गोष्ट म्हणजे दोन तासांच्या खेळानंतर अकरा वाजता त्यांना भोजनऐवजी चहा देण्यात आला. भोजनासाठी त्यांना एक वाजून वीस मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. इथंच सगळा गोंधळ झाला! मी जर सकाळच्या साडेदहा वाजता दुपारचे भोजन घेऊ शकतो तर त्यांना अकरा वाजता दुपारचं जेवण द्यायला काय हरकत होती?  भले ते दुधी, पडवळ वगैरे भाजीचं का असेना!  असो माझे सल्ले लोकं ऐकत नाहीत, नुकसान त्यांचंच आहे! त्यांना समज कधी येईल देव जाणे ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बिबट्या माझा शेजारी

'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्...