१५ जून २०२४
आमच्यासाठी आजच्या दिवसाची सुरुवात खूपच लवकर झाली. रात्री अकरा वाजता झोपून तीन वाजता उठण्याचा उत्साह केवळ युरोप दौऱ्यामध्येच आपण दाखवू शकतो. साधारणतः साडेचार वाजता आम्ही सर्वांनी आंघोळी आटपून बॅग्स घेऊन चेकआउट केलं. रुमभर केलेल्या पसाऱ्याला मोजक्या अवधीत बॅगांमध्ये भरून चेकआऊट करण्याचे कौशल्य सहलीतील पुढील काही दिवसांत आम्ही वारंवार दाखविलं. हॉटेलबाहेर बस तयारच होती. त्यामध्ये सर्वांनी बॅग्स भरल्या. इतक्या भल्या पहाटे नाश्ता देणे / करणे शक्य नसल्यामुळे आम्हांला पाकीटबंद नाश्ता देण्यात आला होता. बस St. Pancras International ह्या स्थानकाच्या दिशेने धावू लागली. पहाटेच्या प्रसन्न वेळी हा प्रवास खूप सुंदर वाटत होता. पांघरूण घेऊन सर्व लंडनवासी झोपले असावेत. त्यांची टुमदार घरे पाहत, निसर्गाचा आनंद घेत आम्ही रेल्वे स्टेशनपाशी पोहोचलो.
प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेबाबत अतुलने फारच मोठा फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरल्यामुळे आम्ही खूपच आधी स्टेशनात पोहोचलो होतो. त्यामुळे स्टेशनच्या एका भागात आम्ही आपल्या सर्व बॅगा गोळा करून उभे राहिलो. हे स्टेशन तसं काही ऐरे गैरे स्थानक नाही. या स्थानकातून युरोपच्या विविध देशांमध्ये जाणाऱ्या युरोस्टारच्या रेल्वे गाड्या सुटतात. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा प्रवास जिथं येतो, तिथं अर्थातच इमिग्रेशन अधिकारी आपले बस्तान मांडून बसलेले असतात. आपण भारतीयांच्या दृष्टीने याहून महत्त्वाची खासियत म्हणजे याच स्टेशनवर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या अत्यंत यशस्वी चित्रपटातील शाहरुख खान आणि काजोल यांच्यातील रेल्वेगाडीतील सुप्रसिद्ध प्रसंग चित्रित करण्यात आला होता. खूपच लवकर आल्याचे दुःख सर्व प्रवाशांनी विसरावे म्हणून अतुलने हे प्रत्यक्ष स्थळ कुठे आहे ते आम्हाला सांगितले. अर्थातच सर्वांनी आपली छायाचित्रं त्या ठिकाणी टिपून घेतली.
John Betjeman ह्यांचा ह्या स्थानकातील पुतळा! सर जॉन हे विसाव्या शतकातील ख्यातनाम ब्रिटिश लेखक, कवी होते. १९७२ सालापासून ते मृत्यूपर्यंत त्यांना Poet Laureate ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आलं होतं . त्यांनी ह्या स्थानकाची मोडतोड थांबविण्यात पुढाकार घेतला होता.
थोड्याच वेळात इमिग्रेशनसाठी वीणा वर्ल्डच्या पर्यटकांना बोलावण्यात आल्याची उद्घोषणा अतुलनं केली. आम्ही सर्व धावपळ करत इमिग्रेशन कक्षांपाशी पोहोचलो. आंतरराष्ट्रीय इमिग्रेशन अनुभव हा बऱ्याच वेळा अत्यंत क्लेशदायी असतो. पट्टा, संगणक, नाणी, कंगवा, कधी कधी तर बूट हे सर्व प्रकार ट्रे मध्ये काढून आपली सुरक्षा तपासणी केली जाते. इथे तर क्वचितच महिलांना दागिने सुद्धा ट्रेमध्ये ठेवण्यासाठी सांगितले जात होते. कसाबसा हा प्रसंग आटपून आम्ही पुढील कक्षामध्ये गेलो. एखाद्या रेल्वे स्टेशनवर इमिग्रेशन करण्याचा आमचा पहिलाच प्रसंग होय. आमचा शेंघेन व्हिसा हा लंडन येथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तपासून पाहिला असावा. यापुढील बारा दिवसात कोणीही आमच्या पासपोर्ट अथवा व्हिसाची तपासणी केली नाही. इमिग्रेशन अधिकारी ज्या ज्यावेळी पारपत्रातील / व्हिसावरील माझ्या छायाचित्राकडं पाहून माझ्याकडं पाहतो त्या प्रत्येक वेळी माझ्या मनात असंख्य शंका निर्माण होतात.
आमच्या पॅरिसला सुटणाऱ्या ट्रेनची वेळ साडेसात वाजताची होती. परंतु आम्ही आधीच पोचल्यामुळे तेथील सर्व आसने साडेसहाच्या ट्रेनच्या प्रवाशांनी व्यापली होती. त्यामुळे आम्हांला उभं राहून त्यांची रेल्वे गाडी येण्याची वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नव्हता. शाळेत बऱ्याच वेळा हिंदी भाषेत 'रेल्वे प्लैटफ़ॉर्मपर आधा घंटा' असा निबंध लिहायला सांगत असत. ह्या अनुभवानंतर नक्कीच त्यात थोडीफार भर घालता आली असती. थोड्याच वेळात साडेसहाच्या आगगाडीची उद्घोषणा झाली. ही मंडळी वरील मजल्यावर जाताच आम्हांला बसण्यासाठी आसने उपलब्ध झाली. स्थानापन्न होताच आम्ही दिलेल्या नाश्त्याच्या पाकिटांवर लक्ष केंद्रित केले.
सात वाजून दहा मिनिटाच्या सुमारास अतुलने आम्हां सर्वांना एका रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत वर जाणाऱ्या एस्केलेटरच्या विभागात बोलावले. या महिला रेल्वे अधिकाऱ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. भारतीय शहरातील वाहतूक, भारतीय खाद्यपदार्थ, भारतीय अभिनेते याविषयी ती आपली मजेदार मते आपल्या एका विशिष्ट शैलीत आम्हांला सांगत होती. यात आमच्या सर्वांचा वेळ चांगला गेला. भारतीय क्रयशक्तीचे महत्व ध्यानात घेता आपल्या पर्यटकांना चांगला अनुभव मिळावा ह्यासाठी काही ठिकाणी निक्षून प्रयत्न केले जात असावेत.
आमची ट्रेन एका फलाटावर आली होती. सर्व मोठ्या बॅग्स आम्ही सर्वांनी सामानाच्या मागच्या डब्यात नेऊन ठेवल्या. छोट्या बॅगांसह आम्ही आमच्या आसनांवर येऊन बसलो. आपल्या बॅगा मागच्या डब्यात सुरक्षित राहतील की नाही याची काळजी करू नये हे अतुलने आम्हांला आधीच सांगितले असल्यामुळे आम्ही अगदी शाश्वत होतो. म्हणजे मी शाश्वत नसलो तरी अनुभवानं ज्या बाबतीत आपण काही करू शकत नाही त्याची चिंता करू नये हे शिकलो आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास लंडनहुन सुटणारी ही रेल्वे गाडी पॅरिस येथे तेथील स्थानिक वेळेनुसार दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते. दोन्ही देशांच्या स्थानिक प्रमाण वेळेत एक तासाचा फरक आहे. आता दोन स्थानकांतील अंतर देणेच फक्त बाकी आहे. मग गाडीचा सरासरी वेग किती असा प्रश्न विचारण्यासाठी तयार असलेले भिडे सर आठवतात.
डब्यातील काही आसने ही प्रवासाच्या दिशेने आणि उर्वरित उलट्या दिशेने तोंड करून होती. ज्या प्रवाशांना धावत्या गाडीचा त्रास होत असतो त्यांना प्रवाशाच्या दिशेने असलेली आसने मिळावीत ही प्रभूचरणी प्रार्थना! ज्याची दुःख त्यालाच माहिती. आमची युरोस्टारची तिकीट प्रति प्रवासी १२७ युरो इतकी होती. एक युरो भारतीय रुपयांच्या तुलनेत ९० - १०० मध्ये असावा. आमची तिकिटं बरेच महिने आधी बुक करण्यात आली होती.
पहिली युरोस्टार ही लंडन आणि पॅरिस या शहरांमध्ये साधारणतः ३० वर्षांपूर्वी सुरू झाली. इंग्लिश खाडीच्या समुद्राखालून जाणारा जवळपास ५१ किमी लांबीचा बोगदा हे या रेल्वे प्रवासाचे खास वैशिष्ट्य! या दोन शहरातील ह्या रेल्वेसेवेच्या यशामुळे प्रेरित होऊन कालांतरानं लंडनपासून युरोपातील अनेक शहरांमध्ये जाण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. युरोस्टार सेवेच्या नावे अनेक विक्रम आहेत. युरोस्टार वापरत असलेला ब्रिटिश खाडीतील बोगदा हा काही काळ जगातील सर्वात लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जात असे. मध्यंतरी एका युरोस्टार ट्रेनने प्रति ताशी ३३४ किलोमीटर इतक्या वेगाची नोंद केली होती. २००६ साली युरोस्टारच्या गाडीनं लंडन ते कान्स हा १४२१ किलोमीटर लांबीचा प्रवास कुठंही न थांबता सात तास पंचवीस मिनिटात पार करून सर्वात दीर्घकालीन लांब पल्ल्याचा टप्पा विनाथांबा पार करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. कान्स ह्या शहराचं नांव भारतीय अभिनेत्रींनी तिथल्या फेस्टिवलला हजेरी लावली ह्या संदर्भाव्यतिरिक्त ऐकण्याची ही पहिलीच वेळ !
आगगाडीने लंडन सोडताच काही वेळातच अत्यंत सुंदर अशा हिरव्यागार शेतीच्या दृश्याने आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
इतक्या प्रचंड वेगाने ही रेल्वेगाडी प्रवास करत असली तरीसुद्धा पोटातील पाण्याचा एक थेंबसुद्धा हलत नव्हता (हा मराठीतील शब्दप्रयोग आहे, खरं की काय असं मला विचारू नये!). सराईत लोक झोपी गेले, काही लोक पुस्तक वाचण्यात दंग झाले. मी लहान मुलाच्या उत्साहानं बाहेरील निसर्गाची विविध रूपं डोळ्यांत सामावून घेण्यात दंग होतो. प्रत्यक्ष बोगदा ज्यावेळी रेल्वेगाडीने पार केला त्यावेळी अंधारातून इतक्या प्रचंड वेगाने जाण्याचा अनुभव संस्मरणीय होता. इंग्लिश खाडी खालील जवळपास ५१ किलोमीटर लांबीचा बोगदा आमच्या गाडीनं वीस मिनिटांच्या अवधीत पार केला. थोड्याच वेळात भोवतालच्या शेतामध्ये पवनचक्क्या दिसू लागल्या. या पवनचक्क्यांनी पुढील पूर्ण युरोप प्रवेशात आमची साथ दिली. मोठ्या संख्येने युरोपभर जागोजागी असलेल्या या पवनचक्क्या विद्युत निर्मितीचा बराचसा भार घेत असतील याविषयी काही शंका नाही. पुढील काही पोस्टमध्ये या पवनचक्क्यांची छायाचित्रे नेमाने येत राहतील. या रेल्वे प्रवासात दोन्ही बाजूला हिरव्या गवतांचे गालिचे मैलोनमैल पसरलेले होते. युरोपातील दूधदुभत्या जनावरांसाठी चाऱ्याची प्रचंड प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे पिकांसोबत हा चाऱ्याचे उत्पादन करणे हा देखील एक मोठ्या प्रमाणातील उद्योग आहे.
पॅरिसच्या Gare du North च्या स्थानकावर पोहोचल्यावर बॅगा ताब्यात आल्या व आम्ही हुश्श केले. बॅगा खेचत आम्ही फलाटाच्या एका कोपऱ्यात येऊन उभे राहिलो. मध्ये चार-पाच पोलीस एकत्र उभे होते. ते कस्टम्स अधिकारी असावेत अशी मी सोयीस्कर समजूत करून घेतली. पॅरिस रेल्वे स्थानकाबाहेर अपघात झाल्यामुळे आमची बस अडकून पडली होती. त्यामुळे आम्हांला बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागली. ह्या वेळेत प्रवाशांनी स्वदेशातून आणलेल्या विविध फराळी पदार्थांचा आनंद लुटला. युरोपातील बहुतेक देशांमध्ये तेथील स्थानिक नागरिक हा प्रवासी मार्गदर्शक म्हणून घेणे बंधनकारक असावं. बसच्या प्रतीक्षेत असताना स्वीडिश नागरिकत्व असलेली आमची वाटाडी आमच्या सोबतीला आली. अतुल हा आमच्या बस आणि चालकाच्या शोधासाठी गेला होता. इतका वेळ वाट पाहायला लावल्याबद्दल अतुल येताच त्याला "काय हे अतुल?" असं तिने मराठीत म्हणावे याचे प्रशिक्षण आमच्या सहप्रवाशांनी तिला दिले.
पॅरिस स्थानकांबाहेर बस येऊन उभी राहिली. आम्ही आमच्या बॅगा घेऊन तिथे मार्गक्रमण केले. हा भाग काहीसा गलिच्छ म्हणता येईल असा होता. तिथं रस्त्यावर फिरणारे काही युवक होते. त्यांच्याकडे पाहून सुरक्षिततेच्या भावनेमध्ये नक्कीच वाढ होत नव्हती. बसमध्ये आम्ही आमचा पुढील दहा दिवसांचा चालक जॅक याला प्रथमच भेटलो. हा साधारण तिशीतला, भारदार मिशा असलेला पोलंडचा युवक होता. इथं चालकांसोबत क्लीनर हा प्रकार नसतो. त्यामुळे जॅकच आम्हांला आमच्या वजनदार बॅगा बसच्या पोटामध्ये ठेवण्यासाठी वगैरे मदत करत असे.
आमचा प्रवास आता उपहारगृहाच्या दिशेने सुरू झाला. आमची मार्गदर्शक आम्हाला पॅरिस विषयी बरीच माहिती देत होती. पॅरिस शहराची लोकसंख्या जवळपास १.१ कोटी इतकी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सुगंधी द्रव्ये (परफ्युम), स्थानिक उत्पादनाची दुकाने तिने आम्हांला दाखविली. येथील सरकार या आस्थापनांवर कर आकारून चांगले उत्पन्न घेते. रस्त्याच्या बाजूला असलेले आफ्रिकन मार्केट सुद्धा तिने आम्हाला दाखविले. पॅरिस शहर हे २० जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहेत. काही वेळाने पॅरिस शहराचा अत्याधुनिक असा भाग आम्हाला दिसला. इथं कित्येक आर्थिक कंपन्यांची कार्यालये आहेत.
Arc De Triomphe (Arch of Triumph) हे पॅरिसमधील सर्वात अधिक प्रसिद्ध स्मारकांपैकी एक होय ! फ्रान्स राज्यक्रांती, नेपोलियनिक युद्धातील हुतात्मांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे.
खरं तर पॅरिस पहावं ते रात्रीच्या वेळी! त्यावेळी तेथील आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे तरुण-तरुणी नवनव्या फॅशनचे कपडे परिधान करून रस्त्यांवर उतरतात. आमच्या वेळापत्रकात ह्यासाठी वेळ नव्हता. आयफेल टॉवरकडे जाताना आम्हाला प्रशस्त रस्ते, आधुनिक कपड्यांची, महागड्या ब्रँड्सची आस्थापने पाहायला मिळाली. हॉलीवुडमधील नामांकित सितारे इथे खरेदीसाठी येत असतात. वाटेतच ब्रिटनची प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी फायेद यांचा जिथे अपघात झाला ती जागा सुद्धा आम्हांला लांबून पहायला मिळाली. अत्यंत दुर्दैवी असा हा प्रसंग !
पुन्हा एकदा एका चांगल्या अशा भारतीय उपहारगृहात आम्ही भोजन घेतले. बाहेर हवामान खूपच थंड झाले होते. बोचरे वारे वाहू लागले होते. उपहारगृहात जाण्याच्या आधी आम्हांला पॅरिस शहराचे मुख्य आकर्षण असलेला आयफेल टॉवर प्रथमच दिसला होता. दिवसभर तो वेगवेगळ्या ठिकाणाहून दिसत राहिला. बसने आम्हांला आयफेल टॉवरपासून काही अंतरावर सोडले. टॉवरचा इतिहास खूपच मनोरंजक आहे. या टॉवरला आयफेल हे नाव गुस्ताव आयफेल या अभियंत्यामुळे पडले. गुस्तावने १८८७ ते १८८९ या कालावधीमध्ये या टॉवरची संरचना आणि बांधकाम करण्यात मोलाचा वाटा उचलला. ज्यावेळी आयफेल टॉवर उभारण्यात आला त्यावेळी जगातील सर्वात उंच मनुष्यरचित इमारतीचा बहुमान त्याला मिळाला होता. पुढील ४१ वर्ष हा बहुमान कायम राहिला होता. पायापाशी हा टॉवर चौरसाकृती आहे. A, B, C, D असे नांव पायाच्या प्रत्येक खांबाला देता येईल. ह्या प्रत्येक बाजूने आपण आयफेल टॉवरवर चढू शकतो. आयफेल टॉवरवर चढताना तीन ठिकाणी तुम्हाला सुरक्षा तपासणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे व्यवस्थित तयारीत राहणे आवश्यक असते, आपल्या जवळील ऐवज आटोपशीर ठेवावेत.
या टॉवरची उंची 330 मीटर इतकी आहे. भेट देणारे पर्यटक या टॉवरच्या तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर जाऊ शकतात. पहिल्या आणि दुसऱ्या पातळ्यांवर काही उपहारगृहेसुद्धा आहेत. सर्वात वरील म्हणजे तिसऱ्या पातळीवरील प्लॅटफॉर्म हा २७६ मीटर उंचीवर आहे. आम्ही गेलो त्यावेळी तिसऱ्या पातळीवर जाणारी लिफ्ट बंद करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या पातळीवरूनच पॅरिसचे मनोहारी दर्शन घेण्यात आम्हाला समाधान मानावे लागले. जर तुम्हाला लिफ्ट वापरायच्या नसतील तर चालत जाण्यासाठी जिने सुद्धा उपलब्ध आहेत. पूर्वी कधीकाळी एक माणूस ११ मिनिटात आयफेल टॉवरच्या तिसऱ्या पातळीपाशी धावत पोहोचला अशी माहिती आम्हांला देण्यात आली.
पॅरिसमध्ये चोरट्यांपासून आपल्या मौल्यवान वस्तू आणि पारपत्रे यांची काळजी घ्यावी हे अतुल आम्हांला वारंवार बजावून सांगत होता. आयफेल टॉवरच्या भोवताली बरेचशे आफ्रिकन युवक आयफेल टॉवरच्या छोट्या प्रतिकृती विकण्यासाठी घेऊन बसले होते. त्यांच्यासोबत किमतींविषयी घासाघीस करा पण सांभाळून! हे आम्हांला बजावण्यात आले.
आयफेल टॉवरची, टॉवरवरून घेतलेली पॅरिस शहराची विविध नयनरम्य छायाचित्रे !
केवळ इमारतींनी व्यापलेले असे हे शहर नसून बऱ्याच ठिकाणी हिरवीगार उद्याने ऐतिहासिक वास्तू दिसत होत्या. पॅरिसमध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस ऑलिंपिक सुरू होत असल्यामुळे शहराच्या काही भागांमध्ये वाहतुकींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. टॉवरवरून ऑलिंपिकसाठी बांधण्यात येत असलेल्या एका स्टेडियमचे दर्शन सुद्धा आम्हांला घडले. थंडगार वाऱ्यांमुळे या पातळीवर उभे राहणे काहीसे कठीण होत होते. खाली उतरल्यावर बसमध्ये जाईपर्यंत आमच्यातील काही प्रवाशांनी आयफेल टॉवरच्या प्रतिकृती विकत घेतल्या. ऑलिंपिकच्या निमित्ताने आयफेल टॉवरला नव्याने रंगरंगोटी करण्यात येत आहे. २५ रंगारी गेले १८ महिने या महाकाय संरचनेला रंग देत आहेत. आयफेल टॉवरवर ऑलिंपिकच्या रिंग्ससुद्धा जोडण्यात आल्या आहेत.
आयफेल टॉवरच्या भेटीनंतर आम्ही सीन नदीवर बोट राईड घेतली. ही अत्यंत मनोहारी अशी राईड होती. आमची बोट यायला काही वेळ असल्यामुळे तेथील दुकानांमध्ये विंडो शॉपिंग करण्यात आम्ही वेळ घालवला. बोट राईट मध्ये ह्या नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या पॅरिस शहरातील विविध प्रसिद्ध वास्तूंचे आम्हाला दर्शन घडले.
Louvre Palace - फ्रेंच शब्दांचा त्यांच्या स्पेलिंगनुसार आपल्या समजुतीनं उच्चार करण्याचा प्रयत्न करणं मी फार पूर्वी सोडून दिलं आहे. Louvre Palace हा पुरातन काळातील राजवाडा हल्ली संग्रहालय म्हणून वापरला जातो.
हा अजून एक पूल Pont Alexandre III! ह्या दोन उदाहरणांवरून Pont म्हणजे फ्रेंच भाषेत पूल हे सूज्ञांस सांगणे न लगे !
हवामान थंडगारच असल्यानं बोटीच्या बंदिस्त भागात राहणे बहुतेकांनी पसंत केले. परंतु बाहेर जाऊन दिसणाऱ्या पॅरिस शहराच्या सुंदर रूपाचे आनंद लुटणे काहींनी पत्करले. आयफेल टॉवरची काही विहंगम दृश्यं आम्हांला या प्रवासादरम्यान पहायला मिळाली.
Palais De Justice - अर्थात पॅरिसमधील न्यायालयं ! नदीतून पाहताना मस्त वाटतंय !
Norte Dame de Paris - थोडक्यात सांगायचं झालं तर Our Lady Of Paris. कॅथॉलिक धर्मियांचे मध्ययुगात उभारलेले सीन नदीच्या काठावरील Île de la Cité ह्या बेटावरील चर्च आहे. फ्रान्समध्ये उगम पावलेल्या गॉथिक स्थापत्यशास्त्राचा हे एक उत्तम नमुना म्हणून ओळखलं जातं.
पुन्हा एकदा आयफेल टॉवर !
हिरवागार नदीचा किनारा !
काठावरील एक विहंगम दृश्य !
रात्री पॅरिस पाहायला येण्यासाठी कोणी उत्सुक आहात का? अशी विचारणा करण्यात आली. भल्या पहाटे तीन वाजता इंग्लंडमध्ये उठून इतक्या लांबचा पल्ला गाठल्यामुळे बहुदा सर्वजणांच्या उत्साह पातळ्या आता किमान पातळीवर आल्या होत्या. त्यातच रात्रही साडेदहानंतर होत असल्यामुळे विद्युत रोषणाईत दिसणारे पॅरिस शहर पाहायचे असेल तर मध्यरात्रीपर्यंत जागायची तयारी असायला हवी होती. या कारणास्तव सर्वांचे उत्तर नकारार्थी आले.
अशा प्रकारे एका प्रदीर्घ दिवसाची अखेर रोजी बीएनबी हॉटेल इथं रात्री झाली. इथं आमच्या सहप्रवाशांसोबत लिफ्टमुळे काही मजेशीर प्रसंग उद्भवले. तुम्हांला ज्या मजल्यावर जायचं असते त्या मजल्यावरील खोलीची चावी तुम्ही उद्वाहकातील सेंसर समोर दाखवणे अपेक्षित असते तरच उद्वाहक त्या मजल्यावर थांबतो. ही मूलभूत गोष्ट काही जणांना न कळल्यामुळे गोंधळासदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरीत शेवटचा सदस्य आपल्या खोलीत पोहोचायला जवळपास एक तास लागला. याला जबाबदार असणाऱ्या सदस्यांना योग्य समज देण्यात आली. रात्रीचे जेवण हे दुपारी जेवण घेतलेल्या उपहारगृहातूनच पॅक करून देण्यात आले होते. हे फारसे काही रुचकर जेवण नसल्यामुळे आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकलो नाही. हॉटेलमधील रूम ही प्रशस्त होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाथरूम हे वेगळे होतं. पुढील दिवशी लवकर उठण्याची वेळ ध्यानात घेऊनच आम्ही तात्काळ निद्राधीन झालो.
लंडनप्रमाणेच पॅरिससुद्धा ओझरतंच पाहिलं. पुन्हा कधी संधी मिळाली तरी पाहण्यासारखं खूप काही आहे.नक्की काय बघायचं आहे ह्याची जाणीव ह्या भेटीने झाली हे ही नसे थोडकं !
ऋणनिर्देश श्री संदीप पाटील - सहलनोंदी श्री मनोहर राय - सहलनोंदी विकिपीडिया सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना.
ऋणनिर्देश
श्री संदीप पाटील - सहलनोंदी
श्री मनोहर राय - सहलनोंदी
विकिपीडिया
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना.
क्रमशः !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा