मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

खेल को खेल रहने दो, उसे सायन्स ना बनाओ !


पुर्वी क्रिकेट खेळ ही एक कला होती. खेळात एक प्रकारची नैसर्गिकता होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पोटाची ढेरी असलेले अनेक खेळाडु पाहायला मिळायचे. प्रतिस्पर्धी फलंदाजाने उत्कृष्ट फटका मारला तर त्याला दाद म्हणुन बहुदा त्या फटक्याचा मनापासुन पाठलाग न करण्याची मानसिकता बऱ्याच खेळाडूंत आढळुन येई! केवळ त्या चेंडुला सोबत म्हणुन ते सीमारेषेपर्यंत धावत जात असावेत असा मला संशय येई !

पण मध्यंतरी केव्हातरी क्रिकेटने कलेकडून व्यवसायाचा प्रवास प्रचंड वेगानं केला. तुम्ही केवळ फलंदाज अथवा गोलंदाज असणं हे पुरेसं ठरेनासं झालं.  तुम्ही क्षेत्ररक्षण करताना किती धावा अडविल्या किंवा बहाल केल्या हे तुमच्या पापपुण्याच्या खात्यात जमा होऊ लागले. 

त्यानंतर अजुन एक घटना घडली! निवृत्त क्रीडापटूंची फौजच्या फौज समालोचक, स्तंभलेखक म्हणुन प्रवेश करती झाली. आता ह्या लोकांना सामन्याच्या पुर्ण कालावधीत बोलणं आवश्यक होऊ लागलं. सामन्याच्या काही दिवस आधी आणि नंतर रकानेच्या रकाने भरणं आवश्यक होऊ लागलं. इतक्या प्रमाणात बोलणं, लिहिणं करायचं असेल तर मग उपलब्ध आकडेवारीला संगणकाच्या हाती (CPU) सोपवुन त्याचा कीस पाडण्याची वृत्ती उदयास आली. ४५ ते ५० षटकांच्या दरम्यान भारताच्या उत्तर भागात गोलंदाजी करताना जर भारत पहिली गोलंदाजी करत असेल तर बुमराह प्रतिषटक ४.३४ च्या गतीने धावा देतो आणि जर भारत पाठलाग करत असेल तर हेच प्रमाण ४.५३ होते. अशा अनाकलनीय आकडेवारीचा मारा क्रीडारसिकांवर होऊ लागला ! विराट कोहलीला बाद करायचं असेल तर त्याला राऊंड द विकेट मारा करुन त्याच्या अंगावर उसळी घेणारा चेंडु टाकावा असा सल्ला आमच्या गल्लीतील फेकी गोलंदाजी करणारा मुलगा म्हणाला तेव्हा मी केवळ विस्मय प्रदर्शित केला हे सौम्य विधान ठरेल. त्यालाही दोष का द्यावा? बहुदा त्यानं आदल्या दिवशीच्या सामन्यातील आकडेवारी पाहिली होती. 

इथं एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो! ही सर्व आकडेवारी, हे सर्व विश्लेषण क्रिकेट खेळाडु, त्यांचे मार्गदर्शक, प्रतिस्पर्धी, सहाय्यक ह्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचे आहे. त्यावर ते आपले डावपेच ठरवत असतात. परंतु ज्यावेळी मी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहत असतो त्यावेळी ह्या सर्व आकडेवारीच्या बोज्याखाली मला कससंच होतं. त्यातला मानवी घटक नाहीसा झाल्यासारखं वाटतं ! म्हणुनच मी म्हणतोय खेल को खेल रहने दो... 

बाकी कोणताही  कप्तान ज्यावेळी सामना हरल्यानंतर Boys played well! म्हणतो त्यावेळी हरवलेला हा माणुसकी घटक मला सापडतो ! सामन्याचे विश्लेषण नंतर करु पण ह्या क्षणी माझ्या संघातील खेळाडूंच्या प्रयत्नांची दाद देणं हे ज्या कप्तानाला महत्वाचं वाटतं तो कप्तान माझ्यासाठी आदर्श असतो ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...