आमच्या केबल टीव्हीवर काही धाटणीबाहेरच्या वाहिन्या सुद्धा येतात. ह्यात CGTN (चिनी वाहिनी), DW TV (जर्मन वाहिनी), RT (रशियन वाहिनी), France TV ह्या आणि इतर काही वाहिन्यांचा समावेश होतो. जाहिरातींनी व्यापलेल्या टीव्हीच्या स्क्रीनवरील उर्वरित भागातुन डोकावणाऱ्या वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या जसे की महाराष्ट्रातील पिकांची परिस्थिती, उत्तर भारतातील टोल नाक्यावर घातलेला गुंडांचा हैदोस वगैरे बघण्याची इच्छा नसेल तर मग मी ह्या वाहिन्यांकडे वळतो. तसं पाहिलं तर सह्याद्री आणि दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवरील बातम्या पाहण्यास मला आवडतं. पुर्ण पडद्यावर कोणत्याही जाहिरातींचा नसलेला अडथळा, आक्रस्ताळेपणाने न ओरडणारे, चित्रविचित्र हावभाव न करणारे निवेदक असले की मला शांत वाटतं.
CGTN (चिनी वाहिनी) वर अनेक उदबोधक कार्यक्रमांचे प्रक्षेपण केलं जाते. त्यावर पाश्चात्य देशातील निवेदक सुद्धा असतात. आणि चिनी सरकारचा कायम पुरस्कार केला जात नाही. त्यांचा Big Story हा कार्यक्रम सुद्धा उदबोधक असतो. गुगलवर Big Story + CGTN + Archive असा शोध घेतला असता अनेक माहिती देणाऱ्या लिंक्स सापडतील.
आजच्या पोस्टचा विषय France TV वर ह्या आठवड्यात पाहिलेल्या फ्रान्स राष्ट्रातील नकारात्मकता (Pessimism) हा आहे. फ्रान्स राष्ट्रातील नकारात्मकतेविषयी सखोल चर्चा घडवुन आणली जात होती. चर्चेची सुरुवात आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या फ्रान्समधील लोकांनी नकारात्मक भुमिका स्वीकारलीच कशी ह्या विस्मयकारी सुरातून झाली. मग चर्चेचा ओघ तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुम्ही जीवनात आनंदी असणं ह्याचा थेट संबंध असतोच असे नाही इथं गेला. चर्चेत भाग घेणारी अनेक मंडळी असल्यानं एकानं अचानक फ्रान्स राष्ट्रात नकारात्मकता पिढ्यानपिढ्या ठासुन भरली आहे असे छातीठोकपणे प्रतिपादन केले. त्यानंतर शालेय जीवनातील आणि इतर सामाजिक व्यासपीठावरील तारुण्यातील अनुभव कदाचित ह्या नकारात्मकतेला कारणीभुत ठरत असतील असा सूर आळवला गेला. प्रत्यक्ष मन:स्थितीपेक्षा त्या मनःस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेत / शब्दप्रयोगात कदाचित नकारात्मकता भरली असावी असाही संशय व्यक्त केला गेला. एकंदरीत पुढील पिढी आपल्यापेक्षा अधिक आनंदी आयुष्य जगू शकेल ह्याविषयी फारसं कोणी आशावादी दिसलं नाही.
हा कार्यक्रम पाहुन एका तत्त्वावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सर्वमान्य समस्या आयुष्यातुन निघुन गेल्या की माणुस, समाज नवनवीन समस्यांचा शोध घेऊ लागतो. ह्या नवनिर्मित समस्यांच्या वसाहतीकरणात विद्वान लोक चर्चेच्या माध्यमातुन मोलाचा हातभार लावतात. पण एक गोष्ट मला जाणवली. एकंदरीत पुढील पिढी आपल्यापेक्षा अधिक आनंदी आयुष्य जगू शकेल ह्याविषयी फारसं कोणी आशावादी दिसलं नाही. हा भाग कदाचित आपल्या भारतीयांना सुद्धा लागु होत आहे. आपल्या आधीच्या पिढी किमान शिक्षणानं आपली पुढील पिढी आपला जीवनस्तर उंचावु शकेल असा आशावाद बाळगुन होती. आजची पिढी कदाचित सध्याचा जीवनस्तर बऱ्यापैकी उंचावल्यामुळं जीवनस्तर ह्याहुन अधिक उंचावणं म्हणजे चंगळवादाच्या आहारी जाण्याचं भय बाळगुन आहे. मागच्या पिढीला संस्कारी समाजाचं बऱ्यापैकी वरदान लाभलं होतं. आज हे कवच पुर्णपणे भेदले गेले आहे. थोडक्यात माझ्या मानसिक गोंधळात अधिक भर पडली आहे. परत आपल्या मराठमोळ्या वाहिन्यांकडं मोर्चा वळविलेला बरा ! आणि हो फ्रेंच पुरुष अगदी देखणे, रसिक वगैरे जे काही वाचलं होतं त्यामुळं निर्माण झालेल्या प्रतिमेला धक्का पोहोचला तो वेगळाच !
नंतर दोनच दिवसांनी CGTN टीव्हीवर एल साल्वाडोर मधुन अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडुन निघालेल्या आणि वाळवंटांतील अत्यंत कठोर हवामानामुळं मृत्यमुखी पडलेल्या तरुणावर आधारित एक ४५ मिनिटांचा कार्यक्रम पाहावयास मिळाला. अचानक खऱ्या समस्यांचं वास्तविक दर्शन पाहुन मन हेलावुन गेलं !
यंद्याच्या वर्षी कंपनीच्या सुट्ट्यांच्या वाटपात काहीसा वेगळेपणा आल्यानं आज सुट्टी मिळाली! खरं तर चांगलं काही गोड गोड बोलायला हवं होतं पण ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा