लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी संध्याकाळची वेळ असल्यानं विमानतळ गजबजलेले होते. आता मात्र रात्रीची वेळ असल्यानं जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक अशा विमानतळावर आपण आहोत असं काही वाटत नव्हतं. पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीनं विचार करून हे विमानतळ युरोपातील इतर काही विमानतळाप्रमाणे रात्रीच्या वेळी पाच-सहा तास बंद ठेवले जाते. आपल्या देशाचा विचार केला असता आपली विमानतळे रात्रीच्या वेळी सर्वात जास्त गजबजलेली असतात. अर्थात युरोप अमेरिकेला जाण्यासाठी सोयीस्कर वेळ म्हणून हे होत असावे. इमिग्रेशनसाठी म्हणायला गेलं तर फारशी मोठी रांग नव्हती. अतुल पुढे आणि त्यामागे वीणा वर्ल्डचे प्रवासी असा एकंदरीत मामला होता. आमच्या सहलीमध्ये एकूण ४३ जण होते. त्यातील १३ जण आम्हाला लंडन इथल्या हॉटेलमध्ये सामील होणार होते. त्यामुळे इथं या रांगेत ३० लोक असावीत. इमिग्रेशनची रांग नियंत्रित करण्यासाठी अनेक अधिकारी होते. अतुलचा जसा क्रमांक आला तसं त्यानं त्या अधिकाऱ्यांना सांगितले की पुढील सर्व माणसे वीणा वर्ल्डतर्फे बारा दिवसाच्या युरोप सहलीसाठी आली आहेत. बहुदा मी या रांगेत वीणा वर्ल्डच्या ग्रुपचा सर्वात शेवटचा माणूस होतो. अतुलच्या सांगण्यामुळं तीन इमिग्रेशन अधिकारी आमच्या गटासाठी नेमण्यात आले. एकंदरीत आमचा इमिग्रेशनचा अनुभव सुरळीतपणे पार पडला. आम्हांला सोपस्कार म्हणून काही मैत्रीपूर्ण असे प्रश्न विचारण्यात आले. आमचा इमिग्रेशनचा सोपस्कार पार पडला. भारतीय ग्राहकांच्या क्रयशक्तीच्या प्रभावाचा आम्हांला ह्या भेटीत आलेला पहिला अनुभव !
त्यानंतर आमचा मोर्चा आमच्या बॅग ताब्यात घेण्याकडे वळला. सध्या हीथ्रो विमानतळावर काही नामवंतांच्या बॅग्स उशिरानं मिळाल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु आम्ही बहुदा सेलिब्रिटी नसल्याने आमच्या बॅगा व्यवस्थित आमच्या ताब्यात आल्या. समाजमाध्यमावर प्रसिद्ध होण्याची संधी बहुदा गमावली अशी खंत आता वाटत आहे. आमची वाटचाल आमच्या बसच्या दिशेने होऊ लागली. आमच्या बॅगा घेऊन बाहेर पडताना आम्ही कस्टम्स अधिकाऱ्यांसमोरून गेलो. बहुदा त्यांची ड्युटीची वेळ संपत असल्यामुळे किंवा आमच्या चेहऱ्याकडे पाहून ही लोक काय संशयास्पद वस्तू आणणार असा समज झाल्याने त्यांनी आम्हाला विनासायास जाऊ दिले.
बाहेर पडताच लगेचच थंड हवेच्या झोक्याने आमचे स्वागत केले. जून महिना म्हणजे तर खरं तर उन्हाळ्याचा महिना. परंतु इंग्लंड, फ्रान्समध्ये आम्हांला बऱ्यापैकी थंड हवामान आणि बोचरे वारे यांचा अनुभव करावा लागला. युरोपातील हवामान हे अत्यंत बेभरवशाचे असते. तिथे पाऊस पडल्यास तापमान अचानक १० अंश सेल्सिअसने सुद्धा खाली येऊ शकते हे अतुल आम्हाला वारंवार बजावत होता. पाऊस केव्हाही येऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासोबत छोटी छत्री, स्वेटर किंवा जॅकेट अशा वस्तू असणे केव्हाही उत्तम. आपण थंडीचा जर फारच बाऊ करत असाल तर कानटोपी, ग्लोज अशा वस्तूसुद्धा आपल्या सोबत ठेवाव्यात. कुटुंबातील इतर सदस्य किंवा सहप्रवासी यांना अशा वेशभूषेमध्ये फोटो काढायला सांगून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले तर चांगली प्रतिक्रिया मिळू शकते. अशावेळी आपल्या सोबत असलेला कोणी खट्याळ सहप्रवासी एखादी टिपण्णी टाकून सोशल मीडियावर आपली खिल्ली उडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही एक दोन दिवसांतच ह्या हवामानाला जुळवून घेता. त्यामुळं त्यानंतर जर वारा नसेल तर तुम्ही १५ डिग्री सेल्सिअस तापमान वगैरे सहजपणे सहन करू शकता.
सोहम आणि प्राजक्ता ह्यांना प्रथमदर्शी इंग्लंड आवडलं. काही वेळातच आमचं हॉटेल पार्क ग्रँड लंडन हीथ्रो आलं. हे लंडन विमानतळाच्या टर्मिनल पाचच्या क्षेत्रात आहे असं सांगण्यात आलं. विमानतळावरील एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी इतका वेळ लागला ह्यावरून ह्या विमानतळाच्या व्याप्तीची कल्पना यावी. वीणा वर्ल्डने पार्सलमध्ये जेवणं आणली होती. परंतु लंडनला उतरण्याआधी काही वेळेपूर्वीच जेवणं झाल्यानं आम्ही ह्या बॉक्समधील केवळ पाण्याच्या बाटल्या घेतल्या. प्रत्येक हॉटेलमध्ये बहुधा येणाऱ्या पाहुण्यांना गोंधळवून टाकण्यासाठी शॉवर, गरम / थंड पाणी ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आयोजन केलेलं असतं. त्यामुळं भारतीय सवयीनुसार केवळ हातपाय धुण्यासाठी कोमट पाणी शॉवरमधून हवंय ही गरज पूर्ण करण्याच्या हेतूनं न्हाणीघरात शिरलेले पाहुणे थंड पाण्याच्या सचैल फवाऱ्यानं अचंबित होऊन जोरदार आरोळी ठोकतात अशा घटना माझ्या ऐकिवात आहेत. परंतु त्यांनी ही कबुली खाजगीत दिल्यानं त्यांची नावं मी घोषित करू शकत नाही. दमलेले जीव बिछान्यावर पहुडल्यानंतर काही क्षणांतच निद्राधीन झाले. रात्री झोपण्याआधी अतुलने पुढील दिवसाचा कार्यक्रम व्हाट्सअँप ग्रुपवर घोषित केला. सकाळी सहा वाजता वेकअप कॉल, सात ते पावणेआठ नाश्ता आणि आठ वाजता लंडन दर्शनासाठी प्रस्थान असं दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचं संक्षिप्त स्वरूप होतं.
सकाळी पाचच्या सुमारास जाग आली. बाहेर लख्ख उजेड होता. तिघेही जण जागे झाल्यानं टीव्ही लावला. आज युरो २०२४ ला प्रारंभ होणार होता. ह्या स्पर्धेमुळं युरोपच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल की नाही ह्याविषयी बातम्यांत चर्चा सुरु होती. २००० साली ब्रायटनला असताना युरो स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध जर्मनी असा सामना झाला होता. त्यावेळी माझी चिंता करणारा सहकारी गाय बॅम्फोर्ड मला म्हणाला होता, "आदित्य, जर जर्मनी जिंकेल अशी चिन्हं दिसू लागली तर अजिबात हॉटेलबाहेर पडू नकोस". आता मी लंडनमध्ये येत आहे असा संदेश त्याला पाठवला होता. परंतु त्याच्या कार्यबाहुल्यामुळं त्याला लंडनमध्ये भेटायला येणं शक्य नव्हतं.
हॉटेलातील नाश्ता बहुरंगी होता. माहितीजालावरून ह्या हॉटेलातील नाश्त्याचे घेतलेलं छायाचित्र.
प्रत्यक्षातही असाच नाश्ता होता. २००० साली ब्रायटनच्या वास्तव्यात ऑफिसात बऱ्याच वेळा जो पर्याय दुपारच्या भोजनासाठी वापरला होता, त्या Jacket Potato with Baked Beans मधील Baked Beans इथं हजर होते. युरोपातील नाश्त्यामध्ये पावाचे विचिध प्रकार, ताजी फळं, फळांचे रस, Scrambled Eggs, कॉफी, चहा, मांसाहाराचे अतर्क्य प्रकार असे विविध पर्याय उपलब्ध असतात. ह्या नाश्त्याचा पुरेपूर आस्वाद घ्यावयाचा असेल तर तुमच्या अंगी खालील गुण असावेत.
१. कॉफी मशिनमधून योग्य पर्याय निवडून आत्मविश्वासानं कपात / ग्लासात कॉफी घेता येणं. पहिल्या प्रयत्नात गोंधळ उडून टेबलवर कॉफी सांडल्यास ही आपली चूक नव्हेच अशा आविर्भावाने दुसरा प्रयत्न करणं. २. आपल्याला हवा असलेला पाव, फळं घेताना आपल्या मागील माणसांना काही शिल्लक राहील का ह्याची चिंता न करणं. ३. बंदिस्त पुड्यांमधील बटर, चीज, जॅम व तत्सम प्रकार कोणत्या पावाला कोणत्या सुरीनं कशा पद्धतीनं लावावेत ह्याविषयी माहिती बाळगून असणे. किंवा ही माहिती नसल्यास मागच्या माणसांच्या चेहऱ्यांवरील मुद्रांकडे बिल्कुल दुर्लक्ष करीत अतिआत्मविश्वासानं आपल्याला हवं ते करणं. ४. सूरी, काट्याचा योग्य वापर करत सर्व पदार्थ तोंड किमान उघडून भक्षण करता येतील अशा प्रमाणात सुबक आकारात तोडणे.
असो, भरपेट नाश्त्यानंतर आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो. पोटाचा घेर दीड सेंमीने वाढला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज रात्री परत ह्याच हॉटेलात यायचं असल्यानं बॅग्स बसमध्ये आणण्याचे कष्ट घ्यायचे नव्हते. बसमध्ये आम्हांला आधीपासूनच (नोंदणीक्रमानुसार) आसने देण्यात आली होती. लंडनच्या लहरी हवामानाचा सामना करण्यासाठी आम्ही सोबत छत्री, जॅकेट वगैरे आयुधं आणि फोटो काढताना व्यक्तिमत्त्व खुलून दिसावं म्हणून काहींनी गॉगल वगैरे गोष्टी घेतल्या होत्या. उन्हापासून संरक्षण म्हणून गॉगल हे विधान मला पटण्याची शक्यता कमीच!
बसमधून शुक्रवार सकाळचे लंडन अगदी प्रसन्न वाटत होते. बसचा चालक डेव्हिड होता. आमची मार्गदर्शक क्लारा ही आम्हांला काही वेळानं शहरात भेटणार होती. लंडन शहरात Please, Excuse me, Sorry आणि Thank You ह्या शब्दांचा मुक्तहस्ते (किंवा मुक्तमुखे ) वापर करा असे अतुल म्हणाला. अर्थात ह्यातील कोणत्या शब्दाचा कोणत्या प्रसंगी वापर करायचा ह्याची जाण नसेल तर अनावस्था प्रसंग ओढवू शकतो. लंडन हे शहर रोमन लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी वसवले असे म्हणता येईल. लंडन शहराने आपल्या इतिहासामध्ये प्लेग, भीषण आग, नागरी युद्ध, हवाई हल्ले, दंगली, नजीकच्या भूतकाळात काही दहशतवादी हल्ले यांचा यशस्वीरित्या मुकाबला केला आहे. १६६६ साली लंडनमध्ये लागलेली, पाच दिवस सतत चाललेली आग पूर्ण लंडन शहराचा विध्वंस करून गेली. ही आग एका छोट्या बेकरीमध्ये मध्यरात्रीनंतर सुरू होऊन प्रचंड वेगाने संपूर्ण शहरभर पसरली. त्या वेळच्या महापौराची आणि अधिकारी लोकांची निर्णय घेण्यातील दिरंगाई ही आग पसरण्यास मुख्यतः कारणीभूत ठरली असे वाचनात आलं आहे. या आगीनंतर लंडन शहराची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सर क्रिस्तोफर Wren यांनी लंडन शहराच्या पुनर्बांधणीमध्ये मोलाचा वाटा उचलला.
ह्या बसप्रवासात पावलोपावली (बसमधून जात असल्यानं टायराटायरी) लंडन शहरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू सामोऱ्या येत होत्या. आधी अतुल मग क्लारा आम्हांला त्यांचं महत्व विशद करून सांगत होते. Cleopatra Needles - ही इजिप्तमधील ऐतिहासिक महत्त्व असलेली दोन शिल्पं १८७८ आणि १८८१ साली अनुक्रमे लंडन आणि न्यूयॉर्क इथं पुर्नस्थापित करण्यात आली. ह्या शिल्पाचे पूर्ण छायाचित्र माहितीमायाजालावरून आपणास मिळू शकेल.
बसमधून दिसलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लंडनमधील विविध वास्तू / स्मारकं ह्यांची छायाचित्रं बसमधून जशी दिसली तशी इथं सादर करण्यात आली आहेत! ह्यातील काही चित्रं वीणा वर्ल्ड सहप्रवासी आणि अतुल ह्यांच्या कॅमेरातून टिपली गेली आहेत. ह्यात Big Ben Miniature, Westminister Abbey Church of Royal Family, Dragon Statue entry point Westminster Abbey, Tower Bridge, London Bridge Railway Station (जगातील सर्वात जुनं रेल्वे स्थानक), Fire Monument, St. Paul Catheral London, Piccadilly Circus, BBC Radio Station, 10 Downing Street, Monument of Victoria, Hercules Statue, Chlesea Monument इत्यादींचा समावेश आहे. तिथं आपलं इंडिया हाऊस पाहून अभिमान वाटला. वर उल्लेखलेल्या प्रत्येक स्थळाला ऐतिहासिक महत्व आहे. अतुल, क्लारा अत्यंत वेगानं ह्या प्रत्येक स्थळाची माहिती आम्हांला देत होते. लंडनमध्ये वर उल्लेखलेल्या स्थळांप्रमाणे इतरही असंख्य ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू आहेत. लंडन शहरात जवळपास दोनशेच्या आसपास संग्रहालये आहेत. ब्रिटिश म्युझिअम हे सर्वात नावाजलेल्या संग्रहालयातील एक! जर आपण खरोखर इतिहासाचे चाहते असाल तर ह्या सर्व वास्तूंची सविस्तर माहिती करून घेण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी अनेक दिवस लागतील. आम्ही हे सारे अर्ध्या तासाच्या प्रवासात आटपलं! १० डाउनिंग स्ट्रीटवरून ज्यावेळी आम्ही बसमधून गेलो, त्यावेळी ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. आज ही पोस्ट लिहिताना त्यांनी हे पद गमावलं आहे. कालाय तस्मै नमः !
टॉवर ब्रिजवर घेतलेली छायाचित्रं ! अर्थात इथं बस थांबू शकत नाही. मुंबईत काळाच्या पडद्याआड गेलेल्या डबलडेकर लंडनमध्ये अजूनही रस्त्यावर जोमानं धावत आहेत हे पाहून माझ्यासारखे जुन्या गोष्टींचे अनेक पुरस्कर्ते आनंदी होतात.
इंग्लंडच्या संसदेची हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स ही दोन सभागृहे आहेत. आपल्या लोकसभा आणि राज्यसभेशी मिळतीजुळती अशी ही संरचना आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये काही उमरावांना तहहयात सदस्यत्व मिळतं असं क्लारा म्हणाली असं पुसटसं आठवत होतं. परंतु माहितीमायाजालावर त्याला दुजोरा देणारी माहिती सापडली नाही. क्लारा काहीशी मिश्किल स्वभावाची होती. ब्रिटिश राजघराण्याच्या गडगंज संपत्तीविषयी ती अधूनमधून संदर्भ देत होती. त्यांची बँक कोणती, ते कोणत्या दुकानातून किराणामाल खरेदी करतात हे सांगताना ह्या आस्थापनाचं सदस्य बनण्यासाठी सदस्य फी किती महागडी आहे हे ती हळूच सांगत असे. राजघराणे वर्षातून एकदा काही नागरिकांसाठी पार्टीचे आयोजन करते. क्लाराच्या नवऱ्याला एकदा अशा पार्टीचे निमंत्रण मिळालं. पण तो क्लाराला सोबत घेऊन न जाता त्याच्या व्यावसायिक सहकाऱ्याला घेऊन गेला. परत आल्यावर त्या पार्टीत फारसा काही पाहुणचार झाला नाही, डम्पलिंग वगैरेच मिळाले हे त्यानं सांगितल्यावर बरी अद्दल घडली असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.
आता आमचं आगमन ट्रॅफल्गार चौकात झालं. ह्या चौकाच्या जवळ बस पार्किंगसाठी केवळ दोन जागा असतात. त्यातील एक आम्हांला मिळाली म्हणून क्लारा अत्यानंदित झाली. ट्रॅफल्गार स्क्वेअर हा सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर सेंट्रल लंडन इथे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी उभारला गेलेला सुप्रसिद्ध चौक आहे. नेपोलियनिक युद्धांमधील (Napoleonic Wars) ब्रिटिश नौदलाने फ्रान्स आणि स्पेन यांच्या सेनेवर ट्रॅफल्गार युद्धात २१ ऑक्टोबर १८०५ साली मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ या चौकास हे नाव देण्यात आले आहे. या भागास पूर्वी रिंग क्रॉस या नावाने सुद्धा संबोधले जात होते. हा चौक अत्यंत प्रशस्त असल्यामुळे विविध जाहीर सभा, राजकीय प्रदर्शने यासाठी वापरण्यात येतो. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि आतिषबाजीसाठी करण्यात येणाऱ्या समारंभाचे हे मुख्य केंद्र आहे. इथं आल्यावर आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या असे अतुलने आम्हांला बजावले. छायाचित्रं काढण्याच्या नादात आपल्या मौल्यवान ऐवज असलेल्या बॅग्स लांब ठेवू नका असे त्याचे म्हणणे होते. सकाळी लवकर आल्यामुळे हा चौक बऱ्यापैकी रिकामी होता.
त्यामुळे आम्हांला छायाचित्रणासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली. आम्ही सुदैवी होतो असे क्लाराचे म्हणणे होते. आदल्या दिवशी इथं खूप पाऊस पडला होता, दुसऱ्या दिवशी देखील पाऊस पडेल असे वेधशाळेचे भाकीत होते. इथले छायाचित्रण सत्र आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये स्थानापन्न झालो.
थेम्स नदीवर असंख्य पूल आहेत. प्रत्येक पुलाची काही वैशिष्टयं आहेत. जसे की वॉटर्लू पुलाच्या बांधकामात बहुतांशी स्त्रियांचा पुढाकार होता. पुरुष दुसऱ्या महायुद्धात गुंतल्यानं त्यांनी हम किसीसे कम नहीं हे दाखवून दिलं. बस टॉवर ब्रिजच्या दिशेने निघाली होती. टॉवर ब्रिज हा थेम्स नदीवरील पुलांमध्ये प्रामुख्याने गणला जाणारा असा पूल आहे. टॉवर ब्रिजला जवळून पाहण्यासाठी, त्याचा सखोल इतिहास जाणून घेण्यासाठी टॉवर ब्रिजची टूर घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. अर्थातच ह्यासाठी आमच्याकडे वेळ नव्हता. २००० साली मी ही टूर घेतली होती. त्यावेळी तेथील मार्गदर्शकाने बरीच काही माहिती दिली होती. अर्थात ती आठवण्याची आता काही शक्यता नाही. पुलाच्या खालून जाणाऱ्या मोठ्या जहाजांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून हा पूल मधोमध उघडला जातो. अर्थात अशा जहाजांची संख्या व वर्दळ हल्ली कमी झाल्यानं पुलाची उघडझाप कमी प्रमाणात होते. माहितीमायाजालावर याविषयी अनेक पोस्ट आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आम्ही काही अंतरावरील एका जागेवरून टॉवर ब्रिजला कॅमेरामध्ये चित्रित केले. टॉवर ब्रिज हे केवळ निमित्त असावे असं वाटावं इतकी आम्ही स्वतःची छायाचित्रे घेतली.
आम्ही क्लारा हिला एका छायाचित्रात आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तिनं आनंदाने ती मान्य केली. हे छायाचित्रण सत्र संपवून बसच्या दिशेने वाटचाल करत असताना फुलांची बाग दिसली. अर्थात इथे छायाचित्रण करणे अत्यावश्यक होते. आम्ही लवकर बसमध्ये परतावे म्हणून अतुलने थोडीशी घाई केली. यापुढील पॉईंट होता तो म्हणजे बॅकिंगहॅम पॅलेस अर्थात इंग्लंडच्या राजघराण्याचा लंडनमधील राजवाडा! ज्यावेळी राजाचे ह्या महालात वास्तव्य असतं त्यावेळी इंग्लंडच्या साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतिक असणारा "रॉयल फ्लॅग" ध्वज राजवाड्यावर फडकत असतो. अन्य वेळी "युनिअन जॅक" ला हा मान मिळतो.
"चेंजिंग द गार्ड" किंवा "गार्ड माउंटिंग" (जी एक अधिकृत संज्ञा आहे) हा समारंभ बॅकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पावणे अकरा वाजता सुरू होतो. साधारणतः ४५ मिनिटं अवधी असलेल्या या समारंभात राजवाड्याच्या पहाऱ्यावर असलेले जुने पहारेकरी नवीन पहारेकऱ्यांच्या हाती सूत्रं हवाली करतात. सुदैवाने आम्ही वेळेतच तिथं पोहोचलो असल्याने आम्ही तेथील रस्त्यावर मोक्याच्या जागा पटकावल्या. ही जागा राजवाड्यापासून थोडी लांब होती. अकरा वाजताच्या सुमारास राजवाड्याच्या आसपास बिगुल आणि ढोल यांचे आवाज येऊ लागले. बहुदा जुन्या पहारेकर्यांनी सूत्रं नवीन पहारेकरांच्या हाती दिली असावीत. घोड्यावर स्वार असलेल्या पहारेकऱ्यांची एक मोठी तुकडी आता आमच्या दिशेने येऊ लागली होती. लाल रंगाचा वेष आणि काळी टोपी परिधान केलेल्या, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या सैनिकांची घोड्यावर स्वार झालेली तुकडी अगदी जवळून पाहणं हा नक्कीच एक अविस्मरणीय असा अनुभव होता.
राजवाड्याच्या भोवताली असलेल्या हिरवळीवर अनेक लोकांची गर्दी जमली होती. इथं छायाचित्रण करण्यात वेळ घालवू नका असे अतुलने आम्हाला सुचविले. आमचा मोर्चा आता दुपारच्या भोजनासाठी वळला. लंडन शहरातील मुमताज हॉटेलमध्ये आम्ही दुपारच्या भोजनासाठी पोहोचलो. या हॉटेलमध्ये गेले कित्येक वर्ष मी येत आहे असे अतुल म्हणाला. युरोपातील मुख्य शहरांमध्ये वीणा वर्ल्ड, केसरीचे प्रवासी ग्रुप काही ठराविक उपहारगृहांमध्येच दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी जात असतात. त्यामुळे प्रत्येक ग्रुपसाठी साधारणतः ४५ मिनिटांचा अवधी दिला गेलेला असतो. या अवधीमध्ये सर्वांनी लवकर जेवण आटपणे अपेक्षित असते. आमच्या ग्रुपच्या वक्तशीरपणामुळे किंवा अतुलच्या ज्येष्ठतेमुळं बहुतेक ठिकाणी आम्ही सर्वप्रथम पोहोचत असू. प्रवासातील उपहारगृहात जाताना वॉशरूमचा ब्रेक हा सुद्धा एक हेतू असायचा. काहीशी खेदाची गोष्ट म्हणजे ही वॉशरूम पूर्णपणे स्वच्छ नसायची. ही वॉशरूम तळघरात असायची. इतक्या मोठ्या संख्येने थोड्या अवधीमध्ये प्रवासी आल्यावर त्यांच्या स्वच्छतेचा काहीसा प्रश्न उद्भवणार हे ओघाने आलेच. इतका वेळ प्रवास केल्यानंतर सर्वजण अर्थातच भुकेलेले होते. जेवण हे रुचकर असे होते तरीही त्यात का कोणास ठाऊक पण यांत्रिकी पद्धतीनं जेवण बनविल्याचा फील येत होता. युरोपातील भारतीय उपहारगृहातील आमची जेवणं एका विशिष्ट पॅटर्न मध्ये असायची. सुरुवातीला नान, सॅलड, शाकाहारी दोन-तीन पर्याय, वरण, भात असे ओळीने मांडून ठेवलेले पदार्थ असायचे. मांसाहारी लोकांसाठी एक पर्याय म्हणून बहुदा चिकन एका कोपऱ्यात उपलब्ध असायचे. ज्या उपाहारगृहात वीणा वर्ल्डचेच पाहुणे असायचे, तिथं मांसाहारी पर्याय एका कोपऱ्यात ठेवून देण्यासाठी आग्रह केला जायचा. परंतु ज्या उपाहारगृहांमध्ये त्यांची स्वतःची व्यवस्था असायची तिथं मात्र मांसाहारी पदार्थ शाकाहारी पदार्थांच्या सोबत ठेवले असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. भरपेट जेवण घेऊन पुन्हा एकदा बसमध्ये बसायला जीवावर आले होते. पोटाचा घेर अजून दोन सेंमीने वाढला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. .सुदैवाने थोड्या वेळातच मॅडम टुसॉ या मेणांच्या पुतळ्याच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन आम्ही थडकलो. आमच्या ग्रुप बुकिंगसाठी एक विशिष्ट वेळ देण्यात आल्यामुळे आम्हाला काही वेळ थांबणे भाग पडले. हवामान अत्यंत थंड होते. बोचरे वारे वाहत होते. तिथं स्मृतिचिन्ह विकणारी अनेक दुकाने होती. सहप्रवाशांनी ह्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. थोड्याच वेळात आम्ही संग्रहालयात प्रवेश केला. मॅडम टुसॉ यांचा जन्म १७६१ साली फ्रान्समध्ये झाला. तिची आई स्वित्झर्लंडमधील एका फिलिप कर्टिस नामक कारागिराकडे काम करीत असे. त्यांनी मॅडमना मेणापासून पुतळे बनवण्याचे प्राथमिक शिक्षण दिले . सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या कलेचा मॅडम टुसॉ यांनी पुढं मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. त्यांना लंडनमध्ये बोलावण्यात आले. नेपोलियनिक युद्धाचे निमित्त होऊन त्यांना लंडनमध्येच राहावे लागले. त्यांनी १८३१ सालापासून छोट्या छोट्या कालावधीच्या भाडेतत्त्वावर बेकर्स स्टेट बाजार इथं वरच्या मजल्यावर आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली. कालांतराने याच वास्तूचे मॅडम टुसॉ संग्रहालयात रूपांतर झाले. २००० सालच्या लंडन भेटीत सुद्धा या संग्रहालयात मी गेलो होतो. इथं विविध राजकारणी, क्रीडापटू, सिनेसृष्टीतील कलाकार, विविध लेखक, शास्त्रज्ञ यांचे अगदी हुबेहूब वाटतील असे पुतळे आहेत.
आपण भारतीय सदैव आपल्याच मान्यवरांच्या पुतळ्यांच्या शोधात असतो. यावेळी आम्हांला नव्याने एक गोष्ट कळली. जगभरात, युरोपात आता बऱ्याच ठिकाणी मॅडम टुसॉ संग्रहालये झाली आहेत. मान्यवरांचे पुतळे या विविध संग्रहालयात छोट्या छोट्या कालावधीनंतर स्थलांतरित करण्यात येतात. आमच्या गटातील लोकांना पंतप्रधान मोदी, माधुरी दीक्षित इत्यादींचे पुतळे पहायचे होते. परंतु सध्या तरी लंडन येथील या संग्रहालयात हे पुतळे पाहायला मिळत नाहीत. आमच्या कुटुंबासाठी मात्र अशी काही विशिष्ट आवड नव्हती. त्यामुळे जशी हॉलीवुड कलाकार, फुटबॉल खेळाडू, आपला सचिन, बीटल्स ही जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व दिसली त्यांच्यासोबत आम्ही आमची छायाचित्रे काढून घेतली.
अशा प्रसंगी अँजेलिना जोली, टेलर स्विफ्टच्या पुतळ्यांसोबत फोटो काढून घेण्याचा आग्रह धरणे प्रशस्त होणार नाही हे मी स्वतःला निक्षून बजावले. शेकस्पियर, आपला सचिन ह्यांच्यासोबत वार्तालाप करून आम्ही पुढे निघालो.
शाहरुख खानच्या पुतळ्याने मात्र घोर निराशा केली. प्राजक्ताच्या भाषेत बोलायचे झाले तर तो कोणत्याही अँगलने शाहरुख खान वाटत नव्हता. या संग्रहालयात अनेक चेंबर्स असतात. काही गरज नसताना तिथे चेंबर ऑफ हॉरर वगैरे प्रकार ठेवले आहेत. अजून एक घाबरवणारा प्रकार म्हणजे तुम्ही पुढे जसे सरकत जाता तसे चेंबर ऑफ हॉरर वगैरे विभागातून तुम्हाला जावं लागतं. तिथून पळवाट काढण्यासाठी जो मार्ग असतो तो केवळ जाणकारच सहजपणे शोधू शकतो. महत्प्रयासाने शोधलेली पळवाट आम्हाला दुसऱ्या एका राईडकडे घेऊन गेली. त्या राईडमध्ये आम्ही दोघेजण बसलो. टॅक्सी राईड हा लंडन शहराच्या इतिहासात प्रवास घडवून आणणारा एक उत्तम असा अनुभव आहे लंडन शहराची ओळख असलेल्या काळ्या टॅक्सीमध्ये आपल्याला दोघा-दोघांच्या गटानं बसवले जाते. ज्यांनी लंडन शहराला घडविले अशा लंडन शहराच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे साक्षीदार होण्याची संधी ही राईड आपल्याला देते. प्लेगने ग्रासलेले लंडन शहर, भीषण आगीने नष्ट झालेले लंडन शहर, सर ख्रिस्तोफर यांच्या मेहनतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उभारले गेलेले शहर, दुसऱ्या महायुद्धात पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीला कडवी लढत देणाऱ्या इंग्लंडची राजधानी असलेले लंडन शहर असा सर्व इतिहास आपल्याला या थोड्या अवधीमध्ये पाहायला मिळतो. ही एक रंजक राईड आटपून आम्ही संग्रहालयाच्या बाहेर पडलो. का कोणास ठाऊक पण मॅडम टुसॉ संग्रहालय पाहताना म्हणावा तितका आनंद झाला नाही. सिंगापूरमध्ये सुद्धा असेच संग्रहालय पाहिले होते. हल्ली भारतात सुद्धा अशी संग्रहालय उभी राहू लागली आहेत.
संग्रहालयाच्या बाहेर असलेल्या स्टॉलवर आमच्यासाठी गरमागरम मसाला चहाची व्यवस्था करण्यात आली होती. इतक्या थंड हवेमध्ये गरमागरम मसाला चहा मिळणं हा एक अत्यंत सुखद अनुभव होता. ह्यापुढील मसाला चहा हा पंचवीस तारखेला आपापल्या घरी हे हसतहसत सांगायला अतुल विसरला नाही.
यानंतर आमची पावलं किंवा बसचे टायर हे लंडन आयच्या दिशेने निघाले. इंग्लंडची राष्ट्रीय विमान कंपनी ब्रिटिश एअरवेजने लंडन आयच्या उभारणीसाठी प्रामुख्याने अर्थपुरवठा केला. थेम्स नदीवर १९९९ साली उभारण्यात आलेल्या या प्रचंड मोठ्या जायंट व्हीलचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ३१ डिसेंबर १९९९ रोजी केलं खरं परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे याचे सामान्य जनतेसाठी उद्घाटन मार्च २००० मध्ये झाले. आम्ही ज्यावेळी २००० च्या जून महिन्यात लंडनच्या भेटीसाठी गेलो होतो त्यावेळी लंडन आयची तिकिटं मिळाली नव्हती. त्यामुळे त्यावेळी मला यात बसता आले नव्हते. लंडन आयमध्ये एकंदरीत बंदिस्त आणि वातानुकूलित ३२ कॅप्सुल्स (कुपिका) आहेत. या कुपिकांना एक ते ३३ असे क्रमांक देण्यात आले आहे. कोणता क्रमांक वापरण्यात आला नाही याचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी कोणतेही बक्षीस देण्यात येणार नाही!! एका कॅप्सूल मध्ये अंदाजे २५ लोक सामावले जातात. एक पूर्ण फेरी साधारणतः ३५ मिनिटांत पूर्ण होते. प्रवाशांच्या चढउतारासाठी हे व्हील पूर्णपणे थांबवले जात नाही. ह्या व्हीलचा वेग प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी शक्य होईल इतका माफक असतो. वरती गेल्यानंतर लंडन शहराचे अत्यंत विहंगम असे दृश्य दिसलं. सोबत भ्रमणध्वनी असल्यामुळे ही सर्व दृश्यं डोळ्यात सामावून घेण्यापेक्षा भ्रमणध्वनीद्वारे त्यांची छायाचित्र घेण्याकडेच सर्वांचे लक्ष होते. आमच्या कॅप्सूलमध्ये आम्ही सर्व बहुदा वीणा वर्ल्डचेच सहप्रवासी होतो. आमचे काही सहप्रवासी बाजूच्या कॅप्सूलमध्ये होते. त्यामुळे आम्ही एकमेकांचे फोटोसुद्धा काढले. आमच्यातील काही सहप्रवासी चौकस बुद्धीचे होते. ही चौकस बुद्धी त्यांनी वयाच्या ६५ वर्षानंतर सुद्धा शाबूत ठेवली होती. त्यामुळे विमानतळ कोणत्या दिशेला असेल, या इमारतीला छप्पर कोणत्या पद्धतीचे असेल अशा पद्धतीच्या शंका त्यांनी मला विचारल्या. मी मला जमतील त्या पद्धतीने त्यांच्या उत्साहावर विरजण पडेल याची योग्य ती काळजी घेत त्यांना उत्तरे दिली. माझ्या चेहऱ्याकडे बघत हा माणूस दिसतो तितका साधासुधा नाही असे भाव देत त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दुसऱ्या लोकांकडे मोर्चा वळविला. साधारणतः सहा वाजता आम्ही या व्हीलमधून खाली उतरलो.
आता परत आमचा प्रवास हॉटेलकडे सुरू झाला होता. शुक्रवार संध्याकाळच्या लंडनच्या वाहतूक कोंडीचा थोडाफार अनुभव आम्हांला मिळाला. वाटेत येणाऱ्या विविध इमारतींची माहिती देणे अतुलने सुरू ठेवलं होतं. चेल्सी क्लब हा केवळ फुटबॉलच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध नसून विविध सामाजिक उपक्रमासाठीसुद्धा ते कार्यरत असतात. त्यांच्या सामाजिक उपक्रमासाठी उभारल्या गेलेल्या काही संकुलांची माहिती अतुलने दिली. मुख्य शहर थोडसं मागे सरलं तसं रस्त्यावर झाडांचे प्रमाण काहीसं वाढलं. झाडांवर फुलं फळ दिसू लागली. बसमधून छायाचित्रण करण्याचा एक तोटा म्हणजे बसच्या काचेमध्ये पडणारं आपलं आणि सहप्रवाशांचं प्रतिबिंबसुद्धा छायाचित्रांमध्ये येतं. तरीही आमचा उत्साह कमी झाला नाही. सात वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. रात्रीचे जेवण हे साडेसात वाजता सुरू होणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पॅरिसच्या दिशेने वाटचाल सुरू करणार होतो. युरो स्टार ही अत्यंत वेगाने धावणारी आगगाडी आम्ही पकडणार होतो. ते स्टेशन एक तासाच्या प्रवासावर होते. दुसऱ्या देशात जाण्यासाठी आम्हाला या रेल्वे स्टेशनवर इमिग्रेशन करणे आवश्यक होते. सकाळी साडेसात वाजताची गाडी असली तरी बसमध्ये बॅगा भरणं, रेल्वे स्टेशन मध्ये गेल्यावर त्या बॅगा काढणं, इमिग्रेशन चेक करणे, रेल्वेगाडी आल्यानंतर त्यामध्ये या सर्व बॅग्स भरणे ह्या सर्व गोष्टींना वेळ मिळावा म्हणून भल्या पहाटे सव्वाचार वाजता हॉटेल सोडावं लागेल असे फर्मान अतुलने काढले. आम्हांला दिलासा मिळावा म्हणून इथल्या तीन वाजता भारताच्या वेळेनुसार सकाळचे साडेसात झाले असतील त्यामुळे तुम्हांला उठायला अजिबात त्रास होणार नाही असे आपल्या मिश्किल स्वरात तो म्हणाला. आमच्या कीर्तीमामाची दोन्ही मुलं प्रेषित आणि श्वेता हे लंडन येथे वास्तव्य करून आहेत. आम्ही लंडनला धावती भेट देणार आहोत हे आम्ही त्यांना कळविले होते. आम्हांला भेटल्याशिवाय तुम्ही लंडनमधून जाऊ शकत नाही हे त्यांनी आम्हांला ठामपणे बजावून सांगितले होते. खरंतर गुरुवारी त्यांना भेटण्याची सुरुवातीची योजना होती. परंतु आम्ही खूपच उशिरा पोहोचल्यामुळे गुरुवारी भेटणं आम्हाला शक्य झालं नाही. शुक्रवारी मात्र ते दोघेही मुलांसह आले. प्रेषितची पत्नी अभिज्ञासुद्धा आली. इतका लांबचा प्रवास करीत ते आम्हांला भेटायला आले. वसईतील आपल्या जवळच्या नातलगांना परदेशात भेटण्यासारखा आनंददायी प्रसंग नाही. आमच्या गप्पांना खूपच रंग चढत होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजताचा अतुलचा अलार्म असल्यामुळे आम्ही लवकर झोपावे असे त्या दोघांनी आग्रह केला. पुढच्या वेळी प्रवासाची चांगली आखणी करून घरी नक्की या असा ठराव मांडून ते सर्वजण परतले. हा प्रसंग नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील.
सकाळी पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री दहानंतर संपला. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा दिवसाचा उजेड आमच्या सोबतीला होता. मी काही फारसा फिरलो नाही. परंतु न्यूयॉर्क आणि लंडन ही दोन शहरे जागतिक शहरांचा एक फील आणून देतात. या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली होत असतात. जगातील प्रमुख आर्थिक कंपन्यांची या दोन शहरांमध्ये कार्यालये आहेत. हवामानाच्या दृष्टीने पाहिलं तर तीव्र हिवाळा हे साधर्म्य या दोन शहरांमध्ये आढळतं. बिजनेस फॉर्मल वेश परिधान केलेले आकर्षक व्यक्तिमत्वाचे स्त्री पुरुष सकाळी ज्यावेळी या शहरांच्या डाउनटाउन मध्ये आपल्या कार्यालयांकडे चालत जात असतात त्यावेळी जगातील आर्थिक शहाणपण इथं एकवटलेलं आहे असा भास होत असतो. या दोन्ही शहरांत तुम्ही चालत बराच वेळ फिरू शकता. मेट्रोचे व्यवस्थित जाळे या दोन्ही शहरांमध्ये आहे. टॅक्सी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे स्वतःच्या कार वर अवलंबून राहणे फारसे होत नाही. किंबहुना शहराच्या मुख्य भागांमध्ये कार आणणे हे या दोन्ही शहरांमध्ये फारसे प्रोत्साहित केले जात नाही. लंडन शहरातील पार्क सुद्धा प्रेक्षणीय स्थळांमध्ये मानली जातात. बरेच जण इथं कुटुंबीयांसमवेत तासनतास वेळ व्यतित करण्यासाठी येत असतात. शहरांमध्ये सुद्धा निसर्ग कसा जोपासावा याचे हे उत्तम उदाहरण आहे!
आधी लेखात म्हटल्याप्रमाणे ही झाली लंडन शहराची धावती भेट! एक जाणकार म्हणून ह्या शहराला भेट देण्याचा योग भविष्यात यावा ही इच्छा !
ऋणनिर्देश श्री संदीप पाटील - सहलनोंदी श्री मनोहर राय - सहलनोंदी विकिपीडिया सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना.
आधीच्या भागाच्या लिंक्स
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी संध्याकाळची वेळ असल्यानं विमानतळ गजबजलेले होते. आता मात्र रात्रीची वेळ असल्यानं जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक अशा विमानतळावर आपण आहोत असं काही वाटत नव्हतं. पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीनं विचार करून हे विमानतळ युरोपातील इतर काही विमानतळाप्रमाणे रात्रीच्या वेळी पाच-सहा तास बंद ठेवले जाते. आपल्या देशाचा विचार केला असता आपली विमानतळे रात्रीच्या वेळी सर्वात जास्त गजबजलेली असतात. अर्थात युरोप अमेरिकेला जाण्यासाठी सोयीस्कर वेळ म्हणून हे होत असावे.
इमिग्रेशनसाठी म्हणायला गेलं तर फारशी मोठी रांग नव्हती. अतुल पुढे आणि त्यामागे वीणा वर्ल्डचे प्रवासी असा एकंदरीत मामला होता. आमच्या सहलीमध्ये एकूण ४३ जण होते. त्यातील १३ जण आम्हाला लंडन इथल्या हॉटेलमध्ये सामील होणार होते. त्यामुळे इथं या रांगेत ३० लोक असावीत. इमिग्रेशनची रांग नियंत्रित करण्यासाठी अनेक अधिकारी होते. अतुलचा जसा क्रमांक आला तसं त्यानं त्या अधिकाऱ्यांना सांगितले की पुढील सर्व माणसे वीणा वर्ल्डतर्फे बारा दिवसाच्या युरोप सहलीसाठी आली आहेत. बहुदा मी या रांगेत वीणा वर्ल्डच्या ग्रुपचा सर्वात शेवटचा माणूस होतो. अतुलच्या सांगण्यामुळं तीन इमिग्रेशन अधिकारी आमच्या गटासाठी नेमण्यात आले. एकंदरीत आमचा इमिग्रेशनचा अनुभव सुरळीतपणे पार पडला. आम्हांला सोपस्कार म्हणून काही मैत्रीपूर्ण असे प्रश्न विचारण्यात आले. आमचा इमिग्रेशनचा सोपस्कार पार पडला. भारतीय ग्राहकांच्या क्रयशक्तीच्या प्रभावाचा आम्हांला ह्या भेटीत आलेला पहिला अनुभव !
त्यानंतर आमचा मोर्चा आमच्या बॅग ताब्यात घेण्याकडे वळला. सध्या हीथ्रो विमानतळावर काही नामवंतांच्या बॅग्स उशिरानं मिळाल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु आम्ही बहुदा सेलिब्रिटी नसल्याने आमच्या बॅगा व्यवस्थित आमच्या ताब्यात आल्या. समाजमाध्यमावर प्रसिद्ध होण्याची संधी बहुदा गमावली अशी खंत आता वाटत आहे. आमची वाटचाल आमच्या बसच्या दिशेने होऊ लागली. आमच्या बॅगा घेऊन बाहेर पडताना आम्ही कस्टम्स अधिकाऱ्यांसमोरून गेलो. बहुदा त्यांची ड्युटीची वेळ संपत असल्यामुळे किंवा आमच्या चेहऱ्याकडे पाहून ही लोक काय संशयास्पद वस्तू आणणार असा समज झाल्याने त्यांनी आम्हाला विनासायास जाऊ दिले.
बाहेर पडताच लगेचच थंड हवेच्या झोक्याने आमचे स्वागत केले. जून महिना म्हणजे तर खरं तर उन्हाळ्याचा महिना. परंतु इंग्लंड, फ्रान्समध्ये आम्हांला बऱ्यापैकी थंड हवामान आणि बोचरे वारे यांचा अनुभव करावा लागला. युरोपातील हवामान हे अत्यंत बेभरवशाचे असते. तिथे पाऊस पडल्यास तापमान अचानक १० अंश सेल्सिअसने सुद्धा खाली येऊ शकते हे अतुल आम्हाला वारंवार बजावत होता. पाऊस केव्हाही येऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासोबत छोटी छत्री, स्वेटर किंवा जॅकेट अशा वस्तू असणे केव्हाही उत्तम. आपण थंडीचा जर फारच बाऊ करत असाल तर कानटोपी, ग्लोज अशा वस्तूसुद्धा आपल्या सोबत ठेवाव्यात. कुटुंबातील इतर सदस्य किंवा सहप्रवासी यांना अशा वेशभूषेमध्ये फोटो काढायला सांगून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले तर चांगली प्रतिक्रिया मिळू शकते. अशावेळी आपल्या सोबत असलेला कोणी खट्याळ सहप्रवासी एखादी टिपण्णी टाकून सोशल मीडियावर आपली खिल्ली उडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही एक दोन दिवसांतच ह्या हवामानाला जुळवून घेता. त्यामुळं त्यानंतर जर वारा नसेल तर तुम्ही १५ डिग्री सेल्सिअस तापमान वगैरे सहजपणे सहन करू शकता.
सोहम आणि प्राजक्ता ह्यांना प्रथमदर्शी इंग्लंड आवडलं. काही वेळातच आमचं हॉटेल पार्क ग्रँड लंडन हीथ्रो आलं. हे लंडन विमानतळाच्या टर्मिनल पाचच्या क्षेत्रात आहे असं सांगण्यात आलं. विमानतळावरील एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी इतका वेळ लागला ह्यावरून ह्या विमानतळाच्या व्याप्तीची कल्पना यावी. वीणा वर्ल्डने पार्सलमध्ये जेवणं आणली होती. परंतु लंडनला उतरण्याआधी काही वेळेपूर्वीच जेवणं झाल्यानं आम्ही ह्या बॉक्समधील केवळ पाण्याच्या बाटल्या घेतल्या. प्रत्येक हॉटेलमध्ये बहुधा येणाऱ्या पाहुण्यांना गोंधळवून टाकण्यासाठी शॉवर, गरम / थंड पाणी ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आयोजन केलेलं असतं. त्यामुळं भारतीय सवयीनुसार केवळ हातपाय धुण्यासाठी कोमट पाणी शॉवरमधून हवंय ही गरज पूर्ण करण्याच्या हेतूनं न्हाणीघरात शिरलेले पाहुणे थंड पाण्याच्या सचैल फवाऱ्यानं अचंबित होऊन जोरदार आरोळी ठोकतात अशा घटना माझ्या ऐकिवात आहेत. परंतु त्यांनी ही कबुली खाजगीत दिल्यानं त्यांची नावं मी घोषित करू शकत नाही. दमलेले जीव बिछान्यावर पहुडल्यानंतर काही क्षणांतच निद्राधीन झाले. रात्री झोपण्याआधी अतुलने पुढील दिवसाचा कार्यक्रम व्हाट्सअँप ग्रुपवर घोषित केला. सकाळी सहा वाजता वेकअप कॉल, सात ते पावणेआठ नाश्ता आणि आठ वाजता लंडन दर्शनासाठी प्रस्थान असं दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचं संक्षिप्त स्वरूप होतं.
सकाळी पाचच्या सुमारास जाग आली. बाहेर लख्ख उजेड होता. तिघेही जण जागे झाल्यानं टीव्ही लावला. आज युरो २०२४ ला प्रारंभ होणार होता. ह्या स्पर्धेमुळं युरोपच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल की नाही ह्याविषयी बातम्यांत चर्चा सुरु होती. २००० साली ब्रायटनला असताना युरो स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध जर्मनी असा सामना झाला होता. त्यावेळी माझी चिंता करणारा सहकारी गाय बॅम्फोर्ड मला म्हणाला होता, "आदित्य, जर जर्मनी जिंकेल अशी चिन्हं दिसू लागली तर अजिबात हॉटेलबाहेर पडू नकोस". आता मी लंडनमध्ये येत आहे असा संदेश त्याला पाठवला होता. परंतु त्याच्या कार्यबाहुल्यामुळं त्याला लंडनमध्ये भेटायला येणं शक्य नव्हतं.
हॉटेलातील नाश्ता बहुरंगी होता. माहितीजालावरून ह्या हॉटेलातील नाश्त्याचे घेतलेलं छायाचित्र.
प्रत्यक्षातही असाच नाश्ता होता. २००० साली ब्रायटनच्या वास्तव्यात ऑफिसात बऱ्याच वेळा जो पर्याय दुपारच्या भोजनासाठी वापरला होता, त्या Jacket Potato with Baked Beans मधील Baked Beans इथं हजर होते. युरोपातील नाश्त्यामध्ये पावाचे विचिध प्रकार, ताजी फळं, फळांचे रस, Scrambled Eggs, कॉफी, चहा, मांसाहाराचे अतर्क्य प्रकार असे विविध पर्याय उपलब्ध असतात. ह्या नाश्त्याचा पुरेपूर आस्वाद घ्यावयाचा असेल तर तुमच्या अंगी खालील गुण असावेत.
१. कॉफी मशिनमधून योग्य पर्याय निवडून आत्मविश्वासानं कपात / ग्लासात कॉफी घेता येणं. पहिल्या प्रयत्नात गोंधळ उडून टेबलवर कॉफी सांडल्यास ही आपली चूक नव्हेच अशा आविर्भावाने दुसरा प्रयत्न करणं.
२. आपल्याला हवा असलेला पाव, फळं घेताना आपल्या मागील माणसांना काही शिल्लक राहील का ह्याची चिंता न करणं.
३. बंदिस्त पुड्यांमधील बटर, चीज, जॅम व तत्सम प्रकार कोणत्या पावाला कोणत्या सुरीनं कशा पद्धतीनं लावावेत ह्याविषयी माहिती बाळगून असणे. किंवा ही माहिती नसल्यास मागच्या माणसांच्या चेहऱ्यांवरील मुद्रांकडे बिल्कुल दुर्लक्ष करीत अतिआत्मविश्वासानं आपल्याला हवं ते करणं.
४. सूरी, काट्याचा योग्य वापर करत सर्व पदार्थ तोंड किमान उघडून भक्षण करता येतील अशा प्रमाणात सुबक आकारात तोडणे.
असो, भरपेट नाश्त्यानंतर आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो. पोटाचा घेर दीड सेंमीने वाढला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज रात्री परत ह्याच हॉटेलात यायचं असल्यानं बॅग्स बसमध्ये आणण्याचे कष्ट घ्यायचे नव्हते.
बसमध्ये आम्हांला आधीपासूनच (नोंदणीक्रमानुसार) आसने देण्यात आली होती. लंडनच्या लहरी हवामानाचा सामना करण्यासाठी आम्ही सोबत छत्री, जॅकेट वगैरे आयुधं आणि फोटो काढताना व्यक्तिमत्त्व खुलून दिसावं म्हणून काहींनी गॉगल वगैरे गोष्टी घेतल्या होत्या. उन्हापासून संरक्षण म्हणून गॉगल हे विधान मला पटण्याची शक्यता कमीच!
बसमधून शुक्रवार सकाळचे लंडन अगदी प्रसन्न वाटत होते. बसचा चालक डेव्हिड होता.
आमची मार्गदर्शक क्लारा ही आम्हांला काही वेळानं शहरात भेटणार होती. लंडन शहरात Please, Excuse me, Sorry आणि Thank You ह्या शब्दांचा मुक्तहस्ते (किंवा मुक्तमुखे ) वापर करा असे अतुल म्हणाला. अर्थात ह्यातील कोणत्या शब्दाचा कोणत्या प्रसंगी वापर करायचा ह्याची जाण नसेल तर अनावस्था प्रसंग ओढवू शकतो.
लंडन हे शहर रोमन लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी वसवले असे म्हणता येईल. लंडन शहराने आपल्या इतिहासामध्ये प्लेग, भीषण आग, नागरी युद्ध, हवाई हल्ले, दंगली, नजीकच्या भूतकाळात काही दहशतवादी हल्ले यांचा यशस्वीरित्या मुकाबला केला आहे. १६६६ साली लंडनमध्ये लागलेली, पाच दिवस सतत चाललेली आग पूर्ण लंडन शहराचा विध्वंस करून गेली. ही आग एका छोट्या बेकरीमध्ये मध्यरात्रीनंतर सुरू होऊन प्रचंड वेगाने संपूर्ण शहरभर पसरली. त्या वेळच्या महापौराची आणि अधिकारी लोकांची निर्णय घेण्यातील दिरंगाई ही आग पसरण्यास मुख्यतः कारणीभूत ठरली असे वाचनात आलं आहे. या आगीनंतर लंडन शहराची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सर क्रिस्तोफर Wren यांनी लंडन शहराच्या पुनर्बांधणीमध्ये मोलाचा वाटा उचलला.
ह्या बसप्रवासात पावलोपावली (बसमधून जात असल्यानं टायराटायरी) लंडन शहरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू सामोऱ्या येत होत्या. आधी अतुल मग क्लारा आम्हांला त्यांचं महत्व विशद करून सांगत होते. Cleopatra Needles - ही इजिप्तमधील ऐतिहासिक महत्त्व असलेली दोन शिल्पं १८७८ आणि १८८१ साली अनुक्रमे लंडन आणि न्यूयॉर्क इथं पुर्नस्थापित करण्यात आली. ह्या शिल्पाचे पूर्ण छायाचित्र माहितीमायाजालावरून आपणास मिळू शकेल.
बसमधून दिसलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लंडनमधील विविध वास्तू / स्मारकं ह्यांची छायाचित्रं बसमधून जशी दिसली तशी इथं सादर करण्यात आली आहेत! ह्यातील काही चित्रं वीणा वर्ल्ड सहप्रवासी आणि अतुल ह्यांच्या कॅमेरातून टिपली गेली आहेत. ह्यात Big Ben Miniature, Westminister Abbey Church of Royal Family, Dragon Statue entry point Westminster Abbey, Tower Bridge, London Bridge Railway Station (जगातील सर्वात जुनं रेल्वे स्थानक), Fire Monument, St. Paul Catheral London, Piccadilly Circus, BBC Radio Station, 10 Downing Street, Monument of Victoria, Hercules Statue, Chlesea Monument इत्यादींचा समावेश आहे. तिथं आपलं इंडिया हाऊस पाहून अभिमान वाटला. वर उल्लेखलेल्या प्रत्येक स्थळाला ऐतिहासिक महत्व आहे. अतुल, क्लारा अत्यंत वेगानं ह्या प्रत्येक स्थळाची माहिती आम्हांला देत होते. लंडनमध्ये वर उल्लेखलेल्या स्थळांप्रमाणे इतरही असंख्य ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू आहेत. लंडन शहरात जवळपास दोनशेच्या आसपास संग्रहालये आहेत. ब्रिटिश म्युझिअम हे सर्वात नावाजलेल्या संग्रहालयातील एक! जर आपण खरोखर इतिहासाचे चाहते असाल तर ह्या सर्व वास्तूंची सविस्तर माहिती करून घेण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी अनेक दिवस लागतील. आम्ही हे सारे अर्ध्या तासाच्या प्रवासात आटपलं! १० डाउनिंग स्ट्रीटवरून ज्यावेळी आम्ही बसमधून गेलो, त्यावेळी ऋषी सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. आज ही पोस्ट लिहिताना त्यांनी हे पद गमावलं आहे. कालाय तस्मै नमः !
टॉवर ब्रिजवर घेतलेली छायाचित्रं ! अर्थात इथं बस थांबू शकत नाही. मुंबईत काळाच्या पडद्याआड गेलेल्या डबलडेकर लंडनमध्ये अजूनही रस्त्यावर जोमानं धावत आहेत हे पाहून माझ्यासारखे जुन्या गोष्टींचे अनेक पुरस्कर्ते आनंदी होतात.
इंग्लंडच्या संसदेची हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स ही दोन सभागृहे आहेत. आपल्या लोकसभा आणि राज्यसभेशी मिळतीजुळती अशी ही संरचना आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये काही उमरावांना तहहयात सदस्यत्व मिळतं असं क्लारा म्हणाली असं पुसटसं आठवत होतं. परंतु माहितीमायाजालावर त्याला दुजोरा देणारी माहिती सापडली नाही. क्लारा काहीशी मिश्किल स्वभावाची होती. ब्रिटिश राजघराण्याच्या गडगंज संपत्तीविषयी ती अधूनमधून संदर्भ देत होती. त्यांची बँक कोणती, ते कोणत्या दुकानातून किराणामाल खरेदी करतात हे सांगताना ह्या आस्थापनाचं सदस्य बनण्यासाठी सदस्य फी किती महागडी आहे हे ती हळूच सांगत असे. राजघराणे वर्षातून एकदा काही नागरिकांसाठी पार्टीचे आयोजन करते. क्लाराच्या नवऱ्याला एकदा अशा पार्टीचे निमंत्रण मिळालं. पण तो क्लाराला सोबत घेऊन न जाता त्याच्या व्यावसायिक सहकाऱ्याला घेऊन गेला. परत आल्यावर त्या पार्टीत फारसा काही पाहुणचार झाला नाही, डम्पलिंग वगैरेच मिळाले हे त्यानं सांगितल्यावर बरी अद्दल घडली असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.
आता आमचं आगमन ट्रॅफल्गार चौकात झालं. ह्या चौकाच्या जवळ बस पार्किंगसाठी केवळ दोन जागा असतात. त्यातील एक आम्हांला मिळाली म्हणून क्लारा अत्यानंदित झाली. ट्रॅफल्गार स्क्वेअर हा सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर सेंट्रल लंडन इथे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी उभारला गेलेला सुप्रसिद्ध चौक आहे. नेपोलियनिक युद्धांमधील (Napoleonic Wars) ब्रिटिश नौदलाने फ्रान्स आणि स्पेन यांच्या सेनेवर ट्रॅफल्गार युद्धात २१ ऑक्टोबर १८०५ साली मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ या चौकास हे नाव देण्यात आले आहे. या भागास पूर्वी रिंग क्रॉस या नावाने सुद्धा संबोधले जात होते. हा चौक अत्यंत प्रशस्त असल्यामुळे विविध जाहीर सभा, राजकीय प्रदर्शने यासाठी वापरण्यात येतो. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि आतिषबाजीसाठी करण्यात येणाऱ्या समारंभाचे हे मुख्य केंद्र आहे. इथं आल्यावर आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या असे अतुलने आम्हांला बजावले. छायाचित्रं काढण्याच्या नादात आपल्या मौल्यवान ऐवज असलेल्या बॅग्स लांब ठेवू नका असे त्याचे म्हणणे होते. सकाळी लवकर आल्यामुळे हा चौक बऱ्यापैकी रिकामी होता.
त्यामुळे आम्हांला छायाचित्रणासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली. आम्ही सुदैवी होतो असे क्लाराचे म्हणणे होते. आदल्या दिवशी इथं खूप पाऊस पडला होता, दुसऱ्या दिवशी देखील पाऊस पडेल असे वेधशाळेचे भाकीत होते. इथले छायाचित्रण सत्र आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये स्थानापन्न झालो.
थेम्स नदीवर असंख्य पूल आहेत. प्रत्येक पुलाची काही वैशिष्टयं आहेत. जसे की वॉटर्लू पुलाच्या बांधकामात बहुतांशी स्त्रियांचा पुढाकार होता. पुरुष दुसऱ्या महायुद्धात गुंतल्यानं त्यांनी हम किसीसे कम नहीं हे दाखवून दिलं. बस टॉवर ब्रिजच्या दिशेने निघाली होती. टॉवर ब्रिज हा थेम्स नदीवरील पुलांमध्ये प्रामुख्याने गणला जाणारा असा पूल आहे. टॉवर ब्रिजला जवळून पाहण्यासाठी, त्याचा सखोल इतिहास जाणून घेण्यासाठी टॉवर ब्रिजची टूर घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. अर्थातच ह्यासाठी आमच्याकडे वेळ नव्हता. २००० साली मी ही टूर घेतली होती. त्यावेळी तेथील मार्गदर्शकाने बरीच काही माहिती दिली होती. अर्थात ती आठवण्याची आता काही शक्यता नाही. पुलाच्या खालून जाणाऱ्या मोठ्या जहाजांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून हा पूल मधोमध उघडला जातो. अर्थात अशा जहाजांची संख्या व वर्दळ हल्ली कमी झाल्यानं पुलाची उघडझाप कमी प्रमाणात होते. माहितीमायाजालावर याविषयी अनेक पोस्ट आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आम्ही काही अंतरावरील एका जागेवरून टॉवर ब्रिजला कॅमेरामध्ये चित्रित केले. टॉवर ब्रिज हे केवळ निमित्त असावे असं वाटावं इतकी आम्ही स्वतःची छायाचित्रे घेतली.
आम्ही क्लारा हिला एका छायाचित्रात आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तिनं आनंदाने ती मान्य केली. हे छायाचित्रण सत्र संपवून बसच्या दिशेने वाटचाल करत असताना फुलांची बाग दिसली. अर्थात इथे छायाचित्रण करणे अत्यावश्यक होते. आम्ही लवकर बसमध्ये परतावे म्हणून अतुलने थोडीशी घाई केली. यापुढील पॉईंट होता तो म्हणजे बॅकिंगहॅम पॅलेस अर्थात इंग्लंडच्या राजघराण्याचा लंडनमधील राजवाडा! ज्यावेळी राजाचे ह्या महालात वास्तव्य असतं त्यावेळी इंग्लंडच्या साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतिक असणारा "रॉयल फ्लॅग" ध्वज राजवाड्यावर फडकत असतो. अन्य वेळी "युनिअन जॅक" ला हा मान मिळतो.
"चेंजिंग द गार्ड" किंवा "गार्ड माउंटिंग" (जी एक अधिकृत संज्ञा आहे) हा समारंभ बॅकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पावणे अकरा वाजता सुरू होतो. साधारणतः ४५ मिनिटं अवधी असलेल्या या समारंभात राजवाड्याच्या पहाऱ्यावर असलेले जुने पहारेकरी नवीन पहारेकऱ्यांच्या हाती सूत्रं हवाली करतात. सुदैवाने आम्ही वेळेतच तिथं पोहोचलो असल्याने आम्ही तेथील रस्त्यावर मोक्याच्या जागा पटकावल्या. ही जागा राजवाड्यापासून थोडी लांब होती. अकरा वाजताच्या सुमारास राजवाड्याच्या आसपास बिगुल आणि ढोल यांचे आवाज येऊ लागले. बहुदा जुन्या पहारेकर्यांनी सूत्रं नवीन पहारेकरांच्या हाती दिली असावीत. घोड्यावर स्वार असलेल्या पहारेकऱ्यांची एक मोठी तुकडी आता आमच्या दिशेने येऊ लागली होती. लाल रंगाचा वेष आणि काळी टोपी परिधान केलेल्या, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या सैनिकांची घोड्यावर स्वार झालेली तुकडी अगदी जवळून पाहणं हा नक्कीच एक अविस्मरणीय असा अनुभव होता.
राजवाड्याच्या भोवताली असलेल्या हिरवळीवर अनेक लोकांची गर्दी जमली होती. इथं छायाचित्रण करण्यात वेळ घालवू नका असे अतुलने आम्हाला सुचविले. आमचा मोर्चा आता दुपारच्या भोजनासाठी वळला.
लंडन शहरातील मुमताज हॉटेलमध्ये आम्ही दुपारच्या भोजनासाठी पोहोचलो. या हॉटेलमध्ये गेले कित्येक वर्ष मी येत आहे असे अतुल म्हणाला. युरोपातील मुख्य शहरांमध्ये वीणा वर्ल्ड, केसरीचे प्रवासी ग्रुप काही ठराविक उपहारगृहांमध्येच दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी जात असतात. त्यामुळे प्रत्येक ग्रुपसाठी साधारणतः ४५ मिनिटांचा अवधी दिला गेलेला असतो. या अवधीमध्ये सर्वांनी लवकर जेवण आटपणे अपेक्षित असते. आमच्या ग्रुपच्या वक्तशीरपणामुळे किंवा अतुलच्या ज्येष्ठतेमुळं बहुतेक ठिकाणी आम्ही सर्वप्रथम पोहोचत असू. प्रवासातील उपहारगृहात जाताना वॉशरूमचा ब्रेक हा सुद्धा एक हेतू असायचा. काहीशी खेदाची गोष्ट म्हणजे ही वॉशरूम पूर्णपणे स्वच्छ नसायची. ही वॉशरूम तळघरात असायची. इतक्या मोठ्या संख्येने थोड्या अवधीमध्ये प्रवासी आल्यावर त्यांच्या स्वच्छतेचा काहीसा प्रश्न उद्भवणार हे ओघाने आलेच.
इतका वेळ प्रवास केल्यानंतर सर्वजण अर्थातच भुकेलेले होते. जेवण हे रुचकर असे होते तरीही त्यात का कोणास ठाऊक पण यांत्रिकी पद्धतीनं जेवण बनविल्याचा फील येत होता. युरोपातील भारतीय उपहारगृहातील आमची जेवणं एका विशिष्ट पॅटर्न मध्ये असायची. सुरुवातीला नान, सॅलड, शाकाहारी दोन-तीन पर्याय, वरण, भात असे ओळीने मांडून ठेवलेले पदार्थ असायचे. मांसाहारी लोकांसाठी एक पर्याय म्हणून बहुदा चिकन एका कोपऱ्यात उपलब्ध असायचे. ज्या उपाहारगृहात वीणा वर्ल्डचेच पाहुणे असायचे, तिथं मांसाहारी पर्याय एका कोपऱ्यात ठेवून देण्यासाठी आग्रह केला जायचा. परंतु ज्या उपाहारगृहांमध्ये त्यांची स्वतःची व्यवस्था असायची तिथं मात्र मांसाहारी पदार्थ शाकाहारी पदार्थांच्या सोबत ठेवले असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. भरपेट जेवण घेऊन पुन्हा एकदा बसमध्ये बसायला जीवावर आले होते. पोटाचा घेर अजून दोन सेंमीने वाढला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. .सुदैवाने थोड्या वेळातच मॅडम टुसॉ या मेणांच्या पुतळ्याच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन आम्ही थडकलो.
आमच्या ग्रुप बुकिंगसाठी एक विशिष्ट वेळ देण्यात आल्यामुळे आम्हाला काही वेळ थांबणे भाग पडले. हवामान अत्यंत थंड होते. बोचरे वारे वाहत होते. तिथं स्मृतिचिन्ह विकणारी अनेक दुकाने होती. सहप्रवाशांनी ह्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. थोड्याच वेळात आम्ही संग्रहालयात प्रवेश केला. मॅडम टुसॉ यांचा जन्म १७६१ साली फ्रान्समध्ये झाला. तिची आई स्वित्झर्लंडमधील एका फिलिप कर्टिस नामक कारागिराकडे काम करीत असे. त्यांनी मॅडमना मेणापासून पुतळे बनवण्याचे प्राथमिक शिक्षण दिले . सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या कलेचा मॅडम टुसॉ यांनी पुढं मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. त्यांना लंडनमध्ये बोलावण्यात आले. नेपोलियनिक युद्धाचे निमित्त होऊन त्यांना लंडनमध्येच राहावे लागले. त्यांनी १८३१ सालापासून छोट्या छोट्या कालावधीच्या भाडेतत्त्वावर बेकर्स स्टेट बाजार इथं वरच्या मजल्यावर आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली. कालांतराने याच वास्तूचे मॅडम टुसॉ संग्रहालयात रूपांतर झाले. २००० सालच्या लंडन भेटीत सुद्धा या संग्रहालयात मी गेलो होतो. इथं विविध राजकारणी, क्रीडापटू, सिनेसृष्टीतील कलाकार, विविध लेखक, शास्त्रज्ञ यांचे अगदी हुबेहूब वाटतील असे पुतळे आहेत.
आपण भारतीय सदैव आपल्याच मान्यवरांच्या पुतळ्यांच्या शोधात असतो. यावेळी आम्हांला नव्याने एक गोष्ट कळली. जगभरात, युरोपात आता बऱ्याच ठिकाणी मॅडम टुसॉ संग्रहालये झाली आहेत. मान्यवरांचे पुतळे या विविध संग्रहालयात छोट्या छोट्या कालावधीनंतर स्थलांतरित करण्यात येतात. आमच्या गटातील लोकांना पंतप्रधान मोदी, माधुरी दीक्षित इत्यादींचे पुतळे पहायचे होते. परंतु सध्या तरी लंडन येथील या संग्रहालयात हे पुतळे पाहायला मिळत नाहीत. आमच्या कुटुंबासाठी मात्र अशी काही विशिष्ट आवड नव्हती. त्यामुळे जशी हॉलीवुड कलाकार, फुटबॉल खेळाडू, आपला सचिन, बीटल्स ही जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व दिसली त्यांच्यासोबत आम्ही आमची छायाचित्रे काढून घेतली.
अशा प्रसंगी अँजेलिना जोली, टेलर स्विफ्टच्या पुतळ्यांसोबत फोटो काढून घेण्याचा आग्रह धरणे प्रशस्त होणार नाही हे मी स्वतःला निक्षून बजावले. शेकस्पियर, आपला सचिन ह्यांच्यासोबत वार्तालाप करून आम्ही पुढे निघालो.
शाहरुख खानच्या पुतळ्याने मात्र घोर निराशा केली. प्राजक्ताच्या भाषेत बोलायचे झाले तर तो कोणत्याही अँगलने शाहरुख खान वाटत नव्हता. या संग्रहालयात अनेक चेंबर्स असतात. काही गरज नसताना तिथे चेंबर ऑफ हॉरर वगैरे प्रकार ठेवले आहेत. अजून एक घाबरवणारा प्रकार म्हणजे तुम्ही पुढे जसे सरकत जाता तसे चेंबर ऑफ हॉरर वगैरे विभागातून तुम्हाला जावं लागतं. तिथून पळवाट काढण्यासाठी जो मार्ग असतो तो केवळ जाणकारच सहजपणे शोधू शकतो. महत्प्रयासाने शोधलेली पळवाट आम्हाला दुसऱ्या एका राईडकडे घेऊन गेली. त्या राईडमध्ये आम्ही दोघेजण बसलो. टॅक्सी राईड हा लंडन शहराच्या इतिहासात प्रवास घडवून आणणारा एक उत्तम असा अनुभव आहे लंडन शहराची ओळख असलेल्या काळ्या टॅक्सीमध्ये आपल्याला दोघा-दोघांच्या गटानं बसवले जाते. ज्यांनी लंडन शहराला घडविले अशा लंडन शहराच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे साक्षीदार होण्याची संधी ही राईड आपल्याला देते. प्लेगने ग्रासलेले लंडन शहर, भीषण आगीने नष्ट झालेले लंडन शहर, सर ख्रिस्तोफर यांच्या मेहनतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उभारले गेलेले शहर, दुसऱ्या महायुद्धात पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीला कडवी लढत देणाऱ्या इंग्लंडची राजधानी असलेले लंडन शहर असा सर्व इतिहास आपल्याला या थोड्या अवधीमध्ये पाहायला मिळतो. ही एक रंजक राईड आटपून आम्ही संग्रहालयाच्या बाहेर पडलो. का कोणास ठाऊक पण मॅडम टुसॉ संग्रहालय पाहताना म्हणावा तितका आनंद झाला नाही. सिंगापूरमध्ये सुद्धा असेच संग्रहालय पाहिले होते. हल्ली भारतात सुद्धा अशी संग्रहालय उभी राहू लागली आहेत.
संग्रहालयाच्या बाहेर असलेल्या स्टॉलवर आमच्यासाठी गरमागरम मसाला चहाची व्यवस्था करण्यात आली होती. इतक्या थंड हवेमध्ये गरमागरम मसाला चहा मिळणं हा एक अत्यंत सुखद अनुभव होता. ह्यापुढील मसाला चहा हा पंचवीस तारखेला आपापल्या घरी हे हसतहसत सांगायला अतुल विसरला नाही.
यानंतर आमची पावलं किंवा बसचे टायर हे लंडन आयच्या दिशेने निघाले.
इंग्लंडची राष्ट्रीय विमान कंपनी ब्रिटिश एअरवेजने लंडन आयच्या उभारणीसाठी प्रामुख्याने अर्थपुरवठा केला. थेम्स नदीवर १९९९ साली उभारण्यात आलेल्या या प्रचंड मोठ्या जायंट व्हीलचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ३१ डिसेंबर १९९९ रोजी केलं खरं परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे याचे सामान्य जनतेसाठी उद्घाटन मार्च २००० मध्ये झाले. आम्ही ज्यावेळी २००० च्या जून महिन्यात लंडनच्या भेटीसाठी गेलो होतो त्यावेळी लंडन आयची तिकिटं मिळाली नव्हती. त्यामुळे त्यावेळी मला यात बसता आले नव्हते.
लंडन आयमध्ये एकंदरीत बंदिस्त आणि वातानुकूलित ३२ कॅप्सुल्स (कुपिका) आहेत. या कुपिकांना एक ते ३३ असे क्रमांक देण्यात आले आहे. कोणता क्रमांक वापरण्यात आला नाही याचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी कोणतेही बक्षीस देण्यात येणार नाही!! एका कॅप्सूल मध्ये अंदाजे २५ लोक सामावले जातात. एक पूर्ण फेरी साधारणतः ३५ मिनिटांत पूर्ण होते. प्रवाशांच्या चढउतारासाठी हे व्हील पूर्णपणे थांबवले जात नाही. ह्या व्हीलचा वेग प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी शक्य होईल इतका माफक असतो. वरती गेल्यानंतर लंडन शहराचे अत्यंत विहंगम असे दृश्य दिसलं. सोबत भ्रमणध्वनी असल्यामुळे ही सर्व दृश्यं डोळ्यात सामावून घेण्यापेक्षा भ्रमणध्वनीद्वारे त्यांची छायाचित्र घेण्याकडेच सर्वांचे लक्ष होते. आमच्या कॅप्सूलमध्ये आम्ही सर्व बहुदा वीणा वर्ल्डचेच सहप्रवासी होतो. आमचे काही सहप्रवासी बाजूच्या कॅप्सूलमध्ये होते. त्यामुळे आम्ही एकमेकांचे फोटोसुद्धा काढले. आमच्यातील काही सहप्रवासी चौकस बुद्धीचे होते. ही चौकस बुद्धी त्यांनी वयाच्या ६५ वर्षानंतर सुद्धा शाबूत ठेवली होती. त्यामुळे विमानतळ कोणत्या दिशेला असेल, या इमारतीला छप्पर कोणत्या पद्धतीचे असेल अशा पद्धतीच्या शंका त्यांनी मला विचारल्या. मी मला जमतील त्या पद्धतीने त्यांच्या उत्साहावर विरजण पडेल याची योग्य ती काळजी घेत त्यांना उत्तरे दिली. माझ्या चेहऱ्याकडे बघत हा माणूस दिसतो तितका साधासुधा नाही असे भाव देत त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दुसऱ्या लोकांकडे मोर्चा वळविला. साधारणतः सहा वाजता आम्ही या व्हीलमधून खाली उतरलो.
आता परत आमचा प्रवास हॉटेलकडे सुरू झाला होता. शुक्रवार संध्याकाळच्या लंडनच्या वाहतूक कोंडीचा थोडाफार अनुभव आम्हांला मिळाला. वाटेत येणाऱ्या विविध इमारतींची माहिती देणे अतुलने सुरू ठेवलं होतं. चेल्सी क्लब हा केवळ फुटबॉलच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध नसून विविध सामाजिक उपक्रमासाठीसुद्धा ते कार्यरत असतात. त्यांच्या सामाजिक उपक्रमासाठी उभारल्या गेलेल्या काही संकुलांची माहिती अतुलने दिली. मुख्य शहर थोडसं मागे सरलं तसं रस्त्यावर झाडांचे प्रमाण काहीसं वाढलं. झाडांवर फुलं फळ दिसू लागली. बसमधून छायाचित्रण करण्याचा एक तोटा म्हणजे बसच्या काचेमध्ये पडणारं आपलं आणि सहप्रवाशांचं प्रतिबिंबसुद्धा छायाचित्रांमध्ये येतं. तरीही आमचा उत्साह कमी झाला नाही. सात वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. रात्रीचे जेवण हे साडेसात वाजता सुरू होणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पॅरिसच्या दिशेने वाटचाल सुरू करणार होतो. युरो स्टार ही अत्यंत वेगाने धावणारी आगगाडी आम्ही पकडणार होतो. ते स्टेशन एक तासाच्या प्रवासावर होते. दुसऱ्या देशात जाण्यासाठी आम्हाला या रेल्वे स्टेशनवर इमिग्रेशन करणे आवश्यक होते. सकाळी साडेसात वाजताची गाडी असली तरी बसमध्ये बॅगा भरणं, रेल्वे स्टेशन मध्ये गेल्यावर त्या बॅगा काढणं, इमिग्रेशन चेक करणे, रेल्वेगाडी आल्यानंतर त्यामध्ये या सर्व बॅग्स भरणे ह्या सर्व गोष्टींना वेळ मिळावा म्हणून भल्या पहाटे सव्वाचार वाजता हॉटेल सोडावं लागेल असे फर्मान अतुलने काढले. आम्हांला दिलासा मिळावा म्हणून इथल्या तीन वाजता भारताच्या वेळेनुसार सकाळचे साडेसात झाले असतील त्यामुळे तुम्हांला उठायला अजिबात त्रास होणार नाही असे आपल्या मिश्किल स्वरात तो म्हणाला.
आमच्या कीर्तीमामाची दोन्ही मुलं प्रेषित आणि श्वेता हे लंडन येथे वास्तव्य करून आहेत. आम्ही लंडनला धावती भेट देणार आहोत हे आम्ही त्यांना कळविले होते. आम्हांला भेटल्याशिवाय तुम्ही लंडनमधून जाऊ शकत नाही हे त्यांनी आम्हांला ठामपणे बजावून सांगितले होते. खरंतर गुरुवारी त्यांना भेटण्याची सुरुवातीची योजना होती. परंतु आम्ही खूपच उशिरा पोहोचल्यामुळे गुरुवारी भेटणं आम्हाला शक्य झालं नाही. शुक्रवारी मात्र ते दोघेही मुलांसह आले. प्रेषितची पत्नी अभिज्ञासुद्धा आली. इतका लांबचा प्रवास करीत ते आम्हांला भेटायला आले. वसईतील आपल्या जवळच्या नातलगांना परदेशात भेटण्यासारखा आनंददायी प्रसंग नाही. आमच्या गप्पांना खूपच रंग चढत होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजताचा अतुलचा अलार्म असल्यामुळे आम्ही लवकर झोपावे असे त्या दोघांनी आग्रह केला. पुढच्या वेळी प्रवासाची चांगली आखणी करून घरी नक्की या असा ठराव मांडून ते सर्वजण परतले. हा प्रसंग नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील.
सकाळी पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री दहानंतर संपला. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा दिवसाचा उजेड आमच्या सोबतीला होता.
मी काही फारसा फिरलो नाही. परंतु न्यूयॉर्क आणि लंडन ही दोन शहरे जागतिक शहरांचा एक फील आणून देतात. या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली होत असतात. जगातील प्रमुख आर्थिक कंपन्यांची या दोन शहरांमध्ये कार्यालये आहेत. हवामानाच्या दृष्टीने पाहिलं तर तीव्र हिवाळा हे साधर्म्य या दोन शहरांमध्ये आढळतं. बिजनेस फॉर्मल वेश परिधान केलेले आकर्षक व्यक्तिमत्वाचे स्त्री पुरुष सकाळी ज्यावेळी या शहरांच्या डाउनटाउन मध्ये आपल्या कार्यालयांकडे चालत जात असतात त्यावेळी जगातील आर्थिक शहाणपण इथं एकवटलेलं आहे असा भास होत असतो. या दोन्ही शहरांत तुम्ही चालत बराच वेळ फिरू शकता. मेट्रोचे व्यवस्थित जाळे या दोन्ही शहरांमध्ये आहे. टॅक्सी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे स्वतःच्या कार वर अवलंबून राहणे फारसे होत नाही. किंबहुना शहराच्या मुख्य भागांमध्ये कार आणणे हे या दोन्ही शहरांमध्ये फारसे प्रोत्साहित केले जात नाही. लंडन शहरातील पार्क सुद्धा प्रेक्षणीय स्थळांमध्ये मानली जातात. बरेच जण इथं कुटुंबीयांसमवेत तासनतास वेळ व्यतित करण्यासाठी येत असतात. शहरांमध्ये सुद्धा निसर्ग कसा जोपासावा याचे हे उत्तम उदाहरण आहे!
आधी लेखात म्हटल्याप्रमाणे ही झाली लंडन शहराची धावती भेट! एक जाणकार म्हणून ह्या शहराला भेट देण्याचा योग भविष्यात यावा ही इच्छा !
ऋणनिर्देश
श्री संदीप पाटील - सहलनोंदी
श्री मनोहर राय - सहलनोंदी
विकिपीडिया
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना.
आधीच्या भागाच्या लिंक्स
सुरेख्
उत्तर द्याहटवापरंतु please (तुम्ही लंडन रिर्टन असल्याने हे वापरावं लागतयं!!)
१.हे साप्ताहीकावरुन दैनिक आवृत्तीवर आणा.
२. एैकिवा नुसार त्यानी चोरलेल्या भारतीय वस्तु ( कुणाचा चष्मा, कुणाचं पायताण) वगैरे दिसल्यास त्याचीही नोंद करा.
३.त्यांच एवढ मार्केटिंग होतय तर जमल्यास दैनंदीन खर्च ही द्या, भारतीय आकड्यात !!
म्हणजे आपलंगाव कस छान हे स्वतःला पटवायला जरा मदत होईल
😂😂