ह्या मॅटर हो गया शब्दप्रयोगाची व्याप्ती विस्तृत आहे.
वैश्विक - सध्यातरी ह्या मंडळींनी हा शब्दप्रयोग अंतराळातील घटनांबाबत वापरल्याचे मी प्रत्यक्षात ऐकलं नसलं तरी एखादी उल्का पृथ्वीच्या जवळुन गेली तर मॅटर होते होते बच गया असं ते म्हणु शकतात !
जागतिक - जागतिक राजकारणात पाहिलं तर ट्रम्प आल्यापासुन त्याचं दररोज चीन, उत्तर कोरिया, इराण अशा देशांशी मॅटर होतंच राहतं!
आशिया - सध्या भारत आणि चीन ह्यांचं लडाख इथं मॅटर चालु आहे.
भारत - कोरोना ने जो जगभर आणि भारतात धुमाकूळ घातला आहे त्याचा स्कोप "मॅटर हो गया" च्या पलीकडचा आहे. इथं आपण मॅटर झालं ह्या संज्ञेचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत ! मॅटर झालं ह्या संज्ञेत जुजबी नुकसान करणाऱ्या आणि दीर्घकालीन दुष्परिणाम नसणाऱ्या घटनांचा अंतर्भाव होतो! त्यामुळे आपल्या राज्यात परत जायला उत्सुक असणाऱ्या असंख्य नागरिकांनी वांद्रा स्टेशनबाहेर गर्दी केली ही घटना मॅटर झालं ह्याच्या स्कोपमध्ये येते. पण जर का त्यामुळं अचानक दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला तर मात्र ती मॅटर झालं च्या परिघाच्या पलीकडं जाते!
शाळा / महाविद्यालयीन जीवन - लेक्चर बंक करुन जाताना शिक्षकांनी पकडणं, वर्गात फ्री लेक्चरला क्रिकेट खेळणं, पालकांची सही करण्याचं धारिष्ट्य केलं असता शिक्षकांच्या ते ध्यानात येणं वगैरे फुटकळ घटना मॅटर झालंच्या व्याप्तीत येतात. पुर्वी शाळेत मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं ही मॅटर होण्याची नांदी समजली जायची! पण त्याकाळी हा शब्दप्रयोग अस्तित्वात नव्हता !
घर ते शाळा / कॉलेज - स्कुल बसचा चालक आणि रिक्षाचालक ह्याची बाचाबाची होणे, रेल्वेचा पास संपला असता समोरुन टी. सी. येणं ह्या घटना मॅटर झालं म्हणुन गणल्या जातात.
सोशल मीडिया - व्हाट्सअँप, फेसबुकवरील दैनंदिन घटना जरी मॅटर हो गया इतकी महत्त्वाची नसली तरी कधीतरी तिथंही मॅटर होतात !
घर - ह्या वयोगटात घरी दररोज मॅटर व्हायलाच लागतं. एखाद्या दिवशी मॅटर नाही झालं तर काहीतरी मोठं मॅटर झालं असावं असा ह्यांना संशय येतो ! घरी मॅटर झालं ह्यात मोबाईलवर रात्री दोन - दोन वाजेपर्यंत खेळत राहणं जे पालकांच्या लक्षात येणं, आईनं दिलेलं महत्वाचं काम विसरुन येणं, बाबांना एखादं दुसरं उलट वाक्य बोलणं ह्या सर्व घटनांचा समावेश होतो !
आता आपण तथाकथित मोठ्यांनी ह्या मॅटर झालं ह्या संज्ञेकडून आणि पर्यायानं ह्या वयोगटाकडुन काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं ! जर लहान वयात त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मॅटरना ते इतके हसतखेळत सामोरे जाऊ शकतात तर आयुष्यात मोठं झालेल्या आपल्याला आयुष्यात सामोरे येणाऱ्या तथाकथित समस्यांकडे मॅटर झालं च्या चश्म्यातुन पाहायला काय हरकत आहे ! ही मंडळी मॅटर झालं हे सांगताना कधी दुःखी नसतात, तर त्यांच्या चेहऱ्यावर बहुतेक वेळा मिश्किल भावच असतात! आपणही त्यांच्याकडुन आयुष्याला सामोरे जाण्याचा हा दृष्टिकोन स्वीकारुयात !
आता बघा आठवडाभराची सुट्टी संपल्याने मी ही एक मोठी समस्या आहे असा चेहरा करुन बसलो होतो पण आता मात्र मी मॅटर हो गया असं स्वतःला समजावत आठवड्याला सामोरे जायला तयार झालो आहे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा