"वत्सा, पुरे झाला तुझा आडमुठेपणा !" भगवंताचे संतप्त उदगार माझ्या कानात पडताच मी प्रचंड हादरलो.
"तुला ह्या क्षणी झोपेतुन जागे होण्याची इच्छा असली तरी मी माझा संदेश दिल्याशिवाय तसं होऊ देणार नाही हे लक्षात असु देत !" भगवंत म्हणाले.
"भगवंता, माझा नक्की प्रमाद काय झाला हे कृपा करुन सांगाल का?" मी म्हणालो.
"तुझ्या ब्लॉगमधुन तू सद्यःकालीन कलाकृतींना अजिबात स्थान दिलं नाही. ह्यात दोन शक्यता आहेत. एक तर तु सद्यःकालीन कलाकृतींपासून पुर्णपणे अनभिज्ञ आहेस किंवा तु त्यांना हेतुपुरस्पर पुर्णपणे दुर्लक्षित ठेवलं आहे." भगवंतांचा पारा खाली उतरण्याची चिन्हं दिसत नव्हती.
"मला माफ करा भगवंत ! माझी चुक मला पुर्णपणे मान्य आहे. पण सद्यकालीन कलाकृती ह्या संज्ञेचा व्यापक अर्थ ध्यानात घेता तुमचा रोख नक्की कशावर आहे हे ह्या पामरास तुम्ही सांगितलं तर बरं होईल !"
"तु सद्यःकालीन हिंदी गाण्यांवर एकही पोस्ट लिहिली नाहीस!" भगवंतांचा राग काहीसा निवळला होता.
"ठीक आहे मी प्रयत्न करतो!" मी म्हणालो. मी ही गाणी पाहतच नाही असं खोटं बेधडकपणे बोलण्याचा मोह मी समोर भगवंत असल्यानं टाळला. भगवंतांकडे ह्याविषयी अधिक चौकशी करण्याची माझी मनिषा भगवंत अचानक अंतर्धान पावल्यानं अपुर्णच राहिली.
दिवस उजाडताच मी भगवंतांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी म्हणुन केबल टीव्ही सुरु केला. सकाळसकाळी ही गाणी मी सुरु केली आहेत हे पाहुन घरात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पण अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडं वेळ नव्हता. अचानक मी एका वेगळ्या दुनियेत प्रवेश करत असल्याची मला जाणीव होऊ लागली. समोर मैं बावली हुँ तेरी ! ह्या गाण्यावर नायक नायिका नृत्य करत / थिरकत होते!
जो अख लड़ जावे
सारी रात नींद ना आवें
मैनूं बड़ा तडपावे
दिल कहीं चैन ना पावे !
कदाचित भगवंतांनी केलेल्या किमयेचा परिणाम म्हणुन मला ह्या गाण्यातील भावार्थ पुर्णपणे उमगु लागला होता. हे नाथा, आपली नजरानजर काय झाली आणि तु माझी चैन, झोप सर्व काही हिरावुन घेतलं आहेस.
मैं बावली हूँ तेरी
तू जान हैं ना मेरी।
एक प्यार ही माँगा था
किस बात की हैं देरी !
ये रात कभी ना आवे !
शेवटच्या ओळींचा अर्थ लावताना मला सर्वप्रथम लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो ह्या गाण्याची आठवण झाली. अचानक भगवंतांची संतप्त मुद्रा माझ्यासमोर प्रकट झाली.
"अरे वेड्या! गीतकार ह्या ओळीतून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छितो, की परीक्षेआधीची ही शेवटची रात्र आहे! गपचुप अभ्यास करा, ही रात्र परत येणार नाही, नंतर पस्तावाल !"
ह्या गाण्याचा उदात्त अर्थ समजल्यानं मी धन्य झालो होतो. इतके दिवस उगाचच ह्या नवीन काळातील उत्तमोत्तम गाण्यांचा अर्थ समजुन घेण्याचा आपण प्रयत्न सुद्धा केला नाही ह्या भावनेमुळं मी पश्चात्तापदग्ध झालो होतो. परदेशी बातम्यांच्या वाहिन्या पाहण्यापेक्षा अशी भावार्थाने भरलेली गाणी पाहता यावीत ह्यासाठी केबल प्लॅनमध्ये बदल करण्याचा माझा मानस पक्का झाला होता.
केवळ अर्थ समजला म्हणुन मी धन्य झालो आहे ही गोष्ट भगवंतांना पटली नसावी. शेवटी भगवंतच ते !
"तु गाणं केवळ ऐकलं की पाहिलं सुद्धा?" माझ्या कानात आवाज आला.
"हो पण सकाळसकाळी दिवाणखान्यात हे गाणं पाहायला फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती !" मी हळु आवाजात पुटपुटलो!
"अरे मुर्खा, नायक - नायिकेचा फिटनेस पाहिलास का? सद्यःकालीन तरुण पिढी इंटरनेटच्या अधीन होऊन आपली शारीरिक तंदुरुस्ती गमावुन बसत आहे. त्यांनी आपल्या फिटनेसकडे पुन्हा एकदा लक्ष द्यावे असा सुप्त संदेश युवापिढीला देण्यात आला आहे !" मी हे शब्द ऐकुन पुर्णपणे हेलावुन गेलो.
"ह्यापुढील असंच एखादं उदबोधक गाणं सुचवाल का?" असा प्रश्न विचारण्याचा माझ्या मनात विचार आला. परंतु भगवंत आधीच नाराज झाल्यानं त्यांची अधिक नाराजी ओढवुन घेण्याचा धोका पत्करण्यास मी तयार नव्हतो. "Lamborghini चलाये जाने हो" ह्या गाण्यातुन आर्थिक मंदीतून बाहेर पडून आर्थिक समृद्धी कशी संपादन करावी ह्याविषयी नक्कीच सुप्त संदेश दिला गेला असणार ह्याविषयी माझी पुरेपूर खात्री पटली आहे. त्यामुळे हे गाणे नवीन दृष्टीकोनातुन पाहण्याचा / ऐकण्याचा मी दृढ मानस केला. "शनिवारी सकाळी हा काय उद्योग सुरु आहे?" एक नजरेतुन घरातील बॉसने संदेश दिला आणि मी माझा हा उपक्रम तुर्तास स्थगित केला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा